२०२१ साली लिहिलेली पण २१२१ साली उजेडात येणारी ‘शिरोजीची बखर’ : प्रकरण तिसरे
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 12 June 2021
  • संकीर्ण व्यंगनामा कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus लॉकडाउन Lockdown ऑक्सिजन Oxygen ऑक्सिजन सिलिंडर Oxygen Cylinder

२०२१चे एप्रिल आणि मे हे महिने भारत देशाला अत्यंत वाईट गेल्याचे या बखरीच्या या आधीच्या प्रकरणात सांगितले गेलेच आहे. गंगा आणि यमुना या नदीत करोना-बाधेने मृत्यू पावलेल्या रुग्णांचे देह वाहवले गेले. त्याची छायाचित्रे सर्व जगभर प्रसारित झाली. करोनामुळे जगात सर्वत्र मृत्यू झाले परंतु कुठेच मृतदेह याप्रमाणे वाहवले गेले नाहीत. दैनिक ‘भास्कर’ या वर्तमानपत्राने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगेच्या पात्राचा सर्व्हे केला. आपल्या वार्ताहरांना बोटीमध्ये बसून गंगेतून प्रवास करायला सांगितला. मृतदेह मोजायला सांगितले. त्या सर्व्हेमध्ये गंगेच्या पात्रात किमान दोन हजार मृतदेह वाहत असल्याचे दिसून आले. दैनिक ‘भास्कर’च्या या वृत्तावर खूप गदारोळ माजला. या वृत्ताची जगभर दखल घेतली गेली. नामुष्कीची ही लाट संपते ना संपते, तोच गंगेच्या किनारी पुरल्या गेलेल्या मृतांच्या बातम्या आल्या. गरीब लोकांनी अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे आपल्या जिवलगांचे मृतदेह गंगेच्या किनारी असलेल्या वाळूत दफन केले. या कबरी अत्यंत उथळ खणल्या गेल्या होत्या. खोल खड्डे खणण्यासाठी पैसे असते, तर खोल खड्डे घेतले गेले असते! तेवढेही पैसे नसल्यामुळे जेवढे पैसे होते, तेवढाच खड्डा घेतला गेला. त्यातच मृताला विश्रांती देण्यात आली. मृताला सद्गती देण्याचे जे काम अग्नीचे होते, तेच काम करण्याची विनंती गंगेला केली गेली. मृतदेहांवरची भगवी वस्त्रे त्या वाळूच्या ढिगांवर अंथरली गेली. ती वस्त्रे उडून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या चार टोकांना बांबू रोवले गेले. पण श्वानांना हे कसे कळावे? ती अंथरलेली वस्त्रे फाडून आणि वाळू उकरून ते मृतदेहांपर्यंत पोहोचू लागले. त्याचे फोटो प्रसिद्ध झाले. स्मशानात पेटलेल्या शेकडो चितांचे, विद्युतदाहिन्यांच्या लाल पडलेल्या चिमण्यांचे, चितांच्या सततच्या उष्णतेमुळे लाल झालेल्या स्मशानांच्या लोखंडी ग्रिलची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांच्यावर या भयाण वास्तवाचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. त्यांचे त्यांचे सुरक्षित जीवन निरामयपणे वाहत राहिले. बहुतेकांना लसी मिळाल्या होत्या. लसीचे दोन डोस आवश्यक होते. त्यातला निदान एकतरी डोस त्यांना मिळाला होता. घरात पैसा होता. त्यामुळे लॉकडाऊनचा तसा त्रास नव्हता. संध्याकाळी आपल्या आवडत्या सिरियल्स बघत काळ मजेत चालला होता. त्यामुळे त्यांना त्या भगव्या ढिगाऱ्यांची चित्रे चावायला उठली नाहीत.

एवढ्यात ‘न्यू यॉर्क टाईम्स’मध्ये भारतात किती लोक साथीमध्ये मृत झाले असावेत, याचा अंदाज प्रसिद्ध झाला. कमीत कमी सहा लाख ते जास्तीत जास्त बेचाळीस लाख असा तो अंदाज होता. भारत सरकारचा आकडा तीन लाखाच्या आसपास होता. या बातमीमुळे भारताला कुप्रसिद्धीला सामोरे जावे लागले. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाला तर या बदनामीचा खूप त्रास झाला. लक्षावधी लोक गेले त्याचा झाला नाही, एवढा या बदनामीचा त्रास झाला. भयाण वास्तवाचा कुणा एखाद्याला त्रास झाला नाही तर आपल्याला समजून घ्यावे लागते. कठोर वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याची मानवी मनाची मूलभूत प्रेरणा असतेच. पण, बदनामी आणि कुप्रसिद्धीकडे कुठल्याही संवेदनशील व्यक्तीने कसे दुर्लक्ष करावे?

नाहीतरी हरयाणाच्या भाजप सरकारातील एक मंत्री म्हणालेच होते – ‘जो गुजर गये हैं उनका क्या?’

मंत्री महोदयांचे खरे होते. मृत झालेले भारतीय लोक आता थोडेच भारतीय म्हणून उरले होते? ते लोक गेले होते तरी भारत जिवंत होता.

करोनाची दुसरी लाट जेव्हा थांबेल, तेव्हा थांबणार होती. ही बदनामीची लाट थांबवणे मात्र आवश्यक झाले होते.

अशा सर्व पार्श्वभूमीवर कहर झाला. गंगेच्या किनाऱ्यावरच्या विस्तीर्ण पुळणीवरून एका वृत्तवाहिनीने एक कॅमेरा ड्रोन उडवले आणि खालच्या असंख्य भगव्या ढिगाऱ्यांना चित्रफितीमध्ये अमर केले. त्या भगव्या ढिगाऱ्यांखाली सद्गती पावलेल्या हजारो जिवांच्या मृतदेहांना इतिहासाने केलेला तो स्पर्श होता.

या सगळ्या वार्तांकनाला सोशल मीडियामध्ये भयंकर प्रसिद्धी मिळाली. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्रॅम आणि यू-ट्यूब या मुख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर कहर झाला. प्रचंड टीका, मृतांच्या नातेवाईकांच्या संतप्त पोस्ट, जहाल आणि मर्मभेदी कार्टून यांची एक सुनामी उसळली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तत्कालीन मोदी सरकार आणि मोदीभक्त हैराण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देवापेक्षा जास्त निष्ठा असलेल्या अनेक भारतीयांना ‘मोदीभक्त’ असे नाव पडले होते. असा प्रकार भारतामध्ये पूर्वी कधी झाला नव्हता आणि नंतरही झाला नाही. अनेक मानसशास्त्रज्ञांनी या प्रकारचा छडा लावण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंत हे गूढ संपूर्णपणे उकललेले नाही. इतिहास मात्र आपल्या नेत्यावर आंधळी भक्ती करणाऱ्या या विचित्र लोकांकडे गेली अनेक दशके गालातल्या गालात हसत पाहतो आहे. असो.

भयाण वास्तवापेक्षा बदनामीने जास्त अस्वस्थ होणाऱ्या भक्तांना बघून शिरोजी अस्वस्थ झाला नसता तरच नवल होते. कारण त्याला संध्याकाळच्या भंपक टीव्ही सिरिअल्स पाहून वास्तव विसरण्याचे वरदान मिळालेले नव्हते. कसे मिळणार ते वरदान त्याला? आत्ममग्नतेच्या साहाय्याने संवेदनेला काबूत ठेवण्याचे कसब त्याला साधले नव्हते.

बदनामीने अस्वस्थ झालेल्या सरकारने सोशल मीडियावर नियंत्रण आणणारा कायदा आमलात आणायचे ठरवले आणि भारत देशी चर्चेला उधाण आले. नदीच्या पाण्यावर हिवाळ्यात वाफ तरंगावी त्याप्रमाणे नदीकाठी पुरलेल्या त्या मृतांच्या अस्तित्वावर चर्चेची ही वाफ तरंगत राहिली. शिरोजीच्या लेखनशैलीचा आमच्यावरसुद्धा कळत नकळत परिणाम झाला आहे. त्यामुळेच आमच्या हातून वरील वाक्य लिहिले गेले आहे, हे मर्मज्ञ वाचकाच्या लक्षात आलेले असेलच.

- श्रीमान जोशी, संपादक, ‘शिरोजीची बखर’

..................................................................................................................................................................

‘शिरोजीची बखर’ : प्रकरण तिसरे

‘न्यू यॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्राने भारतात कोविड रोगामुळे किती लोक मृत पावले असावेत, याविषयी अंदाज जाहीर केला. भारत सरकारने तीन लाख लोक कोविडमुळे मृत झाले असे जाहीर केले होते. ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने संख्याशास्त्रावर आधारित तीन मॉडेल्स केली. पहिल्या मॉडेलच्या अंदाजानुसार भारतात कमीत कमी ६ लाख लोक गेले असावेत असा अंदाज केला गेला. दुसऱ्या मॉडेल अनुसार १६ लाख लोक गेल्याचा अंदाज केला गेला आणि तिसऱ्या मॉडेलप्रमाणे ४२ लाख लोक गेल्याचा अंदाज केला गेला.

भारतात कोविडने मृत झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या नोंदी ठेवण्यात अनेक अडचणी होत्या.

एक म्हणजे, भारतात प्रत्येक ‘डेथ सर्टिफिकेट’वर मृताच्या मृत्यूचे कारण नोंदवले जात नाही. दुसरे म्हणजे, ग्रामीण भागात लोक डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच मृत्यू पावतात. तिसरी गोष्ट अशी की, आपली प्रिय व्यक्ती कोविडने गेली ही ‘अपमानास्पद’ बाब लपवण्याकडे भारतीय लोकांचा कल असतो. चौथी गोष्ट अशी की, अनेक राज्य सरकारांचा मृतांचा आकडा लपवण्याकडे कल असतो. उदाहरणार्थ, गुजरात सरकारने आदेश काढला होता की, मृत्यूचे प्राथमिक कारण कोविड असेल तरच कोविडने मृत्यू झाला आहे, असे सर्टिफिकेट द्यावे. म्हणजे, कोविड झालेल्या व्यक्तीस डायबेटिस वगैरे आजार असतील तर ती व्यक्ती कोविडमुळे न जाता डायबेटिसमुळे गेली अशी नोंद करावी.

त्यामुळे भारत सरकारने जाहीर केलेली आकडेवारी खऱ्या संख्येपेक्षा अनेकदा बरीच कमी असते.

शिवाय, भारतात लोकसंख्येच्या मानाने अत्यंत कमी टेस्ट केल्या जातात. अमेरिकेत दहा लाख लोकांमागे साधारणपणे दोन लाख लोकांच्या टेस्ट केल्या गेल्या. भारतात हा आकडा १८ हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे नक्की किती लोक कोविडने आजारी पडले हेच मुळी माहिती होणे अशक्य झाले. ग्रामीण भागात तर कित्येक लोक आपल्याला कोविड झाला आहे, हे कळण्याआधीच कोविडने मृत्यूमुखी पडले.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या सगळ्या गोष्टींमुळे भारतातील रुग्णांचे प्रमाण भारत सरकारला माहीत असलेल्या संख्येच्या किमान २० पट असावे असा अंदाज ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने वर्तवला. रुग्णसंख्या वीस पट असेल आणि दर शंभर रुग्णांमागे ०.३० टक्के लोक दगावले असे जर गृहीत धरले तर किमान १६ लाख लोक दगावले असावेत, असा अंदाज केला गेला. रुग्णसंख्या जर २६ पट असेल आणि दगावण्याची टक्केवारी ०.६० धरली तर भारतातील मृतांची संख्या ४२ लाख होते.

हे सगळे जाऊ द्या, किमान सहा लाख लोक तरी गेले असावेत असा अंदाज ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने वर्तवला.

त्याच्या या अंदाजांवर मोदीभक्त अविनाश आणि अच्युत अत्यंत चिडले होते. त्यांना नको ते प्रश्न विचारून अडवायला समर आणि भास्कर हजर होतेच. या परिस्थितीत चर्चेची ठिणगी पडायला कितीसा वेळ लागणार होता?

अविनाश - बंदी घालायला पाहिजे या पेपरवर.

समर - कुणाकुणावर बंदी घालणार आहात? आणि का?

अविनाश - भारताची बदनामी करतायत हे लोक.

समर - भारतात मृतांचे अंडररिपोर्टिंग होते आहे, याची जी कारणं दिली आहेत, ती खोटी आहेत का?

अच्युत - खरी असतील, नाहीतर खोटी, यांना चोंबडेपणा करायची काय गरज आहे?

समर – अरे, त्यांचे काम आहे बातम्या देणे.

अच्युत - तुमच्या देशातल्या बातम्या द्या म्हणावे. भारताविरुद्ध कट-कारस्थानं करण्याची गरज नाहिये.

समर - मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण ‘सुपरपॉवर’ होतो आहे, हे सहन होत नाहीये त्यांना.

भास्कर – अरे, आपण ‘सुपरपॉवर’ होतो आहे वगैरे बोलायला हरकत नाही, पण थोडं थांबून बोला ना प्लीज. गंगेत वाहणारे मृतदेह जरा विस्मरणात तरी जाऊ दे लोकांच्या.

अच्युत - तू तुझ्यातली ‘निगेटिव्हिटी’ थोडी कमी कर.

भास्कर - तुम्हाला भारताच्या वेदना थोड्या कमी करता आल्या तर पाहा ना पहिल्यांदा. मग आपण ‘पॉझिटिव्हिटी’ वगैरे बोलू.

अच्युत - मग तू अमेरिकतल्या निगेटिव्ह गोष्टीसुद्धा बघ. तिथे ‘गन कल्चर’ आहे. निष्पाप लोक मारले जातात तिथं ‘हेट शूटिंग्ज’मध्ये. 

समर - पण मग त्या ‘शूटिंग डेथस्’च्या बातम्या दिल्या म्हणून ‘न्यू यॉर्क टाईम्स’वर कुणी बंदी घालत नाही.

अविनाश - तिथं मोदीजी असते तर निश्चित घातली असती बंदी.

भास्कर - (भयंकर हसतो)

अविनाश - हसतोस काय? खरंच घातली असती. आणि शिवाय ती शूटिंगसुद्धा बंद पडली असती.

समर - त्या आधी मोदीजींना म्हणावं पेट्रोलचे भाव कमी जरा कमी करा की थोडेसे.

भास्कर - ते नाही जमणार त्यांना.

अच्युत - मोदीजी मनात आणलं तर सगळं करू शकतात.

समर - एलपीजी गॅसचा भाव कमी करा म्हणावं थोडा.

अविनाश - करतील. नक्कीच करतील. भारताच्या हिताचं असेल तेव्हा नक्कीच करतील.

समर - म्हणजे आत्ता जी महागाई झाली आहे, ती आपल्या सगळ्यांच्या हिताची आहे?

अविनाश - नाना सांगत होते की, ऊर्जस्वल भारताची ताकद अशी एकदम दाखवायची नाहीये जगाला. काँग्रेस पक्षानं सगळा भारत जर्जर करून टाकला आहे. त्यातून आपण हळूहळू सक्षम होऊ. आपण सक्षम झालो की, आपली ताकद दाखवायला सुरुवात करायची.

समर - अच्छा, म्हणजे आपली ताकद जगाला दिसू नये म्हणून ही महागाई केली गेली आहे का मुद्दाम? 

अविनाश - तू तुला पाहिजे ते समज. भारत ‘सुपरपॉवर’ झालेला दिसणार आहे, अचानक सगळ्यांना एके दिवशी. मग मिर्ची लागणार आहे तुम्हा लोकांना. 

भास्कर - कधी होणार हे सगळं? एकदा सांगा आम्हाला.

अच्युत - सगळं प्लॅनिंग तयार आहे. वेळ येताच कळेल.

समर – अरे, हसतायत भारताला जगभर. ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणवून घेतलंत स्वतःला आधी. हातातली सहा कोटी व्हॅक्सिन देऊन टाकलीत जगाला मोठेपणा मिळवायला. मग अचानक आली रोगाची सेकंड वेव्ह, तेव्हा व्हॅक्सिनच उरली नव्हती तुमच्याकडे. आता जगभर विचारत फिरताय कुणी ‘व्हॅक्सिन देता का व्हॅक्सिन?’ म्हणून.

अच्युत - फार ‘निगेटिव्हिटी’ भरली आहे तुमच्यात. मोदी ही काय चीज आहे कळणार नाही तुम्हाला कधी.

समर - (हसत) केवढी चेष्टा होते आहे आपली!

अविनाश - जे परदेशी लोक हसतायत ना ते हसताना दचकतायत मनामध्ये. मोदीजी या हसण्याची किंमत आपल्याला भरायला लावणार याची भीती वाटतेय त्यांना.

(समर आणि भास्कर भयंकर हसतात)

अच्युत - हसा तुम्ही. सगळं जग मोदीजींना घाबरून आहे. आणि दुर्दैव असं की, भारतातल्याच काही लोकांना त्यांची किंमत नाही.

अच्युत - म्हणून तर ‘नेट कायदा’ आणला आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम आणि यू-ट्यूब यांच्या नाड्या आवळल्या आहेत मोदीजींनी.

समर - जगभर आणि भारतातही चेष्टा व्हायला लागली भयंकर म्हणून ‘नेट कायदा’ आणला आहे.

भास्कर - असलं काही करण्यापेक्षा राज्यकारभार चांगला करा. पेट्रोल, डिझेल आणि इतर सगळी भाववाढ कमी करा. कुणी हसणार नाही तुम्हाला. 

समर - राज्यकारभाराची बोंब झाली की, कार्टून येतच राहणार.

अविनाश - काय बोलतोस काय तू? राज्यकारभार उत्कृष्ट चालला आहे.

भास्कर - गंगेतली प्रेतं तसं काही म्हणत नव्हती वाहताना.

अच्युत - किती निगेटिव्ह आहेस तू! शी!

अविनाश - तू त्या प्रेतांना मिठ्या मारून बसू नकोस. ते लोक परत येणार नाहीयेत आता. नाना म्हणत होते की, नियतीने आपल्या मार्गात आणलेलं एक विघ्न होतं ते. विसरून जायचं ते. गंगेतले लोक, चितांवर गेलेले लोक, दफन झालेले लोक, सगळं सगळं सोडून द्यायचं आपण. गंगेच्या हवाली करायचं सगळं. झालं गेलं गंगेला मिळालं! आता आपण भूतकाळ विसरून भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या विचार करायचा. त्यासाठी मोदीजींच्या मागे उभं राहायचं.

अच्युत – अरे, शतकाशतकात एखाद्या वेळेला असा नेता मिळतो देशाला.

अविनाश - बंद करा, ट्विटर. बंद करा फेसबुक. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम, यू-ट्यूब सगळं बंद करा. सगळे पेपरसुद्धा बंद करा. फक्त ‘रिपब्लिक टीव्ही’ चालू ठेवा.

(‘रिपब्लिक टीव्ही’ नावाचा मोदीभक्ती करणारा एक न्यूज चॅनेल तेव्हा मोदीभक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. अर्णब गोस्वामी नावाचे एक गृहस्थ हा चॅनेल चालवत. नरेंद्र मोदी पायउतार झाल्यावर हा चॅनेल बंद पडला. श्री अर्णब गोस्वामी यांचा वृद्धापकाळ कोर्टातील विविध केसेस लढण्यात आणि तुरुंगातून आतबाहेर करण्यात व्यतीत झाला. - संपादक)

समर - तुम्हाला बंदच करायचा आहे सगळा मीडिया. 

अच्युत - आहेच. या सोशल मीडियाने हैदोस घातला आहे. प्रज्वला केस माहीत आहे ना? प्रज्वला या समाजसेवी संस्थेने दाखवून दिलं आहे की, रेपचे व्हिडिओ प्रसारित करतात हे लोक.

भास्कर - कोण करतं असं? ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम आणि यू-ट्यूब?

अच्युत - ते नाही करत, पण त्यांचे प्लॅटफॉर्म वापरून हे सगळं केलं जातं. बंद केले पाहिजेत हे सगळे मीडिया.

भास्कर – अरे, बसमधून चांगल्या लोकांबरोबर खुनी लोकसुद्धा प्रवास करतात म्हणून बंद करायच्या का बसेस? 

अच्युत – अरे, बस कशाला बंद करायच्या? पोलीस नाहीत का खुनी पकडायला?

भास्कर - मग घाणेरडे व्हिडिओ जे पसरवतात, त्यांना अटक करा पोलिसांकरवी. मीडियाला का त्रास देताय? चांगले मेसेजेस येत नाहीत का व्हॉट्सअॅपवर?

अविनाश - फार निगेटिव्ह आहात तुम्ही लोक. काही उपयोग नाही या चर्चेचा.

अच्युत - एन्क्रिप्टेड असतात हे मेसेजेस. कसं करणार अटक? पहिला मेसेज कुणी पाठवला, हे कळलंच पाहिजे सरकारला.

भास्कर - समज, तुझा एखादा सीक्रेट मेसेज एखाद्या सायबर सेलच्या ऑफिसरने वाचला तर तुला चालेल का?

अच्युत यावर चरकला. आदल्याच दिवशी त्याच्या टॅक्स कन्सल्टंटने टॅक्स कसा चुकवायचा याचा प्लॅन त्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. त्यावर त्याने ‘थम्स अप’सुद्धा पाठवला होता. अच्युतने आवंढा गिळला.

अविनाशची केस तर फारच नाजूक होती. तो नुकताच एका अफेअरमध्ये गुंतला होता. ते सगळे गोड मेसेजेस कुणी वाचलेले त्याला चालणार नव्हते.

अविनाश - मोदीजींना कुणाच्या व्यक्तिगत जीवनात कशाला इंटरेस्ट असेल?

समराला अविनाशच्या अफेअरचा पुसटसा अंदाज होता, म्हणून तो हसत म्हणाला -

समर - मी ऑफिसर असेन तर मला कुणाची ‘लव्ह लेटर्स’ वाचायला फार आवडतील. त्याला ब्लॅकमेल करायलासुद्धा आवडेल.

अच्युत - हा गुप्ततेचा मुद्दा सोडवता येईल. मोदीजी सोडवतील तो. कोण कसा टॅक्स रिटर्न भरतो आहे अशा छोट्या गोष्टीत त्यांना कशाला रस असेल? करतील ते सगळं योग्य पद्धतीने.

भास्कर - (हसत) फेसबुक, व्हॉट्सअॅप यांना आता कोणी थांबवू शकत नाही. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप जर बंद पडलं ना तर वेडेपिसे होतील लोक. पाडतील मोदीजींना.

समर - भारतात रोज किती व्हॉट्सअॅप मेसेजेस जातात माहिती आहे का तुला?

अविनाश - किती?

समर - किमान एक हजार कोटी. कोणी काही करू शकत नाही त्याविरुद्ध.

अविनाश - पण घाबरले आहेत व्हॉट्सअॅपवाले मोदीजींना. ‘नेट कायद्या’प्रमाणे त्यांनी अधिकारी नेमले आहेत मेसेजेसवर नजर ठेवायला.

समर - रोजच्या एक हजार कोटी मेसेजेसवर लक्ष ठेवायला तीन अधिकारी?

भास्कर - फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला माहिती आहे, त्यांना कोणी अडवू शकत नाही.

अविनाश - मोदीजी एन्क्रिप्शन ब्रेक करायला लावणार व्हॉट्सअॅपला.

भास्कर - करा. लोक ‘नॉर्ड’सारखे ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ वापरायला सुरुवात करतील. 

अच्युत - म्हणजे?

भास्कर - एक वेगळंच नेटवर्क. तुझा फोन नंबर वापरून तू पाठवलेला मेसेज शोधता येणार नाही, हे नेटवर्क वापरलं की. बसा बोंबलत.

समर - व्हॉइप नंबर घ्यायचा आणि.

अच्युत - व्हॉइप नंबर म्हणजे?

भास्कर - व्हॉइस ओव्हर आयपी नंबर. हा नंबर तुम्हाला मिळाला की, तुम्ही तुमच्या फोनवरून कुठेही बोलू शकता. तुमचा नंबर आणि तुमचा फोन यांचा संबंध राहत नाही. कुणी तुम्हाला शोधू शकत नाही. चीनचे सरकारसुद्धा हतबुद्ध झाले आहे या ‘नॉर्ड’पुढे.

अविनाश - मोदीजी शोधतील बरोबर. नॉर्डला सरळ करतील. मोदी हैं तो मुमकिन हैं!

अच्युत - मोदीजी चीनपेक्षा भारी आहेत.

समर - बघू आपण.

ही चर्चा सुरू असताना अविनाश आणि अच्युत दोघांनीही मनातल्या मनात व्हॉइप नंबर घेऊन टाकायचे ठरवले. त्यांनी विचार केला की, आपण काही ‘देशद्रोही’ आणि पाकिस्तानधार्जिणे मेसेजेस पाठवत नाही. त्यामुळे आपण गुप्त नंबर वापरायला काहीच हरकत नाही. त्यांचेही बरोबर होते. अफेअर करणे किंवा टॅक्स थोडा कमी भरणे म्हणजे काही ‘देशद्रोह’ नाही.

भास्कर - मग आता प्रश्न येतो की, हा नेटविषयक कायदा नक्की काय साधणार आहे.

समर - नोटबंदीने जे साधले तेच.

भास्कर - मोठी चर्चा होणार. मोठ्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विजय मिळवल्याचे डंके पिटले जाणार. बाकी रिझल्ट शून्य!

समर - अच्युत आणि अविनाशला उन्मादात ओरडणायची संधी मिळणार – ‘मोदी है तो मुमकिन हैं’.

अविनाश - बघाल तुम्ही. मोदीजींच्या पायावर लोटांगण घालत येणार हे सोशल मीडियावाले.

समर - ते कसले घाबरतायत. त्यांनी त्या संबित पात्राच्या आणि भाजपच्या मंत्री लोकांच्या ट्विटला ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ असे टॅग लावले.

(संबित पात्रा हे भाजपचे प्रवक्ते होते. त्यांच्यावर ट्विटरने सातत्याने खोटेपणाचे शिक्के मारले. खोटे आणि फेरफार केलेले व्हिडिओ पसरवणारी व्यक्ती म्हणून या पात्रा महाशयांची या काळात फार बदनामी झाली होती. - संपादक)

अविनाश - ट्विटरवाले कोण आहेत संबित पात्राचे व्हिडिओ आणि फोटो खोटे ठरवणारे? आमची न्यायालये आहेत ना?

भास्कर - म्हणजे कोर्टाने पाच वर्षांनी निर्णय देईपर्यंत तुमचे खोटे व्हिडिओ त्यांनी त्यांच्या साईटवर ठेवायचे काय?

अविनाश - मग? खरं खोटं ठरायला नको का?

भास्कर - मग इतर व्हिडिओ आम्ही तक्रार केल्यावर लगेच काढा असा सरकारचा आग्रह कशासाठी? तेसुद्धा कोर्टाला ठरवू द्या.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अच्युत - सरकार सगळे ठरवणार. लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे.

भास्कर - सरकारला लोकांनी निवडून दिलेले असले तरी सरकारवर घटनेचा विश्वास नसतो. म्हणून घटनेने सुप्रीम कोर्ट दिले आहे सरकारवर लक्ष ठेवायला.

अविनाश - घटना आणि कोर्ट मोदीजींचं ऐकणार नसेल तर अवघड परिस्थिती होणार आहे भारताची.

भास्कर - (हसतो) हे वाक्य ऐकू येणारच होते भारत देशात कधीतरी.

ही चर्चा अशीच सुरू राहिली. एप्रिल आणि मे महिन्यात कोविडने भारतात जे काही केले, ते पुसून टाकण्याचा आतोनात प्रयत्न केला गेला. हे प्रयत्न तसे व्यर्थ होते. कारण सामान्य माणूस तसेही सगळे विसरून जाणार होता. भावनिक ट्रॉमा विसरून जाणे ही सामान्य माणसाची भावनिक गरजच असते. साहित्य मात्र काहीच विसरत नाही. इतिहास तर नाहीच नाही.

..................................................................................................................................................................

(शिरोजीने किती योग्य लिहिले होते. आज शंभर वर्षानंतर ही बखर त्या हैराण काळाचा सगळा इतिहास घेऊन आपल्यासमोर उभी राहिली आहे. शिरोजीची बखर हे साहित्यही आहे आणि इतिहाससुद्धा आहे. आज २१२१मध्ये भारत देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य आहे, असे मान्य केले गेले आहे. देश व्यक्तीसाठी असतो, व्यक्ती देशासाठी नसते - हा विचारसुद्धा आज सर्वमान्य झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याची कुठल्याही सरकारची आज हिंमत होणार नाही भारत देशामध्ये. भारत आज या स्थितीला पोहोचला आहे, याचे सर्व श्रेय भास्कर आणि समर यांच्यासारख्या असंख्य भारतीयांना आहे. या लोकांनी वेळोवेळी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात न कंटाळता चर्चा करून करून जनमत स्वातंत्र्याच्या बाजूला वळवले. व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने हे लोक कित्येक वैचारिक वादळात सातत्याने उभे राहिले. करोनासारख्या संकटातसुद्धा या लोकांनी लोकशाहीवरची आपली निष्ठा ढळू दिली नाही.

- श्रीमान जोशी, संपादक, ‘शिरोजीची बखर’)

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......