भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा पाचवा लेख...
..................................................................................................................................................................
कलेचं क्षेत्र कोणतंही असो, कलाकृती निर्माण करताना कलाकारानं त्यासाठी पुरेसा वेळ घेणं गरजेचं असते. उत्स्फूर्तपणा हा कलाकाराचा गुण असला तरी चित्रपटासारख्या तांत्रिक कलेमध्ये अनेक सर्जनशील कलाकारांचा सहभाग असतो. त्यामुळे तिथं कलाकृती दर्जेदार होण्यासाठी एक विशिष्ट कालावधीची अपेक्षा असते. विषय संशोधन, संकल्पना मांडणी, पटकथालेखन, योग्य कलाकारांची निवड, वेशभूषा अशी चित्रीकरणाच्या आधी लागणारी तयारी आणि प्रत्यक्ष चित्रीकरण झाल्यानंतर संकलन, ध्वनी आरेखन हे तांत्रिक संस्कार करण्यासाठी महिनोनमहिने खर्च होतात. मुबलक वेळ वापरूनही निर्माण झालेला सिनेमा उत्तम असेलच याची खात्री देता नाही. तरीही चरित्रपट, ऐतिहासिक कथानकांवर आधारित चित्रपट किंवा विज्ञानपटांची निर्मिती झटपट होऊ शकत नाही, हे खरे! ‘मी अगदी मोजक्या दिवसांत आणि थोड्या भांडवलात चित्रपट निर्माण करू शकतो’ असा आत्मविश्वास असणारा दिग्दर्शकही त्याच्या कलाकृतीला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही, हेसुद्धा आपल्याला अनेकदा अनुभवाला येत असते.
एखाद्या दिग्दर्शकाने गेल्या काही वर्षांत किती चित्रपट निर्माण केले, याचं कौतुक करण्यापेक्षा त्याने किती मोजकेच पण लक्षणीय चित्रपट दिले, त्याची दखल घेणं महत्त्वाचं ठरतं. मोजक्याच पण लक्षणीय कलानिर्मितीच्या निकषावर तेलुगु चित्रपटसृष्टीतील नाग अश्विन या तरुण दिग्दर्शकाने निर्माण केलेल्या चित्रपटांचं मूल्यमापन करायला हवं.
आई-वडील डॉक्टर असूनही नाग अश्विनचा ओढा शालेय जीवनापासूनच कलाक्षेत्राकडे होता. त्यामुळे त्याने मास कम्युनिकेशनची पदवी घेतल्यानंतर न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून चित्रपटनिर्मितीचं प्रशिक्षण घेतलं. अशा प्रकारे परदेशात प्रशिक्षण घेऊन तेलुगु चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या मोजक्या दिग्दर्शकामध्ये अश्विनची गणना होते. त्याने अजय शास्त्री आणि शेखर कम्मुला या दिग्दर्शकांचा सहाय्यक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. ‘नेनु मिकू तेलुसा..?’, ‘लीडर’ आणि ‘लाईफ इज ब्युटीफुल’ या व्यावसायिक चित्रपटांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्याने आपल्या भविष्यातील कामाची दिशा ठरवून टाकली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चारही प्रदेशांतील प्रेक्षकांची चित्रपटांबद्दलची अभिरुची भिन्न आहे. तिथली व्यावसायिक गणितंसुद्धा वेगळी आहेत. गेल्या दहा वर्षांत मल्याळम इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलला आहे. तिथला प्रेक्षकवर्ग आशयाच्या पातळीवर अधिक सजग आणि संवेदनशील झाला आहे. तामिळ आणि तेलुगुमध्ये क्षोभनाट्याला अजूनही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कलात्मक प्रयोगापेक्षा वास्तववादी आशयाला मसाल्याची फोडणी असेल तर प्रेक्षकांचा प्रतिसाद तिथं अधिक मिळतो. कन्नडमध्ये कलात्मक चित्रपटाचा एक प्रेक्षकवर्ग आहे. व्यावसायिक फिल्ममेकर्स मात्र तामिळ आणि तेलुगु चित्रपटांचं अनुकरण करण्यातच धन्यता मानतात.
नाग अश्विनने स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाचा निर्णय घेतला, तेव्हा त्याने आपल्या प्रदेशातील प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेतली. या प्रेक्षकाला जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगायचं असलं तरी ते हलक्याफुलक्या पद्धतीनं सांगायला हवं, याची त्याला जाणीव होती. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘येवडे सुब्रमण्यम’ या पहिल्याच चित्रपटात याचा प्रत्यय पहायला मिळतो. ‘यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी जीव तोडून मेहनत करताना आपण आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाला मुक्त असतो, क्षणभंगुर असलेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदानं जगता यायला हवं’ असं आशयसूत्र असलेला ‘येवडे सुब्रमण्यम’ हा चित्रपट अश्विनने नर्मविनोदी पद्धतीनं हाताळला.
‘येवडे सुब्रमण्यम’चा अर्थ आहे – ‘कोण हा सुब्रमण्यम?’ आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या ‘येवडे सुब्रमण्यम’चा नायक आहे- सुब्रमण्यम (नानी) उर्फ सुब्बु. लहानपणापासून सुब्बु गंभीर प्रवृत्तीचा मुलगा. मॅनेजमेंटची पदवी घेऊन त्याने पशुपती (नासीर)च्या कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळवलेली असते. हरहुन्नरी सुब्बुबरोबर आपल्या मुलीचं, रियाचं लग्न लावून देण्याच्या तयारीत पशुपती असतो. याच दरम्यान त्याच्या घरी त्याचा बालमित्र ऋषी (विजय देवरकोंडा) येतो. तो सुब्बुच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा, स्वछंदी, मोकळाढाकळा, आयुष्य आपल्या अटीनुसार जगणारा. त्याला सुब्बुची ओढाताण लक्षात येते. तो त्याला एका प्रोजेक्टमध्ये मदत करत असताना त्यांची ओळख आनंदी (मालविका नायर)बरोबर होते. दुर्दैवानं तो प्रोजेक्ट फेल जातो आणि सुब्बुचा ताण अधिक वाढतो. अचानकपणे एका अपघातात ऋषीचं निधन होतं आणि सुब्बु पुरता कोलमडतो.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
ऋषीबरोबर दुधकाशी नदीला भेट देण्याचं त्याचं स्वप्न अपुरं राहतं. ऋषीच्या अस्थी दुधकाशी नदीत विसर्जित करण्याचं तो ठरवतो. तो आणि आनंदी दुधकाशीच्या प्रवासाला निघतात. नेपाळमध्ये एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याशी असलेल्या दुधकाशीपर्यंत पोहचताना सुब्बुला जे अनुभव येतात, त्यामुळे त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन बदलून जातो. आपलं धकाधकीचं आयुष्य समाधानानं जगण्याचा नवीन मार्ग त्याला सापडतो.
नाग अश्विनने ‘येवडे सुब्रमण्यम’ दिग्दर्शित करताना चित्रपटाचा खेळकर मूड शेवटपर्यंत कायम ठेवला आहे. ऋषीसारख्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या मृत्यूनंतरही चित्रपट गंभीर होत नाही. एव्हरेस्ट पर्वतराजीच्या दुधकाशी नदीच्या परिसरात चित्रित झालेला हा पहिलाच प्रादेशिक चित्रपट. अर्थात हे स्थळ त्या चित्रपटाच्या कथेचा एक महत्त्वाचा भाग बनून येतं. मृत्यूनंतर निसर्गाशी तादात्म्य पावण्याची इच्छा असणारा ऋषी आणि त्याची इच्छापूर्ती करताना मी कोण? या प्रश्नाचं उत्तर गवसलेला सुब्बु या व्यक्तिरेखा मांडणाऱ्या ‘येवडे सुब्रमण्यम’ला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि नाग अश्विनने तेलुगु चित्रपटसृष्टीत आपलं स्थान कायम केलं.
पुढच्या ‘महानटी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटानं त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली. सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटानं मिळवला. ‘येवडे सुब्रमण्यम’नंतर तब्बल तीन वर्षाच्या अंतरानं ‘महानटी’ प्रदर्शित झाला. तो पाहताना नाग अश्विनने घेतलेली मेहनत लक्षात येते.
तेलुगु चित्रपटसृष्टीतील सावित्री या अव्वल दर्जाच्या अभिनेत्रीच्या आयुष्यातील चढउतारांचं चित्रण करणारा ‘महानटी’ हा चरित्रपट कसा असावा याचं आदर्श उदाहरण आहे. तेलुगु चित्रपटांच्या गेल्या नव्वद वर्षांच्या इतिहासात सावित्री या अभिनेत्रीला ‘महानटी’चा मान देण्यात आला आहे. ‘आपल्याकडे दिग्गज कलावंतांचं कौतुक केलं जातं, त्यांचा गौरव केला जातो, मात्र त्या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, घेतलेली मेहनत नेहमीच नजरेआड केली जाते. त्यांचा सामान्य माणूस ते दिग्गज कलावंत हा प्रवास लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी महानटीमधून केला आहे’, असं नाग अश्विन सांगतो.
‘महानटी’च्या माध्यमातून त्याने तेलुगु चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उभा करताना, त्या काळातील कलावंतांची जीवन शैली, त्यांच्या वाट्याला आलेले संघर्ष, सिनेमा व्यवसायात वावरणाऱ्या भल्याबुऱ्या माणसांची मानसिकता याचं वास्तववादी चित्रण केलं आहे. त्याचबरोबर या कलावंतांच्या लोकप्रियतेचा आजच्या पिढीवर असलेला प्रभावदेखील समांतर कथानकातून मांडला आहे.
घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या सावित्रीला तिचा लहान मुलगा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. प्रथम तिला हॉस्पिटलचे कर्मचारी ओळखत नाहीत, नंतर मात्र तिच्यावर उपचार सुरू होतात. मीडियाला ही बातमी समजल्यावर हॉस्पिटलजवळ बातमी मिळवण्यासाठी पत्रकारांची झुंबड उडते. या पत्रकारांमध्ये एक असते मधुरवाणी (सामन्था अन्निकेनी). ती आपला छायाचित्रकार मित्र विजय अन्थोनी (विजय देवरकोंडा)च्या मदतीनं सावित्रीचा भूतकाळ शोधू लागते. तिच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या मुलाखतींमधून तिला सावित्रीची कहाणी समजत जाते.
आंध्र प्रदेशमधील गुंटुर जिल्ह्यात जन्मलेल्या सावित्रीची चित्रपटातील कारकीर्द वयाच्या चौदाव्या वर्षी सुरू झाली होती. मद्रासमधील विजयावाहिनी स्टुडिओमध्ये तिला चित्रपटांत छोट्या भूमिका करायला मिळाल्या. तामिळ भाषा येत नसल्यानं तिच्या हातून काही महत्त्वाच्या भूमिका निसटल्या. त्यानंतर तिने आपल्या संवादफेकीवर मेहनत घेतली. देखणं रूप, बोलके डोळे आणि अंगभूत अभिनयाची जाण असल्यानं ‘देवदासू’, ‘मिसअम्मा’, ‘मायाबाजार’ या चित्रपटांनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसवलं.
पुढे तिला ए.नागेश्वर राव यांच्यासारख्या सुपरस्टारबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान ती जेमिनी गणेशन या अभिनेत्याच्या प्रेमात पडली. विवाहित असलेल्या जेमिनी गणेशनबरोबर संसार थाटण्याच्या तिच्या निर्णयाला कुटुंबीयांनी विरोध केला, पण सावित्रीनं त्यांना न जुमानता जेमिनी गणेशन यांच्याबरोबर लग्न केलं. त्यानंतर तिला आयुष्यात मिळालेलं यश, प्रसिद्धी, तिचा दानशूरपणा आणि त्यामुळे पती-पत्नीमध्ये आलेला दुरावा, पतीच्या बाहेरख्यालीपणामुळे आलेलं वैफल्य, त्यातून लागलेलं दारूचं व्यसन या सगळ्या अवस्थांचं चित्रण ‘महानटी’मधून आपल्यासमोर येतं.
सावित्रीच्या बरोबरीनेच जेमिनी गणेशन, ए.नागेश्वर राव या तत्कालीन नायक म्हणून लोकप्रिय असलेल्या अभिनेत्यांच्या मानवी चेहऱ्याचीदेखील ओळख होते. चित्रपटसृष्टीतील लोकप्रियतेची किंमत कलावंताना कशा प्रकारे चुकवावी लागते, त्याचं ‘महानटी’ हे उत्तम उदाहरण आहे.
नाग अश्विनने तटस्थपणे सावित्रीचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. १९५०-८० काळ तपशीलवारपणे उभा करण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत जागोजागी दिसून येते. वेगवेगळ्या काळासाठी वापरलेला रंगाचा पोत, समर्पक वेशभूषा आणि रंभूषा, तसेच सावित्रीने अभिनय केलेल्या अनेक चित्रपटांच्या मूळ फिती न वापरता त्यांचं पुनर्चित्रण करण्याच्या त्याच्या निर्णयाचं कौतुक करावंसं वाटतं.
‘महानटी’ची शीर्षक भूमिका करणारी कीर्ती सुरेश आणि जेमिनी गणेशनची भूमिका करणारा दुगलर सलमान या कलावंतांनी आपापल्या व्यक्तिरेखांची नस अचूक पकडली आहे. कीर्ती सुरेशला या भूमिकेसाठी अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे, यातच सर्व आलं. आपल्या इतर कलाकृतींमध्ये प्रेक्षकानुनय करणारा नाग अश्विन ‘महानटी’मध्ये विषयाचं गांभीर्य न हरवता, प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देत गतकाळाची मांडणी करतो. उण्यापुऱ्या एकोणपन्नास वर्षांचं आयुष्य लाभलेल्या सावित्रीच्या आयुष्याची शोकांतिका झालेली असली तरीही नाग अश्विन चित्रपटाचा शेवट मात्र एका सकारात्मक वळणावर करतो.
कारकीर्दीच्या सुरुवातीलाच ‘येवडे सुब्रमण्यम’, ‘महानटी’ असे दोन वेगवेगळे विषय समर्थपणे हाताळणारा नाग अश्विन नेहमीच नवीन विषयांच्या शोधात असतो. ‘नेटफ्लिक्स’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पिट्टू कथालू’ या चार लघुपटांचा समावेश असलेल्या मालिकेतील ‘एक्स लाईफ’ हा लघुपट त्याने दिग्दर्शित केला आहे. तो ‘महानटी’चा दर्जा गाठू शकत नसला तरीही त्यासाठी नाग अश्विनने निवडलेला विषय, त्याच्यातील कलावंताला विविध विषयांचं असलेलं आकर्षण आणि ते पडद्यावर मांडण्यासाठी तो घेत असलेली मेहनत अधोरेखित होते.
‘एक्स लाईफ’मधील नायक व्हीके (संजीत हेगडे) तंत्रज्ञानाच्या मदतीनं आभासी जग निर्माण करतो. या आभासी जगाचा फायदा घेत वास्तवापासून दूर पळू पाहणारे अनेक लोक त्याच्याकडे येतात. हळूहळू व्हीके आपलं साम्राज्य बनवू पाहतो. त्याच्या या साम्राज्याला हादरा देण्याचं काम करते दिव्या (श्रुती हसन) ही तरुणी. तंत्रज्ञान माणसातील संवेदनशीलता नष्ट करू पाहत आहे. तिला कायम ठेवण्यासाठी सामान्य माणसानं पुढाकार घ्यायला हवा, असं सूचन करणारा ‘एक्स लाईफ’ त्यातील आशयामुळे लक्षात राहतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नाग अश्विन दिग्दर्शनात असे वेगवेगळे प्रयोग करत असताना नवीन होतकरू दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटनिर्मिती करतो, हे त्याचं अजून एक वेगळेपण आहे. त्याच्या निर्मिती संस्थेनं निर्माण केलेला अनुदीप के.व्ही. दिग्दर्शित ‘जाथी रत्नालू’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.
आशयपूर्ण चित्रपटांची निर्मिती करताना नाग अश्विन त्यांचं व्यावसायिक मूल्य नजरेआड करत नाही. सध्या तो प्रभास आणि दीपिका पदुकोन या आजच्या घडीला सर्वांत महागड्या अभिनेत्यांना घेऊन आगामी चित्रपटाची जुळवाजुळव करत आहे. त्याचा हा चित्रपटदेखील वैशिष्ट्यपूर्ण असणार हे निश्चित.
..................................................................................................................................................................
या सदरातील आधीचे लेख
वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक
कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!
राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक
..................................................................................................................................................................
लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत.
santosh_pathare1@yahoo.co.in
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment