पासवानांच्या ‘चिराग’ची फडफड!   
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • चिराग पासवान आणि रामविलास पासवान; चिराग पासवान आणि नितीशकुमार
  • Sat , 19 June 2021
  • पडघम देशकारण भाजप BJP जद (यू) JDU लोक जनशक्ती पक्ष Lok Janshakti Party चिराग पासवान Chirag Paswan रामविलास पासवान Ram Vilas Paswan नितीशकुमार Nitish Kumar

शह-काटशह, डाव-प्रतिडाव, कोपरखळ्या, खुन्नस-वचपा, अशा अनेक कृती राजकारणात सतत घडत असतात. या कधी दृश्यमान असतात, तर कधी नसतात. दृश्यमान नसणाऱ्या अशा कृतींचे परिणाम काही काळानंतर दिसू लागतात. राजकारणाचा हा खेळ कधी कुणाला वर चढवतो, तर कधी कुणी राजकारणाच्या साप-शिडीवरून थेट तळाला येऊन पोहोचतो. या सगळ्या कृतींकडे कसं बघायचं, हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असतो. त्यामुळे त्या कुणाला मनोहर वाटतात, तर कुणाला राजकारणाचा तो एक अपरिहार्य भाग वाटतो. बिहारच्या लोक जनशक्ती पक्षामध्ये सध्या जे चालू आहे, त्याचं वर्णन नितीशकुमार यांनी इंधन काढून घेतल्यानं पासवान यांचा ‘चिराग’ आता फडफड करू लागला आहे, अशा शब्दांत करता येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिराग पासवान यांच्यावर राजकीय सूड उगवला असा त्याचा अर्थ आहे.

आपल्या देशात समाजवादी विचाराची जी काही छकलं झाली, त्यापैकी एक रामविलास पासवान यांनी २००० साली स्थापन केलेला त्यांचा सवतासुभा म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आहे. या पक्षाला म्हणजे रामविलास पासवान यांना बिहारमध्ये मागासवर्गीय समाजाचा चांगल्यापैकी पाठिंबा आहे, हे त्यांनी जनता दल (यु)मधून फुटून निघाल्यावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत सिद्ध केलेलं आहे. २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकांत या पक्षाला बिहारात सहा जागा मिळाल्या. रामविलास पासवान यांचा लोकसंग्रह आणि सत्ताधाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा गुण वाखाण्यासारखा आहे.

रामविलास पासवान आणि नितीशकुमार या बिहारमधील दोन नेत्यांचं अत्यंत खास वैशिष्ट्य म्हणजे दोघांचाही लढा धर्मांध शक्ती म्हणजे भाजप विरुद्ध आहे, तरीही त्यातला संधिसाधूपणा म्हणजे या दोघांनीही त्याच भाजपच्या चमच्यातून सत्तेचं दूध प्राशन केलेलं आहे! अर्थात ते दोघेही याला संधिसाधूपणा समजत नाहीत, हा त्यांचा राजकीय कोडगेपणा म्हणायला हवा. शुगर कोटेड आणि जरा वेगळ्या शब्दांत हेच म्हणणं सांगायचं झालं, तर राजकारणात चालून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करून घेण्याची नजर असलेले मुत्सद्दी म्हणजे रामविलास पासवान आणि नितीशकुमार आहेत! अर्थात या बाबतीत रामविलास पासवान टेकाड असतील, तर नितीशकुमार पर्वत आहेत, हे काही वेगळं सांगायला नको!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

रामविलास पासवान यांनी अशा राजकीय सुर्वणसंधी अनेकदा साध्य केलेल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान भाजपच्या आश्रयाला गेले आणि सुमारे अर्धतपाच्या काळानंतर त्यांनी पुन्हा केंद्रातला सत्तेचा सोपान चढण्यात यश मिळवलं. नरेंद्र मोदी-अमित शहा आणि रामविलास पासवान यांच्या राजकारणाच्या बाजाचा अंदाज भल्याभल्यांना आलेला नाही. तसा तो लोक जनशक्ती पक्ष आणि भाजप यांच्यात युती झाली, तेव्हाही आलेला नव्हता. तेव्हा मी दिल्लीतच पत्रकारिता करत होतो आणि अमित शहा यांनी पाटण्याहून लोक जनशक्ती पक्षासोबत भाजपसोबत युती करत आहे, अशी घोषणा केली, तेव्हा दस्तुरखुद्द भाजप मुख्यालयातही भल्याभल्यांना कसा धक्का बसला होता, हे अजूनही आठवतं.

रामविलास पासवान हयात होते, तोपर्यंत लोक जनशक्ती पक्षातील कुरबुरींना तोंड फुटलेलं नव्हतं, कारण रामविलास यांचा करिष्मा आणि वचकही तसाच होता. बिहारवर वर्चस्व निर्माण करण्याच्या नितीशकुमार आणि रामविलास यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षालाही जाहीर स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं. त्या संदर्भात जे काही शह-काटशहाचं राजकारण सुरू होतं, त्याला तोंड फुटलेलं नव्हतं. मात्र रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षाची सुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली आणि नितीशकुमार यांचा जनता दल (यु) आणि लोक जनशक्ती पक्षात वर्चस्वाचा संघर्ष उघडपणे सुरू झाला, तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्याची फार काही झळ नितीशकुमार आणि त्यांच्या जनता दल (यु) पक्षाला बसलेली नव्हती.

चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पक्षाची सूत्रं आली, ती केवळ ते रामविलास यांचे पुत्र आहेत म्हणून, हे काही वेगळं सांगायला नको. चिराग पासवान तरुण आहेत, अभियांत्रिकीतलं उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. दिसायला रुबाबदार असल्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीचेही दरवाजे ठोठावून बघितले आहे. मात्र वडिलांच्या आग्रहामुळे तेही राजकारणाच्या वाटेवरून चालू लागले आणि पुरेशी राजकीय पक्वता येण्याच्या आतच त्यांनी नितीशकुमार यांच्यासारख्या ‘हेवी वेट’शी पंगा घेऊन स्वत:चं राजकीय भविष्य धूसर करून टाकलं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भाजपची बिहारमधील युती जनता दल (यु)पेक्षा नितीशकुमार यांच्याशी जास्त पक्की आहे आणि ती तशी पक्की असणं नैसर्गिक नसून अगतिकता आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा जनता दल (यु) आणि नितीशकुमार यांच्यापेक्षा बिहारात मोठं होण्याच्या संधीची भाजपला प्रतीक्षा होतीच. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती संधी रामविलास पासवान यांच्या अनुपस्थितीत चिराग पासवान यांनी भाजपला मिळवून दिली.

चिराग पासवान म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आणि नितीशकुमार म्हणजे जनता दल (यु) हे दोन्ही पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे घटक पक्ष असले तरी बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल (यु)च्या म्हणजे नितीशकुमारच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला. लोक जनशक्ती पक्ष किती जागा जिंकू शकतो, यापेक्षा जनता दल (यु)चा किती जागी पराभव करण्यास कारणीभूत ठरू शकतो, याचा अंदाज आल्यावर भाजपने मौन धारण करून चिराग पासवान यांना पुरेशी ‘कुमक’ पुरवली हे काही लपून राहिलेलं नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीपासूनच बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्ष सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष ठरेल अशी भाकीतं व्यक्त केली जात होती आणि ती खरीही ठरली.

बिहारमधल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष ठरला आणि जनता दल (यु) चक्क तिसऱ्या नंबरवर फेकला गेला. कारण लालूप्रसाद यादव सर्वेसर्वा असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी अनपेक्षितपणे मुसंडी मारून दुसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ पटकावलं. अर्थात भाजप आणि जनता दल (यु) युती असल्यानं ठरल्याप्रमाणे नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तरी झालेल्या पिछेहाटीचं शल्य त्यांच्या मनात होतं आणि त्याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय ते राहणार नाहीत, हे उघड होतं. त्याप्रमाणे घडलं आता घडलं आहे.

सर्व राजकीय पक्षात असतात तसेच सत्तेसाठीचे संघर्ष लोकसभेत जेमतेम सहा सदस्य असलेल्या लोक जनशक्ती पक्षातही आहेत, हे नितीशकुमार यांनी हेरलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं बिगूल वाजायला सुरुवात होताच फासे फेकले. कुठल्या तरी हिंदी चित्रपटात ‘ये खेल तुमने शुरू किया है, इसे मैं खतम करूंगा’ असा डॉयलॉग आहे. नितीशकुमारांना शह देण्याचा खेळ चिराग पासवान यांनी सुरू केला आणि त्या खेळाचा शेवट आता नितीशकुमार करत आहेत. लोक जनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं. पक्षाच्या गटाचं लोकसभेतील नेतेपद चिराग पासवान यांच्याकडून काढून घेऊन पशुपती पारस यांच्याकडे सूपूर्द केलं. पक्षाच्या संसदीय गटात फूट पडली. चिराग पासवान अल्पमतात गेले. त्यांच्या गटात आता तेच एकमेव खासदार उरले आहेत. पुढच्या सगळ्या हालचाली नितीशकुमार यांच्या नियोजनाप्रमाणे घडत गेल्या आणि चिराग पासवान एकटे पडले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पक्षात फूट पडली हे मान्य करून स्वत:च्या नेतृत्वाखालील पक्ष मूळ असल्याचं सिद्ध करण्याऐवजी चिराग पासवान यांनी त्या पाच खासदारांना पक्षातून काढून टाकलं. आता ते पाच खासदार  विरुद्ध एकटे चिराग पासवान अशी अस्तित्वाची खडाखडी सुरू झालेली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीतच बिहारातील मतदार पशुपती पारस यांच्यामागे आहेत की, चिराग पासवान यांच्यामागे हे सिद्ध होईल.

एक बऱ्यापैकी प्रभावी असलेला प्रादेशिक पक्ष अंतर्गत लाथाळीमुळे अस्तित्वहीन होत असल्याचा आनंद निश्चितच भाजपला असेल, पण दुसरीकडे त्यामुळे नितीशकुमार यांचे पाय बिहारमध्ये आणखी घट्ट होतील, याची भीतीही असेल. त्यामुळे यापुढचा बिहारातला भाजप विरुद्ध नितीशकुमार हा सुप्त राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत जाईल. लोक जनशक्ती या चिटुकल्यापिटुकल्या पक्षातील अंतर्गत संघर्षाला असे भाजप विरुद्ध नितीशकुमार या सुप्त संघर्षाचे कंगोरे आहेत.

या लाथाळीत भारतीय जनता पक्ष चिराग पासवान यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना मंत्रीपद देतो की, नितीशकुमार यांच्या सांगण्यानुसार पशुपती पारस यांना, की दोघांच्याही हातात वाजवण्यासाठी गाजराची पुंगी मिळते, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......