अजूनकाही
आचार्य विनोबा भावे, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, तसंच संतसाहित्य यांचे प्रगाढ अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. अनंत देवीदास (बाळासाहेब) अडावदकर यांचं नुकतंच नागपुरात अल्प आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.
खामगाव (जि. बुलडाणा) येथील मूळ रहिवासी असलेल्या बाळासाहेबांनी शिक्षक म्हणून आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी अकोल्यात काही काळ मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. १९७५ साली ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाले. पणजी, पुणे, यवतमाळ या ठिकाणी त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. नंतर ते नागपूर केंद्राचे प्रमुख म्हणजे स्टेशन डायरेक्टर म्हणून नागपूरला आले आणि तिथूनच सेवानिवृत्त झाले.
लेखनाचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला होता. त्याचं जतन करत बाळासाहेबांनी विपुल साहित्यलेखनही केलं. आचार्य विनोबा भावे यांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या शोध प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी विद्यापीठाने दिली. त्यांनी काही काळ नागपूर विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रात प्राध्यापक म्हणूनही काम केलं होतं. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि संतसाहित्याची आधुनिक दृष्टीकोनातून मांडणी करणारे प्रगाढ अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. ते उत्कृष्ट वक्ते होते. संतविचारांमधील सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता जनमानसात बिंबवण्याचा प्रयत्न ते आपल्या लेखनातून आणि भाषणांतून सातत्यानं करत असत. रामकृष्ण मठातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘जीवन विकास’ या मासिकाच्या संपादकपदावरही त्यांनी काम केलं होतं.
अत्यंत ऋजू स्वभावाचे आणि सौम्य प्रकृतीचे बाळासाहेब लहानथोर सर्वांमध्येच प्रसिद्ध होते. प्रख्यात विज्ञानकथा लेखक निरंजन घाटे यांच्याशी तर त्यांचे मैत्रीपेक्षाही जवळचे म्हणजे बंधुत्वाचे भावसंबंध होते. आपल्या या दिवंगत ज्येष्ठ स्नेह्याला निरंजन घाटे यांनी वाहिलेली ही शब्दांजली…
..................................................................................................................................................................
माझे मोठ्या भावासारखे किंबहुना त्याहूनही जवळचे स्नेही डॉ. अनंत उपाख्य बाळासाहेब अडावदकर यांचं निधन झालं. ‘जातस्यहि धृवोर्मुत्यू’ हे म्हणणं सोपं असतं, पण पचायला अवघड जातं, हे पुन्हा एकदा जाणवलं. आकाशवाणीत पहिल्या दिवशी आमची ओळख झाली. भेटता क्षणी मैत्री जुळली. आमची टेबलं तीन वर्षं एकमेकांशेजारी होती. त्या वेळी आम्ही कार्यक्रम अधिकारी होतो. पुढे माझी बदली झाली, तरीही आमच्या मैत्रीत अंतर पडलं नाही. नंतर बाळासाहेब पुण्यात उपसंचालक म्हणून आले. त्यांच्या काळात पुणे आकाशवाणीला त्यांनी दिलेलं मौलिक योगदान विसरता येणं शक्य नाही. निवृत्तीआधी ते नागपूर केंद्राचे संचालक बनले. त्यांनी विनोबांच्या आयुष्यावर आणि साहित्यावर सखोल अभ्यास करून डॉक्टरेट मिळवली होती. नागपूर विद्यापीठात ते गांधी अभ्यास केंद्रात प्राध्यापक म्हणून शिकवत असत. रामकृष्ण मठाशी ते जवळून जोडलेले होते. ‘जीवन विकास’ या मासिकाच्या संपादकपदाची धुरा त्यांनी बरीच वर्षं सांभाळली. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील एक खरा विचारवंत गेला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट’, हे आपण ऐकत असतो, बाळासाहेबांच्या बाबतीत मी ते अनुभवलंय. २३ नोव्हेंबर १९७७ या दिवशी सकाळी दहा वाजता आमची पहिली भेट झाली. मी माझा एक प्रकल्प पूर्ण करून आकाशवाणीत दाखल होण्याची परवानगी मागितली होती. मला दिलेली मुदत २१ नोव्हेंबरला संपत होती. मी ज्या गाडीनं निघालो होतो, ती थोडक्यात एका भीषण अपघातातून वाचली होती. त्यामुळे मला नागपूरला पोहोचायला रविवार उजाडला.
त्यामुळे थोडासा भीतभीतच मी आकाशवाणीत पोहोचलो. दरवानाने मला ड्युटीरूम दाखवली. तिथं दाभाडे हे ड्युटी ऑफिसर बसले होते. मी माझ्या हातातलं पत्र त्यांना दाखवलं. उठून उभे राहत ते म्हणाले, ‘बसा ना सर!’ हे मला नवीन होतं. विद्यापीठात सगळं कसं अनौपचारिक असे. (तेव्हाचे केंद्र संचालक) “मुकर्जीसाहेब आत्ताच आलेत, मी त्यांच्या पी.ए.ला तुम्ही आल्याचं सांगतो, ती मग तुम्हाला बोलवून घेईल” असं ते म्हणाले.
आमचं हे बोलणं संपेपर्यंत सायकलवरून उतरून एक बुटके, जाड भिंगाचा चष्मा लावलेले गृहस्थ ड्युटीरूममध्ये आले. दाभाड्यांनी आमची ओळख करून दिली. “हे अडावदकरसाहेब, आणि हे नवे पेक्स (PEx). जॉईन व्हायला आलेत”. लगेच अडावदकरांनी माझा ताबा घेतला. मला मी राजपत्रित अधिकारी आहे, याची जाणीव करून दिली. मुकर्जीसाहेबांकडे नेलं. माझी समस्या समजावून दिली. मुकर्जीसाहेबांचा अडावदकरांवर खूप विश्वास होता. त्यांनी लगेच दिल्लीच्या ऑफीसला फोन लावला. मला जॉईन करून घेतलं. अशा रीतीनं मी आकाशवाणीत रुजू झालो. त्याच दिवशी बाळासाहेबांच्या रूपानं मला आयुष्यभरासाठी एक जवळचा मित्र मिळाला. त्यानंतर मी आकाशवाणीत असेपर्यंत बाळासाहेब मला मार्गदर्शन करत राहिले.
इकडे बाळासाहेबांच्या आयुष्याचा पट हळूहळू माझ्यापुढे उलगडत होता. खामगाव, अकोला, मग आकाशवाणी. तेव्हा ते डॉक्टरेट नव्हते, पण त्यांची विद्वत्ता त्यांच्या बोलण्या-वागण्यातून प्रकट होत असे. कवी बी हा त्यांच्या बोलण्याचा आवडता विषय. ‘चाफा बोलेना’पेक्षा ‘गाई पाण्यावर काय म्हणून आल्या’ ही कविता त्यांना अधिक आवडायची. त्यांच्यामुळे मला अनेक कवितांचा अर्थ नव्यानं कळला. कुसुमाग्रजांना भेटलो, तेव्हा या ज्ञानाचा मला फायदा झाला. सुरेश भटांची आणि माझी ओळखही त्यांच्यामुळेच झाली. विठ्ठल वाघ पण त्यांच्यामुळेच माझ्या ओळखीचे झाले आणि पुढे मित्र बनले. नागपुरातील अनेक साहित्यिकांशी माझा परिचय झाला. वामनराव चोरघड्यांसारखे ज्येष्ठ मला आपला मानू लागले. मी नागपूरहून जळगावला गेलो तरी बाळासाहेबांचा आणि माझा संवाद सुरू राहिला. अकोल्याला साहित्य संमेलनाच्या वेळी आम्ही भेटलो, तेव्हा नागपूरच्या आठवणी जागवल्या. विशेषतः विनोबांच्या आश्रमातील बाळासाहेबांनी विनोबांची घेतलेली मुलाखत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
विनोबा हा त्यांचा अभ्यास विषय होता. ते समजून घ्यायला हवे असतील तर आधी गांधी अभ्यासायला हवेत म्हणून त्यांनी समग्र गांधी वाचून काढले. मग ते विनोबांकडे वळले. त्यांची मुलाखत घेता यावी म्हणून पहाटे साडेचारला उठून थंड पाण्यानं स्नान करून विनोबांचं प्रवचन बाळासाहेबांनी ऐकलं होते, याचा मी साक्षीदार आहे. आश्रमात गरम पाणी मिळत नसे. या घटनेमुळे ते किती दृढनिश्चयी होते, हे माझ्या लक्षात आलं. पुण्यात आल्यावर ते कस्तुरबांच्या निवासस्थानी जाऊन आले.
गांधी-विनोबा हे त्यांचे अभ्यास विषय होते, तर विवेकानंद हे श्रद्धास्थान होतं. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्यावर बाळासाहेबांचं भाषण ऐकणं ही एक वेगळीच अनुभूती होती.
बाळासाहेब निवृत्तीनंतर काही काळ पुण्यात विमाननगर भागात राहत होते. त्या वेळी ते बसने स्टेशन, तिथून आमचं घर, किंवा स्वारगेट, स्वारगेट ते रामकृष्ण मठ, मग आमचं घर, किंवा आमच्या घरून मठात, असं जात असत. आमच्या घरी न्याहारी आणि मनसोक्त गप्पा असा कार्यक्रम असे.
त्यांच्या विमाननगर येथील घरी आकाशवाणीतल्या आठवणींना एकदा आम्ही उजाळा देत होतो. आमच्या एका जुन्या सहकाऱ्याचा विषय निघाला. तो माळकरी होता. नागपूरला असताना त्याला राजीनामा द्यावा लागला होता. ‘खोटे आळ घेतले,’ असं त्यानं मला नंतर सांगितलं होतं. मी ते अडावदकरांच्या कानावर घातलं. ते ऐकून प्रथमच त्यांना संतापलेलं मला त्या दिवशी बघायला मिळालं. ‘‘खोटेपणाची कमाल आहे. त्यानं काय केलं हे मी बोलूही शकत नाही. त्याच्या नातीच्या वयाच्या मुलींशी तो असं वागला. लोकांनी धरून मारमार मारला त्याला’’, बाळासाहेब सात्विक संतापानं म्हणाले. याआधी त्यांचं असं रूप मी कधीच बघितलं नव्हतं. आकाशवाणीत अनेक भानगडी आम्ही ऐकल्या होत्या. त्या वयानं मोठ्या कर्मचाऱ्यांच्या होत्या. इथं या गृहस्थानं १०-१२ वर्षांच्या मुलींशी अश्लील, अश्लाघ्य वर्तन केलं होतं. इकडे तो स्वतः वर्तमानपत्रात आध्यात्मिक लेख लिहायचा. अशा लोकांमुळे सर्व संघटना बदनाम होते. त्यामुळे बाळासाहेब संतापले होते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पुढे ते नागपूरला गेले, तरी आमच्या संपर्कात खंड पडला नव्हता. नागपूरला त्यांनी आणखी एक तरुण (तेव्हा) मित्र मिळवून दिला तो म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी. आमच्या गप्पांचा फड आकाशवाणी बाहेरच्या चहाच्या ठेल्यावर जमे. कधी त्यात सुरेश भट सामील होत असत.
खूप आठवणी आहेत. आता त्यावरच जगणं भाग आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment