स्वत:ला दु:खी समजणारी व्यक्ती वा एकटी वा एकाकी माणसे आपल्या आनंदाचे अदृश्य निकष ठरवत असतात!
ग्रंथनामा - झलक
सुरेश द्वादशीवार
  • ‘एकाकी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 04 June 2021
  • ग्रंथनामा झलक एकाकी Yakaki सुरेश द्वादशीवार Suresh Dvadashivar

“एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.” अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेणारे ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांचे ‘एकाकी’ हे पुस्तक नुकतंच साधना प्रकाशनाकडून प्रकाशित झाले आहे. त्यातील हे एक प्रकरण...

..................................................................................................................................................................

गांधीजी म्हणायचे, ‘मार्क्स समाजापासून सुरू होतो आणि व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मी व्यक्तीपाशी सुरू होतो अन्‌ तिच्याजवळ थांबत असतो.’

व्यक्ती प्रगल्भ झाली अन्‌ विकसित झाली की, समाजाच्या विकासाचा वेगळा विचार वा प्रयत्न करावा लागत नाही. आताचे सारे प्रयत्न समूहांना, वर्गांना, समाजांना, धर्मांना आणि धर्मपंथांना दुरुस्त करण्यासाठी वा त्यांच्या विकासासाठी आखले जातात. गर्दीच्या या योजनांमध्ये व्यक्ती कोरडी राहते. लोहिया म्हणायचे, ‘दिल्लीहून निघालेला एक रुपया सामान्य माणसांपर्यंत पोहोचेपर्यंत पाच पैशांचा होतो.’ राजीव गांधींच्या शोधात तो पंधरा पैशांचा होतो, असे आढळले. सगळी यंत्रणा व व्यक्तींवर सकारण-अकारण नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था-संघटनाच तिच्या वाट्याचे सारे काही हिरावून घेतात. हे केवळ आर्थिक बाबतीतच होते, असे नाही. विचार, विकास, उन्नती, अभिक्रम या सगळ्याच गोष्टींत समाज व्यक्तीला मागे ठेवण्याचाच नव्हे, तर शक्य तो अनभिज्ञ ठेवण्याचाही प्रयत्न करतो. विकास योजनांचे देशात व अन्यत्र जे झाले, ते हे आहे. उत्पादन वाढले ते देशाचे, विकासाचा दर वाढला तो देशाचा, शिक्षणाचा प्रचार झाला तो समाजात वा त्यातील वरिष्ठ वर्गाचा. सामान्य माणूस अजून जिथल्या तिथे राहिला वा गेलाच असेल, तर फार थोडा वर गेला. माणसांचे आत्मसंतुष्टपण त्याला आहे त्या स्थितीत समाधानी ठेवते. त्याचमुळे हे दुष्टचक्र चालू राहते.

व्यक्ती स्वत:चा विचार करू लागली. आपल्या स्थितीचा आढावा घेऊ लागली. ‘ते तसे अन्‌ मी का असा?’ हा विचार तिच्या मनात येऊ लागला की, तिच्या खऱ्या विकासविषयक हालचालींना सुरुवात होते. ही स्थिती तिला समूहात गाठता येत नाही. धर्मात, जातीत, वर्गात वा तशा समूहात प्राप्त करता येत नाही. ती तिला एकाकी असणेच देत असते. समूह माहितीत भर घालतात, प्रसंगी मनाच्या कक्षा रुंदावतात; पण ज्ञानात भर घालत नाहीत. ती एकट्याची, एकाकी अवस्थेत गाठलेली उंची असते. तिथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. सोबतचा जोडीदार- मग ती स्त्री असो वा पुरुष- ही पायांतली एक मोठी बेडी असते. ती सुरक्षा देत नाही आणि उंचीही देत नाही. सोबतच्याने जवळ असणे व आपल्या ‘हो’ला ‘हो’ म्हणणे एवढेच मग तिला अपेक्षित असते. व्यक्तीला या जोडीची एवढी सवय होते की, ती स्वत:चा चेहराच नव्हे तर चवही हरवून बसते. जवळचे लोक त्यांचे ‘ते एकरूप झाल्याचे’ कौतुक करतात, पण ते एकरूप होत नाहीत. त्यांच्यातले काही तरी जसे वा तसेच असते. त्या दोघांचे ‘अर्धमेले’पणच त्यांची एकरूपता वा पूर्तता असल्याचे ते व इतरही समजत असतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

स्वावलंबन जाणे आणि परावलंबन येणे, हीच स्नेहाची कसोटी असते काय? समाजही त्याच परावलंबनाने आपले विस्तारलेले रूप असतो काय? समूहांची व समाजांचीही एक गंमत असते. ते एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवतात व तिलाच पूज्य मानतात. तिच्या जवळ असणारे तिचे प्रतिनिधी असणाऱ्यांविषयी त्यांना आस्था असते. पण ती निष्ठा त्या सर्वोच्च व्यक्तीवर असते, जी साऱ्यांच्या वाट्याला येत नाही. नेहरूंनी गांधीजींवर लिहिलेल्या एका ‘निनावी’ लेखाचे शीर्षकच ‘गांधी- जे मला आवडत नाहीत’ असे होते. त्यातले त्यांचे एक विधान येथे सांगण्यासारखे आहे. ते लिहितात, ‘‘लोक माझ्या सभांना लाखोंच्या संख्येने येतात, मला पाहून खूश होतात. माझे भाषणही मन लावून ऐकतात. पण सभेच्या शेवटी त्यातले कोणीही ‘जवाहरलाल नेहरू की जय’ म्हणत नाहीत, ते सारे ‘महात्मा गांधी की जय’ असेच म्हणतात.’’ आपल्या लोकप्रियतेचा खरा आधार नेहरूंना कळत होता.

हीच गोष्ट त्यांनी सुभाषबाबूंना लिहिलेल्या पत्रात म्हटली आहे. ‘आपण दोघेही लोकांचे लाडके आहोत. पण आपल्या लोकप्रियतेचा खरा आधार गांधी आहेत. त्यांच्यापासून कधी दूर जाऊ नकोस. तसे केलेस, तर तू जनतेपासून दूर जाशील व देशापासूनही तुटशील.’ व्यक्तीचे माहात्म्य सांगण्याचा हा प्रकार नाही. समाजजीवनातले वास्तव मात्र असे आहे. समाजाला एकच एक सर्वोच्च व्यक्ती नेतृत्वासाठी हवी असते. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत पंतप्रधान होण्याच्या योग्यतेची अनेक माणसे होती, पण त्यातले कोणीही गांधीजींची जागा घेऊन शकत नव्हते. गांधीजी एकाकी होते काय? समूहात, समाजात, पक्षात व लोकांत राहूनही त्यांच्या आत्म्याचाच आवाज त्यांना मार्गदर्शक का वाटायचा? तो सहकाऱ्यांच्या शब्दांहून त्यांना महत्त्वाचा का वाटायचा? आत्म्याचा आवाज हाही अखेर ‘एकाकीपणाचाच हुंकार’ असतो की नाही?

गांधीजींच्या पश्चात तो सन्मान नेहरूंना मिळाला; पण गांधीजींवरील जनतेच्या विश्वासात निष्ठा होती, नेहरूंविषयी तिला प्रेम होते... नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात राहिले. पण तुरुंगात असले तरी साऱ्या स्वातंत्र्यप्रेमी दक्षिण आफ्रिकन जनतेचे तेच खरेखुरे नेते होते. त्यांच्यावरील जनतेची निष्ठा देवदुर्लभ म्हणावी अशी होती. समाज व व्यक्ती यांचे असलेले नाते असेही या संदर्भात विचारात घ्यावे लागते. रामाविषयीची भक्ती, कृष्णाविषयीचे प्रेम, साधू-संतांविषयीची शतकानुशतके टिकणारी भक्ती ही तरी याच वास्तवाची उदाहरणे आहेत की नाहीत? ज्या काळात राजेशाही होती व ज्या देशात आजही वंशपरंपरागत ती शाही टिकली आहे, तिथे अशा आज्ञाधारकपणाला निष्ठा वा श्रद्धेची गरज नसते. हुकूमशहा आणि लष्करशहा यांनाही लोकांच्या निष्ठा फारशा लागत नाहीत. त्यांची दंडुकेशाहीच सारी प्रजा धाकात ठेवणारी असते. येथेच नमूद कराविशी महत्त्वाची गोष्ट ही की- समूहाची, वर्गाची, धर्माची वा वंशाची विचारसरणी त्यांच्या नेत्याला हुकूमशाहीकडे नेते. व्यक्तीसाठी ही हुकूमशाहीच असते. एकाकीपणाचा, एकेकट्या माणसाचा स्वतंत्र विचार जिच्यात असतो, ती विचारसरणी लोकशाहीच्या दिशेने जाते. जगभरचे वर्गशहा, धर्मशहा वा वंशवादी हे नेहमीच त्यांचे राजकारण द्वेषावर उभे करणारे दिसतात, उलट व्यक्तिवादी विचार विधायक प्रेमाचा व माणुसकीच्या मूल्याचा आढळला. हिटलर लोकशाही-वादी होऊ शकत नाही आणि गांधींना हुकूमशहा होता येत नाही.

एकाकीपण आत्मसंवाद साधणारे असते. मात्र तो संवाद सरळ व विधायक व्हायचा, तर त्या मनाला असूयेचा वा द्वेषाचा स्पर्श नसणे भाग असते. असूयेने पेटलेले मन स्वत:जवळ कधी जात नाही. ते त्याच्या असूयेच्या विषयाभोवती व व्यक्तीभोवतीच घुटमळत असते. असूया व द्वेष या प्रेरणा स्पर्धेची ऊर्जा देतात. प्रसंगी त्या स्पर्धा जिंकूनही देतात. मात्र अशी स्पर्धा जिंकणारे पहिल्या क्रमांकावर आले, तरी मनाने खूप खाली राहत असतात. विधायक मनच मोठे व उंच होत असते. त्याला विजय वा पराजयाची गरज नसते. ज्ञानदेवाची कुणाशीही स्पर्धा नव्हती, त्याचमुळे ‘दुरितांचे तिमिर जावो’ असे त्यांना म्हणता आले. कुणाच्या तरी तिमिराची इच्छा असणाऱ्यांना ज्ञानदेव होता येत नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

समूहात, कुटुंबात, पक्षात वा मित्रांत असणारी दु:खी व स्वत:च्या मनातच गुरफटून राहणारी माणसे आपण पाहिलेली असतात. याउलट एकटी, एकाकी असूनही आनंदात जगणारेही आपण पाहिलेले असतात. आपली मानलेली माणसे जवळच असावी लागणे त्यासाठी आवश्यक नाही. ती दूर असली तरी आपली असतात, ही भावनाही व्यक्तीच्या एकाकीपणाला सर्वस्पर्शी व आनंदी बनवत असते. ‘अणुरेणुहूनिया थोकडा, तुका आकाशा-एवढा’ ही भावना एका संताच्या मनात कशी येत असेल? ती त्याला कशी झेपत असेल? ती एक कविता असते, की त्याचे आत्मस्वरूप? आपल्या ठायी साऱ्यांना पाहता येणे, हेही एकाकीपणाचेच व्यापक रूप नाही काय? आणि आपल्या मनासारखे काहीही आपले नाही, हा भाग क्षुद्रपणाचा मानायचा की नाही?

एक विषय आणखीही. स्वत:ला दु:खी समजणारी व्यक्ती वा एकटी वा एकाकी माणसे आपल्या आनंदाचे अदृश्य निकष ठरवत असतात. ते तिच्या हाडीमांसी खिळलेले असतात. त्या निकषावर तिच्या आवडी-निवडीच नव्हे, तर सुख-दु:खेही निश्चित होतात. यातले चमत्कारिकपण असे की, हे निकष कायम स्वरूपाचे नसतात. ते बदलतात. काल आवडणाऱ्या गोष्टी व व्यक्ती आज आवडेनाशा का होतात? माणसाचे मन असे १८० अंशांनी का फिरते? त्यातला कोणता कोन खरा मानायचा, की ते सारेच तात्कालिक म्हणून पाहायचे?

आपल्याला आपले नातेवाईक निवडता येत नाहीत, तसे शेजारीही निवडून घेता येत नाहीत. जे मिळाले तेच आपले असतात. मात्र आपले मित्र व जोडीदार आपण निवडू शकतो. ते निवडस्वातंत्र्य आपल्याला आहे. अर्थात यातही एक अडसर आहे. ही निवड आपल्या मनाने करण्याचे स्वातंत्र्य किती जणांना असते? विशेषत: आपल्यातील स्त्रियांना? त्यातल्या अशिक्षित व मागास स्त्रियांची- ज्या वर्गात बालविवाह होतात, त्यातल्या स्त्रियांची- गणना यात करायची नाही. शिक्षित समाजातही आई-वडील, बहीण-भाऊ, ओळखीपाळखीचे, जातीतले, धर्मातले असे जोडीदार व मित्र निवडले जातात. ते नेहमीच आपल्याशी पुरते जुळतात काय? जुळले तरी त्यात स्वेच्छेचा, प्रेमाचा भाग किती अन्‌ नाइलाजाचा किती? आपल्या अवतीभोवतीच्या कुटुंबाकडे जरा लक्ष दिले, तरी त्यात मनातून एकमेकांना नावे ठेवीत नाइलाजाने जगणारी घरं आपण किती पाहतो? राजकीय पक्ष, संघटना व संस्था यांचेही असेच असते. पण तरीही समाज असतो. त्याचे सर्वसमावेशक व पारंपरिक निर्बंध अशाही साऱ्यांना एकत्र ठेवतात किंवा बांधून ठेवतात.

‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणून मग आपण गप्प राहतो व आहे त्या व्यवस्थेशी जुळवून घेतो. मग पुरुषाला त्याचे जीवन अनुभवता येते. स्त्रीला त्यातला कितीसा भाग जगता येतो? एक दुष्ट गोष्ट अशी की, यात कोणी तरी कुणावर स्वार व्हायचे वा स्वत:वर कुणाला तरी स्वार होऊ द्यायचे, एवढेच असते की नाही? प्रेम म्हणायचे आणि त्यापलीकडे पाहायचे. समूह फक्त वाईटच नसतात; त्यात सहकार असतो, सहयोग असतो, भागीदारी असते. पण त्या प्रत्येकाची कुठली तरी मागणीही असते. ती नसेल, तर ते निरपेक्ष सहकार्य आनंददायी ठरते. मात्र ते फार अपवादाने लाभते आणि तेच खरे तर आयुष्यातील अंधाराला उजाळा आणते. हा सहभाग आयुष्यात काय आणतो? ज्ञान, अर्थ, स्नेह, जवळीक, मोठेपण? त्यातली काही माणसे अशी येतानाही त्यांचे मीपण आणतात आणि तापदायक होतात. तीही त्याचीच किंमत असते.

स्वयंशिस्त नावाचीही एक शिस्तबद्ध व्यवस्था असते. मी ती जपानमध्ये पाहिली. रस्त्यावरचे लाल दिवे लागतात, गाड्या थांबतात. थांबताना त्या आपसात दहा फुटांचे अंतर ठेवतात. प्रवासातसुद्धा त्यांचे ते अंतर कायम असते. युद्धामुळे शिस्त आली, की शिस्तीच्या बळावर तो देश महायुद्ध करायला सिद्ध झाला- हे कळायला आज मार्ग नाही. पण स्वातंत्र्य व शिस्तबद्धता यांची सांगड घालणारी स्वयंशिस्तीएवढी दुसरी गोष्ट नाही, हे तेव्हा लक्षात आले. लोक श्रीमंत आहेत किती? तर, दर वेळी टॉयलेटमधून बाहेर पडताना हातात एक कागद येतो- त्यावर तुमचे बी.पी., शुगर, अल्कोहोल आणि प्रकृतीतील इतर लहान-मोठे बदल सांगितलेले असतात. शिवाय त्यावरचे तातडीचे उपायही त्यात असतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जपान हे दुसऱ्या महायुद्धापूर्वी हुकूमशाही राष्ट्र होते, पण स्वित्झर्लंडचे तसे नाही. ते पूर्वापार स्वतंत्र, मुक्त व आंतरराष्ट्रीय संघटनांच्याही बांधणीबाहेरचे राष्ट्र आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग राबवणारा जगातला आज तो एकमेव देश आहे. त्याच्या जिनेव्हा या शहरातील मध्यवर्ती व तीन देश जोडणाऱ्या मोठ्या कालव्यातून सफर करताना मी सोबतच्या मंत्र्यांना विचारले, ‘‘तुमच्या लोकशाही देशाने १९६८ पर्यंत स्त्रियांना मताधिकार का दिला नाही?’’ त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘‘त्यांनी तो मागितलाच नाही.’’ मी म्हणालो, ‘‘आमच्या देशाने त्यांना तो न मागताच स्वातंत्र्यानंतर दिला...’’ ते म्हणाले, ‘‘असेल, पण येथे त्यांची तशी मागणीच आली नाही.’’ स्वित्झर्लंड हा जगातला सर्वाधिक सुशिक्षित देश आहे. तिथे असे का व्हावे? त्या मंत्र्यांनी आणखीही एक धक्कादायक गोष्ट त्या वेळी सांगितली. ‘‘आमच्या स्त्रियांना १९७८ पर्यंत बँकिंगचेही अधिकार नव्हते, कारण त्यांनी ते मागितले नव्हते. घरातल्या पुरुषांच्या अधिकारात त्या निर्धास्त होत्या.’’

माणसे देशपरत्वे वेगळी असतात काय? त्यांची मानसिकता भिन्न असते काय? जपान आणि स्वित्झर्लंड यातले प्रगत कोण व अप्रगत कोण आणि शहाणे कोण व समाधानी कोण? माणूस हाच कमालीचा बुचकळ्यात टाकणारा प्राणी आहे. त्यातून स्त्री ही तर फारशी कुणाला समजली नाही, असे अशा वेळी मनात आले तर काय? अशांचे एकाकीपण कोणाला उमजेल? त्यांची उंची, खोली, प्रगल्भपणा वा संकुचित असणे तरी कोणाच्या लक्षात येईल?

‘एकाकी’ : सुरेश द्वादशीवार

साधना प्रकाशन, पुणे

पाने : ११०, मूल्य : १०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......