डॉ. आंबेडकरांचा ‘बौद्धवाद’ सर्व प्रकारच्या वर्चस्ववादी शक्तींना विरोध दर्शवणारा असून सामाजिक व्यवस्थेसाठी न्याय आणि विवेक ही मूल्ये अति महत्त्वाची मानतो
पडघम - सांस्कृतिक
रमेश कांबळे
  • भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Wed , 26 May 2021
  • पडघम सांस्कृतिक भगवान गौतम बुद्ध Bhagwan Gautam Budh बौद्ध धम्म Baudha Dhamma डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar दलित Dalit

हा लेख ‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या डॉ. भालचंद्र मुणगेकर व आकाश सिंग राठोड यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील ‘The Ambedkarian Conversion in Contemporary Context’ या लेखाचा  हा अनुवाद आहे. २००५ साली मुंबईमध्ये झालेल्या ‘पहिल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स’मध्ये सादर केल्या गेलेल्या शोधनिबंधांचा समावेश या संग्रहात केला असून हे पुस्तक नवी दिल्लीतील Bookwell या प्रकाशनसंस्थेने २००७मध्ये प्रकाशित केले आहे.

प्रस्तुत लेखाचा अनुवाद - कुमुद करकरे

..................................................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ (‘बुद्ध अँड हिज धम्म’) या ग्रंथातील विचारांचे विश्लेषण, आधुनिक समाजाच्या मुक्तीचा मार्ग बौद्धधर्म तत्त्वांमध्येच आहे, याबद्दल त्यांची खात्री असल्याचे आपल्याला जाणवून देते. या मुक्तीच्या भाषेचे मूळ समाजातील प्रबळ घटकांची दडपशाही आणि न्याय्य जगाच्या उभारणीची ईर्ष्या धरणारे दलित घटक यांच्यामध्ये सतत चाललेल्या संघर्षात आहे. या मुद्द्यापासूनच सुरुवात करून या निबंधात आंबेडकरी बुद्धवादाची जी दूरदृष्टी आहे, तिच्या समोरील समकालीन आव्हाने जाणून घेऊन त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुलमी जातीव्यवस्था, उदयाला येत असलेल्या उजव्या आणि फॅसिस्ट शक्ती आणि अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था यांची मक्तेदारी बळकावणाऱ्या शक्ती – विशेषकरून पाश्चिमात्य व अमेरिकन यांच्या कच्छपी लागलेल्या देशांतील, या सर्व आव्हानांना आंबेडकरी बौद्धावादाला तोंड द्यायचे आहे. या निबंधाचे लेखकाने दोन भागांत विभाजन केले आहे. त्यापैकी पहिल्या भागात वरील सर्व आव्हानांची चर्चा आहे आणि दुसऱ्या भागात डॉ. आंबेडकरांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या केंद्रभूत सिद्धान्तांचा परामर्श घेतला आहे.

भाग पहिला

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या स्फूर्तिदायक नेतृत्वाखाली मूलभूत मानवतेला वंचित झालेल्या, गुलामगिरीने जखडलेल्या, लादलेल्या जातीच्या कलंकाचा अनुभव घेणाऱ्या, नाकारलेले आणि वंचित जीवन पदरी पडलेल्या, अशा समाजातील लाखो व्यक्तींनी धर्मांतर करून न्याय, प्रतिष्ठा आणि समता यांचे आश्वासन देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. १४ ऑक्टोबरची ही घटना म्हणजे दलितांना त्यांची अस्मिता मिळवून देणाऱ्या प्रदीर्घ लढ्याचा एक टप्पा होता. त्याचबरोबर ब्राह्मणवादाच्या दडपशाही, एकाधिकारशाही आणि अन्य अशाच वर्चस्ववादी शक्तींना दिलेला गंभीर इशारा होता. दलितांच्या या धर्मांतराने त्यांना स्वातंत्र्य आणि स्वयंभू अस्तित्व नाकारणाऱ्या जुलमी ब्राह्मणवादाला नकार देण्याची, प्रतिकार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी जिला ‘विषमतेची वर्गवारी’ (ग्रेडेड इनइक्वॅलिटी) असे म्हटले होते, त्या पद्धतीवर उभारलेली आणि अधिकृत समजली जाणारी समाजव्यवस्थाही झुगारून दिल्याने दलितांनी धर्मांतर करून दाखवून दिले.

अशा प्रकारच्या ऐतिहासिक-सामूहिक धर्मांतराचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ (बुद्ध अँड हिज धम्म) या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले. समाजाच्या नैतिक पुनर्रचनेसाठी थोडीशी जडणघडण केलेला बौद्धविचार हेच एक उपयुक्त साधन आहे आणि त्याचे उपयोजन केवळ दलितांसारख्या जुलमी दडपणाखाली असलेल्या लोकांसाठीच फायद्याचे नाही, तर न्यायाधिष्ठित आणि मानवतावादी भारताच्या नव्हे जगाच्या उभारणीच्या स्वप्नाची चर्चा करण्यासाठी पायाभूत ठरणारे आहे, असा ठाम विश्वास त्यात प्रकट झालेला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मूल्यांच्या पायावर भारतीय समाजाची पुनर्रचना करण्याचे आणि विवेक, न्याय व शांतीपूर्ण सहजीवन यांच्या पायावर भविष्यकालीन जगाची रचना करण्याचे उद्दिष्ट या ग्रंथाचा हेतू आहे. आंबेडकरांच्या परिप्रेक्ष्यात न्याय आणि विवेकवाद या गोष्टी शांतीपूर्ण सहजीवनासाठी अत्यावश्यक मानलेल्या आहेत, ही गोष्ट विशेषत्वाने जाणवते. सदर लेखनात आंबेडकरलिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रकाशात दलितांचे धर्मांतर हा अनुभव समजून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि दलित चळवळ-धर्मांतराच्या कार्यक्रमातून केवळ स्वत:चा सामाजिक दर्जा उंचावण्याचाच प्रयत करत नाही, तर भारतीय समाजाची पुनर्रचना आणि जगातिक दृष्टिकोनात बदल हे उद्देशही या चळवळीसमोर आहेत. त्यानुसारच या ग्रंथातील कळीच्या विचारांचे परिशीलन मी चालू केले आहे. या कार्याचे आणि चळवळीचे मूल्यमापन पुढे दिलेले समकालीन प्रश्न आणि घटना यांच्या संदर्भात करणे जरुरीचे आहे, असाही या लेखाचा उद्देश आहे.

पहिली गोष्ट म्हणजे १९५६ साली महाराष्ट्रात आणि १९९०च्या दशकात उत्तर भारतात झालेले धर्मांतर हे ब्राह्मणवादाच्या एकाधिकारशाहीची तडजोड करण्यास दिलेला स्पष्ट नकार आहे. धर्मांतर करून दलितांनी त्यांच्यावर लादण्यात आलेली बंधने झुगारून दिली आहेत आणि स्वत:च्या अस्मितेची प्रतिष्ठा आणि भारतीय समाजाच्या नवरचनेतील योगदान, या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दलितांच्या बौद्ध धर्म प्रवेशामुळे त्यांना ब्राह्मण्यावर टीका करण्याचा अधिकार त्यांनी मिळवला आहे. तथापि, दलितांमध्ये बौद्ध असण्याची ओळख जाहीर करणे, ही एक प्रकारची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही थेट गृहितकृत्याच्या ती विरोधात जाते. बौद्धधर्मीय असण्याची जी ओळख आहे, तिचे वेगवेगळे अर्थ आहेत आणि ते स्वाभाविक आहेत. काही जणांना आपले मतभेद स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी आणि पर्यायी धर्म निवडण्यासाठी एक वैचारिक चौकट पुरवते, पण ती चौकट पारंपरिक भारतीय सामाजिक कौशल्ये आणि श्रद्धा यांच्यापासून दूर गेलेली नाही. इतर काहींना बौद्धविचारांतून तमावमुक्ती आणि वैश्विक आध्यात्मिक आधार मिळालेला आहे, आणि त्याद्वारे जागतिक बौद्ध परंपरांशी त्यांना जोडून घेतले आहे. पण या दोन्ही समजुती डॉ. आंबेडकरांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ याबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत, त्यांचे अपुरे अवधान किंवा त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या विचारांपासून दूरच गेलेल्या दिसतात. कारण डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धर्म हा दबल्या गेलेल्यांना आवाज उठवून त्यांच्या माणूसपणाची जाणीव करून देण्यासाठीच केवळ नसून भारतीय समाजाच्या पायाभूत घटकांचे नवसंस्करणही करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बौद्ध धर्मावरील भाष्यात बुद्धाच्या सामाजिक संदेशाचा मार्ग सोडल्याबद्दल वर्तमानातल्या बौद्ध आचार धर्मावरही त्यांनी टीका केली आहे. म्हणूनच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रकाशात बौद्ध अस्मितेच्या प्रकटीकरणाची प्रक्रिया कसोशीने तपासून घेतली पाहिजे.

दुसरा मुद्दा असा की हिंदुत्वाच्या उजव्या चळवळीचा झपाट्याने झालेला उगम व वाढ, जिचा स्रोत ब्राह्मणी हिंदू संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आहे. या चळवळीने भारताची राष्ट्रीय संस्कृती, इतिहास आणि अस्मिता यांचे एकस्तंभी दर्शन जगासमोर ठेवले. संघ ही संघटना काही काळ कोशात गेली होती, तरी अतिरेकी धर्मवाद पसरवण्यात यशस्वी झाली. आणि त्यामुळे भारतीय संस्कृती आणि इतिहास यांचा पुरस्कार करण्यात अग्रेसर ठरली. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांचे कथन आणि मूल्यमापन केवळ ब्राह्मणी परिप्रेक्ष्यातून होत राहिल्यामुळेच इतर अ-ब्राह्मणी वर्गांच्या संस्कृती आणि समाजविषयक संकल्पना पार धुडकावल्या गेल्या. ज्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाचा स्वीकार केला नाही, त्यांना सरळ देशद्रोही ठरवण्याचे धाडसही या मंडळींनी दाखवले.

याचा परिणाम असा झाला की, इतिहासाचे पुनर्लेखन आणि सिद्धान्तांचा पुनर्विचार होण्याऐवजी अलीकडील काळात भयंकर हिंसाचार आणि माणुसकीला लाजवणाऱ्या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली. तोच इतिहास बनला. वेगळा दृष्टिकोन असणाऱ्यांवर वार करण्यासाठी ज्या शक्तींच्या हाती सत्ता होती, त्यांना शिस्त लावणे व शिक्षा या नावाखाली हिंदुत्वाचा प्रचार चालवला.

हिंदुत्वाचे प्रचारक म्हणून ब्राह्मणांनी दुसऱ्या वर्गांना अटी घालण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी धर्मांतराला विरोध चालवला. वास्तविक धर्मांतराला असलेला विरोध हा पूर्णपणे राज्यघटनाविरोधी आहे. कारण स्वत:च्या निवडीप्रमाणे धर्माचे आचरण व प्रचार हे मूलभूत स्वातंत्र्य राज्यघटनेने भारतीय नागरिकांना बहाल केलेले आहे. त्याचप्रमाणे या वर्गाने इतिहास खोटा ठरवण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ, काही तथाकथित विद्वानांनी डॉ. आंबेडकरांना ‘खोटे दैवत’ (फॉल्स गॉड) म्हणून लोकांसमोर आणून त्यांचा दलितांचा लढा ब्रिटिशांचा कैवार घेणारा ठरवला. अशा तऱ्हेचे पांडित्य एका वस्तुस्थितीबाबत अंधारातच आहे. आंबेडकरांनी त्यांच्या तथाकथित राष्ट्रीय चळवळीला केलेला विरोध हा खऱ्या अर्थपूर्ण स्वातंत्र्य चळवळीला साहाय्यभूत ठरला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या सर्व पार्श्वभूमीवर एक येथे नमूद करणे जरुरीचे आहे. ते असे की, डॉ. आंबेडकरांचा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ वाचून खात्री पटते की, केवळ न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तत्त्वांभोवतीच बौद्ध धर्माचा विचार केंद्रित केलेला नाही, तर बुद्धाला अभिप्रेत असलेल्या न्याय्य व नैतिक समाजव्यवस्थेच्या पूर्णपणे विरोधात असलेल्या ब्राह्मणांनी पुकारलेल्या चातुर्वर्ण्य पद्धतीवरही त्यांन कडवा हल्ला चढवला होता.

तिसरा मुद्दा जागतिकीकरणाचा.  अलीकडच्या काळात जागतिक व्यवस्था या संकल्पनेवर काही नव-उदारमतवादी भांडवलदारांचे आवाहन जोरदार युक्तिवादाचा आधार घेऊन पुढे आलेले दिसते. अशा आवाहनाचे समर्थक भांडवलशाहीच्या छताखाली येणारी लोकशाही, मानवी हक्क इत्यादी मूल्ये याच मानवी प्रगतीच्या खऱ्याखुऱ्या खुणा आहेत, असा आग्रह धरतात. 

मुक्त व्यापार, जागतिक बाजार व्यवस्था यांच्या पाठपुराव्यामुळे केवळ विकसनशील देशांतच नव्हे, तर विकसित देशांतही लोकांपुढील रोजगाराची आणि उपजीविकेची साधने नष्ट होत चालली आहेत. या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या टीएनसी (Transnational corporations) या घटकामुळे नोम चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे नफ्याचा पाठपुरावा हा जनतेच्या हितसंबंधांना पायदळी तुडवत असून त्याचा परिणाम म्हणून मानवी हक्कांवर गदा आली आहे. भारतासारख्या विकसनशील देशांत बाजारी मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रयोग देशातील सामाजिक विषमता आणि दारिद्रय वाढवतच चाललेला आहे. कारण तिच्या दबावाखाली शासनाने आपले कार्यक्षेत्र आणखीच संकुचित करून घेऊन आरोग्य, शिक्षण आणि नियमांनुसार होणारी रोजगारभरती इत्यादी जबाबदाऱ्या अंगाबाहेर टाकायला सुरुवात केली आहे. शासनाने आपल्या जबाबदाऱ्या आणि लोकांना आधारभूत होतील, अशा अनुदानविषयक यंत्रणा यांच्याबाबत आखडता हात घेतल्यामुळे दलितांसारखे समाजातील दरिद्री घटक जीवन-मरणाच्या सीमेवर आहेत. त्यांच्यापैकी ८० टक्के लोकांना जीवनाच्या किमान गरजा भागवण्यासाठी लागणारी साधनसामग्री नजरेच्या टप्प्यांतही नसल्यामुळे कसेबसे जिवंत राहावे लागत आहे आणि आरोग्य, शिक्षण व रोजगार यांच्या अभावी त्यांच्या जीवनाची परवड वाढतच चालली आहे.

भारतासारख्या अनेक विकसनशील आणि अविकसित देशांत वाढत्या दारिद्रयाचे हे प्रत्यंतर येत असताना जगातील भांडवलशाही पद्धती आपल्या आर्थिक आणि प्रसारमाध्यमांद्वारे खुल्या बाजारी अर्थव्यवस्थेचा मार्गच फक्त ऐच्छिक विकासाच्या ध्येयाकडे नेणारा आहे, असे पुन्हा पुन्हा जाहीर करत आहे. हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि तर्कविसंगत आहे.

पाश्चिमात्य भांडवलशाहीचा दुसरा आक्रमक पवित्रा म्हणजे ‘दहशतवादविरोधी युद्ध’ ही त्यांची घोषणा. ९\११च्या अमानुष आणि निषेधार्ह दहशतवादी दृश्यात असंख्य अमेरिकन नागरिक बळी गेले. पण त्या दहशतवादाला अमेरिकन प्रशासनाचा प्रतिसाद राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या भाषणातून जगातील राष्ट्रांना एक प्रकारे दरडवणारा किंवा वर्चस्ववादी होता – ‘एकतर तुम्ही आमच्याबरोबर असाल, नाहीतर आमच्या विरोधी असाल’. त्याचप्रमाणे बुश आणि ब्लेअर यांनी सद्दामला पदच्युत करण्यासाठी पुकारलेले युद्ध हे ‘दहशतवादविरोधी युद्ध’ म्हणूनच प्रथम जाहीर केले. आणि राष्ट्राध्यक्ष सद्दामकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे असल्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे, अशी ओरड करून इराकमधील लोकशाहीसाठीच हे युद्ध असा आभास निर्माण केला.

जगातील बहुसंख्य राष्ट्रे या अमेरिकन आक्रमणाच्या विरोधात होती आणि अमेरिकेतील शांतीसैनिकांनाही हे युद्ध अन्याय्य वाटत होते. पण बुश आणि ब्लेअर या दोघांनीही इराककडे असलेली डब्ल्यूएमडी (Weapon of mass destruction) ही अण्वस्त्रे ताब्यात घेण्याच्या निमित्ताने या मोहिमेचा पाठपुरावा चालूच ठेवला. त्यामध्ये सद्दामला पदच्युत करून कैदेत ठेवण्यात आले आणि त्याचे प्रशासन नष्ट करण्यात आले, तरी डब्ल्यूएमडी ही अण्वस्त्रे इराकमध्ये आहेत, हे बुश यांना सिद्ध करता आले नाही. वृत्तपत्रांच्या आणि अन्य माध्यमांच्या प्रसारणानुसार इराकमधील जनतेने जरी सद्दामच्या राजवटीचा अंत झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, हे खरे असले, तरी ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याने तेथेच तळ ठोकून राहण्याला प्रतिकारही केला.

अशा प्रकारे आर्थिक आणि लष्करी शक्तीचा वापर करून प्रस्थापित केलेली शांतता परस्परांचे शांतिमय सहअस्तित्व टिकून धरेलच असे नाही. आंबेडकरांच्या बौद्धवादात तर्क आणि न्याय या गोष्टी शांतता प्रस्थापनेसाठी अत्यावश्यक ठरवल्या आहेत. याचा अर्थ असा की, डॉ. आंबेडकरांचा बौद्धवाद सर्व प्रकारच्या वर्चस्ववादी शक्तींना विरोध दर्शवणारा असून सामाजिक व्यवस्थेसाठी न्याय आणि विवेक ही मूल्ये अति महत्त्वाची मानतो. कारण त्यांच्याशिवाय जगामध्ये चिरकाल शांतता आणि सुसंवाद निर्माण होणे अशक्य, अशी त्याची धारणा आहे.

भाग दुसरा

डॉ. आंबेडकरांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील काही कळीच्या मुद्द्यांचा परामर्श घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ही चर्चा वर दिलेल्या तीन मुद्द्यांवर डॉ. आंबेडकर यांच्या बौद्धवादाच्या संकल्पनेच्या संदर्भात थोड्या विस्ताराने केलेली आहे.

डॉ. आंबेडकरांनी त्यांचे महत्त्वाचे बौद्धिक योगदान देण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर केला. पाश्चिमात्य जगातील विचारवंतांना त्यातून आवाहन करावे किंवा आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत हाही एक हेतू त्यांच्या इंग्रजी लेखनामागे होता. ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथही त्यांनी इंग्रजीमधूनच लिहिला. त्यांनी त्या ग्रंथाच्या उपोदघातातच या लेखनाचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये त्यांना ‘इन्सायक्लोपीडिय ऑफ रिलिजन अँड एथिक्स’ (‘धर्म आणि नीती यांचा माहितीकोश’) या ग्रंथाच्या दहाव्या खंडातील ६६९ या पृष्ठावरून एक उतारा सादर केलेला आहे. तो असा – “काळानुसार मानवांना त्यांच्या वर्तमानातील आणि वारशाने आलेल्या श्रद्धा आणि विकार यांचा पुनर्विचार करणे भाग पडले आहे. वर्तमान आणि भूतकाळातील काही अनुभवांची संगती लावण्यासाठी आणि भविष्यकाळातील घटनांना तोंड देण्याचा आत्मविश्वास लाभावा हा त्यामागील हेतू आहे.”

त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आंबेडकरांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करून या ग्रंथलेखनाची गरज उघड केली आहे. ते म्हणतात की, बुद्धाचा स्पष्ट व सुसंगत जीवनपरिचय आणि उपदेश यांच्याबद्दलचे कुतूहल वाढत आहे. बुद्धाचे जीवन आणि उपदेश यासाठीची जी सामग्री आहे, ती गोंधळात टाकणारी नसली तरी कोड्यात टाकणारी आहे. त्यांनी चार मूलभूत प्रश्नच चर्चेसाठी पुढे केलेले आहेत. त्यांपैकी पहिला बुद्धाच्या आयुष्याविषयी आणि त्याने ‘परिव्रज्या’ का घेतली, या संबंधीचा आहे. पण याला उत्तर देताना डॉ. आंबेडकर असे म्हणतात की, त्याला पारंपारिक उत्तर बुद्धाने एक शव, एक रुग्ण आणि एक जरार्जर म्हणजे खूप म्हातारा झालेला माणूस पाहिला आणि तो जीवनाबद्दल उदास झाला, असे जे दिले जाते, ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण वयाची २९ वर्षे त्याने ही दृश्ये पाहिली नसण्याची शक्यताच नाही.

दुसरा प्रश्न डॉ. आंबेडकर यांच्या मते चार आर्य सत्यांचा. त्या संबंधांत ते विचारतात की, बुद्धाच्या मूलभूत शिकवणुकीचा आणि त्या चार सत्यांचा काही संबंध आहे काय? डॉ. आंबेडकर असे सुचवतात की, ही मांडणी बौद्धवादाच्या मुळावरच घाव घालते. “जर जीवन म्हणजे दु:ख, मरण म्हणजे दु:ख आणि पुनर्जन्म म्हणजेही दु:खच असेल तर मग सगळ्याच गोष्टींचा शेवट तिथे आहे, असे म्हणायला हरकत नाही. मग धर्म किंवा तत्त्वज्ञान यांच्यापैकी कोणत्याही गोष्टीचे साहाय्य माणसाला या जगात सुख मिळवण्यासाठी उपयोगी नाही. बुद्धाचा उपदेश समजून घेऊन त्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करू इच्छिणाऱ्या सर्वसाधारण उपासकाच्या मार्गाने हे आर्यांच्या चार सत्यांचे अडथळे उभे आहेत. कारण ती सत्ये माणसांच्या आशा-आकांक्षा नष्ट करणारी आहेत. शिवाय त्या सत्यांच्या प्रकाशात बुद्धाचे तत्त्वज्ञान हे फक्त निराशाजनक आहे. ती सत्ये बौद्धवादात मुळापासूनच आहेत, की नंतर ती धर्मप्रचारकांनी त्यात घुसवली?”

डॉ. आंबेडकर पुढे असे म्हणतात की, आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या संबंधांत एक प्रश्न आहेच. बुद्धाने आत्मा ही संकल्पना नाकारली आहे. पण त्याने कर्म आणि आत्मा यांच्याविषयीचे तत्त्व मान्य केले आहे असे म्हणतात. पण जर आत्मा नसेल तर कर्म किंवा पुनर्जन्म कसा असेल? त्या काळचे ब्राह्मण हे तीन शब्द ज्या अर्थाने वापरत होते, त्यापेक्षा वेगळी संकल्पना बुद्धाने स्वीकारलेल्या या शब्दांमागे असेल काय?

यानंतर आंबेडकर शेवटचा प्रश्न विचारतात, तो भिक्षू या संस्थेबद्दल. भिक्षू संघ बुद्धाने निर्माण केले त्यामागील उद्दिष्ट कोणते होते? त्यातून एक आदर्श मानव निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता की, लोकांच्या सेवेसाठी आपले जीवन खर्च करणारा आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञानी म्हणून त्यांच्यामध्ये वावरणारा समाजसेवक भिक्षूतून बुद्धाला घडवायचा होता? बौद्धवादाचे भवितव्य ठरवणारा हा मौलिक प्रश्न आहे.

समकालीन बौद्ध समाजात भिक्षूंच्या स्थानाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आजच्या समाजातील भिक्षू हे धर्मकृत्यांत गुंतलेले असतात आणि म्हणून त्यांना ‘धर्मोपदेशक’ या पवित्र स्थानावर ठेवले जाते. पण डॉ. आंबेडकरांच्या कल्पनेत भिक्षू हा निव्वळ समाजसेवकच आहे.

यानंतर बुद्धाचा धम्म आणि त्यात त्याचे स्थान यांचा विचार करू. डॉ. आंबेडकर लिहितात की, बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्याला हे जाणवले की, या जगातून निसटून जाणे गरजेचे नाही. तर येथेच राहून या जगात परिवर्तन घडवून आणून ते अधिक चांगले बनवणे जरुरीचे आहे. पुढे बुद्धाने आपल्या प्रवचनात आपला मार्ग अधिक स्पष्ट केला. “आपण स्वीकारलेल्या मार्गाचा ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही संबंध नाही. या धम्मात मृत्युनंतर जीवनाचा कोणातही संस्कार शिल्लक राहत नाही. आणि धार्मिक कर्मकांडे आणि समारंभ यांच्याशी या धर्माचा काहीही संबंध नाही,” हे त्याने स्पष्टपणे सांगितले. त्याने पुरस्कारलेला जो जीवनमार्ग (धम्म) आहे, त्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे आणि पृथ्वीवरील जीवनात माणसाचे माणसाशी असलेले नाते हेही आहे.

त्याचबरोबर बुद्धाने हेही स्पष्ट केले की, त्याचे प्रवचन हा माणसाने माणसाला दिलेला संदेश आहे आणि त्यात चूक निघणारच नाही, अशी आपली धारणा नाही. कोणीही त्यावर प्रश्न विचारू शकतो आणि त्याला कसोटी लावून त्यामधले सत्यही निवडून काढू शकतो.

बुद्धाने केलेल्या उपदेशाचाही विचार आपण करायला हवा. डॉ. आंबेडकर म्हणतात की, बुद्धाचा संदेश काय आहे असा प्रश्न केला तर त्यांचे दोन अनुयायी किंवा बौद्धतत्त्वांचे दोन अभ्यासक यांच्यामध्ये एकमत होणार नाही. काहींना समाधी ही त्यांची मुख्य शिकवण वाटते, तर काहींना विपश्यना (प्राणायामाचा एक प्रकार). काहींना बुद्धाचा उपदेश हा धार्मिक अंतवर्तुळातील निवडक शिष्यांपुरताच मर्यादित आहे असे वाटते, तर काहींची तो सर्वांसाठी खुली असल्याची खात्री आहे. काहींना ते पूर्ण सत्यशोधनाचे रुक्ष तत्त्वज्ञान वाटते, तर काहींना त्यात गूढता जाणवते. मात्र डॉ. आंबेडकर असे विचारतात की, बुद्धाने कोणताच सामाजिक संदेश दिलेला नाही काय? बौद्ध तत्त्वज्ञानावर लिहिणाऱ्या अनेकांनी या मुद्द्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना स्वत:ला या विषयावर लेखन करणे भाग पडले.

अर्थातच बुद्धाच्या संदेशाबद्दलची डॉ.आंबेडकरांची संकल्पना फक्त त्यांनी सामाजिक दृष्टी एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. त्यातील नैतिकता आणि अध्यात्म यांचीही दखल आंबेडकरांनी घेतलीच होती. सामाजिक संदेशाबरोबरच बुद्धाची न्याय, विवेक आणि दुसऱ्याबद्दलची सहानुभूती यासंबंधांतील शिकवण हा त्यांच्या आध्यात्मिकतेतलीच एक आवश्यक पायरी होती. सामाजिक दास्य आणि जनता जर सामाजिक गुलामगिरीच्या चिखलात रुतली असेल आणि तिचे मानवतेचे सर्व हक्क हिरावून घेतले गेले असतील तर त्या परिस्थितीत तिची आध्यात्मिक उन्नती होणे असंभवच!

डॉ. आंबेडकरांनी भारत बौद्धधर्मीय बनवण्याचा आपला संकल्प जाहीर केला होता, हे सर्वांना ठाऊक आहेच. आंबेडकरांच्या या जाहीर संकल्पनामागे त्यांना भारतामध्ये असा एक समाज किंवा राष्ट्र निर्माण करायचे होते की, ज्याची घडण न्याय, विवेकबुद्धी आणि एकमेकांविषयीची कळकळ या तत्त्वांबद्दल केली जाईल. तिथले सामाजिक जीवन याच मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे उभे राहील. आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार बुद्धाला जी एक न्याय्य, सामाजिक व्यवस्था अभिप्रेत होती, त्यात एक मानव दुसऱ्या मानवाच्या दु:स्थितीला आणि दु:खाला कारणीभूत होणार नाही, हे आश्वासन होते. याचाच अर्थ कोणताही समाज अगर राष्ट्रही दुसऱ्या राष्ट्राच्या दुर्दैवाला आणि दु:खद अवस्थेला कारणीभूत होणार नाही, अशी ग्वाही होती.

वरील सर्व विचार मला आता या निबंधाच्या शेवटच्या मुद्द्याकडे आणत आहेत. डॉ. आंबेडकरांचा बौद्धवाद ब्राह्मण्य आणि ब्राह्मणांच्या सामाजिक संघटनांची पद्धती आणि त्यांची हिशोबी वृत्ती यांच्यावर प्रखर टीका करणारा होता. मी असे सुचवले होते की, समता, स्वातंत्र्य आणि न्याय ही मूल्ये पायाभूत असलेल्या सामाजिक व्यवस्थेत एक दुसऱ्याचे दु:ख आणि दुरवस्था यांना कारणीभूत होऊच शकत नाही आणि हाच बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. ब्राह्मणांनी पुरस्कारिलेली आदर्श समाजव्यवस्था चातुर्वर्ण्यावर उभी आहे. आणि व्यक्तिस्वातंत्र्य व विषमतेचा प्रचार करणारी आहे. त्यातून दु:ख आणि दुरवस्था यांचाच फैलाव माणसांमाणसांमध्ये किंवा जातीजातींच्या व्यवहारातून होत असतो. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये डॉ. आंबेडकरांनी चातुर्वर्ण्य आणि ब्राह्मणी व्यवस्था ही मानवताविरोधी आणि न्यायाधिष्ठित समाजाच्या उद्दिष्टाला कशा घातक ठरू शकतात, याचे प्रतिपादन करण्यासाठी तीन-चार पाने खर्ची घातली आहेत. ते म्हणतात –

“चातुर्वर्ण्य पद्धती बुद्धाला घृणास्पद वाटते, कारण चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणांनी संघटित केलेली समाजव्यवस्थाही त्याला स्वाभाविक वाटत नाही. त्यातील वर्गरचना कृत्रिम आणि सक्तीची झाली आहे असे बुद्धाला वाटते. कारण बुद्ध खुल्या आणि अनिर्बंध समाजाचा भोक्ता होता. ब्राह्मणांनी समता हे मूल्य नाकारले होते. ब्राह्मणवादाचा आत्मा विषमतेच्या पायऱ्यांनी बंदिस्त केला होता. त्यामुळे समाजातील विविध स्तरांमध्ये सुसंगती उरली नव्हती. द्वेषाच्या चढत्या पायऱ्या आणि तिरस्काराच्या उतरत्या पायऱ्या, यांवरूनच समाजाची वाटचाल चालू ठेवण्यास ब्राह्मणवाद प्रोत्साहन देईल. ब्राह्मणवादातील कर्म सिद्धान्त हा बंडखोरीतील हवा काढून घेण्यास उपयोगी ठरला – शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना तर अमानुषपणे अपंग करण्यात आले. मग त्यांच्यामध्ये व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करण्याची धगच उरली नाही.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशा तऱ्हेचे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पूर्ण ग्रंथात बुद्धाच्या धम्माचे विवेचन पूर्णपणे ब्राह्मण्यविरोधी आणि विषमतापूर्ण, उपयुक्ततावादी आणि वर्चस्ववादी अशी ब्राह्मण्याने आदर्श ठरवलेली समाजरचना यांचा धिक्कार करणारेच आहे.

१९३२ साली त्या वेळच्या जीआयपी (आताची मध्य रेल्वे) रेल्वे कामगारांच्या मेळाव्यात डॉ. आंबेडकरांनी जाहीरपणे जे सांगितले ते नोंदवून हा निबंध पुरा करतो. मेळाव्यामधील भाषणात आंबेडकर म्हणाले होते की, ‘दलित आणि दरिद्री जनतेला या देशात ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही या दोन संकटांशी सतत झगडावे लागणार आहे.’ अलीकडच्या काळात तर या दोन आपत्ती अधिकच प्रखर होत जाताना दिसत आहेत. स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांसमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आणि दलितांच्या लढ्याचे नेतृत्व करण्याचे कार्य आंबेडकरांनी केले. त्याचबरोबर त्यांच्या मनातील बुद्धाबद्दल आणि त्याच्या धम्माबद्दलच्या संकल्पना विस्तारत गेल्या. पिळवणूक, उपयुक्ततावादी आणि वर्चस्ववादी शक्तींबरोबरचा तीव्र संघर्ष चालू ठेवणे आणि न्याय्य, नैतिक समाजाची प्रस्थापना करणे, त्या ध्येयवादात त्यांच्या विचारांची परिणती झाली. या समाजात माणूस माणसाला दु:ख-हाल-अपेष्टा यांच्या गर्तेत टाकणार नाही. सामाजिक गट एकमेकांच्या दु:खाचे व छळाचे पारंपरिक कार्य थांबवतील आणि त्या ध्येयवादाचा अंगीकार केलेला कोणताच देश दुसऱ्या देशाचे शोषण आणि हाल-अपेष्टा चालू ठेवण्याचा प्रयत्नही करणार नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......