अजूनकाही
‘Everybody Loves Raymond’ ही गाजलेली अमेरिकन टीव्ही मालिका. तिचे १९९६ ते २००५ या काळात एकंदर नऊ सीझन प्रसारित झाले आहेत. या मालिकेच्या एका भागावर आधारित, खरं त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...
..................................................................................................................................................................
कुठल्या तरी जमावाचा भाग म्हणून स्वत:ला ओळखण्याची सवय माणसांच्या इतकी हाडीमासी रुजली आहे की, स्वतंत्रपणे स्वतःचा वा इतरांचा विचार करणे त्याला शक्यच होत नाही. ‘तू/तुम्ही कोण?’ या प्रश्नाचा गर्भित अर्थ बहुधा ‘तू नक्की कुठल्या गटाचा?’ असा असतो. तुझ्याशी मी कसे वागावे, या निर्णयावर सर्वांत मोठा परिणाम घडवणारा घटक म्हणजे ‘तू कोणत्या गटाचा आहेस हा!’ हा अनुभव तर आपण वारंवार घेत असतोच, पण त्या पूर्वग्रहांना मोडून काढण्याऐवजी त्याच व्यवस्थेत आपल्यासाठी जागा शोधू लागतो.
दुसरीकडे त्याचबरोबर गुणवत्तेचा, प्रगतीचा विचार करताना आपले मापदंड आपण निर्माण करावेत, त्यासाठी त्या त्या क्षेत्रातला आवश्यक तो अभ्यास करावा, याची माणसाला फिकीर नसते. त्या जमावाने जे ठरवले तेच आपले. बरं, प्रगतीच्या वाटाही नव्या शोधायची गरज नाही, जमावाने त्या आधीच ठरवल्या आहेत. आता त्याच वाटांवर सारेच चालणार म्हणजे गर्दी तर होणारच. पण इलाज नाही, आमच्याकडे पर्यायच नसतो, मग खेकड्यांच्या ढिगात जसे एक खेकडा दुसर्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे सरकतो, तसे जगायचे.
थोडक्यात शेजार्यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची अहमहमिका सुरू होते. त्यातच भांडवलशाहीच्या उगमानंतर ‘व्हॅल्यू डिस्कव्हरी’ सिद्धान्तानुसार स्पर्धेतूनच मूल्यनिर्धारण सुरू झाल्यानंतर या तुलनात्मक गुणवत्तेच्या संकल्पनेला आणखी एक अधिष्ठान मिळाले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
गणितात कार्यकारणभावाचा, अन्योन्यतेचा सिद्धान्त सिद्ध करायचा तर ‘आवश्यक’ (Necessary) आणि ‘पुरेसा’ (Sufficient) अशा दोन प्रकारच्या संबंधांचा शोध घेतला जातो. ‘अभ्यास केल्याने परीक्षेत चांगले गुण मिळतात’ असे विधान केले तर त्यातून ‘अभ्यास करणे पुरेसे’ असल्याचे सांगितले जाते. पण ते ‘आवश्यक’ असल्याचे सांगितलेले नाही. यातून परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य मार्ग उपलब्ध असण्याची शक्यता शिल्लक ठेवली आहे. (आणि तसे ते असतात, निर्माण केले जातात हे उघड गुपित आहेच.) पण एका ‘च’चा फरक करून केलेले, ‘अभ्यास केल्यानेच परीक्षेत चांगले गुण मिळतात’ हे विधान मात्र अन्य शक्यता खोडून काढून अभ्यास करण्याला परीक्षेतील यशासाठी पुरेशीच नव्हे, तर आवश्यक कृती मानते आहे
आता स्पर्धेच्या युगात यश मिळवायचे, तर शेजार्याच्या एक पाऊल पुढे रहायला हवे, ही आवश्यक बाब झाली. पण पाहता पाहता ती पुरेशी कधी होऊन जाते, हे आपल्या ध्यानातच येत नाही. ‘पुढे जायचे आहे’ हे व्यापक साध्य सोडून ‘शेजार्याच्या पुढे जायचे आहे’ हे मर्यादित साध्य स्वीकारले जाते. आणि सारी धडपड, सारे नियोजन त्या मर्यादित साध्यापुरते केले जाऊ लागले आहे.
आता एकदा हे झाले की, पुढे मग शेजार्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्नही करायची गरज उरत नाही, शेजार्याला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पुरते. मग सारे प्रयत्न, सारे बळ त्यासाठी खर्चले जाऊ लागते. स्पर्धाव्यवस्थेने दिलेला हा ही एक वारसा, संकुचित साध्य आणि नकारात्मक कृतीचा! काही आळशी, पण चतुर लोक स्वत: शेजार्याच्या पुढे जाण्याचा आटापिटा करण्यापेक्षा शेजार्याला आपल्या मागे ढकलण्याचे उपाय शोधून काढतात. हे उपाय बहुधा कमी कष्टाचे नि खर्चाचे असतात.
जाहिरात करताना एखादा उत्पादक आपल्या उत्पादनाचे गुण सांगण्याऐवजी इतर उत्पादकांच्या त्याच उत्पादनामधील धोके, न्यून सांगत बसतो. अनेकदा असे काही न्यून नसले तर थेट न सांगता तसे अप्रत्यक्ष सूचित करणारी जाहिरात करून कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहतो. ‘आमच्या टूथपेस्टमध्ये मिठासारखे वा कोळशासारखे खरखरीत पदार्थ नाहीत’, ‘आमची उत्पादने केमिकल-फ्री आहेत’, ‘आमच्या उपचारांचे काही साईड-इफेक्ट्स नाहीत’. दुर्दैवाने सामान्य जनतेची तर्कक्षमता कमी असल्याने स्पर्धक वाईट वा कमी गुणवत्तेचा ठरला की, हे सांगणारा आपोआपच अधिक गुणवत्तेचा असे ती गृहित धरत असते... त्याला वेगळी सिद्धता ती मागत नाही!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
व्यावसायिक स्पर्धेपासून राजकीय स्पर्धेपर्यंत सर्वत्र हाच अनुभव येत असतो. आणि त्यामुळे एकुणात उद्योगधंदे असोत, राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य, शेजार्यापेक्षा पुढे आहोत हे पुरेसे साध्य आहे. आणि ‘जिंकण्याची स्पर्धा’ केव्हाच मागे पडून ‘हरवण्याची स्पर्धा’ सुरू झाली आहे. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही एकच असाही समज रूढ होत चालला आहे.
आणखी एक पाऊल पुढे... चुकलो, मागे पडून आपण मागे पडलो, तरी आपल्याहून इतर अनेक मागे आहेत, याकडे बोट दाखवून आपल्या मागे पडण्याचे समर्थन करणे, हा प्रकार अलीकडे वारंवार अनुभवण्यास मिळतो आहे. ‘आमच्या अंधश्रद्धांबद्दल का बोलता, त्यांना सांगा की!’, ‘मी तर रोज एक क्वार्टरच दारू पितो. शेजारचा गण्या तर वर आणखी नाईंटी पण मारतो’, ‘इथल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल का बोलता, पाकिस्तानपेक्षा तर बरी आहे ना’, ‘आमच्या मुलाला कमी गुण मिळाले म्हणून काय झालं, आमच्या चुलतभावाचा भाचा तर नापास झाला आहे’ या धर्तीचे तर्क देत आपले न्यून झाकण्याचा प्रयत्न आपल्या नित्य अनुभवाचा भाग असतो.
जगभरात कुठेही आपल्याहून कमअस्सल दाखवता येते, तोवर आपल्याला धडपड करून स्वत:मध्ये सुधारणा करण्याची काही गरज नाही, असा बहुसंख्य लोकांचा आळशी तर्क असतो. त्याला अस्मिता नावाच्या मुळव्याधीची जोड मिळाली की, अधिक निर्ढावलेपण येते.
म्हणूनच रेमंडला मायकेल आणि जेफ्री या आपल्या पोरांच्या प्रगतीची चिंता नाही. मायकेलमध्ये असलेले न्यून कसे भरून काढावे, याचा विचार तो करत नाही, त्यासाठी आपल्याला, आपल्या कुटुंबाला काय करता येईल, हा प्रश्न त्याला पडत नाही. मायकेलशी तुलना करून ‘त्यापेक्षा तरी मायकेल बरा’ म्हणण्याची सोय करण्यासाठी एक स्पर्धक त्याने निवडला आहे. आता मायकेल पुढे जातो की नाही, हा त्याच्यासमोरचा प्रश्न नाही; ‘तो बोर्ड चाटणारा मुलगा मायकेलबरोबर मागे राहणार की नाही?’ हा प्रश्न उरलेला आहे.
सुरुवातीला म्हटले तसे ‘सोबतीमध्ये सुरक्षितता’ शोधण्याचा प्रयत्न तो करतो आहे. तो ‘बोर्ड चाटणारा मुलगा’ जर मायकेलच्या सोबतीने मागे राहणार असेल, तर आपल्या मुलाच्या प्रगतीचा वेग अपेक्षित नसल्याचे शल्य त्याला पुसून टाकता येणार आहे. ‘त्यात काय, तो मुलगाही मागे राहिलाय की’ असे समर्थन करण्याची सोय त्याला मिळणार आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आपल्यासारखेच वैगुण्य इतरांमध्ये असले की, ते तितके गंभीर नाही, असे समजणे हा मानवी स्वभाव आहे. त्याहून पुढे जाऊन आपल्या वैगुण्यामागे जर मोठा जमाव, शक्य झाल्यास बहुमत, ते न जमल्यास आवाजी बहुमत उभे करून त्या वैगुण्याचे गुणात रूपांतर करता आले तर सोन्याहून पिवळे. अशा झुंडींच्या बळावर क्रौर्याला शौर्याचे नाव देता येते, हा मानवी इतिहासात असंख्य उदाहरणे असलेला अनुभव आहे.
आपली गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आपल्याहून अधिक गुणवान व्यक्ती शोधून त्याच्याकडून काही गुण आत्मसात करण्यापेक्षा, आपल्यापेक्षा गुणवत्तेने कमी असलेला एखादा ‘बोर्डचाट्या’ शोधून त्या तुलनेत आपल्या तुटपुंज्या गुणवत्तेलाच बुद्धिमत्ता म्हणून खपवण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यासाठी आपले माणसांचे वर्तुळ काळजीपूर्वक निवडून त्याच्या केंद्रस्थानी आपण असू, असा ‘वासरांत लंगडी गाय’ म्हणून राहण्याचा प्रयत्न करणार्यांना हा रेमंड आपलासा वाटेल यात शंकाच नाही.
..................................................................................................................................................................
लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.
ramataram@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment