मा. खा. छत्रपती संभाजीराजे, छत्रपतींचे वंशज म्हणून आपण रयतेला शहाणे केले पाहिजे. आपली ही नैतिक जबाबदारी आहे!
पडघम - राज्यकारण
व्ही. एल. एरंडे
  • खा. छत्रपती संभाजीराजे
  • Thu , 27 May 2021
  • पडघम राज्यकारण मराठा समाज Maratha Samaj मराठा आरक्षण Maratha reservation सर्वोच्च न्यायालय Supreme Court

मा. खा. छत्रपती संभाजीराजे,

आपणास सस्नेह जय जिजाऊ.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात चर्चा, बैठका, पत्रकार परिषदा व काही सवंग घोषणा, यांचे अमाप पीक आले आहे. एक मराठा म्हणून आपणदेखील पुन्हा सवंग लोकप्रियता डोळ्यासमोर ठेवून आडवं पडण्याची व आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा करून समाजाची भूमिका आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी २७ मे नंतरचा मुहूर्त निश्चित केल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे समजले.

मा. खासदारसाहेब, ‘मराठा क्रांती आंदोलना’चा आणि ‘मराठा सेवा संघा’चा एक कार्यकर्ता या नात्याने आम्हाला काही प्रश्न सतावत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनातील एक नेतृत्व किंवा आरक्षणाचे कट्टर समर्थक म्हणून त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडून मिळतील, ही अपेक्षा ठेवून हा पत्रप्रपंच करत आहे.

मा. खासदारसाहेब, आपण छत्रपतींचे वशंज आहात. आपल्याला भाजपने देऊ केलेली राज्यसभेची खासदारकी तशी फार महत्त्वाची नव्हती व आजही नाही. आपला कालावधीही संपत आलेला आहे. पुढे भाजपसारखा चतूर पक्ष आपल्याला उमेदवारी देण्याची शक्यता वाटत नाही, हे जसे आमच्या लक्षात आले आहे, तसे आपल्याही असेलच की!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दुसरे म्हणजे आपल्याला खासदारकीचा राजीनामाच द्यावयाचा असेल तर त्याची प्रसारमाध्यमांसमोर व जनतेसमोर वेळोवेळी वाच्यता करण्याची अजिबात गरज नाही. आपण राज्यसभेच्या सभापतीकडे चर्चेशिवाय तो पाठवू शकता. मात्र आपल्याला सत्तेचा त्याग करण्याची हिंमत होत नसावी, असे वाटते. किंवा सत्तेशिवाय आरक्षणाचा प्रश्न रेटता येणार नाही, असे वाटत असावे. मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठा समाजातील कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला आहे की, आपण मागील पाच वर्षांपासून (जुलै २०१६ पासून) खासदार आहात. या काळात आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लागला नाही?

आपण खासदार झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात ‘मराठा क्रांती मोर्चां’ना सुरुवात झाली. त्यात एक मराठा म्हणून (‘मी खासदार म्हणून आलो नाही’, असे आपण मुंबईत म्हटले होते) आपण सहभागी झाला होतात. तेव्हापासून आपण सतत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून प्रसारमाध्यमांसमोर बोलत आहात. आजही या पलीकडे तुमची कार्यपद्धती जात नाही. तेव्हा आपण आपल्या पक्षाची तरफदारी करता की, मराठा समाजाचे छत्रपती म्हणून मराठ्यांचा कैवार घेता, याबद्दल संभ्रम आहे. तो आपण कसा दूर कराल?

आपण खासदार म्हणून मा. पंतप्रधानांना भेटीसाठी चार-पाच पत्रं लिहिली, परंतू त्याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली नाही, असे तुम्हीच प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. याचे दोन अर्थ निघतात. एक, चंद्रकांत पाटील म्हणतात त्याप्रमाणे पंतप्रधानांना हा प्रश्न घटक राज्यापुरता मर्यादित वाटत असावा किंवा आपल्याला भेटण्यात पंतप्रधानांना फारसे गम्य नसावे. छत्रपतीचे वंशज असलेल्या व संसदेचे सदस्य असलेल्या व्यक्तीला पक्षात व केंद्रशासनात काहीच महत्त्व नाही, असा संदेश तमाम मराठा समाजात गेला असेल तर आपली विश्वासार्हता समाजासमोर प्रश्नांकित झाली आहे, असा अर्थ काढला जाऊ शकतो. अशा स्थितीत आपण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व कसे करणार आणि केले तरी मराठा समाज आपल्यामागे पुन्हा फरफटत येईल काय?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मा. खासदारसाहेब, आपण २७ मे नंतर मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटणार व पुढची दिशा ठरवणार, असेही तुम्ही म्हटले आहे. इथे एक प्रश्न उपस्थित होतो. तो असा की, मागील पाच वर्षांत आपल्या साक्षीने सर्व सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा करणार, हा खरा प्रश्न आहे. कारण आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांना आता सांगण्यासारखे, तसेच त्यांच्याशी चर्चा करण्यासारखे काही शिल्लक राहिलले आहे, असे आम्हाला वाटत नाही. आणि आता रस्त्यावर उतरून हा प्रश्न सुटू शकणार नाही, हे आमच्याप्रमाणे तुम्हालाही चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आपला नेमका हेतू काय आहे?

सत्ताधारी राजकीय पक्षात राहून, त्याची विचारसरणी स्वीकारून जनहिताचे लढे कधीच उभारले जाऊ शकत नाहीत; कारण सरकारची कार्यपद्धती, पक्षाची ध्येयधोरणे आणि सर्वसामान्य समाजाचा आक्रोश परस्परांशी मेळ खात नाही. त्यामुळे आपल्याला लढ्याचे नेतृत्व खरोखरच करावयाचे असेल तर सत्तात्यागाची ‘राजकीय संस्कृती’ जोपासावी लागेल. केवळ जनतेची समजूत काढण्यासाठी हा खटाटोप चालला असेल तर आपणास क्षणिक सवंग लोकप्रियता मिळेल, मात्र जनतेला सदासर्वकाळ फसवून सत्तेत अखंडपणे राहता येत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे. केवळ छत्रपती घराण्याचे वलय म्हणून सवंग लोकप्रियतेवर आरूढ होऊन समाजाच्या भावनेशी प्रतारणा आपल्याकडून होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.

एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आम्हाला सतावतो आहे. त्याचेदेखील आपण निरसन करावे असे वाटते. काल-परवा प्रसारमाध्यमांसमोर बोलताना आपण राज्यातील काही भागांत दौरे करून मराठा समाजाची भूमिका व समाजाचे प्रश्न समजून घेणार असे म्हटले आहे. मा. खासदारसाहेब, मागील पाच वर्षांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण मिळाले पाहिजे, गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ७० ते ७५ टक्के गरीब असलेल्या समाजाला काही सवलती मिळाल्या पाहिजेत, इत्यादी प्रश्नांना, मागण्यांना अनुसरून पाच वर्षं सतत चर्चा झाली, संघटनांच्या हजारो बैठका झाल्या, समित्या-आयोगाचे गठन झाले, अनेक शिफारशी करण्यात आल्या. आपली ‘एल्गार परिषद’ झाली, तसेच ‘शाहू यात्रा’, ‘छत्रपती रयतेच्या भेटाला’ इत्यादी उपक्रम राबवून आपण संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मराठा समाजाचे प्रश्न, समस्या, भूमिका जाणून घेतल्या. तेव्हा आता पुन्हा दौरे काढून कोणते प्रश्न जाणून घेणार आहात?

मा. खासदार महोदय, आपल्याला खरोखरच माहिती हवी असेल तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचे प्रश्न, त्यांच्या भूमिका आणि आक्रोश याबाबत आम्ही आपल्याला अभ्यासपूर्ण माहिती देऊ शकतो. केवळ दौरे करून जनमानसाला प्रभावित करण्यात काहीही हशील नाही. आपण लोकप्रतिनिधी आहात. मराठा समाजातील आर्थिक मागासलेपण आपल्याला माहीत आहे. तेव्हा दौरे करून हार-तुरे स्वीकारणे आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा सवंग घोषणा देऊन सभा गाजवणे, या पलीकडे काहीही साध्य होणार नाही. कदाचित यात आपला राजकीय स्वार्थ साध्य होईल, मात्र समाजाच्या हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे आपण दौरे करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा मराठा समाज मागासलेला नाही, त्यांचे मागासलेपण सिद्ध होत नाही, या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर सूक्ष्म अभ्यास कसा होईल, यासाठी रचनात्मक-सकारात्मक पाऊले उचलली पाहिजेत.

मा. खासदार महोदय, आणखी एका गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. ती अशी की, विदर्भाचे ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ मा. पंजाबराव देशमुखांनी एका ठिकाणी म्हटले होते की, राजाचा व प्रजेचा धर्म एक नसतो. याचा अर्थ शोषक आणि शोषित समाजाचे प्रश्न केवळ भिन्न-भिन्नच असत नाहीत, तर ते परस्परांच्या हितसंबंधांना छेद देणारे असतात. आपण छत्रपती आहात म्हणून आम्ही हे विधान करत नाही, तर ‘प्रस्थापित’ आणि ‘विस्थापित’ अर्थात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्या वेदना कशा वेगळ्या असतात, हे सांगण्याचे प्रयोजन आहे. याचा अर्थ आपणाला गरीब मराठा समाजाच्या वेदना माहीत नाहीत, असा आमचा आक्षेप नाही. मात्र ‘दाई’ आणि ‘आई’मधला हा फरक आहे.

मा. खासदार महोदय, वर उल्लेख केल्याप्रमाणे पंजाबराव देशमुखांनी विदर्भातील मराठ्यांचा ‘कुणबी’ म्हणून इतर मागासवर्गात समावेश केला. त्यांना मराठवाड्यातील प्रस्थापितांनी दौरा करू दिला नाही. आता मात्र सर्वांचेच दौरे, बैठका ज्या राजकीय अभिनेशातून होतात, ती पद्धत मागास मराठा समाजाला लाभदायक ठरेल, असे किंचितही वाटत नाही. एखाद्या मेंढराच्या कळपाप्रमाणे कुणाच्याही मागे जाऊन भाबडा विश्वास ठेवणे, आपल्या जातीचा दुराभिमान बाळगणे, आपलीच पिळवणूक करून प्रस्थापित झालेल्या धनदांडग्याचे कौतुक करणे, एवढेच नाहीतर आपल्या जातीचा उमेदवार म्हणून प्रचार करणे, निवडून देणे, या प्रवृत्तींचा सर्वसामान्य मराठा समाजात झालेला अतिरेकच त्यांचे मागासलेपण अधोरेखित होऊ देत नाही. याचा लाभ उठवत गरीब मराठा समाजाला सतत गृहित धरून नागवण्यात आलेले आहे. आता आरक्षणाचे राजकारण करून पुन्हा या समाजाला प्रस्थापित नेतेमंडळी वेगळ्याच दिशेने घेऊन जात असतील, तर त्यांच्यात सामील न होता छत्रपतींचे वंशज म्हणून आपण रयतेला शहाणे केले पाहिजे. आपली ही नैतिक जबाबदारी आहे. मात्र सवंग लोकप्रियता आणि पक्षीय राजकारणातील दुर्गंधी त्याला येत असेल, तर मराठा समाजाशी ती फार मोठी प्रतारणा ठरेल.

मागील लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने आपल्याला नाकारलेले आहे. असे असतानाही मराठा समाजाने, विशेषतः मराठवाड्यातील तमाम मराठा समाजाने छत्रपतींचे वारसदार म्हणून तुम्हाला डोक्यावर घेतले. आपणदेखील घोषणा केली होती की, ‘छत्रपती’ या पदवीसमोर बाकी सर्व पदे गौण आहेत. त्यामुळे मी कोणतेही पद स्वीकारणार नाही. तरीही आपण भाजपची उमेदवारी स्वीकारली व संसद सदस्य झालात. त्यानंतरदेखील आपण म्हणाला होतात की, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, त्यामुळे माझा तसा भाजपशी काही संबंध नाही. आम्ही आपल्यावर भाबडा विश्वास ठेवला. मात्र नंतर पक्षाच्या बैठकीत गळ्यात भाजपचे ओळखपत्र अडकून मिरवलात. तरीही आम्हाला वाटले की, तुम्ही सहज गेला असाल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इथे एक बाब प्रकर्षाने नोंदवावीशी वाटते. ती म्हणजे आपल्या नियोजित दौऱ्याला चंद्रकांत पाटील यांच्या शुभेच्छा आहेत. त्यातच भाजपसोबत काम करणाऱ्या आ. विनायकराव मेटे यांनी ५ जून २०२१ रोजी बीडमध्ये जो मराठा समाजाचा मोर्चा आयोजित केला आहे, त्याला आपण उपस्थित राहणार आहात. त्यामुळे अशी चर्चा आहे की, आपल्या दौऱ्याला भाजपचा वरदहस्त तर नाही ना?

आम्हाला आपल्याकडून या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. कारण आपण समाजाचे नेते आहात. आणि हो, अजून एक महत्त्वाचे म्हणजे ‘मराठा क्रांती मोर्चा’ने कोणाकडेही नेतृत्व दिलेले नाही.

आपला नम्र

डॉ. व्ही.एल. एरंडे

..................................................................................................................................................................

लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

vlyerande@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......