काळ मोठा क्रूर असतो. या क्रूरतेचा प्रत्यय सध्या साधू-संन्यासी परंपरेशी नातं सांगणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांना येतो आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला जेमतेम आठ-नऊ महिने शिल्लक आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर थोडाफार ओसरतोय, आणि अशा पडझडीच्या अवस्थेत उद्भवलेल्या राजकीय अस्थितरतेच्या केंद्रस्थानी योगी आदित्यनाथ उभे आहेत.
विरोधाभास असा की, गेली चार वर्षं योगींनी मुख्यमंत्री मोदींच्या ‘गुजरात गव्हर्नंस मॉडेल’ची कॉपी करत बेफाम जाहिरातींच्या माध्यमातून स्वतःची टिमकी वाजवली. देशातल्या बड्या बड्या वर्तमानपत्रांनी योगींच्या जाहिरातींना सढळपणे जागा देऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. एवढा जोरदार प्रोपागंडा करूनही ज्या योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वाची मोदींशी तुलना केली जात होती, आज त्याच योगींच्या नेतृत्वक्षमतेबद्दल शंका, संशय आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
ठाकूर समाज वगळता योगींचा इतर समाजघटकांना सोबत न घेता चाललेला एककल्ली, मनमानी कारभार याच्या मुळाशी आहे. राज्यातली नोकरशाही, युवावर्ग, शिक्षक, डॉक्टर हे सारे विरोधी सूर लावताहेत, हे याच्या मुळाशी आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातल्या दुरवस्थेची जगाने जी लक्तरे काढली, ती याच्या मुळाशी आहेत.
म्हणूनच योगींच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका जिंकणं अवघड असल्याची शीर्षस्थ नेत्यांची खात्री पटलेली आहे. याच कारणास्तव मोदींचे विश्वासू नोकरशहा ए.के. शर्मा यांची विधानपरिषदेवर नेमणूक करून राज्यात या पूर्वीच पाठवणी झालेली आहे. आता कदाचित नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या जितीन प्रसाद यांचीदेखील मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. इतर दुर्लक्षित घटक पक्षांना चुचकारले जाण्याची शक्यता आहे. केवळ हिंदुत्वाच्या नावावर किंवा योगीच्या चेहऱ्यावर विधानसभा जिंकता येणार नाही, हे मोदी-शहांनी पुरते ओळखलेले आहे. ‘ऑपरेशन कमल’ची आखणी करण्यात माहीर असलेल्या दिल्लीश्वरांना उत्तर प्रदेशात उसळून आलेली आदित्यनाथविरोधी लाट पाहता, तातडीने ‘ऑपरेशन योगी’ हाती घ्यावे लागले आहे...
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘हिंदु पुनर्जागरण के महानायक’ ही योगी आदित्यनाथांची त्यांच्या नावे असलेल्या वेबसाइटवरून जगाला करून दिलेली ओळख आहे. ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद के प्रतीक एवं हिंदुत्व और विकास के स्वप्नद्रष्टा...’ असं त्यांचं केलं गेलेलं वर्णन आहे आणि ‘हिंदू राष्ट्र की संचेतना है। इसपर प्रहार महाप्रलय को आमन्त्रण है।’ असं त्यांच्या वेबसाइटवरून तमाम भक्त-समर्थकांना करण्यात आलेलं आवाहन आहे. या आवाहनात दरारा आहे, धाक आहे आणि धर्मकेंद्री राष्ट्रनिर्माणाची जाहीर हाकही आहे. महाविद्यालयीन वयातच नाथपंथाची दीक्षा, वयाच्या २६व्या वर्षी लोकसभेचे खासदार, चाळिशीच्या प्रारंभाला गोरखपीठाचे प्रमुख आणि वयाच्या पंचेचाळिशीत उत्तर प्रदेशसारख्या देशातल्या सगळ्यांत मोठ्या, सगळ्यांत संवेदनशील राज्याचे मुख्यमंत्रिपद असा झंझावाती आयुष्यपट असलेला हा आक्रमक संन्यासी दुभंगलेल्या समाजाचं आणि धर्मसत्तेला शरण गेलेल्या राज्यसत्तेचं प्रतीक ठरला आहे...
जरब निर्माण करणारा वावर
गोरखपूरमधल्या गोरखनाथ मंदिर परिसरात असलेल्या मोठ्या घरवजा कार्यालयात योगी आदित्यनाथांचा दरबार भरला होता. चेहऱ्यावर याचकाचे भाव असलेले असंख्य तक्रारदार रांगेत तिष्ठत उभे होते. त्यातल्या एका शिक्षकाच्या नावाचा पुकारा झाला. त्याने भीतभीतच स्वत:ची ओळख सांगितली. तोंडातल्या तोंडात पुटपुटत बदलीचा विषय काढून सोबत आणलेलं शिफारसपत्र आदित्यनाथांसमोर धरलं. तोवर बऱ्यापैकी मूडमध्ये असलेल्या आदित्यनाथांनी कागदावर नजर फिरवली आणि क्षणार्धात त्यांच्या चेहऱ्यावर संतप्त भाव उमटले. कपाळावर आठ्या पडल्या. आवाज चढला आणि त्याच अवतारात त्यांनी शिफारस लिहून आणलेला तो कागद सर्वांसमक्ष शिक्षकाच्या तोंडावर भिरकावला. त्या प्रकाराने शिक्षक गर्भगळीत झालाच, पण इतरही लोक भेदरून गेले...
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गोरखपूरमधल्या पत्रकारांच्या एका संघटनेने योगी आदित्यनाथांच्या सत्काराचा जंगी घाट घातला होता. योगींच्या नित्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या समर्थक पत्रकारांनी कार्यक्रमाला तोबा गर्दी केली होती. ठरल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत शासकीय लवाजम्यासह योगी आदित्यनाथ कार्यक्रमस्थळी आले. मात्र, पुढचा कार्यक्रम सुरू होण्यास मध्ये ३५ ते ४० मिनिटं गेली. कारण, या कालावधीत उपस्थित समस्त पत्रकारांचा कमरेत वाकून योगींच्या पाया पडण्याचा एकच कार्यक्रम सुरू होता. योगी कधी हास्यविनोद करत, कधी दम भरत पत्रकारांचे नमस्कार स्वीकारत होते...
मुख्यमंत्री होण्याआधी योगी आदित्यनाथ ‘हिंदवी’ नावाच्या स्थानिक वर्तमानपत्राचे प्रबंध संपादक होते. हे वर्तमानपत्र तीन वर्षं चालले आणि एक दिवस अचानक बंद पडले. ते जेव्हा जोशात सुरू होते, तेव्हा एकदा एका पत्रकाराने क्रिकेटच्या संदर्भातली बातमी दिली. ही बातमी दुसऱ्या दिवशी ठळकपणे प्रकाशितही झाली. पण त्याच दिवशी योगी आदित्यनाथांनी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी पाश्चात्त्य आणि देशी खेळांवर एक लांबलचक भाषण दिले. संबंधित पत्रकाराला संस्कृती-परंपरेचे चढ्या आवाजात धडे दिले आणि यापुढे आपल्या वर्तमानपत्रात असला चावटपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराही दिला. सोबत कुस्ती, कबड्डी आदी देशी खेळांचे उपस्थित पत्रकारांना महत्त्वही न चुकता पटवून दिले. एक चकार शब्द न उच्चारता उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या म्हणण्याला माना तेवढ्या डोलावल्या...
प्रतिमेचा कैदी
योगी आदित्यनाथांची अशी चार भिंतींआडची, सार्वजनिक सभा-संमेलनातली, राजकीय स्तरावरची कितीतरी रूपं गोरखपूरवासीयांनी गेल्या तीन दशकांत अनुभवली आहेत. परंतु, योगींचं नेमकं रूप कोणतं, याचा फैसला यातल्या अनेकांना आजवर करता आला नाही. कारण, हवामानापेक्षा बेभरवशी योगींचा मूड असतो, हे एव्हाना गोरखपूर आणि आता लखनऊवासीयांनी ओळखलं आहे. उंचीने जेमतेम पाचेक फूट, मध्यम बांध्याच्या, चेहऱ्यावर कधी सात्त्विक, तर कधी कमालीचे कठोर भाव असलेल्या, इतरांपेक्षा अधिक वेगाने चालण्याची सवय असलेल्या योगी आदित्यनाथांनी आजवर अनेकांना चकवा दिला आहे.
मात्र, सामान्य माणूस असो वा सरकारी अधिकारी, योगींचं त्यांच्याशी वागणं-बोलणं प्रतिमेला धरून राहिलेलं आहे. त्यांना भगव्या वस्त्राशिवाय इतर काही परिधान केल्याचे बघितलेला माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पत्रकार हा त्यांच्यासाठी काहीसा अवघड विषय आहे. एरवी, त्यांचे भक्त म्हणवणाऱ्या पत्रकारांची संख्या ते मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतर वेगाने वाढलेली असली तरीही काही धाडसाने प्रश्न करू पाहणाऱ्या पत्रकारांशी त्यांचे संबंध प्रारंभापासूनच विळ्या-भोपळ्याचे राहिले आहेत. आपल्या मतांशी सहमत नसलेल्या पत्रकारांशी बोलताना, त्यांची विशिष्ट शैली राहिली आहे. म्हणजे, इतर वेळी मोकळे ढाकळे वाटणारे योगी अशा पत्रकारांसोबत खूप सावधपणे बोलतात.
अनेकदा प्रश्नकर्त्याने एक प्रश्न विचारलेला असतो, योगी नजरेला नजर न भिडवता त्याचं भलतंच उत्तर देताना दिसतात. त्यांना त्यांचा अजेंडा सोडून बोलायचं नसतं. त्यांच्या आवडी-निवडी टोकाच्या असतात. त्यांची राजकीय-सामाजिक मतं जहाल असतात. यामुळे ते एका वर्गात कमालीचे लोकप्रिय गणले जातात, तर एका वर्गामध्ये त्यांच्याबद्दल असलेली तिरस्काराची भावना लपून राहत नाही. पण, याचा त्यांच्यावर जराही परिणाम होताना दिसत नाही. त्यांच्या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या भूतकाळाचा ते सहजासहजी कुणाला थांग लागू देत नाहीत...
पौढी गढवाल जिल्ह्यातल्या यमकेश्वर तालुक्यातल्या पंचूर गावी आनंद सिंह बिश्त आणि सावित्री देवी यांच्या पोटी जन्मलेल्या अजय सिंह बिश्त नावाच्या तरुणाची गोरखनाथ मंदिराचे पीठाधिपती महंत अवैद्यनाथांनी आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली. तो दिवस होता १५ फेब्रुवारी १९९४. परंतु तेव्हासुद्धा जिथे त्यांचा जन्म झाला तिथले काही गावकरी, जिथे ते शिकले तिथले काही मित्र वगळता कुणाला त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. मात्र, आज मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतर याच योगींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘दी गार्डियन’सारखी आंतरराष्ट्रीय पातळीवरची वर्तमानपत्रं वेळ खर्ची घालत आहेत. इतका बलवान नेता नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसवलाच कसा, या प्रश्नाचा ते अथकपणे मागोवा घेताना दिसताहेत. त्यातच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्यांची ‘हिंदू मिलिटंट’ अशी ओळख करून दिल्यानंतर तर योगी समर्थकांमध्ये एकच खळबळ उडताना दिसतेय, पण एकेकाळी आक्रमक आक्रस्ताळी भूमिका घेण्यास सरावलेले योगी आता मात्र हिशेबी संयमीपणा राखून पदावर डाग न पडण्याची खबरदारी घेताना दिसत आहेत...
गोरखपंथाची दीक्षा
अजय सिंह बिश्त हा एका सर्वसाधारण कुटुंबातून आलेला सर्वसाधारण विद्यार्थी होता. मात्र, त्याच्यामध्ये इतरांमध्ये नसलेला पेटता निखारा होता. ज्याला हिंदी भाषेत ‘अकड’ म्हणतात, तशी ती होती. कोटदार डिग्री कॉलेजात बीएस्सीसाठी प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा या निखाऱ्याला धग मिळाली होती. निमित्त ठरलं होतं, महाविद्यालयीन निवडणुकीचं. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे उमेदवारी मिळावी, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु अभाविपने त्यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिल्याने प्रक्षुब्ध बनलेल्या अजय सिंहांनी बंडखोरी करत ती निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते पराभूत झाले. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. ज्या दिवशी ते हरले, त्याच दिवशी ते राहत असलेल्या खोलीत कपडेलत्ते आणि इतर गरजेच्या सामानाची चोरी झाली. या प्रकाराने ते निराशेच्या गर्तेत गेले. मात्र, मनावरचा तणाव कमी झाल्यावर त्यांनी गोरखपीठाचे त्या वेळचे प्रमुख महंत अवैद्यनाथांना आपल्याला गोरखपूरला बोलावून घ्यावं, अशा आशयाचं तातडीचं पत्र लिहिलं. महंतदेखील त्याच पौढी गढवालचे. अजयसिंहांचे कुटुंबीय अवैद्यनाथांचे परिचित होते. आपल्याच परिचिताचा मुलगा विनंती करतोय, पाहून अवैद्यनाथांनी अजय सिंह बिश्तला गोरखपूरला बोलावून घेतलं आणि त्या क्षणापासून आयुष्य पालट सुरू झाला...
अवैद्यनाथांचं जिथे वर्चस्व होतं, त्याच जागी कोणे एके काळी नाथपंथाचे गुरू गोरखनाथांनी आपला जम बसवला होता. त्यांच्याच नावावरून पुढे शहराला गोरखपूर हे नाव पडलं होतं. जाणकारांच्या मते, गोरखनाथांचा काळ आठव्या ते अकराव्या शतकादरम्यानचा होता. गोरखनाथांनी ब्राह्मणी वर्चस्वाविरोधात विद्रोह केला होता. परंपरेत रुजलेल्या अतिभोगवादाला आणि सहजयानात शिरलेल्या विकृतींना विरोध केला होता. गोरखनाथांनी हिंदू-मुस्लीम एकतेची एक वीटही रचली होती, उच्च-नीच भेदभाव, कर्मकांडाचा धिक्कार केला होता. म्हणूनच या पंथात प्रामुख्याने सनातन धर्माचे बळी ठरलेल्या अस्पृश्य जाती-जमातींतल्या लोकांनी आश्रय घेतला. काही ठिकाणी तर मुस्लिम धर्मातल्या लोकांनी नाथपंथात प्रवेश केला. गोरखनाथांचा प्रभाव कबीर, दादूंसारखे निर्गुणी संत आणि मुल्ला दाऊद, जायसीसारख्या सुफी कवींवरही पडला. ‘सबदी' ही गोरखनाथांची उपदेशपर काव्यरचना. ‘मन में रहिणां, भेद न कहिणां... बोलिबा अमृत वाणी, अगिला अगनी होइबा, हे अवधू तौ आपण होइबा पाणीं' (याचा अर्थ : भेदभाव राखू नका. मधाळ वाणी बोला. जर समोरचा अग्नी होऊन जळत असेल, तर हे योगी, तू पाणी होऊन त्याला शांत कर) यांसारख्या काही सबदी गोरखनाथ मंदिराच्या भिंतींवरही कोरलेल्या आहेत. मात्र विरोधाभास असा की, २० वर्षांच्या अजयसिंह बिश्तला गोरख पंथाची दीक्षा देतानाच महंत दिग्विजयनाथांनी शिकवलेले कट्टर हिंदुत्ववादी राजकारणाचे धडेही दिले गेले.
कडव्या हिंदुत्वाचे संस्कार
मूळचे राजस्थानातल्या उदयपूरचे असलेल्या दिग्विजयनाथांचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ‘हिंदू महासभे’शी संबंध होता. त्यांनी मंदिराचे महंतपद मिळताच हिंदू-मुस्लीम आणि मंदिर-मशिदीचे राजकारण सुरू केले होते. हिंदूच्या सैनिकीकरणाचा त्यांनी जाहीरपणे पुरस्कार केला होता. ‘हिंदू ध्यावे देहुरा, मुसलमान मसित, जोगी ध्यावे परम पद, जहां देहुरा न मसित’ (याचा अर्थ : योगी मंदिर-मशिदीची चिंता करत नाही. तो आत्मज्ञानाची चिंता करतो. हे आत्मज्ञान काय आहे? कुठे आहे? हे आत्मज्ञान तुमच्या आत आहे.) हे नाथवचन त्यांच्यासाठी केवळ भिंतीवरचे सुविचार होते. आक्रमक हिंदुत्व हाच त्यांच्या कार्यशैलीचा गाभा होता. गांधी हत्येचा त्यांच्यावर आरोपही ठेवण्यात आला होता आणि त्याच कारणास्तव त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर याच दिग्विजयनाथांनी राममंदिर आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून, त्यांना बाबरी मशिदीजवळ यज्ञाचे आयोजनही केले होते आणि नाट्यमयरित्या एका रात्रीत तिथे रामाची मूर्ती बसवली होती.
पुढे तीन वेळा महासभेचे उमेदवार म्हणून निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर १९६७ मधली निवडणूक जिंकून ते लोकसभेत गेले. खासदार झाल्यानंतर दोन वर्षांतच त्यांचे निधन झाले. दिग्विजयनाथांनंतर गोरखपीठाचा आणि राजकारणाचा वारसा अवैद्यनाथांकडे आला. ते चार वेळा गोरखपूरचे खासदार म्हणून निवडून आले. रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष बनले. त्यांनी अधिक आक्रमकपणे हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार केला. महंत दिग्विजयनाथ आणि अवैद्यनाथांच्या या कट्टर हिंदुत्ववादी राजकारणाचा योगी आदित्यनाथांवर प्रभाव पडणे स्वाभाविक होते. नव्हे, गोरखपीठाचे उत्तराधिकारीपद येताच त्यांनी आपल्या भविष्यकालीन राजकारणाचे संकेत देण्यास सुरुवात केली होती.
गोरखपूरची प्रयोगशाळा
वस्तुत: गोरखपूर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हिंदुत्ववादी राजकारणाचे केंद्र बनले होते. त्याला मुख्यत: चालना दिली होती, जयदयाल गोयाडका यांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या ‘गीता प्रेस’ने आणि ‘गीता प्रेस’तर्फे प्रकाशित होणाऱ्या हनुमानप्रसाद पोद्दारसंपादित ‘कल्याण’ आणि ‘कल्याण-कल्पतरू’ या अनुक्रमे हिंदी-इंग्रजीतल्या नियतकालिकांनी. सतानत हिंदू धर्माचा प्रसार, गोहत्या बंदी, गोरक्षण ही या नियतकालिकांची मुख्य उद्दिष्टे होती. त्या दृष्टीने वेळोवेळी विशेषांक (उदा. गौ अंक, गौसेवा अंक) प्रकाशित केले जात होते. इतकेच नव्हे, हनुमानप्रसाद पोद्दार, प्रभूदत्त ब्रह्मचारी आणि करपात्री महाराज यांनी मिळून १९४७च्या दरम्यान कत्तलखान्यांवर बंदी आणण्यात पुढाकार घेतला होता. त्याच वेळी ‘रामचरितमानस’, ‘तुलसी रामायण’, ‘भगवद् गीता’ ही प्रकाशने लाखोंच्या संख्येने जनतेपर्यंत पोहोचवली जात होती.
त्या काळचे लेखक-कवी-भाष्यकार भारतेंदू हरिश्चंद्र यांनी उर्दू भाषेला आव्हान देण्याच्या उद्देशाने बनारसमधून सुरू केलेल्या हिंदी भाषा चळवळीला आणि चळवळीतून जन्माला आलेल्या ‘नागरी प्रचारिणी सभे’ला रसद पुरवण्याचे कामही या गीता प्रेसशी संबंधित मंडळींनी केले होते.
७ नोव्हेंबर १९६६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आणि विभिन्न सनातन धर्माशी निगडित संघटनांनी गोरक्षणाच्या मुद्द्यावरून संसदेबाहेर धरणे आंदोलन केले, त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका ‘कल्याण’ नियतकालिकाने पार पाडली होती. या सगळ्याचा प्रभाव उत्तर प्रदेश-बिहारमधल्या जनमानसावर झाला होता. हिंदुत्ववादी नेत्यांबद्दल गोरखपूरच्या जनतेला असलेल्या आकर्षणाचा साधारण हा इतिहास होता.
हाच कट्टर हिंदुत्वाचा वारसा आदित्यनाथांनाकडे आला होता. किंबहुना, भूतकाळातल्या या वारशाचे आपणच उत्तराधिकारी आहोत, हे ते आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवूनही देत होते. त्यांच्या आक्रमक राजकारणाची सुरुवात साधारण पंचवीसेक वर्षापूर्वीच झाल्याचे गोरखपूरवासीयांनी अनुभवले होते. घडलं असं होतं की, शहरातली मुख्य बाजारपेठ असलेल्या गोलघर परिसरातल्या एका दुकानात गोरखनाथ मंदिर संचालित महाविद्यालयाचे काही विद्यार्थी कपडे खरेदीसाठी म्हणून गेले होते. अचानक देण्या-घेण्यावरून त्यांच्यात आणि दुकानदारामध्ये बोलाचाली झाली. प्रकरण मारामारीपर्यंत गेलं. मुलांनी धांगडधिंगा करत दुकानदाराला मारहाण केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या दुकानदारानेही मुलांवर पिस्तूल रोखलं.
ही घटना घडली, त्यानंतर दोन दिवसांनी युवा आदित्यनाथांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी दुकानदाराविरोधात उग्र स्वरूपाचं आंदोलन पुकारलं. आंदोलनादरम्यान योगी इतके आक्रमक झाले की, ते थेट एसएसपीच्या घराच्या सरळ भिंतीवर चढून आवारात घुसले. पोलिसांना न जुमानता थेट व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या योगींची ती प्रतिमा गोरखपूरवासीयांच्या मनावर ठसली, ती कायमची. नेमका हा काळ गोरखपूरसाठी संक्रमणाचा काळ होता. हरिशंकर तिवारी आणि वीरेंद्रप्रताप शाही या दोन बाहुबली नेत्यांची स्थानिक राजकारणावरची पकड ढिली पडत चालली होती. याच पोकळीत योगी आदित्यनाथांचं राजकारण आकार घेऊ लागलं होतं.
महंतपदाचे उत्तराधिकारी
मंदिराच्या महंतपदाचा उत्तराधिकारी म्हणून योगींचं नाव अवैद्यनाथांनी जाहीर केलं आणि चार वर्षांनंतर आदित्यनाथ हेच आपला राजकीय वारसदार असल्याची द्वाही फिरवली. त्यामुळे जी लोकसभेची जागा महंत अवैद्यनाथांकडे होती, ती आता योगी आदित्यनाथांच्या नावे झाली होती. १९९८मध्ये योगी तब्बल २६ हजार मतांची आघाडी घेऊन पहिल्यांदा लोकसभेचे खासदार बनले. दरम्यानच्या काळात मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे त्यांच्या आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणाला थोडीफार खीळ बसली, पण राजकीय चातुर्य दाखवत योगींनी लोकसभेत दाखल झाल्यानंतरच्या काहीच काळात ‘हिंदू युवा वाहिनी’ नावाच्या संस्था जन्माला घातली. याच हिंदू युवा वाहिनीने पुढल्या काळात गोरखपूर, देवरिया, महाराजगंज, कुशीनगर, सिद्धार्थनगरपासून मऊ, आझमगड इथल्या जातीय घटनांत सक्रिय सहभाग नोंदवला.
या काळात खुद्द योगी आदित्यनाथांवर हत्येचा प्रयत्न करणे, सामाजिक सलोखा धोक्यात आणणे, दोन धर्मात तेढ निर्माण करणे, धर्मस्थळांवर हल्ला करणे आदी कारणांमुळे तीन गुन्हे नोंदवण्यात आले. २००७मध्ये त्यांना अटकही करण्यात आली. यातल्याच एका प्रकरणाची सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, या सगळ्या आक्रमक राजकारणाचा परिणाम हा झाला की, योगी आदित्यनाथांना मिळणाऱ्या मतांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढच होत गेली. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आले.
मधल्या काळात २००७मध्ये जेव्हा त्यांना अटक झाली, तेव्हा त्या घटनेने त्यांना एकप्रकारे धक्का दिला. युवा वाहिनीच्या माध्यमातून भाजपमध्ये आपले उपद्रवमूल्य वाढवण्याचे त्यांचे प्रयत्न थंडावले. एरवी, भाजपतल्या नेत्यांशी त्यांचा होणारा संघर्ष ही नित्याची बाब होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा जेव्हा असे संघर्षाचे क्षण येत, तेव्हा योगी बंडखोरीची भाषा करत. हा प्रकार अगदी अलीकडच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत सुरू होता. या निवडणुकीत ते स्टार प्रचारक असले तरीही शिफारस केलेल्यांना तिकिटे न मिळाल्याने मनातली नाराजी ते लपवू शकले नव्हते. हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांना थेट शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणुकीत उतरवण्याचा डावही समर्थकांकरवी त्यांनी खेळला होता. मात्र, सरतेशेवटी दिलजमाई झाली आणि मोदी-शहांना न जुमानता संघाच्या दबावातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद नाट्यमयरीत्या त्यांच्या पदरात पडले.
मुख्यमंत्रीपदाची झूल
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर स्वाभाविकपणे योगी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माधम्यांमध्ये चर्चेचा विषय ठरू लागले. त्यांची प्रत्येक हालचाल बारकाईने टिपली जाऊ लागली. त्यांच्या प्रत्येक राजकीय खेळीचे विश्लेषण होऊ लागले. म्हणूनच गोरखपूरच्या बाबा राघवदास हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी बालके दगावल्याच्या घटनेत, तत्पूर्वी सहारनपूरमधली ठाकूर आणि दलितांमधल्या रक्तरंजित संघर्षाच्या घटनेत मीडियाने त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांच्या तथाकथिक शिस्तप्रिय कार्यशैलीचे वाभाडे काढले.
कोपिष्ट, हसतमुख, शिस्तप्रिय हे गुणावगुण त्यांना चिकटले होते. पण अध्येमध्ये त्यांच्यातल्या हळव्या माणसाचेही दर्शन ते घडवत होते. २००७मध्ये जेव्हा त्यांना दहशत माजवण्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली होती, तेव्हा या घटनेचा लोकसभेत वृत्तांत कथन करताना योगी अचानक रडू लागल्याचे देशाने पाहिले होते. त्यानंतर गोरखपूरमधल्या बीआरडी हॉस्पिटमध्ये मुलं दगावल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांचा कंठ दाटून आल्याचे बघायला मिळाले होते.
इतर वेळी ते स्वत:ला संताच्या रांगेत बसवण्याचा खूप आटापिटा करताना दिसतात, पण दुसरीकडे त्यांना सत्तेचं असलेलं आकर्षणही लपून राहत नाही. किंबहुना, सत्तेच्या राजकारणाला ते नेहमी प्राधान्य देताना दिसतात. या उठाठेवीत ते जितक्या लवकर एखाद्यावर विश्वास टाकतात, तितक्यात तडकाफडकी एखाद्याला दूरही लोटतात.
हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्यासोबत जे नेते होते, त्यातले बहुतेक सगळे आता त्यांना सोडून गेले आहेत. काहींना योगींनी संघटनेबाहरेचा रस्ता दाखवला आहे. मुख्यमंत्री होण्याआधी ‘लव्ह जिहाद’, ‘घर वापसी’ आदी राजकीय अजेंडा राबवून आक्रमक राजकारणासाठी ओळखले जाणारे योगी आता एका बाजूला राज्यातल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कडक भाषा करताना दिसतात, संस्कृतीविरोधात वर्तन करणाऱ्यांविरोधात ‘रोमिओ स्क्वाड’ची स्थापना करतात. तर दुसरीकडे पत्नीच्या खुनाचा आरोप असलेल्या अमनमणी त्रिपाठींसारख्या बाहुबली अपक्ष आमदाराच्या सदिच्छा भेटी घेण्यात आघाडीवर असतात.
सूडकेंद्री राजकारण शैली
प्रेम, करुणा, सौहार्द या नाथपंथाचा वारसा ते सांगत असले तरीही सूडाचे राजकारण त्यांच्यासाठी कधी वर्ज्य नव्हते, हेही वास्तव गोरखपूरच्या जनतेने या पूर्वी अनुभवले आहे. अलीकडच्या काळात याचा प्रत्यय योगींनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर लगेचच आला होता. योगींच्या आदेशावरून वैचारिक विरोधक असलेले ‘पीस पार्टी’चे नेते डॉ. अयुब तुरुंगात डांबले गेले, तर बसपचे ज्येष्ठ नेते विनय शंकर तिवारी आणि त्यांचे पिता हरिशंकर तिवारी यांच्या घरावर पोलिसांकरवी छापे टाकण्यात आले होते.
मात्र, राजकीय डावपेच कसेही खेळले, तरीही जनमानसातली आपली प्रतिमा सात्त्विक-सोज्वळ दिसावी, आपल्या संन्यस्त वृत्तीकडे जनतेचे अधिक लक्ष जावे, असा त्यांचा प्रारंभापासून आग्रह आणि प्रयत्नही राहिला आहे. गोरखपूरला आल्यापासून संन्याशाच्या प्रतिमेला साजेसा ते पेहराव करत आले आहेत. अर्थातच, भगवा हा त्यांचा आवडता रंग आहे. त्यांची ही आवड ध्यानात घेऊनच कार्यक्रम खासगी असो वा सरकारी भगवे आच्छादन असलेले सोफे, खुर्च्या तक्के इतकेच नव्हे टेबल क्लॉथ, गमछे-नॅपकिनदेखील भगव्या रंगातलेच त्यांच्यासाठी तयार ठेवले जात आहेत.
अनेकदा कार्यकर्त्यांचा, सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचा उत्साह त्यांना अडचणीतही आणत आहे. जसे अलीकडे ते कुशीनगरमधल्या मैनपूर-दिनापत्ती गावातल्या मुसहर जमातीतल्या वस्तीत भेट द्यायला गेले, तेव्हा त्यांच्यावतीने सरकारी फर्मान सुटले. त्या अंतर्गत दलितांनी मुख्यमंत्री योगींना भेटतेवेळी स्वच्छ अंघोळ केलेली असावी, या कारणास्तव साबण, शाम्पू, तेल आणि नवे टॉवेल्स वस्तीत वाटले गेले. मागे ते देवरियातल्या प्रेमसागर नावाच्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेले, तेव्हा त्यांची सोय म्हणून सरकारी अधिकाऱ्यांनी जवानाच्या घरात तातडीने एअर कंडिशनर बसवला. सोफा आणि गालिचा टाकला. ऐनवेळी दगा नको म्हणून जनरेटरही आणून ठेवला. मात्र, योगींची त्या घरची भेट आवरली, तसे हे सारे सामान परतही काढून नेले गेले. अशा जेव्हा घटना घडतात आणि त्यावर मीडियातून टीका होते, तेव्हा योगी अस्वस्थ होतात. समर्थकाच्या कृतीचे समर्थन करताना त्यांची विलक्षण दमछाक होते.
भौतिक जगाचे आकर्षण
एका बाजूला, प्रतिमारक्षणाचा त्यांचा आग्रह लावून धरण्याचं काम त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि पत्रकार अथकपणे करत असले, तरीही नाथपंथांची दीक्षा घेतलेल्या या ‘संन्यस्त राजकारण्या’ला लक्झरी कारचं भारी वेड आहे. म्हणूनच दरवेळी नवी मॉडेल्स त्यांच्या ताफ्यात सामील होताना दिसतात. मधल्या काळात त्यांच्याकडे टोयोटा क्लासिक, टाटा सफारी आणि मारुती एस्टिम या गाड्या होत्या. कालांतराने त्यात फोर्ड आयकॉन, फॉर्च्युनर आदी गाड्यांची भर पडत गेली. एरवी, भगव्या वस्त्रांमध्ये ते आपलं साधेपण जनतेच्या मनावर ठसवू पाहतात, पण अष्टधातूंनी बनलेलं कुंडल आणि त्यांच्याकडची सोन्याच्या साखळीतली रुदाक्षांची माळ त्यांना भेटणाऱ्यांच्या नजरेतून सुटत नाही. या जीवनशैलीला त्यांचे समर्थक ‘काळाची गरज’ म्हणतात, विरोधक याला ‘भपकेबाज’ असं विशेषण लावतात. योगींचं सगळं राजकारण धर्माभोवती फिरतं. हिंदू धर्म हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. इथे ते स्वत:साठी कोणतीही सीमारेषा आखत नाहीत. विशेषत: खासगी स्वरूपाच्या सभा-संमेलनातून संत-महंतांना ते खुलेआम शास्त्र आणि शस्त्र बाळगण्याचा सल्ला देतात. स्वत: परवानाधारी रिव्हॉल्व्हर आणि रायफल बाळगतात.
त्यांचं हे रूप एका वर्गाला प्रचंड भुरळ घालतं. पण टीकाकारांना त्यांच्या या रूपात आणि नाथपंथांच्या शिकवणीत जराही मेळ सापडत नाही. अशा वेळी गोरखनाथांच्या एका सबदीची ते आठवण करून देतात. ती सबदी अशी असते- ‘हबकि न बोलिबा, ठबकि न चालिबा... धिरे धरिबा पांव, गरब न करिबा, सहजै रहिबा, भरत गोरख रांव...’ याचा अर्थ : कुणाच्याही नकळत मार्गस्थ व्हा. अदृश्य राहा. कुणाच्याही नजरेत येऊ नका. गर्व करू नका. साधे राहा. ध्यानपूर्वक बोला..
या वचनाच्या अगदी उलट योगी आदित्यनाथ रूप आज दिसतं. इतरांना कळावं अशा पद्धतीने ते कमांडोंच्या गराड्यात वावरतात. इतरांना कळेल अशा पद्धतीनं मार्गस्थ होतात. इतरांचं लक्ष वेधावं, अशा पद्धतीनं स्वत:ला पेश करतात. धर्माचा गर्व करतात. दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं कधी आडून-कधी थेट बोलतात...
स्वातंत्र्यपूर्व काळापासून महंत दिग्विजयनाथांनी सुरू केलेल्या कट्टरपंथी राजकारणाचं वर्तुळ अशा रितीनं पूर्ण होताना दिसतं...
योगींचा ‘नोटिस पिरीयड’ सुरू
धर्माबद्दल धाक निर्माण करणारी भगवे वस्त्रे लेवून चार वर्षं बेबंदपणे सत्ता राबवल्यानंतर उत्तर प्रदेशातल्या सत्तेच्या वर्तुळातले असंतुष्ट, अन्यायग्रस्त आवाज वाढले. त्यातच परिणाम म्हणून मोदी-शहांना भेटायला गेलेल्या (खरं तर हजेरी दिलेल्या) योगी आदित्यनाथांची देहबोली बरंच काही बिघडलेलं असल्याचं सुचवत होती. त्यांचे खांदे पडलेले होते. मास्कआडचा चेहरा निस्तेज दिसत होता. सदासर्वकाळ आपल्याच टेचात, आपल्यात तोऱ्यात वावरणारे योगी मोदी-शहांसमोर रम्पाट राडा करताना पकडल्यानंतर हेडमास्तर किंवा प्रिन्सिपॉलसमोर अंग चोरून बसलेल्या मुलासारखे भासत होते. तत्पूर्वी, योगींच्या समक्ष संघ-भाजपने लखनौत येऊन झाडाझडती घेणे, हायकमांडने हजर होण्याचे फर्मान सोडणे, या घटना मोदींनंतरचा ‘कडव्या हिंदुत्वाचा आयकॉन’ अशी स्वतःची ओळख ठसवणाऱ्या योगींच्या नाकात वेसण घातली गेली आहे, हे सांगणाऱ्या होत्या.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आता मोकाट सुटण्याची मुभा काढून घेतल्यामुळे नाकात वेसण घातलेल्या अवस्थेत, शहांच्या करड्या देखरेखीखाली योगींना आगामी विधानसभा निवडणुकीत आजवरची सगळ्यात मोठी कामगिरी करून दाखवणे अपरिहार्य ठरणार आहे. आता आहे, त्यापेक्षा पाच-पंधरा जागा जरी कमी झाल्या तरीही, योगींना ‘कट टु साइज’ केलं जाणार हे उघड आहे.
दरवेळी मोदींच्या नावावर निवडणूक लढल्याने आणि अनेक प्रसंगांत त्या हरल्याने (ताजा निर्देश बंगालच्या निवडणुकांकडे) मोदींच्या उत्तुंग प्रतिमेला तडे जातात, ती डागाळते अशा मतांचा गलबला संघ-भाजपमध्ये वाढल्याने उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत मोदी निवडक प्रसंगांतच दर्शन देणार, हे एव्हाना अनेकांनी ओळखलं आहे. अशा वेळी प्रचाराचा अधिकचा भार योगींनाच उचलावा लागेल. अशा स्थितीत गेल्या चार वर्षांच्या काळात पक्ष-संघटनेतल्या ज्यांना योगींनी कस्पटासमान लेखलं, ज्यांचा हाडतूड केलं, ते दिल्लीश्वरांच्या मदतीने उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता येईल, पण योगींचा माज उतरेल, अशा पद्धतीने पाडापाडी करतील, हीदेखील शक्यता अधिक आहे.
म्हणजेच दिल्लीच्या तख्ताकडे डोळे लावून बसलेल्या आणि अप्रत्यक्षपणे थेट अमित शहांनाच आव्हान देणाऱ्या योगींचे काही झाले तरीही, उत्तर प्रदेशच्या सीमारेषेआतच पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याची गादी टिकवायची तरीही, आधीपेक्षा मोठा विजय हा एकच पर्याय त्यांच्यापुढे आहे. इतर पर्याय त्यांची राजकीय उंची आणि प्रतिमा घटवणारे-डागाळणारे असणार आहेत, यात वाद नाही.
‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ जून २०२१च्या अंकातून साभार
..................................................................................................................................................................
लेखक मनोजकुमार सिंह ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘दी गार्डियन फर्स्ट पोस्ट’, ‘दी वायर’ आदींसाठी नियमित योगदान देणारे गोरखपूरास्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.
manoj.singh2171@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment