नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या भेटीस २२ जून रोजी ८१ वर्षे होत असून, या भेटीच्या माध्यमातून सुभाषबाबू आणि सावरकर यांच्या संबंधांविषयी सुरस आणि चमत्कारिक अशी मिथ्यकथा रचली गेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुभाषबाबूंना हिंदुत्ववाद्यांचे सहप्रवासी ठरवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांचाच एक भाग म्हणजे ही कथा. तेव्हा तिचा समाचार घेणे आवश्यक ठरते.
येथे सर्वप्रथम हे स्पष्ट करावयास हवे की, ही भेट कपोलकल्पित नाही. दादरला सावरकर सदन येथे २२ जून १९४० रोजी सायंकाळी या दोन थोर नेत्यांची भेट झाली ही वस्तुस्थिती आहे. मग आक्षेपाचा मुद्दा येतो कुठे? तो येतो या भेटीत जी चर्चा झाली, असे सांगण्यात येते तेथे.
‘सावरकर डॉट ओआरजी’ हे सावरकरांचे जीवनकार्य व विचार यांचा प्रचार-प्रसार करणारे इंग्रजी संकेतस्थळ. मान्यवर सावरकरवाद्यांच्या साह्याने ते तयार करण्यात आले आहे. त्यातील ‘क्यू अँड ए’ विभागात याविषयीची नोंद आहे. असे अनेक लेख इंटरनेटवर आहेत. त्या लेखांचे सार असे, की सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जी लष्करीकरणाची चळवळ चालवली होती, ती त्यांच्या क्रांतिकारी कार्यक्रमाचाच एक भाग होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशाबाहेर जाऊन स्वातंत्र्यलढा सुरू करण्याची सूचना केली ती सावरकरांनीच. ‘तुम्ही गुपचूप देश सोडा. जर्मनी आणि जपानमध्ये जाऊन तेथे युद्धबंद्यांमधून भारताच्या स्वातंत्र्यासाठीची सेना उभारण्याचा प्रयत्न करा,’ असे सावरकरांनी सुभाषबाबूंना सूचवले असे सांगितले जाते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
सुभाषबाबू यांची समाजवादी विचारसरणी, त्यांचे हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयीचे विचार, सावरकरांच्या हिंदू महासभेस त्यांचा असलेला विरोध, या पार्श्वभूमीवर हे सारे केवळ अविश्वसनीयच नव्हे, तर हास्यास्पद वाटते. तरीही जर असे सांगितले जात असेल, तर ते कोणत्या आधारावर?
‘सावरकर डॉट ओआरजी’मधील लेख सांगतो की, ‘याची कुठेही नोंद नाही. कारण हे दोन्ही नेते ब्रिटिशविरोधी कारवायांत गुंतलेले होते. त्यामुळे अशा संवेदनशील बाबींची नोंद मागे ठेवणे, हे शहाणपणाचे ठरले नसते. बोस यांच्या कागदपत्रांत वा लेखनातही या बैठकीविषयीची माहिती कुठेही येत नाही.’ असे म्हटल्यावर सारीच चर्चा खुंटते. कारण चर्चा संवेदनशील, त्याविषयी कोणी काही लिहून ठेवलेलेच नाही. तेव्हा मग जी काही सांगोवांगी असेल त्यावर विश्वास ठेवायचा. पण तरीही हे सारे लेख तीन संदर्भ देतात. पहिला - ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्राचा. दुसरा - जपानी लेखक जे. जॉर्ज ओहसावा यांच्या ‘द टू ग्रेट इंडियन्स इन जपान’ या पुस्तकाचा आणि तिसरा संदर्भ आहे खुद्द सावरकर यांच्या एका भाषणाचा.
कीर यांच्या सावरकर चरित्रात म्हटले आहे – ‘‘हे उघड गुपित आहे की शिवाजी आणि त्यांच्या राजकारणाचे भक्त असलेल्या सुभाष यांनी २२ जून १९४० रोजी, म्हणजे भारतातून जानेवारी १९४१ रोजी नाट्यमयरीत्या नाहीसे होण्याच्या सहा महिने आधी, सावरकर सदन येथे सावरकरांशी दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात भारतीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती याविषयी चर्चा केली. याच चर्चेदरम्यान ‘भारताचे मॅझिनी’ सावरकर यांनी ‘भारताचे गॅरिबाल्डी’ सुभाष बोस यांना स्वातंत्र्यलढा तीव्र करण्याकरीता देशाबाहेर जाऊन सशस्त्र क्रांती करण्याच्या कल्पनेने प्रेरित केले.’’
आता त्या भेटीत काय घडले याची कुठेही नोंद नसेल, तर मग कीर यांना तरी ही माहिती कोठून मिळाली? त्यांनी पुस्तकात कोठेही याचा स्त्रोत वा आधार नोंदवलेला नाही. कीर यांचे हे पुस्तक आहे १९५० मधील. तेव्हा सुभाषबाबूंची प्रतिमा, लोकप्रियता आकाशास भिडलेली होती. अशा काळात कीर यांना कुणीतरी ही माहिती पुरवलेली दिसते. त्यांनीही सावरकरांना इटालियन क्रांतिकारक ‘मॅझिनी’ची आणि सुभाषबाबूंना मॅझिनीचे अनुयायी ‘गॅरिबाल्डी’ यांची उपमा देवून त्यांच्यात अलगद गुरू-शिष्याचे नाते तयार केले.
दुसरे पुस्तक जपानी लेखकाचे. सावरकर आणि सुभाषबाबू यांची ती ‘वैयक्तिक आणि खासगी’ भेट होती. या भेटीत ‘भारत सोडण्याचा प्रयत्न करण्याची’ तसेच ‘जर्मनीत जाऊन भारतीय युद्धकैद्यांची फौज उभारण्याची’ आणि मग नंतर ‘जर्मनीच्या साह्याने जपानला जाऊन रासबिहारी बोस यांच्याशी हातमिळवणी करण्याची ‘ठोस सूचना’ सावरकरांनी केली होती’, असे त्या पुस्तकात म्हटलेले आहे. पण हे काही त्या जपानी लेखकाने म्हटलेले नाही. हा मजकूर आहे पुस्तकाच्या परिशिष्टात छापण्यात आलेल्या एका पत्रातील. ते पत्र आहे पुस्तकाचे प्रकाशक के. सी. दास यांच्या नावे आलेले. त्यावर तारीख आहे २ जून १९५४ आणि ते पाठवले आहे सावरकरांच्या सूचनेनुसार त्यांच्या ‘बाळ’ नामक सचिवाने!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या पत्रात आणखी एक मोठाच रंजक उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे - सुभाषबाबूंनी रासबिहारी बोस यांच्याशी हातमिळवणी करावी वगैरे मुद्दे ठसवण्यासाठी सावरकरांनी त्यांना रासबिहारींचे एक पत्र दाखवले. ते ‘जपानच्या युद्धघोषणेच्या अगदी पूर्वसंध्येला’ रासबिहारींनी लिहिले होते. यातील मौज पाहा. सुभाषबाबू-सावरकर भेट झाली १९४०मध्ये. जपानने युद्धघोषणा केली ८ डिसेंबर १९४१ रोजी. त्या वेळी सुभाषबाबू होते बर्लिनमध्ये.
आणि तरीही सावरकर त्यांना रासबिहारींनी लिहिलेले पत्र दाखवतात! तेव्हा एकंदर विश्वासार्हतेच्या दृष्टीने या पत्राचे मोल शून्य आहे.
अखेरचा आणि ‘सावरकर डॉट ओआरजी’मधील त्या लेखात म्हटल्यानुसार तो ‘एकुलता एक उपलब्ध स्त्रोत’ म्हणजे १९५२ मध्ये ‘अभिनव भारत संघटने’च्या विसर्जन कार्यक्रमात सावरकरांनी केलेले भाषण. त्यात ते नेमके काय म्हणाले, हे त्या नोंदीत सांगितलेले नाही. त्या भाषणाचा उल्लेख कीर यांच्या सावरकर चरित्रात आढळतो. पण त्यातही सुभाषबाबू भेटीविषयीचा उल्लेख नाही. (हे मूळ भाषण वा विश्वासार्ह स्त्रोत उपलब्ध झाल्यास यावर नीट प्रकाश पडेल.)
एकूण हे तिन्ही आधार डळमळीत ठरतात. ‘याची कुठेही नोंद नाही… बोस यांच्या कागदपत्रांत वा लेखनातही या बैठकीविषयीची माहिती कुठेही येत नाही,’ म्हटल्यावर तर संदर्भ-स्त्रोत मागण्याचीही सोय उरत नाही. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. या भेटीची एक नोंद आहे आणि ती करून ठेवलेली आहे खुद्द सुभाषबाबूंनीच.
नेताजींनी जर्मनीमध्ये सप्टेंबर १९४१ ते फेब्रुवारी १९४३ या कालावधीत एक पुस्तक लिहिले होते- ‘इंडियन स्ट्रगल १९३५ - १९४२’ या नावाचे. त्यात ते त्या भेटीविषयी म्हणतात, ‘सावरकर यांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत काही माहितीच नाही असे वाटत होते. ब्रिटिश फौजेत भरती होऊन हिंदूंना लष्करी प्रशिक्षण कसे मिळू शकेल एवढाच विचार ते करत होते.’ यात कुठेही सावरकरांनी आपल्याला जर्मनी आणि जपानला जाऊन सशस्त्रलढा उभारा वगैरे सूचना केल्याचे सुभाषबाबूंनी म्हटलेले नाही. सावरकरांनी तसा सल्ला दिला असता, तर सुभाषबाबूंनी नक्कीच त्याची नोंद केली असती. ते लपून ठेवण्याचे त्यांना काही कारणच नव्हते. जर्मनीत काही त्यांना ब्रिटिशांची भीती नव्हती. आणि सावरकरांचे म्हणावे, तर या काळात ते ब्रिटिशांच्या युद्धकार्यास हिरिरीने मदतच करत होते. स्वातंत्र्यानंतरही त्यांना हे स्पष्टपणे नमूद करून ठेवण्याची भरपूर संधी होती. परंतु तेही त्यांनी केलेले दिसत नाही.
या भेटकथेतून असेही भासवले जाते की, सुभाषबाबूंनी मुंबईत येऊन एकट्या सावरकरांची भेट घेऊन, त्यांच्याशी राजकीय चर्चा केली. आणि म्हणून त्या दोघांचे कीर सांगतात तसे - प्रेमादराचे नाते होते किंवा सावरकर हे नेताजींचे मार्गदर्शक होते. वस्तुस्थिती अशी आहे, की मुंबईच्या त्या दौऱ्यात सुभाषबाबूंनी सावरकरांप्रमाणेच जीना यांचीही भेट घेतली होती. एवढेच नव्हे, तर त्या भेटीत त्यांनी जीनांपुढे ‘आपण सारे आणि काँग्रेस मिळून स्वातंत्र्यासाठी संयुक्त लढा देऊ. तो यशस्वी झाला तर तुम्हाला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान करू’, असा प्रस्ताव ठेवला होता.
हे सुभाषबाबूंनीच ‘इंडियन स्ट्रगल’मध्ये लिहून ठेवलेले आहे. त्यांनी सावरकर आणि जीना यांची भेट घेतली होती, ती केवळ त्या दोघांनी काँग्रेसबरोबर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावे, असा प्रयत्न करण्यासाठी. पण त्यात त्यांचा अपेक्षाभंगच झाला. सुभाषबाबू लिहितात, ‘या मुलाखतींतून एकच निष्कर्ष काढणे भाग पडले की, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग यांच्याकडून कशाचीच अपेक्षा करता येणार नाही.’
पुढे १९४२ सालीही सुभाषबाबूंनी असा एक प्रयत्न केल्याचे दिसते. ३१ ऑगस्ट १९४२ रोजी आझाद हिंद रेडिओवरून केलेल्या भाषणात ते म्हणतात - ‘श्री. जीना आणि श्री. सावरकर आणि ते सर्व नेते की, जे ब्रिटिशांशी तडजोड करण्याचा विचार करत आहेत, त्यांना मी विनंती करतो की, उद्या जगात हे ब्रिटिश साम्राज्य असणार नाही, हे एकदाचे लक्षात घ्या. आज ज्या व्यक्ती, गट किंवा पक्ष स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होतील त्यांना उद्या भारतात सन्मानाचे स्थान मिळणार आहे.’
याचा अर्थ असा की, ब्रिटिशांशी तडजोडीचे धोरण सोडले, तरच तुम्हाला भारतात सन्मानाचे स्थान मिळेल, असेच सुभाषबाबू सावरकर आदी नेत्यांना सांगत आहेत. तरीही नेताजी हे सावरकरांचे अनुयायी होते आणि त्यांनीच सुभाषबाबूंना देशाबाहेर जाऊन आझाद हिंद सेना उभारणीस प्रेरित केले, हे सांगितले जाते. त्या कहाणीत एकच अडचण आहे. ती म्हणजे सावरकरांचे लष्कर भरतीबाबतचे धोरण.
नेताजी जेव्हा जर्मनीत ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी भारतीय युद्धबंद्यांची फौज तयार करत होते, तेव्हा इकडे सावरकर हिंदू तरुणांना सांगत होते की, ब्रिटिशांच्या फौजेत भरती व्हा. याचा अर्थ सावरकर पर्यायाने सुभाषबाबूंच्या विरोधातच ब्रिटिशांना साह्यभूत ठरत होते. खासकरून बंगाल आणि आसामातील हिंदूंनी ब्रिटिश फौजेत सामील व्हावे, यासाठी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन ते १९४१च्या डिसेंबरमध्ये हिंदू महासभेच्या ज्या भागलपूर अधिवेशनातून करत होते, त्याच अधिवेशनात ते सांगत होते की, जपानच्या युद्धप्रवेशामुळे आपल्यासमोर थेट आणि तातडीने ब्रिटनचा शत्रू उभा ठाकलेला आहे. या युद्धापासून आपल्याला आपले घरदार वाचवलेच पाहिजे आणि म्हणून भारताच्या संरक्षणासाठी सरकार करत असलेल्या युद्धप्रयत्नांची तीव्रता वाढवली पाहिजे.
सावरकरांच्या या विधानांची संगती कशी लावायची? हे आपल्या ‘फेक-कथे’ला तर मारक ठरते. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी या कथाकारांनी एक मोठा चलाख युक्तिवाद मांडला की, सावरकर हिंदू तरुणांना ब्रिटिश फौजेत भरती व्हा, असे सांगत ते यासाठीच की, ते सैनिक पुढे जाऊन सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेस मिळावेत.
या तर्कास काय म्हणावे? जणू काही ब्रिटिश फौजा पराभूत होणार, मग ते हिंदू सैनिक जर्मनी वा जपानचे युद्धकैदी बनणार. मग त्यांना आझाद हिंद फौजेत सहभागी करून घेतले जाणार… हे सारे सावरकरांना आधीच माहीत होते.
मात्र या युक्तिवादाच्या समर्थनार्थ दिला जातो सुभाषबाबूंनी आझाद हिंद रेडिओवरून २५ जून १९४४ रोजी केलेल्या भाषणाचा संदर्भ. त्यात सुभाषबाबूंनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली असून, लष्कर भरतीच्या धोरणाबद्दल सावरकरांचे कौतुक केले आहे. ‘याच तरुणांमधून आझाद हिंद फौजेस प्रशिक्षित माणसे आणि सैनिक मिळत आहेत,’ असे सुभाषबाबूंनी त्या भाषणात म्हटल्याचे सांगण्यात येते. हे भाषण कोठून आले? ते आले धनंजय कीर यांच्या सावरकर चरित्रातून. तेथे त्यांनी त्याचा स्त्रोत दिला आहे, रासबिहारी बोस यांच्या ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’च्या प्रकाशनाचा. रासबिहारी हे जपानमधील हिंदू महासभेचे नेते होते, ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी. सुभाषबाबूंच्या भाषणांच्या, लेखांच्या संग्रहांमध्ये मात्र कोठेही हे भाषण आढळत नाही.
या सगळ्याचा अर्थ सुस्पष्ट आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदू महासभेने स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेससोबत यावे, सर्वांनी एकत्र मिळून लढावे, या हेतूने सुभाषबाबूंनी सावरकरांची जी भेट घेतली, त्या घटनेत अर्धसत्ये, असत्ये, अपमाहिती यांची भेसळ करून नेताजी हे जणू सावरकरांचे प्रशंसक, अनुयायी असा धुरळा उडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या खोटेपणाने ना सावरकरांचे माहात्म्य वाढते, ना सुभाषबाबूंना न्याय दिला जातो. होते ती फक्त बदनामीच. मात्र समाजवादी आणि सेक्युलर सुभाषबाबूंना हिंदुत्ववाद्यांचे सहप्रवासी म्हणून लोकांसमोर सादर करू इच्छिणारे लोक त्याची कशास फिकीर करतील? त्यांना मतलब आहे तो गांधी-नेहरू विरोधात एक शस्त्र म्हणून सुभाषबाबूंची लोकमानसातील प्रतिमा वापरण्यात. त्यासाठीच तर हा सारा मिथ्यकथांचा खटाटोप.
संदर्भ -
Hindu Rashtra Darshan - V. D. Savarkar, Maharashtra Prantik Hindusabha, Poona
Netaji and India’s Freedom - Proceedings of the International Netaji Seminar 1973 : Ed. Sisir K. Bose, Netaji Bhavan Calcutta, 1975
Netaji Collected Works - Vol 2 : Ed. Sisir K. Bose, Netaji Research Bureau
savarkar.org ( http://savarkar.org/en/encyc/2017/5/29/Q-A3.html )
Selected Speeches of Subhas Chandra Bose : Publication Division, Ministry of Information and Broadcasting, 1962
Testament of Subhas Bose 1942-1945 : Arun, Rajkamal Publications, 1946
The Indian Struggle 1935-1942 : Subhas Chandra Bose, Chuckervertty, Chatterjee & Company Ltd, Calcutta, 1952
The Two Great Indians in Japan : Sri Rash Bihari Bose and Netaji Subhas Chandra Bose, Vol 1 - J. G. Ohsawa, Kusa Publications, Calcutta, 1954
Veer Savarkar - Dhananjay Keer, Popular Prakashan, 2nd Ed, Dec. 1966
Vinayak Damodar Savarkar: The Untold and Unknown Stories - S. Kaushik, The Commune, 28 May 2020
(https://thecommunemag.com/vinayak-damodar-savarkar-the-untold-and-unknown-stories/ )
..................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment