अजूनकाही
जून महिना उजाडलाय. आपले शैक्षणिक वर्ष याच महिन्यात सुरू होते आणि उन्हाळी सुट्टीनंतर शाळाही याच महिन्यात सुरू होतात. मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षाची परिस्थितीही अतिशय गंभीर आहे. आपल्या देशाला लागलेले करोनाचे ग्रहण अजूनही सुटलेले नाही. म्हणून विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही या वर्षीतरी शाळा सुरू होणार की नाही, अशा संभ्रमावस्थेत आहेत.
देशवासीयांनी खूप टाळ्या आणि थाळ्या पिटल्या, उजेड दाखवला, परंतु करोनाने कसल्याही खुळचट कल्पनांना भीक घातली नाही. सदरील महामारीने कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संपूर्ण देशाला कवेत घेतले असताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सीबीएसई, आयसीएसई आणि देशभरातील विविध राज्यातील १०वी, १२वीच्या परीक्षा एकतर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
भारतीय शिक्षणव्यवस्थेत शालेय, महाविद्यालयीन परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया अपूर्ण आहे, तशाच प्रकारे परीक्षेशिवायही ही प्रक्रिया अपूर्ण आहे, असा चुकीचा गैरसमज आहे. राज्यसंस्थेने ठरवून दिलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाखेरीस किती लक्षात ठेवला आहे, याचा तपास करण्यासाठी मूल्यमापनाच्या नावाखाली परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांचे स्वरूप लेखी आणि तोंडी अशा प्रकारचे असते. दुर्दैवाने या परीक्षा घोकंपट्टीवर आधारलेल्या असल्याने आपण वर्षभर काय शिकलो, हे आठवण्यात मुलांचा चांगलाच कस लागतो. तरीही ही परीक्षा पद्धती भारतीय शिक्षणव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि त्याआधारे विद्यार्थ्यांची प्रगती ठरवली जाते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
खरे तर मुलांचा सर्वांगीण विकास वाढीस लावण्यासाठी शैक्षणिक मूल्यमापन ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अध्ययन-अध्यापनावर, शिक्षणप्रक्रियेच्या दर्जावर आणि परिणामी एकंदर शैक्षणिक व्यवस्थेवरसुद्धा परिणाम करत असते, असे महाराष्ट्र शासनाच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये नमूद केलेले आहे. हा टप्पा मुलांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा असतो. मुलांना विविध प्रकारच्या मूल्यमापनाद्वारे आपण कुठून कुठे पोहचलो, आपल्यात काय बदल झाले आहेत, हे कळते. म्हणून रटाळवाणे मूल्यमापन टाळायला हवे. परंतु फक्त लेखी आणि तोंडी परीक्षेद्वारे मुलांची प्रगती तपासून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, याचे कुणालाही देणेघेणे नाही.
आपल्या देशातील पारंपरिक परीक्षा पद्धती मुलांना पास आणि नापासांच्या यादीत ढकलते, परंतु त्यांच्यातील कलागुणांना, प्रतिभांना, कौशल्यांना वाव देण्यास सपशेल अपयशी ठरते. आपली शिक्षणव्यवस्था प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे करिअरच्या वाटा निवडण्यासाठी मुभा देतच नाही. यामुळे विविध स्तरांमधील मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. आणि याच पारंपरिक शिक्षण पद्धतीमुळे आपल्यातील संशोधक वृत्तीचा विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेतून दिवसेंदिवस गायब होत आहे. याआधारे आपल्याकडील संशोधन संस्कृती (Research culture) लोप पावली आहे, याबद्दल कुणाचेही दुमत असता कामा नये. म्हणून शासनकर्त्यांनी शैक्षणिक सुधारणांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे, जेणेकरून भविष्यकालीन विनाश रोखला जाईल.
शैक्षणिक सुधारणांचा विचार केला तर आपण आजही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत अजूनही खूप मागे आहोत. युरोप खंडातील फिनलंडने सर्वोत्कृष्ट शिक्षणव्यवस्थेचे उदाहरण जगासमोर सिद्ध केले आहे. तेथील शिक्षणपद्धती विद्यार्थांना स्वायत्त आणि सर्जनशील पद्धतीने खेळण्यास प्रोत्साहित करते. या देशातील विद्यार्थी वयाची १६ वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय चाचणीस किंवा मूल्यांकनास बसत नाही. याउलट आपल्या देशाचा विचार केला तर, ‘परीक्षा’ ही आपल्याकडच्या मुलांच्या पाचवीलाच पुजलेली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, कारण त्यांना बालवाडीतच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या परीक्षेला सामोरे जावे लागते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मुलांना परीक्षा म्हटले की ताण येतो, भीती वाटते आणि काही वेळा याच भीतीचे आत्महत्येत रूपांतर होते. मागील काही वर्षांमधील मुलांच्या आत्महत्येची संख्या अतिशय भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या २०१८ सालच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आपल्या देशात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो आणि एका दिवसाला २८ मुले आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. २०१६ आणि २०१७च्या तुलनेत या वर्षी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे संबंधित अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते. शालेय, महाविद्यालयीन आयुष्यात पावलोपावली तणावाखाली जीवन जगत असणाऱ्या मुलांना शाळा आणि महाविद्यालयात समुपदेशनाची सोयच नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे.
खरे तर आपल्या देशातील मुले एका वर्षापेक्षा जास्त दिवसांपासून करोनामुळे भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. शाळा बंद असल्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरलेला आहे. त्यातही ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. वर्षभरात जी उणीपुरी मुले ऑनलाईन शिक्षण घेऊ शकली असतील आणि शिक्षण घेऊ शकली नसतील, त्यांची परीक्षा मात्र ऑफलाइन पद्धतीने घ्यायची की नाही, यासाठी बैठकांवर बैठका घेण्यात आल्या. आणि सरतेशेवटी त्या रद्दही करण्यात आल्या.
ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देऊन मुलांचे जाणूनबुजून नुकसान केले, परंतु निवडणुकांचा प्रचार ऑफलाईन पद्धतीने केला. कारण प्रस्थापित राजकारण्यांची संधी दवडली असती. उद्याचे भविष्य असणाऱ्या शाळकरी मुलांचे नुकसान सहन करू शकते, परंतु पुढाऱ्यांचे नुकसान सहन करू शकत नाही, असे यावरून स्पष्ट होते.
खरे तर करोना ही आपली व्यवस्था सुधारण्याची संधीच होती, परंतु सत्ताधाऱ्यांसहित विरोधकांनीही निवडणुकीच्या प्रचारात अधिकांश वेळ घालवून हाताला आलेली संधीही घालवली आहे. या संधीचा वापर सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकांच्या प्रचारात केला.
सरकारने वर्षभरातील लर्निंग गॅप भरून काढण्यासाठी तात्काळ पावले उचलायला पाहिजेत. त्याचबरोबर प्रचलित मूल्यमापनाच्या पद्धतीतही काळानुरूप बदल घडवून आणायला पाहिजेत. परंतु तशी हालचाल होताना दिसत नाही. विद्यमान केंद्र सरकार नुसतीच ‘परीक्षा पे चर्चा’ करत आहे. अशा चर्चांमधून (एकतर्फी?) अटीतटीच्या कालखंडात विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास दूर होईल का, मुलांच्या मनातून परीक्षांची अकारण वाटणारी भीती दूर होईल का आणि त्यांना परीक्षेतूनही काहीतरी नवीन शिकता येईल का, असे एक ना अनेक प्रश्न समोर येतात. या सगळ्या प्रश्नांचे नकारार्थीच उत्तर आहे. कारण आपल्याकडे कित्येक वर्षांपासून तणावरहित, आनंददायी सर्जनशील लेखनाला आधार देणाऱ्या परीक्षांचा दुष्काळ पडलेला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आजची शिक्षणव्यवस्था, परीक्षापद्धती ही इवान इलिचने म्हटल्याप्रमाणे खरोखरच आपल्या समाजव्यवस्थेचेच प्रतिबिंब आहे. विषमतेने भरलेली, सफलतेची, यशाची उथळ समीकरणे स्वीकारणारी, विचारक्षमता, संवेदनशीलता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून संकुचित दृष्टीकोनातून ज्ञानाचा, शिक्षणाचा विचार करणारी आणि मुलामुलींचे ‘मूलपण’ हरवून टाकणारी व्यवस्था आहे. वर्तमान शिक्षणव्यवस्थेत सर्व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, त्यांना शिकण्याची आवड निर्माण होईल आणि अशा आदर्श शिक्षणव्यवस्थेतील परीक्षांना सगळी मुले हसतखेळत सामोरे जातील, असे पर्यायी मार्ग शोधावे लागतील.
संदर्भ -
१) परीक्षेला पर्याय काय? - हेरंब कुलकर्णी, मनोविकास प्रकाशन, पुणे
२) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका (शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार), महाराष्ट्र शासन, २०१०
..................................................................................................................................................................
लेखक विनायक काळे ‘सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, पुणे’ येथे प्रोजेक्ट ऑफिसर आहेत.
vinayak1.com@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment