Do you know what my favorite part of the game is? The opportunity to play. –Mike Singletary
आक्रमकता म्हणजे हेतूने पार पाडल्या गेलेल्या कोणत्याही प्रकारची वागणूक, जी दुसर्या व्यक्तीचे नुकसान करते.
सुशील कुमार या ऑलिम्पिक विजेत्या भारतीय खेळाडूला खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी. बेटिंग, डोपिंग, नियम मोडणे, भ्रष्टाचार व लैंगिक छळ असे प्रकार भारतीय खेळांत मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात, मात्र एखाद्या सिनेमात शोभेल अशा पद्धतीने गुन्हा करणे, पळून जाणे व पोलिसांनी पाठलाग करून ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला अटक करणे, हे भारतीय क्रीडा विश्वासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांचा कारकिर्दीचा अंत दुर्दैवीपणे एक गुन्हेगार म्हणून झाला आहे. ऑस्कर पिस्टोरियस हा ‘अपंग ऑलिम्पिक विजेत्या’ धावपटूसुद्धा मैत्रिणीला गोळ्या घातल्या म्हणून शिक्षा भोगत आहे. माईक टायसन या जगप्रसिद्ध बॉक्सरवर बलात्कार, प्रतिस्पर्ध्याच्या कानाचा चावा घेणे, जनावरांचा छळ करणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
प्रत्येक गोष्टीला एक वाईट बाजू असते, तशी ती खेळ व खेळाडूला पण आहे. आक्रमकता खेळात शोभते व खेळाडूला आकर्षक बनवते. कारण खेळसुद्धा एक प्रकारची लढाईच असते. खेळाडू ग्लॅडिएटर्सप्रमाणे शतकानुशतके आपले मनोरंजन करत आले आहेत. त्यांची ऊर्जा, पदलालित्य, हालचाली व आक्रमकता हे जगावेगळे मिश्रण असून त्यात एखाद्या कलेइतकीच मोहकता आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लढाईप्रमाणेच डावपेच, हार-जीत हासुद्धा खेळाचा अविभाज्य भाग आहे. जिंकण्यासाठी जो जितका आक्रमक, तितका विजय सोपा होत जातो. आक्रमकतेच्या तीव्रतेनुसार खेळाचे प्रकार आहेत. लॉन टेनिस हा खेळ पाच तासापर्यंत चालतो, तर कुस्ती हा काही मिनिटांचा खेळ आहे. दोन्हीमध्ये आक्रमकता आहे, पण लॉन टेनिस खेळाडूच्या संयमाची जास्त परीक्षा बघतो, याउलट कुस्तीत आक्रमकता अत्यावश्यक आहे, जी काही क्षणांतच प्रतिस्पर्ध्याला गारद करत सामन्याचा निकाल लावते.
कुस्ती, बॉक्सिंग, रग्बी, आईस हॉकी हे ‘combat sport’ किंवा ‘fighting sport’ म्हणून ओळखले जातात. त्यांत एकाविरुद्ध एक अशी थेट लढत होते. या आक्रमकता व हिंसा हे अविभाज्य घटक असतात.
रॉबर्ट बॅरेंन या मानशास्त्रज्ञाने ‘विरोधी आक्रमकता’ (Hostile aggression) व ‘साधनीभूत आक्रमकता’ (Instrumental aggression) असे दोन प्रकार सांगितले आहेत. पहिल्यात समोरच्या प्रतिस्पर्ध्याला हानी करणे हा हेतू असतो, तर दुसऱ्यात प्रामुख्याने प्रतिस्पर्ध्याला चीत करणे, गुण मिळवणे. मात्र प्रत्येक खेळात काही प्रमाणात ‘साधनीभूत आक्रमकता’ चालते, मात्र ‘विरोधी आक्रमकता’ चालत नाही. ‘कॉम्बॅट स्पोर्ट’मध्ये मात्र या दोन प्रकारच्या आक्रमकतेतील सीमारेषा धूसर होत जातात, कारण प्रतिस्पर्ध्याला चितपट करणे हाच अंतिम उद्देश असतो. खेळात ‘Nice guys finish last’ ही म्हण लोकप्रिय आहे. त्यातून आक्रमकतेचेच महत्त्व अधोरेखित होते.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘खेळाचे मानसशास्त्र’ आक्रमकतेचे वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण देते. त्यासंबंधी अनेक सिद्धान्त मांडले गेले आहेत. उदा. अंतर्ज्ञान सिद्धान्त (Instinct theories), सामाजिक शिक्षण सिद्धान्त (Social learning theory), निराशा–आक्रमकता सिद्धान्त (frustration–aggression theory) इत्यादी.
‘अंतर्ज्ञान सिद्धान्ता’नुसार मनुष्यातील आक्रमकता ही उत्क्रांतिची देणगी आहे. प्राणी व इतर मनुष्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आक्रमकता मानवी स्वभावात आली. सिगमंड फ्राइडच्या म्हणण्यानुसार मनुष्यात जीवन व मृत्यू यांची अंत:प्रेरणा असते आणि मृत्युची अंत:प्रेरणा (death instinct) आक्रमकतेसाठी कारणीभूत ठरते.
‘सामाजिक शिक्षण सिद्धान्ता’नुसार लहान मुले मोठ्यांकडे बघून आक्रमकता शिकतात. अल्बर्ट बंडुरा यांच्या ‘बोबो डॉल’ या प्रयोगाने हे सिद्ध केले की, पालक, आजूबाजूचे वातावरण यातून मुले आक्रमकपणा नकळत आत्मसात करतात.
‘निराशा–आक्रमकता सिद्धान्ता’नुसार निराशा आक्रमकतेला जन्म देते, परंतु हेसुद्धा आंशिक स्पष्टीकरण आहे.
आक्रमकता जितकी जास्त, तितकी जिंकण्याची संधी वाढत जाते. प्रशिक्षक व क्रीडा संस्थासुद्धा आक्रमकतेला प्रोत्साहन देतात. कुस्तीसारख्या खेळात शारीरिक ताकद, लवचीकता व वेग महत्त्वाचा असतो. मोक्याच्या क्षणाला खेळ उंचावत आक्रमकपणे प्रतिस्पर्ध्याला चित करत पदक जिंकता येते. मात्र हीच आक्रमकता मैदानाबाहेर कशी हाताळायची याचे प्रशिक्षण भारतात दिले जात नाही. त्यामुळे खेळाचा ‘खेळखंडोबा’ व्हायला वेळ लागत नाही!
गेल्या काही वर्षांत पंजाबमधील उदयोन्मुख खेळाडूंचे गुन्हेगारीकडील वळण वाढले आहे. अनेक राज्यस्तरीय खेळाडू कुख्यात गुंड बनले आहेत आणि पोलीस चकमकीतही मारले गेले आहेत.
पहेलवान म्हणून ओळखले जाणारे, कुस्तीच्या आखाड्यात तयार होणारे खेळाडू किती कष्ट घेतात, हे आपण ‘दंगल’सारख्या सिनेमातून बघितले आहे. एवढे कष्ट घेऊनसुद्धा जे यश मिळते, ते कसे हाताळावे किंवा अपयश कसे पचवावे, यासाठी मानसिक तयारी आवश्यक असते. ‘क्रीडा मानसशास्त्र’ केवळ खेळाडूला कसे जिंकावे एवढेच सांगत नाही, तर ते संपूर्ण कारकीर्द घडवायला मदत करते.
कुस्तीसारख्या खेळातील आक्रमकता व हिंसा खेळाडूच्या स्वभावाचा एक भाग बनण्याची शक्यता असते. तेच नेमके सुशील कुमारच्या बाबतीत झाले. त्याच्यासोबत जे झाले, ते अचानक झालेले नाही. गेल्या काही वर्षांतील घटना त्याच्या गुन्हेगारी वृत्तीची झलक देत होत्या, त्या दुर्लक्षित करण्यात आल्या.
यश, पैसा व सत्ता हे वेगळेच घातक मिश्रण आहे. त्यामुळे यशाच्या सर्वोच्च शिखरावर असणारे खेळाडू वेगळ्याच धुंदीत असतात. नियमात राहून खेळणारे मैदानाबाहेर खेळाचे नियम विसरतात. भारतीय कुस्तीचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून नाव मिळवलेल्या सुशील कुमारचे बदललेले वागणे ‘ग्लासगो कॉमनवेल्थ गेम’नंतर जाणवायला लागले होते. आपल्याच साथीदारांशी पंगे घेणे, वाद घालणे, नियमबाह्य वर्तन या सगळ्या गोष्टी सुशील कुमारच्या आयुष्यात नेहमीच्या झाल्या. पैसा कमवणे हा त्याच्या आयुष्याचा मुख्य उद्देश होऊन कुस्ती मागे पडली. त्याचा परिणाम म्हणून तो २०१८च्या ‘जकार्ता एशियन गेम’च्या पहिल्या पात्रता फेरीतच बाद झाला.
कुठलाही जगजेता खेळाडू चुका करतोच/करतेच, वाद होतात व नको असलेल्या गोष्टीसुद्धा घडतात. अगदी जेंटलमन म्हणवणाऱ्या रॉजर फेडरर किंवा सचिन तेंडुलकरच्या बाबतीतसुद्धा वाद झाले आहेत. यशाच्या लाटेवर असताना खेळाडूच नाही, तर कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत हे घडते. समोरासमोर लढत असलेल्या खेळांतीत मुळात अस्त्र असलेली आक्रमकता खेळाच्या मैदानाच्या बाहेर खेळाडूंवर उलटते. त्यामुळे पुरुष खेळाडूंमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ होते. त्यातून नियम तोडले जातात.
क्रीडा मानसशास्त्र या आक्रमकतेला योग्य दिशा द्यायला अनेक उपाय सांगते. त्यात काही प्रकारची शिक्षा, भावनिक विरेचन (Catharsis), रागाचे व्यवस्थापन (anger management), तसेच समुपदेशन यांचा समावेश आहे. भारतात ज्या व्यक्तीला यश मिळते, तिला डोक्यावर घेऊन नाचायची प्रथा आहे- मग क्षेत्र कोणतेही असो. यशस्वी व्यक्ती चुकू शकत नाही, जिथे आहे त्यापेक्षा चांगले करू शकत नाही. त्यामुळे यशस्वी लोकांचे भक्त व समुदाय तयार होतात. त्यांच्या घरी, मित्र परिवारात व व्यवसायात त्यांच्याकडून जास्तीत जास्त फायदा करून घेतला जातो, मात्र ती व्यक्ती जर विवेकाचे भान सोडत असेल तर तिला कोणी सांगत नाही किंवा सांगितले तरी तिला कळतसुद्धा नाही.
यामुळेच आपल्यावर चांगली टीका करणाऱ्या व वेळीच आपली चूक दाखवून देणाऱ्या व्यक्ती आजूबाजूला हव्यात. खरे तर हे काम खेळाडूंचे आई-वडील, प्रशिक्षक, मित्र व जोडीदार यांचे आहे. मात्र भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये यशस्वी पुरुष देव असतो! त्याच्यासमोर कोणाचे काही चालत नाही. सुशील कुमारचे प्रशिक्षक त्याचे सासरेच आहेत, त्यांना त्यांचा जावई कुठल्या मार्गावर जात आहे, हे समजले नाही?
मायकेल फेल्प्स या विश्वविजेत्या जलतरणपटूने यशाच्या अत्युच्य शिखरावर असताना असेच काहीसे बेजबाबदार वर्तन केले होते. उदा. दारू पिऊन गाडी चालवणे, मारिजुआना पिणे… त्यामुळे त्याला जेलची हवा खाल्ली. त्याच्या नशीबाने आई, प्रशिक्षक, मैत्रीण, बहीण अशा जवळच्या व्यक्तींनी त्याला सांभाळले. परिणामी आपल्या औदासिन्यावर मात करत त्याने परत २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केले. गेल्या वर्षी मायकेल फेल्प्सने ‘The Weight Of Gold’ नावाचा एक लघुपट तयार केला आहे. त्यात त्याने व इतर काही ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंनी यशाच्या शिखरावर जाताना आणि गेल्यावर कसे मानसिक त्रास होतात, ते काही खेळाडूंसाठी कसे जीवघेणे ठरले आहेत, याची प्रांजळपणे कबुली दिली आहे.
गेल्या वर्षभरात बहुतेक खेळ बंद आहेत आणि खेळाडूंचे प्रशिक्षणही. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य इतर सामान्य जनतेइतकेच खालावले आहे. काही खेळाडू जसे पी. व्ही. सिंधू, विराट कोहली, अभिनव बिंद्रा, चेतेश्वर पुजारा, सुनील छेत्री अशा दिग्ग्ज भारतीय खेळाडूंनी आपल्या मानसिक आरोग्याच्या कथा लोकांना सांगितल्या. हरमनप्रीत कौर या भारतीय महिला क्रिकेटपटूने बीसीसीआयकडे पूर्ण वेळ क्रीडा मानसशास्त्रज्ञ हवा, अशी मागणी केली आहे.
मी स्वतः खेळाची चाहती असून Sport Psychology हा विषय शिकवते. माझ्या नशीबाने मला दोन वेळा भारताचे जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांना भेटण्याचा योग आला आणि दोन्ही वेळा त्यांच्या साधेपणामुळे मी भारावून गेले. त्यांना भेटणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदी क्षणांपैकी एक आहे. त्यांना भेटल्यावर हे जाणवते की, खेळ हा केवळ पैशासाठी खेळावयाचा नसून त्यात भावनिक व सामाजिक असे पैलू आहेत. खेळाडूचे यश त्याच्या एकट्याचे/एकटीचे कधीच नसते. तो/ती असंख्य लोकांसाठी ‘रोल मॉडेल’ असतात. त्या खेळाडूसोबत देशाची व त्या खेळाची प्रतिष्ठा जोडलेली असते. आज सुशीलकुमार सोबत जे झाले, त्याने देशाचे आणि कुस्तीचेसुद्धा नाव बदनाम झाले आहे.
सध्याच्या काळात खेळ हा प्रचंड प्रमाणात कॉर्पोरेट नियंत्रित करते. त्यामुळे व्यावसायिकपणाचा अतिरेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. खेळाची मजा कमी होऊन खेळाडूंनी कसेही करून जिंकणे, ही वृत्ती वाढली आहे. खिलाडुवृत्ती कमी झाल्याने खेळाडूसुद्धा ईर्ष्या व असूया यांच्या आहारी जाऊन खेळासाठी व खेळाडूंसाठी काही वारसा ठेवून जाण्याचे प्रमाणही कमीच आहे.
24 बाय 7 आक्रमकता ही सर्वसामान्य बाब नाही. आपल्यातली आक्रमकता खेळाच्या मैदानावरच काढावी, याचे मानसिक प्रशिक्षण भारतीय खेळाडूंना देणे गरजेचे आहे. बहुतेक खेळाडूंटे विश्व खेळाच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला दुसरे पैलूच नसतात. राहुल द्रविड हा कदाचित चौफेर वाचन करणारा एकमेव खेळाडू असावा. त्याचबरोबर तो प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहून आयुष्य जगतो. एकसुरी आयुष्य जगणाऱ्या खेळाडूंना दुखापत किंवा काही कारणांनी खेळापासून दूर जावे लागले तर कमालीची पोकळी जाणवते. त्यातून वेगवेगळे मानसिक त्रास सुरू होतात. त्यामुळे खेळाडूंना केवळ खेळाचे प्रशिक्षण आवश्यक नसून संतुलित आयुष्य जगण्याच्या दृष्टीनेही प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
गेल्या काही काळात केंद्राच्या चुकीच्या धोरणांवर भारतीय खेळाडूंनी घेतलेली भूमिका, ही बोटचेपेपणाची आहे. त्यात सरसकट शरण जाण्याची वृत्ती दिसते. परिणामी त्यांच्यामध्ये ‘खिलाडू वृत्ती’चा अभाव दिसतो.
कोणताही एकेरी किंवा सांघिक खेळ शारीरिक कौशल्याबरोबर भावनिक कौशल्य शिकवतो. हार-जीत हा खेळाचा भाग असून त्यावर अवलंबून न राहता मांडलेला डाव पूर्ण करायला हवा, ही सगळ्यात मोठी शिकवण खेळ देतो.
क्षणिक मोहाला बळी पडून सुशील कुमारसारख्या अनेकांनी स्वत:चे आयुष्य बरबाद करून घेतले आहे. ते अत्यंत दुर्दैवी आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेली रितिका फोगाटची आत्महत्या आणि आता सुशील कुमारचा गुन्हा, हे नक्कीच भारतीय क्रीडा विश्वाला वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करायला सांगत आहेत.
सुशील कुमारने भारतीय कुस्तीमध्ये जे करून ठेवलंय, ते नक्कीच अभिमानास्पद आहे. पण त्याच्यासोबत जे झालं ते दुर्दैवीच आहे. आता हा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू आयुष्याची लढाई कशी लढतो, हे काळ ठरवेल.
प्रतिभावान खेळाडूंचं यश साजरं करताना त्याच्या दुसर्या अनेक बाजूंचा विचार करून या खेळाडूंना लागणारी मानसिक आरोग्याची मदत देणं भारतीय खेळाच्या भविष्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे.
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
vrushali31@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment