गेल्या आठवड्यात महाराष्ट्र काँग्रेसचं दोन वेळा अध्यक्षपद भूषवलेले, राज्यात प्रदीर्घ काळ मंत्री राहिलेले रणजित देशमुख यांचा मुलगा आशीष देशमुखचा फोन आला. माजी आमदार असलेल्या आशीषनं सांगितलं, ‘बाबा (म्हणजे रणजित देशमुख) येत्या २९ मे रोजी पंचाहत्तरीत प्रवेश करताहेत.’
मन एकदम भूतकाळात गेलं. रणजित देशमुख आणि माझी पहिली ओळख १९८१ साली झाली. माझी स्मरणशक्ती तर बरोबर असेल तर तेव्हा ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मुख्य वार्ताहर दिनकरराव देशपांडे यांनी माझी रणजित देशमुख यांच्याशी ओळख करून दिली. निळ्या गर्द रंगाचा सफारी सूट घातलेले, केस मागे वळवल्यामुळे भालप्रदेश विस्तृत दिसणारे, सोनेरी काड्यांचा मोठ्या फ्रेमचा चष्मा घातलेले आणि अस्सखलित मराठी आणि इंग्रजीत सूचना देणारे रणजित देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर न शोभणारे होते. कारण तोपर्यंत जे जिल्हा परिषद अध्यक्ष बघितले होते, त्यांची इंग्रजीवर फारशी तशी हुकमत नव्हती. पुढे कळलं की, ते इंजिनिअर आहेत.
रणजित देशमुखांशी मैत्रीचा सुरू झालेला सिलसिला अजून कायम आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणारा एक कर्तबगार नेता, अशी त्यांची वाटचाल मी बघितली आहे. सत्तेमध्येच असताना ‘एन. के. पी साळवे इन्सिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असो की, ‘लता मंगेशकर हॉस्पिटल’ असो किंवा अन्य शैक्षणिक संस्थांचा पसारा असो किंवा सहकार क्षेत्रातील साखर कारखान्याचं त्यांनी उभारलेलं जाळं असो, अशी कर्तबगारी गाजवणारे रणजित देशमुख या काळात बघता आले.
आमच्या मैत्रीचं एक गुपित इथे सांगून टाकायला हरकत नाही. रणजित देशमुख हे कट्टर विदर्भवादी आणि मी कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी. त्यामुळे आम्हा दोघांची खूप जुंपतही असते. रणजित देशमुखांना कधीही फोन केला की, बोलण्याची सुरुवात मी ‘जय महाराष्ट्र’नं करतो आणि ते तिकडून ‘जय विदर्भ’ म्हणून बोलायला सुरुवात करतात. त्यांनी मला अनेकदा ‘प्रवीण, तुम्ही जर विदर्भाचे जावई नसता तर बुकलून काढलं असतं,’ अशी धमकी दिलेली आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आणखी एक गुपित इथं सांगायला हरकत नाही. रणजित देशमुखांना गाणं ऐकण्याचा शौक आहे. ते स्वत: गातातही उत्तम. एका मध्यरात्री पैठण ते औरंगाबाद प्रवास करताना ते स्वत: गाडी चालवत होते. (त्यांना एकेकाळी ड्रायव्हिंगचाही शौक होता. आता प्रकृती अस्वस्थ्यामुळे जमत नाही.) पैठण ते औरंगाबाद आमचं घर येईपर्यंत ते हेमंतकुमारची गाणी गात होते. मला आठवतं, आमचा तो प्रवास फार छान झाला होता. हेमंतकुमार यांचं ‘बेकरार कर के हमें यू न जाइये’ हे त्यांचं आवडतं गाणं.
१९९५ची एक घटना सांगतो. रणजित देशमुख यांच्या स्वभावाची चुणूक त्यात जाणवेल. विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले होते आणि तेव्हा सावनेर मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या रणजित देशमुखांचा सुनील केदार यांच्याकडून पराभव झालेला होता. पत्रकारितेतला सहकारी धनंजय गोडबोले, प्रकाश देशपांडे, सिद्धार्थ सोनटक्के वगैरे आम्ही ठरवून त्यांच्याकडे पोहोचलो. सिव्हिल लाइन्समधल्या त्यांच्या घरी नेहमीची लगबग नव्हती, तसा सन्नाटाच होता. एव्हाना रणजित देशमुखांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. त्यांची मुलं आशिष आणि अमोल मला काकाच म्हणायचे. आशिष देशमुख तर माझा लाडका पुतण्या आहे. आम्ही गेलो, तर रणजित देशमुख सोफ्यावर शांतपणे वृत्तपत्र वाचत बसले होते. आम्ही बसलो, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग मी त्यांच्या पराभवाचा विषय काढला.
तेव्हा ते म्हणाले की, ‘निवडणुकीत जय-पराजय चालायचेच. राजकारणात असे चढ-उतार येतच असतात. माझ्यासाठी प्रश्न इतकाच आहे की, मतदारसंघात आपण इतकं काम केल्यानंतरही आपला पराभव का झाला, या कारणांचा शोध आपण घ्यायला हवा.’ रणजित देशमुख कुठल्या जातकुळीचे राजकारणी आहेत, म्हणजे एखाद्या घटनेकडे किती बारकाईनं बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन असतो, कितीही संकट आलं तरी, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘कुलली’ घेण्याचा त्यांचा हा असा स्वभाव आहे. बरीच चर्चा झाल्यावर उठता उठता रणजित देशमुखांना म्हणालो, ‘पराभवाचंही आता सेलिब्रेशन करायला हवं.’
तेव्हा ते हसत हसत म्हणाले, ‘बिलकुल. का नाही?’.
मग मी म्हटलं ‘कधी?’ तर ते म्हणाले, ‘आजच रात्री बसू या.’
मग त्या रात्री आम्ही त्यांच्या पराभवाचं सेलिब्रेशन केलं! पराभवसुद्धा इतक्या दिलेरपणे घेणारा असा राजकारणी विरळाच!
रणजित देशमुखांची एकूण कारकीर्द पंगा घेणं आणि पंगा निभावणं अशा पद्धतीची राहिलेली आहे. एक प्रसंग सांगतो. रणजित देशमुख आणि सुनील शिंदे (आम्ही सोनूबाबा म्हणायचो.) आमदार होते, पण मंत्रिमंडळात नव्हते. तेव्हा या दोघांचं गृहराज्यमंत्री असलेल्या श्रीकांत जिचकारांशी राजकीय घमासान सुरू होतं. नरखेडच्या कुठल्यातरी प्रश्नावरून तर सोनूबाबा आणि श्रीकांत जिचकार हमरीतुमरीवर आलेले होते. सोनूबाबा आणि रणजित देशमुख एका गटाचे. त्यामुळे त्या लढाईला श्रीकांत जिचकार विरुद्ध रणजित देशमुख आणि सोनूबाबा असं स्वरूप प्राप्त झालं होतं. एका क्षणी खूप मोठी गडबड झाली आणि नरखेड रस्त्यावर सोनूबाबांच्या समर्थकांकडून जिचकारांच्या गाडीवर दगडफेक झाली. गृहराज्यमंत्र्याच्या गाडीवर दगडफेक होणं आणि त्यातही तो गृहराज्यमंत्री मुख्यमंत्र्याचा लाडका असेल, तर त्याचे पडसाद गंभीरपणे उमटणं स्वाभाविक होतं. समर्थकांसह सोनूबाबांनाही अटक झाली. रणजित देशमुखांनी बेल घेण्यास स्पष्ट नकार दिला. ‘मी जामिनासाठी कोणतीही विनंती करणार नाही. कारण आमचं काही चुकलेलं नाहीये’ असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून सुनील शिंदेंनीदेखील जामीन घ्यायला नकार दिला. दोघांची रवानगी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाली.
प्रकरण फार चिघळू देणं मुख्यमंत्र्यांसाठी शक्य नव्हतं. असेच सात-आठ दिवस गेले. शरद पवारांना मध्यस्थी घालण्यात आलं. ते तेव्हा मुख्यमंत्री नव्हते. पण पवार नागपूरला आले आणि त्यांनी रणजित देशमुख आणि सुनील केदार यांना समजावलं आणि ते कारागृहाबाहेर आले.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
याला हट्टीपणा म्हणता येणार नाही. ते आपल्या भूमिकांवर ठाम असणं होतं. रणजित देशमुख विदर्भातले असे राजकारणी आहेत की, ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात गावपातळीवर संपर्क आहे. त्यांचं संघटन कौशल्य वादातीत आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमधून सुरुवात करताना त्यांनी आपलं संपूर्ण राज्याचं नेटवर्क करायला सुरुवात केली होती आणि मंत्रिमंडळात आल्यावर त्यांनी हा गुण अधिक जोमानं जोपासला आणि महाराष्ट्रभर संपर्क निर्माण केला.
ते सत्तेत नसतानासुद्धा त्यांच्याभोवती लोक जमा होत, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते राज्यमंत्री झाले, मंत्री झाले, अनेक खात्यांचं त्यांनी मंत्रिपद भूषवलं. ग्रामीण विकास, कृषी, सिंचन ही खाती शहरापेक्षा ग्रामीण भागाशी जास्त संपर्क असणारी आहेत आणि ती सांभाळताना रणजित देशमुखांना लाभ मिळाला.
मंत्री म्हणून काम करताना रणजित देशमुखांनी प्रादेशिक अभिनिवेश बाळगला नाही आणि स्वतंत्र विदर्भाचा आग्रही सोडला नाही. त्यांची प्रशासनावर पकड मजबूत होती. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर विदर्भातल्या लोकांना खिजगिणतीतही न ठेवण्याचं एकंदरीत प्रशासनाचं धोरण होतं, पण रणजित देशमुखांनी खमकेपणानं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ते धोरण मोडून काढलं. विशेषत: सनदी अधिकाऱ्यांना पदाचा तोरा असतो. आपण समोरच्यावर वरचढ होऊ अशा शैलीनं ते वागत असतात, पण रणजित देशमुख यांनी एका बैठकीत एका सनदी अधिकाऱ्यावर असा कणखर आवाज काढला की, प्रशासनात त्यांच्या नावाचा दरारा निर्माण झाला!
विदर्भाच्या किंवा त्यांच्या खात्याच्या प्रश्नाच्या फाइली घेऊन ते मंत्रालयात वेगवेगळ्या दालनांत फिरत असत. त्यांना त्याच्यात कधीच कमीपणा वाटत नसे. एखादं काम करवून घेण्याची जी हातोटी एखाद्या प्रशासकाला लागते, ती त्यांच्यामध्ये होती. नागपूरचं आजचं जे काही स्वरूप बदललेलं आहे, त्याचं स्वाभाविक श्रेय निश्चितच नितीन गडकरी यांचं आहे, पण रणजित देशमुखांच्या मनामध्येही ज्या काही विकासाच्या कल्पना होत्या, त्यात नागपूरचा विकास हाही एक मुद्दा होता. आणि नागपूरच्या या बदललेल्या स्वरूपाची अगदी रस्त्याच्या विस्तारीकरणापासून ते महाराज बागेचं मोठं झू करणं किंवा फूड पार्क, गारमेंट पार्क या सर्व योजनांची पूर्वआखणी रणजित देशमुखांच्या काळामध्ये झालेली होती.
रणजित देशमुख पुढे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांनी खूप छान काम केलं. १९९८ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र काँग्रेसचा सुवर्णकाळ म्हणावी लागेल. तेव्हा काँग्रेसला राज्यात ३७ जागा मिळलया होत्या. त्यानंतर तसं यश महाराष्ट्रात काँग्रेसला कधीच लाभलं नाही. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी रणजित देशमुख जालन्याला आले, तेव्हा दै. ‘लोकसत्ता’चा विशेष प्रतिनिधी म्हणून मी काम करत होतो. त्यांचा निरोप मिळाला. रात्री ते जालन्याहून आल्यानंतर पुढे त्यांना पैठणला अनिल पटेल यांच्याकडे जेवायला जायचं होतं.
या दरम्यान रणजित देशमुख यांना कळलं की, ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांना औरंगाबादच्या ‘परिवर्तन’ या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘बी रघुनाथ’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे. रणजित देशमुख राजकारणी, पण त्यांना बी रघुनाथ, अकोल्याचे नारायण कुलकर्णी कवठेकर आणि परिवर्तन ही संस्था आणि त्या पुरस्कारचं मोलही माहिती होतं. त्यांचा मला फोन आला की, ‘तुझा काय कार्यक्रम आहे?’
‘नारायण कुलकर्णी माझा दोस्त, तेव्हा मी त्या कार्यक्रमाला जाईन. तुम्ही मला तिथूनच पिकअप करा’ असं मी म्हणालो. तर रणजित देशमुख म्हणाले की, ‘मी जालन्याहून लवकर येतो आणि त्या कार्यक्रमात सहभागी होतो.’ त्यानुसार ते पाच-साडेपाच वाजता औरंगाबादला थेट माझ्या घरीच आले. आम्ही दोघं तिथून संत एकनाथ मंदिरमधल्या बी रघुनाथ पुरस्कार वितरण सोहळ्याला गेलो. श्रोत्यात बसून शांतपणे त्यांनी त्या कार्यक्रमाचा आणि कवी नारायण कुलकणी कवठेकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही रात्री पैठणला गेलो. तिथं आमच्या गप्पा सुरू असतानाच त्यांचं राजकीय काम सुरू होतं.
त्यांचा निवडणुकीचा आवाका कसा होता, याचा इथं एक अनुभव सांगतो. त्यांना असं वाटत होतं की, जालन्याला सोनिया गांधी यांनी प्रचारासाठी यावं. त्यांची एक सभा जरी झाली तर जालन्याची जागा निघू शकते. त्यासाठी तेवढ्या रात्री ते सोनियाजींना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर कसाबसा सोनिया गांधी यांचे सचिव व्ही. जॉर्ज यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी त्यांना सगळं सांगितलं. जॉर्जनी सांगितलं की, मी प्रयत्न करतो आणि मॅडमशी सकाळी बोलणं करून देतो.
आमचं जेवण वगैरे आटोपलं. खाणं आणि खिलवणं हा रणजित देशमुखांचा शौकच होता. आम्ही ते सर्व आटोपून बाहेर आलो. अनिल पटेल यांनी नुकतीच नवीन कार घेतली होती. ती बघितल्यावर रणजित देशमुखांना कार चालवण्याची खुमखुमी आली. अतिशय सराईतपणे कार चालवत असलेल्या रणजित देशमुख यांना गाण्याचा मूड आला आणि मग संपूर्ण प्रवासभर आम्ही हेमंतकुमारची गाणी ऐकली.
रणजित देशमुखांचा स्वभाव पंगा घेण्याचा होता. त्यांचा नागपूरच्या राजकारणात उदय झाला, तेव्हा बॅरिस्टर वानखेडे, दत्ता मेघे, नरेंद्र तिडके ही मंडळी मात्तबर झालेली होती. त्यात शरद पवारांचे लाडके असलेले बाबासाहेब केदारही होते. ते सहकार क्षेत्रातले दिग्गज नेते होते. त्यांचं आणि रणजित देशमुखांचं कधी पटायचं नाही. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना एक वेळ अशी आली की, नागपूरहून रणजित देशमुख आणि बाबासाहेब केदार दोघंही जण एकाच वेळी राज्यमंत्री झाले आणि दोघांमध्ये खूप जुंपलेली होती. काँग्रेसच्या विरोधी गटातून रणजित देशमुखांना मंत्रिमंडळातून वगळावं अशी मागणी सुरू झाली, दबाव वाढला. अखेर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि पंतप्रधान नरसिंह राव यांना सांगण्यासाठी सुधाकरराव नाईक दिल्लीला गेले.
या सगळ्या हालचालींची आधीच खबर रणजित देशमुखांना लागलेली होती. त्यामुळे त्यांनीही पुरेशी मोर्चेबांधणी केलेली होती. सुधाकरराव नाईकांची आणि त्या शिष्टमंडळातल्या लोकांची जेव्हा नरसिंह राव यांच्याशी भेट झाली, तेव्हा यांनी काही मागणी करण्याच्या आतच नरसिंह राव सुधाकरराव नाईकांना म्हणाले, ‘सुधारकरराव, तुम्ही रणजित देशमुखांना कॅबिनेट मंत्री का करत नाही? एवढा कर्तबगार माणूस आहे!’ आणि या लोकांची खूप पंचाईत झाली. तर हे असं पंगा घेण्याचं काम आहे आणि ते निस्तरण्याचं कौशल्यही रणजित देशमुखांमध्ये आहे.
शरद पवार आणि विलासराव देशमुख या दोघांशी त्यांचं नातं असंच. राजकारणातल्या सुरुवातीच्या दिवसापासूनचं रणजित देशमुख यांची दिल्लीतली मोर्चेबांधणी जबर होती. राजकारणातला त्यांचा प्रवेश संजय गांधी यांचे समर्थक म्हणून झाला आणि दिल्लीत त्यांनी त्यांचे गॉडफादर चांगले तयार करून ठेवले होते. एन. के. पी. साळवे, खुद्द नरसिंहराव अशी ती त्यांच्या राजकीय गॉडफादरची बडी बडी नावं आहेत.
रणजित देशमुखांची वयाची साठी साजरी झाली, तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा नागपूर येथे संपादक होतो. त्या कार्यक्रमात बोलताना मी म्हणालो होतो की, रणजित देशमुख यांच्यामध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, पण ते स्वतंत्र विदर्भाच्या भोवतीच घोटाळत राहिले, हे त्यांचं फार मोठं अपयश आहे. खूप मोठी क्षमता असूनही स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दयाच्या भोवतीच ते रेंगाळत राहिले आणि त्यांना मग पुढे फार मोठी झेप घेता आली नाही. अन्यथा एक अतिशय कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता, याबद्दल शंका नाही, पण त्या भूमिकेला रणजित देशमुख स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला आयुष्यभर चिकटून राहिले आणि राज्याचं नेतृत्व मिळण्याची संधी त्यांनी गमावली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
रणजित देशमुखांनी आजपर्यंत ‘तू ही बातमी का छापली? किंवा माझ्यावर टीका का केली? किंवा माझ्या विरोधकांना बळ देण्याचं तू एक पत्रकार म्हणून का केलं?’ अशी विचारणा कधीही केली नाही. मीही आजवर त्यांना एकही काम सांगितलं नाही. निखळ असा मैत्रीचा आमचा प्रवाह आहे. रणजित देशमुख यांच्यासारखा दिलदार राजकारणी मित्र विरळाच, हेही मला आवर्जून सांगायला हवं.
आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात रणजित देशमुखांचा अजून एक ड्रा-बॅक सांगतो- स्वत:ची टिमकी वाजवावी, स्वत:चा पीआर करून घेणं त्यांना जमलं नाही. सध्याच्या राजकारण्यांच्या ट्रेंडमध्ये ‘इमेज मेकिंग’ हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यातही ते कमी पडले. पण ते असो, कारण असा राजकारणी आणि मित्र अतिशय विरळाच असतो.
घरातली ती जी जुनी संदुक आपण उघडतो, तेव्हा त्यात ठेवलेल्या अत्तराचा सुगंध आसमंतात दरवळतो. रणजित देशमुख यांच्याशी असणारी मैत्री ती अशी जुनी, अस्सल आणि आसमंतात दरवळणाऱ्या अत्तरासारखी आहे. अशा या कर्तबगार मित्राला, नेत्याला वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करत असताना शुभेच्छा देतो, दीर्घायुरारोग्य चिंततो.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment