जो बायडेन, शरद पवार आणि माध्यमांची अगतिकता!
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर  
  • जो बायडेन, शरद पवार आणि प्रशांत किशोर
  • Sat , 26 June 2021
  • पडघम माध्यमनामा जो बायडेन Joe Biden शरद पवार Sharad Pawar प्रशांत किशोर Prashant Kishor तिसरी आघाडी Third Front

एक आंतरराष्ट्रीय, एक राष्ट्रीय आणि दोन राज्यस्तरीय ‘न्यूज अ‍ॅलर्ट’ माझ्याकडे आहेत. शिवाय ‘व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठ’ आहेच. त्यामुळे दिवसाचे चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरू असतो. गेल्या आठवड्यात एका आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त वृत्तवाहिनीकडून एक ‘ब्रेकिंग अ‍ॅलर्ट’ मिळाला की, अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कुटुंबियाच्या लाडक्या ‘चॅम्प’ या जर्मन शेफर्ड श्वानाचे निधन झालेय. त्यामुळे बायडेन कुटुंबियांना दु:ख झालेलं आहे. त्याच वेळी विशेषत: महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात राष्ट्रीय पातळीवरच्या प्रकाश वृत्तवाहिन्यांवरही (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी कशी स्थापन करत आहेत, या बातम्यांचा रतीब घातला जात होता.

या दोन्ही घटना अतिशय वेगळ्या आहेत. राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या परस्परभिन्न असलेल्या दोन टोकावरच्या देशांत घडलेल्या आहेत, यात काहीच शंकाच नाही. तरी, भारतातील असोत की अमेरिकेतील, माध्यमांचा तोल ढळलेला आहे, हेच अंतर्सूत्र या पत्रकारितेच्या आड लपलेलं आहे, असं म्हणावं लागेल.

तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा करण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक आयोजित केल्याच्या वृत्तात तथ्य किती आहे, हे कोणत्याही भारतीय माध्यमानं; विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्यांनी लक्षात घेतलंच नाही; नुसताच तथ्यहिनतेचा काथ्याकूट सुरू केला. प्रत्यक्षात ती बैठक माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे असंतुष्ट नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या ‘राष्ट्रमंच’ची होती. माध्यमांनी मात्र ती बैठक म्हणजे राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी कशी स्थापन होत आहे, याचं दळलेलं दळण होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या बैठकीत आठ विरोधी पक्षांचे नेते आणि काही मान्यवर उपस्थित होते. त्यापैकी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे दोन वगळता उर्वरित सहा प्रादेशिक पक्ष होते. शिवाय देशाचे एक निवृत्त सरन्यायाधीश, एक माजी राजदूत, एक माजी निवडणूक आयुक्त, तीन ज्येष्ठ वकील आणि एक लेखक, कवी उपस्थित होते. (अशा कथित महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एका कवीलाही देशाच्या राजकारणातील ज्येष्ठतम नेते शरद पवार सहभागी करून घेतात, हे सर्व कवींनी लक्षात घ्यावं  घ्यावं!) 

लोकसभेत जवळ-जवळ तीनशेपेक्षा जास्त बहुमत असणाऱ्या भाजपला आव्हान देण्यासाठी ही जी कथित तिसरी आघाडी म्हणून जुळवाजुळव सुरू होती, त्यांचे जेमतेम साठही खासदार नाहीत! अशी ही सुमारे ३०० विरुद्ध ६० अशी लढाई म्हणजे कुणा रिकामडेकड्या गारुड्यानं वाजवून बघितलेली गाजराची पुंगीही - म्हणजे ‘वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली’ अशीही कशी नाही - हेही माध्यमांच्या लक्षात आलं नाही .

अज्ञानाचे दीप उजळवण्याचा माध्यमांचा प्रयोग आणखीही पुढे आहे. ही जी कथित तिसरी आघाडी होती, त्यात तेलगू देसम, बसपा आणि काँग्रेस हे देशातील प्रमुख पक्ष नव्हते. महाराष्ट्रात पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेली आणि लोकसभेत संख्याबळाच्या आधारे तिसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेनाही नव्हती. विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता आपल्या देशात काँग्रेसला वगळून कोणताही राजकीय पर्याय भाजपच्या विरोधात उभा करता येऊ शकत नाही.

या कथित आघाडीचे जितके सदस्य संसदेत आहेत, त्यापेक्षा जास्त सदस्य एकट्या काँग्रेसचे आहेत आणि राहुल गांधी वगळता अन्य कोणताही नेता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पर्याय म्हणून उभा राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती शरद पवार यांची तळी उचलणाऱ्या माध्यमातील पत्रकार/संपादकांना हे वास्तव भानावर येऊन केव्हा तरी लक्षात घ्यावंच लागणार आहे. ते लक्षात घेतलं नाही, तर माध्यमांच्या विश्वासाहर्तेचा मुद्दा अधिक गंभीर होत जाणार आहे.

थोडंसं विषयांतर होईल तरी सांगतो. गेल्या आठवड्यात अचानक बहुसंख्य मराठी आणि इंग्रजी मुद्रित माध्यमांनी दिल्लीतील वादग्रस्त ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाची तळी उचलली. असा ‘यू टर्न’ घेण्यामागची कारणं म्हणा की, मजबुरी वाचकांना समजत नाहीत, अशा भ्रमात तर ही माध्यमं वावरत नाहीत ना? असो.  

(तिसऱ्या आघाडीचा फुसका बार ठरलेल्या) या राष्ट्रमंचच्या बैठकीबद्दल स्वत: शरद पवार अद्यापही काही बोललेले नाहीत. त्यांच्या वतीनं बोलण्यासाठी जे पोपट त्यांनी पाळलेले आहेत, त्यांच्या म्हणण्यातही कोणतीही सुसूत्रता नाही. (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी कथित तिसऱ्या आघाडीची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असल्याचं सांगितलं, तर या पक्षाचे खासदार माजिद मेमन यांनी मात्र बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्रमंच’ या अ-राजकीय व्यासपीठाची ही बैठक होती असं स्पष्ट केलं. त्यावर ही बैठक शरद पवार यांच्याच निवासस्थानी का, असा प्रश्न कुणा पत्रकाराला विचारवासा वाटला नाही, हेही लक्षात घेण्यासारखं आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

(पत्रकारितेतील आमचे एकेकाळचे सहकारी आणि शरद पवार यांचे शिवसेनेतले प्रवक्ते) खासदार संजय राऊत यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेस आणि शिवसेनेला वगळून तिसरी आघाडी निर्माण होऊच शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक तज्ज्ञ (खरं तर ‘मॅनेजर’ म्हणायला हवं!) प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील अशात झालेल्या भेटी गाजत आहेत आणि त्यावरही बऱ्याच उलटसुलट बातम्या माध्यमांतून येत आहेत. प्रशांत किशोर म्हणाले की, “आपल्या देशात आता तिसऱ्या म्हणा की, चौथ्या राजकीय आघाडीचे मॉडेल गैरलागू आहे.”

अशा या ‘बैठकीचं रामायण’ खूप रंगलं तरी शेवटी ‘रामाची सीता कोण?’ म्हणजे, त्या कथित तिसर्‍या आघाडीच्या चाचपणीचं काय झालं, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला.

यासंदर्भात नेहमीप्रमाणे राजकीय मौन बाळगून माध्यमांनी त्यांच्या संदर्भात उडवलेल्या गोंधळाची मजा शरद पवार चाखत होते, असंच म्हणायला हवं. अशा ऐन कळीच्या प्रसंगी नेमकी कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करणं आणि जी काही प्रतिक्रिया चुकून व्यक्त केली त्याच्या नेमकं विरुद्ध वागणं, हे वैशिष्ट्य शरद पवार यांनी याही वेळी कायम राखलं आणि माध्यमांना ‘पतंगबाजी’ करण्यासाठी आकाश मोकळं सोडलं. त्यामुळे आज नाही तर उद्या ही आघाडी अस्तित्वात येईल, अशी भाबडी आशा माध्यमांनी बाळगली की, काय, हे कळण्यास मार्ग नाही.

‘शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील चर्चा गुप्त आहे. त्यामुळे नेमकी कशाबद्दल चर्चा झाली याबद्दल काही सांगता येणार नाही,’ असं म्हणत माध्यमांनी सर्व प्रकारच्या शक्यता/स्वप्नरंजन/अकलेचे तारे पाजळून घेतले. समाजमाध्यमं आणि ‘व्हॉटसअप विद्यापीठा’त तर तथाकथित राजकीय विश्लेषकांच्या विश्लेषणाचा महापूर आलेला होता. त्यातली एक शक्यता तर फारच ‘भीषण सुंदर’ होती आणि ती वाचून जर कुणाला गडाबडा लोळावंसं वाटलं नाही तर तो माणूसच नव्हे! तर ती शक्यता अशी, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणाले, “देशाचा पंतप्रधान होण्यासाठी म्हणजे केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी  किमान २७२ लोकसभा सदस्यांचा पाठिंबा हवा. २७२ सदस्य निवडून आणण्यासाठी किमान ३७२ जागा लढवायला हव्यात. ती चर्चा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या झाली असल्याची पक्की माहिती मला मिळालेली आहे.”

इथं मेख अशी आहे की, देशातल्या ३७२ लोकसभा मतदारसंघात शरद पवार म्हणजे (महा)राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे कथित तिसऱ्या आघाडीला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळतील का? त्यातील २७२ निवडून येण्याइतके सर्वार्थानं ‘लायक’ असतील का? आणि हे २७२ सदस्य पवारांशी एकनिष्ठ राहतील का? त्या ज्येष्ठ पत्रकाराच्या या माहितीचा पुढचा उपभाग असा की, “एका उमेदवाराचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा खर्च किमान ४० कोटी रुपये. या हिशेबानं ३७२ उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी १४ हजार ८८० कोटी रुपये लागतील.” (गेल्या ४५ वर्षांत विधानसभा आणि निवडणुकांचं वृत्तसंकलन केल्याच्या अनुभवाच्या आधारे सांगतो, हा आकडा निम्माही नाही.) तर, शरद पवार सुमारे पंधरा हजार कोटी रुपये पंतप्रधान होण्यासाठी खर्च करण्याइतके सक्षम, तुल्यबळ आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य उमेदवार आहेत का? समकालात भारतीय जनता पक्ष वगळता अन्य कोणताही पक्ष असा सधन आहे का, असे अनेक प्रश्न कुणाही सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतील, पण त्यापैकी एकही प्रश्न माध्यमातल्या कुणाच्याही मनात डोकावलाही नाही. हे लक्षण माध्यमांचा तोल ढळल्याचं आहे की, बौद्धिक  खुजेपणाचं, हे ज्याच्या त्याच्या आकलनावर सोडायला हवं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तिसऱ्या आघाडीच्या संदर्भामध्ये स्वप्नरंजनीय ‘पंतगबाजी’ करणं ही जशी भारतीय माध्यमांची अगतिकता आहे, तशीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या श्वानाची मृत्यूची बातमी देणं, ही अमेरिकन माध्यमांचीही अपरिहार्य  अगतिकता आहे.

थोडक्यात काय तर, भारतातील असो की अमेरिकेतील असोत बहुसंख्य माध्यमं बेताल झालेली आहेत. म्हणून म्हणायचं, ओरडत रहा, असंच फक्त ओरडतच रहा!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......