‘महाभारत’ हे एक ‘काव्य’ आहे की, तो एक ‘इतिहास’ आहे, अशी चर्चा सतत सुरू असते.
काही दिवसांपूर्वी माझे लेखक मित्र संजय भास्कर जोशी यांचा अचानक फोन आला. ते म्हणाले, ‘तू संपूर्ण महाभारत वाचलेले आहेस, तर मला एक गोष्ट नक्की सांग. महाभारत हे काव्य आहे की इतिहास?’
क्षणभर काय बोलावे ते मलाही कळेना. मी संजयला सांगितले की, पटकन सांगायचे तर मला ते काव्य वाटते आहे. कारण त्यात अनेक ठिकाणी कल्पनेला मुक्त वाव दिलेला आढळतो. म्हणजे, निवातकवचांशी लढण्यासाठी अर्जुन आकाश मार्गाने आपला रथ घेऊन गेला. पाताळात जाऊन अर्जुनाने नागकन्या उलूपीशी लग्न केले. युद्ध झाले, तेव्हा रक्ताच्या खऱ्या खऱ्या नद्या वाहिल्या. रक्तामुळे एवढा चिखल झाला, त्यात रथ रुतून बसले.
महाभारतात ठिकठिकाणी गंधर्व, किन्नर, यक्ष, गुह्यक, साध्य नावाचे देव, पिशाच आणि पितर अशा अस्तित्वांचे उल्लेख आहेत. कल्पनेची भरारी आणि ज्ञानाचे व तत्त्वज्ञानाचे अखंड अवगाहन बघता, महाभारत हे ‘काव्य’ आहे, असेच म्हणावे लागेल.
त्यावर संजय म्हणाला की, ‘मग व्यासांनी स्वतःच महाभारताला ‘इतिहास’ का म्हटलेले आहे?’ त्यावर मी म्हणालो की, ‘काही घडलेल्या घटना त्यात लिहिल्या गेलेल्या असणार म्हणून तसे म्हटलेले असेल.’
मला फार काही बोलता येत नव्हते, म्हणून महाभारतातले त्या वेळी आठवतील ते किस्से सांगून मी ती चर्चा संपवली. गप्पा झाल्या, गंमत झाली, पण मला वाटू लागले की, या प्रश्नावर विचार झाला पाहिजे. गुह्यक, पितरे आणि यक्ष यांचे उल्लेख आहेत म्हणून सगळ्या काव्याला कल्पनेचा आविष्कार म्हणणे कितपत योग्य आहे? मी माझी आधुनिक जीवनदृष्टी महाभारतावर तर लादत नाहीये ना?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
थोर विचारवंत नरहर कुरुंदकरांनी श्रीकृष्ण या व्यक्तिरेखेच्या ऐतिहासिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण’ या त्यांच्या लेखात केला आहे. हा लेख त्यांच्या ‘व्यासांचे शिल्प’ या पुस्तकात उपलब्ध आहे. या लेखात पुराणे आणि काव्ये यांचे एकेक स्तर बाजूला करत कुरुंदकरांनी ऐतिहासिक श्रीकृष्णापर्यंत पोहचायचा प्रयत्न केला आहे.
नरहर कुरुंदकर यांनी स्वतःला घालून दिलेले ज्ञानसंपादनाचे मार्ग निधर्मवादी आहेत. सेक्युलर आहेत. आणि विसाव्या शतकात हे ज्ञानसंपादनाचे मार्ग सर्वमान्यसुद्धा झाले आहेत. श्रीकृष्ण तुरुंगात जन्मला, तो जन्मताच तुरुंगाचे दरवाजे उघडले, त्याच्या पायाच्या अंगठ्याने यमुना दुभंगली आणि वसुदेवाला मार्ग मोकळा झाला, या सगळ्याला कुरुंदकर ‘काव्य’ म्हणतात. कुरुंदकर यांना इतिहास चमत्कारांशिवाय हवा आहे. कुरुंदकरांच्या इतिहासाला ‘फिजिक्स’चा म्हणा, ‘केमिस्ट्री’चा म्हणा किंवा कुठल्याही शास्त्राचा कुठलाही नियम तोडलेला चालत नाही. चमत्कारांनी युक्त असे जे जे काही आहे, त्याला कुरुंदकर इतिहास म्हणत नाहीत.
काव्याला कुरुंदकर कमीही लेखत नाहीत. तुम्ही काव्याचा आनंद घ्या, मानवी जीवनात काव्य आवश्यकच असते, काव्य आपल्याला सुसंस्कृत करते, असे कुरुंदकरांनी लेखात लिहिलेले आहे. कुणाला श्रद्धा ठेवायची असेल तर तीसुद्धा ठेवायला कुरुंदकरांची काही हरकत नाहीये. पण, कुठल्याही परिस्थितीत चमत्कार असलेल्या गोष्टींना कुरुंदकर ‘इतिहास’ म्हणायला तयार होत नाहीत.
हीच गोष्ट गेल्या आणि या शतकातील सर्व आधुनिक विद्वानांची आहे.
माझ्या दृष्टीने येथे प्रश्न असा आहे की, स्वतः महाभारतकार नक्की कशाला ‘इतिहास’ म्हणत आहेत? ‘शास्त्रांचे नियम पाळून जे घडले ते सांगणे म्हणजे इतिहास’ असा अर्थ व्यासांना अभिप्रेत असता तर त्यांनी तसे सांगितले असते. शिवाय असेही सांगितले असते की, जे घडले त्याला काव्याचे पंख लावून आणि त्याचा काव्यात्म विस्तार करून मी येथे मांडत आहे. दोन लाख ओळी लिहिणाऱ्या कवीला एवढी चार वाक्ये लिहिणे अवघड नव्हते.
संजयशी गप्पा झाल्यावर मला असे वाटले की, आपण ‘काव्य’ आणि ‘इतिहास’ या शब्दांचे आधुनिक अर्थ लक्षात घेत असू तर नक्कीच गोंधळ उडणार आहे.
कुरुंदकरांचा लेख वाचल्यावरसुद्धा मला तेच वाटले. कुरुंदकर ज्याला ‘काव्य’ म्हणत आहेत आणि व्यास ज्याला ‘काव्य’ म्हणत आहेत, त्या संकल्पनांमध्ये काही फरक असेल, तर काय करायचे?
महाभारतकार स्वतः महाभारताबद्दल नक्की काय म्हणत आहेत, ते बघायला नको का?
महाभारत अनेक पर्वांत विभागलेले आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे. पहिले पर्व आहे ‘आदिपर्व’. आणि या आदिपर्वातील पहिले पर्व आहे ‘अनुक्रमणी पर्व’. महाभारत सुरू होते नैमिषारण्यात. तिथे एक आश्रम आहे. शौनक ऋषी त्याचे कुलपती आहेत. ते आणि इतर सर्व ऋषी आपल्या विश्रांतीच्या काळात सुखाने बसले आहेत आणि तिथे अचानक लोमहर्षण सौती हे ऋषी येतात. नमस्कार वगैरे झाल्यावर ते शौनक ऋषी सौती ऋषींना विचारतात – ‘हे सौते, आपण कुठून आलात? आपण आपला आतापर्यंतचा काल कसा व्यतीत केला आहे? आपण हे सारे आम्हाला सांगू शकाल का?’
त्यावर सौती म्हणतात की, ‘मी जनमेजय राजाने जे सर्पसत्र केले, त्या वेळी तिथे होतो. त्या वेळी व्यास मुनींना महाभारताची अदभुतरम्य कथा सांगण्याची विनंती केली गेली. तेव्हा महर्षी व्यासांनी त्यांचे शिष्य वैशंपायन यांना महाभारत सांगण्याची आज्ञा केली. वैशंपायन ऋषी व्यासांचे शिष्य असल्याने महाभारताची कथा व्यासांनी त्यांना सांगितलेली होती. वैशंपायन ऋषींनी कथा सांगितली. ती मी तेव्हा मनःपूर्वक ऐकली. त्यानंतर पुढच्या काळात मी खूप प्रवास केला. महान लोकांची चरित्रे देशोदेशी जाऊन ऐकली. तेव्हा मी यातील आपल्याला काय सांगू?’
त्यावर ऋषी म्हणतात की, ‘तुम्ही आम्हाला (वैशंपायन ऋषींनी सर्पयज्ञाच्या वेळी सांगितलेली) ‘भारत’ नामक इतिहासाची संहिता सांगा. तुम्ही आम्हाला व्यासांनी रचलेले आख्यान सांगा.’ (अनुक्रमणी पर्व - श्लोक १७-२१)
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
थोडक्यात सांगायचे तर एकविसाव्या श्लोकात महाभारताला पहिल्यांदा ‘इतिहास’ म्हटले गेले आहे. आणि त्याच वेळी त्याला ‘आख्यान’सुद्धा म्हटले गेले आहे.
यावर सौती आद्य पुरुषाला म्हणजे ईश्वराला नमन करतात आणि म्हणतात की, ‘आता मी तुम्हाला व्यासांचे पवित्र मनोगत सांगणार आहे.’ (१:२२-२५) सौती पुढच्या श्लोकात सांगतात की, ‘काही कवींनी हा इतिहास पूर्वीच वर्णिलेला आहे; इतर काही कवी तो आता सांगत आहेत आणि दुसरे काही कवी या इतिहासाचे भावी काळात कथन करतील.’ (१:२६) थोडक्यात आपल्या लक्षात येते की, ‘आख्यान’, ‘इतिहास’ आणि व्यासांचे ‘मनोगत’ असे तीन शब्द महाभारतासाठी सुरुवातीलाच वापरले गेले आहेत.
पुढच्या श्लोकात सौती म्हणतात – ‘(कवींनी सांगितलेल्या) या इतिहासाच्या रूपाने तीनही लोकांमध्ये अतिशय श्रेष्ठ प्रकारचे ज्ञान सुप्रष्ठित झाले आहे. आणि, पुढच्या पिढ्यांसाठी ते सामावून ठेवले जात आहे.’ (१:२७) इथे सौती महाभारताला ‘इतिहासाच्या रूपाने प्रतिष्ठित झालेले ज्ञान’ म्हणत आहेत.
पुढे सौती म्हणतात की, ‘हे ज्ञान अन्वर्थक शब्दांनी युक्त आहे; त्याचप्रमाणे ते वैदिक आणि लौकिक संकेतांनी युक्त आहे, छंदशास्त्रातील अनेक वृत्तांनी ते नटलेले आहे, आणि म्हणून प्रज्ञावंतांना ते प्रिय आहे.’ (१:२८) इथे सौती अन्वर्थक शब्द, (भाषणाचे) वैदिक संकेत आणि छंदशास्त्राचा उल्लेख करतात. इथे पहिल्यांदा महाभारतावर काव्याची छाया तयार होते.
पुढे सौती सांगतात की, ‘इतिहास आणि व्याख्या करणाऱ्या ग्रंथांनी युक्त असलेल्या विविध श्रुती महाभारत नामक इतिहासात अनुक्रमाने सांगितलेल्या आहेत. आणि हाच महाभारताचा प्रतिपाद्य अर्थ आहे.’ (१:५०) (श्रुती म्हणजे परमेश्वराने सांगितलेले आणि ऋषींनी ‘ऐकलेले’ ज्ञान.)
एवढे सांगून झाल्यावर सौती, स्वतः महर्षी व्यासांनी या विषयी काय सांगितले आहे, त्याकडे वळतात.
सौती सांगतात की, ‘आपल्या मनात सगळे महाभारत रचून झाल्यावर महर्षी व्यास विचार करू लागले की, आपण हे आख्यान आपल्या शिष्यांना कसे शिकवावे?’
व्यासांच्या मनातील हा विचार ओळखून या विश्वाचे गुरू ब्रह्मदेव स्वतः व्यासांच्या भेटीला येतात. ब्रह्मदेवाना आसन देऊन व्यास त्यांच्या जवळ जमिनीवर बसतात. आणि ब्रह्मदेवाना सांगतात – ‘‘हे भगवन अत्यंत पूजनीय असे काव्य मी रचलेले आहे. हे ब्रह्मन्, या काव्यात सर्व वेदांचे रहस्य तर अंतर्भूत केलेले आहेच, पण त्याशिवाय आणखीही अनेक गोष्टींचा त्यात अंतर्भाव केलेला आहे. त्यामध्ये सांग उपनिषदांचा आणि वेदाचा विस्तार केलेला आहे. इतिहास आणि पुराणांचा परिपोष केलेला आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालातील गोष्टी वापरून त्रिविध कालाचे निरूपण केलेले आहे. वार्धक्य, मृत्यू व भय यांचे आणि व्याधी, भाव व अभाव यांचे निश्चित रूप सांगितले आहे. अनेक धर्मांची आणि जीवनातील ब्रह्मचर्य वगैरे आश्रमांची लक्षणे सांगितली आहेत. चातुर्वर्ण्याचे आचरण कसे करावे, हे शिकवले आहे. समग्र पुराणांचा, तपश्चर्येचा आणि ब्रह्मचर्याचा विचार काय आहे ते सांगितले आहे. पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे, तारे यांचे प्रमाण सांगितले आहे. युगांचे प्रमाण काय आहे हेसुद्धा मी सांगितले आहे. ऋग्वेदातील मंत्र, यजुर्वेदातील मंत्र, सामवेदातील सूक्ते आणि वेदांतामध्ये ग्रथित असलेली अध्यात्मविद्या सांगितली आहे. न्यायशास्त्र, शिक्षाग्रंथ आणि कायचिकित्सा समजावून सांगितले आहेत. दान म्हणजे काय ते शिकवले आहे. सगळ्या जीवांचा जो अधिपती आहे, त्या पशुपतीचे महात्म्य सांगितले आहे. सात्त्विक आदि कर्मांप्रमाणे मानुष जन्म घडून येतो आणि दिव्य जन्मसुद्धा घडून येतो, त्या सगळ्याचे वर्णन केले आहे. पवित्र तीर्थांचे, देशांचे, नद्या, पर्वत, अरण्ये, सागर आणि दिव्य नगरांचे वर्णन केले आहे. धनुर्विद्येमध्ये सांगितलेल्या शस्त्रांच्या योजनेच्या पद्धती सांगितल्या आहेत. युद्धामध्ये कुठली कुठली कौशल्ये वापरली जातात, ते सांगितले आहे. निरनिराळ्या लोकांबरोबर निरनिराळे भाषेचे प्रकार कसे वापरायचे असतात, ते सांगितले आहे. जगामध्ये वर्तन कसे करायचे असते, हे शिकवणारे नीतीशास्त्र येथे सांगितले आहे. आत्ता वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टींचे प्रतिपादन माझ्या या काव्यात केलेले आहे. इतकेच नव्हे तर या जगात जी जी म्हणून वस्तू विद्यमान आहे, त्या प्रत्येकीचे वर्णन मी येथे केलेले आहे.” (१:६१-७०)
यावर स्वतः ब्रह्मदेव व्यासांना म्हणतात की – “हे मुने, तुझ्या जन्मापासून तू सत्य आणि ब्रह्मवादिनी वाणीच उच्चारत आला आहेस. तू निर्माण केलेल्या ‘भारत’ नावाच्या इतिहासाचे तू स्वतःच ‘काव्य’ या शब्दाने वर्णन केले आहेस. तेव्हा आता ते काव्यच ठरेल. गृहस्थाश्रमापेक्षा उरलेले तीन आश्रम ज्या प्रमाणे श्रेष्ठ ठरत नाहीत, त्या प्रमाणे तू केलेल्या काव्यापेक्षा श्रेष्ठ काव्य करण्यास इतर कवी समर्थ नाहीत.” (१:७१-७४)
शेवटी सौती म्हणतात – “हे जग अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाल्यावर हे भारत नावाचे काव्य ज्ञानाचे अंजन घालून त्या जगाचे डोळे उघडते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचे या काव्याने कधी संक्षेपाने, तर कधी विस्ताराने प्रतिपादन केले आहे. भारतरूपी सूर्याने लोकांच्या डोळ्यावरील झापड नष्ट केली आहे. पूर्णचंद्राप्रमाणे असलेल्या या पुराणाने (भारतनामक इतिहासाने) वेदरूपी चंद्रिकेचे तेज जगात सर्वत्र विकसित केले आहे. माणसांची बुद्धी ही कमळे आहेत, असे मानले तर या काव्याने ती बुद्धीची कमले विकसित केली आहेत. मोहरूप आवरण नष्ट करणाऱ्या या भारतरूपी प्रदीपाने या विश्वरूपी मंदिराचे सारे अंतर्गृह पूर्णपणे उजळून टाकले आहे.” (१:८४-८७)
इतिहास, पुराण, आख्यान, ज्ञान, काव्य आणि मनोगत. महाभारत काय आहे, हे सांगताना महाभारतकारांनी वर्णनांची रेलचेल केली आहे.
हे सगळे वाचून झाल्यावर असे वाटले की, आपण इतिहास वगैरे शब्दांच्या व्युत्पत्ती बघायला पाहिजेत. म्हणून मग कृ. पां. कुलकर्णी यांचा ‘मराठी व्युत्पत्ती कोश’ उघडला.
‘इतिहास’ या शब्दाची फोड त्यांनी दिलीय - इति+ह+आस. याचा अर्थ ‘अशी गोष्ट झाली’ किंवा ‘असे असे घडले’. ‘इति’ हा अखेर किंवा शेवट किंवा भूतकाळ दाखवणारा शब्द आहे. उदाहरणार्थ - इतिश्री - अध्यायाचा शेवट दाखवणारा शब्द. (पान ९२)
‘काव्य’ हा शब्द कवी या शब्दावरून आलेला आहे. कवीने जे केले ते ‘काव्य’. (पान १७७) आता ‘कवी’ हा शब्द कशावरून आला? कृ. पां. म्हणतात- तो ‘कु’ या संस्कृत मुळावरून आला आहे. ‘कु’ याचा अर्थ ‘शब्द करणे’ असा आहे. या जगात कोण शब्द करतो? कोण महत्त्वाचे बोलतो? अर्थात विद्वान! त्यामुळेच कृ. पां. नी ‘कवी’ या शब्दाचा अर्थ पूर्वी ‘विद्वान’ असा होता असे सांगितले आहे. जो महत्त्वाचे बोलतो, तो ‘कवी’. हा अर्थ लक्षात ठेवून आपण महाभारताकडे गेलो तर खूप प्रश्न सुटतात. जेथे महत्त्वाचे बोलले गेले आहे, ते ‘काव्य’.
कृ. पां. पुढे म्हणतात - पुढच्या काळामध्ये या जुन्या अर्थामध्ये बदल होऊन कवी म्हणजे काव्य करणारा असा विशेष अर्थ प्राप्त झाला. त्यावरूनच पुढे काव्य, कवन, कविता आणि कवित्व इत्यादी शब्द रूढ झाले. ‘काव्य’ या शब्दाचे हे नवीन अर्थ घेऊन आपण महाभारताकडे गेलो तर गोंधळ होणारच. ‘शब्द’ याचा अर्थ अक्षरसमूह किंवा आवाज किंवा बोल असा जरी असला तरी ‘शब्द’ या शब्दाचा लाक्षणिक अर्थ कृ. पां. नी आज्ञा, निरोप, प्रतिज्ञा आणि वेद असा दिलेला आहे. (पान ७२७)
म्हणजे लाक्षणिक अर्थ बघितला तर ‘शब्द करणारा म्हणजे कवी’ याचा अर्थ ‘वेद करणारा’ किंवा ‘वेदासारखे वाङ्मय लिहिणारा’ असाच होतो.
व्यासांनी मी महाभारतात काय काय लिहिले आहे, याची जी यादी ब्राहदेवांसमोर ठेवली, ती वाचली आणि ‘व्युत्पत्ती कोशा’तील ‘काव्या’चा जुना अर्थ बघितला, तर व्यास महाभारताला ‘काव्य’ का म्हणत आहेत, हे लक्षात येते.
छोट्या छोट्या विषयांवर, सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य भावनांवर कविता लिहिणे, ही आधुनिक पाश्चात्य जगातली कल्पना आहे. पुरातन भारतात ‘काव्य’ म्हणजे एक तर ते देवांवर पाहिजे, नाहीतर राजांवर आणि राजवंशातील उदात्त लोकांवर पाहिजे.
श्री अरविंद हे जुन्या आणि नव्या जगाला त्यांच्या त्यांच्या समग्र ताकदीनुसार जाणणारे प्रज्ञावंत आणि दार्शनिक होते. आधुनिक काव्य आणि प्राचीन काव्य यातील फरक त्यांनी आपल्या ‘फ्यूचर पोएट्री’ या ग्रंथात सांगितला आहे. प्राचीन कवी दार्शनिक होते आणि नवीन कवी भावनिक किंवा तत्त्वज्ञानी आहेत, हा फरक श्री अरविंद यांनीही सांगितला आहे.
‘कवी हा केवळ महान गोष्टी लिहिणारा माणूस’ असा अर्थ प्राचीन काळी रूढ होता, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाभारतकारांनी महाभारतात संपूर्ण मानवी जीवन आणि त्याचे तत्त्वज्ञान रेखाटलेले आहे, म्हणून ते काव्य आहे. त्यात काही बाबतीत आणि काही ठिकाणी कल्पनेचे खेळ आहेत, हे आधुनिक वैचारीक मनाला वाटते म्हणून ते काव्य आहे, असे नाही.
आता इतिहासाचे बघू. इतिहास म्हणजे ‘हे असे घडले’ इतकेच आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इतर सर्व ‘ऑब्झर्व्हेबल’ शास्त्रांचे नियम पाळून जे घडले, तो इतिहास असा इतिहासाचा अर्थ नाहिये.
महाभारतातील श्लोक क्रमांक २९ ते ३७ एक वेगळाच ‘इतिहास’ सांगतात. तो वाचण्यासारखा आहे-
“सर्व दिशा अंधकाराने व्याप्त झाल्या असता, प्राणिमात्राचे अविनाशी बीज असलेले एक फार विशाल अंडे (ब्रह्मांड) निर्माण झाले. सर्व जगाचे ते सूक्ष्म आणि अव्यक्त कारण आहे. ते सत् ही नाही आणि असत् ही नाही. या ब्रह्मांडापासून सर्व जगाचा प्रभू पितामह प्रजापती निर्माण झाला. त्याच्यापासून ब्रह्मा, विष्णू व शिव आणि मनू, क, परमेष्ठी, प्राचेतस, दक्ष व दक्षाचे पुत्र निर्माण झाले. त्यानंतर एकवीस प्रजापती यांची उत्पत्ती झाली. त्यानंतर अपार महात्म्याने युक्त असा ‘पुरुष’ निर्माण झाला. त्यानंतर विश्वेदेव, तसेच आदित्य, वसू आणि अश्विनी कुमार निर्माण झाले. त्यानंतर यक्ष, साध्य, पिशाच, गुह्यक आणि पितर निर्माण झाले. त्यानंतर ब्रह्मर्षी निर्माण झाले. त्यानंतर राजर्षी निर्माण झाले. तसेच जल, आकाश, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष आणि दिशा यांची उत्पत्ती झाली. नंतर संवत्सर, ऋतू, महिने, पक्ष व दिवस आणि रात्र यांची निर्मिती झाली. तसेच जे जे या जगात लोकांनी पाहिले किंवा ज्याविषयी त्यांनी ऐकले, ते ते सारे निर्माण झाले.”
महाभारतकार या सर्व घटनाक्रमाला ‘इतिहास’ असेच म्हणतात. विश्वाची जडणघडण कशी झाली, या विचाराला इंग्रजीत ‘कॉस्मॉलॉजी’ (Cosmology) म्हणतात. इतिहासाची महाभारतीय संकल्पना ‘कॉस्मॉलॉजी’ला कवेत घेण्याएवढी मोठी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
शिवाय, घडलेले सर्वसामान्य लोकांना त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी दिसते आहे की नाही, याचा विचार महाभारतकार करताना दिसत नाहियेत.
त्यामुळे असे म्हणावे लागते की, अर्जुन निवातकवचांचा निःपात करायला आकाशमार्गे गेला असेल तर तोही इतिहासच आहे.
जी गोष्ट शात्राच्या सिद्धान्तांप्रमाणे घडलेली नाही, ती घडलेलीच नाही, असे मानणे हे आधुनिक मनाचे ‘कंडिशनिंग’ आहे. आधुनिक मनावर झालेला तो संस्कार आहे. प्राचीन भारतातील मानवी मन तसे नव्हते. ऐंद्रिय ज्ञानाच्या पलीकडे ज्ञान आहे आणि अस्तित्वेसुद्धा आहेत, असे ‘प्रज्ञाकक्षु’ प्राप्त केलेले लोक त्या काळात सांगत होते आणि सामान्य जन त्यावर विश्वास ठेवत होते. त्या काळात इतिहास हा भौतिक किंवा तत्सम शास्त्रांनी आखून दिलेल्या रस्त्यावरूनच चालला पाहिजे, असा आग्रह नव्हता, हे लक्षात घेतले पाहिजे.
व्यासादिकांच्या मनात कसलाही संशय नव्हता. कुरुंदकर आणि व्यास अशी भेट झाली असती तर व्यास त्यांना म्हणाले असते की – ‘बाबा, तू लिहितो आहेस ते तुझ्या अनुभवातून लिहितो आहेस. असे लिहिणे योग्यही आहे. कारण तू तुझ्या अनुभवाशी प्रामाणिक राहतो आहेस. पण एक गोष्ट सांग, तू तुझी जीवनदृष्टी मी लिहिलेल्या इतिहासावर का लादतो आहेस?’
मला स्वतःला कोणत्याच भूमिकेची बाजू घ्यायची नाही. ना कुरुंदकर, ना व्यास. मला प्रज्ञाचक्षू प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत व्यासांचे म्हणणे मान्य करणे अवघड होते आहे आणि प्रज्ञाचक्षू नसतातच, हे जोपर्यंत कुणी निर्विवादपणे सिद्ध करत नाही, तोपर्यंत कुरुंदकर यांच्या मार्गावरून चालणे अवघड होते आहे.
एवढेच जाणवते आहे की, इतिहास हा शास्त्राच्या रस्त्यावरून चालणारा प्रकार आहे, असा आग्रह धरणे न्यायाचे नाही. कुरुंदकरांनी ‘काव्य’ या शब्दाचा मूळ अर्थ लक्षात घ्यायला हवा होता, एवढेच मला म्हणायचे आहे.
कुरुंदकर मार्क्सवादी विचारवंत होते. म्हणजे राजकीय मार्क्सवादावर त्यांचा विश्वास होता असे नाही. त्यांना मार्क्सने घालून दिलेल्या ज्ञानसंपादनाच्या चौकटी आणि पद्धती मान्य होत्या इतकेच. (मार्क्सियन डायलेक्टिक्स वगैरे). त्यातून त्यांनी श्रीकृष्णाचा शोध घेतला. तो लेख अत्यंत वाचनीय आहे. मी अकरावी-बारावीमध्ये असताना, म्हणजे १९८१ सालाच्या सुमारास, त्यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत या लेखावर आधारित एक व्याख्यानही दिलेले आठवते आहे. महाभारताकडे बघण्याची चिकित्सक दृष्टी कशी असावी, याचा हा लेख म्हणजे एक आदर्श वस्तुपाठ आहे. पण या नादात महाभारताच्या जीवनदृष्टीवर अन्याय होतो, हे लक्षात घेतले गेले पाहिजे.
या विश्वाच्या उत्पत्तीपासून काय काय घडले, हा इतिहास व्यासांना सांगायचा आहे. वेद आणि वेदान्त सांगून त्यांना काव्याचा अनुभव श्रोत्याला द्यायचा आहे. विलक्षण नगरे यांची माहिती देऊन आणि विविध विलास रंगवून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी एक मोठे आख्यान उभे करायचे आहे. मानवी जीवनाविषयी त्यांना आपले मनोगत सांगायचे आहे. मानवी जीवन हा एक महाप्रचंड कल्लोळ आहे. तो काव्यात उसळवून शांत रसाचा परिपोष करायचा आहे.
महाभारतातला कल्लोळ एवढा मोठा आहे की, या काव्याला कवेत घेणे थोरामोठ्यांना अशक्य होते. भरत मुनींचे उदाहरण घेता येईल. त्यांनी त्यांच्या ‘नाट्यशास्त्रा’त आठ रस सांगितले. कुठल्याही काव्यात त्यापैकी एका रसाची निष्पत्ती झाली पाहिजे, असा दंडक त्यांनी घालून दिला. पण त्यांचा दंडक महाभारतालाच लागू होईना. एवढा मोठा विराट कल्लोळ वैश्विक घटनांपासून ते व्यक्तिगत भावनांचा. कुठला रस कुठे शोधावा?
त्यामुळे मग उद्भट या सातव्या शतकातील काश्मिरी विद्वानाने भरत मुनींच्या आठ रसात शांत रसाची भर घातली. महाभारताचा विचार करताना त्याला वाटले असावे की, भरत मुनींच्या आठ रसांच्या पलीकडे आपण गेले पाहिजे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा दहाव्या शतकातील काश्मिरी टीकाकार अभिनवगुप्त याने शांत रसाची स्थापना केली असेही मानले जाते. उद्भट की अभिनवगुप्त या वादात पडण्याचे काही कारण नाही. विचार महत्त्वाचा.
सर्व जीवन कल्लोळ लक्षात आला आणि त्यातील अर्थहीनता लक्षात आली की, माणूस शांत रसाकडे जातो. महाभारत वाचून झाले की, शांत रसाची निष्पत्ती होते. आपण भरत मुनींनी सांगितलेल्या आठही रसांच्या पलीकडे जातो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
महाभारताला एक काव्य म्हणून कवेत घेण्याच्या प्रयत्नात उद्भट आणि अभिनवगुप्त यांना भरत मुनींच्या पलीकडे जावे लागले. त्याच प्रमाणे महाभारत हा ‘इतिहास’ आहे की ‘काव्य’ हे लक्षात घेताना आपण आपल्या मनातील ‘काव्य’ आणि ‘इतिहास’ यांच्या संकल्पनांच्या पलीकडे जायला पाहिजे.
इतिहास आणि काव्य यांच्या आधुनिक अर्थांच्या पुरेसे पलीकडे आपण गेलो की, एक गोष्ट आपल्या अतिशय लख्खपणे लक्षात येते. आणि ती अशी की – ‘इतिहास’ हा महाभारताचा विषय आहे आणि ‘काव्य’ हा महाभारताचा आशय आहे. सौती सव्विसाव्या श्लोकात म्हणतात, त्याप्रमाणे महाभारत हा कवींनी सांगितलेला इतिहास आहे. काय घडले हे तर सांगितलेलेच आहे, पण त्या घटनांतून आशय काय घ्यायचा, हेदेखील सांगितलेले आहे. सौती सत्ताविसाव्या श्लोकात म्हणतात की, इतिहास आणि काव्य एकत्र आले की, ज्ञान तयार होते. हा सर्व इतिहास, हे सर्व काव्य आणि त्यातून प्राप्त होऊ शकणारे ज्ञान पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी महाभारताने स्वतःमध्ये साठवून ठेवलेले आहे.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment