मुद्दा, कुणी पक्ष सोडण्याचा नाही!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • राहुल गांधी, काँग्रेसचे बोधचिन्ह आणि जितीन प्रसाद
  • Sat , 12 June 2021
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress भाजप BJP राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi जितीन प्रसाद Jitin Prasada

जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून फार काही आभाळ कोसळलं आहे, असं समजण्याचं कारण नाही. कारण पक्षांतरं आता भारतीय राजकारणाचा अविभाज्य अंग झालेली आहेत. एखाद्या नेत्यानं पक्षांतर केलं हा मुद्दा नसून आता तरी काँग्रेस पक्ष खडबडून जागा होणार का नाही, हा खरा मुख्य मुद्दा आहे. सध्या काँग्रेसची एकूणच अवस्था अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी झालेली आहे. त्या भळाळत्या जखमेवर उपचार करायला काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी तयार नाहीत.

जितीन प्रसाद काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. म्हणजे त्यांचे सर्व समर्थक भाजपमध्ये गेले आहेत, असं नाहीत. एखादा नेता पक्षांतर करतो म्हणजे त्याच्या जाती-धर्माची सर्व मतं दुसऱ्या पक्षाकडे वळतात, असा जो दावा केला जातो, त्यात काही तथ्य नसतं. कोणत्याच जाती-धर्माची शंभर टक्के मतं कोणत्याच एका पक्षाच्या बाजूनं कधीच नसतात. जितीन प्रसादसारख्या नेत्यांच्या पक्षांतरातून प्रश्न निर्माण होतो की, त्यांनी पक्ष का सोडला? इतकी वर्षं काँग्रेसवर असणारी निष्ठा एका रात्रीत का बदलली? काँग्रेस नेते शशि थरुर यांनी छान म्हटलंय की, “पक्षांतर म्हणजे काही आयपीएलचा खेळ नव्हे.’’ (जितीन प्रसाद यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घाव शशि थरुर यांच्या फारच वर्मी बसला असल्याचं त्यांच्या लेखातून दिसतं आहे!)   

भारतीय जनता पक्षाला पर्याय उभा करण्यात काँग्रेसला यश आलेलं नाही, हा मुद्दा आहे. किमान भाजपला पर्याय म्हणून उभं राहावं, यासाठी सर्व मरगळ झटकून टाकून सर्व शक्तिनिशी उभं राहावं, याचंही सोयरसुतकं एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसला आहे, असं अलीकडच्या काळात दिसलेलं नाही. लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाला वाटतं की, कोणत्याही एका पक्षाची निरंकुश सत्ता देशात नसावी; त्या सत्तेवर विरोधी पक्षाचा प्रभावी अंकुश असावा म्हणूनच भाजपला एक सशक्त पर्याय देशात उभा राहिला पाहिजे. (पूर्वी असा पर्याय काँग्रेसला निर्माण व्हावा असं या गटाला वाटत असे.) तो पर्याय म्हणून गेली आठ- दहा वर्ष भारतीय लोकशाहीविषयी आस्था असणारे हे लोक काँग्रेसकडे बघत आहेत आणि काँग्रेस मात्र आस्थेनं बघणाऱ्या या लोकांचा अपेक्षाभंग करत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या निमित्तानं लोकांच्या आणि काँग्रेसमधीलही अनेकांच्या मनात प्रश्न हाच आहे की, काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या क्रायसिसमधून आधी मुक्त व्हावा. तशी गांधी कुटुंबाची तरी इच्छा आहे की नाही? सोनिया गांधी यांच्या अलिकडच्या कोणत्याही निर्णयातून तसं दिसत नाही. पक्षावरची पकड किंचितही ढिली करायला त्या तयार नाहीत आणि पक्षात गांधी घराण्याला पर्याय देईल असं नेतृत्वही उभं राहायला तयार नाही.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी अलिकडच्या दीड-दोन दशकात खूप काही चांगलं आणि वाईटही बोललं गेलेलं आहे, अजूनही बोललं जातं. विरोधकांनी त्यांच्यावर टोकाची टीका केलेली आहे, तर समर्थकांनी त्यांचं अतिसमर्थन केलं आहे. लोकशाहीविषयी आस्था असणाऱ्या लोकांनी राहुल गांधी हा भाजप आणि नरेंद्र मोदी यांना एक पर्याय असू शकतो, असं मत प्रदर्शन केलेलं आहे. मात्र राहुल गांधी स्वत:सुद्धा असा पर्याय म्हणून उभा राहण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. पक्षातीलही सर्व बुजुर्ग नेत्यांना एकमतानं राहुल गांधी हे पर्याय वाटत नाहीत. त्यामुळे पक्षात सतत कुरघोडीचं राजकारण सुरू आहे परिणामी कोणाचा पायपोस कुणात उरलेला नाही असं चित्र आहे. त्याला कंटाळून राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक असलेले ज्योतिरादित्य शिंदे आधी गेले, आता जितीन प्रसाद गेले... आणखी काही जातील. 

जितीन प्रसाद यांनी पक्षांतर केल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेलं मतप्रदर्शन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी जरा गंभीरपणे घ्यायला हवं, असं कितीही म्हटलं, तरी तसं घडणार नाही, अशीच या पक्षाची अलीकडच्या काळातली वाटचाल राहिलेली आहे.

वीरप्पा मोईली हे काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. ‘काँग्रेसवर आता एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे. वीरप्पा मोईली यांच्या म्हणण्यामध्ये निश्चितचं तथ्य आहे, पण अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी वीरप्पा मोईली पुढाकार का घेत नाहीत, हाही एक कळीचा मुद्दा आहे. एकटे वीरप्पा मोईलीच कशाला काँग्रेसमध्ये कथित बंडाचा झेंडा घेऊन उभे असलेले २३ नेतेही गांधी घराण्याला सक्षम पर्याय देऊ शकतील, या दिशेनं काही कृतिशील आहेत असं काही दिसत नाही. नुसतीच पत्रकं काढायची आणि प्र्त्यक्षात काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनीच पक्षाच्या नेतृत्व पदी कायम राहावं, अशी गुळमुळीत भूमिका हा २३ नेत्यांचा गट घेत असतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण यापैकी एकही नेता त्यांच्या राज्यापुरता तर सोडाच, पण गेला बाजार त्यांच्या लोकसभा मतदार संघापुरता स्वयंभू नाही. या नेत्यांसाठी कठोर शब्द वापरतो, असे ‘बाजारबुणगे’ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पर्याय उभा करू शकतील, अशी कोणतीही शक्यता नाही.

श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कालखंडापासून ‘गांधी’ नावाच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आणि नेत्यांनी अवलंबून राहावं, सत्ता मिळवावी, सत्ता उपभोगावी अशी एक मानसिकता तयार झालेली आहे. त्या मानसिकतेच्या बाहेर हे २३च काय पण काँग्रेसचे देशभरातील कुणीही नेते येऊ शकतच नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाची ही विकलांगी  वाटचाल अशीच चालू राहणार आहे, असं म्हणण्याशिवाय आता प्रत्यव्याय उरला नाही.

भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे, हा जितीन प्रसाद यांच्या पक्षांतराचा आणखी एक अर्थ आहे. ज्या ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असतात, तिथे दोन-तीन वर्षं आधी निवडणुकांची तयारी सुरु करण्याची भाजपाची एक रणनीती असते. त्यानुसार अन्य पक्षातील जमतील तेवढे दिग्गज किंवा गणंग नेते भाजपामध्ये ओढून आणण्याचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा प्रयत्न असतो. तसाच प्रयत्न उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकींच्या जितीन प्रसाद यान फोडून करण्यात आलेला आहे.

काँग्रेस पक्ष असा विकलांग झालेला असताना आपल्या देशाचं राजकीय चित्र काय असू शकतं? या स्तंभातून अलीकडच्या काळात लेखन करत असताना भाजपला अ-राजकीय पर्याय उभा राहू शकत नाही असं प्रतिपादन केलं होतं. लोकशाहीविषयी संवेदनशील असणार्‍यांनी त्या संदर्भात मतप्रदर्शन केलेलं आहे आणि त्यापैकी बहुतेकांना अ-राजकीय पर्याय अमान्य आहे, हे स्पष्टपणे दिसतं आहे. मग काँग्रेस व्यतिरिक्त भाजपला कोणता पर्याय असा प्रश्न जर कोणाच्या मनात आला तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्ष विरुद्ध भाजप असं एक राष्ट्रीय (?) राजकीय चित्र निर्माण होण्याची असू शकते.

ओरिसात बिजू जनता दल नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे उभा आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड काबीज करून भाजपला जबरदस्त चपराक लगावलेली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी ठोस अस्तित्व राखून आहे. तामीळनाडूत अण्णा द्रमुक आणि अखिल भारतीय अण्णा द्रमुक असे दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातले पर्याय पुरेसे स्पष्ट झालेले आहेत. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आहे. आज भाजपसोबत असले तरी नितीश कुमार येत्या निवडणुकीत भाजपची साथ सोडतील अशी चिन्हे आहेत. देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये हे असे प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय म्हणून उभे राहू शकतात.

प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत किंवा त्यांचं एका नेतृत्वाखाली येणं, हे कचकड्याच्या बाहुलीसारखं वाटत असलं, तरी त्या त्या राज्यात हे पक्ष पुरेसे प्रभावी आहेत याबद्दल काहीही दुमत नाही. प्रादेशिक पक्षाच्या अनेक मर्यादा आहेत, तसेच लाभही आहेत. प्रादेशिक टोकदार अस्मितांना खतपाणी घालून या पक्षांनी आपआपल्या राज्यांमध्ये हातपाय पसरले आहेत आणि या सर्व राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष अतिशय कमकुवत असल्यामुळे भाजपला त्या त्या राज्यांमध्ये हे प्रादेशिक पक्षच सध्या पर्याय ठरू शकतात. अशा परिस्थितीत भावी चित्र हे प्रादेशिक पक्ष विरुद्ध भाजप आणि विकलांग झालेला, पण देशभर अजूनही धुगधुगी असलेला काँग्रेस पक्ष, असं असू शकतं. अर्थात नेतृत्वाच्या मुद्द्यावरूनही समीकरणं केव्हाही बिघडू शकतात, म्हणूनच या सर्वांना एका बळकट धाग्यात बांधून ठेवणारा पक्ष काँग्रेस आहे, हे युपीएच्या प्रयोगानं सिद्ध केलंय, पण आजच्या घटकेला काँग्रेस असं काही घडवून आणण्याच्या परिस्थितीत नाहीये आणि हीच बाब भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडलेली आहे. 

महाराष्ट्राचा अपवाद असा वर उल्लेख केला आहे, त्याचं एक कारण महाराष्ट्रात कोणताही प्रादेशिक पक्ष राज्यव्यापी प्रभावी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना हे विधान फारसं रुचणार नाही, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की, गेल्याच आठवड्यामध्ये २२वा वर्धापन दिन साजरा केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रभर प्रभाव निर्माण करता आलेला नाही. राष्ट्रीय पातळीवर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन शरद पवार यांनी बाहेर पडण्याची हिंमत दाखवली, तेव्हा त्यांना देशभरातून पाठिंबा मिळतो आहे, असं जाणवत होतं; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस कायमच केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली, याबद्दल शंकाच नाही.

दुसरा भाग असा की, नवीन पटनायक, मुलायमसिंग यादव, ममता बॅनर्जी, मायावती आता स्टॅलिन, अशा अनेक प्रादेशिक नेत्यांप्रमाणे राज्यात एकहाती बहुमत मिळण्यात गेल्या ४० वर्षांत यश आलेलं नाही, ही शरद पवार आणि आधी बाळासाहेब ठाकरे व आता उद्धव ठाकरे यांची ही फार मोठी मर्यादा आहे. शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीच्या संदर्भामध्ये नेहमीच संभ्रम असतो आणि आज शिवसेना आणि काँग्रेससोबत असणारे शरद पवार भाजपसोबतही जाऊ शकतात, असे सावट कायमच दाटून आलेलं असतं. आज हवेत असणारी चर्चा आहे, पण उद्या जर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं ऑफर दिली तर, ती शरद पवार ते नाकारतीलच याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शिवसेना ही काही मराठी माणसांची अस्मिता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी हा पक्ष सांभाळलाही अतिशय व्यवस्थित आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र अलीकडे ज्या काही राजकीय तडजोडी उद्धव ठाकरे यांनी केल्या, त्यामुळे पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये एकमुखी असेल, गेला बाजार सत्ता स्वबळावर स्थापन करण्याइतकं असेल, असं म्हणणं शुद्ध भाबडेपणाचं ठरेल, यात शंकाच नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या भेटीकडेही या शक्यताचंही धुकं निर्माण झालेलं आहे. त्यातूनच शिवसेनेच्या भविषयाकडे बघायला हवं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या आसपासच महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होईल. तूर्तास मात्र हे चित्र भाजपेतर पक्षासाठी फारसं काही समाधानकारक नाही.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......