अजूनकाही
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण म्हणजे गोवा. या चिमुकल्या राज्याच्या प्रेमात पडून पुन्हा पुन्हा तिथं जाणाऱ्यांची संख्याही खूप आहे. असं असलं तरी काही ठराविक समुद्रकिनारे, काही शहरं आणि तिथली वैशिष्ट्यपूर्ण खाद्य आणि पेय संस्कृती यापलीकडे अनेकांना गोव्यातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अंगाची ओळख नसते. आपल्याकडचा पर्यटन हंगाम हा साधारणतः दिवाळी, उन्हाळी आणि नाताळाच्या सुट्टीपुरता मर्यादित असतो. त्यामुळे वर्षाच्या इतर कालावधीत कार्निव्हल आणि शिगमो उत्सवांसारख्या केवळ गोव्यातच साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक सणांची बहुतेकांना तोंडओळखही नसते.
पावसाचं आगमन झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस गोव्यातील झरे-ओढे, विहिरी, तलाव आणि तळी पाण्यानं तुडुंब भरतात. सर्व परिसर हिरवाईनं नटतो. या काळात २४ जून रोजी गोव्यात ‘सांन जॉव’ हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. अनेक गावांत तरुण या दिवशी घुमट, गिटार आणि इतर वाद्यांच्या संगीतात धुंद होत ‘सांन जॉव’ अशी आरोळी ठोकत पाण्यात सूर मारून हा सण साजरा करतात.
‘सांन जॉव’ (São João) म्हणजे पोर्तुगीज आणि कोकणी भाषेत ‘सेंट जॉन’.
सेंट जॉन द बॅप्टिस्ट (संत जॉन बाप्तिस्ता) हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. येशू ख्रिस्ताचा हा जवळचा नातेवाईक. येशूपेक्षा वयानं केवळ सहा महिन्यांनी मोठा. मात्र ‘देवाचा पुत्र असलेल्या येशू ख्रिस्तासाठी वाट तयार करण्यासाठी आपण आलो आहोत, अरण्यात ओरडणारी वाणी मी आहे’ असं सेंट जॉन द बॅप्टिस्टने स्वतःबाबत म्हटलं आहे. त्याने येशूचा जॉर्डन नदीत पाण्यानं बाप्तिस्मा केल्यानंतरच ‘सुताराचा मुलगा’ असलेला येशू आपलं खरंखुरं जिवितकार्य सुरू करतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्याशिवाय सेंट जॉन द बॅप्टिस्ट हा ‘बायबल’च्या ‘नव्या करारा’तील अगदी सुरुवातीचा एक हुतात्मा. आपल्या मुलीच्या नृत्यकौशल्यावर खूष झालेला राजा हेरोद तिला ‘बक्षीस म्हणून काय हवं?’ असं भरलेल्या दरबारात विचारतो. राजकन्या आपल्या आईच्या सुचनेनुसार तुरुंगात खितपत पडलेल्या जॉन द बॅप्टिस्टच्या शिराचा नजराणा आपल्याला ताबडतोब तबकात घालून मिळावा, अशी मागणी करते. अनिच्छेनेच राजा ती मागणी पूर्ण करतो.
सेंट जॉन द बॅप्टिस्ट आणि येशू ख्रिस्त आपापल्या आईंच्या उदरांत असताना त्या दोघींची भेट झाली आणि त्या वेळी झालेल्या एका घटनेशी संबंधित या उत्सवाची जन्मकथा आहे. गॅब्रिएल देवदूताने मारियेला भेट देऊन तिच्या पोटी देवपुत्र येशू जन्माला येणार आहे, असं सांगितलं. त्यापूर्वी सहा महिने आधी याच देवदूताने मारियेची नातलग असलेल्या एलिझाबेथला भेटून तिच्या पोटी सेंट जॉन जन्माला येईल, असं सांगितलेलं असतं.
येशूचा जन्म अपौरुषेय म्हणजे पवित्र आत्म्याच्या संयोगानं झाला अशी श्रद्धा आहे. इस्लाम आणि ज्यू धर्मांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातही एकदेवतावाद (मोनोथिझम) असला तरी ख्रिस्ती धर्मात पिता, (येशू) पुत्र आणि पवित्र आत्मा असं एक त्रैक्य मानलं जातं.
‘बायबल’मध्ये मायकल, राफाएल आणि गॅब्रिएल हे तीन देवदूत वेगवेगळ्या प्रसंगांत प्रकट होतात. यापैकी गॅब्रिएल देवदूताचं मुख्य काम म्हणजे देवाचा निरोप मानवापर्यंत सोपवणं. निरोपाची ही एकतर्फी वाहतूक असते, मानवानं ती ऐकून अंमलात आणावयाची असते आणि त्याबद्दल शंकाप्रदर्शन करायचं नसतं.
गॅब्रिएल देवदूताने झेकरायहाला ‘तुझी पत्नी एलिझाबेथ गर्भवती राहील’ असा निरोप दिला, तेव्हा त्याने देवदूतालाच उलट प्रश्न केला, ‘असं कसं घडेल? कारण मी तर वृद्ध आहे आणि माझ्या बायकोचंही वय झालं आहे.’ याबद्दल झेकरायहाला कडक शिक्षा मिळाली. गॅब्रिएलने त्याला म्हटलं- ‘माझे शब्द यथाकाळी खरे ठरतील. परंतु तोपर्यंत तुझी वाचा जाईल आणि तू मुका होशील. कारण तू माझ्या वचनावर विश्वास ठेवला नाहीस.’
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
याउलट मारियेची वागणूक होती. गॅब्रिएल देवदूत मारियेला भेटला आणि म्हणाला- ‘तुझ्या पोटी पवित्र आत्म्याने संयोगाने देवपुत्र जन्मेल आणि त्याचे नाव येशू ठेव.’ असा निरोप देवदूताने सांगितला त्यावर मारियेने ‘जशी प्रभूची इच्छा’ म्हणून नम्रपणे मान तुकवली. म्हणून तर तिला ‘स्त्रीजातीमध्ये तू धन्य’ असा सन्मान मिळाला.
त्यानंतर मारिया तातडीनं आपल्या बहिणीला भेटायला निघते. त्या भेटतात, तो सेंट लुकच्या शुभवर्तमानातील प्रसंग फादर फ्रान्सिस दिब्रिटो-संकलित ‘सुबोध बायबल’ या ग्रंथात पुढील शब्दांत लिहिला आहे - “त्या वेळी मारिया घाईघाईने ज्युडेयाच्या पहाडी प्रदेशातील एका गावात गेली. तिने झेकरायहाच्या घरी जाऊन एलिझाबेथला अभिवादन केले. मारियेचे अभिवादन ऐकताच एलिझाबेथच्या उदरातील बालकाने उसळी मारली आणि एलिझाबेथ पवित्र आत्म्याने भरून पावली. ती मोठ्या स्वरात म्हणाली, ‘स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या कुशीचे बालक! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या पायरीवर चढावे, हा माझा किती मोठा सन्मान आहे! पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने आनंदाने उसळी मारली.’ ”
याच भेटीनिमित्त या दिवशी पाण्यात उडी मारून गोव्यात हा उत्सव साजरा केला जातो. किरिस्तांव गोंयेंकारांनी आपल्या या निसर्गदत्त देणगीचा हा सण साजरा करण्यासाठी कल्पकतेनं वापर केला आहे.
१९७०च्या दशकात बार्देस तालुक्यातील साळगाव इथल्या बामणवाडो येथे मित्र लेस्टर फर्नांडिस यांच्या घरी महाविद्यालयीन सुट्टीमध्ये काही दिवस राहिलो होतो. त्याच्या आजीने मासळी आणायला सांगितले, तिचा मुलगा म्हणजे लेस्टरचा मामा बाहेर पडला. मीही त्याच्याबरोबर निघालो. त्या वेळी घरामागच्या टेकडीजवळच्या शेतांपाशी असलेल्या तलावात आम्ही दोघं एक सुती कापड धरून जवळजवळ एक तास थांबलो. वरून पाऊस कोसळत होता आणि तलाव भरून वाहत होता. त्या दिवशी फिश-करीसाठी आणि तळण्यासाठी पुरेसे मासे पकडल्यानंतरच आम्ही घरी परतलो. स्वतःच्या हातांनी पकडलेले मासे खाण्याचा आनंद काही औरच होता!
विहिरी हा गोव्यातल्या जुन्या घरांचा एक अविभाज्य भाग असतात. पणजीजवळच सान्त इनेझपाशी असलेल्या ताळगावात १९८०च्या दशकात मी राहात होतो. त्या घराच्या शेजारी वापरात असलेली विहीर होती. माझ्या भाटकाराच्या (घरमालकाच्या) त्या विहिरीचे पाणी आम्ही सर्व जण पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरायचो. (भाटकार म्हणजे शेतमालक आणि मुंडकार म्हणजे शेती कसणारा, हे खास गोमंतकातले विरुद्धअर्थी शब्द!) या काळात ताळगावच्या या विहिरी जवळ जवळ काठोकाठ भरलेल्या असत.
गावांत सगळीकडे विहिरी, ओढे, तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असताना आणि वरून पाऊस कोसळत असताना साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाची मजा काही वेगळीच असते. उत्तर गोव्यात आणि विशेषतः बार्देस तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.
उत्तर गोव्यातल्या साळगाव, शिवोली वगैरे गावांत या उत्सवादरम्यान तरुण मुलांना ‘सांन जॉव’ असे ओरडत पाण्यात सूर मारताना मी पाहिले आहे. विविध पानेफुले यापासून तयार केलेले कॉपेल (मुकुट) डोक्याला लावून पाण्यात डूब मारली जाते. पारंपरिक संगीताची साथ असतेच. आजपावेतो तरी ‘सांन जॉव’ हा लोकांचा फेस्त राहिला आहे.
विशेष म्हणजे हा सण जगभरातील ख्रिस्तीविश्वात सगळीकडे चर्चमधील उपासनेत साजरा केला जात असला तरी केवळ गोव्यातच हा सण अशा प्रकारे साजरा होतो. आजच्या दिवशी गोव्यात सर्वच चर्चमध्ये प्रार्थना होत असल्या तरी या उत्सवात कॅथोलिक चर्चचा कुठल्याही प्रकारचा सक्रिय सहभाग नसतो.
कार्निव्हल हासुद्धा ख्रिस्ती धर्मातील संकल्पनेशी आणि श्रद्धेशी संबंधित असलेला आणखी एक लोकप्रिय उत्सव आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत सुरू होणाऱ्या ‘ऍश वेन्सडे’ किंवा भस्म बुधवारापासून ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांचा ‘लेन्ट सिझन’ हा उपवासाचा काळ सुरू होतो. या भस्म बुधवाराच्या आधीच्या शनिवारी हा चार दिवसांचा कार्निव्हल फेस्टिव्हल गोव्यात, युरोपातील आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत सुरू होतो.
कार्निव्हलच्या मिरवणुकीत औटघटकेचा राजा असलेला किंग मोमो आपल्या जनतेला ‘खाओ, पिओ, ऐष करो’ असा आदेश देतो आणि या चार दिवसांत अनेक गंमतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. नीतिमत्तेची पार वाट लावणारे तत्त्व असलेल्या कार्निव्हल उत्सवापासून कॅथोलिक चर्चने फार पूर्वीच फारकत घेतली आहे. मात्र कार्निव्हलशी पर्यटनवृद्धीचे अर्थकारण गुंतलेलं असल्यानं गोव्यात आणि जगभर इतर ठिकाणी सरकारतर्फे हा उत्सव अगदी डामडौलात भरवण्यात येतो. कार्निव्हल भारतात आणि संपूर्ण आशिया खंडात फक्त गोव्यातच साजरा होतो. गेल्या काही वर्षांत त्याची संक्षिप्त आवृत्ती गोवन लोक स्थायिक झालेल्या मुंबई-पुण्यात होत असते.
अशाच प्रकारे ‘सांन जॉव’ हा उत्सवही अलीकडे गोव्याबाहेर काही ठिकाणी साजरा होऊ लागला आहे. विहिरी-तलावांत डूब मारून नाही तर ‘रेन डान्स’च्या शैलीवर पाण्याच्या कारंजात गाऊन-नाचून तो साजरा केला जातो. या उत्सवाचे कार्निव्हलसारखे सुदैवाने मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेले नाही. गोव्यातील लोकसंस्कृतीचा तो एक भाग राहिला आहे आणि तो तसाच राहावा ही अपेक्षा. गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी या उत्साहावर करोना महामारीचं सावट आहे. त्यामुळे अनेक बंधनंही आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
गोव्याप्रमाणेच त्या काळी पोर्तुगिजांची वसाहत असलेल्या आणि गुजरातजवळील दमण येथे जन्म झालेले चित्रकार आणि व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा हे मूळचे दक्षिण गोव्यातील लुथाली या गावचे. मारिओ मिरांडा यांनी गोव्याची संस्कृती दर्शवणारी अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. ‘सांन जॉव’ या सणाची वैशिष्ट्यं दाखवणारं त्यांचं एक सुंदर चित्र प्रसिद्ध आहे.
आपल्याकडे वर्षभराचं पंचाग असतं, तसं कॅथोलिक चर्चचं पूर्ण वर्षाचे (विविध संतांच्या सणांचं, आगमन, ख्रिस्तजन्मसोहळा आणि उपवासकाळ अशा विविध हंगामांचं) कॅलेंडर असते. या कॅलेंडरमध्ये गॅब्रिएल देवदूताने मारियेला निरोप सांगितला, तो दिवस १४ मार्चला साजरा होतो, म्हणजे नाताळाआधी बरोबर नऊ महिने. गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा काळ ध्यानात ठेवून चर्चने या काही सणांची तारीख मुक्रर केली आहे. २४ जूननंतर बरोबर सहा महिन्यांनी म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ख्रिस्तजन्माचा म्हणजे नाताळाचा आनंदमयी उत्सव सुरू होतो.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment