‘चिपको आंदोलना’चे प्रणेते, वृक्षप्रेमी सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजळा देणारा हा लेख...
..................................................................................................................................................................
१.
पत्रकारिता करताना अनेक प्रसंग आणि व्यक्ती येऊन कधी आदळतील यांचा काहीच नेम नसतो. कधी हे अनपेक्षितपणे घडतं, तर कधी ते अपेक्षित असतं, तर कधी पूर्वनियोजनाप्रमाणे घडतं. त्यामुळे कधी आपण भोवंडून जातो, कधी चकित होतो, तर कधी त्यामुळे एक सुखद अशी भावना मनात निर्माण होते. नुकतेच दिवंगत झालेले, ‘चिपको आंदोलना’चे प्रणेते, वृक्षप्रेमी सुंदरलाल बहुगुणा यांचा आमच्या घरी अचानक मुक्काम आमच्यासाठी एक अविस्मरणीय सुखद घटना ठरली.
वर्ष १९८५. एप्रिल महिना. तारीख नेमकी सांगायची तर ८. नागपूरचा प्रख्यात उन्हाळा सुरू झाल्याचे ते दिवस. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. वेळ रात्री साधारण नऊची होती. दुसऱ्या दिवशी पहाटे स्कूटरने प्रवास करत मला गडचिरोलीला होणाऱ्या बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखालील ‘जंगल बचाव, मानव बचाव’ या आंदोलनाचं वृत्तसंकलन करायला जायचं होतं. ‘नागपूर टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचे तत्कालीन वृत्तसंपादक बाबासाहेब नंदनपवार हेही माझ्यासोबत येणार होते. मी काम लवकर संपण्याच्या गडबडीत होतो. कारण सकाळी लवकर निघायचं होतं आणि प्रवासही एका दमात सुमारे दीडशे किलोमीटर करायचा होता. काम संपवण्याच्या घाईत असताना अत्यंत मधाळ स्वरात ‘नमस्तेजी, मुझे आपसे जरुरी बात करनी हैं।’ असं म्हणणं ऐकू आलं. मी मान वर केली आणि ताडकन उठून उभा राहिलो. कारण समोर उभे होते ते सुंदरलाल बहुगुणा!
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हे तेव्हा देशात चर्चेतलं नाव होतं. विविध प्रकल्पांसाठी सरकारनं सुरू केलेल्या वृक्षतोड मोहिमेला त्यांनी विरोध सुरू केला होता. आताच्या उत्तराखंड भागात तेव्हा टेहरी धरण निर्मिती सुरू होती आणि त्यासाठी मोठी वृक्षतोड करावी लागणार होती. वृक्षतोडीला विरोध म्हणून लोक झाडाला चिकटून बसत. पर्यायानं ते झाड तोडणं अशक्य होत असे. माणसानं झाडाला चिकटून बसण्याचं हे आंदोलन अनोखं होतं आणि ते ‘चिपको आंदोलन’ नावानं ओळखलं जाऊ लागलं. या आंदोलनामुळे अनेक वृक्षांचा जीव वाचलेला होता. साहजिकच सुंदरलाल बहुगुणा लोकप्रियतेच्या कळसावर होते, निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींच्या गळ्यातले ताईत बनलेले होते.
गोरापान वर्ण, भरघोस वाढलेली दाढी आणि डोईवरचे केस. त्यात लपलेले डोळे, त्यावर धातूच्या काड्यांचा चष्मा, धुवट पांढरा सदरा आणि धोतर… पाठीवर जाड, सुती कापडाची बॅग. नमस्कार करत त्यांना खुर्ची दिली, ओरडून चपराश्याला पाणी आणायला सांगितलं आणि त्यांना विचारलं, ‘आपल्याला कोण पाहिजे? आणि काय काम आहे?’
सुंदरलालजी म्हणाले, ‘आप प्रवीणजी हो ना? मुझे आपसेही मिलना हैं, मुझें कुछ मदत चाहिये.’
मी चक्रावून गेलो. एवढ्या मोठ्या माणसाचं आपल्याकडे काय काम असेल, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. मी त्यांना म्हणालो, ‘शक्य आहे, ती सर्व मदत मी तुम्हाला करेल.’
सुंदरलाल बहुगुणांनी बाबा आमटेंचा संदर्भ दिला आणि नागपुरात काही अडचण आली तर तुम्हाला भेटा असं त्यांनी सांगितल्याचं म्हणाले. दरम्यान समोर आलेल्या ग्लासातील पाणी गटागटा पिऊन ते पुढे म्हणाले, ‘उद्या, बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत आंदोलन आहे. त्यासाठी मला जायचं आहे. दिल्लीहून येणाऱ्या विमानाला उशीर झाल्यानं गडचिरोलीला जाणारी शेवटची बस निघून गेली, म्हणून मला आजची रात्र तुमच्याकडे मुक्काम करता येईल का?’ असं त्यांनी विचारलं.
सुंदरलाल बहुगुणा आपल्या घरी मुक्काम करणार, ही घटना सुखद धक्का देणारी होती, पण आमचं घर लहान होतं. कन्या सायली जेमतेम सहा महिन्यांची होती, तिच्यासह आम्ही घरात तिघे होतो. इतक्या छोट्या घरात हा माणूस राहील का? अशी शंका आली आणि ती शंका त्यांना स्पष्ट बोलून दाखवत ‘तुमची एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये सोय करू का?’ असं विचारलं, पण सुंदरलालजी मात्र घरीच मुक्काम करण्यावर ठाम होते.
मग मी बेगम मंगलाला फोन केला आणि काय ते सांगितलं. मंगल म्हणाली, ‘अरे, माई येणार म्हणून जी शेजारची एक खोली आपण तयार करून घेतली, तिथं राहतील ते आणि जेवतील आपल्यासोबत. घेऊन ये त्यांना.’
माई म्हणजे माझी आई. ती लवकरच आमच्याकडे कायमची राहायला येणार म्हणून शेजारची एक खोली भाड्यानं घेऊन तिच्या राहण्याची तयारी आम्ही करून ठेवलेली होती.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
एव्हाना ‘नागपूर पत्रिका’, ‘नागपूर टाइम्स’मधले अनेक जण जमा झाले. त्या गराड्यात सुंदरलाल बहुगुणा यांना सोडून मी पटापट काम उरकलं. एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक परिचयाचे होते. त्यांना फोन करून बहुगुणा यांच्यासाठी सकाळी साडेपाच वाजता गडचिरोलीला जाणाऱ्या बसमध्ये एक सीट राखून ठेवली. तेही इतके उत्तेजित झाले की, ‘मीच सकाळी बस स्टँडवर येतो, काळजी करू नका’ असं म्हणाले.
काम संपवून जिना उतरताना मी सुंदरलाल बहुगुणांना म्हणालो, ‘माझ्याकडे स्कूटर आहे. तुमच्यासाठी रिक्षा करू का?’ ते ‘गरज नाही’ म्हणाले. त्यांना नागपूरच्या रामदासपेठमधून छत्रपतीनगरच्या आमच्या घरी नेताना मी एकाच वेळी उत्तेजित आणि भारावूनही गेलेलो होतो.
आमच्या छोटेखानी फ्लॅटला लागूनच असलेल्या खोलीत बॅग टाकून दहाच मिनिटांत सुंदरलालजी आमच्या किचन-कम-डायनिंग-कम-हॉलमध्ये आले आणि आमच्याशी त्यांनी गप्पा सुरू केल्या.
‘तुम्हाला भाजी कोणती आवडेल?’ असं बेगमनं विचारलं. तेव्हा त्यांनी माझा स्वयंपाक मीच करेन आणि तो गॅसवर नसेल’, असं सांगून टाकलं.
माझ्या बेगमला ती कल्पना काही रुचली नाही. पण, ‘बेटी मेरा खाना मैं खुद बनाता हूँ और खाता हूँ!’ असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
आमचा संसार तेव्हा तसा नवाच होता. पुरेशी साहित्य सामग्री नव्हती, तरी गॅसशिवाय सुंदरलालजी जेवण शिजवणार कसे? हा प्रश्न आम्हाला फारसा भेडसावला नाही. कारण तेव्हा आम्ही आंघोळीचं पाणी कोळशाच्या शेगडीवर तापवत असू. बाथरूम समोरच्या पॅसेजमधील ती शेगडी कोळसे भरून मी आत आणली. तोपर्यंत बेगमला हाताशी घेत त्यांनी त्यांच्या स्वयंपाकाची तयारी केलेली होती. बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या अशी भाजी त्यांनी काढलेली होती आणि एका ताटात ते कणिक मळत होते. शेजारीच लोखंडी तवा ठेवलेला होता. त्यांना ‘नॉनस्टिक तवा दे’, असं मी बेगमला सुचवलं, तर ते मराठी समजून सुंदरलालजी म्हणाले, त्यांना लोखंडी तवाच हवा असतो.
तिकडे बेगम आणि इकडे सुंदरलालजींचा स्वयंपाक आणि आमच्यातल्या गप्पा सुरू राहिल्या. त्यांनी दोन मोठे रोडगे बनवले. ते आधी तव्यावर आणि मग शेगडीतल्या विस्तवावर खरपूस भाजून घेतले. आमच्याकडे तेव्हा मोहरीचं तेल नव्हतं म्हणून त्यांनी एका पितळेच्या भांड्यात भाजी तशीच शिजवली. एव्हाना त्या रोडग्याचा भूक प्रज्वलित करणारा खरपूस भाजलेला वास आमच्या घरात पसरलेला होता.
तेव्हा आमच्याकडे डायनिंग टेबलही नव्हता. आम्ही तिघंही खाली बसून गप्पा मारत जेवलो. सुंदरलालजी बहुगुणा यांनी त्यांचा स्वयंपाकाचा पसारा नीट घासून आवरून ठेवला. एव्हाना साडेअकरा झाले असावेत. छत्रपती नगरमधून गणेश पेठेतल्या एसटी स्टँडवर पोहोचण्यासाठी २० मिनिटं आणि आधी तयारीसाठी अर्धा तास म्हणजे सव्वाचार-साडेचारला उठणं आवश्यक होतं. झोपायला जाण्याआधी ‘मला सकाळी चहा वगैरे काही लागत नाही’, असं सुंदरलालजींनी स्पष्ट केलं.
घड्याळ आणि टेलिफोन अशा दोन्ही ठिकाणी चारचा अर्लाम लावून झोपलो तरी सकाळी सुंदरलालजींना बसस्टँडवर सोडायचं आहे, या जाणीवेनं अधूनमधून जाग येतच होती.
अलार्म वाजल्यावर आम्ही उठलो आणि बाहेरच्या खोलीत आलो, तर सुंदरलालजी आंघोळीला जाण्याच्या तयारीत होते. पाणी तापवण्याचं भांडं गॅसवर ठेवत ‘आंघोळीसाठी दहा मिनिटांत गरम पाणी करून देतो’, असं मी म्हणालो. तर ‘मी बाराही महिने थंड पाण्यानेच आंघोळ करतो,’ असं म्हणत ते बाथरूममध्ये शिरले. त्यांची आंघोळ होईपर्यंत मीही तयार झालो. आंघोळ झाल्यावर त्यांनी गॅलरीत जाऊन पूर्व दिशेला तोंड करून हात जोडले. आम्हीही त्यांच्या पाया पडलो. त्यांनी आशीर्वाद दिला आणि आमचा बस स्टॅंडच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
२.
एसटीचे विभाग नियंत्रकच स्वत: सुंदरलालजींच्या स्वागताला सज्ज होते. त्यांच्या ताब्यात त्यांना सोपवून मी परतलो. कारण मलाही प्रवास सुरू करायचा होता. त्याप्रमाणे घरी येऊन तयार होऊन बाबासाहेब नंदनपवार यांना घेऊन आम्ही गडचिरोलीकडे कूच केलं.
गडचिरोलीला आम्ही आंदोलनस्थळी वेळेच्या आधीच पोहोचलो. बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा आदी नेते तिथे पोहोचलेले होते. नमस्कार-चमत्कार झाला. सुंदरलालजींनी जेव्हा ‘प्रवीणजीने हमे कल आश्रय दिया’, असं बाबा आमटे यांना सांगितलं, तेव्हा मी विलक्षण संकोचून गेलो.
पुढे तीन-चार वेळा सुंदरलालजींच्या भेटी झाल्या. ते माझी ओळख कधीच विसरले नाहीत, अतिशय अगत्यानं ते चौकशी करत असत.
पत्रकारिता करताना अनेक वळणं लागतात आणि तीही अनपेक्षितपणे. एक वळण समोर उभं ठाकलेलं आहे, हे आम्हाला ठाऊक नव्हतं. पोस्टात जाऊन ‘जंगल बचाव, मानव बचाव’ आंदोलनाचा वृत्तांत तारेनं (टेलिग्राम) पाठवल्यावर बातमी मिळाली की, नाही हे कन्फर्म करायला नागपूरला फोन केला, तर समजलं की, रिपब्लिकन पक्षाच्या खोब्रागडे पक्षाचे एक बडे नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती राजाभाऊ खोब्रागडे यांचं निधन झालेलं आहे. ‘दिल्लीहून त्यांचं पार्थिव चंद्रपूरला उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचेल. परवा सकाळी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होतील. ते सर्व कव्हर करूनच मग नागपूरला परत ये’, असं वृत्तसंपादक रमेश राजहंस यांनी सांगितलं. मंगलाला तसा निरोप द्या, अशी विनंती रमेश राजहंस यांना केली आणि ती त्यांनी लगेच मान्य केली.
३.
संध्याकाळी नागपूरला परतीचा प्रवास असल्यानं मी आणि नंदन पवार यांनीही अतिरिक्त कपड्यांचा जोड वगैरे आवश्यक सामान सोबत घेतलेलं नव्हतं. पण त्यासाठी अडून बसण्याची कोणतीही सोय नव्हती.
केंद्र सरकारने एक टपाल तिकीट जारी करून बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूरचे आणि अतिशय लोकप्रिय नेते होते. त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेलं होतं. ते काही काळ उपसभापतीही होते. साहजिकच त्यांच्या अत्यंविधीचं वृत्तसंकलन ही एक मोठी न्यूज इव्हेंट होती. जेवण झाल्यावर त्याच रात्री उशिरा बाबासाहेब नंदनपवार आणि मी स्कूटरने चंद्रपूरकडे रवाना झालो.
इथं आणखी एक वळण आमच्या प्रवासाला लागलं. दिवसभरांच्या श्रमानं थकलेलो असल्यानं आम्हा दोघांनाही झोप येऊ लागली आणि घनदाट जंगलातील रस्त्यावरून प्रवास करण्याची भीती वाटू लागली. अखेर आम्ही मध्यरात्री मूल या गावच्या विश्रामगृहात मुक्काम ठोकला आणि पहाटे लवकर उठून चंद्रपूरला रवाना झालो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
दोन दिवस राहून बॅ. राजाभाऊ खोबतगडे यांच्या अंत्यसंस्कारांची आणि त्या संदर्भातील काही साईड स्टोरीज पाठवल्यावर पाठवल्यावर नागपूरला परतलो. एका दिवसासाठी घराबाहेर पडलेलो मी आणि बाबासाहेब नंदनपवार असे एकूण चार दिवस अंगावरच्या, एकाच कपड्यानिशी भटकत होतो आणि वृत्तसंकलन करत होतो. एका दिवसासाठी जरी बाहेर पडायचे असेल तर आवश्यक कपड्यांचा किमान एक तरी जादा जोड सोबत ठेवायचा हा धडा यानिमित्तानं मिळाला.
‘फील्ड’वर जाऊन वृत्तसंकलन करताना अशी अनेक वळणं लागतात, पण ठराविक तासांची नोकरी न समजता पत्रकारिता पूर्ण झोकून देऊन केली तर येणारी नशा आणि मिळणारं समाधान काही औरच असतं!
(महात्मा गांधी मिशनच्या ‘गवाक्ष’ या त्रैमासिकाच्या अंकासाठी लिहिलेला आठवणीवजा लेख.)
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment