पूर्वी पुण्याच्या कर्वेनगर भागात राहात असतानाची गोष्ट आहे. चौकात एक कळकट हॉटेल होते. जेमतेम चार बाकडी बसतील इतकी जागा पुढे, आत एक माणूस कसाबसा उभा राहील नि बाजूला एक लहानसे टेबल बसेल इतपत जागा ‘किचन’ म्हणून. हॉटेल नावालाच, कारण सतत उकळणारा चहा, आदल्या दिवशी संध्याकाळी केलेले वडे, मिसळ, दगड झालेली इडली आणि सांबार असे अक्षरश: एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके पदार्थ तिथे मिळत. आमच्या ‘बिडी’वाल्या मित्रांना शेजारच्या पानवाल्याकडे सिगारेट मिळे. मग त्यांची सिगारेट नि आम्हा ‘फुंकसंप्रदायी’ नसलेल्यांसाठी हॉटेलातून मागवलेला चहा यावर तिथे चकाट्या पिटणे चालत असे.
हॉटेलचा मालक एक पैलवान होता नि त्याच्याहून निम्म्या उंची-रुंदीचा त्याचा धाकटा भाऊ बहुतेक वेळा हॉटेलात असे. हा भाऊ एकदम गप्पिष्ट. त्याचं नाव तात्या. त्याच्याशी गप्पा मारता मारता ‘थांबा आधीचा उकळलेला चहा नको, तुम्हाला नव्याने बनवून देतो’पर्यंत चांगली दोस्ती झालेली. एकदा त्याच्याशी गप्पा मारताना समजले की, त्या हॉटेलवर तिघा भावांचे संसार तर आरामात चालतातच, पण तिथे कर्वेनगरमध्येच त्यांनी छानपैकी प्रॉपर्टी बनवून ठेवली आहे. आमच्या त्या वेळच्या घराची लीज संपत आली म्हणून नवे घर शोधताना त्याने त्यातील एक घर दाखवायला नेले होते. आसपासच्या वस्तीच्या तुलनेत ते आरसीसी स्ट्रक्चरचे, अॅल्युमिनिअम विंडो नि ऑईल बाँड लावलेले घर एकदम ताजमहाल वाटत होते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तसं पाहिलं हॉटेलचा दिवसभराचा धंदा हा एखाद्या सदाशिवपेठी उद्धट म्हातार्याच्या दुकानातील गोळ्या-बिस्किटांच्या विक्रीशी स्पर्धा करणारा होता... एकदम निवांत. पण संध्याकाळचे पाच-साडेपाच झाले की, हॉटेल अंग झाडून धावू लागायचं. ज्याचा विस्तार थोरल्या भावासारखा सर्वांगीण न होता फक्त शरीराच्या मध्यभागातच झालेला होता, असा मालकाचा तिसरा भाऊ हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला तयार केलेल्या ओट्यावर भलीमोठी कढई ठेवून उभा राही. सायंकाळी साधारण साडेपाच ते नऊ या काळात तो तिथे दणादण बटाटवडे तळताना दिसत असे. सहापासून हॉटेलसमोर सायकलींची रांग लागे. शहराच्या विविध भागांतून कर्वेनगर, शिवणे, उत्तमगर, वारजे, माळवाडी या भागात आपल्या वस्तीवर परतीच्या वाटेवर असलेले मजूर दोन-दोन वडापाव खाऊन पुढे जात... तेच त्यांचे रात्रीचे जेवण!
तात्याशी एकदा बोलत असताना त्याने सहज सांगितले की, या तीन तासांत सुमारे सहाशे ते सातशे वडा/वडापाव विकले जातात. तो आकडा ऐकून आमचे डोळे पांढरे झाले. ही २०हून अधिक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे! तेव्हा ‘जोशी वडेवाले’ वगैरे ‘फिनोमेना’ नव्हते. त्यांच्या सधनपणाचे रहस्य तिथे उलगडले. पण किस्सा इथे संपत नाही.
एकदा तात्याला डिवचण्यासाठी म्हटले- ‘‘तात्या, तुम्ही बंगला बांधला, फ्लॅट घेतले. मग हे हॉटेल असे कळकट का? किती वर्षांपूर्वीची आहेत ती बाकडी? कोपरे उडालेत, मायका निघालेला, भिंती पण ओशट झालेल्या आहेत. जरा सगळे नवीन करा. माणूस ठेवून रोजचे रोज स्वच्छता करा, म्हणजे हॉटेल आणखी चालेल.’’ त्यावर तात्या गुदगुल्या केल्यासारखा हसला नि म्हणाला, ‘‘दादा, अहो संध्याकाळच्या तीन तासांत मला पैसे मिळवून देणारे लोक आहेत कष्टकरी समाजाचे. मी हॉटेल चकाचक केले तर त्यांना ते परके वाटेल. (फाइव-स्टार हॉटेलमध्ये मला येणारा न्यूनगंड, आपण इथे उपरे आहोत अशी येणारी भावना आठवली नि त्याचे म्हणणे लगेच पटून गेले!) शिवाय हे सर्व केले तर माझा मासिक खर्च वाढेल, तो वसूल करताना मला वडापावची किंमत वाढवावी लागेल. दिवसाला अडीचशे रुपये मिळवणार्या माझ्या गिर्हाईकाला ते परवडेनासे होईल. हॉटेल जसे आहे तसे राहणे हेच बरोबर आहे. तुमच्यासारखी मंडळी काय किंवा आसपासच्या बंगल्यातली मंडळी काय, इथे हॉटेलात न बसता पार्सल घेऊन जातील; कारण आमचा वडा सर्वांना आवडतोच. मग माझा खर्च वाढवणारा, खप कमी करणारा हा उपद्व्याप का करू मी?’’ त्याचा मुद्दा बिनचूक होता, मुकाट्याने मान डोलावण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते.
तात्याच्या या दृष्टीकोनाच्या नेमके उलट उदाहरणही मला माहीत आहे. चार-पाच वर्षांपूर्वी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर असलेले पुस्तकाचे प्रसिद्ध दुकान ‘पॉप्युलर बुक हाऊस’ कायमचे बंद झाल्याची बातमी आली. दोन दशकांपूर्वी पुस्तक आणि सीडी-खरेदीसाठी मी त्या दुकानावर अवलंबून होतो. पुणे विद्यापीठातून परत येताना डेक्कन जिमखान्यावरून बस बदलावी लागत असे. त्यामुळे अप्पा बळवंत चौकात ‘रसिक’ला जाण्यापेक्षा तिथेच पॉप्युलरमध्ये जाणे सोयीचे होते. पण त्याशिवाय विक्रेत्याचे अगत्य हेही एक कारण होते. पुस्तकांच्या जाहिरातीसाठी ई-मेल बुलेटिन वापरणारे पॉप्युलरचे गाडगीळ हे पहिलेच असावेत. ‘या आठवड्यात आलेली पुस्तके’ अशा सब्जेक्ट लाईनची ई-मेल दर आठवड्याला येई. इतकेच काय पण अमुक एक सीडी वा पुस्तक हवे असेल, नि ते उपलब्ध नसेल, तर ते मागवून घेऊन फोन करून कळवलेही जाई. अधिक संख्येने पुस्तके असूनसुद्धा अव्यवस्था, धूळ यांमुळे पाऊल टाकण्यास नकोसे वाटणार्या जवळच्या ‘इंटरनॅशनल बुक हाऊस’च्या तुलनेत स्वच्छता नि नेटकेपणा हा ही एक महत्त्वाचा सेलिंग पॉइंट होता.
काळ पुढे गेला तसे गाडगीळांनी ‘बिझनेस मॉडेल’ हळूहळू बदलत नेले. दुकानाची मागची बाजू प्रथम इंग्रजी पुस्तकांनी भरली. मग काही रॅक्सवर केवळ महाविद्यालयीन उपयोगाची तांत्रिक पुस्तके आली. यथावकाश संगणकासंबंधी पुस्तके अवतीर्ण झाली. त्यांनी तर काही काळ इतका धुमाकूळ घातला की, इंग्रजी साहित्याच्या पुस्तकांनाही एक रॅक रिकामी करून देऊन माघार घ्यावी लागली. या सार्या प्रकारात मराठी पुस्तकांसाठी एका कोपर्यातील दोन रॅक्स तेवढ्या उरल्या होत्या.
मग सीडीज आल्या. दुकानाच्या डोक्यावर खेळण्यांचे दुकान सुरू झाले. एकुणात पुस्तकांच्या दुकानाचा पुस्तके आणि इतर अनेक गोष्टींचा मॉल झाला. यातून दुकानाचा चेहराच नाहीसा झाला. दुकानात सगळ्या प्रकारची पुस्तके आहेत, पण त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या पुस्तक-संख्येवर मर्यादा आल्या. मग नेमके हवे असलेले पुस्तक नाही, हा प्रकार वारंवार घडायला लागला. आजच्या गुगलच्या नि व्हॉट्स-अॅपच्या जमान्यात माणसांच्या माहितीचा विस्तार वाढला, पण खोली कमी झाली आहे. ‘पॉप्युलर’बाबत अगदी तसेच घडले.
सर्व प्रकारची पुस्तके मिळतात, म्हणून कोणत्याही पुस्तकाची गरज असलेल्या लोकांची पावले तिकडे वळू लागली. पण हवे ते पुस्तक मिळण्याची शक्यता कमी आहे, हे ध्यानात आल्यावर पर्यायांच्या शोधात निघाली. पॉप्युलर जरी अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा, संगणक विषयांची अद्ययावत पुस्तके विकत असले, तरी त्यांचे दर विद्यार्थ्यांना परवडणारे नसत. त्यातच या विद्यार्थ्यांना किफायतशीर भावात पुस्तके विकण्यासाठी अप्पा बळवंत चौकातील आणि कॅम्पमधील काही चतुर पुस्तक विक्रेत्यांनी अनोखे ‘बिझनेस मॉडेल’ राबवायला सुरुवात केली. नवे पुस्तक विकत घेताना पूर्ण किंमत देऊन विकत घ्यायचे, वापरून झाले की, त्याच दुकानात परत करायचे नि त्याबदली साठ टक्क्यापर्यंत पैसे परत घ्यायचे. ही परत आलेली पुस्तके पुन्हा नव्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के भावात विकायची. आता गरीब विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक विकत घेण्यासाठी जुनी पुस्तके धुंडाळत वणवण करण्याची गरज संपली. नवे पुस्तक का जुने, हा पर्याय एकाच दुकानात उपलब्ध झाला. त्यांनी तो आनंदाने स्वीकारला.
चलनी नाणे झालेल्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना अधिक उठाव असेल, या अपेक्षेने चटकन तो नवा मार्ग स्वीकारलेल्या पॉप्युलरचा हा ग्राहक तिकडे फारसा फिरकेनासा झाला. आता सोवळे सोडले नि ओवळेही निसटले, अशी स्थिती झाली. या दरम्यान दीक्षितांच्या ‘इंटरनॅशनल’ची मालकी ‘बुकगंगा’ या ऑनलाईन विक्री करणार्या कंपनीकडे गेली. त्यांनी त्याचा व्यवस्थित जीर्णोद्धार केला. तिथे पुस्तकसंख्या बरीच असल्याने हवे ते पुस्तक मिळण्याची शक्यता वाढली आणि तिथून जेमतेम अर्धा किमीवर असलेल्या पॉप्युलरला घरघर लागली.
थोडक्यात सांगायचे तर ‘इफ यू वॉण्ट टु प्लीज एवरीवन, यू एण्ड अप डिस्प्लिझिंग एवरीवन’ हे पॉप्युलरच्या ‘बिझनेस मॉडेल’चे सार म्हणता येईल. बदलांचा स्वीकार करायला हवा, पण तो डोळस हवा. अन्यथा बदलांचा अतिरेकी हव्यासही तुमच्या पतनास कारणीभूत होऊ शकतो, हे या उदाहरणाने स्पष्ट झाले.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘आपले गिर्हाईक कोण?’ हे व्यावसायिकाने ओळखणे आणि त्या गटाच्या दिशेने तोंड करून व्यवसाय सुरू करणे हा यशस्वी व्यवसायाचा पाया आहे. आपले उत्पादन कुठले आहे, त्याची गरज कुणाला आहे, तो गट त्या उत्पादनविक्रीतून पुरेसा नफा मिळवून देऊ शकतो का, याचा अदमासही व्यवसायाच्या सुरुवातीलाच उत्पादकाला घ्यावा लागतो. याच धर्तीवर विक्रेत्याला विक्रीसाठी कोणती जागा निवडावी, याचाही विचार करावा लागतो. पुण्यातील अन्य एका प्रसिद्ध पुस्तक-विक्रेत्यांशी बोलताना त्यांनी याबाबत काही बारकावे मला सांगितले होते. मुख्य रस्त्याच्या दोनपैकी एका बाजूला बराच अधिक व्यवसाय होतो, हे त्यांच्याकडून मला समजले. त्याची कारणमीमांसा त्यांनी केली होती. माणसे रोजगाराच्या दिशेने जाताना पुस्तके खरेदी करण्यासाठी रेंगाळत नाहीत, परतीच्या वाटेवर मात्र त्यांना वेळ असतो नि म्हणून त्या वाटेवर विक्री अधिक होते. तेव्हा रोजगारासाठीच्या प्रवासाची दिशा समजून घेणे आवश्यक असते. सकाळच्या घाईत घरी जेवण बनवणे शक्य न झाल्यास, जाताजाता दुपारसाठी जेवण बांधून नेणे सोयीचे पडत असल्याने पोळीभाजी केंद्रे पुस्तकविक्रीच्या नेमक्या उलट बाजूला अधिक चालतील. अशाच खाचाखोचा इतर व्यवसायांबाबतही असाव्यात.
पण केवळ व्यवसायांसाठीच हे आडाखे कामात येतात असे नव्हे. गैरव्यावसायिक क्षेत्रातही अर्थकारणाचे हे पैलू दिसतात. एक ठळक उदाहरण म्हणजे आपले प्रधानमंत्री मोदींचेच घेता येईल. बहुतेक निवडणुकांमधून त्या मतदारांच्या गटाच्या अस्मिता कुरवाळण्यासाठी त्यांच्यावरील कथित अन्यायाचे पाप कुणावर तरी फोडत आहेत. आणि हे साध्य करण्यासाठी दडपून खोटे बोलत आहेत. समाजमाध्यमांवरचे स्वयंघोषित मोदीविरोधक तंत्रज्ञानाच्या, माहितीच्या आधारे त्यांचे ते खोटे बोलणे उघडेही पाडत आले आहेत. आपण जे खोटे बोलतो, समाजाच्या एका जागरूक, माहितगार गटामध्ये आपले त्याचे हसे होते, हे आज दोन मोठ्या विजयांनंतरही मोदींना समजले नसेल का? तेवढे चाणाक्ष ते नक्कीच आहेत. संपूर्ण देशाच्या राजकारणाचा प्रवाह बदलण्याची कुवत असलेले नेते आहेत. पण तरीही ते बदलत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांनी आपले हॉटेल चकाचक न करता, हेतुत:, तात्यासारखीच आपल्या हॉटेलची कळा राखली आहे... कारण त्यांच्या ‘गिर्हाईका’ला तिथे ‘घरच्यासारखे’ वाटते!
ते तुमच्या-आमच्याशी नव्हे तर त्यांच्या सभेला आलेल्या, त्यांचे संभाव्य मतदार असलेल्या, तात्कालिक भावनिक प्रवाहात वाहात जाणार्या, ज्यांना भूतकाळातील आपला कुणी तरी माणूस भारी होता एवढा अभिमान पुरेसा आनंददायी असतो, अशांशी बोलत असतात. त्या कुण्या श्रेष्ठीला पुरेसे श्रेय न मिळण्यामागे कुणीतरी दुष्ट लोक कारणीभूत होते हे ऐकायला आवडते. हा मोठ्या संख्येने आलेला मतदार मोदी बोलले, ते बरोबर की चूक हे शोधायला जाणार नसतो. कदाचित उद्या त्याला कुदळ-फावडे घेऊन रोजंदारीवर जायचे असते, किंवा दुकानासाठी माल भरायला पहाटेच जायचे असते. एखाद्या घरच्या गृहिणीला पहाटे उठून पोरांना शाळेसाठी डबा करून द्यायचा असतो, कदाचित स्वत:देखील कामावर जायचे असते.
या सामान्य जगण्यातील मोठ्या विवंचना सोडून, मोदी बोलले ते बरोबर होते की चूक, याची ते उठाठेव करत नसतात. मोदींनी हे अचूक ओळखले आहे. त्यांचे मतदार बहुसंख्येने असेच आहेत की, ज्यांना समाजातील वाईट बाबींबाबत कुणावर तरी खापर फोडायला आवडते. इतिहासातील गैरसोयीच्या, न आवडलेल्या गोष्टी या ‘अशा नाही तशा असत्या तर किती बरं झालं असतं’ असं त्यांना वाटत असतं. अशा वेळी ‘त्या तशा आहेतच’ असं ठासून सांगणारा, नि एखाद्या मोठ्या पदावर असलेला मोदींसारखा माणूस त्यांना त्यांच्या अपेक्षांना, धारणांना, आकांक्षांना मूर्त रूप देण्यास मदत करतो. ‘आम्ही तुमच्यासारखे शिकल्यालं अडानी न्हाई’ हे वाक्य ऐकवणार्या, प्रत्यक्षात आपल्या अशिक्षितपणाचा न्यूनगंड पुसू पाहणार्यांसारखी त्यांची अवस्था असते.
मोदींसारखे बोलभांड नेते अशा न्यूनगंडांना नेतृत्व देतात, त्या न्यूनगंडातून आक्रमक विध्वंसकता जन्माला घालतात; जेणेकरून ज्यांच्याबाबत न्यूनगंड आहे, त्यांचे नुकसान करून त्या गर्दीला ‘जिंकल्याची’ भावना जोपासता येते. त्यांना प्रतिष्ठा नकोच आहे, त्यांना हवे आहे ते गर्दीचे नेतृत्व! आणि ते कसे राखायचे, हे त्यांना चोख ठाऊक आहे, कारण गर्दीची मानसिकता त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते जे बोलतात, ते बरोबर की चूक हा प्रश्न गैरलागूच आहे. ‘ते बोलणे त्यांनी जमवलेल्या गर्दीला रुचते की नाही?’ एवढाच विचार ते करतात. त्यांना ‘सत्यमार्गी’ हे बिरूद नको आहे, त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे नाहीच. त्यांना निवडणुकीत समोरच्या व्यक्तीचे मत हवे आहे, सत्ता हवी आहे. आणि ती मिळावी म्हणून ‘तू किती भारी, तुझा गट किती भारी आणि त्या अमक्याने किंवा त्यांच्या गटाने तुमच्यावर कसा अन्याय केला’ अशी सहानुभूती दाखवणार्या गोष्टी रचून सांगत असतात. त्याबद्दल बुद्धिजीवींकडून ‘खोटारडे’ म्हणवून घ्यायची त्यांची तयारी असते. कारण या तोट्यापेक्षा होणारा फायदा अधिक महत्त्वाचा असतो आणि एकूण ताळेबंद जमेच्या बाजूला शिल्लक दाखवत असतो.
व्याख्याने, लेख, विचार वगैरेंच्या मार्गाने जाऊन त्यांचे मूल्यमापन करणार्यांनी, त्यांना विरोध करणार्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे. सत्तेचे गणित सद्गुणांवर, चुका सुधारण्यांवर नव्हे, तर मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. आणि मतदार, कार्यकर्ते हे स्वत:च स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यापेक्षा, प्रसंगी नियम मोडूनही (किंबहुना नियम मोडूनच) ‘आपली कामे करणारा’, ‘आपल्या गटाला’ धार्जिणा नेताच अधिक हवासा वाटत असतो. त्यालाच ते जवळ करत असतात. म्हणून सत्तालोलुप होऊन या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे नेते आपल्याला हास्यास्पद वाटत असले, तरी अनेकदा त्यांची ती अपरिहार्यता असते. आपल्या आसपासचे ‘कार्यकर्ते’ टिकवून धरण्यासाठी त्यांना सत्ता हवी असते. ते त्यांचे गिर्हाईक असते. आणि त्याला हवे ते देण्यासाठी सत्तेचा आधार त्यांना आवश्यक असतो. ‘आम्ही आमच्या नेत्याचे समर्थक. मग तो या पक्षातून उभा राहो की त्या,’ असे म्हणणारे विधिनिषेधशून्य कार्यकर्ते अप्रत्यक्षरित्या त्याला ‘सत्तेच्या जवळ असलास तर आमच्या कामाचा, नाहीतर आम्हालाही पर्याय आहेत’ असेच सुचवत असतात, पक्षांतराला उद्युक्त करत असतात.
एका समाजवादी मंत्र्याने आपल्या कार्यकर्त्याच्या मुलाला नोकरी/शाळेत अॅडमिशन मिळवण्यासाठी शिफारस देणे हा भ्रष्टाचार आहे म्हणून नाकारल्यानंतर, ‘आपली कामे करत नाही, तो कसला नेता’ म्हणणारे कार्यकर्ते गमावल्याचे किस्से ऐकले आहेत. थोडक्यात काही दोषच सत्ताकारणात कामी येतात. त्याचे गणित तुम्हा-आम्हा सत्तेच्या बाहेरच्यांना समजणे अवघड असते.
‘आपले गिर्हाईक कोण’ हे अचूक माहीत असणे हेच धंद्यातील यशाचे इंगित असते. हातचे सोडून पळत्या पाठी न धावण्याचे शहाणपण यश देऊन जाते. ‘गिर्हाईकाचा संतोष हीच आमची संपत्ती’ हे ध्वन्यर्थाने नव्हे वाच्यार्थानेही खरेच असते, हे तात्याने शिकवले. ‘पॉप्युलर’च्या, मोदींच्या उदाहरणावरून या धड्याचे चांगले आकलनही झाले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
बर्याच वर्षांनंतर पुन्हा तात्याच्या हॉटेलमध्ये गेलो होतो. आता शेजारचे दुकान घेऊन, मधली भिंत पाडून हॉटेल मोठे केले आहे. चारऐवजी सहा टेबल्स आहेत; बाहेरही दोन टेबल आहेत नि शेजारी एक तारेने लटकवलेले बेसिनही. पैलवानाचा फोटो भिंतीवर हार घातलेल्या स्थितीत पाहिला, त्याचा पूर्वी इथे-तिथे लुडबुडणारा छोटा मुलगा आता बापाच्या आकाराचा होऊन त्याच्याच जागी गल्ल्यावर बसला होता. हॉटेलची कळा मात्र अजून तशीच आहे. कर्वेनगरच काय पण वारजे, माळवाडी, उत्तमनगर, शिवणे या सार्या मजूर-वस्त्यांच्या जागी पांढरपेशी घरे उभी राहून अनेक वर्षे उलटली आहेत.
तात्या भेटता तर हॉटेलची संध्याकाळची गिर्हाईके आता कुठे गेली हे त्याला विचारले असते. परिस्थिती बदलली, वस्ती बदलली की, गिर्हाईक नवे दुकान शोधते. हा धडा तात्याला मिळाला की नाही, ते माहीत नाही, पॉप्युलर बुक हाऊसला नक्कीच मिळाला; राजकारणात काँग्रेसही एव्हाना शिकली असावी अशी आशा आहे!
..................................................................................................................................................................
लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.
ramataram@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment