सध्या जो काही अर्थ प्रचलित होऊ पाहतोय, तोच जर खरा असं गृहीत धरलं तर, मी मराठी भाषाभिमानी आहे की नाही, हे हल्ली मला ठामपणे सांगता येईनासं झालं आहे! (तसंच आजकाल अनेक शाळा, कॉलेज, मराठी वाहिन्या ते अगदी नवनव्या रेडिओ चॅनेलवर जे काही मराठी म्हणून ऐकू येतं, ते जर मराठी असेल तर आपण मराठी भाषकही नाही. भाषक आणि भाषिक या दोन पूर्णपणे भिन्न शब्दांचा अर्थ तर, आजकाल मराठी वृत्तवाहिन्यांना तरी माहिती आहे की नाही, अशी दाट शंका येऊ लागली आहे.) अनेक मोठे मोठे साहित्यिक आणि मराठी भाषाभिमानी लोक हाती सतीचं वाण घेतल्याप्रमाणे मराठीच्या अस्तित्वाची काळजी/चिंता वाहत असतात. त्याच त्याच गोष्टी निरनिराळ्या प्रकारे सांगून, आपण काही तरी महान क्रांतिकारक बोलत असल्याचा आव आणतात. ते पाहता आपण मराठी भाषाभिमानी नाही असंच मला वाटू लागलंय!
निमित्त झालंय ते नुकत्याच (एकदाच्या) पार पडलेल्या ९०व्या मराठी साहित्य संमेलनाचं. आता ही “साहित्य संमेलनं आणि संमेलनाध्यक्षांची निवडणूक हा सर्व चोरांचा बाजार आणि बदमाषांचा गोंधळ आहे. या बाजारात चांगला माणूस निवडून येणे शक्यच नसते,” असं आपलं स्पष्ट मत (छ्या!, आपलं कसलं, हे तर गुरुवर्य भालचंद्र नेमाडे यांचं स्पष्ट मत. पहा- १९९१ मध्ये 'टीकास्वयंवर'ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या निमित्तानं दिलेल्या मुलाखती व भाषणं.). नेमाडेसाहेबांच्या या वक्तव्यानंतर य.दि. फडके किंवा रा.ग. जाधव यांच्यासारखे जे अध्यक्ष साहित्य संमेलनांना लाभले, ते जर चोर\ बदमाश असतील, तर तिथं माझ्यासारख्या सामान्य बौद्धिक कुवतीच्या माणसाचं काय?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांचं भाषण वाचलं. म्हणजे ‘अक्षरनामा’वर एक लेख आला होता- ‘संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे काय बोलले, तुम्हाला काही कळले?’. त्यात त्यांच्या भाषणातले काही परिच्छेद दिलेले होते, ते वाचले. अन्यथा संमेलनाध्यक्षांचं भाषण एक हाती वाचून काढायची आपली काही छाती नाही. हे अध्यक्ष महोदय गेली ३०-४० वर्षं निष्ठेनं साहित्यसमीक्षा करतात, हेही त्या लेखावरूनच कळालं. सरकारी नोकर जसा ३०-४० वर्षं नोकरी करून निवृत्त होताना त्याच्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करायचा एक शिष्टाचार आहे, तसाच काहीसा हा प्रकार असावा!
मागील वर्षी अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यावर, त्यांच्याबरोबरच अर्ज भरणारे कविवर्य प्रवीण दवणे यांनी ‘अध्यक्ष म्हणून लेखक हवा की, समीक्षक ते ठरवा!’ असा सवाल केला होता. तेव्हाच आम्हाला यंदा(देखील) एक समीक्षकच अध्यक्ष म्हणून लाभणार याचा अंदाज आला होता. समीक्षक साहित्यिक नसतो? मागे एकदा पु.ल. देशपांडे विनोदी लिहिणारे असल्याने ते लेखक/ साहित्यिक नाहीत असा वटहुकूम काही समीक्षकांनीच काढला होता, असं स्मरतं. पण दस्तुरखुद्द समीक्षक हेच साहित्यिक आहेत की नाहीत, असा दावा कुणी करेल असं वाटत नव्हतं.
१८७८ साली लोकहितवादी आणि न्या. रानडे यांना ही संमेलनाची कल्पना सुचली. तेव्हापासून मधली काही वर्षं वगळता हा वार्षिक गदारोळ अव्याहत चालू आहे. १९२६ साली पुण्याच्या पहिल्या वार्षिक शारदोपासक संमेलनाचं अध्यक्षपद इतिसाचार्य राजवाडे यांनी स्वीकारलं आणि व्यासपीठावरून ‘मराठी ही मुमुर्षु भाषा आहे. (म्हणजे मरण पंथाला लागलेली भाषा आहे) तिचे सोहळे कसले करता?’ म्हणून आयोजकांनाच खडसावलं होतं. त्या वर्षी त्यांनी जी तार छेडली, तीच धरून संमेलाध्यक्ष दरवर्षी मराठीच्या अस्तित्वाचा कापूस पिंजत असतात!
विद्यमान संमेलनाध्यक्ष काळे यांचं हे वाक्य बघा -
“खेड्यापाड्यांतल्या, उपेक्षित वस्त्यांतल्या, कलाशाखेतल्या सतत हिणवले जाणाऱ्या, पोरक्या ठरू पाहणाऱ्या मराठी माध्यमातील शिक्षणाकडे कानाडोळा करून इंग्रजी शिक्षणमाध्यमाच्या राजरस्त्यावरून विज्ञान, तंत्रविज्ञान, वैद्यक, व्यवस्थापन, विधी इत्यादी क्षेत्रांतील शिक्षण पूर्ण करून युरोप, अमेरिकेची दारे ठोठावता येतात, याबद्दल पुरेपूर खात्री पटल्याने आमच्या केवळ उच्चभ्रू समाजानेच नव्हे, तर सर्व जातिगटांतील मध्यमवर्गीय समाजानेदेखील मराठी माध्यमातील शिक्षणाकडे एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून, त्याकडे कायमची पाठ फिरविली आहे.”
हे एक वाक्य आहे बरं का! अख्खा परिच्छेद नाही. वाचताना दम लागतो, अर्थ कधी लागायचा? काय ती भाषा! काय तो डौल! ‘अक्षरनामा’वर टप्पू सुलतान म्हणून कोणी आहेत, त्यांनी या सगळ्याच भाषणाचा व्यवस्थित समाचार घेतलेला असल्याने मी परत त्या फंदात पडत नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.............................................................................................................................................................
कोणतीही जिवंत भाषा प्रवाही नदीप्रमाणे असते. ती तळ्यासारखी स्थिर नसते. नदी जशी वाहत जाताना प्रवाहातले थोडे पाणी व गाळ काठावर पसरवत आणि तिला येऊन मिळणाऱ्या पाण्याला, गाळाला सामावून घेत पुढे जात असते, त्याचप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणाहून नवनवे शब्दप्रयोग, संकल्पना घेत आणि देत भाषा वाहत असते. जड झालेले, उपयोगातून बाद झालेले शब्दप्रयोग तळाशी साचतात, स्मृतीतून नाहीसे होतात. आज मी जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात व लिखाणात वापरतो ते सारे मी कुठे ना कुठे, कधी ना कधी पुनःपुन्हा ऐकलेले किंवा वाचलेले असतात. सतत उपयोग होत असल्यामुळे ते चलनात असतात. उपयोग कमी झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे जीवनशैलीतील बदल, वाचन, प्रसारमाध्यमं आणि इतर लोकांशी होणारा संपर्क इत्यादींमधून त्यात अनेक नवनवे शब्द समाविष्ट होत राहतात. ही प्रक्रिया अत्यंत संथपणे आणि बिनबोभाटपणे चाललेली असते.
मराठी भाषा गेल्या ५०-६० वर्षांत फार बदलली. तिच्यातली संस्कृत प्रचुरता गेली, वाक्यं छोटी झाली. ‘जेहत्ते काळाचे ठायी’ किंवा ‘एकसमयावच्छेदेकरून’ अशा जडजंबाळ शब्दांचे श्रीवर्धनी रोठे फोडून अर्थ वेगळे काढायची गरज उरली नाही. नुसती लोकांची बोलणी नाही तर नाटक, सिनेमा, मालिकांमधून लांबच लांब पल्लेदार वाक्यं आणि ती एका दमात म्हणून टाळ्या घेणारे अभिनय सम्राटही गेले. एकदा रेडिओ मिरची का असाच कुठला तरी तत्सम रेडिओ चॅनेल ऐकताना एक आरजे म्हणाला- “हेल्लो पुनेकर, पुन्यात चिल आउट करायला सोयीचा स्पॉट शोधताय. लेट अवर शाम का साथी डू इट फॉर यु.” या मराठीसारख्या दिसणाऱ्या वाक्याने आधी माझाही फ्युज उडाला, पण नंतर विचार केला, तरुणाईला याच्यासारखीच भाषा (sorry, लँग्वेज) आवडते, त्याला ते तरी काय करणार?
आता बघा मीसुद्धा बोलताना फ्युज उडाला, रेडिओ चॅनेल, डेंजरस असे शब्द वापरलेच की नाही? कोण वाचतंय हे जसं महत्त्वाचं, तसंच जास्तीत जास्त लोकांना कळेल आणि मुख्य म्हणजे आवडेल असं बोलणं लिहिणं महत्त्वाचं. मराठी साहित्य आणि भाषा याबद्दल बोलताना एक वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की, बोली म्हणून मराठी खूप जुनी भाषा नक्कीच आहे. मराठी साहित्यालाही अगदी प्राचीन म्हणावा असा इतिहास आहे. पण अनेक शतकं मराठी भाषा बहुतकरून पारमार्थिक स्वरूपाचं साहित्यच प्रसवत होती. पेशवाई बुडाल्यानंतर जसा जसा इंग्रजांचा आणि त्यांच्या इंग्रजीचा प्रादुर्भाव(!) वाढला तसं कथा, लघुकथा, निबंध, स्फुट, कादंबऱ्या, नवकविता वगैरे इतर साहित्य प्रकार मराठीत येऊ लागलं. अर्वाचीन साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून मराठीला वैभव आणलं हे खरं, पण ही परंपरा २००-२२५ वर्षांपेक्षा जुनी नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पन्नास वर्षांपूर्वी बहुतेक प्रौढ स्त्रिया 'लुगडं' नेसत असत, तरुणी 'गोल पातळ' नेसत आणि लहान मुली 'परकर पोलकं' घालत. 'साडी' हा शब्द तेव्हा फारसा प्रचारात नव्हता.'लुगडं' नेसणार्या स्त्रियांची पिढी काळाआड गेली आणि जाड्या भरड्या सुती कपड्यापासून बनलेल्या लुगड्याऐवजी नायलॉन वगैरे सारख्या पातळ कपड्याची ‘पातळं’ आली. 'गोल पातळ' जाऊन आलेली 'साडी' मध्यमवयीन व प्रौढ महिला नेसतात. बहुतेक तरुण मुली जीन्स किंवा कॅप्री आणि टॉप घालतात. पंजाबी ड्रेस आता 'पंजाबी' राहिला नाही, 'सलवार कमीज' किंवा 'सलवार सूट' या नावाने तो सर्वच वयोगटात वापरला जातो. फ्रॉक, स्कर्ट आणि त्यांचे मिनि, मॅक्सी, मिडी वगैरे अनंत प्रकार येत आणि जात असतात. राजस्थानी, गुजराती किंवा लमाणी पद्धतीच्या कपड्यांचाही क्वचित कधी वापर दिसतो. नव्या पिढीतल्या मुली 'फंक्शन' किंवा 'ऑकेजन'च्या निमित्याने कधी कधी ‘साडीही’ (नेसत नाहीत) घालतात. आणखी तीन-चार दशकांनंतरही कोणत्या ना कोणत्या नावाने साडी शिल्लक राहील, पण 'नेसणं' हा शब्द कदाचित राहणार नाही!
आपण ठरवू किंवा न ठरवू, बोलत असताना आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररीत्या व्यक्त होतात. आपलं सांगणं ऐकणार्याला लगेच समजणं हे जास्त महत्त्वाचं असतं. माझे आई-वडील ज्या (मराठी) बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, त्या बोलीत मी माझ्या मुलीशी बोलत नाही. जरी ती मराठीच असली. 'फडताळ', 'शिंकाळे', 'संदुक' असे जुने शब्द माझ्या बोलण्यात फारसे कधी येत नाहीत, कारण त्या वस्तू माझ्या घरात नाहीत, तसेच 'सीडी', 'मॉल' , 'रिमोट', ‘जॅम’, ‘सॉस’ आदि शब्द सतत येतात, कारण या वस्तू सतत वापरात असतात.
आपलं लेखन वाचणारे जे लोक असतात, त्यांना आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुद्धलेखनाच्या नियमांचं शक्य तितकं पालन करणं आवश्यक असतं, हे मान्य, पण त्याचबरोबर त्यात वापरलेले शब्द मूळ मराठी आहेत, संस्कृतजन्य आहेत, आपल्याच देशातल्या परप्रांतातून आले आहेत की, परदेशातून आले आहेत यापेक्षाही ते किती लोकांना समजतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. ‘आकाशवाणी’ असं म्हटल्यावर कुणाला ‘म्हणजे काय?’ असा प्रश्न पडणार नाही, पण म्हणून ‘रेडिओ’ हा शब्द वापरल्यावर लगेच विटाळ झाला असे समजून शहारण्याचीही गरज नाही. ईश्वरीय संदेश म्हणून जेव्हा आकाशवाणी हा शब्दप्रयोग केला जातो, त्याऐवजी कोणी रेडिओ असा शब्दप्रयोग करणार नाही. केला तर ते हास्यास्पदच होईल.
भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात कितीतरी नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवीच लिपी तयार झाली आहे. आपण ते सगळे अगदी सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धावा', 'वाचवा' वगैरे म्हणताना निदान माझी जीभ तरी अडखळेल. उद्या एका मराठी माणसाने नव्या तंत्रज्ञानावर आधारलेली एखादी नवी गोष्ट बाजारात आणली आणि सुरुवातीपासूनच तिचा वापर करताना 'उचला', 'ठेवा', 'थांबा', 'चला', 'दाबा', 'सोडा' अशा सोप्या मराठी शब्दांचा प्रयोग केला तर त्या शब्दांचा उपयोग करायला कुणालाही मनापासून आवडेल. पण सध्या तरी जी गोष्ट ज्या परक्या, पण सहज, सोप्या नावानं माझ्यापर्यंत पोचली त्यांना चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नावांचाच मराठी भाषेत समावेश करायला हरकत नसावी.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.............................................................................................................................................................
मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी बोलताना मातृभाषेतून शिक्षण हा आपल्याकडचा सर्वांत महत्त्वाचा आणि बहुधा सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे. (जणू मातृभाषेतून शिक्षण एवढा एक मुद्दा सोडला तर दुसरे कोणतेही प्रश्न, आव्हानं शिक्षणक्षेत्रात नाहीत!) जवळपास सगळे तथाकथित तज्ज्ञ, सूज्ञ शिक्षण मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे, या एका मुद्द्यावर सहमत होताना दिसतात. कमीत कमी प्राथमिक शिक्षण तर मातृभाषेतूनच झालं पाहिजे, यावर सर्वांचं एकमत असतंच. सर्वसाधारण मनुष्यसुद्धा बोलताना मातृभाषेतून शिक्षणाची भलावण करताना आढळतो.
मी माझा अनुभव सांगतो. आमच्या कॉलनीमध्ये २७ बंगले आहेत. त्यामध्ये साधारण ४५-५० शाळेत जाणारी मुलं आहेत. ही मुलं विविध वयोगटातली आहेत. त्यामुळे अगदी अंगणवाडीपासून नववी-दहावीपर्यंतची मुलं यात येतात. (महाविद्यालयातली मुलं धरली नाहीत.) एका मुलीचा सन्माननीय (!) अपवाद सोडला तर सर्व मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांत जातात. तरीही ही मुलं आपापसांत खेळताना अस्खलित मराठी बोलतात. त्यांना मराठी की इंग्रजी असा पेच पडत नाही. आजी-आजोबांशी मराठीत संवाद साधताना या मुलांना काहीही ‘प्रॉब्लेम’ येत नाही. याचं कारण साधं, सरळ आहे. मुलांना आपण जरी शाळेत शिकायला पाठवत असलो, तरी त्यांचं शिक्षण त्या आधीच सुरू झालेलं असतं. ते घर, आसपासचा परिसर, मित्रपरिवार यांच्याकडून बरंच काही शिकत असतात. माझी मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते आणि तिथं असलेल्या हिंदी भाषक मुलांच्या संगतीनं तिच्या वयाच्या मानानं बरं हिंदी बोलते. माझा बलराम छप्पर म्हणून एक कानडी मित्र आहे. त्याचा आठ वर्षांचा मुलगा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कानडी अस्खलित बोलतो. तेव्हा मातृभाषेतून शिक्षणाचा फार बागुलबुवा करायची गरज नाही.
इंग्रजी माध्यमामुळे मुलांना मराठी नीट बोलता येत नाही, असं बोंबलणाऱ्या लोकांना ‘म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?’ असं विचारलं तर नीट सांगता येत नाही. मराठी बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची फार सरमिसळ होते, असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो. ठीक आहे, पण मग आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षांपूर्वी वापरात होती काय? आणि १०० वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं?
जुनेच पण रोजच्या वापरातले शब्दसुद्धा मराठी नसतात. जबाब, जबाबदारी, हरकत, घड्याळ हे शब्द मराठी आहेत की संस्कृत? पण ते वापरताना आज आपल्याला उष्टावाल्यासारखे वाटत नाहीत. अस्खलित मराठी वापरून आज आपण कुणाशी संवाद साधू शकू? ते सोडा, आपण मराठीतही बोलू शकणार नाही. मोबाईल, सीडी, पेन ड्राईव, digital, Analogue यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज नाही. फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गानं हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय? दरवर्षी या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. atomic theory यातला atom हा लॅटिन आहे, तर theory ग्रीक आहे. सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे.
मराठीवर अतिक्रमण करणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजीचा जितका दु:स्वास केला जातो, तितका इतर कुठल्याही भाषेचा केला जात नाही. गेल्या १००-१५० वर्षांत मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांचा इंग्रजीशी संबंध आला आहे. कोणत्याही दोन भाषांचा संनिकर्ष अनेक प्रकारांनी होत असतो. भाषाशुद्धीच्या नावाने जशी ओरड मराठीत चालू आहे, तशी इंग्रजीतही झाली. तो सगळा इतिहास मोठा रंजक आहे. जिज्ञासूंनी बीबीसीने या विषयावर केलेला आठ भागांचा प्रदीर्घ लघुपट आवर्जून पाहावा.
साधारण १२ कोटी लोक मराठी भाषक आहेत. त्यातले ८० टक्के किमान साक्षर आहेत. मराठी भाषा समजणारे, बोलणारे लोक जगभर पसरले आहेत. मराठीच्या ज्ञात अशा ४२ बोली आहेत. दर १२ कोसांवर आपला पोत लहेजा बदलणारी ही भाषा जवळपास सव्वा दोन हजार वर्षं जुनी आहे. इंग्रजीपेक्षा ८०० वर्षं जुनी. पण या सृष्टीतला आश्चर्य आणि विलोभनियतेनं नटलेला खजिना त्यापेक्षा खूप मोठा आहे. त्याला गवसणी घालण्याचं, ते सौंदर्य आपल्यात व्यक्त करण्याचं सामर्थ्य या भाषेत नक्कीच आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न करा, जमत नसेल तर गप्प बसा किंवा इतर लोक जे प्रयत्न करताहेत त्याचा, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्या.
मराठी भाषेचा आणि साहित्याचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ देदीप्यमान तर आहेच, पण भविष्यकाळही उज्ज्वल आहे. काळजी नसावी!
.................................................................................................................................................................
लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
George Threepwood
Mon , 13 February 2017
याच संदर्भात हा एक अगदी ताजा लेख वाचा. इंग्रजी भाषेने भारतीय भाषांमधले जे शब्द उचलले आणि आपले स्वतःचे म्हणून आत्मसात केले, यावरचा. जर इंग्रजांनीही परके शब्द नकोच असा दुराग्रह त्यावेळी धरला असता तर काय झाले असते? हॉबसन-जॉबसन नावाचा एक सुमारे शंभर वर्षे जुना शब्दकोश उपलब्ध आहे, तो भाषिक देवाण-घेवाण यात रस असणार्या जिज्ञासूंनी जरूर अभ्यासावा. How the British Raj brought Indian words into the English language 10 February 2017 http://www.telegraph.co.uk/films/viceroys-house/english-words-of-indian-origin/
George Threepwood
Mon , 13 February 2017
फारच चांगले विचार आहेत. लेख आवडला.