हा लेख ‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या डॉ. भालचंद्र मुणगेकर व आकाश सिंग राठोड यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील ‘Dr. Ambedkar's Interpretation of Budhhism and Its Contempoprary Relevance’ या लेखाचा हा अनुवाद आहे. २००५ साली मुंबईमध्ये झालेल्या ‘पहिल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स’मध्ये सादर केल्या गेलेल्या शोधनिबंधांचा समावेश या संग्रहात केला असून हे पुस्तक नवी दिल्लीतील Bookwell या प्रकाशनसंस्थेने २००७मध्ये प्रकाशित केले आहे.
प्रस्तुत लेखाचा अनुवाद - कुमुद करकरे
..................................................................................................................................................................
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसहित केलेले धर्मांतर ही एक इतिहासात ठळकपणे नोंदवली गेलेली घटना आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील कार्याचा हा सर्वोच्च बिंदू होता. एवढेच नव्हे तर त्यामुळे आधुनिक भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाच्या आणि जागतिक इतिहासात त्यांना अढळ स्थान प्राप्त झाले.
डॉ. आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य जाति-वर्णभेद व्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध उभ्या केलेल्या विद्रोहाचे एक प्रतीक होते. या व्यवस्थेने समाजातील नीच जातीच्या लोकांना आणि विशेषत: अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या लोकांना अन्यायाने दडपून टाकून, त्यांचे शोषण करून, पदोपदी त्यांचा अपमान करून आणि त्यांना विविध प्रकारे असहाय्य आणि निराश्रीत करून त्यांचे जीवन उदध्वस्त केले होते. डॉ. आंबेडकरांच्या मताप्रमाणे त्यांनी या जनतेला वेगवेगळ्या जातींच्या पारंपरिक आणि अभेद्य साच्यांमध्ये इतके घट्ट बंद करून टाकले होते की, अनेक शतके या देशाची अस्मिता आणि सामर्थ्य यांच्यापुढे मोठेच आव्हान उभे राहिले होते. शिवाय या जातिपद्धतीमुळे लोकांच्या निष्ठा त्यांच्या त्यांच्या जातींच्या समजुतीत गुरफटून गेल्या आणि नैतिकतेचे निकषही जाती-जातींनुसार ठरवले गेले. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूलभूत मानवी मूल्यांचा विध्वंस तर झालाच, त्याचबरोबर वरिष्ठ जातींनी सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मालमत्ता या सर्व गोष्टी हस्तगत करून घेऊन इतर वंचितांना आपले गुलाम बनवले. स्वत: डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यता ही जुन्या रोममधील गुलामगिरीपेक्षाही भयंकर वाटत होती.
डॉ. आंबेडकरांचा जन्म एका अस्पृश्य कुटुंबात झाल्यामुळे अस्पृश्यतेच्या वाट्याला आलेली आणि जीवन उदध्वस्त करून टाकणारी सर्व दु:खे त्यांनाही भोगावी लागली. त्यामुळे ते जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे प्रखर विरोधक बनले. हिंदू समाजाला जातिव्यवस्थेच्या आणि अस्पृश्यतेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रकारच्या सुधारणांचे सुसंगत मार्ग दाखवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी आपले सर्व आयुष्य पणाला लावले. पण त्यांना त्या कार्यात फारसे यश मिळाले नाही. म्हणून १९३५ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात येवला या गावी भरलेल्या परिषदेत त्यांनी ‘आपण हिंदू म्हणून जन्माला आलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही’ असा निर्धार जाहीर केला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अस्पृश्यांच्या सर्वांगीण मुक्तीसाठी डॉ. आंबेडकर आयुष्यभर लढत राहिले. देशातील पददलितांच्या विशेषत: अस्पृश्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर निकराचा आणि अथक संघर्ष केला. त्या कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, वृत्तपत्रे आणि नियतकालिके तर काढलीच, पण त्यांच्या मागे एक राजकीय पक्ष स्थापन करून त्याचे सामर्थ्यही उभे केले. समाजातील तळागाळाची आणि अस्पृश्य समजली जाणारी जनता स्वाभिमानाने आणि प्रतिष्ठेने जगत राहावी म्हणून त्यांनी जनतेची आंदोलने चालवली.
स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे सदस्यत्वही त्यांनी खुशीने स्वीकारले. घटनेच्या रूपरेखा (आराखडा) समितीचे (ड्राफ्टिंग कमिटीचे) ते कार्याध्यक्ष बनले. याचे कारण घटनाविषयक कायद्याचे ते एक तज्ज्ञ समजले जात होते. त्या विषयावरच्या त्यांच्या असाधारण कौशल्यामुळेच त्यांना राज्यघटनेच्या मसुद्यावर चांगलीच पकड बसवता आली आणि त्यामुळे ते ‘घटनाकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. समोर चालून आलेल्या या ऐतिहासिक संधीचा वापर त्यांनी देशातील दरिद्री आणि वंचित जनतेच्या हितसंबंधांना संरक्षण देण्यासाठीच केवळ केला नाही, तर या देशाचे रूपांतर सामर्थ्यवान आणि समृद्ध राष्ट्रात करण्यासाठी हे चैतन्यपूर्ण राज्यघटनेचे साधन देशासमोर ठेवले. त्यांनी या कार्यात घेतलेले अथक कष्ट हा त्यांच्या जाज्ज्वल्य देशभक्तीचा एक पुरावा ठरला.
एखाद्या समाजाचे व्यवहार सुरळीत चालू राहावेत म्हणून नियमांच्या स्वरूपात काही मार्गदर्शक तत्त्वांची रचना आवश्यक असते. त्यांच्या आधारे समाजातील विविध प्रकारच्या घटनांना योग्य दिशा देणारी धोरणे ठरवावी लागतात, यावर डॉ. आंबेडकरांचा गाढ विश्वास होता. अर्थपूर्ण आणि स्थैर्य आणणाऱ्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी त्याला पूरक अशी सांस्कृतिक क्रांती आधी घडून आली पाहिजे, यावरही त्यांचा विश्वास होता. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेला बौद्धांच्या क्रांतिकारक तत्त्वज्ञानाचा आधार होता, त्याचप्रमाणे शिवाजीमहारांच्या स्वराज्याला महाराष्ट्राच्या भक्तीचळवळीची पार्श्वभूमी लाभली होती, ही उदाहरणे ते व्याख्यानांत नेहमी देत असत.
त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी जवळ जवळ तीन दशके सर्व धर्मांतील तात्त्विक मुद्द्यांचा तौलनिक दृष्टीने गाढ अभ्यास केला. आणि शेवटी ते या निष्कर्षाला पोचले की, मानवी समाजाला कायम मुक्ती देणारे बौद्ध धर्माचे एकमात्र तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी मात्र त्यांनी सतत बदलत्या मानवी समाजाच्या संदर्भात स्वत:च्या पद्धतीने, विचारांनुसार केली. एक तत्त्वप्रणाली म्हणून बौद्ध धर्माने खालील श्रद्धा नाकारल्या आहेत –
वेदांचा अचूकपणा, मोक्ष किंवा आत्म्याची मुक्ती, मोक्षप्राप्तीसाठी केले जाणारे धार्मिक विधी, यज्ञ आणि बलिदान इत्यादींचे सामर्थ्य, आदर्श सामाजिक संघटनेसाठी चातुर्वर्ण्याची निकड, विश्वाचा निर्माता ईश्वर हा विश्वास, आत्म्याचे अमरत्व व कर्मविपाक आणि पुनर्जन्म व चालू जन्मात मागील जन्मातील पाप-पुण्याची मिळणारी फळे.
बुद्धाने मनाला सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू मानले आहे. सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचे शरीरातील उगमस्थान प्रथम मन आहे, त्यांचा बाह्यानुभव आपण नंतर घेतो, असे त्याचे प्रतिपादन होते. म्हणूनच सर्व प्रकारच्या पापकृत्यांचा त्याग केला पाहिजे, खरा धर्म ग्रंथात नाही, तर धर्मतत्त्वांचे आचरण करण्यात आहे, असे बुद्धाचे प्रतिपादन होते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
वर उल्लेख केल्याप्रमाणे बुद्धाने वर्ण-जाती व्यवस्था साफ नाकारली. त्याने आपल्या संघात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना वर्ग, जात, लिंग, प्रतिष्ठा, व्यवसाय या कशाचाही भेदभाव न मानता किंवा कसोटी न लावता प्रवेश दिला. बौद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार करणाऱ्यांत प्रवेश करणारे यक्ष (बनारसमधील धनिक), कश्यप (खूप शिकलेले), सारिपुत्त आणि मोग्गलाना (ब्राह्मण), मगधाचा राजा बिंबिसार, अनाथ पिंडिका (प्रसेनजितचा कोषरक्षक), स्वत: कोसलनृत्य प्रसेनजित, सरदारपुत्र जीवक, प्रतिष्ठित कुटुंबातून आलेला रथपाल, उपाली (न्हावी), सुनिता (झाडूवाली), सोपक व सुप्रिया हे अस्पृश्य, सुप्रबुद्ध हा महारोगी आणि अंगुलीमाल हा दरोडेखोर अशा विविध प्रकारचे लोक होते.
बुद्धाने जाती आणि वर्णसंस्थेचा केलेला त्याग हे तत्कालीन हिंदू समाज व्यवस्थेला आव्हान होते. आणि सामाजिक परिवर्तनाला ते गती देणारे होते. त्यामुळे जागृत झालेल्या प्रतिक्रांतिकारी शक्तींमुळे बौद्ध धर्म आपल्या जन्मस्थानपासून दूर गेला. त्याचे भारतातून उच्चाटन झाले.
माणूस आणि माणसामाणसांचे या पृथ्वीवर असणारे संबंध, हे बुद्धाच्या धम्माचे केंद्र किंवा गाभा होता. मानवी जीवनाच्या अतिरेकी अवस्था त्याने पूर्णपणे नाकारल्या. ऐहिक बाबींचा तिरस्कार करणे किंवा सुखोपभोगांची अदम्य लालसा या दोन्ही गोष्टींना विरोध केला. त्याने या दोन्ही अवस्थांच्या मधला – मध्यम मार्ग (माझ्झामा पनिपद) काढला. त्याने अष्टपद मार्गांचा (अष्टांग मार्ग) उपदेश केला. त्यामध्ये सम्मदित्ती म्हणजे योग्य दृष्टी, सम्मा संकप्पो (योग्य उद्दिष्ट अगर अपेक्षा), समावाक्का (योग्य भाषा), साम्मा कमान्तो (योग्य आचरण), साम्मा अजीवो (जीवनासाठी योग्य साधने), साम्मा व्यायामो (योग्य प्रयत्न), साम्मा सत्ती (योग्य विचार) आणि साम्मा समाधी (योग्य एकाग्रता) यांचा समावेश आहे.
डॉ. आंबेडकर पुढे लिहितात, “निब्बाणावर (निर्वाण) गौतम बुद्धांची श्रद्धा होती, पण मानवमात्राला मुक्ती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले नाही. आपण मार्गदाता म्हणजे मार्ग शोधणारा आहोत, मोक्षदाता नाहीत असे त्यांनी सांगितले. ‘अत्त दीप भव’ म्हणजे ‘स्वत:च स्वत:चा मागदर्शक हो’ असा उपदेश त्यांनी केला. आपण आणि आपला धर्म यांच्याभोवती दिव्यत्वाची प्रभा त्यांनी कधी मिरवली नाही. माणसाने माणसासाठी शोधलेला धर्म, अशी त्यांची बौद्ध धर्माविषयीची भूमिका होती.”
गौतम बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली. शांतीचा मार्ग दाखवला. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. बुद्धांनी काही सामाजिक संदेश दिला आहे काय? त्यांनी न्याय शिकवला काय? प्रेमाची शिकवण त्यांनी दिली काय? बुद्धांनी समतेचा, बंधुतेचा संदेश दिला आहे काय? कार्ल मार्क्सला ते उत्तर देऊ शकतात काय? हे सर्व प्रश्न उपस्थित करून डॉ. आंबेडकर लिहितात की, बुद्धांच्या धम्माची चर्चा करताना या मुद्द्यांना कोणी स्पर्शही केलेला नाही.
आणि मग डॉ. आंबेडकर आत्मविश्वासाने सांगतात की, या प्रश्नांना माझे उत्तर आहे की, बुद्धांनी सामाजिक संदेश आपल्या शिकवणीतून दिला आहे. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्या उपदेशात आहेत. पण आधुनिक लेखकांनी ती गुलदस्त्यात ठेवली आहेत.
बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली, पण डॉ. आंबेडकरांच्या मताप्रमाणे त्यांनी हिंसेची आवड किंवा इच्छा आणि हिंसेची गरज यांच्यामध्ये भेद केला होता. पहिल्या गोष्टीला त्यांनी साफ नकार दिला आणि दुसरीचे समर्थन केले. प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन मूल्यांवर बुद्धाचे संपूर्ण तत्त्वज्ञान उभे आहे, कारण त्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
पुनर्जन्मावर बुद्धांचा विश्वास होता, पण हिंदू तत्त्वज्ञानातील आत्म्याच्या पुनर्जन्मावर नाही. ज्या मूलद्रव्यांनी माणसाचा देह बनवला आहे, ती तत्त्वे अमर आहेत आणि त्यांच्या संयोगातूनच पुनर्जन्म लाभतो, असे बुद्धाचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळे बौद्ध धर्मातील पुनर्जन्माची कल्पना आणि हिंदू धर्मातील पुनर्जन्म कल्पना यांच्यामधील फरक लक्षात येतो.
नैतिकतेला बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानात असाधारण महत्त्व दिले. नैतिकता हाच धर्म या त्याच्या वचनाचा अर्थ हाच आहे.
बौद्ध धर्माच्या वरील सर्व बाजूंचा विचार केला, तर पृथ्वीवरील मानवाचे जीवन आणि समाजातील इतर मानवांशी त्याचे संबंध यांना मार्गदर्शन करणारे, वळण लावणारे असे हे बौद्ध तत्त्वज्ञान आहे. मानवाच्या ऐहिक जीवनाकडे ते वैज्ञानिक दृष्टीतून पाहते, परमेश्वराचे अस्तित्व नाकारते. त्याचप्रमाणे पुनर्जन्म, आत्मा, रुढी आणि अंधश्रद्धा व चमत्कार या सर्वांवर या तत्त्वज्ञानाने साफ अविश्वास दाखवला आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याचे मूल्य यात उचलून धरले आहे. समता, न्याय, बंधुत्व, अहिंसा आणि करुणा यावर भर आहे. नैतिकता हा त्याचा पाया आहे. आणि म्हणूनच डॉ. आंबेडकरांसारख्या लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांसाठी आजीवन खडतर कष्ट करणाऱ्या नेत्याला धर्म परिवर्तनासाठी बौद्ध तत्त्वज्ञानाची ओढ लागावी, यात नवल नाही.
भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करताना घटनात्मक कायदा (कॉन्स्टिट्यूशनल लॉ) या विभागासाठी डॉ. आंबेडकरांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावले. भारताच्या सामाजिक जीवनातील सर्व प्रकारची उच्चनीचता व विषमता, व्यक्तिस्वातंत्र्याला त्यात मिळणारा नकार, सामाजिक बंधुभावाची उणीव आणि सामाजिक न्याय या मूल्यावर आलेले सर्वंकष गंडांतर या सर्व वास्तविक पार्श्वभूमीवर भारताची राज्यघटना सामाजिक क्रांतीचे आवाहन करत असलेली दिसते.
भारताच्या राज्यघटनेची कोणतीही बाजू नजरेसमोर आणली तरी, त्या रचनेमागे डॉ. आंबेडकरांच्या विचारांवरील बौद्ध तत्त्वांचा पगडा स्पष्टपणे जाणवतो. मग ती राजकीय धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे असोत किंवा मूलभूत हक्क, अस्पृश्यता निर्मूलन किंवा समाजातील दुर्बल वर्गाच्या संरक्षणासाठी – मागास जाती व जमाती (आदिवासी) यांच्यासाठी लिहिलेली घटनेची कलमे असोत – सर्व लेखनात बुद्धाच्या संदेशाचे प्रतिबिंब पडलेले दिसते.
शांतीपूर्ण समाजपरिवर्तनावर बौद्ध धर्माचा विश्वास आहे. तीच गोष्ट भारतीय घटनेसंबंधात म्हणता येईल. या घटनेनुसार भारतामध्ये प्रस्थापित झालेल्या संसदीय लोकशाहीत चर्चा, वादविवाद आणि मतभेद यांना वाव आहे. जगातील राष्ट्रांना एकत्रित आणणारी ‘युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन’ (संयुक्त राष्ट्रसंघ) या संस्थेची स्थापनाही आंतरराष्ट्रीय तंटे शांततापूर्ण मार्गाने मिटवण्यासाठी झालेली आहे, हे येथे नमूद करणे जरुरीचे आहे.
आज जग उत्तर-दक्षिण अशा दोन प्रदेशात विभागलेले आहे. उत्तरेकडील राष्ट्रे आपल्या आर्थिक व राजकीय सत्तेचा वापर करून दक्षिण प्रदेशातील राष्ट्रांवर वर्चस्व गाजवत आहेत. आपल्या आर्थिक-राजकीय हितसंबंधांसाठी बलाढ्य राष्ट्रे इतर लहानसहान राष्ट्रांमध्ये बेधडक हस्तक्षेप करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे काही वेळा युद्धाची ठिणगी पडते. दोन संहारकारी महायुद्धांतून होरपळून निघालेली मानवजात आजसुद्धा भविष्यातील संभाव्य युद्धांच्या भीतीपासून मुक्त नाही. राजपुत्र सिद्धार्थालाही त्याच्या काळातल्या शाक्य आणि कोलिया या राज्यांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून चाललेल्या झगड्यांमुळे अस्वस्थतेला तोंड द्यावे लागले. आणि त्यामुळे आलेली अति उदासीनता त्याच्या राजत्यागाचे मुख्य कारण झाले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
जगामध्ये वांशिकतेच्या वादातून चालेल्या निकराच्या झगड्यांमुळे अनेक राष्ट्रांचे तुकडे झाले आहेत. नव्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे उत्तर आणि दक्षिण यांच्यामधली दरी रुंदावली आहे. एवढेच नव्हे तर दक्षिणेतील राष्ट्रांमध्येही दुरावा वाढत चालला आहे. सार्वत्रिक दारिद्रयावस्था, बेरोजगारीचे जुनाट पण तीव्र झालेले दुखणे, नजरेला बोचणारी विषमता, जाती-वंश-धर्म आणि लिंगभेद यांच्यावर आधारलेली भेदभावाची वागणूक आणि मोठ्या मानव समूहाच्या मूलभूत मानवी हक्कांची सामर्थ्यवान हितसंबंधांनी केलेली पायमल्ली, हे जगात आज दिसणारे दृश्य गौतम बुद्धाचा युद्धविरोध, शांततापूर्ण मार्गाने, चर्चेने संघर्षाचे मुद्दे निकालात काढणे, सहिष्णुता आणि लालसेवर नियंत्रण या मार्गांकडे आपले लक्ष वळवणे आणि केवळ आताच नव्हे तर भविष्यातही उगवणाऱ्या समाजांना त्यांच्या संदेशाच्या पालनाची गरज अधोरेखित करते.
म्हणूनच ज्याप्रमाणे आज सर्व मानवजातीला बौद्ध धर्मतत्त्वांची दखल घेणे आत्यंतिक जरुरीचे आहे, त्याचप्रमाणे द्रष्टेपणाने या बौद्ध तत्त्वज्ञानाचा जगाला उदबोधक परिचय करून देणारे डॉ. आंबेडकर हेही त्या तत्त्वज्ञानाइतकेच बुद्धाचे चिरंतन वारसदार आहेत, हे आपल्याला कबूल करावे लागेल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment