कार्यकर्ता असणारा मित्र तुम्हाला कधी गोत्यात आणेल सांगता येत नाही. ‘भाषण करायला या’ असा त्याचा आदेश टाळणे दोन कारणांसाठी जड जाते. पहिले, आपण गेलो नाही तर त्याचे स्थान डळमळीत होते की काय, याची आपल्याला चिंता. दुसरे, आपण त्याच्या पाठीराख्यांना किंमत देत नाही, अशी त्याला चिंता. त्यामुळे आपल्याला जावेच लागते. तो कार्यकर्ता असल्याने त्याला वाचन, चिंतन, अभ्यास करायला वेळ पुरत नसतो. थोडेफार वाचन अन अभ्यास त्याला करावा लागतो, पण त्याला असे वाटत राहते की, आपण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यासू, चिंतक आहोत. मग काय, आपला अहंकार अन त्याचा रोष यांतून मार्ग काढायचा म्हणजे मुकाट जावे व दिलेला विषय बोलून टाकावा.
काही दिवसांपूर्वी ‘भारत संचार निगम लिमिटेड’चा आमचा कार्यकर्ता मित्र रंजन दाणीने एकाएकी ‘परात्मभाव’ अर्थात ‘एलिनेशन’ या विषयावर अभ्यासवर्गासारखे बोलावे, असा प्रस्ताव माझ्यापुढे मांडला. बापरे! मार्क्सवादापासून ‘एलिनेट’ झालेले जग मार्क्सवादाच्या त्या सिद्धान्ताविषयी कितपत रुची घेईल, प्रश्न पडला. आपणही सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी या विषयाचा मागोवा घेतलेला. मग जगरहाटीत एवढे बुडून गेलो की, मागे वळून पाहताच आले नाही. पण करोना आला अन परात्मता, अलगता, वियोग अथवा तुटलेपण अवघ्या जगाला अनुभवावे लागले. ज्यांना फार काही संगणकीय काम करावे लागत नाही, त्यांचे जग अभंग होते. थोडेथोडे त्यांनी जग जोडून ठेवलेले होते, परंतु संगणकीय सेवेदार असणाऱ्यांना एरवीही आभासी जगजोडणी करावीच लागे. कोविडची साथ पसरल्यावर तर त्यांना इंटरनेटसारखे स्थलकालबंधनरहित राहायचे सक्तीचे झाले. नोकरीच ती, तिला कार्यालय कशाला नि टेबल-खुर्ची कशाला? संगणक उघडून, जोडून घेतला की झाले काम सुरू. उगाच बाकीचा फुकाचा सरंजाम का म्हणून लागावा? मालकांचे आयतेच फावले. इमारतीचे भाडे, पाण्याचे व विजेचे खर्च, वाहतूक, सुरक्षा, उपाहारगृह, प्रवास, भत्ते, देखभाल व दुरुस्ती, टेबल-खुर्च्या, स्वच्छता… सारे सारे वाचवले त्यांनी. वर पगारही घटवले. हे सर्व कमी केले, पण कामाचे तास बेबंद करून टाकले. एकेकाला दोन-दोन कामे सोपवली गेली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्याआधी ‘वर्क फ्रॉम होम’ ही कल्पना इतकी हुरळून टाकणारी रंगवली गेली की बस्स! घरीच काम. तेही आवडत्या लोकांसोबत. कसेही, कुठेही, कधीही बस अन काम कर. टाय घाला अन वेळेवर येऊन आपली उपस्थिती नोंदवा ही सक्ती नाही. घरचे जेवण तर अनेकांना असा ‘वर्कर’ व्हायला प्रेरणा देऊन बसले! दुसऱ्या शहरातला केवढा तरी खर्च वाचला. भाडी, प्रवास, जेवण, पेट्रोल, पार्ट्या, खरेदी अन सहली आदी वाचले. वेळ पाळा आणि रजांसाठी तोंड वेंगाडा, यांचा प्रश्नच उरला नाही.
काम करण्याच्या ठिकाणापासून खूप दूर आपल्या घरी आरामात काम करता येण्याचा अनुभव अनेकांना आरंभी सुखावून गेला. एकांत, एकटेपणा, शांतता आणि शिस्त, सामुदायिक कार्यपद्धतीपासून सुटका यांनी अनेक मने लोभावली.
कामे सुरू झाली. पाहता पाहता वर्ष उलटले. पण वर्षाचे कशाला, चौथ्या-पाचव्या महिन्यातच सारी कल्पनासृष्टी उन्मळून पडली. घरात असूनही नसल्यासारखे. घरातल्या घरात पाठ करून बसण्याची वेळ आली. ना गप्पा, ना सहवास, ना घरकामे, ना जबाबदाऱ्यांचे पालन. जी जागा कामासाठी निवडली ती जणू या वर्कर्सच्या कबजात जाऊन बसली. लहानांनी तिकडे फिरकायचे नाही आणि मोठ्यांनी मध्ये मध्ये लुडबुडायचे नाही. जेवायची परवानगी घेऊन कसेबसे पोटात ढकलल्यावर पुन्हा त्या डेस्कटॉप पुढ्यात वा लॅपटॉपसमोर बसावे लागते. बकासुराच्या गोष्टीचीच आठवण येऊ लागली. गाडाभर अन्न खाऊनही त्याचे पोट भरेचना. वर अख्खा माणूस खाऊन टाकायचीसुद्धा तयारी. एवढेसे ते काचेचे पडदे, पण ७० एमएम पडद्यावर पेन्सिलीने लिहायला बसवावे, तसे अगडबंब काम देऊन बसणारे. फोन करत राहा, बोलत-ऐकत राहा आणि या विंडोवरून त्या विंडोत जाऊन बसा. अगदी ‘गोविंडो’ होऊन गेला साऱ्यांचा! कधी रेंज बेपत्ता तर कधी कॉल ड्रॉप. ऑफिस असताना डोके वर उंचावून ‘ए ब्रो’ अशी हाक मारून काही विचारण्याची सवय. ती गेली ती गेलीच. त्यातला वेळ अन यातला वेळ याची जाणीव झाली. बाहेर लॉकडाऊन, आत लॉकअप.
पोरगा अन पोरगी घरी आल्याचा आनंद वीज गेल्यावर संगणकाची जशी हतबल अवस्था होते, तसा आईबापांचा झाला. इनव्हर्टर अथवा बॅकअप म्हणून मातृत्व-पितृत्व तरी किती वेळ तजेलदार ठेवावे? मुले घरात परतल्याची सारी टवटवी मावळली. दोस्तांची गजबज, मैत्रिणींची लगबग नि गप्पा, आरडाओरडा, गाणी-बजावणी तो सारा कल्लोळ निमाला म्हणजे निमालाच. सगळे जण पुन्हा एकटे एकटे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
काय म्हणायचे या अवस्थेला? तुटलेपण, दुरावा, अलिप्तता, अंतरणे, अलगता, अनोळख की परात्मता? कार्ल मार्क्सने १८४४ साली ‘इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्टस’ या नावाचे एक चोपडे लिहून ठेवले होते. ते उजेडात आले १९३२ साली. त्यात ‘एलिनेशन’ अर्थात ‘परात्मता’ याचा सिद्धान्त त्याने मांडला आहे. भांडवली उत्पादन व्यवस्थेचा अभ्यास करताना त्याला असे आढळले की, कामगार जे उत्पादन करतो, ते त्याचे न होता दूर जाते. त्यावर त्याचा काही अधिकार राहत नाही. उलट ते उत्पादन श्रमिकावरच वर्चस्व गाजवू लागते. नुसते तेवढेच नाही, तर ते श्रमिकाला निसर्गापासून तोडते अन माणसांपासूनही. सरतेशेवटी उत्पादन अती झाले व बाजारात पडून राहिले, तरीही श्रमिकाला म्हणजे उत्पादकाला त्यापासून दूर गेल्याचा भाव येत राहतो. हा भाव म्हणजे ‘परात्मभाव’.
आपले स्वत्व काढून नेणारे ते उत्पादन आणि ती उत्पादनप्रक्रिया आपल्याला निव्वळ अमानवी, शुष्क व यांत्रिक बनवते; एखादी क्रयमूल्य असलेली वस्तूच बनवते आणि जीत आपण आपले थोडेफार स्वत्व ओतले ती आपल्यावर अशी वेळ आणते… या प्रक्रियेत कामगार त्या उत्पादनापासून परात्म होतो. परका होतो. श्रम ही आनंदाची व नवनिर्मितीची अत्यंत नैसर्गिक कृती असते, ही जाणीव नष्ट होते. श्रम नेहमी समुदायातूनच आकार घेतात. श्रम म्हणजे सामूहिक कृती. पण या उत्पादन व्यवस्थेत ही मानवी अवस्थाच गायब केलेली.
मार्क्सने त्याच्या तारुण्यात परात्मतेचा विचार केलेला. तो हेगेल या तत्त्वज्ञाने आधी केला तरी मार्क्स म्हणतो की, मी तो डोक्यावर उभा असलेला पायावर उभा केला. मालक, श्रमिक, भांडवल, खाजगी मालमत्ता, स्वातंत्र्य, सर्जनशीलता अशा काही बाबी मार्क्सने त्याच्या ‘इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्टस’मध्ये आणल्या. भांडवली उत्पादन व्यवस्था खाजगी मालकीच्या आधाराशिवाय उभी होत नाही, हे सांगून मार्क्स टोटल मॅन, ह्यूमॅनिझम अशा नव्या मुद्द्यांचाही विचार मांडतो. ही शोषण करणारी उत्पादनव्यवस्था नको आहे. तिच्या जागी समाजवादी उत्पादनव्यवस्था आणायची आहे, असे त्याने १८४४मध्येच सांगून ठेवले आहे. त्यानुसार १८४८मध्ये ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित झाला. तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ की मानसशास्त्रज्ञ अशी विविधांगे मार्क्सच्या विचारविश्वात एकत्र येत. पण शेवटी आर्थिक विचारांनी सर्वांवर मात केली. त्यामुळे परात्मता मार्क्सला नंतरच्या आयुष्यात विस्तार करून मांडता आली नाही.
सोव्हिएत रशिया, पोलंड, हंगेरी, युगोस्लाव्हिया, अल्बानिया, रुमेनिया, ऑस्ट्रिया, पूर्व जर्मनी आदी देशांत समाजवादी अर्थव्यवस्था राजकीय सत्तेमुळे अवतरली. तिथे कामगारांना परात्मता जाणवत होती काय, असा वाद निर्माणही झाला. पण तोही फार वाढला नाही.
आता इलेक्ट्रॉनिक क्रांतीचे एक अपत्य म्हणून परात्मतेची चर्चा करायला हवी. जवळपास ४० वर्षांपासून हा विषय जगभर वर्ज्य झालेला होता. कारण उत्पादन तंत्र, उत्पादनाची साधने, उत्पादन पद्धती, उत्पादनामागील प्रेरणाशक्ती यांत झपाट्याने होणारे बदल. या बदलांत श्रमिकाचे स्थान गौण झाले. संगणक, यंत्रमानव, तंत्रप्रणाली विखरून केले जाणारे उत्पादन, अत्याधुनिक यंत्रे अशा अनेक घटकांचा प्रभाव या मागे होता. ‘मॉडर्न टाइम्स’मध्ये चार्ली चॅप्लीनने ज्या ‘असेंब्ली लाईन’ उत्पादन पद्धतीची भेदक थट्टा केली, ती अद्यापही चालते. पण आता कामगारच कमी लागतात. डिजिटलायझेशन होताच उत्पादन पद्धती बदलली. पण माणूस वा श्रम लागतातच. म्हणून आज संगणकापुढ्यात बसलेला सुशिक्षित, उच्चशिक्षित तज्ज्ञ, अभियंता, संशोधक अथवा तंत्रज्ञ परात्मभावापासून बचावला असे नाही. श्रम, कल्पकता, स्वेच्छा आणि आनंद यांचा अतूट संबंध असतोच. स्वत:ची अवस्था यंत्रवत आणि वस्तुगत झाल्याची भावना १८४४च्या आसपासही होती आणि २०२१मध्येही आहे.
‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना वा योजना मालक वर्गासाठी फायदेशीर आहे. मात्र ती फार मोठे एलिनेशन करते, हे फार लवकर कळाले. सबब ती नसावी, अशी मागणी अनेक सर्वेक्षणे व चाचण्या यांमधून पुढे येत आहे. परस्परांपासून शिकता येण्याची प्रक्रिया थांबली. संवादामधून काम सोपे होत जाण्याची व्यवस्था खोळंबली. अनुभवी व हुशार सहकाऱ्यांकडून ऐनवेळी वा संकटकाळी येणाऱ्या सूचना आटल्या. खेळीमेळी आणि हलकेफुलके वातावरण संपले. मन मोकळे करता येणे थांबले. नवे विचार, मित्र, अनुभव यांचा पुरवठा घटला. ‘घरात काम’ की ‘कामात घर’ हा पेच सुटेनासा झाला.
महिलांना तर व्यावसायिक व वैयक्तिक जीवन इतके त्रासदायक होऊन बसले की बस्स! मातृत्व, पालकत्व, जबाबदाऱ्या यांच्या चिंध्या होऊ लागल्या. महिलांचा स्वतंत्र परात्मभाव एक श्रमिक या नात्याने नसतो. पण त्यांची परात्मता अधिकच त्रासदायक ठरली. ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात सांसारिक हिंसा, दुरावा, कटुता, घटस्फोट इत्यादी समस्यांत भारतही सापडला. एकाकी, तुसडा, चिडका, किरकिरा आणि अनुत्साही असा श्रमिक वर्ग भांडवलशाही कसा सहन करील? आधीच भांडवलदारांनी कारस्थाने करून श्रमिकांच्या संघटना संपवून टाकलेल्या. त्यांचा विचारही न करण्याचे वातावरण निर्माण केले. अशा वेळी गाऱ्हाणे व दाद यांचा विचार कसा करणार? सरकार मालकांच्या बाजूचे, कायदेही तसेच. तक्रार करताच नोकरीवरून काढून टाकले जाणार. बरे, घरात राहून घरातल्यांसमोर भांडणे, वाद अथवा संघर्ष कसा अन किती करायचा?
बहुतेक घरांत ‘वर्क फ्रॉम होम’ गुणगुण चालू असल्याचा भास होतो, पण प्रत्यक्षात हे वर्कर्स फार अस्वस्थ, असंतुष्ट आणि असहाय आहेत. त्यांचे तुटलेपण या नव्या रोगराईने आणून ठेवले असले तरी कामाची पद्धती बदलल्यामुळे उजळ झालेली परात्मता फार जिव्हारी लागलेली आहे. भांडवलशाहीचे शोषण, नफेखोरी, श्रमविभागणी अशा कित्येक गोष्टी कोण्याही समाजवाद्याच्या वा साम्यवाद्याच्या भाषणांवाचून प्रत्येकाला समजलेल्या आहेत. मार्क्सही कोणी वाचलेला नाही. परात्मभाव ही काय चीज असते, याचीही त्यांना जाण नाही. मात्र ‘अनुभव हाच खरा शिक्षक’ हे शाळेत शिकलेले एक वाक्य त्या साऱ्यांना आज नवे ज्ञान देत आहे. ना संप करता येतो, ना धरणे देता येते, ना युनियन करता येते, ना सरकारकडे तक्रार! ही कोंडी आणि कामाचे बदलेलेले स्वरूप, यांमुळे त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास उडू लागला आहे.
भांडवलशाही व लोकशाही यांचे विशेष सख्य नसते. भांडवलशाहीला नेहमीच नरेंद्र मोदींसारखा एकाधिकारशाहीवादी नेता आवडतो. परंतु एकीकडे कोविडचा प्रकोप आणि दुसरीकडे ‘वर्कर्स फ्रॉम होम’ यांचा कोप भांडवलशाहीला परवडणारा नाही. त्यामुळे ७० टक्के मालक पुन्हा कारखाने, कार्यालये सुरू करून जुनीच पद्धत ठेवण्याच्या विचारात आहेत. शिवाय प्रचंड मोठा समुदाय घरात कोंडला गेल्याने त्याचे ग्राहकपण संपुष्टात आल्याचा तोटा भांडवलदारच सहन करत आहेत.
लोकशीहीची गरज भांडवलशाहीला असण्याचे कारण अभिव्यक्ती. नव्या कल्पना, योजना, उत्पादने, सेवा यांचा जन्म मोकळ्या वातावरणात होत असतो. मोदींचा काळ या भांडवलदारांसाठी अत्यंत भाकड. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘स्मार्ट इंडिया’ आदी सारे प्रकल्प हुकूमशाही राज्यव्यवस्थेने जन्माला घालून मारूनही टाकले. कोविडच्या काळात अनेकांना कल्पकता, एकी व सहयोग दाखवून वातावरण सुसह्य केले. हुकूमशाही विचारसरणीच्या संघाला व भाजपला तसे काही जमले नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
परात्मतेमधून सुटका होण्याचा मार्ग म्हणजे सर्जनशील श्रमाची हमी, स्वातंत्र्याची खात्री देणारी उत्पादनप्रणाली! म्हणून राजकीय अर्थव्यवस्था अशी हवी, जी श्रम व व्यक्ती यांचा मान राखणारी असेल. मात्र विद्यमान राज्यकर्ते असे होऊ देतील का? मुळीच नाही. त्यांनी म्हणजे भाजपने व त्याच्याआडून राज्य करणाऱ्या संघाने सत्तेच्या राजकारणाचे अत्यंत घातक मिश्रण पिऊ घातले आहे. धर्म, राष्ट्रवाद, भय आणि द्वेष या चार पायांवर आपली सत्ता प्राप्त केलेली आहे. मुसलमान, दलित, आदिवासी आणि स्त्रिया यांच्याविषयी खास चीड व नाराजी उत्पन्न करून उर्वरित नागरिकांना त्यांच्यापासून अलग केलेले आहे. म्हणजे ‘एलिनेट’ केलेले आहे. भयंकर अफवा, गैरसमज, असत्य यांची निर्मिती करून ती अलगतावादी बारूद बनवली आहे. सोशल मीडियावर ताबा मिळवणारा हा पक्ष व्यवस्थितरीत्या या चार घटकांना आणि त्या निमित्ताने काँग्रेस पक्षाला या समूहाजवळ येई देईनासा झाला आहे.
आता गंमत अशी की, सोशल मीडियामुळे आपण कनेक्टेड, कमिटेड आणि कन्व्हिन्स्ड आहोत, असा भास झालेल्यांना उर्वरित समाजाने आपल्याला कटाप केले आहे, ते लक्षात येत नाही. अन्यथा बंगाली, तमिळी, मल्याळी मतदारांनी धर्म-राष्ट्र-सेवा-द्वेष यांचे रसायन फेकून दिल्याचे त्यांना समजले असते. ही अलगता व तुटलेपण, त्यात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे निर्माण झालेली विलगावस्था. यांचा फार गंभीर परिणाम राजकारणावर पडू लागला आहे. स्पष्टच सांगायचे झाले तर भारतीय नागरिकांत, श्रमिकांत फूट पाडण्याचे अघोरी व समाजद्रोही कृत्य सत्ताधारी पक्षाने केले आहे. शिवाय हा पक्ष भांडवलशाहीचा प्रखर पाठीराखा आहेच.
हा जो आपला वर्कर आहे, तो काही वर्षांपूर्वी मोदींच्या प्रेमात बुडून गेला होता. आज स्वत:ची अवस्था त्याला ओंगळवाणी वाटते आणि त्यासाठी तो मोदींची कार्यपद्धती जबाबदार धरतो. जी भांडवलशाही उत्पादनव्यवस्था सध्या अनिर्बंध बोकाळली, ती राज्यकर्त्यांच्या सहकार्यावाचून व मान्यतेशिवाय अमलात आलेलीच नाही, हे या ‘होम वर्कर’ला पटले आहे. त्याला आता या पुढच्या संकटांसाठी ऐक्य करण्यावाचून उपाय नाही.
एकेकटा कुणी लढू शकत नसतो. एक भारतीय म्हणून एकमेकांपासून परके केले गेलेले असताना त्यात या कोविडकालीन परात्मतेची भर पडली. तसे पुन्हा होऊ नये यासाठी संघटन, एकी, युती, आघाडी यांची फार गरज आहे.
बघू या, काही बदल म्हणजे परात्मतेकडून आत्मीयतेकडे हे वर्कर्स वळतात का ते…
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment