करोनाकहरावर आज ना उद्या मात करता येईल, या आशेवर जसे सारे जग जगते आहे, तसाच प्रकाशनव्यवसायही!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
राम जगताप
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 24 May 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो पुस्तके Books अत्यावश्यक वस्तू Essentials जीवनावश्यक वस्तू Essentials मराठी प्रकाशन मराठी ग्रंथव्यवहार

जागतिक किंवा राष्ट्रीय पातळीवर जेव्हा मोठ्या आपत्ती येतात, तेव्हा नुकसान तर सर्वांचेच होते. मनुष्यहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या आपत्तींपुढे माणसांचा नाईलाज होतोच. करोनाने तर गेल्या एक-दीड वर्षांपासून जगभरच हाहाकार माजवला आहे. अशा ‘अभूतपूर्व’ संकटाचा सामना जगाला याआधी क्वचितच करावा लागलेला आहे. त्यामुळे त्याचे परिणामही तेवढेच मोठ्या प्रमाणावर झाले आहेत.

मराठी प्रकाशनव्यवसायही त्याला अपवाद नाही. मराठी वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि खास महाराष्ट्राची सांस्कृतिक घडामोड म्हणून ओळखले जाणारे दिवाळी अंकही त्याला अपवाद ठरलेले नाहीत.

गेल्या दीडेक वर्षांत मराठी प्रकाशनव्यवसाय खऱ्या अर्थाने फक्त ऑक्टोबर ते जानेवारी याच काळात सुरू होता. म्हणजे जवळपास वर्षभर हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प म्हणावा अशा स्थितीला आलेला आहे. या काळात मराठी पुस्तकांची विक्री ५० टक्क्यांहूनही कमी झाली आहे. साधारपण अशीच स्थिती मराठी वर्तमानपत्रांचीही झाली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत होणाऱ्या दिवाळी अंकांच्या विक्रीवर तर जवळपास ७५ टक्के परिणाम झाला. या अंकांची खरेदी-विक्री, त्यांचे वाचन आणि त्यावरील चर्चा महाराष्ट्रात जवळपास मार्च-एप्रिलपर्यंत चालू राहतात. या वेळी मात्र त्या जानेवारीपर्यंतही जाऊ शकल्या नाहीत.

मराठीतल्या नियतकालिकांवर मात्र २०-२५ टक्केच परिणाम झाला आहे. त्याचे कारण असे की, बहुतेक नियतकालिके ही जवळपास पूर्णपणे वर्गणीदारांवर अवलंबून आहेत. मागच्या वर्षी मार्चपासून सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन सुरू असल्याने या नियतकालिकांची छपाई, वितरण ठप्प झाले होते. पण या काळात अनेक नियतकालिकांनी आपापल्या अंकांच्या पीडीएफ फाईल तयार करून त्या आपल्या वर्गणीदारांना पाठवल्या. पण त्यांना मिळणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. ज्यांची विक्री पूर्णपणे स्टॉलवरच अवलंबून आहे, त्यांना मात्र लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. एरवी त्यांचा खप जास्त असल्याने त्यांचा तोटाही जास्त झाला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

जी नियतकालिके पूर्णपणे वर्गणीदारांवर अवलंबून आहेत, त्यांच्या वर्गणीच्या नुतनीकरणावर सर्वाधिक परिणाम झाला. कारण बहुतेकांनी आर्थिक अडचणींमुळे नुतनीकरण करणे टाळले. पण ‘साधना’सारख्या साप्ताहिकाने या काळात व्यवस्थापन कौशल्याच्या पातळीवर चांगले काम केले. म्हणजे म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर ऑगस्टमधील चार विशेषांक सर्व वर्गणीदारांना पाठवले. शिवाय, ज्या वर्गणीदारांना एप्रिल ते जुलै या काळातील छापील अंक हवे होते, ते छापून पाठवले आणि ज्यांना नको होते त्यांची वर्गणीची मुदत चार महिने पुढे ढकलली. ‘साधना’च्या सहा हजार वर्गणीदारांपैकी दोन हजार वर्गणीदारांनी त्या चार महिन्यातील अंकांची मागणी केली, उर्वरित चार हजार लोकांची वर्गणीची मुदत चार महिने पुढे ढकलली. त्या प्रक्रियेत केवळ सप्टेंबर महिन्यांत पाऊण लाख प्रती साधनाने वर्गणीदारांना पोहचवल्या. आणि अंकांच्या पीडीएफ तर सर्वच वाचकांपर्यंत पोहचवल्यामुळे वाचकांची वाचन-साखळी तुटली नाही. कठीण काळात अंक वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी या साप्ताहिकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे वाचकांनीही आपापल्या वर्गणीचे नुतनीकरण करण्यावर भर दिला.

परिणामी हे मराठीतले बहुधा एकमेव नियतकालिक असावे, ज्याने करोनाकाळातही आपल्या वाचकांचा विश्वास कायम राखला. ज्या नियतकालिकांना अशा प्रकारचे व्यवस्थापन कौशल्य दाखवता आले नाही, त्यांना मात्र जाहिराती नाहीत, वर्गणीचे नुतनीकरण नाही, खुली विक्री नाही, अशा अडचणींचा सामना करावा लागला.

शिवाय ही नियतकालिके पोस्टामार्फतच वर्गणीदारांकडे जात असल्यामुळे आणि त्यासाठी बरीच सवलत मिळत असल्यामुळे ते सुसह्य होते. पण टपालसेवाही मधल्या काही काळात बंद होती. गेल्या काही महिन्यांपासून ती सुरू असली तरी टपालसेवेवर बराच ताण आला आहे. आणि आपल्याकडच्या सरकारी यंत्रणा ताणाखाली नवनवे नियम काढून कामात चालढकल कशी करता येईल, यात माहीर आहेत. नियतकालिकांसाठीची सवलत योजना रद्द करणे किंवा अंकांच्या प्रती पाठवण्यावर मर्यादा घालणे, असे प्रकार टपालसेवेकडून केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे नियतकालिकांच्या अडचणी अजूनच वाढल्या आहेत. परिणामी अंक बंद पडू नये म्हणून त्याच्या पीडीएफ फाईल्स सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्याचे आर्थिक नुकसानीचे काम करावे लागत आहे.

प्रकाशनव्यवसायासमोर नियतकालिकांसारखी भीषण परिस्थिती नाही, हे खरे असले तरी हा व्यवसाय धडपणे कॉर्पोरेट नाही आणि धडपणे छोटा उद्योगही नाही. शिवाय तो अक्षरजुळणीकार, कागद विक्रेते, मुद्रणालये, बाइंडर, पुस्तके विक्रेते आणि वाचक अशा अनेक घटकांवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. त्यात पहिली शिथिलता जुलै महिन्यानंतर आली. तोवर सगळा देशच बंद असल्याने प्रकाशन व्यवसायही जवळपास पूर्णपणे बंद होता. त्यामुळे या काळात प्रकाशनसंस्थांची कार्यालये पूर्णपणे बंद होती. नव्या पुस्तकांची छपाईही बंद होती. पुस्तकांच्या दुकानांतून होणारी पुस्तकविक्रीही बंद होती. पण अमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा, मॅजेस्टिक रीडर्स, बुक्सनामा यांसारख्या संकेतस्थळांवरून काही प्रमाणात पुस्तकविक्री झाली. जुलैनंतर टप्प्याटप्प्याने पुस्तकांची दुकाने, प्रकाशनसंस्थांची कार्यालये सुरू झाली. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात तर जवळपास सगळेच पूर्वपदावर आल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे या काळात नवी पुस्तकांची छपाई मराठीतल्या अनेक प्रकाशनसंस्थांनी केली असली तरी त्यांचे प्रमाण बरेच कमी होते. इतर छोट्या प्रकाशनसंस्थांनी तर दोन-चार पुस्तकांपलीकडे पुस्तकेही प्रकाशित केली नाहीत. पण जी पुस्तके प्रकाशित झाली, त्यांची प्रसारमाध्यमांतून नेहमीसारखी दखल घेतली जाणे, त्यांची जाहिरात करणे, पुस्तक विक्रेत्यांकडून त्यांची मागणी व विक्री यांवर परिणाम झालाच. शिवाय या काळात वर्तमानपत्रांनी रविवार पुरवण्यांची पाने कमी केल्याने पुस्तकांच्या पानांना कात्री लागली. त्यामुळे प्रकाशनसंस्थांनी सोशल मीडियाचा पुस्तकांच्या जाहिरातासाठी उपयोग केला आणि ज्यांना शक्य होते, त्यांनी ऑनलाईन विक्रीवर जास्त भर दिला. पण एकंदर सर्वांच्याच आर्थिक चलनवलनावर परिणाम झाल्यामुळे पुस्तकांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

१ ते २५ नोव्हेंबर या काळात राजहंस, साधना, साकेत, रोहन, पद्मगंधा, मनोविकास, मॅजेस्टिक, मेहता, ज्योत्स्ना, डायमंड या मराठीतल्या १० आघाडीच्या प्रकाशनसंस्थानी ‘वाचन जागर महोत्सव’ महाराष्ट्र पातळीवर सुरू केला. २५० पुस्तके २५ टक्के सवलतीत देण्यात आली. महाराष्ट्रातल्या आघाडीच्या ठिकाणी ही पुस्तके उपलब्ध करून दिली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान पुन्हा हा महोत्सव त्याच पद्धतीने आयोजित करण्यात आला. या वेळी त्यात पॉप्युलर व समकालीन या दोन प्रकाशनसंस्था सामील झाल्या. पुस्तकांवर ३० टक्के सवलत देण्यात आली. पण तोवर पुन्हा करोनासंसर्ग वाढत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे या योजनेला आधीच्या इतका प्रतिसाद मिळाला नाहीच, उलट तोटाच सहन करावा लागला.

मधल्या काळात पुस्तकांची दुकाने उघडली, तशी तिथून होणारी पुस्तक खरेदी सुरू झाली. पण तोवर लोकांचे बरेच आर्थिक नुकसान झाले होते. अनेकांनी आपले नातेवाईक, मित्र गमावले होते. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, नोकरदार वर्गाच्या पगारात १०-२० टक्क्यांपर्यंत कपात झाली होती. अशा विविध कारणांचा प्रत्यक्ष परिणाम पुस्तकांच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

थोडक्यात गेल्या दीडेक वर्षांत प्रत्यक्ष पुस्तकविक्रीला ५० टक्क्यांपेक्षाही जास्त फटका बसला, पण ऑनलाईन विक्रीत एरवीपेक्षा या काळात १०-१५ टक्क्यांची वाढ झाली. शिवाय ज्या प्रकाशनसंस्थांनी या काळात ई-बुक्स काढली, त्यांनाही ०५-१० टक्के फायदा झाला. मात्र या काळात शासनाच्या विविध पुस्तक खरेदी योजना आणि महाराष्ट्रभरातल्या ग्रंथालयांकडून होणारी पुस्तक विक्री पूर्णपणे बंद आहे. या दोन्हींकडून मराठी प्रकाशनव्यवसायातल्या जवळपास ३० टक्के पुस्तकांची खरेदी केली जाते. ती गेल्या दीडेक वर्षांत शून्यावर आली आहे.

कुठल्याही व्यावसायिकाचे वैयक्तिक पातळीवरील नुकसान हे त्याला कर्ज काढून किंवा दिवाळखोरी जाहीर करून का होईना भरून काढण्याचा प्रयत्न करता येतो. पण आपला व्यवसाय ज्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे, ते सगळेच घटक जेव्हा अडचणीत येतात आणि आपल्या ग्राहकांची आर्थिक पत खालावते, तेव्हा कुठल्याही व्यावसायिकाचा नाईलाज होतो. त्याला त्यावर मात करता येत नाही.

एप्रिल महिन्यापासून तर महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या प्रकाशनसंस्था, पुस्तक विक्रीची दुकाने बंद आहेत. कुरिअर सेवाही जवळपास बंद आहेत. पोस्टसेवेचा मिणमिणता दिवा तेवढा सुरू आहे. पण त्याचा फायदा विशेषकरून नियतकालिकांनाच होतो. थोडक्यात पुन्हा एकदा गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. हे सगळे किती काळ सुरू राहणार, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे करोनामुळे वाचन ‘डिजिटल’ होत असल्याची चर्चा सुरू झालेली असली तरी ती वाढ तात्कालिकच राहण्याची शक्यता आहे. कारण मराठी ई-बुक्सची विक्री थोडीफार वाढली असली तरी त्यात लक्षणीय अशी वाढ झालेली नाही. गेल्या १०-१५ वर्षांतल्या जगभरच्या ई-बुक्सच्या विक्रीची आकडेवारी पाहिली तर ती २० टक्क्यांच्या फारशी पुढे जात नसल्याचेच दिसते.

प्रकाशनव्यवसाय हा काही प्रमाणात बेभरवशाचाही आहे. समाजाचे चलनवलन सुरळीत चालू असेल तरच तो नीट चालतो. उदाहरणार्थ निवडणुकांच्या काळात या व्यवसायावर परिणाम होतो. उन्हाळ्यात होतो. किंवा समाजात जेव्हा जेव्हा अस्थिर वातावरण निर्माण होते, तेव्हा प्राथमिकता बदलतात. उदाहरणार्थ, २६\ ११चे मुंबईवरील संकट किंवा पानशेत पुराच्या वेळी पुण्यावर आलेले संकट हे तसे मर्यादित पातळींवरचे होते. त्यामुळे त्यावर एका परीने दोन्ही शहरांतल्या इतर व्यावसायिकांप्रमाणे मराठी प्रकाशकांनीही मात केली! पण करोनाची आपत्ती तशा स्वरूपाची नाही. तिने सर्वांनाच ग्रासून टाकले आहे.

पुस्तकांचाही ‘जीवनावश्यक’ गोष्टींमध्ये समावेश करायला हवा, अशी मागणी प्रकाशकांकडून-पुस्तकविक्रेत्यांकडून कितीही केली जात असली, तरी महाराष्ट्रामध्ये पुस्तके तितकीशी ‘नडीव’ गोष्टीमध्ये मोडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तसे पाहिले तर निकडीची गरज असलेली कुठलीही वस्तू – म्हणजे पायपुसण्यापासून कंडोमपर्यंत – जीवनावश्यकच असते. मात्र त्यात निदान महाराष्ट्रात तरी पुस्तकांचा फारसा समावेश होत नाही.

अर्थात तरीही प्रकाशनव्यवसाय आणि नियतकालिकांपुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे, असे अजून तरी म्हणता येणार नाही. सर्वांचेच अस्तित्व पणाला लावणाऱ्या आपत्ती येतात, तेव्हा काही प्रमाणात पडझड होतेच. पण तुमचा पोहरा ज्या विहिरीत पडलेला असतो, त्याच विहिरीत डुबकी मारून तुम्हाला तो काढावा लागतो. किंवा मग नवीन पोहरा आणून त्याच विहिरीतून पुन्हा नव्या जोमाने पाणी शेंदावे लागते. पोहरा बदलता येतो, पण विहीर बदलता येत नाही. आणि पाणीही. कारण या दोन्ही गोष्टी तितक्या सहज नसतात. अर्थात हे सर्वच व्यवसायांना लागू होते. प्रकाशनव्यवसायही त्याला अपवाद नाही इतकेच.

करोनाकहरामुळे मराठी प्रकाशन व्यवसायाच्या विहिरींतल्या पाण्याने तळ गाठलाय. त्यांची पडझडही झालीय. त्यामुळे पोहऱ्यातून पाणी शेंदताना जे थोडेफार पोहऱ्यात येतेय तेही वर येईपर्यंत मधल्या कडेकपारींवर आपटून हिंदकळत, सांडत वर येतेय. याचा अर्थ एवढाच की, विहिरी अजूनही कोरड्याठाक झालेल्या नाहीत. त्यामुळे झालेली पडझड मराठी प्रकाशक भरून काढतील आणि पुन्हा नव्या जोमाने वाचकांच्या अर्थशास्त्राचा, मानसशास्त्राचा आणि समाजशास्त्राचा विचार करत आपला व्यवसाय चालू करतीलच.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पण मराठी प्रकाशन व्यवसायापुढील आव्हानांना २०१६मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीपासूनच सुरुवात झाली होती. त्यात जीएसटीच्या काही जाचक नियमांनी या व्यवसायाला अजूनच अडचणीत आणले होते. आता त्यात करोनाकहराची भर पडलीय. एकामागून एके संकटे येत असतील आणि त्यांची भाजणी चढली असेल तर त्याचे दुष्परिणामही मोठे असतात.

त्यामुळे येत्या काळात काही प्रकाशनसंस्था बंद पडतील, नव्या पुस्तकांचे प्रमाण घटेल, पुस्तकांच्या किमती वाढतील, पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रकाशकांना एरवीपेक्षा जास्त नेटाने प्रयत्न करावे लागतील. पण सर्वांत मोठे आव्हान असेल ते आपल्या वाचक-ग्राहकांची घटलेली आर्थिक पत. त्याच्याशी कल्पकता, प्रयोगशीलता आणि प्रभावी प्रचार-प्रसार यांच्या जोरावर मात करावी लागेल. त्यात मराठी प्रकाशन व्यवसाय जेवढा यशस्वी होईल, तेवढ्या लवकर या व्यवसायाचे गाडे सुरळीत होईल.

करोनाकहरावर महाराष्ट्रातले नोकरदार, व्यावसायिक, उद्योगपती अशा सर्वांसमोरच खूप सारी प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. मात्र तरीही आज ना उद्या मात करता येईल, या आशेवर जसे सारे जग जगते आहे, तसाच हा व्यवसायही.

..................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......