महापुरुष वा महामानवांनाही समाजमनाला काही प्रमाणातच वळण लावता येते!
संकीर्ण - वाद-संवाद
राजन मांडवगणे
  • २ मे २०२१ रोजी ‘सावरकरांचा समाजसुधारणा मार्ग…’ या प्रा. पंकज घाटे यांच्या दै. ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचे छायाचित्र
  • Tue , 01 June 2021
  • संकीर्ण वाद-संवाद स्वातंत्र्यवीर सावरकर Swatantryaveer Savarkar महर्षी शिंदे Maharshi Shinde डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar महात्मा गांधी Mahatma Gandhi

‘सावरकरांचा समाजसुधारणा मार्ग…’ हा प्रा. पंकज घाटे यांचा दै. ‘लोकसत्ता’च्या ‘रविवार विशेष’मध्ये २ मे २०२१ रोजी प्रकाशित झालेला लेख वाचला. या लेखाचे शीर्षक व इंट्रो वाचून जे मत तयार होते, त्याचा लेखात फारसा दाखला मिळत नाही. म्हणजे या दोन्हींना लेखाच्या मांडणीतून न्याय मिळत नाही. लेखाचा भर सावरकरांनी ज्या वेळी अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हाती घेतला, त्या वेळी महाराष्ट्रात एकंदर काय परिस्थिती होती, याचा स्थूल धावता आढावा घेण्यावर आहे. पण तो स्थूल आढावा जरा जास्तच स्थूल झाला आहे.

दुसरी गोष्ट, रत्नागिरीत स्थानबद्ध असताना सावरकरांनी केलेल्या सामाजिक चळवळींविषयी प्रा. घाटे म्हणतात - “या पर्वात त्यांनी हिंदू संघटन, धर्म-भाषा-लिपी यांची शुद्धी चळवळ, अस्पृश्यता निवारण, अस्पृश्यांचा देवालय प्रवेश, पतितपावन मंदिराचा प्रयोग, स्त्रियांची तसेच जात्युच्छेदक सहभोजने, स्पृश्यास्पृश्य मुलांना शाळेत सरमिसळ बसवण्याची चळवळ, स्वदेशी अशा अनेक चळवळी केल्या.”

आणि पुढे एके ठिकाणी असंही म्हणतात की, “सावरकरांचं व्यक्तित्व, लेखन, वक्तृत्व आणि तत्त्वज्ञान कितीही आकर्षक असलं; तरी बहुसंख्य हिंदू त्यांच्यापाठी न जाता काँग्रेसकडे वळले. सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे नानाविध उपक्रम हाती घेतले, त्या उपक्रमांना त्यांच्या सर्वच अनुयायांनी पाठिंबा दिला नाही.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

खरे या दोन्ही गोष्टी प्रा. घाटे यांनी एकमेकांशी जोडून पाहायला हव्या होत्या. तसे केले असते तर कदाचित त्यांच्या लक्षात आले असते की, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करणे, हे कुठल्याही व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्याच्या अष्टपैलुत्वाचे द्योतक असले तरी ते सामाजिक वास्तवाच्या बाबतीत मात्र काहीसे गैरसोयीचे ठरते. कारण अशा व्यक्तीमागे समाज फारच मर्यादित स्वरूपात उभा राहतो. शिवाय तुम्ही ज्या कार्यकर्ते-सहकारी यांच्यासोबत काम करत असता, त्यांच्या विचारविश्वाला पूर्णपणे उलटेपालटे करणारे उपक्रम तुम्ही हाती घेतले की, ते गोंधळात पडतात, नाराज होतात. त्यातून ते तुम्हाला दुरावतात तरी किंवा तुमच्यापासून वेगळे तरी होतात.

अस्पृश्यतानिवारणासाठी सावरकरांनी विविध उपक्रम हाती घेतले असले तरी, त्यांचे बहुतांश सहकारी\कार्यकर्ते ब्राह्मण होते. तेही सनातनी. त्यांना सावरकरांचा हा सरळ डोक्यावर उभा करणारा प्रयोग झेपला नाही. आणि ज्या दलितांसाठी ते हे काम करत होते, त्यांच्या दृष्टीने सावरकर उपरे होते. सावरकरांनी सामाजिक चळवळी खूप केल्या असल्या तरी त्यांचे मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि समाजशास्त्र नीट समजून घेतले नाही. म्हणून त्यांच्या चळवळींना मर्यादित स्वरूपाचे यश मिळाले, असे वाटते.

पुढे घाटे यांनी “अस्पृश्यांच्या उद्धारासाठी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, सावरकर, माटे यांच्यासारख्या सवर्ण हिंदूंनी चालवलेल्या चळवळीविषयी आंबेडकर साशंक आणि उदासीन असत. त्यांची रणनीती आणि डावपेच आंबेडकरांना कधीच पसंत पडले नाहीत. त्यांचा अशा प्रयत्नांना मुळातूनच विरोध होता. असे मतभेद असल्याने या सुधारकांनी अस्पृश्योद्धारासाठी- एखादा अपवाद वगळल्यास- एकत्र येऊन काम केल्याचं दिसत नाही,” असा निष्कर्ष काढला आहे.

तो थोडासा तर्कदुष्ट आहे. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे प्रयत्न केले, त्याला दलितांनी आणि मराठ्यांनीही कधी फारशी साथ दिली नाही. शिंदे हे मराठ्यांचे नेते\पुढारी, पण त्यांच्या समाजसुधारणेबाबत मराठा समाजानेही कधी फार आस्था दाखवली नाही. त्याचे कारण पुन्हा  सावरकरांसारखेच आहे. शिंद्यांनाही त्यांच्या मराठा सहकारी\कार्यकर्ते यांनी साथ दिली नाही. (घाटे यांनी शिंदे, सावरकर, गांधी यांच्यासोबत श्री. म. माटे यांच्याही अस्पृश्यता निवारणाबाबतच्या कामाचा उल्लेख केला आहे. माट्यांचे काम उल्लेखनीय असले तरी ते शिंदे, सावरकर, गांधी यांच्या तुलनेत फारच मर्यादित स्वरूपाचे होते. त्यामुळे ते बाजूला ठेवू या.)

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अस्पृश्यतेबाबत आंबेडकरांना जेवढा पाठिंबा मिळाला, तेवढा शिंदे, सावरकर, माटे, गांधी यांना का मिळाला नाही? मला वाटते, याचे उत्तर सरळ आणि स्पष्ट आहे. अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्यांचा उद्धार यातच आंबेडकरांनी ‘इतिकर्तव्यता’ मानली. त्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य पणाला लावले. म्हणून त्यांना एवढा पाठिंबा मिळाला. शिवाय ते अस्पृश्य. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता त्या काळात वादातीत होती. कुठल्याही चळवळीचे एक अंगभूत तर्कशास्त्र असते. ते म्हणजे ज्यांनी ज्या मुद्द्यावर चळवळ उभी केली गेली आहे, त्यांनी आधी स्वत:ला पणाला लावावे लागते आणि मग तो मुद्दा जनसमूहाला लावून त्यांचे जीवनही कसे या गोष्टीमुळे पणाला लागले आहे, हे पटवून द्यावे लागते. तरच जनसमूह तुमच्या बाजूने येतो आणि तुमच्यासह रस्त्यावर उतरतो. (इथे उदाहरण म्हणून शेतकरी चळवळीचे संस्थापक शरद जोशी यांना आठवून पाहता येईल.)

अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत शिंदे, सावरकर, गांधी यांचे प्रयत्न जनसमूह त्यांच्यापाठी ठामपणे उभा राहावा, इतक्या निकराचे आणि सातत्याचे होते का? कितीही कटु असले तरी हे मान्य केले पाहिजे की,  नक्कीच नव्हते. एकतर यातले कुणीच अस्पृश्य नव्हते आणि यातल्या कुणीही अस्पृश्यता निवारण याच एका प्रश्नावर काम केले नाही. त्यांच्यासाठी तो एक ज्वलंत प्रश्न होता, एवढेच.

कुणाच्याही मागे समाज सहजासहजी जात नाही. तो आपल्या नेत्याला चांगला पारखून घेतो, त्याच्या अस्सलपणाची खात्री करून घेतो आणि मगच त्याच्यासोबत जातो. आंबेडकरांनाही त्यांच्या समाजात आणि त्याबाहेरच्या इतर समाजांतही या सगळ्या परीक्षांतून जावे लागले, तेव्हाच ते दलितांचे नेते झाले.

तसे शिंद्यांनी, सावरकरांनी, गांधींनी कुठे केले? त्यांचे प्रयत्न सैद्धान्तिक पातळीवरच जास्त राहिले.

शिंद्यांनी एकाच वेळी कितीतरी सुधारणा हाती घेतल्या होत्या. पण त्या घेताना त्यांनी ज्या समाजासाठी आपण हे करतोय त्याला हे झेपेल का, याचा कधीही विचार केला नाही. त्यांच्या काळात जातीय राजकारण हाच पाया होता, पण तेव्हा शिंदे बहुसंख्याकांचे राजकारण करण्याचा आग्रह धरत होते. एकीकडे अस्पृश्यता निवारण तर दुसरीकडे मराठा समाजातील दुर्गुणांविषयी बोलते होते. तिसरीकडे स्त्रियांच्या शिक्षणाविषयी, तर चौथीकडे बहुजनांच्या शिक्षणाविषयी... या अशा इतक्या पातळ्यांवर तेव्हाच काम करता येते, जेव्हा तुम्ही राजकारणात सक्रिय, प्रभावशाली असता... पण शिंदे तसे नव्हते, त्यामुळे त्यांच्या सगळ्या कामाची उपेक्षा होत गेली.

याउलट गांधींचे. राजकारणात ते जसजसे प्रभावशाली होत गेले, तसतसा त्यांच्या समाजसुधारणांना अनुयायी मिळत गेले. गांधींची सर्वोच्च प्राथमिकता स्वातंत्र्याला होती. त्याला पूरक ठरतील असेच उपक्रम त्यांनी हाती घेतले. म्हणून त्याला समाजाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत गेला. गांधींनी ‘राजकीय क्रांती’ घडवून आणण्यासाठी ‘सामाजिक क्रांती’चा ज्या हुशारीने वापर करून घेतला, तसा प्रयत्न आंबेडकर वगळता भारतात कुणीही केलेला नाही. त्यांच्या काळात नाही, आणि त्यानंतरच्याही नाही. ‘सामाजिक क्रांती’ ही अतिशय संथ प्रक्रिया असते, पण तिला ‘राजकीय क्रांती’च्या जोरावर काही प्रमाणात प्रभावित करता येते, काही प्रमाणात वळणही लावता येते आणि काहीसा तिचा वेगही वाढवता येतो, हे गांधींनी दाखवून दिले. आणि आंबेडकरांनीही.

सावरकरांच्या राजकीय सक्रियतेवर बंधने आल्यामुळे त्यांना हे जमले नाही, असे म्हणता येईल का? मला वाटते, सावरकरांना राजकीयदृष्ट्या सक्रिय राहण्याची संधी मिळाली असती तरी हिंदू समाजाचे प्रभावशाली पुढारी ते होऊ शकले असते का? टिळकांइतकी कर्तबगारी त्यांना गाजवता आली असती का? टिळक १९२०ला गेले, पण त्याआधीच भारतीय राजकारणात गांधींचा उदय झाला होता आणि भविष्यात गांधींना कुणीही रोखू शकणार नाही, याचा काहीसा अदमास टिळकांना आला होता. ही दूरदृष्टी सावरकरांकडे होती का? मला असे वाटते की, सावरकरांकडे गांधींइतकी तर नाहीच, पण टिळकांइतकीही ‘व्हिजन’ नव्हती.

शिंदे, सावरकर, टिळक यांच्यापेक्षा गांधींना जास्त यश मिळाले, याचेही उत्तर यातच आहे, असे वाटते. गांधींचे गुरू गोखले, गोखल्यांचे गुरू रानडे, ही परंपरा नीट प्रकारे समजूनच घेतली जात नाही, असे मला वाटते. रानडे-गोखले यांना ‘सामाजिक क्रांती’ आणि ‘राजकीय क्रांती’ कधी आणि कशा होतात, हे नीट उमगलेले होते. त्यामुळेच त्यांनी त्यांची गल्लत केली नाही. तोच वारसा नंतर गांधींनी चालवला. आंबेडकरांनी मात्र दलितांच्या उद्धाराबाबतीत ‘राजकीय क्रांती’ करण्यात यश मिळवले, पण ‘सामाजिक क्रांती’ करणे त्यांना त्यांच्या हयातीत शक्य झाले नाही, आणि त्यांच्यानंतर ते काम अजूनही होतच आहे…

राजकारणात आणि समाजकारणात पुरेसा लवचीकपणा असल्याशिवाय फार पुढे जाता येत नाही. सावरकरांना ते जमले नाही, टिळकांना जमले. म्हणून राष्ट्रीय पातळीवर गेल्यावर टिळक बदलले, पण तरी त्यांना राष्ट्रीय पातळीवर अजून पुढे जाण्यात मर्यादा होत्या, ते त्यांच्या लक्षात आले असावे, याचा कयास करता येतो. आणि टिळकांना जे उमगले (पण त्यांना दुर्दैवाने त्यांना पुढे आयुष्यही मिळाले नाही) ते त्यांच्या अनुयायांना उमगले नाही, हेही खरे. म्हणूनच त्यांनी गांधींना विरोध करण्यातच आपली सगळी ऊर्जा घालवली, असे मला वाटते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गांधींच्या अस्पृश्यतानिवारण कार्यक्रमाविषयी अनेकांनी, विशेषत: दलित अभ्यासकांनी आजवर अनेकदा टीका केली आहे. पण हा कार्यक्रम एका मर्यादेनंतर पुढे रेटण्यातले धोके गांधींना कळले होते, कारण काँग्रेसने अस्पृश्यतानिवारण हा प्रमुख अजेंडा केला असता तर स्वातंत्र्य हे प्रमुख ध्येय मागे पडले असते, हे एक आणि दुसरे आंबेडकरांचा भारतीय राजकारणात उदय झाल्यानंतर गांधींना व काँग्रेसला तो कार्यक्रम हाती घेण्याचे कारणही राहिले नव्हते. कारण आंबेडकरांचे काम गांधींना व काँग्रेसला एका अर्थाने समांतरच होते. म्हणून तर नंतर गांधींनी आंबेडकरांना बळ दिले, असे मला वाटते.

प्रा. घाटे शेवटी म्हणतात - “हिंदू मनाची टोकदार वृत्ती बोथट करण्याचा सावरकरांनी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला. रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत त्यांना मर्यादित यशही मिळालं. पण ते मन पूर्णत: बदलणं त्यांच्या ताकदीबाहेरचं होतं.”

ते एका अर्थाने खरेच आहे. आपल्या सबंध समाजाची मानसिकता बदलणे कुठल्याही एकट्या-दुकट्या नेत्याला शक्य होत नाही. मग तो महापुरुष असो की महामानव असो. समाजमनाला काही प्रमाणात वळण लावणे किंवा चार पावले पुढे घेऊन जाणे, एवढेच करता येते. समाजमन जर महापुरुषांच्या बरोबरीला यायला लागले, तर जग कितीतरी पुढे जाणार नाही का?

..................................................................................................................................................................

लेखक राजन मांडवगणे मुक्त पत्रकार आहेत.

mandavgane.rajan@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......