अजूनकाही
सध्या वेगवेगळ्या पॅथीचे लोक एकमेकांच्या उरावर बसत आहेत. पण वास्तव लक्षात घेता या सगळ्या पॅथीत ‘ॲलोपॅथी’ ही काल सुसंगत आहे, असेच म्हणावे लागते. म्हणूनच अनेक विद्यार्थी ॲलोपॅथीला प्रवेश घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. पण ज्यांना ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे नाईलाजाने ‘आयुर्वेदिक डॉक्टर’ व्हावे लागते, अशा लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्यावर मात करण्यासाठी मग ते आयुर्वेद हे ॲलोपथीपेक्षा उच्च दर्जाचे असून आपल्या प्राचीन भारताची देण आहे, अशा बढाया मारू लागतात. पण खरी ‘अंदर की बात’ अशी असते की, ॲलोपथीला प्रवेश न मिळाल्यामुळे त्याचा पोटशूळ म्हणून ते ॲलोपॅथीवर खार खात असतात. मग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या धार्मिक अस्मितेला साद घालत परंपरांचा बडेजाव मिरवणे त्यांना भाग पडते. त्यात त्यांना सध्या हिंदुत्ववादी सरकारची साथ मिळाली आहे. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखेच झाले...
आयुर्वेदातली काही औषधे काही रोगांवर खरेच गुणकारी आहेत. पण त्यांच्या शास्त्रीय कसोट्यांवर चाचण्या न घेतल्यामुळे हजार-दोन हजार वर्षापूर्वीच्याच जुन्यापुराण्या ठोकताळ्यावर ती औषधे दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्या पूर्वजांचे प्राचीन ज्ञान यापलीकडे कुठलाही ठोस परिणाम जनतेसमोर दिसत नाही. अशा वेळेस जे स्वतःला ‘आयुर्वेदाचार्य’ म्हणवतात, त्यांनी अशा सगळ्या औषधांना सर्व शास्त्रीय चाचण्यांमधून तावूनसुलाखून प्रमाणित करणे आवश्यक नाही काय? जोपर्यंत आयुर्वेदातील औषधे ही शास्त्रीय चाचण्यांना सामोरे जात नाहीत, तोपर्यंत तरी आयुर्वेद हे जडीबुटीचे शास्त्रच समजले जाईल, हे आयुर्वेदाच्या खंद्या समर्थकांच्या कसे लक्षात येत नाही? यामुळे नुकसान तर आयुर्वेदाचेच होते ना!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
म्हणूनच मला एक कळत नाही की, या आयुर्वेदशास्त्रात आजपर्यंत ‘आयुर्वेदाचार्य’ म्हणवणारे अनेक ‘ढुढ्ढाचार्य’ निर्माण झाले. त्यातील क्वचितच कुणी शेकडो वर्षांपूर्वीच्या या चिकित्सा पद्धतीत संशोधन करून काही नवीन भर घातली आहे, असे झाले नाही. उलट पुरातन कालीन ऋषी-मुनीनी त्यांच्या निरीक्षणाने जी काही चिकित्सा पद्धती तयार केली, तीच त्यांनी ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ म्हणून पुढे चालू ठेवली. यातील एकानेही का बरे प्रयोगसिद्ध वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून योग्य त्या नोंदी ठेवत... चाचण्या घेत आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीची विश्वासाहार्यता वाढवली नाही? बुद्धिप्रामाण्यापेक्षा शब्दप्रमण्यावर का भर दिला?
वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे आपल्याकडे विज्ञान म्हटल्यावर दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात असलेली विमाने आणि ज्योतिषशास्त्राने मिळवलेली ग्रहांदरम्यानची अचूक अंतरे, असे सध्या वातावरण आहे. आयुर्वेद कसे थोर आहे, हे सांगताना अनेक जण थकत नाहीत. गेल्या ५० वर्षांत भारतीयांचे आयुर्मान जवळपास दुप्पट झाले. पण त्याला कारण आधुनिक विज्ञान आहे, आयुर्वेद नाही.
आपण केलेल्या प्रयोगाचं डॉक्युमेंटेशन न केल्यामुळे आयुर्वेदातील अनेक शोध त्या त्या माणसांबरोबर संपले आहेत. अशा प्रकारे आयुर्वेद मागास ठेवण्यात या तथाकथित आयुर्वेदाचार्यांचाच हातभार लागला आहे. आपले संशोधन जर जागतिक स्तरावर पुढे यायचे असेल तर त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून डॉक्युमेंटेशनचे महत्त्व असतेच. म्हणून जोपर्यंत आपण वैज्ञानिक पद्धतीचा नीट उपयोग करत नाही, तोपर्यंत आपण केलेल्या लहानसहान नवीन संशोधनाचा दुसरा कोणीतरी फायदा घेत राहणारच. अशा लहान गोष्टींना मोठ्या करून जगामध्ये आपण शोध लावला असे दाखवले जाणार. हे टाळण्यासाठी तरी आपल्या संशोधक डॉक्टरांनी वैज्ञानिक डॉक्युमेंटेशनची सवय लावणे आवश्यक आहे असे वाटते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अशी सवय नसणे हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत आहे. कारण विज्ञान हे कधीच साचलेले डबके नसते किंवा त्यात अंतिम सत्य असे काही नसते; तर तो एक सतत वाहणारा ज्ञानाचा प्रवाह असतो. या अर्थाने विज्ञान निरंतर असते. कालचे सत्य आज असत्य ठरून – म्हणजेच त्यातील त्रुटी लक्षात येऊन नवीन सत्य जन्माला येते. अशा प्रकारे दर क्षणाला त्यात नवीन नवीन शोध लागत असतात आणि माणसाची प्रगती होत असते.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. कारण ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून प्रश्न विचारणे थांबले... अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरवण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आयुर्वेदही शेकडो वर्षांपूर्वी जे होते, ते तसेच राहिले आहे. मग अशा साचलेल्या डबक्यात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती, हा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य वाटू नये.
..................................................................................................................................................................
जगदीश काबरे
jetjagdish@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ravi Go
Tue , 25 May 2021
Very logical and constructive. Well said.