अजूनकाही
१. कोणालाही दुसऱ्या व्यक्तीची देशभक्ती मोजण्याचा अधिकार नाही. मलाही तो अधिकार नाही. कोणी स्वत:ला या देशाचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता समजत असेल, तरी ती व्यक्ती कोणाची देशभक्ती मोजू शकत नाही. : सरसंघचालक मोहन भागवत
कोण तो गाणं म्हणतोय, ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना…’ 'देशाचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता' समजू लागलेला एक स्वयंसेवक सगळ्यांच्या परिचयाचा आहे. गंमत म्हणजे, तोही हेच म्हणतो! म्हणजे मग देशभक्ती मोजणार तरी कोण आणि देशाचा रोजचा कारभार इटालियन फासिस्टांकडून आयात मापकाने केलेल्या देशभक्तीमापनाविना चालणार तरी कसा?
………………………………….
२. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले की, भाजपचे सरकार सत्तेत आले तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. ही घोषणा तुम्ही महाराष्ट्रात का करत नाही? तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, तर तुम्हाला माझा कायमचा पाठिंबा राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
अरे अरे अरे, आम्ही इकडे मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो, मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरू लागले, मुख्यमंत्री तुमच्या बेनामी कंपन्यांच्या याद्या देऊन राहिले आणि तुम्ही लढाईआधीच पांढरं निशाण फडकवून मोकळं झालात? मुख्यमंत्र्यांना काय, नुसती घोषणाच करायची आहे ना? गरज पडली तर करतील घोषणा. शेतकऱ्याला काही दिलं पाहिजे, असा नियम थोडाच आहे?
………………………………….
३. अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या पितापुत्रांत झालेला वाद ठरवून करण्यात आला होता. अखिलेश यादव यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी केलेला तो केवळ एक राजकीय स्टंट होता. सायकल चिन्ह हे अखिलेशकडेच जावे असे मुलायम यांना वाटत होते. : अमरसिंह
अमरसिंह काका, वयोपरत्वे तुमचा साबण स्लो झालाय का? हे भांडण सुरू झाल्यापासून नेताजी आणि बेटाजी यांच्यातली ही नूरा कुस्ती आहे, हे यूपीतल्याच नव्हे, तर देशभरातल्या चौथीच्या पोरांनाही माहिती होतं. आप लोग अगर अॅक्टर अच्छे है, तो हम भी ऑडियन्स बुरे नहीं है.
………………………………….
४. हिंदू सक्तीने धर्मांतर करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांची लोकसंख्या घटते आहे आणि भारतात अल्पसंख्यांक समुदाय वाढतो आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू
असेही तुम्ही भारताचे मंत्री असण्यापेक्षा 'हिंदुस्थान'चे मंत्री असल्यासारखेच वागता, तर एकदा या धर्मासाठी फतवे काढणाऱ्या सर्व साधू, महंत, संघचालक, आखाडाचालक वगैरेंना बोलवा आणि स्पष्ट काय ते आदेश द्या. एक सांगतो, ब्रह्मचर्य हेच जीवन, दुसरा सांगतो, १० मुलं जन्माला घाला. माणसं कन्फ्यूज होतात ना हो?
………………………………….
५. जगभरात व्हॅलेंटाईन डेनिमित्त बाजारपेठा लाल रंगात रंगल्या असतानाच पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाने प्रेमात भंग आणला आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे.
तरीच एरवी याला पाकिस्तानात पाठवा, त्याला पाकिस्तानात पाठवा म्हणणारे प्रमोद मुतालिक छाप प्रेमद्वेष्टे पाकिस्तानकडे निघालेले आहेत. आता यांना कायमचं तिकडे स्थायिक करून टाका. यांचे धर्मविचार तिकडच्या विचारांशी जुळतात तंतोतंत. धर्म जुळत नाही, तेवढा बदलून घ्या म्हणावं.
………………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment