‘अधुरी चीजों का देवता’ हे गीत चतुर्वेदींच्या जादूई गद्यलेखनाचं ताजं उदाहरण आहे!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नानासाहेब गव्हाणे
  • गीत चतुर्वेदी आणि त्यांच्या ‘अधुरी चीजों का देवता’चं मुखपृष्ठ
  • Fri , 25 June 2021
  • पडघम वाचणारा लिहितो गीत चतुर्वेदी Geet Chaturvedi अधुरी चीजों का देवता Adhuri Cheezon Ka Devta

गीत चतुर्वेदी हे हिंदी साहित्यातील समकालीन लेखकांमध्ये सगळ्यात जास्त वाचले जाणारे लेखक मानले जातात. त्यांची अकरा पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत.

हिंदीतील प्रख्यात संपादक व कथाकार ज्ञानरंजन यांनी आपल्या ‘पहल’ या अनियतकालिकात चतुर्वेदींची ओळख करून देताना लिहिलं होतं – “आपल्या कथनात शब्दांच्या बारीक नक्षीसोबतच गद्यलेखनातही आढळणारा कवितेचा गंधही गीत त्यांच्या लेखनाची विशेषता आहे.”

चतुर्वेदींचं नवं पुस्तक ‘अधुरी चीजों का देवता’ वाचत असताना या गोष्टीची शंभर टक्के खात्री पटते. कवितेसारख्या नाजूक भाषेतसुद्धा तत्त्वज्ञानविषयक गूढ प्रश्नांवर चर्चा करणं आणि ती कुठेही बोजड न होऊ देणं, ही महत्त्वाची लक्षणं त्यांच्या लेखनाला अप्रतिम आणि वैशिष्ट्यपूर्ण सिद्ध करतात. रुख पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित झालेलं ‘अधुरी चीजों का देवता’ हे चतुर्वेदींच्या जादूई गद्यलेखनाचं ताजं उदाहरण आहे. त्यांच्या वाचकांना हे खूप चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे की, त्यांच्या व्यासंगाचं, अभ्यासाचं क्षेत्र हे विस्तीर्ण आणि व्यापक आहे.

या पुस्तकात गीत यांनी लिहिलेले निबंध, स्मृतीलेख आहेत, रोजनिशीतले काही तुकडे आहेत आणि काव्यात्मक गद्यदेखील आहे. विषयांचं वैविध्य, भाषेची प्रांजळता व अंतर्धारेप्रमाणे प्रवाही अंतर्दृष्टी, या पुस्तकाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या पुस्तकात कोणत्या विषयांवरचे निबंध आहेत? जागतिक साहित्य, जागतिक सिनेमा, कला, संगीत, हिंदी कविता विश्व, संस्कृत काव्य, महाकवी कालिदासाचं मेघदूत, महाकवी श्रीहर्षाचं नैषधियचरित्रम, प्रुस्तचा ओव्हरकोट, नॅथेनियल हॉथोर्नच्या कथा, ग्रीक मायथालॉजी, हिब्रू बायबल, उपनिषद व बुद्धाच्या गोष्टी इत्यादी इत्यादी.

खरं पाहता चतुर्वेदींचं लेखन वाचणं म्हणजे एका हिरव्यागार साहित्यिक विश्वकोशाची आनंददायी दीर्घ यात्रा करण्यासारखंच आहे. त्यांची गणना भारतातील आघाडीच्या कवींमध्ये केली जाते. परंतु त्यांच्यातील गद्यलेखकाशी जेव्हा आपण भिडतो, तेव्हा सगळ्यात जास्त प्रभावित करणारी गोष्ट असते, ती म्हणजे ते सतत खूप सुंदर पुस्तकांचं वाचन करत असतात आणि त्या वाचनाचे संदर्भ त्यांच्या गद्यलेखनात ठिकठिकाणी विखुरलेले असतात. त्यांचं सूक्ष्म वाचन, गहन चिंतन, मनन त्यातून प्रकट होतं. त्या वाचलेल्या भागावर ते तितक्याच सुंदर शैलीत आपल्या लेखनात चर्चा घडवून आणतात. हे एक अत्यंत दुर्लभ कौशल्य आहे.

याच कारणांमुळे भारतातील सुप्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ समीक्षक अशोक वाजपेयी यांनी चतुर्वेदींच्या रचनातंत्राबद्दल असं म्हटलंय – “साहित्य हे जीवन जगण्याची शक्ती देतं, असं मानणाऱ्यांपैकी गीत चतुर्वेदी एक आहेत. त्यांचं गद्यलेखन कितीतरी कलाप्रकारांना सामावून घेतं. त्यात साहित्य, संगीत, कविता, कथा इ.विषयी विचार प्रकट करत असताना एक प्रकारचं बौद्धिक वैभव आणि संवेदनशील लालित्य यांची घनदाट गुंतवळ पहायला मिळते. त्यात वाचनाचे, विचार करण्याचे, ऐकण्याचे इ.सर्व प्रकारचे सहज उत्कट आविष्कार संमिश्र स्वरूपात पहायला मिळतात.”

एक लेखक म्हणून चतुर्वेदींची अभिरुची व निवड यांचं क्षेत्र खूप विस्तीर्ण आणि व्यापक आहे. मात्र यातलं वैविध्य हरवून जाता कामा नये, हे भानदेखील त्यांच्याकडे सतत जागृत असलेलं दिसतं. त्याला संयमित ठेवत, त्याच्या स्वाभाविक ऊर्जेला खतपाणी घालण्याचं कौशल्य त्यांना विशेष अवगत आहे.

‘अधुरी चीजों का देवता’ या पुस्तकाची सुरुवात होते, ‘बिल्लियां’ या शीर्षकाच्या स्मृतीलेखानं. या लेखात लेखकानं आपल्या बालपणीच्या दिवसांचं चित्र रेखाटलं आहे. त्यांचा सगळ्यांचा आवडता बोका नुरू कशा प्रकारे खोड्या, मस्ती करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असे आणि त्याच्या मृत्यूमुळे सगळ्यांना अतीव दुःख झालं होतं, हे या स्मृतीलेखाच्या केंद्रस्थानी आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

ह्यासोबतच चतुर्वेदींची एका वाक्यात येणारी विधानार्थकता यात एक वेगळाच रंग भरते. या स्मृतीलेखात गीत एके ठिकाणी म्हणतात- “बिल्ली अगर तुमसे प्यार करेगी, तो तोहफें में खरोंचे ही देगी, उसकी शिकायत गैर वाजिब है.”

हे संस्मरण त्यांनी तितक्याच आत्मीयतेनं आणि प्रेमपूर्वक लिहिलं आहे, जितकं की महादेवी वर्मांचं रेखाचित्र! हे पुस्तक किस्सेवजा आहे. काही कपोलकल्पित, काही आत्मअनुभव, काही बडबड्या गप्पा! ज्याला इंग्रजीत ‘Narrative Prose’ असं म्हणतात. कथा आणि कथनाच्या कक्षेबाहेर इथं काहीच नाही. वर्णनाला महत्तव देणारं गद्य, गोष्टींमध्ये रममाण होणारं गद्य! हे सुखद अशा गोष्टींनी भरलेलं पुस्तक आहे. कुतूहल हा त्याचा गाभा आहे. किश्श्यांच्या पोथीप्रमाणे कोणतंही पान उलगडून ते वाचलं जाऊ शकतं.

मराठीतील प्रसिद्ध कवी भुजंग मेश्राम हे चतुर्वेदींचे किशोरावस्थेतील मित्र. त्यांची सांस्कृतिक व सामाजिक समज वृद्धिंगत करण्यामध्ये भुजंग मेश्राम यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्यावर लिहिलेला लेख याची साक्ष देतो. या लेखात ते भुजंग मेश्राम यांचं भावनात्मक, संवेदनशील, जिवंत चित्र उभं करण्यात पूर्णतः यशस्वी ठरले आहेत.

या पुस्तकातील लेखन काळावर स्वार झालेलं, भावनेची गहरी पकड व रूपकांद्वारे खूप खूप काही सांगून जाणारं आहे. ‘कारवी के फूल’ हा निबंध त्यातील विषय, संवेदना, अभ्यास आणि लालित्य या कारणांमुळे चतुर्वेदींना हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या रांगेत नेऊन ठेवतो. हा एक आधुनिक ललितनिबंध आहे, जो मुंबईच्या जवळील किनारी प्रदेशापासून ते कोकण किनारपट्टीपर्यंतच्या पर्वतरांगांमध्ये उगवणाऱ्या एका दुर्लक्षित फुलाच्या निमित्तानं आपल्या जीवनातील फुलांचं महत्त्व अधोरेखित करतो. फूल केवळ कोमलच नसतं, तर ते शक्ती व संघर्षाचंदेखील प्रतीक असू शकतं.

या ललितनिबंधाच्या शेवटी चुतर्वेदी लिहितात – “रगडल्या जाण्याच्या सगळ्या इतिहासानंतरही डोकं वर काढत एखादं फूल ताकदीची प्रेरणा देतं. देवाची आराधना करा अथवा करू नका, त्याच्या चरणात पडणाऱ्या फुलाची मात्र आराधना केली पाहिजे.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या पुस्तकाचा एक विभाग गीत यांच्या रोजनिशीच्या तुकड्यांनी बनलेला आहे. त्यांची रोजनिशी वाचकांच्या उत्सुकतेचा, आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. यात त्यांनी कवितांसह इतर काव्यात्मक नोंदी केल्या आहेत. त्यातील काही ओळी पुस्तक प्रकाशित होण्याअगोदर समाजमाध्यमांमध्ये खूप लोकप्रिय ठरल्या, व्हायरल झाल्या. याचं एक उदाहरण पहा -

‘जाने देना भी प्रेम है | लौटे हुए को शामिल करना भी प्रेम है |’

‘अधुरी चीजों का देवता’ हे पुस्तक आपल्या अंतरंगांमध्ये विविध रत्नांनी युक्त समुद्रासारखं भरलेलं पुस्तक आहे. त्यात विविध प्रकारची खूप रत्नं पसरलेली आहेत. जीवन प्रसंगांच्या या रत्नांना एका सूत्रात बांधणारी, ही सुंदर माळ गुंफणारी, सांभाळून ठेवणारी ही कलाकृती आहे.

जी नेहमीच आपल्या जवळ बाळगण्याची इच्छा वाचक बाळगतील.

..................................................................................................................................................................

नानासाहेब गव्हाणे

gavhanenanasahebcritics@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Rahul Hande

Sat , 26 June 2021

समकालीन हिंदी कवी आणि लेखक गीत चतुर्वेदी यांच्या प्रतिभा व व्यासंगाचा मोजक्या व नेमक्या शब्दात परिचय आणि प्रत्यय देणारे अतिशय सुंदर व मार्मिक पुस्तक परीक्षण. - राहुल हांडे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......