आभासी युगातील सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे, तिथं आपलं शरीर व मन कुणालाही दिसत नाही. जे दिसतं, ते फक्त ‘curated profile’!
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 09 June 2021
  • पडघम तंत्रनामा सोशल मीडिया Social Media फेसबुक Facebook गुगल Google ट्विटर Twitter व्हॉटसअ‍ॅप Whatsapp

मन पांखरू पांखरूं

त्याची काय सांगूं मात?

आतां व्हतं भुईवर

गेलं गेलं आभायांत

- बहिणाबाई चौधरी

नुकतीच ‘Solos’ नावाची एक वेबसिरीज ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाली आहे. त्यात मानवी भविष्याची एक शक्यता दाखवली आहे. कळपात राहण्यासाठी उत्क्रांतीने मानवाची जी शारीरिक व मानसिक रचना केली आहे, त्याच्या अगदी विरुद्ध समाजापासून दूर व काहीतरी कारणाने ‘एकटे’ (पण तंत्रज्ञानाच्या सोबतीने) राहणारे लोक कसे असतील, याची झलक या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळते. यात दाखवलेल्या मानवी भविष्यातील तंत्रज्ञान इतकं पुढे आहे की, मानवी मेंदूतील आठवणी काढून परत त्या टाकता येतात. हा मानव विज्ञानाच्या कृपेमुळे कितीही चांगलं आयुष्य जगत असला तरी त्याचं मन व भावना या आपल्यासारख्या दाखवल्या आहेत. त्यांना पण दु:ख, वेदना, आनंद असून नात्यांची ओढसुद्धा तशीच जुनी आहे.

मानवी मन हे अजूनही आपल्यासाठी गूढच आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण असं की, ते डोळ्यांनी दिसत नाही. जन्माला आल्यापासून पंचेंद्रियाद्वारे आपण जगाचा अनुभव घेतो. नजर, आवाज, स्पर्श, वास व चव या पाच इंद्रियांद्वारे आपण आजूबाजूच्या जगाशी व लोकांशी संपर्क करून नातं प्रस्थापित करतो. मनाला सहावं इंद्रिय म्हणतात (The Sixth Sense). ते दिसत नसलं तरी जाणवत राहतं आणि वेळ आली की, त्याचं अस्तित्व दाखवून देतं.

मानवी मेंदूचा कितीही अभ्यास केला तरी काही गोष्टी अजूनही मानवी आकलनापलीकडल्या आहेत. मनाचं व भावनांचं नातं अतूट आहे. अनुभवत असलेल्या भावनांद्वारा आपण मनाचं अस्तित्व अनुभवत असतो. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता’ व ‘मन करा रे प्रसन्‍न, सर्व सिद्धीचें कारण’ अशा अनेक अभंगांतून तुकोबांनी मनाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

सगळ्यात कठीण गोष्ट कुठली असेल तर ती समोरच्या व्यक्तीला मनाचं अस्तित्व जाणवून देणं आणि तिला तिचं मन काय सांगत आहे, हे समजावून देण्याचा प्रयत्न करणं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मूर्तिपूजा व व्यक्तिपूजा यांची परंपरा असलेल्या आपल्या देशात समोर दिसत असलेल्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवणं शिकवलं जातं. यामुळे आपल्या धर्माचे, जातीचे, शहरातले किंवा राज्यातले लोक चांगले आणि बाकीचे वाईट असं लहानपणापासून मेंदूचं प्रोग्रॅमिंग केल्यानं ‘मनाचे बंध’ जुळवणं कठीणच जातं.

वेगवेगळी फिल्टर्स (जात, धर्म, भाषा व शहर) लावल्यानं समोरच्या व्यक्तीशी ‘connect’ होणं, मन जुळणं घडत नाही. परिणामी दोन व्यक्तींमधील दरी वाढत जाते. त्यातून द्वेष, संशय निर्माण होऊ शकतो. ‘ते व आपण’ अशा पद्धतीचं प्रशिक्षण ज्यांना लहानपणापासून मिळतं, ते लोक ‘सहसंवेदना’ (empathy)मध्ये कमी पडतात.

सिग्मंड फ्राईड यांच्या ‘Projection’ या तंत्रानुसार व्यक्ती त्याला स्वत:बद्दल न आवडणार्‍या गोष्टी (चांगल्या व वाईट) दुसर्‍यात दाखवून त्याचा द्वेष करायला सुरवात करतात. फ्लोरिडाच्या लीसबर्गमधील बीकन कॉलेजमध्ये मानसशास्त्र आणि मानवी सेवांचे सहाय्यक प्राध्यापक ए.जे. मार्सेडन यांच्या मते, जे लोक आपल्यासारखे दिसत नाही, ते वाईट आहेत, असा सहसा निष्कर्ष काढला जातो. संशोधकांच्या मते आपल्या सगळ्यामध्ये जन्मजात ‘आक्रमकपणा व करुणा’ या गोष्टी असतात. त्यातील काय निवडायचं हे अर्थात व्यक्तीवर अवलंबून असतं. त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातून, शिक्षणातून व समाजातून काय शिकवलं जातं, हेसुद्धा महत्त्वाचं आहे. विशिष्ट प्रकारच्या समुदायातून जडणघडण झालेली व्यक्ती बहुतेक वेळा आपल्याच समुदायातील व्यक्तींशी सर्व प्रकारचे व्यवहार करते. त्यामुळे भारतात आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न अजूनही सर्वमान्य होत नाहीत आणि अशा जोडप्यांना किंवा त्यांच्या मुलाबाळांनाही त्रास होतो.

याला कुणी ‘Gut Feeling’ तर कुणी ‘Hunch’ म्हणतं, पण आइन्सटाइनसारख्या वैज्ञानिकानेसुद्धा ‘Intuition’ या मनाशी संबंधित गोष्टीचं महत्त्व अनेक वेळा तार्किक बुद्धीपेक्षा जास्त आहे, हे मान्य केलं आहे.  त्यांनी म्हटलंय की, “The intuitive mind is a sacred gift, and the rational mind is a faithful servant. We have created a society that honors the servant and has forgotten the gift.”

बाह्य रूपावर अवलंबून राहून दुसर्‍या व्यक्तीला समजून घेताना जास्त कष्ट पडत नाहीत. त्यामुळे मेंदूचं काम सोपं होतं. ‘हा मा‍झ्या गावातला’, ‘ती मा‍झ्या जातीची’ किंवा ‘ते मा‍झ्या नात्यातील’ अशा काही पद्धती आपण सगळेच दुसर्‍या व्यक्तीला ओळखण्यासाठी व त्याच्याशी जोडण्यासाठी वापरतो. या सर्व व्यवहारात मनाचा कुठेच विचार होत नाही. अव्यक्त मन बिचारं आपल्या मालकाचं व्यवहारी वागणं चूपचाप सहन करत असतं. मात्र व्यावहारिक जगातील अनेक प्रकारच्या ‘बाह्य’ गोष्टी आपल्या समाजानं आखून दिल्याप्रमाणे आपल्याला कराव्या लागतात. त्यातील सगळ्याच वाईट नसतात, मात्र सगळ्याच मनाला पटणार्‍यासुद्धा नसतात.

असं मन मारून जगत असलेल्या ‘मनाला’ काय वाटत असेल?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

शास्त्रीय पद्धतीनं बघितल्यास मेंदूतील ‘Amygdala’ नावाचा भाग हा मानवी भावनांचं नियंत्रण करत असतो. ‘hippocampus’ या भागात आपल्या आठवणी रेकॉर्ड होत असतात. एखादं छायाचित्र बघताना ही ‘माझी मावस बहीण आहे’ हे hippocampusमधून येतं. ‘ती मला आवडत नाही’ हे Amygdala सांगत अशा प्रकारे आपल्या भावनांचा खेळ सुरू असतो.

मानवी प्रेमाचं एक महत्त्वाचं रूप स्त्री-पुरुष शरीरसबंध आहेत. ती जरी माणसांची मूलभूत गरज असली तरी मनाच्या विरुद्ध प्रस्थापित झालेले शरीरसंबंध बलात्कार म्हणून ओळखले जातात. हे फक्त स्त्रीच्या बाबतीतच होत नाही, तर पुरुषाच्या बाबतीतसुद्धा होतं. आपल्याकडची लग्नपद्धती वंश चालवण्याच्या दृष्टीनं स्त्री व पुरुष या दोघांवरही दबाव आणते. त्यात शरीरसंबंध ही शारीरिक क्रिया बनते. अशा वेळी तिच्यात भावनेचा ओलावा नसतो.

‘ओढ’ या भावनेसाठी ‘Oxytocin’ नावाचं एक मेंदूतील रसायन जबाबदार असतं. ते कोणत्याही दोन व्यक्तींमधील ‘bonding’ म्हणजे भावनिक बंध घट्ट करतं. त्या दोन व्यक्ती ‘आई-मुलं’, ‘बॉस-सहकारी’, ‘शिक्षक-विद्यार्थी’ किंवा अगदी शेजारीसुद्धा असू शकतात. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये ‘सलगी’ (Intimacy) हीसुद्धा ओढ वाढवायला कारणीभूत ठरते. ही ओढ नातं टिकवण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यात व्यावहारिक कारणानं आलेली कोरडी औपचारिकता नसून सहज उत्स्फूर्तता असते. लहानपणी ही निरागस उत्स्फूर्तता जास्त असते. कारण व्यावहारिक बंध नसतात, पण वयानुसार व्यवहार वाढत जाऊन मन अबोल होत जातं.

गेल्या काही वर्षांत पॉर्नने आपल्या सगळ्यांच्या लैंगिक विश्वावर विचित्र परिणाम केले आहेत. त्यामुळे स्त्री व पुरुष या दोघांचंही नुकसान होतं. पॉर्नमुळे शरीरसंबंध अमानवीय होत असून त्यात मनाचा काहीही संबंध येत नाही. सगळा भर बाह्य रूपावर असतो. जगभरात पॉर्नमुळे लैंगिक गुन्हे, नात्यातील दुरावा व स्त्रियांचं शोषण वाढलं असून एकंदरीत समाज मनावर खोल परिणाम झाला आहे. ज्यात दोघांनाही दडपण न येता आनंद (Emotionally safe sex) घेता येईल, असे शरीरसंबंध आरोग्यपूर्ण असतात.

हे बघा

सध्याच्या ऑनलाइन युगात ‘दिखता है वो बिकता है’ हा मंत्र आहे. त्यात अदृश्य मन जाणवणं आणखीच कठीण काम आहे. आपल्या पंचेंद्रियांवर सतत stimulusचा मारा होत असतो. त्यामुळे जे पडद्यावर (मोबाइल, लॅपटॉप व टीव्ही स्क्रीन) 24बाय7 दिसतं, तेच खरं मानून आपण कधी ना कधी त्यावरच्या रंगीबेरंगी मृगजळात अडकून फसवणूक व निराशा अनुभवतो.

मेंदू अशा पद्धतीनं गुंतून राहिल्यानं शरीराची स्पंदनं कळत नाही. ते ‘आत्म-जागरूकता’ (self-awareness) या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. ती आल्यावर आपण इतरांचं मन चांगल्या रीतीनं समजावून घेऊ शकतो. ‘Image consulting’ हा प्रकार सध्या एवढा धुमाकूळ घालत आहे की, अगदी ‘असं नाही केलं तर जेलमध्ये जाऊ या’ असं करत लोक ‘manipulated media’चा वापर करत स्वत:च्या ऑनलाइन प्रतिमेला आणखी कसं चांगलं, चकचकीत करता येईल, या नादात प्रत्यक्ष मन व भावना यांचा विचारच करत नाहीत.

PR, Marketingच्या नादात आपण सगळेच अशी नाती (नाइलाजानं) जोडत आहोत, जी भावना शून्य आहेत. मनाला पटत नाही, पण व्यावसायिकदृष्ट्या उपयोगी, चलनी अशी कचकड्यांची नाती जितक्या लवकर जुळतात, त्याच वेगानं तुटूनही जातात. यातही एक गंमत अशी की, वैयक्तिक नाती जास्त व्यावहारिक होत आहेत की व्यावहारिक नाती वैयक्तिक नात्यापेक्षा वरचढ होत आहेत, हीसुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भारतात अजूनही लग्नाकडे व्यवहार म्हणूनच पाहिलं जातं. म्हणून ठरवून केलेली लग्नं जास्त होतात. कारण परत तेच की जात, धर्म, शिक्षण, वय व बाह्य रूप यांची कसोटी लावली की, लग्न चटकन जमतं. मात्र पटलं नाही की, लोक मनाला दोष देऊन मोकळे होतात. उदा. तो/ती मला समजून घेत नाही वगैरे.

आभासी युगातील सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे, तिथं आपलं शरीर व मन कुणालाही दिसत नाही. जे दिसतं, ते फक्त ‘curated profile’! म्हणजे एक प्रकारे आपली डिजिटल प्रतिमा. प्रत्यक्ष आयुष्यात कसंही वागा, मात्र likes, comments आणि followers असं करत समोरच्याला ‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे’ असं म्हणत लोक वेगवेगळ्या प्रकारची नाती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. ती प्रत्यक्षात तुटतात, कारण खऱ्या आयुष्यात चांगल्या व वाईटासकट व्यक्तीला स्वीकारावं लागतं. म्हणून आभासी जगातील नाती तद्दन व्यावसायिक म्हणजेच तकलादू असतात.

हे ऐका

गेल्या काही वर्षांत एकमेकांशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी अजून काही बाह्य गोष्टींची भर पडली आहे. त्यात दारू, सिगरेट व मांसाहार या गोष्टी प्रामुख्यानं येतात. कॉर्पोरेटमध्ये हा अनुभव वारंवार येतो की, जे लोक या तीन गोष्टींचं सेवन करतात, ते चटकन एकमेकांशी ‘कनेक्ट’ होतात. म्हणून कदाचित मला मानसशास्त्रज्ञ म्हणून बहुतेकांशी ‘कनेक्ट’ होता आलं नाही. कारण मी या तीन गोष्टींचं सेवन करत नाही. ही काही उदाहरणं झाली. पण एक व्यक्ती म्हणून दुसर्‍या व्यक्तीशी संवाद साधायला वा कनेक्ट व्हायला काही विशिष्ट बाह्य गोष्टींची का गरज पडावी? निसर्गानं अशी रचनाच केली आहे की, आपण व्यक्तीच काय, प्राण्यांशीदेखील अबोलपणे संवाद साधू शकतो.

सध्या भारतात ‘राजकीय मत’ हे एकमेकांशी ‘कनेक्ट’ व्हायचं प्रमुख कारण झालं आहे. मा‍झ्या पक्षाची भाषा नाही वापरली, तर ती व्यक्ती दुश्मन असा समज झाल्यानं रक्ताची नातीसुद्धा दुरावत आहेत. सोशल मीडियाचं algorithmसुद्धा आपल्यातील अशा बाह्य घटकांमुळे होणार्‍या मतभेदाला खतपाणी घालतं. कारण ते आपल्याला आपल्यापेक्षा वेगळं काही दाखवत नाही. जे आपण like करतो, तेच व तसाच कन्टेन्ट आपल्या टाइमलाइनवर फिरवला जातो. 

गेल्या काही वर्षांत मला तरी हे फार जाणवतं की, Friends कमी किंवा नाहीतच आणि Professional Associate खूप आहेत. त्यांच्याजवळ मन मोकळं करता येत नाही, कारण भीती असते की, या माहितीचा काही दुरुपयोग तर होणार नाही. मग काय करायचं, तर आभासी जगात जाऊन मन मोकळं करायचं. आभासी जगात चांगलं दिसू मात्र प्रत्यक्ष जगात काय करतो, यावर आयुष्य अवलंबून आहे, हे विसरल्यानं जगभरात ‘मानसिक स्वास्थ्य’ गडबडलं आहे.

स्त्रियांच्या वाट्याला आखीव आयुष्य येतं. त्यामुळे त्यांच्या मनाचा कोंडमारा खूप जास्त असतो. सतत मनाविरुद्ध गोष्टी केल्यानं काय होत असेल? मनातील दबलेल्या भावना शरीरावर परिणाम करतात. Bio Memory म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत आपल्या भावना आणि आठवणी encoded असतात. त्यामुळे भावना जितक्या दाबून ठेवू, तितक्या त्या आजारांना निमंत्रण देतात. भीतीमुळे adrenaline हे रसायन स्त्रवतं, तर रागामुळे adrenaline व noradrenaline ही रसायनं स्त्रवतात. त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं, रक्तदाब वाढतो व बदला घेण्याची इच्छा निर्माण होते. दाबून ठेवलेला राग औदासि‍न्याला जन्म देतो, तसंच सतत ताणत राहिल्यानंसुद्धा शरीराच्या प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नकारात्मक भावना आजारांना आमंत्रण देतात, तर सकारात्मक भावना प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे मोकळं व आनंदी मन ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दुर्दैवानं सध्याचा बाह्य घटकांवर भर देणारा काळ ‘न दिसणाऱ्या, न ऐकू येणाऱ्या’ मनासाठी काही विशेष चांगला नाही. त्यामुळे मनाचे विकार खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

एवढं मनाबद्दल लिहून, बोलून झाल्यावरसुद्धा आपला मूळ प्रश्न तसाच राहतो की, मन शरीरात कुठे वास करतं? मेंदू, हृदय, आपल्या पेशीतील bio memoryमध्ये की, आपल्या Consciousnessमध्ये?

मन दिसत नाही, मात्र आपलं अस्तित्व आपल्या अनेक शारीरिक बदलांतून जाणवून देत असतं. अजूनही मनाचं पूर्ण गुपित आपल्याला उलगडलेलं नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं, हे समजून घेण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे डोळे मिटून ती व्यक्ती (जिचं सोशल मीडिया प्रोफाइल नाही) आपल्याशी प्रत्यक्षात कशी वागली, त्या व्यक्तीसोबत असताना आपल्याला कसं वाटलं, हे आठवणं. अशा वेळी मनाकडून आपल्याला अचूक उत्तर मिळतं.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......