अजूनकाही
महाराष्ट्रातील दलित समाज २५ डिसेंबर हा दिवस ‘मनुस्मृती’ दहन दिवस म्हणून पाळतो. सरंजामी काळातील भारतीय समाजाचं नियमन करणारा विषमतेवर आधारलेला तो ग्रंथ होता. म्हणून याच दिवशी १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जाहीररीत्या महाडला ‘मनुस्मृती’चं दहन करण्यात आलं. तेव्हापासून दरवर्षी डॉ. आंबेडकरांचे अनुयायी या दिवशी ठिकठिकाणी सार्वजनिकरीत्या ‘मनुस्मृती’ दहनाचे कार्यक्रम करतात. भारिप बहुजन महासंघाने हा दिवस ‘भारतीय महिला मुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याची प्रथा पाडली. सुरुवातीला काही वर्षं राज्यव्यापी महिला परिषदा घेऊन हा दिवस त्यांनी साजरा केला. नंतरच्या काळात जिल्हा पातळीवर, पुढे चालून तालुका पातळीवर आणि आता जसा जमेल तसा साजरा करण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतो. इतर लोकही त्याला साथ देतात.
अशा दिवशी या वर्षी दखल घेण्यासारख्या दोन घटना नागपुरात घडल्या. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. विहिपचीही बैठक याच दिवसापासून नागपुरात सुरू झाली. त्यातील १० अपत्ये जन्माला घाला, यज्ञातून होणाऱ्या धुरामुळे पर्यावरण स्वच्छ होते, इत्यादी बाष्फळ बडबडीकडे आपण दुर्लक्ष केले तरी सरसंघचालक मोहन भागवतांनी दुसऱ्या धर्मात गेलेल्या हिंदू धर्मियांना पुनश्च हिंदु धर्मात आणण्याचं, एक प्रकारे ते पूर्वीपासूनच राबवत असलेल्या ‘घर वापसी’चं आवाहन बैठकीतील उपस्थितांना केलं. पण त्यांच्या दुर्दैवानं त्याच दिवशी नागपुरातच दीक्षा भूमीवर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप उपरे यांच्या नेतृत्वाखाली भंते सुरर्इ सुसोर्इ यांनी हिंदू धर्माचा त्याग करणाऱ्या हजारो ओबीसींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. एकप्रकारे या ओबीसी बहुजनांनी आपल्या मूळ घरात म्हणजे बौद्ध धर्मात ‘घर वापसी’च केली.
‘चलो, बुद्ध की ओर’ अशी घोषणाच सत्यशोधक ओबीसी परिषदेचे दिवंगत अध्यक्ष हनुमंत उपरे ‘काका’ यांनी दिली होती. ओबीसींनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारावा, यासाठी त्यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोहीमच सुरू केली होती. त्यासाठी मुंबर्इ, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, महाड अशा अनेक शहरांतून परिषदांचं आयोजन केलं होतं. त्याच्या तयारीसाठी ग्रामीण भाग पिंजून काढला होता. ओबीसींना हिंदू धर्माचे ठेकेदार असलेल्यांकडून कशी उपेक्षिततेची वागणूक मिळते, त्यांना शैक्षणिक व नोकरीविषयक सोयी सवलती मिळण्यात ते कशा अडचणी आणतात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या सवलती मिळाव्या यासाठी कसे प्रयत्न केले होते, इत्यादी बाबी ते या परिषदांमधून सोदाहरण मांडत होते. त्यांना ओबीसींकडून प्रतिसादही चांगला मिळत होता.
औरंगाबादच्या या परिषदेला मी स्वत: हजर होतो. त्यासाठी त्यांनी काही पुस्तिकाही काढल्या होत्या. पण उपरेकाकांचं मागील वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन झालं. त्यांचं हे कार्य त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यांचे चिरंजीव, संदीप पुढे नेत आहेत.
तेव्हा ओबीसींचं हे धर्मांतर अचानकपणे घडलेलं नाही, तर पूर्व व पूर्ण तयारीनिशी घडलेलं आहे. त्यांच्या मते ही त्यांची मूळ ‘घर वापसी’च आहे. त्याचा हा पहिला टप्पा असून ही मोहीम अशीच पुढेही चालू राहणार आहे. या धर्मांतराचं आंबेडकरी समाजानं उत्स्फूर्त स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी समाज दीक्षाभूमीवर हजर होता.
यापूर्वी भटक्या विमुक्तांचे नेते ‘उपरा’कार लक्ष्मण माने व एकनाथ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली २७ मे २००७ रोजी महाराष्ट्राच्या ४२ जातींतील ५० हजारांवर भटक्या विमुक्तांनी मुंबर्इतील लक्ष्मी रेसकोर्स मैदानावर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हिंदुधर्मातील जातीव्यवस्थेनं ग्रासलेल्या भारतात या समाजाला कस्पटाइतकीही किंमत नव्हती. चोर, लुच्चे, लफंगे, बदमाष, उचले, उपरे, असे समजून त्यांना जन्मताच गुन्हेगार मानलं गेलं. मानाचं तर सोडाच पण स्थिर जीवनही त्यांना या समाजव्यवस्थेनं लाभू दिलं नाही. अशा या समुदायानं आपल्या दु:ख व दारिद्र्याचं कारण जातीव्यवस्थेनं ग्रासलेला हिंदू धर्म आहे, असं मानून त्याचा त्याग केला आणि समतेचं तत्त्व मानणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.
त्याहीपूर्वी १२ जानेवारी २००५ रोजी मराठा सेवा संघाच्या नेतृत्वाखाली लाखांच्या संख्येनं मराठा समाजाने ‘शिवधर्माचा’ स्वीकार केला होता. बौद्ध धर्माच्या दिशेनं होणारी ही वाटचाल आहे, असं त्या धर्मांतराचं वर्णन डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केलं होतं. यात त्यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला, यापेक्षा विषमतेवर आधारलेल्या हिंदू धर्माचा त्याग केला, ही बाब महत्त्वपूर्ण समजली पाहिजे. सध्याच्या देशातील वाढत्या हिंदुत्ववादी उन्मादाच्या काळात भटक्या विमुक्त, ओबीसी बहुजनांच्या धर्म त्यागामुळे हे समाज हिंदू धर्माच्या वैचारिक गुलामगिरीतून मुक्त झाल्याने संघाच्या हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नाला जबरदस्त तडाखा बसणार आहे. याचं महत्त्व आंबेडकरवाद्यांप्रमाणे सर्वच पुरोगाम्यांनी ओळखून अशा धर्मांतराचं स्वागत केलं पाहिजे.
डॉ. आंबेडकर यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’मध्ये सांगितलेला बौद्ध धर्म निश्चितच इतर कोणत्याही व विशेषत: हिंदू धर्मापेक्षा कितीतरी पटीनं जास्त वैज्ञानिक व प्रगतीशील धर्म आहे. जगातील तिबेट, थायलंड, जपान, कंबोडिया, श्रीलंका इत्यादी बौद्ध धर्मीय देशातील बौद्ध धर्मापेक्षा तो निराळा आहे. या देशातील बौद्ध धर्म हा मूलत: समतेवर आधारलेला असला तरी कालक्रमात त्यात बरीच कर्मकांडं, अध्यात्म, अवतार व पुनर्जन्म इत्यादी बाबी घुसडलेल्या आहेत. पुनर्जन्मानुसार दलार्इ लामा हे एक अवतार पुरुष आहेत, असं मानलं जातं. त्यामुळेच डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या वरील ग्रंथावर जगातील काही बौद्ध भिक्कूंकडून ‘तो भगवान बुद्धाचा धर्म नसून डॉ. आंबेडकरांचा धर्म आहे’ अशा प्रकारची कडवट टीका झाली होती. ते काहीही असलं तरी डॉ. आंबेडकरांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात आताच्या काळातील भौतिकवादी वैज्ञानिक प्रगती, समतावादी विचार, त्यासाठी झालेले जगभरातील संघर्ष, याची दखल घेण्यात आली आहे.
सध्यस्थितीत अशा या धर्माचा प्रसार होणं एक प्रगतीशील पाऊल म्हणून श्रेयस्करच आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील कॉ.भारत पाटणकर, कॉ.धनाजी गुरव व त्यांच्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. नुकत्याच दिवंगत झालेल्या कॉ. सुलभा ब्रम्हे यांनीही आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात बौद्ध धर्म स्वीकाराची मनिषा व्यक्त केली होती. पुणे मनपा कामगार युनियनच्या सरचिटणीस व लाल निशाण पक्ष (लेनिनवादी) सचिव मंडळाच्या सदस्या कॉ. मुक्ता मनोहर यांनीही माझ्याकडे बोद्ध धर्म स्वीकारण्याची इच्छा व त्यासाठी काय करावं लागेल याची पृच्छा केली होती.
याचा अर्थ प्रत्येक मार्क्सवाद्यानं बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे अथवा बौद्ध धर्म प्रसाराचं कार्य हाती घेतलं पाहिजे असा नाही. जगातील महत्त्वाच्या धर्मांची निर्मिती ही मुख्यत: समाज गुलामगिरीच्या अवस्थेतून सरंजामी अवस्थेत प्रवेश करण्याच्या काळात झाली. त्या काळात त्यांनी निश्चितच प्रगतीशील भूमिका निभावली आहे. पुढील काळात या धर्मांचा वापर शोषक वर्गांनी शोषितांना वैचारिक गुलागिरीत ठेवून त्यांचं शोषण करण्यासाठी कसा केला हे सर्वज्ञात आहे.
भारतातील बौद्ध धर्म गणव्यवस्थेतून राजेशाहीकडे वाटचाल करत असतानाच्या काळात निर्माण झाला आहे. त्यामुळे राजेशाहीत असणाऱ्या वार्इट बाबींच्या तुलनेत गणव्यवस्थेत असणाऱ्या समता, लोकशाही यांसारख्या चांगल्या बाबींचा पुरस्कार भगवान बुद्धानी आपल्या धर्मात केला. म्हणूनच त्यांनी त्या काळी प्रचलित असलेल्या वर्णव्यवस्थेला, उदयोन्मुख जातीव्यवस्थेला विरोध केला. समाजातील दु:खाची कारणमीमांसा करून ते नष्ट करण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा उपचार सांगितला. त्या काळात प्रचलित असलेल्या ‘वेदं वाक्यं प्रमाणं’ला न मानता ‘अत्त दिप भव’चा सल्ला समाजाला दिला. त्यासाठी त्यांनी संस्कृत भाषेचा वापर न करता सर्वसामान्यांच्या व्यवहारातील पाली भाषेचा वापर केला.
इतर धर्मीयांच्या तुलनेत कितीतरी जमेच्या बाजू बौद्ध धर्मात आहेत, हे खरं असलं तरी तो अडीच हजार वर्षांपूर्वीचा धर्म आहे, सरंजामशाही उदयोन्मुखाच्या काळातील आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे काळाच्या मर्यादा जशा कोणालाच टाळता येत नाही, तशा मर्यादा भगवान बुद्धांनाही टाळता आल्या नाहीत, हे आपण मान्य केलं पाहिजे. स्त्रियांना धर्मात प्रवेश व त्यानंतर संघातील स्त्री-पुरुष समतेबद्दलच्या त्यांच्या विचारातून या मर्यादा स्पष्ट होतात. अडीच हजार वर्षानंतर डॉ. आंबेडकरांनी विद्यमान काळातील विविध शास्त्रातील वैज्ञानिक प्रगती, जगाच्या विविध देशांतील गुलामगिरी विरोधातील संघर्ष, वर्ण-वंशवादीविरोधी संघर्ष, लोकशाहीसाठीचे लढे, स्त्री-पुरुष समतावादी विचार इत्यादींची नोंद घेऊन भारतीय संविधानाची रचना करण्याचा आणि त्यामार्फत देशातील दलित, शोषितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना हक्क मिळण्यासाठी हिंदू कोड बिलाची रचना केली, तसंच समान नागरी कायद्याचाही पुरस्कार केला. त्यांच्या या विचारांचं प्रतिबिंब ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात पडणं साहजिक आहे. थोडक्यात, डॉ. आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म कालसुसंगत करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यावर इतर देशातील बौद्ध भिक्कूंनी टीका केली.
पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याची फिकीर केली नाही. त्यांना चिंता वाटत होती, ती तरुणांना आकर्षित करणाऱ्या व जगभर वाढणाऱ्या मार्क्सवादाची. ख्रिश्चनादी युरोपीय देशांतून क्रांत्या करून तर तो वाढत होताच, पण बौद्ध धर्मीय आशियायी देशातील चीन, व्हिएतनाम, उत्तर कोरिया, कंबोडिया, लाओस यांसारख्या देशातून तो सत्तास्थानी आला होता. लॅटिन अमेरिकेतील क्युबासारख्या देशात फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेराच्या नेतृत्वाखाली त्याने बस्तान बसवलं होतं. अशा जागतिक वातावरणात डॉ. आंबेडकर यांनी खाटमांडूला ‘बुद्ध आणि मार्क्स’ असं प्रसिद्ध भाषण दिलं. त्यात त्यांनी बुद्धिझम व कम्युनिझम या दोन विचारांची तुलना केली. त्यांच्या म्हणण्यानुसार बुद्धाला या जगातील ‘दु:ख’ नष्ट करायचं होतं, तर मार्क्सला ‘शोषण’ नष्ट करायचं होतं. दोघेही खाजगी संपत्तीच्या विरोधात होते. अशा रीतीने दोघांची उद्दिष्टं एकच होती. बुद्धाला (गणव्यवस्थेतील) लोकशाही अभिप्रेत होती, पण मार्क्स (कामगार-कष्टकऱ्यांच्या) हुकुमशाहीला त्याज्य मानत नाही, अशी डॉ. आंबेडकरांनी मांडणी केली. यावर विस्तारानं बरीच चर्चा होऊ शकते आणि वादही होऊ शकतो.
पण मला इथं एवढंच सांगायचं आहे की, डॉ. आंबेडकरांनी हे दोघे तत्त्वज्ञ शत्रूसारखे एकमेकांसमोर पर्याय म्हणून उभे केले नव्हते, तर ‘बुद्ध आणि मार्क्स’ असे एकमेकाला पूरक म्हणून त्यांच्या विचार व्यवहाराची मांडणी केली होती. त्यात त्यांनी स्वत: भगवान बुद्धाचा मध्यममार्ग निवडला. हे दोघेही तत्त्वज्ञ स्थितीप्रिय नसल्यामुळे त्यांच्या विचारांचा कालसुसंगत अर्थ आपण लावू शकतो. डॉ. आंबेडकरांनी यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात जसा तो लावला, तसाच तो मार्क्सनंतरच्या जगभरातील मार्क्सवाद्यांनीही लावला आहे. त्याला अपवाद फक्त पारंपरिक भारतीय मार्क्सवाद्यांचा करता येर्इल. मार्क्स जणू काही धर्माकडे केवळ नकारात्मकरीत्याच पाहतो, तो जणू काही धर्मसंस्थेचा शत्रूच आहे, असंच त्यांचं चित्र उभं केलं आहे. मार्क्सने ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ एवढंच म्हटल्याचं उच्चरवानं सांगितलं जातं. पण ज्या परिच्छेदामधून त्यांचं हे वाक्य ओरबाडलं जातं, त्यात ‘धर्म हे या हृदयशून्य जगाचं हृदय आहे’ असंही त्यांनी म्हटलं आहे. पण ते मात्र प्रस्थापित भांडवली व्यवस्थेशी हितसंबंध जुळलेले विचारवंत सांगत नाहीत.
यावरून मार्क्सनं धर्मसंस्थेच्या निर्मितीपासून तर तिच्या अंतापर्यंतच्या प्रक्रियेचं अवलोकन अगदी शास्त्रीय पद्धतीनं केलं असल्याचं आपणाला दिसून येर्इल. लेनिन- माओसारख्या नंतरच्या मार्क्सवाद्यांनी जनतेतील धार्मिक भावना व्यवहारिक पातळीवर कशा समजावून घ्याव्यात याबाबत बरीच भर घातली आहे. यावरून मार्क्सवादी जसे धर्मांध नाहीत, तसंच ते धर्मवेडेही नाहीत, म्हणून ते धर्माकडे नकारात्मकदृष्टीनं पाहत नाहीत, हे लक्षात येतं. थोडक्यात, भारतातील बौद्ध धर्मात भगवान बुद्धानंतर सम्राट अशोक, कनिष्क, धर्मकीर्ती, दिग्नाक, नागार्जुन, नागसेन, धर्मानंद इत्यादींनी कालपरत्वे भर घालून विषमतावादी विचार व्यवहारांशी संघर्ष केला आहे. बरेचदा बरीचशी घसरणही झालेली आहे. त्यामुळे बरेचदा ते पराभूतही झाले असतील, पण त्यांनी संघर्ष केला हे महत्त्वाचं आहे.
म्हणून तर कॉ. शरद पाटील यांनी माफुआंपासून सुरुवात करून तो दिग्नाकांच्या सौत्रांतिक मार्क्सवादापर्यंत आणला आहे .तो परिपूर्ण व सर्वांनाच पटण्यासारखा नसला तरी त्याची दखल मात्र घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत आपणाला जी समतावादी समाजरचना आणावयाची आहे, त्याची मुळे या भारतीय समाजातच रुतलेली आहेत, असं जर कोणाला वाटत असेल आणि त्या परंपरेचे पार्इक होऊनच आपणाला भावी काळात समताधिष्ठित समाज आणण्यासाठी संघर्ष करता येर्इल, या विचारानं काही कार्यकर्ते बौद्ध धर्माकडे पाहत असतील तर त्याचं आपण एका मर्यादित अर्थानं का होर्इना, पण स्वागतच करायला पाहिजे.
लेखक मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment