‘नवल’चा नायक सोनकुळे पुलावरून नाही तर थेट पाण्यावरून चालत असल्यासारखा “पायवाट न पाडता” हिंडतो-फिरतो, अतिअंतर्मुखतेच्या महाप्रलयी पाण्यावर…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
माया निर्मला
  • छायाचित्रं - विजय बेंद्रे
  • Tue , 29 June 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो नवल Naval प्रशान्त बागड Prashant Bagad पपायरस प्रकाशन Papyrus Prakashan

सोनकुळे हा ‘नवल’चा कथानायक. नव्यानं पुण्यात दाखल झालेला एक अतिअंतर्मुख कॉलेजकुमार. भोवतीच्या वस्तू, घटना, क्रिया, हकिगतींचे जे नाट्यमय प्रतिसाद त्याच्या सजग संवेदक स्तरावर उमटतात, ते ‘नवल’मध्ये आपल्याला विंगेतून पाहायला मिळतात. काही वेचक संवाद आणि स्वगतांमधून सोनकुळेला ऐकत ऐकत, निवेदक जे पाहतो-दाखवतो ते पाहत ‘नवल’ परिसरात फिरताना केलेल्या या नोंदी.

मिटता उमटता एकांत  

पाठीवर स्कूलबॅग घेऊन जाताना जसजसा गावातला बसस्टँड जवळ येत जातो, तसतसा सोनकुळे “(त्या) एकलकोंड्या चालण्यात कैद होत जातो.” पुण्यात आल्यावर वसतिगृहातल्या वर्गमित्रांचे शेरे ताशेरे ऐकून सोनकुळे बुजतो. “आपण गाफील आहोत, आपण विस्तारांध आहोत, कुंठित आहोत, बिंदू-बंद आहोत असं जाणवून,” तो अजूनच संकोचतो. रस्त्यावर उभा असताना चौकातली रहदारीची शहरी व्यस्तता पाहून सोनकुळे गांगरतो. “नुसता पाहता डोळा... होऊन तो उभा आहे... (तो) जणू फक्त चौक आहे. वाहता पण स्थिर. घडता, पण न-ढळता,” अशी त्याची धारणा होते. कॉलेजमध्ये तासाला जाताना स्वतःचा अजागळपणा लक्षात येऊन, “अंग शक्य तितकं आक्रसून घ्यावं असं त्याला (वाटतं). जरासाही अवकाश व्यापण्याची आपली पात्रता नाही असं वाटून तो खिन्न होतो.”  

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मग हॉस्टेलच्या खोलीत एखाद्या दुपारी, “सारी चेतना आणि संज्ञा पापण्यांच्या सावल्यांत गोळा करून तो निजून (असतो). आपण विश्वात (सूक्ष्म) अंतरं आणि फटी निर्माण करतो… जोपासतो. त्या अंतरात आपण राहतो” असा विचार करता करता, जेव्हा सोनकुळेला तुडुंब झोप येते, तेव्हा त्याचा “(बिंदू-बंद) एकांत झोपेच्या विशाल पात्रात खुलतो आणि परत पाण्यासारखा स्वतःत गुंतत-गहिरत जातो.” त्या प्रगाढ झोपेच्या खोल अंतरंगात एक प्रकारची अफाट उघडीप असते. “विहिरीच्या तळाशी असलेल्या पाण्यासारखं आकाशाची सावली मुरलेलं प्रशांत पाणी असतं.” तिथल्या मोकळेपणात निःसंकोच झालेल्या सोनकुळेला “झोपेतल्या झोपेत आपण कुठलंसं अंतर पार करून येतो, जाग येताना कुठल्याशा मुक्कामी पोहोचतो, कुठेतरी प्रकट झाल्यासारखं किंवा कसलासा अवतार धारण केल्यासारखं वाटतं.” जागेपणी तो “भिरभिरून पृथ्वीवर उतरल्यासारखा” वावरत असतो. 

उसळता ओसरता पसरता परिसर 

असा संकोची-निःसंकोच सोनकुळे वावरतो त्या परिसरात - “ढग मुळात वाफ असतात पण काही वाफांना आकार येतात आणि काही आकार सुटे सुटे होतात.”, “खोलीतला अंधार… सावल्यांच्या बेरजेसारखा अंधार (असतो).”, “अंधाराची उघडझाप होत रहाते.”, “नेरपगारचं घड्याळ आपलं चमकतं स्टील सृष्टीतून सतत उसनं घेतं.”, “चौक एकजीव वाटतो तोच पांगतो, लगेच पांगापांगीतून उठताना दिसून एक होऊन उभा राहतो.”, “दगडातून कॉलेजची वास्तू पुन्हा आकाराला येते.”, “मुलींचे घोळके स्पष्ट चेहरामोहरा कमावतात, तोच फुटतात.”, “कँटीन बाहेर आवाजांच्या, कपड्यांच्या, हालत्या-बोलत्या हातांच्या बिंबांची घालमेल बोगनवेल (असते).”

क्रांतीसारखी ठोस निर्णायक ऐतिहासिक घडामोड इथे एकदाची होऊन गेलेली भागत नसतं. ती होत राहणारी असते. सोनकुळेला वाटत आलेलं असतं की, “औद्योगिक क्रांती होऊन गेलीये... ती उलथापालथ इतिहासात एकदा घडून गेलीय... पण अजून यंत्रांची स्थापना होते. यंत्रांची घरघर होते. यंत्रांभोवती यंत्रणा उभ्या राहतात.” दुसरी एक जातीवादाविरोधातली “होऊन गेलेली क्रांती पुन्हा करायचा (त्याला कदाचित) कंटाळा (आलेला असतो).”   

एका दुपारी बाजारपेठेतून परत जाताना सोनकुळे झोपाळू डोळ्यांनी “(रस्ता चाळतो तेव्हा) माणसं, बोलणी-चालणी, वाहनं अकाली मागे सरकतात. आपल्याला जोडलं गेलंय, आपल्याला एकमेकांशी बांधलं जातंय, याचा एहसास झाल्याप्रमाणे वस्तू आणि दृश्य मागे हटतात, अंग चोरतात, एकाकी, एकांगी होतात.” एका संध्याकाळी तो पुलावरून चालत जात असताना “हळूहळू वस्तू, इमारती, सारी स्थळं अवकाशाचे प्रवाळ होत जातात.”   

अशा प्रवाळांच्या दरम्यान सोनकुळे वसतो. दिवसाचे, संध्याकाळचे रागरंग पाहण्यासाठी तो बाहेर पडतो, तेव्हा अचानक त्याच्या लक्षात येतं की, “त्याचे अवयव आहेत… तितका त्याचा पसारा आहे. अवयव नसते तर समोरचा रस्ता गाठू पाहतोय ते आकाशच तो असता.” कॉलेजमध्ये साहित्याचा अभ्यास करताना सोनकुळे विचार करतो, युरोपिअन कथा-कादंबऱ्यांच्या तुलनेत मराठी कथा-कादंबऱ्या चेहऱ्याची, मुद्रेची, ठेवणीची वर्णनं करत नाहीत. जसं काही मराठी साहित्यात “शरीर आपल्याला दिसत नाही... व्यक्तित्वातून आपण शरीर बाजूला काढून ठेवतो... आपण शरीराच्या आधारे राहत नाही; आपण तसे वरवरचे असतो.” नंतर केव्हातरी या निरीक्षणाला पुष्टी मिळेल असा एक सिद्धांत सोनकुळेला सुचतो. तो असा की, “ ‘शरीर’ दुसऱ्याचं असतं. ते भौतिक असतं. आपलं असतं ते ‘अंग’. आपलं अंग भौतिक नसतं.… आपल्या अंगी अवकाश व्यापण्याची, अवकाशात वावरण्याची, अवकाश फुलवण्याची कला असते.”  

अशा एखाद्या अवकाश फुलवणाऱ्या कलाकाराच्या भूमिकेत तो असताना, “(जसा) आदम नावं उच्चारून पाहतो आणि वस्तू अस्तित्वात हजर होतात,” किंवा “(जसा) कोकीळ बोलून-गाऊन अवकाशात ढोली कोरतो,” तसा सोनकुळे नुसता हिंडून फिरून किंवा नुसता कानोसा घेऊन “आसमंत आकाराला आणतो.” जसं काही “एरव्ही आसमंत जवळजवळ नसल्यातच जमा असतो.” कॉलेजमध्येसुद्धा जसा काही “(त्याच्या) चालत जाण्यानेच कॉरिडॉर धरून ठेवलेला (असतो).” सोनकुळेला खात्री असते की, “(त्याच्या) दृष्टीने हेरलेला सुटा ढग निव्वळ त्या दिसण्याद्वारे एक होतो.” शिवाय हॉस्टेलसमोर साचलेल्या पाण्यात जे ऊन चमकतं, “ ‘ते उन्हाचं चितळ’ (त्याचं) लक्ष लागलं की च खेळतं,” असं त्याला राहून राहून वाटतं. आळंदीला जाऊन आल्यावर एखाद्या दृष्टांतानं बदलावी तशी त्याची दृष्टी बदलते आणि त्याला पुणं अगदी वेगळंच दिसायला लागतं, तेव्हा “हे काळसर-निळसर-गेरूसर पुणं (सुद्धा) आपणच आळंदीला जाऊन तयार केलंय” अशी त्याची सहज भावना होते. 

अबोध अबोल आसमंत

सोनकुळेचं निमित्त झालेल्या उन्हाच्या चितळाला, आसमंताला, शहराला, या कशाचीच जाणीव नसते कदाचित. “सगळ्या वस्तू... सगळी दृश्यं... सगळ्या चौकटी स्वतःतल्या स्वतःत परागंदा झालेल्या असतात, चिडीचूप असतात.”, “जग स्वतःची गतकालीन धूळधाण आता (नुसतं) बघत बसलेलं असतं बहुतेक.”, “(जगात) वस्तूंचे संबंध संपल्यासारखा आसमंत किंवा वस्तूंचे संबंध उघड झाल्यानंतरची निर्विकार अळीमिळी (असतात)”. सिमला ऑफिस जवळ बसची वाट पाहताना सोनकुळेला दिसतं की, “झाड आपली अबोध स्थिती टाकून देत नाही. त्याची ढिम्म, मख्ख, मुग्ध दशा तशीच राहते. अंगावरच्या त्याच त्याच बदलांचा व घटनांचा जप करत ते स्वतःला सतत आत्मस्थितीत कोंडत राहतं.”     

सोनकुळेच्या लहानपणी एका कविराजानी स्वेटरवर लिहिलेल्या कवितेतसुद्धा, “स्वेटरचे गुपित स्वेटरलाही न ठावे,” अशी ओळ लिहिलेली असते. आताही रस्त्यातल्या रहदारीच्या कुशीतल्या काचेपलीकडे “पाण्यात सुळसुळतो... (तो) मासा स्वतःची पाणगती संवेदत (नसतो).” हॉस्टेल जवळच्या फ्लॅटमध्ये “नळातलं पाणी झळ्ळ झळ्ळ हौदात पडतं आणि मोठ्या पाण्याच्या मिठीत गेल्यावर ते चूप होतं.” विलासपूरच्या वर्षी सोनकुळे पिंप्राळा तलावाकडे टक लावून पाहतो, तेव्हा तलावातलं पाणी “बोलत-डोलत नाही.”, “पाणी उत्तर देत नाही.”, “पाण्यावर कविता केली तरी हे पाणी स्वतःबाहेर येणार नाही, अढळ निमूटपणाच्या वाटेने आतल्याआत स्वत्वाचा स्वर्ग गाठत राहील,” अशी त्याला दाट शंका येते. आपण पाण्याशी जुळू पाहतोय, पण पाणी आपल्याकडे पाठ फिरवतंय असं काहीसं सोनकुळेला तेव्हा वाटलेलं असावं. काही अवघड लाजिरवाण्या नकोशा प्रसंगांनंतर जेव्हा जेव्हा उद्विग्न होऊन तो खोलीत येतो, तेव्हा “खोलीला कशाचं भान नसतं” किंवा “खोलीत संगळलेला मुकाबहिरा अवकाश-प्रकाश (असतो),” हे त्याला एक प्रकारे बरंच वाटलेलं असतं, तरी एखाद्या उदास वेळी आपल्याला वस्तूंच्या विश्वातून काहीच प्रतिसाद मिळत नाही, याची त्याला खंत वाटत असावी.

शब्दांचे झोके

अनेकदा सोनकुळेलाही वाटतं, “आपण आपल्यापाशीच असावं. म्हणून कैकदा तो अबोल राहतो.” एका दुपारी शिवाजीनगरकडे भरकटत जाताना, “त्या भटकण्याला न फुटलेलं बोलणं (तो) कंठू शकतो. (ते) न-बोल-हलाहल त्याला बरं वाटतं.” पचतं. इतर वेळी मात्र “आपल्या चेहऱ्याने आपले… भाव व्यक्त केले पाहिजेत” अशी त्याची अपेक्षा असते.” डोळे, नाक, कपाळ, हनुवटी, जिवणी वगैरे गोष्टी भाव व्यक्त करतात, संकल्प व्यक्त करतात, तळमळ व्यक्त करतात, पण ती... अशब्द अरण्यात मंद प्रकाशत (असतात),” असं जाणवून तो जरा निराश होतो. “(त्याच्या) चेहऱ्यावरची अवाक्षररहितता अवजड होत (जाते).”

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

सोनकुळेच्या व्यक्तिमत्त्वात, “मनात, अंतर्मनात, शब्दार्थांना अद्याप जिथे वाव नसतो (असा) संवेदक, लाजाळू स्तर (असतो).” जेव्हा त्याचे मित्र एकमेकांना सांगतात-विचारतात की, “ये सुधर गया नं रे?” तेव्हा ते न उमजून जणू तो त्या संवेदक स्तरातून “स्वतःला चाचपत... भाषेत चालत (जातो). हळूहळू तो वाक्प्रचाराच्या अर्थापाशी येतो. तब्येत सुधारल्याचा अर्थ त्याला लागतो. तो आनंदतो. स्वतःची पुनर्प्राप्ती झाल्यासारखं वाटतं.”  

कडक उन्हातून किराणामालाच्या दुकानात आल्यावर एक बाई पंख्याकडे पाहून जेव्हा “वीज नाहीये का?” विचारतात आणि “पंखा चालवा ना,” म्हणतात तेव्हा, “त्या क्षणी त्या शब्दांमुळे तो नागरिक होतोय,” असं सोनकुळेला जाणवतं. तो आता केवळ “गरजांच्या, आकांक्षांच्या, हवेपणाच्या कोठडीतला तळमळता अंध निव्वळ जीवशास्त्रोक्त जीव” उरलेला नसतो. भाषेत वावरणाऱ्या सगळ्यांना बंधनकारक ठरेल असं, एखादं जादुई दालन, एक “हक्कजन्य, शब्दजन्य, हवेशीर प्रतल” त्याच्या समोर उलगडलेलं असतं.

इतर वेळीही “मेंदूत नेहमीच तप्त, कुजबुजते, प्रच्छन्न आवेग असतात… मेंदूत माणूस स्वतंत्र नसतो… मेंदूत माणूस तावडीत असतो… शब्दांत माणूस थोडा सुटा होतो,” असं लक्षात येऊन सोनकुळेला शब्द सोयीचे वाटतात आणि “सर्वसामान्य वर्णनं दिलदार” वाटतात. पण, “जिणे गंगौघाचे पाणी” अशा परत परत आळवलेल्या बंदिशीच्या तीन शब्दात “थोर गंगेचं... ‘ओघ’ या सडपातळ शब्दातलं आकुंचन, मग त्या ओघाचं नुसतं सुटं पाणी हे त्याला खटकतं.” 

शब्दांच्या प्रचलित वापरामुळे वस्तूंचं आणि व्यक्तींचं अनाठायी सामान्यीकरण किंवा सार्वत्रिकीकरण होत जातं, हे सोनकुळेला अजिबात पसंत नसतं. “शब्द आपल्याला माहीत होत जातात आणि आपल्या भिन्नतेची वासलात लावत जातात” हे त्याला योग्य वाटत नाही. कारण त्यामुळे त्याच्या मते “बोलणं सोपं होत असेल, मैत्री जुळत असेल, पण आपण आपले-आपण राहत नाही.” जेव्हा, लांबून दोन माणसं सोनकुळेकडे चालत जातात, तेव्हा तोही त्याच्यातून उठून “त्यांच्या दिशेने जातो, वाहतो. बघणं-भेटणं अंतरात घडतं. स्वतःपाशी नाही,” याचा त्याला खेद असतो. लहानपणी बस-बस खेळताना “चारपाच मित्र एकाच वेळी एकाच खिडकीतून बाहेर बघत प्रवास करतील, अशी कल्पना करताना त्याचा आनंदाने थरकाप (होत असे). “कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र हताशपणे मनातल्या मनात तो रूममेटला विचारतो, “तुला कळलंय की मिळूनपण आभासी असतं?”    

कॉलेजमध्ये एकदा इंग्रजीचा तास चालू असताना “सगळ्यांना सगळं माहीत असणं आणि त्या कुंपणात सगळ्यांनी गोष्ट वाचणं, शब्दार्थ ऐकणं, हसणं, आकलनाचा अभिनय करणं त्याला विचित्र वाटतं.” मग जरा हटके विचार करून तो इतरांपासून स्वतःला वेगळं ठेवायचा आटापिटा करतो, पण “मधल्या अधांतरातूनच तो पुन्हा पुन्हा वर्गात फेकला जातोय” अशी त्याची अवस्था होते. “(एखाद्या संध्याकाळचे) टाके लगोलग त्याला शिवून घेतात” तसं. शब्दांच्या हुकुमतीत त्याला सुटं, वेगळं, निराळं, जसाचा तसा राहायची मुभा राहत नाही. “आपलं न डागाळलेलं राज्य भाषेने परत केलं पाहिजे” अशी सोनकुळेची तगमग होते. 

कॉलेजमध्ये लागलेलं चित्रांचं प्रदर्शन पाहताना, “शब्दांवाचून काही दिसत नाही अशी अंधावस्था त्याला प्राप्त (झालेली असते).” फोटोची फिल्म डेव्हलप केल्यावर त्यातलं दृश्य आकाराला यावं, तसं, भाषेच्या रसायनात भिजवून वाळवल्यावरच सोनकुळेला चित्रं नीट दिसतात. त्याच्या दाराच्या चॉकलेटी रंगावर सुद्धा मराठीचा मुलामा असतो. “चॉकलेटी हा मराठी रंग आहे,” अशी त्याची खात्री असते.    

प्रदर्शनातल्या काही चित्रांवर सोनकुळे कवितारूपी टिपणं लिहितो. प्रत्येक कवितेला ते ते चित्रक्रमांक देतो, जे नंतर तो खोडून टाकतो. त्याला कळून चुकलेलं असतं की, “चित्रं नुसती निमित्तं आहेत. त्याचं लिखाण चित्रांचा अनुवाद करत नाही.” जसं दि. पु. चित्रे जेव्हा ‘हात करू जातात डोळ्यांचा अनुवाद’ असं एका कवितेत लिहितात, तेव्हा तसं काही होत नाही. होत नसावं. तिथेही नाही आणि इथेही नाही. “लिखाण स्वतंत्र (असतं)” यावर सोनकुळे ठाम राहतो.   

मुंबईत असताना गावी पाठवण्यासाठी तो एक पोस्टकार्ड लिहितो. नंतर “शिसपेन्सिलीने सबंध कार्डभर फिका करडा भवताल (भरतो).”, “त्या भोर भवतालातून शब्द वर येतील,” शब्द, संज्ञा, आशयांच्या देवघेवीची एककं त्याच्या लिखावटीत आपली आपण मुळं धरतील, असा प्रामाणिक हेतू त्यात असतो. तसंच काहीसं होतंही, पण अनपेक्षित प्रकारे. होस्टेलच्या मेसमध्ये जेवणाची वाट पाहत असताना एकदा सोनकुळे स्वतःचं काही लिखाण गुपचूप वाचतो, तेव्हा “ते शब्द स्वतः काहीतरी म्हणतात. आपणहून म्हणतात.” हे त्याला अगदी साफ साफ ऐकू येतं. पण तो स्वतः स्वतःच्याच अक्षरात लिहिलेल्या “त्या शब्दांबाहेरचा आहे… तो परका आहे,” असा उपरेपणा त्याला जाणवतो. खुपतो.

भाषेचं पाठबळ असल्याखेरीज, कुणा एकाच्या कोशात असलेल्या एकट्या दुकट्या शब्दांचे अर्थ ठोस आणि ठळक होत नाहीत असं निवेदक सुचवतो. उदाहरणार्थ, निवेदनात लिहिलंय, “सिग्नल पडतात, गाड्या थांबतात, धावू लागतात, विचित्र हॉर्न वाजवतात, (तेव्हा) गाड्यांचे व्यवहार (सोनकुळेला) एतद्देशीय वाटत नाहीत, … (या वाक्यातला) ‘एतद्देशीय’ हा त्याचा शब्द असावा, त्यामुळे त्याचा पक्का अर्थ त्याला माहीत नसावा.” आणि इतरत्र असंही सुचवलंय की, एखादा अनोळखी शब्द, कधी कधी, “उताऱ्याचा एकंदर अर्थ लक्षात घेऊनही, इतर वाक्यांशी व मुद्यांशी पुन्हा पुन्हा अन्वय लावूनही... (दाद देत नाही). कधी कधी साकल्य कामी येत नाही. त्या विशिष्ट वस्तूशीच प्रत्यक्ष आणि समक्ष ओळख असावी लागते,” असा सोनकुळेचा अनुभव असतो.     

ओळखीच्या शब्दांनाही हे थेट अनुभवाचं सूत्र लागू होत असावं. ‘नवल’मध्ये वर्णन केलेला अंधारासारखा अंधार, त्याच शब्दात, थेट जसाच्यातसा अनुभवायचा असतो. तो “संध्याकाळचा, दिवेलागणी नंतरचा, न पुसला जाणारा अंधार” असतो. त्या “प्रकाशाने पाळलेल्या सावल्या” नसतात. तिथे “उष:काल-गर्भ पेलणारी सावली” नसते. तिथे “अंधाराचं पाणी घातलेल्या, अंधाराने वाढवलेल्या” सावल्या असतात. “आकाशात अंधाराचा ओला गिलावा” असतो. “अंधार, अंगावर ओढून घ्यावा” असा असतो. “अंधाराची पानं-फुलं, त्यांचा ओसंड-उत्सव, ग्रहताऱ्यांच्या अंगणात” असतात.  “खोल्यांमधला अंधार, आधी उगीच खाजगी वाटणारा मग खरोखर गर्तेत गुरफटणारा” असतो.  “नंतर अंधाराच्या खोळीत खोल्या” असतात.  “संध्याकाळ… अंधाराच्या चित्राचित्राआड… उभी” असते.  “रात्र रात्रीसारखी” असते.

अनंताची हूल 

सोनकुळे जसा विशिष्ठान्वेशी आहे तसा अरुंद, आटोपशीर स्थळकाळात अनंततेचा सुगावा लागणारा, लावणारा आहे. “उजेडाचा एक चौकोनी तुकडा… मी दुरून आलोय… असं सांगण्यासाठी (हलताना)” त्यालाच दिसतो. त्याला “आरशामुळे लिफ्ट खुली” होताना आणि तिथली “पोकळी द्विगुणित” होताना जाणवते. “विहिरीवरचं झाकण जरा दूर करतो तर आकाश दिसतं.” त्याच्या गाढ झोपेत “विहिरीच्या तळाशी असलेल्या पाण्यासारखं आकाशाची सावली मुरलेलं प्रशांत पाणी असतं.” मित्राबरोबर पुण्याच्या पेठांमधून बोलत बोलत, संधिप्रकाशात चालत जातो तेव्हा त्याला “नक्षी न कोरलेलं, जाळी न कोरलेलं, पैलू न पाडलेलं, रिकामं पण तुडुंब, ओघवतं, … (असं) एक मोठं रिकामपण” दिसतं. “बसच्या पोलादी चौकटीत सहज मावलेल्या वा सामावलेल्या अवकाशाचा तो लहानपणापासून विचार करत (आलेला असतो).”, “लहानपणी बस-बांधणीचा खेळ खेळताना “बस मधलं आकाश मोकळं ठेवलं पाहिजे” याची जबाबदारी तो स्वीकारतो. पुण्यात असताना तो सिमला ऑफिसपाशी बस पकडतो, तेव्हा “अदृश्य पडदा उघडतो आणि बसला अंतरंग फुटतं.”, “लहान प्रवासाच्या पोटातल्या अनंततेत (तो) भटकत राहतो.”   

पण सोनकुळेला अंदाज असतो की, “आकाश वस्तुतः अनंत नसतं. अनंतता कुणी पाहिलेली नसते. अनंतता ही कल्पना असते. ती पक्षाच्या स्वैर उड्डाणाला सुचते. पक्षाने आकाशात विहार करणं ही घटना निळ्याशार अनंततेला जन्म देते.” जसं “कल्पवृक्ष आपल्याला… आपण इच्छू-कल्पू तेवढंच … देतो. पसरत्या पायांना कल्पवृक्ष पसरतं अंथरूण देतो” तसं. मोकळेपणा हा काही झालं तरी आपल्याला जाणवणारा मोकळेपणा असतो हेही सोनकुळे ओळखून असतो. त्या जाणिवेवर त्याच्या “केवळ अनुभवजन्य ज्ञानाला शरण” असण्याची, “ज्ञानाने बाटलेले” असण्याची, “बेसावधपणे सावध” असण्याची आणि “अन्वेषक अंधाराची” छाया असते. कॉलेजमध्ये तास संपल्यावर जेव्हा वर्ग रिकामा होत जातो, तेव्हा त्या मोकळ्या अवकाशाकडे पाहताना सोनकुळेची खात्री पटते की, “नाही म्हटलं तरी या मोकळेपणावर धुळीचा एक थर आहे.”  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अनंत काळाची चौथी मितीही सोनकुळेला विशिष्टात आणि वर्तमानात अनुभवाला येते. चांदसरहून बैलगाडीत घालून आणलेल्या त्याच्या अभ्यासाच्या टेबलात “प्रवासाचे प्रहर प्रस्तर होऊन लपलेले (असतात).”, “रस्त्यांवर तासांचे ताव असतात.” त्याच्या आठवणींमधले “पूल… नदी… सूर्य… पाठ… सावली… सगळंच… सोनकुळे वर्तमानात घेऊन (आलेला असतो).”, “पहिला प्रलय, मनू, त्याचा मासा, तेव्हाचं सारं पाणी त्याला आठवत (असतं)” किंवा पुराणातले न घडलेले इतिहास, घडलेल्या आणि त्याच्या आठवणीतल्या इतिहासात मिसळून गेल्याने “जणू आठवत (असतं).” अशी सरमिसळ झालेल्या काळाच्या भानामुळे, “अवजड रात्र अवतीभवती… ती लांब लांब जाते… ती बोगदा आहे की तळ नसलेलं पात्र?” अशा प्रश्नामार्गे, हुलकावे देणाऱ्या अनंततेविषयी सोनकुळे साशंक होतो. दुसऱ्या वळणानं जाता त्याला काळाच्या अनंततेचं आणि स्वतःच्या स्वत्वाचं अतूट नातंही जाणवत असतं.  “स्वतःतून बाहेर पडलो तर काळ वाया जाईल,” आणि अनंत कालखंड वर्तमानात गोळा करून “स्वतःपाशी राहिलो तर काळ सुरकुतेल” अशी त्याची द्विधा मनस्थिती होते. 

पाण्यावरची पायवाट

सोनकुळेची अंतस्थ आंदोलनं, सगळे स्थायी अस्थायी विचार त्याच्या दैनंदिनतेची नस निमित्ता निमित्ताने नेमकी पकडतात. “लोकांचं ऐहिक गांभीर्य आपल्यात नाही,” असं सोनकुळे मानत आलेला असला तरी विचारांना “वस्तूंची बाजू असते,” हे त्याला जरा उशिरानं का होईना, कळतं. पण वळत नाही. त्याचा जीव रोज रहाटीतल्या “तपशिलांच्या नजरकैदेत तळमळतो.” एका विवक्षित क्षणी “अंतर्मुखतेच्या प्रखर झोतात तो विश्व कोंदाटून टाकतो.” अमूर्ततेची कास धरून सोनकुळे “विचारासारखा वाहतो.” वळणावळणांनी वाहणाऱ्या विचारांनी, उलटसुलट गुंतागुंतीच्या संवेदक सूत्रांनी, आतल्याआत होत राहणाऱ्या स्थित्यंतरांनी जडणघडण झालेलं सोनकुळेचं स्वत्व एखाद्या टपोऱ्या गोळीबंद स्थिरचित्त थेंबासारखं तेवत नाही. ते एखाद्या ओघळनिघळ फराट्यासारखं मिटत उमटत उलगडत जातं. “रेघ म्हणजे चालत निघालेला बिंदू” असा निर्वाळा पॉल क्ली हा थोर चित्रकार ‘नवल’मध्ये देतो.

..................................................................................................................................................................

या कादंबरीतलं एक प्रकरण वाचण्यासाठी क्लिक करा -

जीव तपशिलांच्या नजरकैदेत तळमळतो (कादंबरीअंश)

..................................................................................................................................................................

झिळमिळ विचारांचा सोनकुळे त्या ओसंडत्या विचारांमधून विचारांनिशी “अवचित, अनाहूत, अनर्गल” चालीत चालतो. नदीपार पायी जाण्यासाठी बांधलेल्या लहान पुलाला ‘नवल’मध्ये “पाण्यावरची पायवाट” असं साजेसं नाव दिलंय. सोनकुळे पुलावरून नाही तर थेट पाण्यावरून चालत असल्यासारखा “पायवाट न पाडता” हिंडतो-फिरतो. अतिअंतर्मुखतेच्या महाप्रलयी पाण्यावर वावरताना - त्यानं कुठे सुरुवात केली? तो कुठे पोचला? त्यानं किती आणि कुठलं अंतर पार केलं? ते ‘नवल’ वाचताना कसं कळावं!         

नवल – प्रशान्त बागड

पपायरस प्रकाशन, कल्याण

मूल्य – ४७५ रुपये.

..................................................................................................................................................................

माया निर्मला

maya.nirmala@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......