अजूनकाही
ब्रिटनच्या राजघराण्याचे वारस प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी आज दाद मागत आहेत, बीबीसीसारख्या बलाढ्य माध्यमाकडून. जरी बीबीसीने त्या दोघांची माफी मागितली असली तरी त्यांचे घाव भरले नाहीत. आज पस्तिशीत असलेल्या या युवराजांच्या जखमा पंचवीस वर्षांपूर्वी झाल्या आहेत, पण आजही ताज्या आहेत. बीबीसीचा एक नवखा पत्रकार मार्टीन बशीर याने त्यांची आई, प्रिन्सेस डायनाची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य, त्यांच्या आईचे आयुष्य एका वेगळ्या वळणावर आले. ही मुलाखत त्यांच्या आईने राजीखुशीने दिली असल्याचा दावा मार्टीन बशीर करत असले तरी तिच्याकडून ती काढून घेण्यसाठी बशीरने त्यांच्या आईला फसवले होते. डायनाशी मैत्री करायला बशीरने डायनाच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना दूर केले. आईच्या मृत्यूच्या वेळी पोरगेले असलेले विलियम आणि हॅरी अजूनही आईच्या आठवणीने हळहळत आहेत.
ही मुलाखत बीबीसीच्या तत्त्वांना काळिमा फासणारी होती, असा निष्कर्ष लॉर्ड डायसन यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चौकशी अहवालात काढला आहे. आणि बीबीसीने विलियम आणि हॅरीची माफी मागितली असली तरी ते दोघे या माफीनाम्याने समाधानी झाले असल्याचे काही वाटत नाही. प्रिन्स विलियम यावर म्हणाला की, ‘त्या मुलाखतीने माझ्या आईबाबांच्या आयुष्यात विष कालवलं. त्यांच्यातले उरलेसुरले संबंध संपले. तिला पॅरानोईया झाला, ती सगळ्यांपासून दुरावली.’ तर प्रिन्स हॅरी त्याच्या पुढे जाऊन म्हणाला आहे की, ‘तत्त्वांशी फारकत घेतलेल्या पत्रकारितेने माझ्या आईचा बळी घेतला.’
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
विलियम आणि हॅरी आज पस्तिशीत आहेत. पण पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या या मुलाखतीचे चटके त्यांना अजून बसत आहेत. जर ही मुलाखत प्रसिद्ध झाली नसती, जर त्यांच्या आईला राजघराण्याने वाळीत टाकले नसते, जर ती एकटी पडली नसती... तर कदाचित आज चित्र वेगळे असते हा सल त्यांना आहे. मुलाखतीतले शब्द त्यांच्या आईचे होते, पण तिच्याकडून ते वदवून घेण्यासाठी बीबीसी आणि मुलाखतकार मार्टीन बशीरने ज्या उचापती केल्या, त्या अत्यंत चुकीच्या होत्याच, पण पत्रकारितेला काळिमा फासणाऱ्या होत्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात मानाचं नाव असलेल्या बीबीसीने आपल्या ‘पॅनारोमा’ या चॅनलवर प्रिन्सेस डायनाची एक मुलाखत दाखवली. ब्रिटनमधल्या दोन कोटी लोकांनी ही मुलाखत बघितली.
मुलाखतीत काय झाले?
ब्रिटनचे राजघराणे अत्यंत खाजगी आयुष्य जगते. आणि त्यांच्या खाजगी आयुष्यात तिथल्या जनतेला फार रस आहे. हा रस इतक्या प्रमाणात आहे की, तिथली अनेक वर्तमानपत्रं, विशेषतः टॅब्लॉईड्स राजघराण्यातली लफडी-कुलंगडी बाहेर काढून, त्यांच्या बातम्या देऊन आपला बिझनेस चालवतात. प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्सचं लग्न एखाद्या परीकथेतल्या लग्नासारखे झाले. पण त्यांच्या लग्नात सुरुवातीपासून कुरबुरी सुरू होत्या. या सगळ्यावर वर्तमानपत्रांचे लक्ष होतेच, पण सगळे काही कुजबुजीच्या स्वरूपात होते.
१९९५ साली बशीरने घेतलेल्या मुलाखतीत डायनाने काही स्फोटक विधाने केली. ती म्हणाली - “आमच्या लग्नात सुरुवातीपासून आम्ही तिघे होतो. (ती दोघे आणि चार्ल्सची तेव्हाची प्रेयसी आणि आताची बायको, कमिला पार्कर बोल्स). तिला (डायनाला) बुलिमिया म्हणजे जेवलेले अन्न ओकून काढण्याचा आजार आहे. तिचे विवाहबाह्य संबंध होते...” वगैरे वगैरे.
अत्यंत खाजगी असलेल्या ब्रिटिश राजघराण्यात ही मुलाखत बंडखोरी ठरली. या मुलाखतीनंतर तिला राजघराण्याने पूर्णपणे वाळीत टाकले. तिचे आणि तिच्या पतीचे प्रिन्स चार्ल्सचे उरलेसुरले संबंध संपुष्टात आले. मुलाखतीनंतर दोन वर्षांनी मागे लागलेल्या पत्रकारांचा ससेमिरा चुकवताना झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. आता तिच्या मृत्यूला ही मुलाखत जबाबदार आहे की नाही, यावर चर्चा सुरू आहे.
चौकशी अहवालात काय म्हटले आहे?
लॉर्ड डायसन यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे आणि त्या अहवालात बशीर यांनी केलेल्या फसवणुकीवर बीबीसीने पांघरूण घातले, असा निष्कर्ष निघाला आहे. लॉर्ड डायसन यांनी अहवालात म्हटले आहे की - मुलाखत मिळवण्यासाठी बशीर यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. डायनाची मुलाखत मिळवण्यासाठी बशीर ज्या थराला गेले, ते भयंकर आहे. त्यांनी बॅंकेची खोटी कागदपत्रं तयार केली आणि ती डायनाचे भाऊ अर्ल स्पेन्सर यांना दाखवली. त्या कागदपत्रांच्या आधारे बशीर यांनी डायनाच्या आजूबाजूच्या लोकांना टॅब्लॉईड्सकडून पैसा मिळत होता असे भासवले. डायनावर लक्ष ठेवायला तिच्या आजूबाजूच्या लोकांना लाच दिली जात आहे, असे बशीर यांनी भासवले. याच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी डायनाशी ओळख करून घेतली आणि तिचा विश्वास संपादन केला.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
ही फसवणूक बीबीसीच्या लक्षात आली, पण मुलाखत किती स्फोटक ठरेल, हे लक्षात आल्यावर बशीर यांनी केलेल्या फसवणुकीकडे बीबीसीने साफ दुर्लक्ष केले. ज्या तत्त्वांच्या आधारावर बीबीसीचा पाया रचला आहे आहे त्या सच्ची आणि पारदर्शक पत्रकारितेच्या पायाला धक्का देणारी ही मुलाखत आहे. बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी झालेली चूक मान्य केली आहे. बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही यांनी माफी मागताना डायना मुलाखत द्यायला उत्सुक होती, अशी जोड दिली आहेच. पण त्यामुळे बशीरच्या वागणुकीचे समर्थन होऊ शकत नाही.
पण प्रकरण फक्त डायनाची मुलाखतीपर्यंतच संपले नाही. २०१६ साली मार्टीन बशीर यांची पुन्हा बीबीसीत नियुक्ती झाली. त्यांना धर्मविषयक बाबींचे संपादक म्हणून नेमण्यात आले. बीबीसीच्या डिजिटल, खेळ आणि संस्कृती विभाग समितीचे अध्यक्ष नाईट यांनी ही नियुक्ती कोणतीही प्रक्रिया न करता झाली, असा आरोप हाऊस ऑफ कॉमन्समध्ये केला. ही नियुक्ती ज्या पद्धतीने झाली, त्यावरून बशीर हे बीबीसीला डायना मुलाखत प्रकरणी ओलीस तर धरत नव्हते, अशी शंका नाईट यांनी व्यक्त केली.
नवखे पत्रकार बशीर या मुलाखतीनंतर प्रसिद्धीच्या झोतात आले. पुढे त्यांनी घेतलेली पॉपस्टार मायकल जॅक्सन याची मुलाखतसुद्धा वादग्रस्त ठरली. त्या मुलाखतीनंतर मायकल पुरता कोलमडला असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. आता मायकल जॅक्सनचा संबंध या मुलाखतीशी जोडणे डायनासाठी अन्यायकारक ठरेल असे वाटते. मायकल जॅक्सनच्या प्रकरणाच्या मुळाशी त्याने लहान मुलांचा केलेला लैंगिक छळ आहे. डायनाची मुलाखत घेताना बशीरने तिच्या असहयातेचा फायदा घेतला. तुझ्यावर राजघराणे आणि पत्रकार लक्ष ठेवून आहेत. तू सुरक्षित नाहीस, तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तुझ्याबद्दल माहिती पुरवण्यासाठी तुझ्या जवळची मित्रमैत्रिणी लाच घेतात, असे सांगून बशीरने अशा अर्थाची खोटी कागदपत्रं बनवली. त्यात तिच्या जवळच्याच मित्रमैत्रिणींची नावं घालून तिला दाखवली. त्यानंतर डायनाने त्या सगळ्यांशी संबंध तोडले आणि बशीरला जवळ केले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
डायनाला असलेले प्रसिद्धीचे वलय अतुलनीय होते. लोकांना तिचे जबरदस्त आकर्षण होते. ती खऱ्या अर्थाने ‘पिपल्स प्रिन्सेस’ होती, इतक्या सहजतेने ती सामान्य लोकांशी संबंध ठेवत होती. त्याच सहजतेने तिने बशीरने पुढे केलेला मैत्रीचा हात हातात घेतला. ती जेवढी साधी होती, तेवढीच आतून दुखावलेली होती. चार्ल्सच्या बाहेरख्यालीपणाला जणू त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा होता. त्यांचे लग्न कोलमडायला लागले. तिने चार्ल्सला सोडून इतरांना जवळ करायचा प्रयत्न केला.
या सगळ्या संघर्षात तिने मुलांना दूर केले नाही. त्यांच्या आयुष्यात ती पूर्णवेळ सहभागी होती. विलियम आणि हॅरीची आई म्हणून ती सतत त्यांच्याबरोबर होती. बशीरच्या मुलाखतीनंतर तिची गाडी जी गडगडली ती शेवटपर्यंत. याच काळात तिचा मृत्यू पॅरिसला कार अपघातात झाला.
ती गेल्यानंतर तिच्या अंतिमयात्रेत सहभागी झालेली तिची लहान मुलं पाहून जग कळवळले. त्यांनी त्यांच्या दहा-बारा वर्षांच्या आयुष्यात फार भोगले होते आणि आता पंचवीस वर्षांनंतर आलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेनंतर असं वाटतंय की, त्यांच्या जखमा अजून भरल्या नाहीत.
..................................................................................................................................................................
लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.
bhalwankarb@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment