कवी-लेखक लोकांची जमात तशी भयंकरच असते. ती क्रूर हुकूमशहालाही घाबरत नाही आणि एकाधिकारशहांनाही. त्यामुळे जगातल्या अनेक हुकूमशहांनी कवी-लेखकांना छळले, तुरुंगात डांबले, काहींच्या हत्याही केल्या. पण त्यामुळे काही कवी-लेखकांची जमात नमली नाही. जगातल्या सगळ्या देशांत आजही कवी-लेखक त्यांचे त्यांचे लिहीत असतात. ते त्याच्या त्याच्या परीने गाजते किंवा वाजते.
जगात जिथे जिथे मोठमोठी युद्धे झाली, नरसंहार झाला, दडपशाही झाली, त्या देशातल्या कवी-लेखकांचे साहित्य पहा. शोषण, अन्याय, अत्याचार, गरिबी, वंशभेद, जातीयता यांचे चटके ज्यांना ज्यांना सहन करावे लागले, त्या देशांतल्या कवी-लेखकांची पुस्तके पहा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या किंवा फाळणीच्या जखमा भोगाव्या लागलेल्या देशांतल्या कवी-लेखकांचे लेखन पहा. जे छातीत दु:खाचा कढ घेऊन जगतात, त्या कवी-लेखकांच्या लेखणीत वेदनांचा ढग ओथंबून आलेला असतोच. शोषण, अन्याय, अत्याचार, गरिबी, वंशभेद, जातीयता, नरसंहार, दडपशाही, गुलामगिरी, या गोष्टी कल्पनेच्या पातळीवर अनुभवून त्याविषयी काल्पनिक स्वरूपाचे काही लिहिता येत नाही. खरे कवी-लेखक अशा कृतक गोष्टी कधीही करत नाहीत. थोडक्यात जे कृतक कल्पना करत नाहीत, जे कृतक जगत नाहीत, त्यांच्या लेखनात फोलपटे नसतात.
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव म्हणायचे की, ‘लेखकांना फार सुखा-समाधानात ठेवू नये. त्यांना मरू द्यावं. त्याशिवाय त्यांच्याकडून चांगल्या साहित्याची निर्मिती होत नाही.’ सुख-समृद्धी ही कवी-लेखकांना तशी मारकच गोष्ट असते. छातीत कळ आणि मनगटात बळ असल्याशिवाय लेखकांच्या लेखणीला बहर येत नाही. विपरित परिस्थितीतच त्यांची स्वत:शी आणि इतरांशी झटा घेण्याची क्षमता लखलखीत होत राहते. कसोटीच्या, अटीतटीच्या प्रसंगी कवी-लेखकांचे स्वत्व पणाला लागतेच. जगभरातल्या कितीतरी जणांनी आजवर ते पणाला लावले आहे. जीवावर उदार होऊन सत्याचा आरसा उंचावला आहे.
कवी-लेखक हे गल्लोगल्ली फिरून आरसे विकणाऱ्या विक्रेत्यासारखे असतात. ते तुम्हाला त्यांची वस्तू विकत तर देतात, पण त्यातून तुम्हाला तुमचा ‘खरा चेहरा’ही दाखवण्याचे काम करतात. कवी-लेखकांचे साहित्य हे माणसांच्या अंतरात्म्यातला दिवा पेटवण्याचे आणि मस्तकातला विवेक जागा करण्याचे काम करते. म्हणजे ते समाजाचे ‘कॅटलिस्ट’ (‘उत्प्रेरक’) म्हणून काम करत असतात. त्यांच्यामुळे माणसांमध्ये, समाजामध्ये इष्ट बदल घडायला मदत होते\होऊ शकते. गौतम बुद्धाने म्हटले आहे की – ‘सत्याला सत्य म्हणून जाणा आणि असत्याला असत्य म्हणून जाणा’. कवी-लेखक लोक नेमके हेच सांगण्याचे काम करतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
करोनाकहराच्या गेल्या दीडेक वर्षाच्या काळात देशभरातल्या कितीतरी कवी-लेखकांनी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवले आहे आणि जनसामान्यांचा कैवार घेतला आहे. त्याविषयी भरभरून लिहिले आहे, लिहीत आहेत. त्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद होऊन ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘व्हायरल’ होत आहेत. सत्तेचे पाठीराखे आपल्या देशात ‘To Much Democracy’ असल्याचा मानभावी दावा करत असले तरी प्रत्यक्षात ती मोदी सत्तेत आल्यापासून ‘To less Democracy’ झालेली आहे. विविध मंत्रालये, सरकारी-निमसरकारी संस्था, प्रसारमाध्यमे यांची अवस्था गलितगात्र झालीय. उघड आहे, हे सगळे आपापत: घडून आलेले नाही.
करोनाकहरामुळे तर देशभर मृत्युचे तांडव चालू आहे. गंगेतून प्रेते वाहताहेत, नदीकाठावरच्या वाळूत ती पुरली जाताहेत. स्मशानात त्यांच्या दहनासाठी रांगा लागताहेत किंवा कुठल्या तरी नदीच्या काठी दहा-दहा वीस-वीस चिता एकाच वेळी जळताना दिसताहेत. कुणाचा मृत्यु करोनामुळे होतोय, तर कुणाचा वेळेत रुग्णालयात बेड न मिळाल्याने. कुणाला बेड मिळतोय, पण ऑक्सिजनअभावी मृत्युला कवटाळावे लागतेय. कुणाला वेळेत रेमडिसिव्हर मिळत नाही, कुणाला अम्ब्ल्युन्स मिळत नाही. कुणाकडे रुग्णालयात जाऊन उपचार करून घेण्याइतपत पैसे नाहीत, कुणाला रुग्णालयाचे अव्वाच्या सव्वा बिल झेपत नाही, कुणाला वडिलाचे पार्थिव स्मशानात घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्ससाठी तिष्ठावे लागतेय. अनेकांना आपल्या कुटुंबसदस्याचे, नातेवाईकाचे, आप्तांचे वा मित्रांचे अंत्यदर्शनही घेता येत नाही.
या महामारीच्या काळात आपल्या केंद्र सरकारने दिवे लावा, थाळ्या वाजवा अशी सुरुवात केली. नंतर लॉकडाउन केला. आणि आपण कसा या महामारीचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे, याचा गमजा मारण्यात वेळ काढला. दरम्यानच्या काळात युरोपात या महामारीची दुसरी लाट उदभवली होती. पण त्याकडेही आपल्या आत्ममश्गूल आणि अहंमन्य केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. उलट थातुरमातूर उपायांवर नेहमीप्रमाणे स्वत:चे प्रतिमासंवर्धन कसे होईल, याचीच काळजी घेतली.
त्यामुळे मार्च २०२१पासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातल्या अनेक राज्यांत उचल खाल्ली, तेव्हा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारची लबाडी सपशेल उघडी पडली. गेल्या काही दिवसांत गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांतील परिस्थिती किती हाताबाहेर गेलेली आहे, हे वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या, ऑनलाईन पोर्टल्स यांच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज पाहतोच आहोत.
याचबरोबर ज्या राज्यांमध्ये गैरभाजप सरकारे आहेत, त्यांची अडवणूक करण्याचे धोरणही केंद्र सरकारने राबवले आहे. प. बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडू आणि पाँडेचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका याच करोनाकहरात पार पडल्या. उत्तराखंडमध्ये कुंभमेळा पार पडला. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्प चालूच आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही जास्त तडाखा देणारी आहे. पण याबाबत केंद्र सरकारने पुरेसे गांभीर्य दाखवले नाही. फारसे कसले नियोजनही केले नाही. प्रोपगंडा आणि बुद्धिभेद करणाऱ्या ‘फेक न्यूज’ हाच जणू काही केंद्र सरकारचा अजेंडा झालेला आहे. गुजरात-उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये तर मृतांची आकडेवारीही लपवण्याचे उद्योग तेथील सरकारने केले.
पंतप्रधान मोदींनी या कठीणकाळात काय केले? देशातील जनतेला धीर देण्याचे काम केले? स्वत:च्या सरकारच्या चुका माध्यमांसमोर येऊन मोकळेपणाने मान्य केल्या? नाही, पण दिशाभूल करण्याचे आणि खोटे दावे करण्याचे काम मात्र नेहमीच्या पद्धतीने इमानेइतबारे केले.
ज्या ‘गुजरात मॉडेल’ देशभर डंका वाजवून मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची निवडणूक लढवली, त्या गुजरातची अवस्था करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अतिशय दयनीय झाली, हे उघड झाले आहे. तसेही गेल्या २० वर्षांत म्हणजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यातील सर्व सरकारी-निमसरकारी आणि खाजगी संस्था यांचा पद्धतशीरपणे ऱ्हास करण्यात आलेला आहे.
२००१ ते २०१४ या काळात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. गोध्रा जळीत प्रकरणानंतर गुजरातमध्ये उसळलेली जातीय दंगल आणि त्याला सरकारने दिलेले प्रोत्साहन, हा मुद्दा एक वेळ बाजूला ठेवूया. पण या काळात गुजरातमधल्या कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण या क्षेत्रातल्या कुठल्या व्यक्ती वा संस्था राष्ट्रीय पातळीवर चर्चेच्या ठरल्या? गुजरातमधल्या प्रसारमाध्यमांची काय स्थिती आहे? तिथल्या कुठल्या पत्रकार-संपादकाने राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवला आहे? गुजराती साहित्यातून कुणाचे नाव पुढे आले? कुठल्या गुजराती पुस्तकाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली? ‘हेल्लारो’ हा चित्रपट सोडला तर कुठल्या गुजराती चित्रपटाची गुजरातबाहेर चर्चा झाली? नर्मदा सरोवरात उभ्या केलेल्या सरदार पटेल्यांच्या भव्य पुतळ्याव्यतिरिक्त कुठले काम गुजरातमध्ये झाले?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि गुजरात राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजीच झाली. या साठ वर्षांच्या काळात महाराष्ट्राने फार भव्यदिव्य कामगिरी केली असे नव्हे, पण गुजरातपेक्षा महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर पुढे आहे, हे नक्की.
अशा या सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेल्या राज्यातूनच मागच्या पंधरवड्यात पारुल खक्कर नावाची एक कवयित्री पुढे यावी आणि आणि तिच्या अवघ्या १४ ओळींच्या कवितेने सोशल मीडियावर हलकल्लोळ माजवावा, हे आक्रितच म्हणायला हवे. त्यांच्या ‘नंगा साहेब’ या मूळ गुजराती कवितेचा हिंदी, इंग्रजी, मराठी, आसामी, तमिळ, मल्याळम, भोजपुरी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. तो सोशल मीडियावरून खूप मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ झाला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका पोस्टरवर असा दावा करण्यात आला आहे की, ४८ तासांत या कवितेमुळे पारुल खक्कर या कवयित्रीला भाजपच्या आयटी सेलने २८ हजार शिव्या दिल्या. ही गोष्टही मागच्या आठवड्यातली. त्यामुळे आतापर्यंत त्या शिव्या कदाचित दुप्पटही झाल्या असतील.
एक कविता इतकी भयानक का ठरावी? तिची सत्तेत असलेल्या पक्षाला इतकी भीती का वाटावी?
कारण या कवितेत आजच्या भारताचे वर्णन आहे. देशाच्या स्थितीचे पोस्टमार्टेम आहे. त्याला जबाबदार असणाऱ्या राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्यासमोर सत्याचा भलामोठा आरसा धरला आहे. आणि ‘सच का सामना’ करण्याची हिंमत तर कुठल्याच सरकारमध्ये नसते. मोदी सरकार तर त्याबाबतीत फारच संवेदनशील आहे. उलट सत्याला नामोहरम कसे करता येईल आणि आपला प्रोपगंडा कसा चालू राहील, हाच या सरकारचा एकमेव अजेंडा आहे. नाहीतर पंतप्रधान मोदींची देशभर एवढी सर्वदूर लोकप्रियता पसरलेली असताना, केंद्र सरकार त्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी सातत्याने जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना एवढ्या मोठ्या पगारी आयटी सेलच्या कुबड्या या सरकारला का लागाव्यात?
मोदींना प्रश्नांची इतकी भीती का वाटते?
कारण उघड आहे – त्यांना ‘सच का सामना’ करायचा नसतो. सत्य सांगायला, सत्य बोलायला, सत्य स्वीकारायला आणि सत्य कबूल करायला मोदींना अजिबात आवडत नाही. उलट प्रत्येक सत्यावर रंगसफेदी करून किंवा त्याची सोयीस्करपणे वासलात लावूनच ते त्यांच्या जाहीरसभांमध्ये किंवा ‘मन की बात’मध्ये बोलत असतात.
पण त्यांना याची कल्पना नाही की, पगारी पत्रकारांची मुस्कटदाबी करता येते, पण कवी-लेखक यांची सरसकट मुस्कटदाबी करता येत नाही. कारण म्हटलेय पारुल खक्कर यांनी? तर –
“एक साथ सब मुर्दे बोले ‘सब कुछ चंगा-चंगा’
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा
ख़त्म हुए शमशान तुम्हारे, ख़त्म काष्ठ की बोरी
थके हमारे कंधे सारे, आँखें रह गई कोरी
दर-दर जाकर यमदूत खेले
मौत का नाच बेढंगा
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा
नित लगातार जलती चिताएँ
राहत माँगे पलभर
नित लगातार टूटे चूड़ियाँ
कुटती छाति घर घर
देख लपटों को फ़िडल बजाते वाह रे ‘बिल्ला-रंगा’
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा
साहेब तुम्हारे दिव्य वस्त्र, दैदीप्य तुम्हारी ज्योति
काश असलियत लोग समझते, हो तुम पत्थर, ना मोती
हो हिम्मत तो आके बोलो
‘मेरा साहेब नंगा’
साहेब तुम्हारे रामराज में शव-वाहिनी गंगा”
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी लगेचच जून २०१४मध्ये ‘नमामि गंगे’ या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये २० हजार कोटी इतकी भरघोस तरतूद केली होती. त्या प्रकल्पाचे काय झाले? गंगा स्वच्छ झाली? ‘नमामि गंगे’ झाली? तशी झाली असेल तर ती आज पारुल खक्कर म्हणतात तशी ‘शव-वाहिनी गंगा’ का झाली?
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर देशातल्या नागरिकांना ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ अशीही ग्वाही दिली होती. म्हणजे मी या देशात ‘रामराज्य’ निर्माण करेल असा दावा त्यांनी केला होता. त्या दाव्याचे काय झाले? रामराज्यातली जनताही गंगेला पवित्र, आईसमान मानतेच ना! मग तिची ‘शव-वाहिनी’ कशामुळे झाली?
येत्या ३० मे २०२१ रोजी मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण होतील. म्हणजे गेली सात वर्षे मोदी पंतप्रधान म्हणून या देशाचा गाडा हाकत आहात.
या सात वर्षांत त्यांना निदान पारुल खक्कर यांच्या चौदा ओळींच्या कवितेचा सामना करायचं तरी बळ यायला हवं ना…
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment