अजूनकाही
राजधानी दिल्ली म्हणजे देशाचं राजकीय तख्त! या शहराने अनेक राजांना, सम्राटांना अभिषिक्त आणि पायउतार होताना पाहिलं आहे. अगदी लोकशाहीच्या काळातही ही परंपरा सुरूच आहे. त्यामुळे या शहराकडे सांगण्यासारखं खूप आहे. फक्त आपल्याला ऐकायला वेळ हवा! असं म्हणतात की दिल्ली शहरात आठ शहरांचा वारसा सामावला आहे. इंद्रप्रस्थ आणि सुरजकुंड धरून दहा शहरं म्हणता येतील. थोडक्यात भारताचं सत्ताकेंद्र यमुनेच्या तीरावरच राहिलं. फक्त वेगवेगळ्या शाह्यांनी आपलीआपली नगरं वसवली. प्रत्येक नगरानं त्या त्या काळातील आठवणी जतन केल्या... प्रत्येक शहर एक एक पर्व आहे इतिहासाचं ... इतिहास म्हटलं की राजे-महाराजे, सरदार लढाया आणि राजकारण आलंच... आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहेच. पण ऐतिहासिक वास्तू मला ‘टाइम मशीन’सारख्या वाटतात... कारण त्या अनेक शतकं जुन्या काळाच्या साक्षीदार असतात... अनेक पिढ्यांपूर्वीचं बरंच काही त्या जतन करून असतात. त्या काळात लोकांनी काय बांधलं, कसं बांधलं, त्यासाठी कोणती सामग्री वापरली, कोणत्या अभिजात मूल्यांचा प्रभाव त्या रचनेवर होता, असं बरंच काही या वास्तू आपल्याला थोडंसं झूम इन केलं तर सांगतात. ताजमहालचा पुरस्कर्ता मुघल बादशाह शाहजहान... त्याने बांधलेल्या शाहजहानाबादचा केंद्रबिंदू आहे लाल किल्ला... २००७ मध्ये याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला...
लाहोरी गेटच्या बुरुजांवर फडकणारा तिरंगा आणि पंतप्रधानांचं भाषण हे १५ ऑगस्टला आपण पाहिलेलं चित्र आहे. या दरवाजाभोवती भक्कम बुरुजाचा वेढा आहे आणि चौफेर खणलेला खंदकही. आज मुघल पहारेकऱ्यांची जागा CISFच्या हत्यारबंद जवानांनी घेतली आहे. दिल्ली दरवाजाही रचनेच्या दृष्टीनं साधारण तसाच आहे. तिथल्या भागात मुबलक उपलब्ध असलेल्या लाल सँडस्टोननी बांधलेली तटबंदी आखीव-रेखीव आणि भौमितीय समतोलानं सजलेली वाटते.
किल्ल्याच्या आत शिरलं की, एक मोठा बाजार लागतो! ज्यांना इतिहासापेक्षा बाजारहाट करण्यात जास्त रस आहे त्यांना इथं रमायला सोडून पुढे जायचं आणि तीन तास निवांत भटकायचं. या बाजाराला ‘छत्ता चौक’ म्हणतात. पण पब्लिक चिवट असेल तर किल्ल्यात शिरायच्या आधीच चावडी बाजार आणि चांदणी चौक भागात त्यांना सोडून यावं!
आत शिरल्यावर दिसतो नौबतखाना किंवा नगारखाना. आज या वास्तूमध्ये एक सुंदर संग्रहालय आहे. तिथं विविध काळातील हत्यारं आणि चिलखती पोशाखांचा संग्रह पाहता येतो. इराणच्या सफावी सुलतानाची (ज्याने हुमायूनला आश्रय दिला) तलवारही या संग्रहात आहे. हा किल्ला शाहजहानच्या इराणी वास्तुरचनाकार उस्ताद अहमद लाहोरीने १६३९ मध्ये बांधला.
नौबत खान्याच्या प्रवेशद्वारातील घुमटाकार छत आणि त्यावरील बारीक कोरीव काम पाहिलं की, समरकंदच्या तिमुरीद बांधकामांची आठवण येते! उलूग बेगने बांधलेला समरकंदचा मकबरा पाहिला तर अनेक साम्यस्थळं दिसतील. अर्थात दोन्हींवर स्थानिक शैली आणि सामग्रीचा प्रभाव असल्याने त्यांचं स्वतंत्र सौंदर्य आहेच.
किल्याच्या मुख्य चौकात प्रवेश केल्यानंतर अनेक मुघलकालीन बांधकामं पाहता येतात. दिवाण-इ-आमच्या खांबांच्या रचनेतील समतोल आणि दिवाण-इ-खासमधलं कोरीव काम सतराव्या शतकातील दृश्य सौंदर्याची ओळख करून देतं. तिथं बाजूलाच असलेला रंग महाल आणि मुमताज महाल जाळ्या आणि झरोक्यांनी उत्तम सजवला आहे. एके ठिकाणी दरवाजात केलेलं कोरीव काम आणि सजावट अजूनही शाबूत आहे. जाळीकामाची गंमत त्यातून अशी की, दिवसभर जागा बदलणाऱ्या प्रकाशाशी वास्तू संवाद साधत असते. प्रत्येक प्रहर हा एक नवा अनुभव असतो. मुमताज महालात असलेल्या संग्रहालयात काही सुंदर चित्रं आणि इस्लामी अक्षररचनेचे नमुने आहेत.
तिथंच शेजारी आलमगीर औरंगजेबानं बांधलेली खासगी मशीद आहे. मोती मस्जिद. आपल्या खासगी खर्चासाठी टोप्या विणणाऱ्या आणि दक्खनेत कफनाशिवाय दफन झालेल्या सम्राटाची ही साधी मशीद... प्रचंड महत्त्वाकांक्षी क्रूरकर्मा आणि अनेक इतिहासकारांनी साधार धर्मांध मानलेल्या औरंगजेबाच्या पाऊलखुणा त्याच्या स्वभावाच्या एका वेगळ्या पैलूची ओळख करून देतात. कधीकधी असं वाटतं कॅमेरा ठेवून द्यावा आणि काहीतरी हातानं रेखाटावं! असेही क्षण फोटोग्राफीतली मजा वाढवतात
नादीरशहाच्या स्वारीत या किल्ल्याची १७३९ मध्ये बरीच नासधूस झाली. शंभरी गाठताना ही संक्रांत आली. नंतर १८५७चं स्वातंत्र्ययुद्ध चिरडताना ब्रिटिशांनीही बरीच तोडफोड केली. आज सावन आणि भादो महल पाहताना किंवा अखेरचा मुघल बादशाह बहादूरशाह जफरने बांधलेला जफर महाल पाहताना मागे ब्रिटिशकालीन इमारती दिसतात.
१७८०-९० च्या सुमारास अनाम चित्रकाराने लखनवी शैलीत काढलेलं चित्र आपल्याला तेव्हाच्या माहौलाची चांगली कल्पना देतं.
किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला सुंदर बावली म्हणजे विहीर आहे. तिथं गेलो तेव्हा ती बंद होती. पलीकडे चालत जाऊन पूल ओलांडला की, सलीमगढचा जोडकिल्ला लागतो. तो १५४६मध्ये इस्लामशाह सुरीने बांधला होता. आज किल्ल्याच्या आत जुन्या तुरुंगाचे अवशेष आहेत. आझाद हिंद फौजेच्या नेतृत्वाला तिथं कैदेत ठेवण्यात आलं होतं. हे म्युझियम थोडं आडबाजूला वाटलं तरी पाहण्यासारखं आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोसांचे सहकारी कर्नल प्रेमकुमार सहगलांचा गणवेश तिथं पाहता येतो.
शुक्रवारच्या दिवशी लाल किल्ल्यासमोरच्या जामा मशिदीला भेट देणं हा एक खास अनुभव असतो! पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी.
chinmaye.bhave@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment