अजूनकाही
आधी हिंदू-मुस्लीम एकतेचे मोठे समर्थक असलेले बॅ. मोहंमद अली जिना यांनी २० मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये झालेल्या मुस्लीम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात जे अध्यक्षीय भाषण केले, त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लीम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत, आणि ते एकत्र, एकाच छताखाली कधीच नांदू शकणार नाहीत, असे सांगितले. २३ मार्च १९४० रोजी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढे भारतीय उपखंडाचे दोन तुकडे झाले. कोट्यवधी लोकांना प्रचंड हिंसाचारात मायभूमी सोडावी लागली. दोन्ही देशांच्या आरपार घुसलेला फाळणीचा भाला अजूनही कायम आहे. अगदी मागच्या महिन्यात इमरान खान यांनी भारताने देऊ केलेली साखर नाकारून भारत-द्वेषाचा नमुना दाखवून दिला.
या फाळणीने कधीच भरून निघणार नाही, एवढे नुकसान कलेच्या प्रांतात झाले. पाकिस्तानातील अत्यंत प्रतिभावान कलावंत आणि सिनेमा, नाटक, टीव्हीवर व्यस्त असणाऱ्या गायिका-लेखिका असलेल्या बुशरा अन्सारी यांनी परवा, १५ मे रोजी ६६ व्या वर्षांत पदार्पण केले. चाळीसपेक्षा अधिक सिनेमे, सहा टीव्ही मालिका, दहा नाटकांमधून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण केलाय.
पण त्या केवळ कलावंतच नाहीत, तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत जागृत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना खडे बोल सुनावण्यास त्या कचरत नाहीत. इतिहासात जे घडले ते घडले, कुटुंबे वेगळी झाली म्हणून मुलांमध्ये कटुता कशासाठी, असा त्यांचा सवाल असतो. दोन-अडीच वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तानात तणाव वाढला. प्रसारमाध्यमांनी तर असे वातावरण तयार केले की, आता अणुयुद्ध होणार की काय असे वाटू लागले. तेव्हा बुशरा यांनी ‘हमसाये मा-जाई’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
प्रसारमाध्यमे, राजकारण्यांना बाजूला सारत आता भारत-पाकिस्तानातील गृहिणींनाच दोन्ही देशांची काळजी घ्यावी लागणार आहे. युद्धाचे वातावरण थांबवून मुलांमध्ये प्रेमभावनेची पेरणी करावी लागेल, असा संदेश देणारे हे गीत बुशरा यांची बहीण नीलम अहमद बाशेर यांनी लिहिले. त्यात बुशरांनी हिंदू तर त्यांची दुसरी बहीण अस्मा अब्बास यांनी पाकिस्तानी मुस्लीम गृहिणीची भूमिका केली आहे. अगदी शंभर चौरस फुटाच्या सेटवर चित्रित झालेल्या या गाण्याने लाखो पाकिस्तानी रसिकांनाही अंतर्मुख केलेय. त्यामुळे बुशरा यांचे बळ वाढले. पण केवळ व्हिडिओ करून त्या थांबल्या नाहीत, तर प्रत्येक मंचावर हा विचारही ठणकावून मांडला.
‘बुशरा’ या शब्दाचा अर्थ ‘अचूकता’. तो त्यांनी सार्थ केलाय. अर्थात, कलावंत होण्याचे, व्यक्तिस्वातंत्र्याच्या कट्टर समर्थक असण्याचे बीज त्यांच्यात वडिलांकडून पेरले गेले. त्यांचे वडील अहमद बाशी प्रख्यात व्यावसायिक लेखक होते.
बुशरा यांना खरी ओळख मिळाली १९७८मध्ये पीटीव्हीवरच्या 'फिफ्टी-फिफ्टी' विनोदी मालिकेतून. १९८३मध्ये त्यांच्या ‘आंगन टेढ़ा’ मालिकेने खळबळ उडवून दिली. कारण त्यात त्यांनी पाकिस्तानची कायम मुस्कटदाबी करणाऱ्या लष्करी राजवटीवर टीका केली होती. त्यामुळे त्या काही काळ अडचणीतही आल्या होत्या. पण त्यांनी माघार घेतली नाही. अन्वर मकसूद यांची ‘लूज टॉक’ मालिका प्रचंड लोकप्रिय होती. त्यात ते आणि मोईन अख्तर समाजातील दांभिक लोकांच्या चिंधड्या उडवत. या मालिकेतील काही भागांमध्ये बुशराही होत्या. त्यात भूमिका साकारताना बुशरा यांनी जी वेगवेगळी रूपे धारण केली आहेत, ती त्यांच्यातील समर्थ, बहुगुणी अभिनेत्रीची साक्ष देतात.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
त्यांची बहीण अस्मा अब्बास याही उच्च दर्जाचा अभिनय करतात. ‘कोई चांद रख’ आणि ‘दिल लगी’ या टीव्ही मालिकेतील मेहविश हयात (दाऊद इब्राहिमची तथाकथित मैत्रीण)ची आई, ‘दलदल’ या मालिकेतील खाष्ट सासू, असा त्यांचा अभिनय उत्कृष्ट दर्जाचा आहे.
इमरान यांनी भारत द्वेष दाखवून दिला तरीही पाकिस्तानातील कलावंत, टीव्ही मालिकेत काम करणारे कलाकार यांचे मात्र भारतीय कलावंत, टीव्ही कलाकार, हिंदी सिनेमा यावर प्रेम आहे, हे नक्की. पाकिस्तानातल्या कुठल्याही टीव्ही मालिकेत आपल्या हिंदी सिनेमाचा आणि कलाकारांचा उल्लेख असतोच असतो!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हुमायून सईद या टीव्ही कलाकाराने स्वतः निर्मिलेली कुठल्याही टीव्ही मालिकेत तर हिंदी सिनेमातील गाण्यांचा सढळ वापर केलेला दिसतो. बुशरा यांच्या वर उल्लेख केलेल्या ‘हमसाये माँ जायी’ या व्हिडिओमध्येही विश्वजित यांच्या ‘किस्मत’ चित्रपटातील ‘कजरा मोहब्बतवाला’ या गाण्यातल्या ओळी वापरल्या आहेत. सत्तर-ऐंशीच्या दशकात ‘धूप किनारे’ आणि ‘परछाईयां’ या पाकिस्तानी मालिका भारतातदेखील आवडीने पाहिल्या जायच्या.
बुशरा यांच्यातील प्रतिभेला मात्र पाहिजे तेवढा वाव मिळाला नाही. त्यांचा चाहता वर्ग, भूमिकांमधील वैविध्य पाकिस्तानपुरतेच मर्यादित राहिले आहे. फाळणी झाली नसती तर त्यांच्यातील अभिनयाचा आणखी कस लागला असता. भारतात आणखी एका रूपवान, परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या अभिनेत्रीची भर पडली असती…
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
bsatish17@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment