‘आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग’
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 15 June 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध प्लुव्हिऑसिटी Pluviosity मान्सून Monsoon पॉगन्ट्रॉफी Pogonotrophy ग्लॅब्रेट Glabrate

शब्दांचे वेध : पुष्प सदतिसावे

आजचे शब्द : Pluviosity, Monsoon, pogonotrophy आणि glabrate

“Those big talkers now whine about wet rain—relentless, drab, mold-producing, muddy, the-dog-is-always-wet, leaden, depressing, pass-the-Prozac pluviosity.”

अमेरिकेतल्या पोर्टलंड शहरात प्रकाशित होणाऱ्या ‘ओरेगॉनियन’ या नियतकालिकातलं १९९९ सालचं हे वाक्य ‘ऑक्सफर्ड’च्या इंग्रजी शब्दकोशात pluviosity (प्लुव्हिऑसिटी) या शब्दाच्या वापराचं उदाहरण म्हणून उदधृत केलेलं आहे. ‘प्लव्हिऑसिटी’ किंवा ‘प्लुव्हिअसिटी’ म्हणजे पावसाळी कुंद वातावरण, सतत पडणारा धो धो पाऊस, काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळामुळे पसरलेला ओला काळोख इत्यादी. आपल्या देशात मान्सूननं नुकताच प्रवेश केला आहे, म्हणून या शब्दाची आठवण झाली.

लॅटिन भाषेत (aqua) ‘pluvia’ म्हणजे पावसाचं पाणी. Pluvius म्हणजे पावसाशी संबंधित. आणि pluere म्हणजे पाऊस पडणं. यातला pleu हा धातू मुळातला अती प्राचीन इंडो-युरोपियन भाषेतला आहे. त्याचा अर्थ वाहणं (to flow) असा होतो. तिथून pluviōsus हा शब्द लॅटिनमध्ये तयार झाला आणि नंतर तो फ्रेंच, तसंच काही जर्मेनिक भाषा या मार्गानं इंग्रजीत शिरला. Pluviōsus ला -ity हा प्रत्यय लागून मग pluviosity शब्द तयार झाला. तसा हा एक अप्रचलित शब्द आहे. पण त्यात पावसाचं सौंदर्य आहे. त्यामुळे तो सतत वापरायला काही हरकत नसावी.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

शब्दांच्या मूळ धातूंची एक गंमत असते. आपल्याला पटकन आठवता येणार नाहीत असे बरेच, वर वर पाहिले तर असंबंधित वाटणारे, शब्द आधी कोणत्या तरी एकाच धातूपासून बनलेले असतात. पुढे त्यांचा प्रत्येकाचा वेगळा विकास आणि प्रवास सुरू होतो. हा जो pleu धातू आहे, यापासून plō(u)- म्हणजे flow हे रूप तर बनलंच, पण इतरही बरेच शब्द बनले. त्यातले दोन तर नक्कीच आपल्या ओळखीचे आहेत. एक आहे, ‘पल्मनरी’ (pulmonary) म्हणजे फुप्फुसांशी संबंधित. (यातूनच ‘न्युमोनिया’ (pneumonia) हाही शब्द बनला. यातला pneuma म्हणजे श्वास आणि pleumōn म्हणजे फुप्फुस.) दुसरा शब्द आहे, plou-to म्हणजे Pluto. हे एका ग्रहाचंही नाव आहे आणि अत्यंत श्रीमंत, धनवान व्यक्तींनाही ‘plutocrat’ असं म्हणतात. मात्र या वेळी हा ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे. तिथे Ploutos म्हणजे ओसंडून वाहणारं वैभव, श्रीमंती, पैशांचा ओघ, प्रवाह.

पण आपण पावसावर बोलत होतो. पावसाळा सुरू होण्याच्या आधी उन्हाळ्यात भाजून निघालेल्या जमिनीवर पावसाच्या पहिल्या सरीचे पहिले काही थेंब पडले की, आसमंत व्यापणारा जो एक मृद‌्गंध येतो, त्याला इंग्रजीत ‘पेट्रीकर’ (petrichor) असं म्हणतात. या सुवासाला इंग्रजीत काहीच शब्द नव्हता. इंग्लंडमध्ये वर्षभर सततच पाऊस पडत असल्यानं त्या अभाग्यांना या वासाची कल्पनाच नव्हती. भारतात आल्यावरच त्यांना त्याचा नाक भरून आनंद घेता आला. या विलक्षण सुवासाचा पुढे शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, कडक उन्हात तापलेल्या जमीन किंवा दगडांवर पावसाचे थेंब पडले की, एक विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून हा सुगंध बाहेर फेकला जातो. कारण तर कळलं. पण मग आता याला नाव काय द्यायचं?

यासाठी त्यांनी ग्रीक भाषेचा सहारा घेतला. ग्रीकमध्ये ‘पेट्रा’ (petra) म्हणजे खडक आणि ‘पेट्रॉस’ (petros) म्हणजे दगड. (यातून ‘पेट्रोलियम’, ‘पेट्रोल’, ‘पेट्रिफाईड’ यांसारखे शब्द आणि ‘पीटर’ हे पहिलं नावसुद्धा तयार झालं आहे.) याच ‘पेट्रा’ला मग त्यांनी ‘इकर’ (ichor) हा शब्द जोडून ‘पेट्रिकर’ असा नवा शब्द बनवला. ग्रीक पुराणांनुसार प्राचीन काळी तिथले जे देव होते, त्यांच्या धमन्यांमधून एक विशेष प्रकारचा रस वाहत असे. त्याला ‘ichor’ असं नाव होतं. तेच त्यांनी इथं वापरलं. थोडक्यात ‘पेट्रिकर’ म्हणजे दगडांतून वाहणारा जीवनरस किंवा द्रवपदार्थ. पण काही म्हणा, या शब्दाला आपल्या ‘मृद‌्गंधा’ची सर नाही. ‘पेट्रिकर’ कसा दगडासारखाच कठीण वाटतो. ‘मृद‌्गंध’ या शब्दात पावसाची ओल आहे, जमिनीच्या मायेची डूब आहे. रंध्र रंध्र उत्तेजित करणारा, मनाला उल्हसित करणारा मृद‌्गंध ओल्या मातीसारखाच मऊ वाटतो!

पाऊस, पावसाळा, पूर, कुंद किंवा वादळी हवामान यांसारख्या एकमेकांशी संबंध असलेल्या संकल्पनांसाठी इंग्रजी भाषेत शंभरहून जास्त पर्यायी शब्द आहेत. यातला आपल्याला पक्का माहीत असलेला शब्द म्हणजे ‘रेन’ (rain) किंवा ‘रेन्स’. पावसाळा म्हणजे ‘रेनी सीझन’. वर्षातले चारच महिने पाऊस हे इंग्रजांसाठी नवीन होतं. म्हणून त्यांच्या भाषेत उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पण पावसाळा नाही. भारतात आल्यावर इथला मान्सून बघून या तीन-चार महिन्यांच्या चिंब ओल्या काळासाठी ‘रेनी सीझन’ हा नवा शब्दप्रयोग त्यांनी तयार केला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘रेन’ हा शब्द इंग्रजांनी युरोपातल्या प्राचीन जर्मनसदृश भाषांमधून घेतलेला आहे. प्रोटो जर्मेनिक भाषेत ‘regna’ म्हणजे आकाशातून खाली पडणारे पाण्याचे थेंब. आधुनिक जर्मन, डच किंवा गॉथिक अशा भाषांमध्येही याचसारखे शब्द पावसासाठी वापरले जातात.

‘Rain’शी संबंधित अनेक वाक्प्रचार आणि शब्दसंप्रदाय इंग्रजीत आहेत. त्यातले काही उल्लेखनीय म्हणजे -

‘रेनचेक’ (Rain check). हा खास करून अमेरिकेत जास्त प्रचारात असलेला वाक्प्रचार. एखादी ऑफर ताबडतोब स्वीकारायची नसेल तर ‘Can I take a rain check on this?’ असं म्हणतात. म्हणजे नंतर कधी तरी या गोष्टीवर मी विचार करेन. (आपण बॅंकेच्या ‘चेक’चं स्पेलिंग ‘cheque’ असं करतो, अमेरिकेत त्यालाच check असं लिहितात.)

‘रेन डान्स’ (Rain dance). पावसाचं आगमन लांबलं आणि काहिली वाढली की, जगातल्या काही भागातले आदिवासी लोक पर्जन्यदेवाला खुश करण्यासाठी सामूहिक नृत्य करतात. याला ‘रेन डान्स’ असा शब्द आहे. आजकाल वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी याच नावाची क्लृप्ती वापरली जाते. एका ठराविक जागेत उंचावरून शॉवरद्वारे जमिनीवर पाण्याचे फवारे मारले जातात आणि त्याखाली आपली अंगं त्या कृत्रिम जलधारांनी भिजवून आबालवृद्ध लोक डीजेच्या ठेक्यावर मनसोक्त नाचून घेतात!

‘रेन डेट’ (Rain date). एखादा उघड्या मैदानातला खेळ ठरलेल्या दिवशी पावसामुळे होऊ शकला नाही किंवा खेळ सुरू असताना जर त्यात पावसामुळे विघ्न आलं तर दुसऱ्या एखाद्या दिवशी तोच खेळ पुन्हा होईल, अशी ग्वाही आयोजक देतात, त्याला ‘रेन डेट’ म्हणतात.

‘रेन शॉवर’ (Rain-shower). म्हणजे पावसाची जोरदार सर.

‘To know enough to come in out of the rain’ या वाक्संप्रदायाचा अर्थ नकारार्थी आहे. सोपा अर्थ म्हणजे स्वतःचं रक्षण कसं करायचं, यासारखी सामान्य गोष्ट प्रत्येकालाच माहीत असली पाहिजे. दुसरा कोणी तुमच्या मदतीला येईल, त्यानं यावं, ही अपेक्षा न करता आपला बचाव आपल्यालाच करता आला पाहिजे.

‘To rain on (someone's) parade’. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी न होता काही तरी खुसपटं काढून, वेडंवाकडं बोलून, समोरच्याला नाउमेद करणारे जे विघ्नसंतोषी लोक असतात, ते हे काम करतात. They rain on your parade. यांनाच spoil-sport, wet blanket असंही म्हणतात. एखाद्या प्रसंगाची मजा घालवण्याचं ‘पुण्यकर्म’ ही मंडळी करतात!

‘To rain cats and dogs’. वेडावाकडा, आडवा तिडवा, धो धो पाऊस पडणे. या संप्रदायाच्या व्युत्पत्तीबद्दल दुमत आहे. पूर्वीच्या काळी इंग्लंडमध्ये घरांची छप्परं गवताची बनवलेली असत. त्यांना घराच्या आतून लाकडी खांबांचा आणि तुळयांचा आधार दिला जाई. थंडी किंवा पावसापासून आपलं संरक्षण करायला घरातली कुत्री आणि मांजरं या तुळयांवर चढून बसत. पण एखाद्या वेळी जर खूप जोराचा पाऊस पडला, तर गवताच्या छपरातून पाणी वेगानं आत शिरायचं आणि त्याच्या लोंढ्यात ती कुत्री आणि मांजरं पटापट जमिनीवर आपटायची. यावरून हा संप्रदाय तयार झाला, असा एक तर्क आहे. पण याचे विरोधक म्हणतात की, कुत्रा काही मांजरीसारखा खांबांवर चढू शकत नाही. म्हणून ते असा पर्याय देतात की, वेडावाकड्या, आडव्या तिडव्या, धो धो आलेल्या पावसाचा आवाज कुत्रा आणि मांजर यांच्यात होणाऱ्या भयंकर, भेसूर भांडणासारखा येतो. त्यावरून हे असं म्हटलं जाऊ लागलं.

आणि आता ‘रेनमेकर’ (Rainmaker). म्हणजे असा माणूस जो मंत्र तंत्र, जादूटोणा अशा अवैज्ञानिक पद्धतींचा वापर करून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतो. (खूप दिवस पाऊस आला नाही, वरुणराजा रुसला, तर बेडूक आणि बेडकीचं वाजत गाजत लग्न लावून देण्याची प्रथा आपल्याकडे ग्रामीण भागांत अजूनही पाळली जाते. यामुळे पाऊस नक्की येईल, अशी खात्री लग्न लावणारी मंडळी गावकऱ्यांना देतात. हेदेखील असेच कुडबुडे ‘रेनमेकर’च असतात.) आताशा मात्र कृत्रिम पाऊस पाडण्याचे वैज्ञानिक प्रयोग केले जातात. या ‘क्लाऊड सीडिंग’ करणाऱ्या शास्त्रज्ञालादेखील ‘रेनमेकर’ म्हटलं जातं. हा झाला याचा खरा अर्थ.

पण लक्षणार्थानं ‘रेनमेकर’ या शब्दाला आता एक नकारार्थी छटा प्राप्त झाली आहे. भरपूर कमिशन घेऊन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा इतरत्रही बिझिनेस डील जमवून देणाऱ्या, गरजू व्यावसायिकांना भांडवल मिळवून देणाऱ्या, ग्राहक मिळवून देणाऱ्या मध्यस्थांना (दलालांना) ‘रेनमेकर’ असं आजकाल म्हटलं जातं.

यावरून आठवलं - जॉन ग्रायशमच्या ‘रेनमेकर’ या विख्यात कादंबरीवर आधारित फ्रान्सिस फोर्ड कपोला दिग्दर्शित १९९७चा अप्रतिम इंग्रजी चित्रपट आपण बहुतेक बघितलाच असेल. त्यात हीच थीम आहे. असाच आणखी एक सुंदर चित्रपट हिंदीत आहे, ‘थोडासा रुमानी हो जायें’. १९९०मध्ये अमोल पालेकर यांनी नाना पाटेकर, विक्रम गोखले आणि अनिता कंवर यांना घेऊन हा चित्रपट बनवला होता. मात्र यातला रेनमेकर स्वार्थी नसतो, तो पोटार्थीही नसतो, तो लंदफंद धंदे करत नाही. एका नैराश्यग्रस्त, मनोधैर्य खचलेल्या मुलीला तो आशेचा नवा किरण दाखवतो, तिच्यातली क्षमता तिला दाखवून देतो, तिच्या वाळवंटासमान कोरड्या जीवनात उत्साहाचा पाऊस पाडतो. म्हणून तो ‘रेनमेकर’. हा चित्रपट एन. रिचर्ड नॅशच्या ‘The Rainmaker’ या गाजलेल्या नाटकाच्या कथेवर बेतलेला होता, असं म्हणतात! प्रत्येकानं आवर्जून बघावा, असा हा सिनेमा आहे.

भारतीय उपखंड आणि आसपासच्या प्रदेशात वर्षातल्या ठराविक महिन्यांतच पाऊस पडतो. याला ‘मान्सून’ किंवा ‘मान्सूनचा पाऊस’ म्हणतात, असं आपण लहानपणापासूनच शिकतो. लगतच्या समुद्रात तयार झालेले पावसाचे ढग मान्सूनच्या वाऱ्यांसह मे महिन्यात आपल्या देशात दाखल होतात आणि सप्टेंबरपर्यंत त्यांचा येथे मुक्काम असतो. मग त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.

‘मान्सून’ हा शब्द मूळचा अरबी भाषेतला असून ते आणि आपणही त्याला ‘मौसम’ म्हणतो. म्हणजे ऋतू. पण पोर्तुगीज लोकांनी या ‘मौसम’चं ‘मौंसों’ (monção) असं भ्रष्ट रूप तयार केलं आणि इंग्रजांनी त्यालाच ‘मॉन्सून’ बनवलं. हे सांगतानाच ‘हॉबसन-जॉबसन’वाले असंही सांगतात की, पोर्तुगिजांच्या या शब्दाचा युरोपभर प्रवास झाला आणि शेवटी नेदरलंड्समधल्या डच लोकांकडून इंग्रजांनी तो उसना घेतला. काही लोक हाच शब्द ‘अर्ध वर्ष - सहा महिने’ या अर्थानं वापरतात. ‘हॉबसन-जॉबसन’मध्ये या शब्दाचा उपयोग १५०५ पासून होत असल्याची नोंद आहे. ‘ऑक्सफर्ड’ शब्दकोशानुसार मान्सूनचे दोन प्रकार आहेत – एक- ओला (पावसाळी) मॉन्सून, जो नैऋत्येकडून येतो, आणि दुसरा- कोरडा मॉन्सून, जो ईशान्येकडून येतो आणि ऑक्टोबर ते एप्रिल या काळात मुक्काम करतो.

प्राचीन काळापासून काळे ढग, कडाडणाऱ्या विजा, वादळं आणि पाऊस या विषयांवर जगभरातल्या साहित्यिकांनी लेख, कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अक्षरशः हजारोंच्या संख्येत त्यांची गणना करता येईल. सततच्या पावसाला कंटाळलेल्या लहानग्या जॉनीची विनवणीही त्यात आहे - Rain, ran, go away, Little Johnny wants to play. इंग्लंडच्या बेमौसमी आणि बेभरोश्याच्या पावसावर एका चिडलेल्या अमेरिकन माणसानं केलेलं तिखट भाष्य पी. जी. वुडहाऊसच्या ‘The girl on the boat’ या कादंबरीत वाचायला मिळतं.

आपल्यासाठी मात्र पाऊस ही जीवनदायी अमृतधाराच असते. म्हणून तर शास्त्रीय संगीतातही पावसाचा उल्लेख सापडतो. उस्ताद अमीर खानसाहेबांची मेघ मल्हार रागातली ही पेशकश ऐकून ज्याला शांतीचा

अनुभव आला नाही, असा माणूस विरळाच!

बरखा ऋतू आयी

हिंदी चित्रपटांत पावसावरची गाणी शेकड्यांनी सापडतील. त्यातलं सर्वोत्तम म्हणता येईल असं हे एक गाणं बघा – ‘ओ, सजना, बरखा बहार आयी’.

मराठीतलं ‘अंगे भिजली जलधारांनी’' किंवा ‘झिमझिम झरती श्रावणधारा’ ही कर्णमधुर गीते कोण विसरू शकेल?

कवी ग्रेस आणि पाऊस यांचं एक अतूट नातं आहे. त्यांची एक विलक्षण कविता आहे, ‘ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता, मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता’.

आणि शेवटी इंदिरा संत -

नको नको रे पावसा

असा धिंगाणा अवेळी :

घर माझे चंद्रमौळी

आणि दारात सायली;

 

नको नाचू तडातडा

असा कौलारावरून :

तांबे-सतेली-पातेली

आणू भांडी मी कोठून?

 

नको करू झोंबाझोंबी :

माझी नाजूक वेलण,

नको टाकू फुलमाळ

अशी मातीत लोटून;

 

आडदांडा नको येऊ

झेपावत दारातून :

माझे नेसूचे जुनेर

नको टाकू भिजवून;

 

किती सोसले मी तुझे

माझे एवढे ऐक ना :

वाटेवरई माझा सखा

त्याला माघारी आण ना;

 

वेशीपुढे आठ कोस

जा रे आडवा धावत;

विजेबाई, कडाडून

मागे फिरव पांथस्थ;

 

आणि पावसा, राजसा

नीट आण सांभाळून :

घाल कितीही धिंगाणा

मग मुळी न बोलेन;

 

पितळेची लोटीवाटी

तुझ्यासाठी मी मांडीन,

माझ्या सख्याच्या डोळ्यांत

तुझ्या विजेला पूजीन;

 

नको घालू रे पावसा

असा धिंगाणा अवेळी :

घर माझे चंद्रमौळी

आणि दारात सायली.

इंदिरा संत यांच्या या गीताला पुष्पा पागधरे यांनी फार उत्कटतेनं गायलं आहे, असं मी ऐकून आहे. पण जंग जंग पछाडूनही मला आजवर ते रेकॉर्डिंग ऐकायला मिळालेलं नाही. तुम्हाला कुठे आढल्यास मला जरूर कळवा, प्लीज. पुष्पा पागधरे यांचंच आणखी एक पाऊसगीत फार प्रसिद्ध आहे. त्याच्याच पहिल्या दोन ओळी या लेखाचं शीर्षक म्हणून वापरल्या आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आजची पस्तुरी (lagniappe) = आजचा गिफ्ट वर्ड आहे, ‘pogonotrophy’ किंवा ‘पॉगन्ट्रॉफी’. ग्रीक भाषेतून आलेल्या या शब्दातल्या ‘पॉगन’चा अर्थ होतो, दाढी. आपल्या दाढीवर प्रेम करून तिची व्यवस्थित निगा राखण्याच्या क्रियेला ‘पॉगन्ट्रॉफी’ असं म्हणतात. आणि तुम्ही जर दाढी या विषयाचा सविस्तर अभ्यास करून त्यावर एखादा प्रबंध लिहिला असेल तर तुम्ही ‘पॉगनोलॉजिस्ट’ (pogonologist) आहात.

कोणे एके काळी मीही भरपूर मोठी दाढी वाढवली होती. आता मात्र मी अगदी क्लीन शेव्हन म्हणजे ‘glabrate’ (ग्लॅब्रेट) आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......