अजूनकाही
सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या प्रचारसभा, त्यांचे आरोप-प्रत्यारोप यांचं रणकंदन पाहायला मिळत आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून ते आपल्या घरात, कानात ओतलं जात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात, एकमेकांना भ्रष्टाचारी ठरवण्यात आणि एकमेकांची उणी-दुणी काढण्यात कुठला पक्ष मागे आहे, असं दिसत नाही. निदान या बाबतीत तरी साऱ्यांचा तोंडवळा सारखाच आहे. म्हणून ‘अक्षरनामा’वरील १० फेब्रुवारीच्या ‘मतदान कोणाला करावं? कोणाला करू नये? का करू नये?’ या संपादकीयात “आपला, आपल्या राज्याचा आणि देशाचा व्यापक पातळीवर विचार करता मतदार म्हणून आपण कुणाला मतदान करावं, हा आपल्या दृष्टीने सर्वाधिक कळीचा मुद्दा असायला हवा. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते भ्रष्टाचार करतात, गुन्हेगार उमेदवारांना पाठीशी घालतात. त्यांना तिकिटं देतात. जातीयवादाचं राजकारण करतात. राजकारणात, सत्तेत राहायचं असेल तर हे सर्व करावं लागतं, असं त्याचं खाजगीत समर्थनही करतात. हे दुष्टचक्र थांबवण्यापलीकडे गेलं आहे. पण सुजाण मतदार म्हणून आपण मतदानासाठी काहीएक निश्चित भूमिका ठरवली तर आपण या दुष्टचक्राला काहीएक प्रमाणात रोखू शकतो, पायबंद घालू शकतो,” अशी भूमिका मांडत मतदारांसाठी एक पंचशील सुचवलं होतं.
‘अक्षरनामा’च्या या भूमिकेशी सुसंगत असा एक म्युझिक व्हिडिओ पुण्यातील काही तरुणांनी तयार केला आहे. तो आवर्जून पाहण्यासारखा आहे. कारण मतदार म्हणून आपण आपल्या योग्य निवडीतून नक्कीच बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी मतदान करायलाच हवं. पण कुणाला मत द्यावं असा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकलेला असतो. तो संभ्रम दूर करणारा, कुणाला मत द्यायचं आणि कुणाला नाही याबाबत मार्गदर्शन करणारा ‘प्लीज गो व्होट’ हा अनोखा म्युझिक व्हिडिओ आहे.
पाटे डेव्हलपर्स आणि सेतू अॅडव्हर्टायझिंग यांनी या अनोख्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. ‘प्लीज गो व्होट बाबा, प्लीज गो व्होट’ असे यातील गाण्याचे शब्द आहेत. महाभारताच्या संदर्भातून आताच्या काळाशी सुसंगत असा विचार या म्युझिक व्हिडिओतून मांडण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेता विजय पटवर्धन यांनी या म्युझिक व्हिडिओमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. अनिकेत वाकचौरे, प्रशांत तपस्वी, तेजस कुलकर्णी, हृषिकेश थेटे, करण खजिने, रोहित सातपुते हे कलाकार या म्युझिक व्हिडिओमध्ये आहेत. निखिल खैरे यांनी गीतलेखन, राजेश कोलन यांनी दिग्दर्शन, योगेश राजगुरू यांनी छायांकन, गंधार यांनी संगीत आणि संयोजन, निखिल ठक्कर यांनी संकलन केले आहे. तेजस गोखले, योगेश कोलन कार्यकारी निर्माते आहेत.
तेव्हा, प्लीज गो वोट बाबा, प्लीज गो वोट!
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment