अजूनकाही
पंतप्रधानाचे सल्लागार सिन्हा यांनी राजीनामा दिला, तेव्हापासून बबडूला आपण त्या पदासाठी अर्ज करावा, असे राहून राहून वाटू लागले होते. देशाचे दायित्व घेतलेल्याला सल्ला देण्याचे दायित्व आपण घेतले पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले. प्रत्यक्ष नगरातला आता ५० वर्षांचा अनुभव त्याच्यापाशी होता. शिवाय ग्राउंडवर्कमध्ये कॉलर पकडणारादेखील कोणी नव्हता. अगदीच जरा ताणून म्हणायचे तर छाती काही इंच कमी पडल्यामुळे सारी गडबड झाली. पोलिसात भरती होताना जशी छाती मोजून घेतात, तसे देशातल्या इतर महत्त्वाच्या पदासाठीदेखील छातीच्या मापाची अट ठेवावी, असे त्याचे २०१४पासून म्हणणे होते. निधड्या छातीनेच कारभार चालवल्यामुळे देशाची प्रतिष्ठा वाढली होती! संपूर्ण शरीराचे दायित्व एकाच अवयवाकडे दिल्याने हे घडले होते. आजपर्यंत त्याने सारे निर्णय केवळ छातीच्या भरवश्यावर घेतले होते. अकौंटन्सीचा तीन तासांचा पेपर पंधरा मिनिटात सुपरवायझरच्या तोंडावर फेकायला ‘छाती’च तर लागते. एक शरीर, एक अवयव!
आता खरे तर त्याच अवयवाने दगा दिल्याने बाबडूला काही सुचेनासे झाले होते. बबडू पॉझिटिव्ह झाला. दम लागतो आहे, असे त्याला जाणवू लागले होते. स्वत:ची ऑक्सीजन लेव्हल सारखी तपासू लागला. ती कधी ९४, तर कधी ९७ येऊ लागली. डॉक्टरांनी ९५ ही त्याची पास होण्याची सीमा सांगितली होती. त्यावर बाबडूचा विश्वास बसला नाही. त्याला सवय ३५ची होती. हा अवयव एवढा ऑक्सीजन खातो, हे त्याला आधी समजले असते, तर त्यावर तो अवलंबून राहिला नसता. बरं ऑक्सीमीटर दाखवत असलेला आकडा हा आपण घेत असलेल्या ऑक्सीजनचा की, सोडत असलेल्या ऑक्सीजनचा, की वापरत असलेल्या ऑक्सीजनचा हे काही त्याला समजत नव्हते. बरं चर्चेत असलेला व्हायरसच नव्हे तर तो लावत असलेला ऑक्सीमीटरदेखील चायनीज होता. कोणावर विश्वास ठेवावा, याचा निर्णय होत नव्हता.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लस घ्यायला हवी होती, असेही त्याला गेल्या चार दिवसांपासून वाटू लागले होते. या सगळ्या गुंत्याचा विचार करता करताना त्याचा ऑक्सीजन ९३.८ आला, तसे त्याच्या लक्षात आले- आपला ऑक्सीजन कोण खातो आहे ते! धडपडत त्याने गुगल उघडले व शोधले. तसे त्याला सापडले की, २० टक्के ऑक्सीजन त्याचा मेंदूच खात होता. आपल्या मेंदूला एवढा ऑक्सीजन लागतो याचे त्याला नवल वाटले. सगळी गडबड १५ मे नंतर चालू झाली होती. अचानक त्याला मेंदू वापरायची निरागस आज्ञा आली होती. आणि तेव्हापासून त्याची ऑक्सीजनची पातळी हेलकावे खाऊ लागली.
यावर त्याच्या हातात असलेला एकच उपाय होता, तो त्याने लगेच अमलात आणला. तो १५ मे पूर्वी जे जे अवयव वापरी, ते आणि तेवढेच वापरणे त्याने परत सुरू केले. ऑक्सीजनची पातळी परत ९८ आली. गेली अनेक वर्षे ती ९८ असण्याचे कारणही त्याला मिळाले. केवळ त्याचीच नाही तर ‘फेसबुक सेने’च्या ऑक्सीजन पातळीचाही त्याला अंदाज आला. ऑक्सीजनसाठी धावाधाव व बोंबाबोंब करणाऱ्या देशद्रोह्यांना हा साधा उपाय माहीत नसल्याबद्दल चार शिव्या हासडल्या व तो शांत चित्ताने झोपी गेला.
अखेर बबडूकडे नगराची व्यवस्था आली. त्याला धन्य वाटले. पूर्वी त्याचे वरिष्ठ अधूनमधून ‘बैठक’ आहे म्हणायचे. त्यामुळे त्याला तेव्हापासून बैठकीचे फार कुतूहल असायचे. कालपरत्वे बबडू लहानाचा थोडा मोठा झाला व त्याने ‘बैठक’ हा शब्द इतर ठिकाणी वेगळ्या संदर्भात ऐकला, तेव्हा त्याची उत्सुकता तेव्हापासून खूप ताणली गेली. उत्सुकता शमवण्याचे धैर्य काही त्याच्या संस्कारी मनाने दाखवले नाही.
कालपरत्वे बबडू आणखी मोठा झाला व त्याची उत्सुकता अखेर शमली. त्याला तिथे काम मिळाले. पंगतीत पाणी वाटपापासून ते वाढप यंत्रणेचा नेता म्हणून त्याची उन्नती झाली. आपण ज्यांना वाढतो, त्यांच्यासारखे आपणही डायरी घेऊन यावे, असे त्याला वाटू लागले. एकदा त्याने डायरी आणलीही, पण त्याच्यात लिहिण्यासारखे काही नव्हते. दुसऱ्या खेपेला त्याने त्याच्या वाढप यंत्रणेतल्या सगळ्यांचे नावे व पत्ते लिहून घेतले. पण त्याच्या पुढच्या बैठकीच्या खेपेला नेमकी JEEची entrance आली. त्यामुळे त्याच्याबरोबर कामाला वेगळीच मंडळी आली. त्याने परत सगळ्यांची नावे व पत्ते लिहून घेतले. हे जणू त्याचे व्रतच झाले!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कालपरत्वे बबडू आणखी मोठा झाला. तोपर्यंत त्याची गाडी मार्गाला लागते आहे, हे कुणीतरी पाहिले आणि त्याला बैठकीचे आमंत्रण गेले. बैठकीत फार काही सांगण्यासारखे नव्हते. शिवाय क्वचित असत. बैठकीत एकदा तर त्याच्या बाजूला अप्पा बसले होते. त्यांच्या डायरीत त्याने अधूनमधून डोकावले. त्याच्या डायरीत व त्यांच्या डायरीत त्याला फार फरक जाणवला नाही. पण या बैठकींनी त्याचे मैदानाचे आकर्षण मात्र कमी झाले. तसाही तो आता वयाने मोठा झालाच होता. मैदानातले खेळच नव्हे खेळणारे ही बालिश वाटू लागले.
कालपरत्वे बबडू परत मोठा झाला. बैठकींची संख्या आता बरीच वाढली होती. त्यातल्या बऱ्याच बैठकींना आपली हजेरी अनिवार्य असली पाहिजे, असे त्याच्या मनात कायम असे. एका बैठकीतून दुसऱ्या बैठकीला जात राहिला. तो असतो म्हटल्यावर त्याला बोलावणेही जाऊ लागले. बैठकीला जाऊन जाऊन हळूच त्याने एक दिवस बैठक घेणाऱ्याकडे पाहिले. बैठकीच्या आधी पाहिले. बैठकीच्या नंतर पाहिले. बैठक नसतानाही पाहून घेतले. हे काम आपल्याला जमायला हरकत नाही, असे त्याला लक्षात आले.
कालपरत्वे बबडू परत मोठा झाला. तो बैठकी घेऊ लागला. त्याची सवय झाली. एकदा त्याने घरातल्या सगळ्यांनाही म्हटले ‘दर बुधवारी सायंकाळी आपण एकदा बसत जाऊ’. हे मात्र अति झाले होते. घरच्यांनी त्याला धुडकावूनच लावले. त्यांची नावे व पत्ता लिहिलेले डायरीतले त्याचे पान कोरेच राहिले. दर आठवड्याला तो ते पान कोरेच ठेवे. बैठक नसताना घरातल्यांचे कसे चालते, याकडे त्याने दुर्लक्ष केले, पण घरातल्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्यामुळे त्याचे चालून गेले.
कालपरत्वे बबडू परत मोठा झाला. पन्नाशी उलटली. त्याच्याकडे नगराचे काम आले. हे कधी होईल असे त्याला वाटले नव्हते. बैठकांच्या जोरावर आपण मोठी मजल मारली, असे त्याला वाटले. महत्त्वाचे म्हणजे करोनामुळे वरिष्ठ जागा रिकाम्याच झाल्या होत्या. पहिल्या लाटेत तो बावचळला होता, पण आता दुसऱ्या लाटेत सुरुवातीला त्याचा धीर चेपला. मृत्यूचा दर जास्त होता, तरीही घरच्यांनी हरकत घेतली नाही. आमचे सारे कुटुंबच ‘देशभक्त’ आहे, असे त्याने बैठकीत बोलूनही दाखवले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
समर्पणासाठी ‘आपले ‘कोविड योद्धे’ तयार होणार’ असा निरोप आला, तसे त्याने स्वत:चे पहिल्या १० झूम बैठकांचे टाईमटेबल आखले. १) पीपीई किट शिवणाऱ्या शिंप्याबरोबर संवाद, २) पीपीई किट देणाऱ्यांना दुकानदारांबरोबर संवाद, ३) पीपीई किट आणणाऱ्यांची बैठक, ४)पीपीई किट वितरण करणाऱ्यांची बैठक, ५) ते कसे घालायचे हे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक, ६) कोविडसाठी नागरिकांचे तापमान घेणाऱ्या कार्यकर्त्यांची विभागाप्रमाणे बैठक, ७) तापमान घेणाऱ्या कार्यकर्त्यांची एकत्र बैठक, ८) तापमान घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाबरोबर संवाद, ९) कोविड कार्यकर्त्यांना जेवण देणाऱ्यांबरोबर संवाद आणि १०) कोविड कार्यकर्त्यांना जेवण वाढणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक.
बबडूला कायम लॅपटॉपवर पाहून त्याचे सुनेवर जास्त भरवसा असलेले वृद्ध वडील अखेर कंटाळले. शेजारच्या शंभरीला येत असणाऱ्या अण्णांना म्हणाले, “काय हो हे? सतत स्क्रीनवर आहे!” अण्णा म्हणाले, “देशाचे काम आहे.”
“बरोबर आहे.” बबडूचे वडील म्हणाले, “त्याला म्हणावे स्वत: बरोबर पण बैठक घ्या कधीतरी.”
अखेर पीपीई किटच्या बैठका संपल्या. तोपर्यंत ऑक्सीजनसाठी लोकांची धावाधाव सुरू झाली होती.
.............................................................................................................................................
लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.
kravindrar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment