सिद्धू आणि त्रिशला यांच्यासारखे लोक आपल्या आजुबाजूला असतात, म्हणून मानवाच्या जीवनावरच्या अमर्याद प्रेमाची प्रचिती आपल्याला येत राहते!
पडघम - देशकारण
श्रीनिवास जोशी
  • बीबीसीच्या ‘वॉर अँड पीस’ या टीव्ही मालिकेतला आंद्रे बॉल्कॉन्स्कीच्या भूमिकेतला जेम्स नॉर्टन आणि मारिया बॉल्कॉन्स्कीच्या भूमिकेतली जेसी बकली
  • Tue , 25 May 2021
  • पडघम देशकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus वॉर अँड पीस War and Peace लिओ टॉलस्टॉय Leo Tolstoy मारिया Maria प्रिन्स आंद्रे Prince Andrei

करोनाने भारतदेशी आतंक माजवला आहे. याचे मानसिक आणि आत्मिक परिणाम हळूहळू सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागले आहेत.

मानव जातीने यापेक्षा मोठ्या विनाशकारी घटना बघितल्या आहेत. यापेक्षा मोठा विनाश बघितला आहे. प्रत्येक वेळी मनाव जणू काही झालेच नाही, या पद्धतीने पुन्हा एकदा उभा राहिला आहे. मानवाला प्रत्येक विनाशातून उठून उभे राहायला कोण भाग पाडते, हा विचार आपल्या मनात येतो. कुठली ताकद मानवाला अजेय बनवते? 

इतिहास प्रत्येक घटनेची नोंद ठेवतो. प्रत्येक विनाशकारी घटना इतिहासाच्या पानांमध्ये आपले स्वतःचे असे एक घर करून राहते.

इतिहास लेखनाच्या सुरूवातीपासून आपण विनाशकारी घटनांची जंत्री वाचत गेलो, तर सगळ्या घटना आपल्याला एकसारख्या वाटतात. तशा त्या असतातही. त्या त्या घटनांमध्ये सापडलेल्या व्यक्तींचा विचार केला, तर प्रत्येक व्यक्तीची वेदना वेगळी असते. दुःखाच्या असंख्य छटा आपल्याला या व्यक्तीमध्ये सापडतात. एवढी सगळी जंत्री इतिहास ठेवत नाही.

ही जंत्री साहित्य ठेवते.

साहित्य प्रत्येक पात्राच्या वेदनांचे वेगळेपण पकडण्याचा प्रयत्न करत असते. पण, त्याचबरोबर मानवी व्यक्तिमत्त्वांच्या काही जाती चांगल्या साहित्यातून आपल्या लक्षात येतात. काही लोक भावनिक असतात, काही कोरडे असतात. काही संवेदनशील असतात. काही तत्त्वज्ञानी असतात. काहींनी तत्त्वज्ञानाच्या आधाराने आपल्या भावनांवर ताबा मिळवलेला असतो, तर काहींनी आपल्या भावनांच्या जिवंतपणाच्या आधाराने तत्त्वज्ञानाला आपल्या कवेत घेतलेले असते.

या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या जाती, दुःखे आणि विनाश वेगवेगळ्या पद्धतीते हाताळताना दिसतात.

१८१२ सालचे नेपोलियन आणि रशिया मधील महायुद्ध असो वा २०२१ सालचे करोना विषाणू विरुद्ध मानवजात असे युद्ध असो, या व्यक्तिमत्त्वांच्या जाती आपापल्या पद्धतींनी दुःखाचा सामना करताना दिसतात.

नेपोलियनच्या रशियन युद्धातील सगळ्या घटनांची यादी इतिहासाने ठेवली आहे. त्या युद्धात भाग घेतलेल्या एका रेजिमेंटच्या नायकाच्या जीवनाची आणि विचारांची नोंद टॉलस्टॉयने त्याच्या ‘वॉर अँड पीस’ या कादंबरीमधील प्रिन्स आन्द्रे याची व्यक्तिरेखा रेखाटून ठेवली आहे. त्याचबरोबर प्रिन्स आंद्रेची बहीण प्रिन्सेस मारिया हिचीसुद्धा व्यक्तिरेखा टॉलस्टॉयने रेखाटलेली आहे.

आज या प्रिन्स आंद्रेची आणि प्रिन्सेस मारियाची आठवण यायचे कारण म्हणजे नुकतीच माझी माझ्या डॉक्टर मित्र आणि मैत्रिणीशी करोना काळातील डॉक्टरांच्या मन:स्थितीबद्दल चर्चा झाली. हे दोघेही माझ्या शाळेतले. एक म्हणजे डॉक्टर एम. सिद्धेश्वर आणि दुसरी म्हणजे डॉक्टर त्रिशला शहा-सिंघवी.

दोघेही अत्यंत शांत आणि कर्तबगार. दोघेही अतिशय संवेनशील मन लाभलेले. दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाला तत्त्वज्ञानाची बैठक. डॉक्टर सिद्धेश्वरला आम्ही ‘सिद्धू’ म्हणतो. त्रिशलाला त्रिशलाच. या दोघात अजून एक साम्य म्हणजे करोना आल्याच्या दिवसापासून दोघेही कोव्हिड पेशंट ट्रीट करत आहेत. सिद्धू एका मोठ्या हॉस्पिटलमधील एक खूप मोठा कोव्हिड वॉर्ड चालवतो आहे. त्रिशला इंदूरमधील एका मोठ्या हॉस्पिटलच्या आयसीयूची मुख्य आहे.

सिद्धू हा प्रिन्स आंद्रेसारखा आहे, असे मला वाटते आणि त्रिशला मारियासारखी.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आंद्रे शांत असला तरी तत्त्वज्ञानात्मक मन लाभलेला. सतत विचार करणारा. त्याला हे जग जाणून घ्यायचे आहे. या जगात इतिहास कसा घडतो हे त्याला जाणून घ्यायचे आहे. तत्त्वज्ञानात्मक कारणांसाठी त्याने युद्धात भाग घेतला आहे. त्यासाठी तो युद्धाच्या सगळ्या वेदना भोगतो आहे.

ऑस्टरलिटझच्या लढाईत तो जखमी होऊन पडलेला असतो, तेव्हाही तो तत्त्वज्ञानात्मक विचार करत राहतो. पुढे काही वेळाने साक्षात नेपोलियनच्या तुकडीला तो सापडतो. नेपोलियन आणि त्याचे सैनिक आंद्रेला वाचवतात. पुढे काही दिवस आंद्रे नेपोलियनच्या तुकडीत राहतो. नेपोलियन हा विरोधक असला तरी आंद्रेचा आदर्श आहे. इतिहास अशाच मोठ्या माणसांकडून घडतो असे त्याला वाटत असते.

ऑस्टरलिटझच्या लढाईत जखमी होऊन जमिनीवर मृत्यूची वाट पाहात असताना त्याला आकाशातले ढग दिसतात. वरचे अथांग आसमंत दिसते. मृत्यू समोर दिसत असताना इतिहास, मानवी संस्कृती आणि त्यावरून झालेली युद्धे वगैरे गोष्टी त्याला फार क्षुद्र वाटू लागतात.

नेपोलियनला जवळून पाहिल्यावर त्याला मोठ्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमागील छोटी माणसे दिसू लागतात. इतिहास हा अपरिहार्यपणे घडत असतो. ही मोठी माणसेसुद्धा त्यांच्याहूनही फार मोठ्या शक्तींच्या हातातली अत्यंत छोटी प्यादी असतात असे त्याला जाणवते.

सिद्धूसुद्धा आंद्रेसारखा मनात विचार घेऊन लढत राहिला आहे. आंद्रे युद्धावर गेला, तेव्हा तिशीत होता. सिद्धूला करोनाचे हे युद्ध लढायला लागते आहे, तेव्हा तो पन्नाशीतला आहे. आंद्रेचा भाबडेपणा आता सिद्धूच्या व्यक्तिमत्त्वात उरलेला नाही.

आपण छोटे आहोत, हे कळायला आंद्रेला ऑस्टरलिटझच्या लढाईत जखमी होऊन पडायला लागले. सिद्धूला ते त्याच्या वयाने शिकवले आहे. सिद्धू एवढा मोठा डॉक्टर असूनसुद्धा अत्यंत साधे आयुष्य जगतो आणि अत्यंत साधेपणाने वागतो-बोलतो.

करोना येताच माझ्या अनेक डॉक्टर मित्रांनी आपापल्या प्रॅक्टिसेस बंद केल्या. ते घरात गप्प बसून राहिले. सिद्धू आणि त्रिशला मात्र सैनिकासारखे युद्धाच्या पहिल्या दिवसापासून रणांगणावर लढत राहिले आहेत. पुढे करोनाची भीती कमी झाल्यावर सुरुवातीला घरी बसलेल्या माझ्या डॉक्टर मित्रांनी आता कोव्हिड पेशंट ट्रीट करायला सुरुवात केली. पण ते अजूनही कुठेतरी भीतीच्या आवरणाखाली राहात आहेत.

परवा तर ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये अनेक डॉक्टर कसे ‘अँग्झायटी’ आणि ‘डिप्रेशन’ यांच्या प्रभावाखाली गेले आहेत, यावर एका मानसोपचारतज्ञाचा लेख आला. काही डॉक्टरांनी तर आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या. 

मी तो लेख सिद्धूला पाठवला. म्हटले, डॉक्टरांच्या या भीत्यांबद्दल मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी फोन केला तेव्हा सिद्धू खूप वेळ बोलत राहिला. पेशंटच्या वेदना, गेलेल्या लोकांच्या प्रियजनांचा शोक, वॉर्डमध्ये पीपीई सूट आणि इतर प्रोटेक्टिव्ह गियर्स घातल्यामुळे होणारे शारीरिक हाल. त्या सूटमध्ये येणारा घाम, तोंडाला पडणारी कोरड, त्यामुळे येणारी अस्वस्थता. या सगळ्या सगळ्यावर सिद्धू बोलत होता. औषधांचा, ऑक्सिजनचा आणि इतर सुविधांचा तुटवडा. त्यामुळे पेशंट, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर आणि हॉस्पिटल या सर्वांचे होणारे हाल हे होतेच. शिवाय लसीचा डबल डोस घेऊनही कित्येक डॉक्टर कोव्हिडने आजारी कसे पडत आहेत आणि त्यातले कित्येक जात कसे आहेत, हे सिद्धू शांतपणे सांगत होता. त्या खूप वेळ चाललेल्या फोनकॉलमध्ये मला जाणवले की, इतर डॉक्टरांप्रमाणे सिद्धू भ्यालेला नाहीये. तो या महामारीमुळे दुःखी झालेला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आंद्रे ऑस्टरलिटझच्या लढाईत जखमी झाला त्याचप्रमाणे डबल लस आणि सर्व काळजी घेऊनही सिद्धूला कोरोनाने आजारी पाडलेच. एप्रिलमध्ये सिद्धू आजारी पडला, त्याआधी नोव्हेंबरमध्ये त्रिशलाला करोनाने गाठले.

आंद्रेला बरे वाटल्यावर नेपोलियनने घरी पाठवले, तेव्हा एक जखमी सैनिक म्हणून आपल्या प्रचंड इस्टेटीवर राहायचा मोह आंद्रेला झाला नाही. खरंतर त्याने शौर्य गाजवले होते, आपल्या देशाची सेवासुद्धा केली होती. आता त्याला आपल्या प्रचंड इस्टेटीचे सगळे सौख्य भोगत राहाता आले असते.

सिद्धूनेसुद्धा आतापर्यंत खूप काम केलेले आहे. त्याने करोनाकाळात केलेले अविरत काम, त्याचे वय आणि त्याला एकदा झालेला आजार बघता तो आता घरी थांबला, तर त्याला कोणी काही बोलू शकणार नाही. आंद्रे जसा नेपोलियनविरुद्ध मनापासून लढला आहे, तसा सिद्धूसुद्धा करोना विरुद्ध मनापासून लढला आहे.

तत्त्वज्ञानाशी असलेली नाळ जपायची म्हणून आंद्रे परत लढाईला गेला. आपण पंचवीस वर्षे जो अनुभव मिळवला आहे, त्याचा उपयोग लोकांना होत राहिला पाहिजे म्हणून सिद्धू रोज हॉस्पिटलात जातो आहे. 

बोरोडिनोच्या लढाईत नेपोलियनच्या सैन्यातून तोफेचा एक गोळा आंद्रेच्या समोर येऊन पडतो. तो गोळा फुटण्यापूर्वी स्वतःभोवती गरगरत राहतो. त्या काळात पळून जायची संधी आंद्रेला उपलब्ध असते. कुठल्यातरी गूढ प्रेरणेमुळे आंद्रेला पळून जावेसे वाटत नाही.

सिद्धूसुद्धा कुठल्या तरी गूढ प्रेरणेमुळे हॉस्पिटलात जातो आहे काय?

सिद्धू माझ्याशी जवळ जवळ पन्नास मिनिटे फोनवर बोलत होता. तो परत परत म्हणत होता - अजून खूप काळ आपल्याला खूप धीर ठेवून काढायला लागणार आहे.

आंद्रे सुद्धा म्हणतो की – “time and patience are the greatest warriors.” (‘काळ आणि संयम हे जगातील सर्वात मोठे योद्धे आहेत.’)

आंद्रे आणि सिद्धू या दोघांनाही संयमाने कठीण काळ काढण्याचे महत्त्व कळले आहे. दोघेही जीवन संग्रामात तात्त्विकदृष्ट्या सावध राहून पावले टाकताना दिसतात.

टॉलस्टॉयने आपल्या स्वतःवरून तीन अमर पात्रे तयार केली. ‘वॉर अँड पीस’मधील आंद्रे बॉल्कॉन्स्की आणि पिएर बेझुकॉव्ह आणि अॅना कॅरेनीना या कादंबरीतील कॉस्टॅन्टिन लेव्हिन.

सिद्धूचे आणि त्रिशलाचे पात्र लिहायलासुद्धा टॉलस्टॉय हवा होता, असे मला वाटून जाते. आंद्रेचा जन्म उमराव समाजात झाला सिद्धूचा मध्यमवर्गात. आंद्रेला नेपोलियन आणि रशियाचा मुख्य सेनापती कुटुझॉव्ह याचा सहवास मिळाला. आमच्या सिद्धूला भरपाई म्हणून लढण्यासाठी करोना विषाणूसारखा न दिसणारा शत्रू मिळाला.

दोघेही वेगवेगळ्या काळात आणि समाजात जन्माला आलेले असले तरी आंद्रे आणि सिद्धू यांची युद्धाची खुमखुमी एकच आहे. संयम हे एकच शस्त्र ते दोघेही त्यांच्या त्यांच्या युद्धात वापरत आहेत.

टॉलस्टॉयने आंद्रेची व्यक्तिरेखा आपल्या स्वतःवरून बनवली, तर मारिया त्याने आपल्या आईच्या व्यक्तिरेखेवरून रेखाटली. टॉलस्टॉय दोन वर्षांचा असताना त्याची आई गेली. पुढे कौटुंबिक गप्पा, आईची डायरी आणि तिचे इतर लिखाण या सर्वांच्या आधाराने त्याने आपल्या आईचे चित्र आपल्या मनाशी जुळवले. पुढे तिशीत त्याने ‘वॉर अँड पीस’ लिहिली, तेव्हा अत्यंत सुंदर भावना असलेली आणि ख्रिश्चन धर्माचे सर्व अंतरंग वैश्विक प्रेमात बघणारी मारिया बॉल्कॉन्स्की त्याने आपल्या आईवरून लिहिली.

मारियाची मैत्रीण ज्युलिया कुराजिना लिहिते की – “मारियाचे डोळे मोठे, खोल आणि पाणीदार आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःचा असा एक प्रकाश आहे. तिच्या डोळ्यांचा जिवंतपणा तिच्या सौंदर्यापेक्षा सुंदर आहे.”

मारिया ज्युलियाला लिहिते – “ख्रिश्चन धर्मात व्यक्त झालेले  प्रेम, आपल्या शेजाऱ्याविषयी आपल्याला वाटणारे प्रेम आणि आपल्या शत्रूविषयी सुद्धा आपल्याला वाटणारे प्रेम हे खूप सुंदर आहे. ज्युलिया, एखादा तरुण मुलाचे सुंदर डोळे बघून तुझ्यासारख्या प्रेमळ मुलीच्या मनात तयार होणाऱ्या प्रेमापेक्षा हे प्रेम मोठे आणि सुंदर आहे.”

मारियाला मानवता हे सर्वांत मोठे मूल्य वाटते. त्रिशला स्वतः जैन आहे. जैन धर्मातील करुणेचे आणि मानवतेचे खूप खोल संस्कार त्रिशलावर झालेले आहेत. त्रिशला बौद्ध धर्मावरची पुस्तके वाचते. हिंदू धर्मावरची पुस्तके वाचते. मानसशास्त्रावरची पुस्तके वाचते. मानवतेचा आणि मानवी जीवनातील साफल्याचा तिचा शोध सतत सुरू असतो. ती रोज मेडिटेशन करते. न्यू एज बुक्स वाचते. हे सगळे ती स्वतःला शांत ठेवण्यासाठी करते, कारण तिला रोज आयसीयूमधले पेशंट ट्रीट करायचे असतात. त्या पेशंट विषयी बोलताना तिच्या तोंडातून ‘माझे पेशंट’ असा शब्दप्रयोग बाहेर पडतो.

मारिया भटक्या ख्रिश्चन यात्रेकरूंची काळजी घेते. त्यांना मदत करते, आसरा देते. त्रिशला ‘तिच्या’ पेशंटची काळजी घेते. दोघींचेही समाधान एकच आहे. दोघींनाही तत्त्वज्ञानाचे महत्त्व माहीत आहे, परंतु जिवंत भावनांच्या वादळात त्यांना ते कमी महत्त्वाचे वाटते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खूप पेशंट दगावले. त्रिशलाने ग्रुप वर लिहिले – “life has become a hell.” या निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग तिने बागकामात आणि पानाफुलांच्या सहवासात शोधला.

जीवन नरकासारखे झालेले आहे, हे तिने लिहिल्यावर मी तिला मेसेज पाठवला की, ‘तुला नक्की काय त्रास होतो आहे?’

तिने लिहिले – ‘सकाळी आपल्याशी हसून बोलणारा पेशंट संध्याकाळी गेलेला असतो. अचानक जातो तो. पल्मोनरी एम्बॉलिझम होतो आणि काही कळायच्या आत सगळे संपते. मी नातेवाईकांना खूप काही प्रॉमिस केलेले असते, ती सगळी प्रॉमिसेस मी पाळू शकत नाही. लोकांचे अनावर दुःख बघून तिला वाटत होते की, हे जग एक नरकाप्रमाणे झाले आहे.’ 

त्यावर मी बरेच अध्यात्म लिहिले. मी लिहिले- ‘जाणारे जात असतात. तू स्वतःला कितपत जबाबदार धरणार? मृत्यू हे शाश्वत सत्य आहे त्याचे किती वाईट वाटून घ्यायचे?’ मला कळत होते की, त्रिशलाला हे सर्व माहीत आहे, तरीही मी लिहीत गेलो. इतकी वर्षं ती आयसीयूमध्ये काम करते आहे, तिला मृत्यू सामान्य लोकापेक्षा कितीतरी जास्त कळलेला असणार.

मी तिला लिहिले – ‘हे जग ही एक मोठी यंत्रणा आहे. आपल्याला मृत्यू जेवढा भयानक वाटतो तेवढा ही यंत्रणा चालवणाऱ्या शक्तींना तो वाटत नसावा. मृत्यू खरंतर सुंदरसुद्धा असेल.’ मी तिला ‘one  should be cured of one's sensitivity’ हे योगी अरविंद यांचे वाक्यसुद्धा सांगितले. आपल्या संवेदनशीलतेपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे, या श्री अरविंद यांच्या वाक्याचा त्रिशलावर मोठा परिणाम होईल असे मला वाटत होते.  त्यावर तिचा तुटक मेसेज आला – ‘you are right, I felt good.’ मानवी संवेदना हे त्रिशलासाठी फार मोठे मूल्य आहे. ती हे मूल्य सहजासहजी सोडणार नाही, हे मला कळत होते. मी पुढे फार काही बोललो नाही.

पुढे मग ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये तो लेख आला. तो लेख मी सिद्धूला पाठवला तसाच तिलाही पाठवला.

त्यावर ती म्हणाली- ‘खरे आहे. You do not know how it all affects our psyche.’ सगळे तत्त्वज्ञान माहीत असूनही लोकांचे दुःख तिच्या अंतर्मनावर खोल परिणाम करत होते. पेशंट आणि त्यांचे प्रियजन यांचे दुःख आणि हाल तिला हलवून गेले होते.

वडिलांचा विरोध असूनही मारिया ख्रिश्चन यात्रेकरूंना मदत करत राहिली. पैशाची गरज नसताना, करियरमध्ये काही मिळवायचे बाकी नसताना त्रिशला रोज आयसीयूमध्ये जात राहते. मारिया आणि त्रिशला या दोघींसाठीही दुःखी लोकांची सेवा हाच त्यांच्या स्वतःच्या  दुःखावरचा उतारा आहे. कारण, इतरांचे दुःख हेच त्यांचे दुःख आहे. या दोघी त्यांच्या भावना सांगतात म्हणून युद्धावर जातात. या उलट आंद्रे आणि सिद्धू दोघेही कर्तव्य म्हणून लढाईला सामोरे जातात. आपली बुद्धी सांगते आहे म्हणून युद्धावर जातात.

आंद्रे, मारिया, सिद्धू आणि त्रिशला या चौघांनाही लढाई बंद करून स्वतःला सुरक्षित करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. परंतु तरीही चौघेही अनावरपणे काम करताना दिसतात.

कुष्ठरोगावर आणि क्षयरोगावर इलाज नसताना मारिया आजारी यात्रेकरूंची सेवा करत राहिली. ‘माझ्या स्टाफवर ये’ असे स्वतः जनरल कुटुझॉव्ह आंद्रेला सांगत असताना ते सुरक्षित पोस्टिंग सोडून आंद्रे बोरोडिनोच्या लढाईवर गेला. लसीचे दोन्ही डोस घेऊनही बरोबरीचे डॉक्टर करोनाला बळी पडत आहेत, हे सिद्धू आणि त्रिशलाला रोज दिसते आहे. तरीही हे दोघे रोज आयसीयूमध्ये जात आहेत.

मारिया आणि त्रिशला या दोघी त्यांच्या भावनांमधून तत्त्वज्ञान जगत आहेत आणि आंद्रे आणि सिद्धू त्यांच्या बुद्धीच्या प्रतलावर राहून तत्त्वज्ञान जगत आहेत. चौघांसाठीही त्यांचा स्वतःचा प्रवास महत्त्वाचा आहे. त्यासाठी काहीतरी करून आपल्या स्वतःच्या मृत्यूचे भय दूर त्यांच्याकडून दूर ठेवले गेले आहे.

मृत्यू शेवटी मानवी आयुष्यावर विजय मिळवतो असे म्हटले जाते. परंतु, मानवी आयुष्यसुद्धा मृत्यूवर अशा रीतीने विजय मिळवतच असते.

मानवाला आत कुठेतरी आपल्या मृत्यूवर आपण विजय मिळवावा असे वाटत असते. म्हणूनच ऑस्टरलिटझच्या लढाईत जखमी झालेला आंद्रे बोरोडिनोच्या लढाईत पुन्हा एकदा जखमी होण्यासाठी गेला. त्याचमुळे कोव्हिड होऊनसुद्धा सिद्धू आणि त्रिशला त्यांच्या त्यांच्या रुग्णांकडे पुन्हा पुन्हा जात राहिले. त्याचमुळे रोज बागकाम करून त्रिशला स्वतःचे मन जीवनाकडे वळवण्याचा प्रयत्न करत राहते. परंतु, बंद दाराखालून पाणी झिरपावे तसे तिच्या पेशंटसचे दुःख तिने बंद केलेल्या मनाच्या दारातून तिच्या मनात येतच असणार. तरीही ती दुसऱ्या दिवशी 'तिच्या' पेशंट्सकडे जात राहते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इथे आपल्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट येते. मारियाचे प्रेमावरचे प्रेम तिला यात्रेकरूंकडे घेऊन जात होते. त्रिशलाचे मानवी संवेदनेवरचे प्रेम तिला तिच्या पेशंट कडे घेऊन जाते आहे. आंद्रे आणि सिद्धू यांचे त्यांच्या क्षमतांवरचे प्रेम त्यांना कर्ममग्न ठेवते आहे. प्रेम मृत्यूवर विजय मिळवते म्हणतात ते असे. म्हणूनच टॉलस्टॉयने आंद्रेच्या तोंडी वाक्य घातले आहे - 

“Love hinders death. Love is life. All, everything that I understand, I understand only because I love. Everything is, everything exists, only because I love. Everything is united by it alone. Love is God, and to die means that I, a particle of love, shall return to the general and eternal source.”

(प्रेम मृत्यूवर मात करते. प्रेम हेच जीवन आहे. या जीवनातले मला जे जे काही उमगते आहे ते प्रेमामुळेच उमगते आहे. या जगात जे जे काही अस्तित्वात राहते आहे ते प्रेमामुळेच अस्तित्वात राहते आहे. प्रेमामुळे सगळे जग एकत्र बांधले गेले आहे. प्रेम हाच देव आहे. मृत्यूचा अर्थसुद्धा प्रेम हाच आहे. मी जेव्हा मृत्यू पावतो, तेव्हा प्रेमाचा एक कण प्रेमाच्या अथांग आणि अमर अशा स्रोतामध्ये मिसळून जात असतो.)

करोना असो नाहीतर नेपोलियनने रशियावर लादलेले युद्ध असो- मृत्यूच्या काहूरातून प्रेमाचे कोंब सतत वर येत राहतात.

टॉलस्टॉयसारखे लोक लिहीत असतात, म्हणून प्रेमाचे आणि जीवनाचे हे नाते आपल्या लक्षात येत राहते. आंद्रे, मारिया, सिद्धू आणि त्रिशला यांच्यासारखे लोक आपल्या आजुबाजूला असतात म्हणून मानवाच्या जीवनावरच्या या अमर्याद प्रेमाची प्रचिती आपल्याला येत राहते.

प्रेम ही ताकद माणसाला अजेय बनवते यात शंका नाही. हे लोक स्वतःमधून आणि स्वतःच्या भीत्यांमधून बाहेर पडले आणि प्रेमाच्या मार्गावर कळत नकळत का होईना दोन पावले चालले आणि म्हणूनच मृत्यूला त्यांच्या समोर नतमस्तक व्हावे लागले. 

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......