मराठी समीक्षा अजूनही ‘बालभारती’, ‘कुमारभारती’, ‘युवक भारती’ अशा वर्गीकरणात कोंडून पडलेली आहे!
ग्रंथनामा - झलक
जी. के. ऐनापुरे
  • ‘निरूपक’ या ज्येष्ठ साहित्यिक मोतीराम कटारे यांच्यावरील गौरवग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Tue , 29 June 2021
  • ग्रंथनामा झलक निरूपक मोतीराम कटारे आंबेडकरवादी समीक्षा मार्क्सवादी समीक्षा साहित्यसमीक्षा

‘निरूपक’ हा ज्येष्ठ साहित्यिक मोतीराम कटारे यांच्यावरील गौरवग्रंथ जी. के. ऐनापुरे यांनी संपादित केला आहे. तो नुकताच सहित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला ऐनापुरे यांनी दीर्घ स्वरूपाची प्रस्तावन लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

‘आंबेडकरवादी समीक्षा’ म्हणत असताना मराठी समीक्षाच अभिप्रेत असते. मराठी समीक्षेला समतोल करण्याचे काम मराठीतल्या मार्क्सवादी समीक्षेनं आपल्या विचारव्यूहाच्या बाहेर ठेवल्याने, त्यासाठी आंबेडकरवादी समीक्षेला कार्यरत राहावे लागले. कॉ.शरद् पाटील यांनी हा कार्यकारीभाव डॉ.आंबेडकरांनंतर पहिल्यांदा अधोरेखित केला. मार्क्सवादी समीक्षेच्या ब्राह्मणी, मर्ढेकरी (Primitive) मर्यादा दाखवून देताना त्यांनी केलेला मार्क्स-फुले-आंबेडकर (माफुआ) संयोगचा प्रयत्न असाधारण असाच आहे. या त्यांच्या प्रयत्नामुळे मार्क्सवादी समीक्षा अधिक पल्लेदार, धारदार व्हायला पाहिजे होती. पण, जातीय आत्ममग्नतेमुळे हा कर्तव्यभारपणा आंबेडकरवादी समीक्षेला स्वीकारावा लागला. मूलभूतता आणि उपयोजन या बाबतीत तिने दाखवलेला कर्मठपणा, मराठी समीक्षेच्या अॅकॅडमिक सनातनीपणाला (आधुनिक समीक्षा सिद्धान्त) पुसून टाकणारा आहे.

मराठी समीक्षा (भाषेच्या अभ्यासकांपुरती) अजूनही ‘बालभारती’, ‘कुमारभारती’, ‘युवक भारती’ अशा वर्गीकरणात कोंडून पडलेली आहे. तिला या वर्गीकरणातून मुक्त करण्यासाठी केलेले प्रयत्न उपयोजनाअभावी तसे अपुरेच ठरतात. अर्थात, हे प्रयत्न भाषाशास्त्रज्ञांनी केलेले आहेत. याची ओळख भाषेचे अध्यापनकार्य करणाऱ्या लोकांना नीटपणे नाही. नव्या शतकात तसे असण्याचे कारणसुद्धा नाही. असे म्हणण्याचे कारण समीक्षेच्या या नव्या वर्गीकरणातच शोधता येईल. रोजच्या दैनिकांत छंद म्हणून लिहिली गेलेली जुजबी, प्राथमिक, पुस्तकाची ओळखवजा माहिती देणारी समीक्षा (लिहिणाऱ्याच्या म्हणण्यानुसार) या ‘बालभारती’ गटात मोडते.

इथे शब्दमर्यादा असल्याने लिहिण्याच्या, विस्ताराने व्यक्त होण्याच्या शक्यता आपोआपच खुंटतात. यामध्ये पाठराखण (न वाचता लिहिलेला) म्हणजे blurb किंवा ‘अंतपान’ (नाटककार चं. प्र. देशपांडे यांचा शोध) या जागेसाठी किंवा स्थितीसाठी लिहिलेला मजकूर. या मजकुराला मराठीत समीक्षा म्हणण्याचा प्रघात अलीकडच्या काळात पडला आहे. तिला ‘पाठथोपटी समीक्षा’ असे नाव देण्यात आलेले आहे. पुस्तक परीक्षणे, दैनिकातले आठवड्याचे स्तंभलेखन हे काही अपवाद वगळता ई-कचराच असतो. त्याला ‘बालभारती’मध्ये मोजणेसुद्धा धाडसाचेच ठरेल. या पातळीवर कार्यरत असणारे बऱ्याचदा चळवळीतले कार्यकर्ते असतात. प्रसंगनिष्ठ अशा अंगाने लिहिलेल्या लेखनालाच ते ‘समीक्षा’ म्हणत असतात. अशाच लेखनाचा ते आग्रह धरतात. ते स्वत:ला समीक्षक-विचारवंत म्हणवून घेतात. हे लोक साहित्य व्यवहाराच्या अग्रभागी राहून दर्जात्मक मोजमापाला अग्रक्रम देताना दिसतात. त्याचे हे मोजमाप आणि अग्रक्रम चळवळ आणि साहित्याच्या मूल्यमापनासाठी मारकच ठरतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘कुमारभारती’ या गटात मोडणारी समीक्षा ही ‘सजग समीक्षा’. आपल्या गटातटाच्या, जातीच्या बाहेर न पडणारी, गटाच्या  नेत्याच्या  शब्दाला  प्रमाण  मानणारी  अशी.  अशा लिहिणाऱ्या युवा समीक्षकांची संख्या महाराष्ट्रात खूप आहे. या खूप असण्यामध्ये समग्र वाचनाचा ताण सांभाळून लिहिणारे समीक्षक जवळ जवळ नाहीत. बऱ्याचदा या समीक्षेच्या व्यवहाराबद्दल बार, हॉटेल, खाजगी समारंभ, प्रकाशन सोहळे, संमेलने, चर्चासत्रे यामध्ये खास अशा योजना ठरवल्या जातात. आणि हातात आलेल्या पाकिटानुसार त्याची कार्यवाही होताना दिसते.

‘आंबेडकरी समीक्षा’ या दोन्ही गटाच्या म्हणजे ‘बालभारती’ आणि ‘कुमारभारती’च्या मध्यापर्यंत विस्तारलेली दिसते. मिलिंद महाविद्यालयातील काळ, पँथर पर्वातील विद्रोहाचे अनुकरण, १४एप्रिल-६ डिसेंबरच्या विशेष अंकात डॉ. आंबेडकरांच्या उद्धृतांनी  विस्तारलेले लेख, कविता, रिपब्लिकन ऐक्याबद्दल लिहिलेले स्फूट, आपापल्या नेत्यांच्या गौरवासाठी पाडलेले लेख, थातूरमातूर दलित (भारतीय) साहित्याचे अनुवावाद असा पोटापाण्यापुरता लेखनाचा झालेला प्रयत्न येथे दिसतो. ‘आंबेडकरी समीक्षा’ म्हणून वर्षानुवर्षे यांचे हेच उद्योग अतिशय तळमळीने चाललेले दिसतात. उदाहरण म्हणून येथे लांबलचक यादी जोडता येईल. कदाचित ते अपमानास्पद ठरण्याची शक्यता वाटते; म्हणूनच येथे ती यादी देत नाही.

‘युवक भारती’ या गटात येणारी समीक्षा, सिद्धान्त, टीका यांच्या सीमारेषा पार करणारी असली, तरी प्रतिसादाअभावी आणि चर्चात्मक पातळी न लाभल्याने ती बऱ्याचदा एकाकी विस्तारते. मरून जाते. साहित्य-सामाजिक व्यवहारासाठी तिची उपयुक्तता जवळपास संपुष्टातच आलेली असते. ती स्वकेंद्री असल्याने तिच्यातल्या बहुमताच्या शक्यता अडचणीच्या बनतात आणि या लेखनाला वैयक्तिक दुश्मनीचे स्वरूप प्राप्त होते.

ऐंशीनंतर या समीक्षेची सुरुवात झाली. नव्वदच्या दशकात तिने स्वयंभू अशी उंची गाठली. नव्या शतकात ती नष्ट झाली. म्हणजे फेसबुक, ब्लॉगपुरती मर्यादित राहिली. या गटाच्या बाहेर असलेल्या प्रस्थापित, आस्वादक समीक्षेचीच आज चलती आहे. याचा फायदा परंपरावादी समीक्षेचे अभिवाचन करून घेत आहेत. अभिवाचनासाठी त्यांनी रा. माधव आचवल यांच्या ‘जास्वंद’ (१९७४) या पुस्तकाची निवड करावी; ही साहित्य व्यवहार सराईतपणे बघणाऱ्या माणसाला समीक्षेतील चित्तथरारक आणि चिंताजनक गोष्ट वाटेल.

मराठीतील समीक्षा व्यवहाराला बोथट करण्याचं काम ‘प्रस्तावनावीर’ आणि ‘पाठराखण करणारे महामहोपाध्याय’ यांनी जोमात सुरू ठेवलेले आहे. सांस्कृतिक लढाईचा विचार पाठराखण करताना किंवा प्रदीर्घ प्रस्तावना लिहिताना होताना दिसत नाही. उलट ज्याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, पाठराखण केली, तो या अतिसार कौतुकामुळे या लढाईचा बिनीचा शिलेदार न बनता, या लढाईपासून बाजूला होताना दिसतो. प्रस्तावना आणि पाठराखण या नावाखाली लिहून (हातोहात) लांबवलेल्या मजकुरामुळे मराठी समीक्षेतील टीकात्मकता जवळपास नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. ‘टीकास्वयंवर’ (१९९०) हे कदाचित या प्रकारातले शेवटचे पुस्तक ठरावे. प्रस्तावना आणि पाठराखण करणाऱ्यांनी स्वत:चा मजकूर स्वत:च काही दिवसांनी तपासून पाहिला, तर आपल्या या सांस्कृतिक पराक्रमाची त्यांनाच लाज वाटेल; अशी गंभीर परिस्थिती आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मराठी साहित्य-समीक्षा व्यवहारावर ‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ (कॉ.शरद् पाटील), ‘टीकास्वयंवर’ (डॉ.भालचंद्र नेमाडे), ‘झोत’ (१९७८, डॉ.रावसाहेब कसबे) या पुस्तकांचा मराठी साहित्य समीक्षा व्यवहारांवर काय परिणाम झाला? याच्यावर विस्तारपूर्वक लिहिण्याची गरज आहे. कॉ. शरद्  पाटील यांचा अपवाद वगळता इतरांच्या भूमिका संदिग्ध आणि हिंदुत्ववादी राजकारणाच्या वर्चस्वाखाली जाऊन, निसरड्या, युक्तीवादशास्त्राच्या मध्यमवर्गीय खेळात  अडकून  पडल्या  आहेत.  कॉ.शरद्  पाटील  यांनी  मार्क्सवादी  समीक्षेला डोक्यावर उभी करण्यात यश मिळवले असले तरी त्यांचे अनुकरण आणि अन्वयार्थ, विस्तार करण्यात एक पिढी खर्च पडेल, असे वाटते. ‘आंबेडकरवादी समीक्षे’ला निव्वळ चळवळ आणि कार्यकर्ता मानसिकतेतून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या लिखाणाने केले. संशोधन हा कोणत्याही गंभीर लेखनाचा (समीक्षा /वैचारिक) पाया असतो; हे आत्मभान डॉ. आंबेडकरांनंतर बहुजन समाजात टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी केले.

पण या तिघांच्या लेखन व्यवहाराला युवा प्रतिसादापासून लांब ठेवण्यासाठी जे सांस्कृतिक राजकारण उपयोगात आणण्यात आलं, त्यामध्ये दुर्बोधता (कॉ.शरद् पाटील), शेरेबाजी (डॉ.नेमाडे), आंबेडकरविरोध (डॉ. कसबे) अशा शेलक्या; पण वेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या. नेमाडे-कसबे यांनी हे सांस्कृतिक अडथळे ज्या पद्धतीने पार केले, ते कॉ. पाटील यांना पार करता आले नाही. त्याचे मुख्य कारण अॅकॅडमिक व्यवहाराशी समांतर नसलेला एक पूर्ण समाज त्यांच्यापासून लांब होता. अनोळखी होता.

मात्र, आज या स्थितीत परिवर्तनीय फरक पडल्याने कॉ. पाटील यांच्या मूल्यभानातील क्षमता कायम आहे. इतरांची ती आता विरोधाभासाच्या पातळीवर आहे. या तिघांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा सूर सुरुवातीला एक असला, तरी सांस्कृतिक हेलकाव्यामुळे या गोष्टी (वर्तमानात बुद्ध-भूतकाळात आंबेडकर) एकमेकांच्या विरोधात गेल्या आहेत.

येथे कॉ. पाटील यांचे विचार-विकासातील सातत्य महत्त्वपूर्ण आणि सांस्कृतिक लढाईचे मुख्य हत्यार बनते. हा विकासक्रम मार्क्सवाद-मार्क्स-फुले-आंबेडकर (माफुआ)- सौत्रान्तिक मार्क्सवाद असा सांगता येतो. हे साध्य करत असताना कॉ. पाटील यांनी मराठीतल्या सॅक्शनच्या सर्व गोष्टी गुंडाळून ठेवल्या. मराठीतल्या अ‍ॅकॅडमिक साहित्य समीक्षेवर या सगळ्या विचार व्यवहाराचा परिणाम तुटपुंजा असाच आहे. चळवळीत हा उत्साह अमाप आहे, होता. पण, तो सहजासहजी वाहून जाण्यासारखाच अस्तित्वात राहिला. अ‍ॅकॅडमिक जगात या विचार व्यवहाराची भीती सॅक्शनच्या अंगाने होती.

बऱ्याच जणांनी दाखवायला अनुयायीत्व पत्करले. तोंडी लावायला विचार सांगितले. प्रत्यक्ष सांस्कृतिक व्यवहार करताना ‘मनुमृती’ कायद्याचे पालन केले.  (देशीवाद सांगणारे, नेमाडेंच्या शिष्यांच्या बाबतीत हा प्रकार जास्त समोर आला.) फार मोठा बौद्धिक समूह कालावधी पर्यंत या विचारापासून दूर राहिला. याचे परिणाम सगळ्याच बाजूने नव्या शतकात दिसायला लागले. सांस्कृतिक लढाईसाठी पर्यायी विचाराचा जो भरभक्कम पाया तयार होत चालला होता; तो राजकीयदृष्ट्या धूसर होत गेला. सांस्कृतिक लढाई हाताबाहेर जात असल्याचे याच काळात जास्त जाणवायला लागले. मात्र मार्क्सवादी,आंबेडकरवादी समीक्षा लिहिणाऱ्या नव्या पिढीत, मात्र  ‘अच्छे दिन’ आल्याप्रमाणे  सगळ्या  गोष्टी  आलबेल, फेसबुकीय बनल्या आहेत. त्यातला आवेश, आत्मविश्वास कामापुरता, दिसामाजी असा स्वच्छ आहे. या एकदमच ताज्या समीक्षेचा तुकडा वानगीदाखल समोर ठेवत आहे. त्यातून समीक्षेचा गळा घोटण्याच्या सार्वजनिक पद्धतीची प्रक्रिया ध्यानात येईल. याला संपादक समाजाची निष्क्रियता जबाबदार असल्याचे (वाचक) अधिक जाणवेल.

नव्वदोत्तरी दलित-आंबेडकरी मराठी कादंबरीची वाटचाल ही अशी दुहेरी स्वरूपाची आहे. एका बाजूने ही कादंबरी दलित जाणिवांचा शोध घेत जाते. आणि दुसऱ्या बाजूने ही कादंबरी आंबेडकरी जाणिवांचा शोध घेत जाते. या कादंबऱ्यामधून प्रकट होणारे दलित जीवन वास्तव हे आजच्या समाजजीवनाचे एक समकालीन सत्य आहे. त्याच प्रमाणे या कादंबऱ्यांमधून प्रकट होणारे आंबेडकरी जीवनदृष्टीरूप हेदेखील आजच्या समाजजीवनाचे एक दुसरे समकालीन सत्य होय. या दोन्ही प्रकारचे समकालीन जीवनवास्तव या कादंबऱ्यांमधून प्रभावी स्वरूपात अभिव्यक्त झाले आहे. नव्वदोत्तरी दलित-आंबेडकरी कादंबऱ्यांमधून प्रकट होणारी दलित जाणीव, तसेच या कादंबऱ्यांमधून प्रकट होणारी आंबेडकरी जाणीव, यांचे संबंध सरळसोट स्वरूपाचे  आहेत, असे  म्हणता  येत  नाहीत.  त्यांचे  संबंध  मोठे  व्यामिश्र स्वरूपाचे आहेत. त्या संबंधामध्ये परस्परपूरकता आहे, त्याचप्रमाणे परस्पर विरुद्धतादेखील आहे (२०१७ : ६०).

वरील उद्धृताचे आकलन हा समीक्षेच्या दृष्टीने एक गंभीर मुद्दा आहे. विद्यापीठाच्या आवारातील, भाषा विभागातील ही समीक्षा. सॅक्शन (न वाचता) हा तिचा मूलभूत हक्क आहे. ही समीक्षा ‘बालभारती’मध्ये मोजली जाईल. कारण तिच्यात प्रतिकाराचा जीव नाही. ती समूह-पोटसमूह यातील द्वेषाने बरबटलेली असल्याने तिच्यातल्या विधानाच्या शक्यता आकारालाच येत नाहीत.

१९८०-९०च्या दशकात मराठी नव्या शक्यता निर्माण झाल्या, त्याबद्दल अगदी थोडक्यात आपण पाहिले. त्याला अलीकडच्या समीक्षेबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला. समीक्षेत अवतरणाऱ्या आंबेडकरवादी बाजू शोधण्याचा प्रयत्न केला. यातून समीक्षेची नवी प्रारूपे (Models) किंवा शक्यता हाताला लागतात का याचा शोध घेतल्यानंतर खूप कमी नावे हाताला लागली. त्यात रा. पार्थ पोळके (रा. रामदास ठोसर यांच्या कवित्व आणि व्यक्तित्त्वाचा पर्दाफाश), डॉ.अनिल सपकाळ, कॉ.सचिन माळी (मार्क्सवाद-आंबेडकरवाद समन्वयाचा प्रत्यक्ष कृती आणि साहित्य उपयोजनाचा प्रयत्नाचे खंडीत सातत्य). कॉ. माळी यांच्या क्षमतेचा वापर साहित्य व्यवहारात अधिक व्हायला  हवा. कॉ.शरद्  पाटील  यांना  जोडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न वाङ्मयीन व्यवहारात जबाबदारीने विस्तारायला हवा. डॉ.भूषण रामटेके यांनी प्रादेशिकता सोडून पेपरवर्क, भाषणबाजी आणि सॅक्शनच्या खोट्या, भंपक व्यवहारात न अडकता केल्यास त्यांच्यातील अनन्यसाधारण क्षमता उपयुक्ततेच्या अंगाने कार्यरत होईल.

या उपर प्रा. अनिकेत जावरे आणि रा. रविंद्र इंगळे-चावरेकर यांनी केलेल्या कामामध्ये नव्या शक्यता (प्रारूपे) अधिक प्रमाणात आणि प्रभावीपणे उतरलेल्या दिसतात. डॉ.आंबेडकर हे Universal Standard म्हणून मान्य केल्यास अभ्यासाच्या दिशा कशा विस्तारित आणि नव्या विचारमंथनाला जागा करून देतात; याचे सूचन या दोघांच्या कामात दिसून येते. चावरेकर यांच्यावर संशोधनात्मक मूल्यांचा अधिक प्रभाव आहे. तर मार्क्सवादी प्रा. जावरे, डॉ. आंबेडकरांना, सत्ता (power) संकल्पनेची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता दाखवणाऱ्या फुको (Michel Foucault) बरोबर लावून बघितले आहे (संयोग अशा अर्थाने). त्याला ते ‘सुंदर’ आणि ‘फुकोसदृश्य क्षण’ असे म्हणतात (डॉ.आंबेडकरांच्या Who were the shudrasचा संदर्भ घेऊन). मुळात ही कल्पना ज्या लेखात विस्तारलेली आहे, तो ‘फुको आणि आंबेडकर’ हा लेख मूळाबरहुकूम असा वाचायला हवा. मराठी दलित कवितेचा विचार करताना त्यांच्यावरील फुकोचा प्रभाव पष्ट होतो. या लेखात त्यांनी ‘स्पर्शव्यवस्था’ असा नवा विचार मांडला आहे. त्यासाठी त्यांनी गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’चा संदर्भ दिला आहे. गोडसे भटजींच्या म्हणण्यानुसार १८५७च्या बंडाची ठिणगी ब्राह्मण आणि चांभार यांच्यातील वादावरून (पाणी  पिण्यासाठी चांभाराने ब्राह्मणाकडे  लोटा मागितल्यामुळे) झाली. याच लेखात त्यांनी दलित उक्तीचे तीन साचे सांगितले आहेत.

दलित उक्तीचे तीन साचे दिसतात. पहिला आहे नैतिक आणि सामाजिक अपेक्षेचा. अपेक्षा अशी आहे की, समंजसपणे आणि परखडपणे तक्रार मांडल्यावर ब्राह्मणी वर्तन आणि राज्यकर्त्यांचे वर्तन बदलेल (जोतीराव  फु ले). जेव्हा या अपेक्षेची पूर्ती होत नाही, तेव्हा दुसरा साचा आकार घेतो. बदलासाठी कायद्यातच सोयी करून ठेवायच्या. अजूनही अनेक क्रांतिकारी आणि राज्यकर्ते या साच्यातच वावरतात (आंबेडकर). जेव्हा कायद्याचेही पालन होत नाही असे दिसू लागते, तेव्हा तिसरा साचा आकार घेतो. बदल घडवण्यासाठी बळ वापरण्याचा-शब्दांचे, तलवारींचे, दगडांचे, टॅक्सीचे बळ (दलित पँथर) (२०११ : १६).

दलित साहित्यावर जे काही लिहिलेले आहे त्यात चित्रकार आणि जे. जे. स्कूल आर्टचे डीन्. कलामीमांसक रा. संभाजी कदम यांचा लेख मूलभूत अशा अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. जावरे यांचा हा लेख वाचल्यानंतर हा अग्रक्रम बदलण्याची शक्यता निर्माण होईल इतका नावीण्यपूर्ण विस्तार या मांडणीत आहे. लेखनाच्या विस्तारात अधूनमधून कवितेच्या ओळी पेरून, त्याच ओळींचा अर्थ सांगण्याला समीक्षा म्हणणाऱ्या अॅकॅडमिक अंडरग्रॅज्युएट ‘प्रस्तावनावीर’ आणि ‘पाठराखण करणारे महामहोपाध्याय’ यांनी या लेखाचा मुद्दाम अभ्यास करावा; अशा जिनियस शक्यता त्यात आहेत. दलित कवितेच्या गौरवीकरणाचा विचार प्रा. जावरे यांनी मांडला आहे तो विचार करण्यासारखा आहे.

आधुनिक मराठी काव्याची आधुनिकता ‘दलित’ काव्यात सर्वाधिक स्पष्ट दिसते. अशा प्रकारच्या काव्याचे उत्पादन, अभिसरण आणि उपभोग केवळ याच गृहीतांवर आधारित आहे की ‘जातव्यवस्था’ वाईट आहे. जातिव्यवस्थेत दलितांवर घडणारा अत्याचार पूर्वाधुनिक समाजाचे, नैतिकतेचे द्योतक ठरतो. या काव्याचे दुसरे महत्त्वाचे योगदान हे की, या काव्याने साहित्यक्षेत्राची प्रच्छन्न राजकीयता उघड्यावर आणली. ही आधुनिकता पाश्चात्य लेखकांच्या आधुनिकतेपेक्षा अनेक पटींनी समाजाभिख आणि राजकीय आहे.  पाश्चात्य साहित्याच्या आणि मराठी साहित्याच्या आधुनिकतेत हा महत्त्वाचा फरक आहे (२०११ : १८).

अशा प्रकारचे जातविरहित गौरवीकरण किंवा तसा विचार मराठी समीक्षा (साहित्य) व्यवहारात चुकूनच सापडतो. प्रा. अनिकेत जावरे यांची समग्र समीक्षा ‘काळे पांढरे अस्फुट लेख’ (२०११) या एकमेव ग्रंथात समाविष्ट आहे. या ग्रंथातील विपुलता, विविधता आणि खोली पाहण्यासारखी आहे. यातील अभ्यासात, विस्ताराच्या शक्यता खूप माठ्या प्रमाणात आहेत. साहित्य, समीक्षा, उत्तर-आधुनिकतावाद, अस्तित्ववाद, प्रसारमाध्यमे, भाषांतर, इतिहासाचे पुनर्लेखन इ. महत्त्वाच्या विषयांचा त्यात समावेश आहे. त्यातील लेखांची शीर्षकेसुद्धा वेगळ्या वळणाची आहेत. ‘व्यंजनांचे महत्त्व : बाबूराव बागूलांच्या काही कथा’ (पृ. ३७), ‘टीकास्वयंवर अर्थात कोणी कोणास वरले’ (पृ. ४५) अशी. बागूलांच्या कथांबद्दलचे त्यांचे आकलन असेच नोंद घेण्यासारखे आहे. कलाकृतीच्या आशयातील शक्यतांचे अचूक विश्लेषण करणे नव्या प्रारूपाची नांदी असते. ती येथे ठळकपणे दिसते.

गद्यकथांचे अर्थबोधन, त्यांचा सामाजिक आणि राजकीय अर्थ इत्यादींमध्ये आपल्याला भयंकर रस असल्याळे गद्यलेखनातील नादव्यवस्थेकडे आपण सतत दुर्लक्ष करीत असतो. शिवाय, त्यामागे व्यंजन म्हणजे शरीर आणि स्वर म्हणजे आत्मा असे अध्यात्म पाठीला आहेच. बागूलांच्या शैलीतील, घटना आणि व्यक्तिरेखा यातील दुभंग-संस्कृत-प्रचूर शब्दभांडार आणि व्यक्तिरेखांचे ध्वस्त आणि भयानक आयुष्य-विशेषत: स्त्रियांचे आयुष्य-यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हा दुभंग बागूलांच्या लिखाणाचा सर्वांत महत्त्वाचा विशेष आहे, आणि मराठी साहित्याला त्यांनी दिलेली अमूल्य देणगी आहे (२०११ : ४४).

रा. नेमाडे यांच्या देशीवादाची चर्चा मराठी साहित्यात तीन ते साडेतीन दशकांपासून चालूच आहे. पण, त्याचा अचूक प्रतिवाद न करता नेमाडेंच्या व्यक्ती दोषावर अनेक जण घसरलेले दिसतात. हे घसरणे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर अधिकच विस्तारले. त्याची घसरगुंडीच सुरू झाली. या सगळ्यात प्रा. जावरे यांनी देशीवादाचा केलेला अचूक प्रतिवाद दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला. त्याचे मुख्य कारण म्हणजे तो ग्रंथात समाविष्ट नसल्यामुळे आणि ज्यांना हा प्रतिवाद माहीत होता, त्यांनी तो रामायण - महाभारतातल्या काल्पनिक अस्त्राप्रमाणे वापरला. पण, प्रा. जावरे यांचे नाव घेण्याचे टाळले. याचा गैरवापर विरोधकांनी इतका केला की, देशीवादी लेखन म्हणजे वास्तववादी लेखन. आणि वास्तववादी लेखन म्हणजे रिपोर्टिंग; हा मौखिक प्रचार अस्तित्वात आला. या प्रचाराला अनेक नवीन लेखक-कवी बळी पडले. आणि त्यांच्यातला लिहिण्याचा विस्तार खुंटला. थोडक्यात, प्रा. जावरे यांच्या देशीवादी प्रतिवादाचा वापर असा दुहेरी पद्धतीने वापरला गेला. यातील वस्तुस्थिती आणि प्रा. जावरे यांची विश्लेषण क्षमता नव्या लिहिणाऱ्यांच्या परिचयाची व्हावी म्हणून काही मुद्दे येथे उद्धृताच्या रूपात देत आहे.

त्यात आम्हास दोन तात्त्विक गफलती आढळतात. एक म्हणजे माती–पीक संबंध व समाजजीवन - कलाकृती संबंधाचे एकत्रीकरण. कुठलीही कलाकृती रोपटे वाढते तितक्या ‘नैसर्गिक’ प्रक्रिने अस्तित्वात येत नाही. विशेषत: लिखित व छापील भाषा व्यवहार तर हमखास नाही. मग, ती मडक्यावरील नक्षी असो किंवा तुकारामाचे अभंग किंवा नेमाडेंची कादंबरी. कृतीचे परिणाम ‘कलाकृती’ बनतात ते विविक्षित परंपरेतच. ही परंपरा संस्कृतीच्या रखवालदारांनी बनवलेली असते. लिखित साहित्याची कृत्रिमता नेमाडे ध्यानात घेताना आढळत नाहीत. मायबोलीतील देशी साहित्य असो किंवा इंग्रजीत भारतीयांनी लिहिलेले, दोन्ही तेवढेच कृत्रिम असते. माती - पीक - जीवन - कलाकृती हे एक रूपक (अॅरिस्टॉटेलिअन मॅटेफर) समजले व यात उघड केलेले संबंध इतक्या कडकपणाने लावायचे नाहीत, अशी अपेक्षा असेल तर रूपकविहीन गद्याचे उदाहरण त्यांनी द्यावे (२०११ : ५१).

अर्नाल्ड, ब्रॉडली, क्विलर-काउच इ. असैद्धांन्तिक टीकाकारांची परंपरा नेमाडे का चालवू पाहत आहेत? असा प्रश्न उपस्थित करून हीच त्यांची टीकेची समज असेही म्हणता येत नाही; असे प्रामाणिकपणे सांगून टाकतात. पण, त्यामुळे त्यांचा प्रतिवाद ठिसूळ होत नाही. तो अधिक टोकदार बनतो.

दुसरे असे की देशाच्या मातीत जन्मलेल्या, फोफावलेल्या साहित्यातच वैश्विक परिणामे प्राप्त होतात हे मत; व त्याची शेक्सपिअरवादी उदाहरणे. कलेच्या कुठल्याही नमुन्यातून वैश्विकता दिसते, असे आम्हास खात्रीने कोणी दाखवू शकेल? शेक्सपिअरचेच उदाहरण घ्यायचे तर, शिकवल्याशिवाय त्याचे कोणते लेखन कळू शकते? मग हे शिकवणे गुरूमुखातून असो वा आर्डन आक्सफर्डेत्यादी आवृत्त्यांतून असो, याशिवाय तरी शेक्सपिअरीयन नाटकांची व त्याच्या सॉनेटसची वैश्विक ता आम्हास कळत नाही, व जी अधिकृतरित्या विद्यापीठांमधून ‘शिकवली’ जाते, त्या वैश्विकतेविषयी आम्हास शंका वाटणे उचितच आहे. वैश्विकता वगैरे भंपक कल्पना आहेत. सतराव्या-अठराव्या शतकात काही खास रॅशनॅलिस्ट उदारमतवादी व ‘मानवतावाद्यांनी’ पुढे आणलेल्या. याच  मानवतावादाखाली  आम्हा रानटी नेटिवांना मानव  बनवण्यासाठी  त्यांनी  आम्हाला  पश्चिमी  नीतिनियमांचे बाळकडू पाजून आमच्या अतिरेकी धार्मिकतेविरुद्ध आवाज उठवले व याच भंपक वैश्विक मानवतावादाच्या आधाराने भारतात प्रगती, ज्ञानवृद्धी, संशोधन (शास्त्र व विद्या यामध्ये)  अंधश्रद्धा  निमूर्लन,  खेड्यांचे  इलेक्ट्रिफिकेशन, तंत्रश्रद्धा इ.  अनेक  अघोरी  प्रयोग  होत  आहेत. आम्ही  अतिशय प्रतिगामी विचारसरणीचे असूही. परंतु, वीज नसलेल्या गावातील व्यक्तींचे आयुष्य, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते, त्यांचे खुद्द सूर्याशी असलेले निसर्गत:च जणू असे  अधिभौतिक नाते, याचे  इलेक्ट्रिफिकेशन आम्हांला धक्कादायक भासते (२०११ : ५१-५२).

प्रा. जावरे यांच्या प्रतिवादाचा तर ध्यानात यावा; यासाठी हे प्रदीर्घ उद्धृताचे तुकडे देण्याचा प्रपंच इथे केला. या समीक्षेत मराठी साहित्यातील गट-तट, आयकॉन, प्रस्तावनावीर, पाठराखण करणारे महामहोपाध्याय इ. गोष्टींना महत्त्व दिलेले नाही. त्यामुळेच देशीवादाचा प्रतिवाद करणारे हे पूर्ण टिपणच महत्त्वाचे ठरते. प्रा. जावरे यांची संदर्भ देण्याची पद्धती आणि बौद्धिक खुलेपणा दर्शवणाऱ्या अनेक जागा या समीक्षेच्या विवेचनात पष्ट दिसतात. पाश्चात्य आणि देशी यातील समतोल टिकवून पांडित्याला  नकार  देण्याचा  धाडसी  प्रयत्न या  जागा  दाखवतात. 

कॉ. शरद्  पाटील यांच्या ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथाचा उल्लेख करून ते म्हणतात; त्यात जुन्या- पुराण्या ग्रंथांचा स्तुत्य पुनर्विचार झाला असला तरी या ग्रंथातील पांडित्य विश्वसनीय आहे. परंतु, विचारपद्धती वेगळ्या अर्थाने अविश्वसनीय आहे (तळटिप पृ. २०) हे स्थानिक उदाहरण  झाले. तर आल्बेर कामू यांना त्यांनी दुय्यम तत्त्वज्ञ मानले आहे. सार्त्र-कामू यांची तुलना करताना (अस्तित्ववाद : एक विचार) लिहितात; कामूची अवस्था यापेक्षाही वाईट आहे. त्याने साहित्य लिहिलेले बरे, Sisyphus किंवा Rebelसारखे तत्त्वज्ञानाच्या मागे लागण्यात काहीसे हुकले, हे सध्याचे मत आहे (पृ. ६१) एके ठिकाणी त्यांनी फील्डींगची कादंबरीची व्याख्या दिलेली आहे; comic epic in prose. अशा अनेक महत्त्वाच्या संदर्भांची रेलचेल या समीक्षेत दिसून येते. नव्या वादांना, चर्चेला जन्म देण्याची क्षमता या लेखनात दिसून येते. ताजेपणा आणि समाजभिमुखता याचे भान यात समांतरपण प्रवास करते. प्रयोगाच्या नावाने चाललेल्या अवडंबराला ही समीक्षा खोडून काढते. वाढू देत नाही. म्हणूनच ‘नवे प्रारूप’ असा अग्रक्रम या समीक्षेला द्यावा वाटतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘निरूपक’ या मोतीराम कटारे यांच्या गौरवग्रंथाच्या नियोजन-प्रयोजनाबद्दल. हा गौरवग्रंथ चार भागात विभागून त्याप्रमाणे लेखनाचा शोध सुरू झाला. दुसरा आणि तिसरा भाग हा कटारे यांच्या लेखनाला जोडून घेणारा होता. या दोन्ही भागांना उदंड प्रतिसाद मिळाला. इतका की, काही लेख पृष्ठमर्यादेमुळे बाजूला ठेवावे लागले. नव्या लिहिणाऱ्या लोकांमध्ये कटारे यांच्याबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेमच त्यातून समोर आले. ही सांस्कृतिक व्यवहारातील मोठी आणि महत्त्वाची गोष्ट. ती प्रत्येकाच्या वाट्याला येईलच, असे नाही. ती कटारे यांच्या वाट्याला आलेली दिसली; हे या गौरवग्रंथाचे यश आणि आम्हाला सगळ्यांना (संपादक मंडळ) मिळालेले नैतिक बळ. हे बळ आम्ही कोणत्याही राजकीय शक्तिशिवाय मिळवले आहे; हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर सिद्ध होईलच.

या ग्रंथाचा चौथा भाग हा कटारे यांच्या प्रदीर्घ मुलाखतीने व्यापलेला आहे. ही मुलाखत वैचारिक द्वंद्व अशा अर्थानेच विस्तारली. या मुलाखतीचे संदर्भ मूल्य वाढावे म्हणून डॉ. अविनाश कोल्हे, डॉ. श्रीधर पवार या सांस्कृतिक-राजकीय जाणकारांना मुलाखतकारांच्या यादीत ढकलले. त्याचा फायदा वाचकांना आणि पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्ता, टीकाकारांना, गटबाजांना नक्कीच होईल. सगळ्यात अडचणीची गोष्ट आणि डोकेदुखी पहिल्या भागासाठी लेखन मिळवताना झाली. कटारे यांची सुरुवातीपासूनच आपण सैद्धांन्तिक लेखन करावे, अशी धडपड चालू होती. बौद्ध सौंदर्यशास्त्र (अप्रसिद्ध) या त्यांच्या ग्रंथाने हे यश त्यांना मिळवून दिले आहे; असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. या त्यांच्या धडपडीचा आदर म्हणून काही सैद्धान्तिक लेखन आणि लेखक यांचा शोध सुरू झाला. साहित्यापेक्षा सिनेमा, नृत्य, चित्रकला, क्रिकेटसारखे इतर खेळ, नाटके इ. गोष्टीवर फोकस करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी JNUपर्यंत मोबाईल रेंज वापरली. यातून हाताला जे काही लागले ते प्राथमिक अवस्थेपेक्षा वाईट होते. फक्त त्याची भाषा इंग्रजी होती (ही विभागणी भारत आणि महाराष्ट्र म्हणजे दलित आणि बौद्ध होती) त्यामुळे या भागासाठी हतबल होण्याशिवाय पर्याय  राहिला  नाही.

याच  भागात  कॉ. शरद्  पाटील  यांच्या  लेखनाचा  विकासक्रम दाखवणारा लेख अपेक्षित धरला होता. तो देणाऱ्या माणसाने (पुणेरी) अजूनही पूर्ण केलेला नाही. रा. एम. एफ. हुसेन यांच्या कार्याचा गौरव करणारा, विरूपणाच्या अंगाने जाणारा लेख अपेक्षित होता. तोसुद्धा मिळवता आला नाही. हे संपादकाचे म्हणजे माझेच अपयश. पाठपुरावा करण्याचे तंत्र आणि संयम या गोष्टी संपादन कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे असल्याशिवाय प्रतिसादाच्या शक्यता कमी असतात. पुढच्या प्रयत्नात यात आणखी सुधारणा होतील. पण, नवा शोध म्हटल्यावर पुन्हा तीच अडचण असणार आहे.

या संपूर्ण करोना महामारीच्या काळात, लॉकडाऊनमुळे लेखन-वाचन-संशोधन या सांस्कृतिक व्यवहाराला जोडलेल्या सगळ्या गोष्टींना मानसिक आणि प्रत्यक्ष मर्यादा पडलेल्याच होत्या. कुठलीही गोष्ट दुष्कर वाटण्याच्या काळात हा गौरवग्रंथ पूर्णत्वाला पोहचला. त्यासाठी संपादन मंडळातील सर्व सदस्य, खास करून रा. सुनील हेतकर, डॉ. अशोक इंगळे यांनी केलेल्या अमर्याद मदतीमुळेया संपादनाचा आणि वैचारिक संपादकीयाचा भार मोकळेपणाने, विस्तारपूर्वक पेलवू शकलो. त्यासाठी त्यांचे  आभार.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जातीच्या बाहेर नेले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आंबेडकरवादी)  आणि जातीत बंदिस्त केले जाणारे बाबासाहेब (आंबेडकरी)यातील मानसिक संघर्षात वाया जाणारी ऊर्जा वाचवून सांस्कृतिक  लढाई (cultural war) अधिक  धारदार, कृती कार्यक्रमयुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. असा विचार केल्यानंतर आंबेडकरवाद हा लेनिन-माओ-मार्क्सवाद, समाजवादाला समांतर जातो. यातील वैचारिक सीमारेषा आपोआप धूसर होतात. यातून असाधारण, धर्मनिरपेक्षतेला सुरक्षित करणारी शक्ती तयार होते. ही शक्तीच आपली ओळख व्हावी ही मनोमने इच्छा. अशा भूमिकेच्या कायम जवळ राहिल्याने, तिचे महत्त्व कळायला वेगळी कृती करावी लागत नाही; या अर्थाला पुष्ट करणारे प्रा. अनिकेत जावरे यांचे जॉ पॉल सार्त्रचा आधार घेऊन केलेले विवेचन (उद्धृत) समोर ठेवून थांबतो-

सार्त्रसाठी ‘स्व’ ची संकल्पना महत्त्वाची होती, हे साहजिकच आहे : ‘स्व’ नसेल तर choice नाही आणि choice नसेल तर commitment नाही, आणि commitment नसेल तर authenticity नाही असे साधे समीकरण आहेच. कोणत्याही साध्या नक्षलवाद्यालासुद्धा हे आता माहीत आहे. ‘स्व’ची संकल्पना साहजिक च फ ‘स्व’साठी ((pour-soi) आणि वांत ((en-soi) यात विभागता येते. ‘स्व’साठी म्हणजे सर्व phenomenological  विश्व आणिया पलीकडचे, न समजणारे असे स्वत:पुरते मर्यादित, स्वांत-in-itself, en-soi वस्तूमात्राचे विश्व अशी जगाची self and otherमध्ये विभागणी केली की, आयुष्य काहीसे सोपे जाते. कारण ‘स्व’ची संकल्पना काही आपण तपासत नाही, ती आपण गृहीतच धरून चाललो आहोत (२०११ : ६१).

चळवळी आणि सांस्कृतिक लढाईच्या विस्ताराचे असेच असते.

निरूपक : मोतीराम कटारे गौरवग्रंथ - संपा. जी. के. ऐनापुरे

सहित प्रकाशन, गोवा

मूल्य - ५५० रुपये

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......