प्रिय सुमित्राताई, आभार मानायचेत तुमचे. ते खूप महत्त्वाचं आहे. किती गोष्टींबद्दल कितीदा तरी ते मानावे लागतील…
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अश्‍विनी गिरी
  • डावीकडे अश्‍विनी गिरी यांनी केलेल्या विविध भूमिकांची छायाचित्रं, तर उजवीकडे सुमित्रा भावे (१२ जानेवारी १९४३- १९ एप्रिल २०२१)
  • Wed , 26 May 2021
  • कला-संस्कृती सुमित्रा भावे सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukthankar अश्‍विनी गिरी Ashwini Giri

अभिनेत्री अश्‍विनी गिरी यांनी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्याशी पत्ररूपाने केलेला हा संवाद. अश्‍विनी गिरी ही गुणी अभिनेत्री तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी सिनेमा व मालिका या क्षेत्रात सातत्याने काम करत आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून प्रशिक्षण घेऊन प्रयोगशील कामे करण्याकडे त्यांचा ओढा राहिला. २००४मध्ये आलेल्या ‘श्‍वास’ या सिनेमात त्या झळकल्या. ‘वळू’, ‘विहिर’, ‘शाळा’, ‘तार्‍यांचे बेट’, ‘लेथ जोशी’, ‘भाई - व्यक्ती की वल्ली’ (दोन्ही भाग), ‘मंटो’ अशा कितीतरी सिनेमांत त्यांनी अभिनय केला आहे. बर्‍याच शॉर्ट फिल्म्स त्यांच्या नावावर आहेत. सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘मोर देखने जंगल में’, ‘एक कप च्या’, ‘हा भारत माझा’, ‘मन की बात’, ‘संहिता’, ‘वेलकम होम’ या सिनेमांमध्ये व ‘माझी शाळा’ या मालिकेत त्यांनी काम केले आहे.

..................................................................................................................................................................

प्रिय सुमित्राताई,

तुम्हाला जाऊन आता एक दीड महिना होऊन गेला... असा एकही दिवस नाही की तुमची आठवण नाही. तुमच्याबरोबर काम करणार्‍यांनी खूप खूप भरभरून लिहिलं तुमच्याबद्दल. मला बर्‍याच लोकांनी विचारलं, ‘तू का नाही लिहीत तुझ्या अनुभवाबद्दल?’ मनात विचार आला की, मला तुमच्याबद्दल काय वाटतं हे मी खरं तर तुम्हाला सांगायला हवं ना? की इतर लोकांना? चिडचिड झाली माझी की माणूस हयात असताना का नाही आपण त्याला हे प्रत्यक्ष बोलून दाखवत, की तुझ्याबद्दल मला हे असं वाटतं… पण उत्तरही होतं ना माझ्याकडेच. माझ्या वागण्या-बोलण्यातून ते तुम्हाला पोहोचत असेल ना, मला तुमच्याबद्दल काय वाटतं ते... कदाचित! नाहीतर १९९५ पासून जेवढी काही कामं मी तुमच्याबरोबर केली ती करता आली नसती मला...

तुमच्याबरोबर काम करताना, काम चालू असताना ज्या गप्पा व्हायच्या आणि लॉकडाऊनमध्ये तुमच्याबरोबर फोनवरून ज्या गप्पा मारता आल्या त्यातून मला काय नाही मिळालं! प्रेम, आपुलकी, सकारात्मकता, चांगुलपणा - कलाकार म्हणून व माणूस म्हणूनही. आता असं जास्त जाणवतंय की, तुम्ही वयानं, अनुभवानं इतक्या मोठ्या होतात, तरी तुमचं मोठेपण मला जाणवू दिलं नाहीत. का? तुम्ही कधी मला आपलंसं केलं ते मला आठवतही नाही. ज्या समानतेबद्दल तुम्ही सतत बोलत आलात, ती तुमच्या वागण्या-बोलण्यातून पावलोपावली दिसत आली. जाणवत आली. आता ती तुमच्याबरोबर काम करून स्वतंत्रपणे दिग्दर्शन करू लागलेल्या सगळ्यांच्या वागण्यात दिसून येते. त्यांच्याबरोबर काम करताना मला जाणवते ती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कुठलेही आदेशाचे डोस न पाजता, कुठलाही अभिनिवेश न दाखवता केवळ तुमच्या आचरणातून हे गुण तुम्ही पुढच्या पिढीकडे संक्रमित केलेत. लिहायला जितकं सोपं वाटतंय तितकं ते सोपं मुळीच नव्हतं. एकामागून एक सतत सिनेमे करताना तुम्ही व सुनीलसर हसतमुख राहून कसं काय सगळं सांभाळत होतात? आत्ताच्या काळातल्या अती व्यावसायिकतेत, कुठलीही तडजोड न करता, स्वत:च्या सिनेमांचा उदोउदो न करता, अती जाहिरातबाजी न करता कसं काय जमत होतं तुम्हाला हे?

तुम्ही एक उत्तम शिक्षिका होतात. जिथं जेवढं कौतुक करायला हवं, तिथं प्रेमानं कौतुकाचा वर्षाव आणि गरज आहे तिथं परखडपणे कानउघाडणी हा ताळमेळ मला इतर कुठल्याही सिनेमाच्या सेटवर कधीच दिसून आला नाही, येत नाही. मी स्वत: दोन-तीन ठिकाणी शिकवते, तुम्हाला ते खूप आवडायचं. माझ्या विद्यार्थ्यांबद्दल, माझ्या अनुभवांद्दल तुम्ही किती जिव्हाळ्यानं विचारपूस करायचात. शिक्षकच समोरच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, हे तुमचं मत अजूनही आठवतंय, पटतंय. ते आचरणातही आणण्याचा प्रयत्न करते मी नेहमी. अशा कित्येकांच्या आयुष्यात तुम्ही स्वत: बदल घडवून आणलेला बघितलाय मी!

एक यशस्वी दिग्दर्शिका असूनही तुम्ही तुमच्या बहिणी, भाचरं, नातवंडं यांच्यात किती रमून जायचाl आणि किती प्रेमानं ही घरची मंडळी तुमच्या प्रत्येक चित्रपटासाठी कंबर कसून उभी असायची! खाजगी आयुष्य नि व्यावसायिक जबाबदार्‍या हा ताळमेळ कसा जमायचा तुम्हाला? आपला ‘एक कप च्या’ बघितल्यावर माझ्या एका भावानं विचारलं होतं, ‘इतका चांगुलपणा जगात शिल्लक तरी आहे का, तुमच्या सिनेमात दाखवता तसा?’ मी या प्रश्‍नावर काहीच उत्तर दिलं नव्हतं. आता देऊ शकते – ‘हो, काहीजणांमध्ये तरी चांगुलपणा नक्की शिल्लक आहे. या यादीत माझ्यासाठी तुमचा नंबर पहिला आहे सुमित्राताई!’

अगदी लख्ख आठवतंय... ‘हा भारत माझा’ या सिनेमासाठी तुमचा फोन आला होता. तुम्ही म्हणालात की, पैसे कोणालाही देऊ शकणार नाही, पण तुझ्यासाठी तो रोल लिहिलाय. मी लगेच तयार झाले! या सिनेमात उत्तरा बावकर, विक्रम गोखले, जितेंद्र जोशी अशी कितीतरी नावाजलेली कलाकार मंडळी तुमच्या प्रेमाखातर व तुमच्या तो सिनेमा करण्यामागच्या उद्देशाखातर काहीही मानधन न घेता आली. सिनेमाला ‘पुणे फिल्म फेस्टिवल’मध्ये बक्षीस मिळालं. तीन-चार वर्षांनंतर एक दिवस वरुण नार्वेकरचा फोन आला आणि तो मला म्हणाला, “अश्‍विनीताई, मावशींनी तुझा पत्ता मागितलाय, देतेस?” मी विचारलं, ‘कशासाठी?’ तर तो म्हणाला की, ‘ ‘हा भारत माझा’चं मानधन द्यायचंय, सगळ्यांनाच देणार आहेत मावशी.’ मला आश्‍चर्य वाटलं आणि भरून आलं की, मानधनाची कसलीही अपेक्षा न ठेवता आम्ही सगळ्यांनीच हा सिनेमा केला होता. काही वर्षं उलटून गेल्यावरही, जेव्हा पैसे हाताशी आले, तुम्ही लक्षात ठेवून ते कलाकारांना मानानं पोहोचवावेत यावर व्यक्त तरी कुठल्या शब्दांत व्हावं हे मला कळेना. कैकवेळा वेगवेगळ्या कामांसाठी तुमच्याकडून जो चेक यायचा, त्यात ठरलेल्या मानधनापेक्षा जास्त रक्कम लिहिलेली असायची. मी फोन करून तुम्हाला सांगायचे. तर त्यावर तुमचं उत्तर असायचं, “राहू दे गं! तुम्हा कलाकारांना यापेक्षा जास्त मानधन द्यायची माझी इच्छा असते नेहमीच!” हे असे अनुभव दुसर्‍या कुठल्याच टीममध्ये कधीच आलेले नाहीत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मी आजवर जितक्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंय, त्यातल्या एकाशीही नंतर माझा फारसा संपर्क नाही. मात्र पंचवीस वर्ष तुमच्या व सुनीलसरांच्या संपर्कात आहे. कलाकार म्हणून तुमच्याकडून मिळणारं कौतुक, मानधनाबद्दल कुठलीही लपवाछपवी न करणं, प्रत्येक कामावर परखड मत मिळत राहणं, माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल तुम्हाला वाटाणारा जिव्हाळा, यामुळे हे बंध टिकून राहिले.

काय काय आणि किती किती लिहू? ‘एक कप च्या’मध्ये माझ्या व्यक्तिरेखेच्या तोंडी तुम्ही लिहिलेलं एक वाक्य आहे- ‘जेवढा तो रथ मोठा, तेवढा त्याला हलायला वेळ लागणारच की!’ तुमचं व्यक्तिगत आयुष्य, व्यावसायिक जीवन, प्रसिद्धी यात तुमची ओढाताण कधी दिसलीच नाही आम्हाला.... की तुम्ही जाणवू दिली नाहीत? दिलखुलास व आशावादी असण्यानं इतक्या सार्‍या सिनेमांचा हा मोठ्ठा रथ आज तुम्ही यशस्वीरित्या ढकलत आणला आहात. त्या रथामध्ये किती आनंदानं तुम्ही कित्येकांना सामील करून घेतलंत, आपलंसं करून घेतलंत. तो रथ पुढे घेऊन जायची जबाबदारी आता आम्हा सगळ्यांची आहे.

तुम्ही तुमच्या प्रत्येक पात्रावर व ते करणार्‍या कलाकारावर मनापासून प्रेम करायचात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा करून तुम्ही बारकावे ठरवायचात. कोणीही केवळ सुंदर दिसण्यासाठी उगाचच खूप जास्त गळ्यात, कानात घातलेलं तुम्हाला अजिबात खपत नसे. तसं व्हायचं तेव्हा तुम्ही त्या-त्या कलाकाराला सगळ्यांसमोर खडसावून सांगितलेलं मी बघितलं आहे!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘माझी शाळा’ ही मालिका करताना एक वेगळाच गेटअप तुम्ही दिला होता. कलकत्ता कॉटन साडी, ठसठशीत मोठ्ठी टिकली!! मी अशा तर्‍हेनं मला बघितलं नव्हतं, पण तुम्ही विचार करून वेशभूषा दिली ती मी आनंदानं मान्य केली. नंतर मला कितीतरी जणांचे फोन आले ती मालिका बघून की, तुझा गेट अप फारच वेगळा आणि चांगला झालाय! बिस्कीट रंगाची, लाल ठिपके असलेली साडी मी याच मालिकेच्या शूटिंगसाठी नेसली होती. शूटिंग संपल्यावर माझ्याकडं बघून म्हणालात, “खूप छान दिसते आहेस तू या साडीत. तुला माझ्याकडून भेट म्हणून घेऊन जा!!”

‘काय गं, हा औपचारिकपणा कशाला?’ असं हसून म्हणाल तुम्ही, पण तरी... आभार मानायचेत तुमचे. ते खूप महत्त्वाचं आहे. किती गोष्टींबद्दल कितीदा तरी ते मानावे लागतील. तुमच्याबरोबर काम करण्याच्या हर एक संधीतून मी बहरत गेले. हा बहर जाणकारीनं पाहणारी माणसं कधीच जाऊ नयेत, असं वाटतंच राहतं ना? तुम्ही टाकलेला विश्‍वास, दिलेलं अमाप प्रेम सोबतीला आहेच, ते कुठंच जाणार नाही, पण तुम्ही... तुम्ही हव्या होतात…

तुमची,

अश्‍विनी गिरी

ता.क. -

१) माझ्यासाठी भेट म्हणून तुम्ही एक पुस्तक ठेवलंय घरी असं कळलंय. रेणूकडून घेईन मी ते.

२) मी व चित्तरंजन गिरी मिळून आमचा जो पहिला सिनेमा केलाय ‘अवकाश’, त्यात तुमचा नि सुनील सुकथनकरांचा खूप मोलाचा वाटा आहे. तुमच्या शुभेच्छांमुळे तो वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवडला जात आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख