अजूनकाही
अडॉल्फ हिटलरचं ‘मेईन काम्फ’, एपीजे अब्दुल कलाम यांचं ‘विंग्ज ऑफ फायर’, नेल्सन मंडेला यांचं ‘लाँग वॉक टू फ्रिडम’, राकेश मारिया यांचं ‘लेट मी से इट नाऊ’, बराक ओबामा यांचं ‘अ प्रॉमिस्ड लॅंड’, देव आनंद यांचं ‘रोमान्सिंग विथ लाईफ’ ही आत्मचरित्रं हातात पडल्यावर आपण वाचायला सुरुवात करतो आणि मग ते वाचून संपवल्याशिवाय खाली ठेववत नाही.
काहींची मांडणी काही वेळा स्फोटक वाटते, उत्सुकता पानागणिक चाळवली जाते, हाताळलेले जागतिक किंवा देशांतर्गत प्रश्न आणि त्यांची उत्तरं वाचताना आपण अचंबित होतो. लेखकांनी दिलेल्या मुलाखती वाचल्यानंतर त्यांची प्रगल्भता जाणवायला लागते, त्यांना भेटलेली माणसं किती आणि कशा प्रकारची होती, हे कळून माणसाच्या विविध प्रकारच्या मनोव्यापाराची ओळख होते.
या सर्व गोष्टी वाचल्यानंतर आपण अगदी अंतर्मुख होऊन जातो. एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून जगाकडे बघायला लागतो आणि आपला दृष्टिकोन बदलून जातो, पूर्वग्रह संपतात आणि नवीन प्रश्न मस्तक भणाणून सोडतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्याच वेळी या पुस्तकातून आपल्या देशासाठी काही सूचना, काही संदेश मिळतात का, असा विचार केला तर तशीही उदाहरणं मिळतात. त्यातून अशा पुस्तकाचं मूल्य (छापील किंमत नव्हे) आपल्याला कळतं. कालांतरानं नवी पुस्तकं येत राहतात आणि जुन्या पुस्तकावर धूळ साचते. इतिहासाची पुनरावृत्ती नव्या प्रकारे होते आणि धूळ साचलेलं पुस्तक कपाटातून बाहेर येतं… आणि पुन्हा नव्यानं वाचलं जातं, वेगळ्या दृष्टीकोनातून, वेगळ्या परिप्रेक्ष्यातून.
‘द लास्ट गर्ल’ हे असंच एक पुस्तक इराकच्या नादिया मुरादनं लिहिलेलं आत्मकथन. अंगावर काटा आणणारं, अंतर्मुख करणारं, पाशवी अत्याचाराची परिसीमा सांगणारं...
इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेनला फाशी दिल्यानंतर तिथं अराजकता माजली. त्याचा फायदा घेऊन १९९९ साली स्थापन झालेल्या इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया)ने २००४ साली अल् कायदा या अतिरेकी संघटनेशी हातमिळवणी करून अमेरिकन फौजांना हुसकून लावण्यासाठी इराकी सैन्याविरुद्ध लढाई सुरू केली. इराकमध्ये रोजचे बॉम्बस्फोट, रक्तपात, जीवितहानी अशा अस्थिर परिस्थितीत जनता जगू लागली. २०१४मध्ये इसिसने इराकमधील मोसुल हे शहर ताब्यात घेतलं. सिंजर प्रांतात हल्ला केला आणि हजारो लोकांच्या कत्तली केल्या.
नादिया आई आणि भाऊ-बहिणींसोबत इराकच्या उत्तर भागातल्या कोचू गावात राहणारी. ३ ऑगस्ट २०१४ या दिवशी तिथल्या याजिदी लोकांवर इसिसच्या आतंकवाद्यांनी हल्ला चढवला. अनेक गावकरी जवळच असलेल्या सिंजर पर्वताच्या दिशेनं पळाले. पण नादिया, तिचं कुटुंब आणि काही गावकरी इसिसच्या तावडीत सापडले. ३ ते १५ ऑगस्टपर्यंत या सगळ्यांना ओलिस ठेवण्यात आलं. याजिदी धर्माचे लोक मुस्लीम नाहीत. त्यांची काही तत्त्वं पारसी आणि ख्रिश्चन धर्माशी जुळतात. म्हणून आतंकवाद्यांनी गावकऱ्यांना इस्लामचा स्वीकार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. त्या वेळी गावकऱ्यांना कळलं की, इस्लाम नाकारणाऱ्या जवळजवळ तीन हजार लोकांना मारण्यात आलंय आणि साधारण पाच हजार स्त्रिया व मुलांना बंधक बनवून ठेवलंय.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
१५ ऑगस्टला इसिसचे हजारो आतंकवादी गावात घुसले. शाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सर्वांना गोळा करण्यात आलं. तिथं स्त्रिया आणि पुरुष असे दोन गट पाडून त्यांच्याकडील सर्व वस्तू काढून घेण्यात आल्या. थोड्या वेळानं त्यांच्या नेत्यानं घोषणा करून सांगितलं की, ज्यांना इस्लाम स्वीकारायचा आहे, ते या खोलीतून बाहेर जाऊ शकतात. नादिया लिहिते,
‘‘कोणीही बाहेर गेलं नाही. यानंतर पहिल्या मजल्यावरच्या सर्व पुरुषांना एकत्रितपणे बाहेर घेऊन जाण्यात आलं. बाहेर काय घडतंय कळत नव्हतं, पण थोड्या वेळानं गोळ्या घातल्याचा आवाज येत राहिला. त्या पुरुषांत माझे भाऊ होते. त्या नंतर आम्हाला बाहेरच्या मोठ्या बसमध्ये बसवून दुसऱ्या गांवात नेलं. तिथं उतरल्यानंतर तरुण मुली, लहान मुलं आणि प्रौढ बायका असे तीन गट करण्यात आले. त्यात माझ्या (नादियाच्या) आईसकट प्रौढ बायकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. लहान मुलांचं काय झालं कळलं नाही.
मग माझ्यावर आणि बाकीच्या मुलींवर रात्रभर अत्याचार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ते आम्हाला मोसुलच्या इस्लामिक कोर्टात घेऊन गेले आणि तिथं सगळ्या मुलींचे फोटो घेण्यात आले. या कोर्टात हजारो महिलांचे फोटो लावलेले होते. फोटोखाली त्या महिलांना पकडून आणलेल्या माणसांचा फोन नंबर होता. आयसिसचे आतंकवादी तिथं येऊन मुलींची निवड करायचे. मग मुलींचा योग्य तो भाव लावला जायचा आणि गिऱ्हाईकाला विकण्यात यायचं. घेऊन जाणारा आतंकवादी मुलींना ‘भाडेतत्त्वा’वर द्यायचा किंवा जवळच्या माणसाला ‘भेट’ म्हणून द्यायचा. मलासुद्धा अशाच प्रकारे विकण्यात आलं.”
नादिया एके दिवशी खिडकीतून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडली गेली. शिक्षा म्हणून तिला चाबकानं फोडण्यात आलं आणि तिच्यावर सहा सुरक्षाकर्मींनी बलात्कार केला. त्यानंतर जवळ जवळ तीन महिने तिच्यावर सिगारेटचे चटके देण्यापर्यंत अनेक प्रकारे अत्याचार होत राहिला. काही मुलींनी अत्याचाराला कंटाळून जीव दिला. एकदा घरी कोणी नसताना नादिया हिमतीनं तिथून निसटली आणि एका मुस्लिम परिवाराच्या दारात पोहोचली. या परिवाराला तिची दया येऊन त्यांनी तिला कुर्दिस्तानच्या सरहद्दीपर्यंत नेऊन सोडलं.
दरम्यान या अत्याचाराच्या बातम्या जगात पसरू लागल्या. जर्मनीनं एक हजार लोकांना आसरा देण्याची घोषणा केली, त्यात नादियाही होती. जर्मनीतील एका संघटनेनं तिला संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन आपली कहाणी सांगण्याचा सल्ला दिला. मग तिने आपली भयानक कहाणी युनोसमोर कथन केली.
आता ती नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली इसिसला आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर उभं करण्याचं काम करत आहे. इंटरनॅशनल लॉ आणि ह्यूमन राइट्स यात विशेष प्रावीण्य असणाऱ्या अमाल क्लूनी (प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी यांची पत्नी) या तिच्या वकील आहेत. नरसंहार आणि मानवी तस्करीपासून वाचलेल्यांच्या पुनर्बांधणीसाठी मदत, अशी कामं या दोघी करत आहेत.
नादियाची कहाणी ऐकून अमाल क्लूनी यांनी तयार केलेला अहवाल आणि विश्लेषण याची दखल घेऊन इसिसने केलेल्या नरसंहाराचे पुरावे गोळा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने एक तपास संघ गठित केला आहे. इसिसच्या सदस्यांवर व्यक्तिशः खटले भरण्यात येणार आहेत.
२०१८ साली शांतता नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. २५ वर्षांच्या नादियाने युद्धादरम्यान लैंगिक अत्याचाराला हत्यार म्हणून वापरण्याविरुद्ध जो लढा दिला, त्याबद्दल हा पुरस्कार तिला देण्यात आला. मलाला युसूफझाईनंतर नादिया सर्वांत कमी वयाची नोबेल पारितोषिक विजेती आहे.
रशियन फौजा १९८९ साली अफगाणिस्तानातून परत गेल्यावर मुजाहिदीन आणि तालिबान अत्याचार करायला मोकळं झालं. त्यांनी पाकिस्तानच्या आयएसआय आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेशी संधान बांधलं. त्याचा परिणाम काश्मीरमधील पंडितांवर अत्याचार करण्यात झाला. लाखो पंडित विस्थापित झाले, शेकडो मारले गेले. ते रक्त अजूनही भळभळत आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आता २०२१मध्ये अमेरिकन फौजा अफगाणिस्तानातून परत जात आहेत. तालिबान्यांना परत रान मोकळं झालं आहे. पाकिस्तानच्या आयएसआयबरोबर ते आपले संबंध परत वृद्धिंगत करतील? जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार होईल? ही इतिहासाची पुनरावृत्ती असेल? हे येणारा काळच ठरवेल.
याच पार्श्वभूमीवर ‘द लास्ट गर्ल’ची पानं नव्यानं उलटली गेली.
पुस्तकातल्या शेवटच्या परिच्छेदात नादिया म्हणते- “मी भाषणात सांगितलं की, प्रत्येक याजिदीची हीच इच्छा आहे की, इसिसला वंशहत्येबद्दल शिक्षा व्हायला हवीच. माझ्यावर बलात्कार करणाऱ्या लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवायचा आहे मला आणि त्यांना कोर्टात उभं केलेलं पाहायचं आहे. बाकी काहीही असलं तरी माझी इच्छा आहे की, कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये... मीच अशी कहाणी असलेली जगातली शेवटची मुलगी असावं... द लास्ट गर्ल!”
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
bsatish17@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment