श्रीरामपुरात मेन रोडवरील सोनार आळीतील आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानासमोर नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते. अगदी जुनाट दिसत असलेल्या या वाचनालयात पाचव्या इयत्तेत असल्यापासून मी नियमितपणे जायला सुरुवात केली. संध्याकाळी साडेपाचला शाळा सुटली की, मी आमच्या दुकानाकडे येई आणि वाचनालयाच्या सहा वाजता खुला होणाऱ्या बालविभागाच्या कक्षात जाऊन बसे. १९७०-७१सालची ही घटना. त्या काळात महाराष्ट्रातील सर्वांत उत्तम पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या या लोकमान्य टिळक वाचनालयाचा समावेश होई.
या वाचनालयाच्या बालविभागाने मला संपूर्ण जगाच्या, भारताच्या आणि मराठीच्या समृद्ध साहित्याची तोंडओळख करून दिली. ‘इसापनीती’, ‘गुलबकावली’, ‘ग्रीक साहित्यातील महाकाव्ये’, कालिदासाची ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’ वगैरे नाटके, वासवदत्ता वगैरे संस्कृतमधील अनेक अभिजात साहित्य, विल्यम शेक्सपियरची ‘हॅम्लेट’ आणि इतर नाटके, रविंद्रनाथ टागोर यांची मराठीत भाषांतरीत झालेली अनेक पुस्तके, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’, ‘सिंदबादच्या कथा’, बिरबल आणि अकबरच्या सुरस कथा, साने गुरुजींची ‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’, अमर चित्र कथा मालिकेतली रंगीबेरंगी चित्रांची पुस्तके’ आणि आता न आठवणारी कितीतरी पुस्तके मी पाचवी, सहावी आणि सातव्या इयत्तांत असताना अगदी अधाशीपणे वाचली.
यांपैकी बऱ्याचशा पुस्तकांचे कथानक काय होते, हे आता मला आठवतही नाही. त्याशिवाय ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘आनंद’, ‘किशोर’ अशी किती तरी बालमासिके तिथे असायची. बालविभागाच्या दारापाशी चपला काढून फरशीवर पसरलेल्या लाल चादरीवर बैठक घालून आम्ही मुले वाचत बसायचो. या बालविभागात उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘साने गुरुजी कथामाला’ चालायची. या कथामालेमुळे गो. नि. दांडेकर वगैरे नामवंत साहित्यिकांच्या तोंडून त्यांच्या साहित्याची ओळख झाली.
बालविभागाची वेळ फक्त सहा ते साडेसात अशी असायची आणि ती संपल्यावर नाराजीनेच मी बाहेर पडायचो. आणि सर्वांत वाईट बाब म्हणजे हा बालविभाग वर्षांतून काही महिनेच म्हणजे फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतच चालू असायचा! पण या इष्टापतीमुळेच मला वाचनालयाच्या दुसऱ्या म्हणजे मोठ्या माणसांसाठी असलेल्या वाचनकक्षाची ओळख झाली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
वाचनालयाच्या या मुख्य कक्षात लाकडी प्लॅटफॉर्मवर जाड दोरीने बांधलेली श्रीरामपूर शहरात येणारी सर्व मराठी वृत्तपत्रे उभ्याने वाचण्याची सोय होती. त्याशिवाय काही इंग्रजी, हिंदी आणि एकदोन गुजराती दैनिकेसुद्धा होती. सर्वांत महत्त्वाचे आणि आनंदाचे म्हणजे या कक्षात मराठी भाषेत प्रसिद्ध होणारी विविध साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी लांबलचक लाकडी टेबले आणि खुर्च्यांची सोय होती. ‘धर्मयुग’ हे हिंदी साप्ताहिक, ‘इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ हे खुशवंत सिंग संपादित आणि मारिओ मिरांडा यांची ‘सेंट्रल स्प्रेड’वर रंगीत व्यंगचित्रे असलेले इंग्रजी साप्ताहिक ही नियतकालिकेदेखील मी चाळीत असे. माझ्यासाठी एक मोठे आनंदमय भांडार उघडले गेले आहे, अशीच त्या वेळी माझी भावना होती. या वाचनालयाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. बुधवार हा आठवड्यातला माझा सर्वाधिक नावडता आणि कंटाळवाणा दिवस असायचा, याचे कारण म्हणजे वाचनालय या दिवशी बंद असायचे.
वाचनालयाचे ग्रंथपाल हरीभाऊ कुलकर्णी होते. गोरेपान, मध्यम उंचीचे आणि नाजूक चष्मा वापरणारे हरीभाऊ आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानात दादांकडून आपला सफेद शर्ट आणि सफेद पायजमा शिवून घ्यायचे आणि आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे या शिलाईची पूर्ण रक्कम लगेचच रोख द्यायचे. दादांबरोबर वा दुकानातील इतर कुणाबरोबरही गप्पा मारताना मी त्यांना कधी पाहिले नाही. एक खूप शिकलेली, सुसंस्कृत आणि आदर करण्यासारखी व्यक्ती म्हणून हरिभाऊ कुलकर्णी ही माझ्या आयुष्यात आलेली पहिली व्यक्ती.
दादांचे शिक्षण केवळ दुसरीपर्यंत झालेले असले तरी वाचनाचे त्यांना प्रचंड वेड होते. दिवसभर चहा आणि त्यानंतर केवळ कात आणि चुना लावलेले पान खायची सवय वगळता त्यांना इतर कुठलेही व्यसन नव्हते. आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानात कुणी गिऱ्हाईक नसले, आजूबाजूचे कुणी गप्पागोष्टीसाठी जमलेले नसले की, मग दादा ‘सकाळ’ किंवा ‘नवा मराठा’ ही वृत्तपत्रे वाचायचे. शिवून झालेली कपडे ठेवायच्या कपाटातच एका कोपऱ्याला अवांतर वाचनासाठी काही साप्ताहिके, मासिके, पुस्तके असायची. यामध्ये ‘चांदोबा’ हे रंगीबेरंगी चित्रांचे मासिक, जेसुईट संस्थेतर्फे श्रीरामपुरातूनच संपादक फादर प्रभुधर प्रकाशित करत असलेले ‘निरोप्या’ हे मासिक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी-संपादित जेसुइटांमार्फतच नाशिकहून प्रकाशित होणारे ‘आपण’ हे साप्ताहिक, ‘स्वराज्य’ हे सकाळ ग्रुपतर्फे प्रकाशित केलेले लोकप्रिय साप्ताहिक यांचा हमखास समावेश असायचा.
त्याशिवाय आमच्या दुकानात आणि घरीही अनेक मराठी पुस्तकांचा संच असायचा आणि त्यात कायम भर पडत राहायची. श्रीरामपूरजवळच असलेल्या हरेगाव येथे दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी-रविवारी मारिया मातेच्या जन्मानिमित्त मतमाऊलीची यात्रा भरते. त्यात असलेल्या बुकस्टॉलमध्ये दादा दरवर्षी नवनवी पुस्तके विकत घ्यायचे. आमच्या कुडाच्या घरातील तिन्हीही खोल्यांत - अगदी स्वयंपाकघरातही - पितळी भांड्यांच्या फळीवर, रेडिओशेजारी, इकडेतिकडेही साप्ताहिके, पुस्तके असायची.
या पुस्तकांपैकी सगळीच पुस्तके मी अधाशासारखी वाचली. मला वाचायला येण्याआधीपासून दादा ही पुस्तके विकत घेत असत, स्वतः वाचत बसत असत. त्यांचे पाहून मीही ती पुस्तके हातात घेऊ लागलो आणि नंतर अधाशाप्रमाणे ती वाचू लागलो. नंतरनंतर तर हरेगावच्या मतमाऊली यात्रेत घेतलेली पुस्तके माझ्यासाठीच घेतलेली असायची.
आमच्या घरातील इतर जण म्हणजे माझे मोठे भाऊ किंवा बहिणी यांना कधीही ही पुस्तके वाचताना मी पाहिले नाही. बाई - माझी आई - तर निरक्षरच होती. भिंतीवरच्या येशू ख्रिस्ताचा पुतळा असलेल्या अल्तारापाशीच सुबक कोरीव लाकडी पेटीमध्ये ठेवलेल्या गोल आकाराचे घड्याळ वाचण्यापलीकडे तिची मजल गेली नव्हती.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मला आणि माझ्या भावंडांना दुसरी-तिसरीत असताना ते घड्याळ वाचण्यास बाईनेच शिकवले. शाळेची तयारी करण्यासाठी हे घड्याळ वाचणे गरजेचे होते. ते जुने घड्याळ बंद पडल्यावर नव्या पद्धतीचे घड्याळ आले आणि बाईची तेव्हढीही साक्षरता संपली. जेव्हा माझ्या लक्षात हे आले, तेव्हा मला खूप वाईट वाटले होते.
त्यानंतर खूप वर्षांनी, वयाची पंच्याऐशी ओलांडल्यानंतर दादांना चष्मा लावल्यानंतरही वाचता येईना, म्हणून मी त्यांना डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तेव्हा ‘यापुढे त्यांना वाचणे शक्य होणार नाही’ असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मला असेच खूप वाईट वाटले होते.
तर त्या वेळी घरच्या संग्रहातील वाचलेल्यांपैकी आजही आठवणाऱ्या या पुस्तकांमध्ये ‘यात्रेकरूचा प्रवास’ (जॉन बनयान यांच्या सोळाव्या शतकातील गाजलेल्या ‘द पिलग्रिम्स प्रोग्रेस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद), सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांच्या ‘चांदवडचा मधू’ वगैरे कादंबऱ्या, सेंट हेलेना, डॉन बॉस्को, डॉमिनिक साव्हियो वगैरे संतांची रंगीत कव्हर असलेली चरित्रे, ‘हैती’ ही जाडजूड आकाराची भाषांतरीत कादंबरी वगैरेंचा समावेश होता. पुण्यातील ‘जीवनप्रकाश’ या जेसुईट प्रकाशन संस्थेतर्फे त्या काळात मराठीत अनेक पुस्तके प्रकाशित व्हायची. ही मूळ मराठीतील आणि भाषांतरीत पुस्तके कुणाच्या संग्रहात असली तर पुढच्या पिढीसाठी ती जपून ठेवायला हवी.
एकदाची शाळा सुटली की, मी घरात दफत्तर ठेवून जवळच असलेल्या आमच्या दुकानाकडे सुसाट पळत यायचो. मी कायम आमच्या या दुकानात दुकानात पडीक असायचो. दादांकडे हट्ट करून नव्या शिवलेल्या कपड्यांना काजे करायचे, बटणे लावायचे मी शिकलो. इतर मोठ्या भावांप्रमाणे मात्र शिलाई मशीनवर बसून कपडे शिवण्याचे तंत्र मी शिकलो नाही. मित्रांबरोबर कधी धप्पारप्पी, क्रिकेट, विट्टी-दांडू, पतंग, लंगोरी किंवा गोट्या खेळणे अशा खेळांत मी कधी रमलोच नाही. या सांघिक खेळांत मी फक्त शाळेच्या पीटीच्या क्लासमध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे त्या काळात माझ्या घराशेजारी भरत असलेल्या शाखेमध्ये सहभागी व्हायचो. दादांमुळे मलाही दुकानात रस्त्याशेजारी असलेल्या त्या बाकावर बसून मग ‘चांदोबा’, ‘स्वराज्य’, ‘निरोप्या’, ‘आपण’, ‘श्री’ अशी नियतकालिके, मासिके वाचायची सवय लागली ती लागलीच.
मी सहावी-सातवीला असेन तेव्हा श्रीरामपूरच्या मेन रोडवर किशोर टॉकीजशेजारी एका हातगाडीवर सार्वजनिक वाचनालय चालायचे. या हातगाडीवर छोट्याछोट्या पुस्तकांचा ढीग लावलेला असायचा आणि वर्गणीदार दरदिवशी किंवा आठवड्यातून दोन-तीन वेळेस पुस्तके बदलून घ्यायला यायचे. माझा दोन नंबरचा भाऊ लुईस - नाना - हा या वाचनालयाचा वर्गणीदार होता. त्याच्या संगतीने मलाही या वेगळ्याच प्रकारच्या, साहसी, रहस्यमय, उत्कंठा वाढवणारी पुस्तके वाचण्याची सवय लागली.
या वाचनालयाची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तके म्हणजे गुरुनाथ नाईक यांच्या पाच-सहा मालिकांत दर आठवड्याला प्रसिद्ध होणारी पॉकेट बुक्स. यामध्ये ‘तिरंदाज’, ‘कॅप्टन भोसले’, ‘भारतीय गुप्तहेराच्या पाकिस्तानातील करामती’, ‘काळा पहाड’ असे नायक असलेली पॉकेट बुक्स शुक्रवारी हाती पडायच्या आणि त्यावर वर्गणीदारांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. (काही वर्षांनंतर गोव्यात एका संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत एका सहकारी पत्रकाराने तेथे हजर असलेल्या गुरुनाथ नाईक यांची ओळख करून दिली, तेव्हा त्यांना पाहून मी थक्क झालो होतो!) बाबुराव अर्नाळकर यांच्या भयकथांच्या पुस्तकांनाही या वाचनालयात भरपूर मागणी असायची, पण अर्नाळकरांच्या पुस्तकांच्या वाटेला मी कधी गेलो नाही.
मी आठवीत गेल्यावर लोकमान्य टिळक वाचनालय श्रीरामपूर नगरपालिकेच्या आझाद मैदान येथील प्रशस्त जागेत गेले. तोपर्यंत वाचनाचे मला व्यसन लागल्याने मी एकटा मेन रोडने चालत जाऊन तिथे वाचत बसू लागलो. सुट्टीच्या काळात मी तेथे सकाळी नऊपासून अकरापर्यंत तर संध्याकाळीही रात्री आठपर्यंत वाचनात घालवत असे. ‘वाट चुकलेला फकिर मशिदीत’ या नियमाने या काळात मी कोठे असेल असा प्रश्न माझ्या आईवडलांना कधी पडत नसे. श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगा रात्री साडेआठला वाजल्यानंतर शहरातील सर्व दुकाने बंद व्हायची, या भोंग्याआधीच मी आमच्या दुकानात वा घरी पोहोचलेलो असायचो.
त्या काळात खूप लोकप्रिय असलेली साप्ताहिके, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक, ‘डेबेनॉर’, ‘फेमिना’, ‘करंट’ आणि ‘ब्लिट्झ’ साप्ताहिके, ‘ठणठणपाळ’ हे लोकप्रिय साहित्यिक टवाळक्या करणारे सदर असणारे ‘ललित’ मासिक, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘नवल’, ‘मोहिनी’, ‘हंस’, ‘जत्रा’, तसेच य. गो. जोशी यांचे धार्मिक विषयाला वाहिलेले ‘प्रसाद’ मासिक वगैरे मासिके आणि विविध विषयांना वाहिलेले दिवाळी अंक हे सर्व या वाचनालयात अगदी फुकटात वाचायला मिळणे म्हणजे एक मोठी मेजवानीच होती.
यापैकी प्रत्येक साप्ताहिकाचा, मासिकाचा, दिवाळी अंकाचा स्वतःचा असा वेगळा बाज असे. कुठले तरी एक साप्ताहिक त्यातल्या पण दोनवर प्रसिद्ध होणाऱ्या बिकिनीतील ललनेसाठी लोकप्रिय होते. ‘हंस’, ‘नवल’ आणि ‘मोहिनी’ ही तिन्ही मासिके एकाच प्रकाशनसंस्थेची, अनंत अंतरकर यांनी सुरू केलेली. मात्र यापैकी ‘नवल’ हे गूढ आणि रहस्यकथांना वाहिलेले होते. ‘मोहिनी’ आणि ‘हंस’ यांचे वेगवेगळे विषय कोणते होते, ते आता आठवत नाही, मात्र हे तिन्ही मासिके मी वाचत असे हे मात्र नक्की. अशीच गोष्ट किर्लोस्कर कंपनीतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ या मासिकांची होती. ही तिन्ही मासिके त्या काळात खूप लोकप्रिय होती. त्या तीन मासिकांची आद्याक्षरे असलेले ‘किस्त्रीम’ नावाचे मासिक आता प्रसिद्ध होते.
विशेष म्हणजे लोकमान्य टिळक वाचनालयात ही सर्व साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके ती अगदी ताजीतवानी असतानाच वाचकांच्या टेबलांवर असायची, साधारणतः महिन्याच्या सातआठ तारखेपर्यंत सर्व नियतकालिके वाचकांच्या पुढ्यांत असायची. तीच गोष्ट दिवाळी अंकांची. याबद्दल ग्रंथपाल हरीभाऊ कुलकर्णी यांना श्रेय देऊन त्यांचे याबाबतीत ऋण मान्य केलेच पाहिजे. ग्रंथपाल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर लवकरच दुदैवाने हरीभाऊ यांचे हृदयविकाराने निधन झाले, हे दादांकडून ऐकले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. ज्येष्ठ असलेल्या या व्यक्तीशी मी एक शब्दही कधी बोललो नव्हतो, मात्र ग्रंथपाल म्हणून त्यांनी माझ्यासारख्या अनेकांची वैचारीक, बौद्धिक जडणघडण केली आहे हे नक्कीच.
‘पॅपिलॉन’, अनिल बर्वे यांचे ‘थँक यू मिस्टर ग्लॅड’ वगैरे पुस्तके, ‘मनोहर’ या नियतकालिकांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेतून मी पहिल्यादा वाचली. रवींद्र गुर्जर यांनी इंग्रजीतील अनेक लोकप्रिय पुस्तके मराठीत आणली त्यापैकी अनेक पुस्तके मी या काळात वाचली.
टिळक वाचनालयात दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत साने गुरुजी कथामालेअंतर्गत साहित्यिकांची व्याख्याने आयोजित केली जायची. हे वाचनालय आपल्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाल्यावर तेथे गो. नि. दांडेकर यांचे व्याख्यान झाले होते. तेव्हा शिवरायांचे किल्ले चढणारे दांडेकर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी त्या चक्राकार पायऱ्या अगदी वेगाने कसे चढले होते, ते आताही आठवते.
अजूनही माझ्या आवाक्यात न आलेले एक भले मोठे भांडार त्या लोकमान्य टिळक वाचनालयात होते. ते भांडार म्हणजे वाचनालयात असलेली हजारो पुस्तके. मात्र ही पुस्तके केवळ वाचनालयाच्या वर्गणीदारांना घरी घेऊन वाचायला मिळायची. अनामत रक्कम भरून मासिक वा वार्षिक वर्गणीदार झालेल्या लोकांना ही पुस्तके काही ठराविक दिवसांसाठी मिळायची. पुस्तक परतण्यास उशीर झाल्यास दरदिवशी काही पैसे दंड बसायचा. दादांना मी पुष्कळ तगादा करुनही त्यांनी वाचनालयाची वर्गणी भरली नव्हती. अखेरीस मी आठवी की, नववीला गेल्यावर एकदाचे दादांनी ही अनामत रक्कम आणि वर्गणी भरली आणि मी एकदम खुश्श झालो.
आता या कक्षात बसून लाकडी खोक्यांमधील लेखकाच्या किंवा पुस्तकाच्या आद्याक्षरानुसार जाड कागदांवर लिहिलेली यादी पाहून पुस्तके निवडणे म्हणजे आनंदच होता. त्यानंतर मराठीतील अनेक नामवंत लेखकांची एकामागून एक पुस्तके वाचण्याचा मी सपाटा लावला. यामध्ये गो. नि. दांडेकर होते. त्यांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘मृन्मयी’, ‘माचीवरला बुधा’ यांसारख्या पुस्तकांनी मला भारावून टाकले होते. इतर लेखकांमध्ये वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील होते. त्या काळात म्हणजे १९७०च्या दशकात त्या टिळक वाचनालयाच्या सर्व सुविधांचा सर्वाधिक पुरेपूर लाभ घेणारा माझ्या वयातील मी एकमेव वाचक होतो. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषक मिळाल्यावर ‘ययाती’ कादंबरी वाचून काढली. ‘खांडेकरांच्या रूपाने मराठीला पहिले ज्ञानपीठ’ असा मी दिलेला दहाबारा ओळींचा लेख माझ्या नावानिशी त्या वेळी ‘निरोप्या’ मासिकात प्रसिद्ध झाला होता.
दहावीनंतर शिक्षणासाठी कराडला गेलो तेथे ज्यांच्याबरोबर मी राहात होतो, त्या ‘निरोप्या’ मासिकाचे संपादक असलेल्या फादर प्रभुधर यांच्या मराठी ग्रंथसंग्रहाची दोन-तीन स्टीलची, पारदर्शक काचांची कपाटेच होती. त्यामध्ये ‘ज्ञानेश्वरी’ होती, केशवसुतांच्या कविता होत्या, स्वामी रामदासांचे ‘दासबोध’ आणि संत तुकारामांची ‘गाथा’ होती. मराठीतील पहिले छापिल पुस्तक असलेले फादर थॉमस स्टिफन्स यांचे ‘ख्रिस्तपुराण’, ‘कऱ्हेचे पाणी’ या आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राचे तीन-चार खंड होते. त्या वर्षभराच्या काळात अशी ही अनेक पुस्तके एकतर वाचून किंवा नजरेखालून काढली.
पुढील शिक्षणासाठी मी गोव्याला गेलो आणि तिथे इंग्रजी बोलता आणि वाचता यावे म्हणून आम्हा मुलांवर मराठी वा कोकणी बोलण्यावर बंदीच आली आणि त्यामुळे मी इंग्रजी बोलू लागलो, लिहू आणि वाचू लागलो.
पदवी शिक्षण संपल्यानंतर गोव्यातच मी पत्रकार बनलो, तेही इंग्रजी दैनिकात. तेथून आजवर पूर्णतः इंग्रजी वृत्तपत्रांतच कारकीर्द घालवली आहे.गोव्यातील माझ्या वास्तव्याचा काळ हा माझ्या आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ. या काळात मी विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकांशिवाय इतर कुठली मराठी पुस्तके वाचलीही नाहीत. त्या कॉलेज आणि हॉस्टेल जीवनात मित्रांच्या संगतीने हेराल्ड रॉबिन्स, जेफ्री आर्चर, मारिओ पुझो (गॉडफादरफेम) वगैरेंची भरपूर लोकप्रिय इंग्रजी पुस्तके वाचली, इंग्रजी चित्रपट पाहिले.
मी केवळ इंग्रजी पत्रकारितेतच काम केले असले तरी तेव्हापासून आजपर्यंत मराठीतही माझे लिखाण असतेच. काही जण म्हणतात, दोन्ही भाषांत मी बऱ्यापैकी लिहू शकतो. लहानपणी भरपूर वाचन केल्यामुळे असे दोन्ही भाषांतही लिहिणे शक्य झाले असावे.
आता मागे वळून पाहताना वाटते कि सत्तर, ऐशी आणि नव्वदच्या दशकांचा तो काळ मराठी साप्ताहिके, मासिके आणि इतर नियतकालिकांचा सुवर्णकाळच होता. वाचनसंस्कृतीचाच तो सुवर्णकाळ म्हटले तरी चालेल. दूरदर्शन किंवा मोबाईल येण्याच्या आधीच्या त्या काळात बहुतेक घरात किमान एक तरी दैनिक यायचे. शेजाऱ्यांकडून दैनिके वाचण्यासाठी घेऊन जाण्याची पद्धत होती. शहरांत चौकाचौकांत वर्तमानपत्रांचा, इतर नियतकालिकांचे स्टॉल्स असायचे आणि रस्त्यांवर सायकलने हिंडत मोठ्याने ओरडून, बस स्टॅण्डवर प्रत्येक बसमध्ये शिरून ‘ताज्या’ बातम्या असणारी दैनिके विकली जायची. चहाची तलफ भागवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अमृततुल्य’ सारख्या हॉटेलांत, तसेच कटिंग सलूनमध्येही दैनिके, साप्ताहिके ठेवण्याची प्रथा होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील कुठल्या तरी वाचनालयाचे सदस्य असणे प्रतिष्ठेचे समजले जायचे. मी पुण्यात डेक्कनला १९८९ला राहायला आलो, तेव्हा माझ्या लॉजच्या शेजारी असलेल्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचे सदस्य होण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असायची, हे अजूनही आठवते. नेहमी सिटी बसने प्रवास करणाऱ्या मी स्वतः अनेक वर्षे बसची वाट पाहत असताना काही वाचावे म्हणून बॅगमध्ये नेहमी पुस्तक वा मासिक आवर्जून ठेवत असायचो. मोबाईलमुळे माझी ही सवय आता गेली आहे.
या दोन-तीन दशकांच्या काळात ‘स्वराज्य’, ‘श्री’, ‘मार्मिक’, ‘विवेक’, ‘आपण’, ‘मनोहर’, ‘ब्लिट्झ’, ‘करंट’ अशी भिन्न विचारसरणींची, प्रवृत्तींची दैनिकांच्या, नियतकालिकांच्या कट्ट्यांवर एकमेकांशेजारी गुण्यागोविंदाने राहिली. वाचकांनी ती सार्वजनिक वाचनालयांत किंवा आपापल्या घरी वाचली. तरी या वाचकांना डावा, उजवा, पुरोगामी, भक्त, अर्बन नक्सली किंवा कुठलेही ‘वादी’ अशी लेबले त्या काळात लावली जात नसायची. अशीच स्थिती देशभरही होती का ते माहीत नाही. या सगळ्या विचारांची त्या काळात सरमिसळ होत राहायची. हे विचार ‘स्टेटस को’ किंवा ‘जैसे थे’वादी, डबके न बनता सतत प्रवाही राहिले हे नक्की!
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ravi Go
Fri , 04 June 2021
Sundar ..