बाजारात नव्यानं कुठलं पुस्तक आलंय, घरी त्यांपैकी काय आहे आणि काय वाचायला घ्यावं, याचा विचार सुरू असताना, नवऱ्यानं काही पुस्तकं सुचवली. त्यातल्या एका नावानं लक्ष वेधून घेतलं – ‘मृत्यू पाहिलेली माणसं’. काळाचा महिमा! सध्या मृत्यूशिवाय काय पाहतायत माणसं! म्हणून असेल कदाचित, पण वाचायला घेतलं आणि फटकन हातावेगळं झालं.
पुस्तकाची कॅचलाईन पुस्तकाचा आशय अगदी नेमकेपणाने आणि तंतोतंत व्यक्त करते – ‘मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या’. या गोष्टी वाचताना ‘अत्त्युच्च भीती’ आणि ‘कल्पनेपलीकडची आशा’ या दोन टोकाच्या भावना मनाची पकड घेतात आणि या गोष्टींमधल्या माणसांप्रमाणे वाचकही या दोन टोकांमध्ये झुलत राहतो.
लेखिका गौरी कानेटकर यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे, या कहाण्या खरोखरच झपाटून टाकणाऱ्या आहेत. या कहाण्यांपैकी एक कहाणी यू-ट्यूबवर पाहिल्यानंतर लेखिकेने त्या कहाणीबद्दल मिळेल ते वाचून काढलंच, पण या कहाणीसारख्या मृत्यूला आव्हान देणाऱ्या इतरही अनेक कहाण्या आणि त्यासंबंधित अनेक पुस्तकं वाचून काढली. पेशाने पत्रकार-संपादक असलेल्या व्यक्तीचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. कुतूहलाचा किंवा चमकणारा एक जरी धागा सापडला, तरी तो धरून त्याच्याशी संलग्न शक्य तितका आवाका पिंजून काढायचा. एरवी सर्वसामान्यपणे एखाद्या वेधक विषयाचा सलग टेम्पो ठेवून पाठलाग करत राहणं सहजसाध्य नसतं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लेखिकेने वाचलेल्या अशा पुस्तकांमधल्या वेचक पुस्तकांच्या कहाण्या तिने सारांशरूपाने, पण आवश्यक विस्तार करत या पुस्तकात नोंदवल्या आहेत. त्या नोंदवताना लेखिका अनेक ठिकाणी हे प्रसंग वाचतानाच्या तिच्या भावना, तिची मतं, निरीक्षणं नोंदवत राहते. त्यातून नकळतपणे प्रेरणेपलीकडे एक दृष्टीकोनही वाचणाऱ्याला मिळत जातो. त्यामुळे हे पुस्तक ‘चिवट जीवनेच्छा’ या लेबलापलीकडे जातं आणि जीवन-मरणाच्या उंबरठ्यावरदेखील माणसात ठाण मांडून बसलेल्या मूल्यविवेकाचं, समाजशीलतेचं, हळुवार भावनिक बंधाचं आणि प्रसंगी विनोदबुद्धीचं आपल्याला दर्शन होतं. मात्र एकट्या आणि तहान-भुकेची परिसीमा गाठलेल्या माणसाचं अशा परिस्थितीत साहजिक वाटेल असं क्रूर प्रदर्शन या कहाण्यांमध्ये अगदीच विरळा आहे. कदाचित या कहाण्यांमधली बहुतेक संकटं निसर्गाशी संबंधित असल्याचा हा परिणाम असावा. मात्र वंशविच्छेदाच्या एका कहाणीमध्येदेखील जिवावर शब्दशः उदार होऊन एका पाद्रीने वाचवलेले इतर वंशीयांचे जीव हीदेखील भयप्रद वातावरणात स्वतःच्या मूल्यविवेकाशी झुंजून मानवी मूल्यांना बळकट करणारीच कहाणी आहे.
या पुस्तकात एकूण नऊ कहाण्या आहेत. सगळ्या सत्य घटना आहेत. यांतल्या बहुतांश जंगल्यातल्या आहेत, काही बर्फातल्या आहेत, एक समुद्रावरची आहे, तर एक वाळवंटातली आहे आणि एक मानवी नरसंहाराची आहे. या सगळ्या कहाण्या विपरीताला, आक्रिताला तोंड देणाऱ्या आहेत, पण प्रेमानं बहरलेल्या आहेत. यांतल्या प्रत्येक कहाणीतल्या व्यक्तीबरोबर मृत्यू सावलीसारखा वावरतो आहे; पण माणसाचं मन ही एक अद्भुत आणि सामर्थ्यशाली गोष्ट असल्याचा प्रत्यय प्रत्येक कहाणीतून येत राहतो.
जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवर यांतल्या प्रत्येकाला प्रेयसी, आई, वडील, मुलं, बायको यांपैकी कुणा ना कुणाच्या तरी प्रेमाच्या आठवणीनं नवसंजीवनी मिळालेली दिसते. शरीर-मनाच्या थकव्यामुळे, ताणामुळे प्रसंगी यांपैकी बहुतांश व्यक्तींना आपल्या प्रियजनांचे भास झालेले आहेत. मात्र यांपैकी कुठलाही भास दुःखद नाही. कडेलोटाच्या प्रसंगीदेखील हे भास आशेचं बळ पुरवणारेच आहेत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
माणसाचं शरीर हादेखील एक चमत्कारच असल्याचा प्रत्यय या गोष्टी वाचताना येतो. कारण पाण्याअभावी यांतल्या अनेकांनी स्वतःची लघवी प्यायली आहे, माणसांचं मांस खाल्लं आहे आणि प्रसंगी प्राण्यांचं रक्तही प्यायलं आहे. मात्र कोणीही स्वतःला सोबत करणाऱ्या प्राण्याला, पक्ष्याला किंवा माणसाला भुकेपायी मारलेलं दिसत नाही. अन्न-पाण्याइतकीच कोणा जिवंत जिवाची सोबत ही माणसाची प्राथमिक गरज असल्याचं यातून स्पष्ट होतं. तसंच माणसाच्या समाजशील असण्याची ग्वाहीदेखील यातून मिळते.
देवावर विश्वास असणा-नसणारा प्रत्येक जण या एकटेपणाच्या प्रवासात मृत्यूशी झुंजताना जगण्यावरच्या श्रद्धेसाठी ‘देव’ या संकल्पनेचा आधार घेताना दिसतो. यांतल्या प्रत्येक गोष्टीतून माणसाच्या शरीर-मनाची परिस्थितीशी जुळवून घेण्याची आदिम ताकद आणि लवचीकपणाही अधोरेखित होतो. एकीकडे विपरीत परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जीव दावणीला लावत असताना, दुसरीकडे तोच जीव राखण्यासाठी भवतालातून जे मिळेल, ते रिचवून ही माणसं उभी राहताना दिसतात. त्यामुळे ‘यातून आपण कधीच बाहेर पडणार नाही’ या अत्युच्च निराशेच्या क्षणीदेखील ‘आता आपण असेच दिवस काढत कितीही काळ जगत राहू शकतो’ असे साक्षात्काराचे बिंदू कहाणीतल्या प्रत्येकापुढे चमकलेले दिसतात. स्वतःच्या अस्तित्वासाठी केलेला परिस्थितीचा स्वीकार माणसाला किती चिवट आणि टणक बनवू शकतो, याचं परिमाण प्रत्येकाच्या मनातला हा समान विचार आपल्याला देऊन जातो.
यांतल्या सगळ्याच कहाण्या आणि व्यक्ती विलक्षण आहेत. पण ऍंडीजच्या कहाणीतला नॅंडो, कटाहदिनच्या कहाणीतला डॉन फेंडलर, समुद्रात एक वर्ष काढणारा अल्वरेंगा आणि बर्फाळ बेटावर चिवटपणे राहणारी ऍडा या व्यक्ती मनावर ठसा उमटवतात. आई आणि बहीण यांचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिल्यावर जणू नॅंडो भीतीच्या पलीकडे जातो. वडलांच्या ओढीनं तो इतका व्यापून जातो की, त्याचं शरीर थकतं, पण मन थकत नाही; जगण्याचं भूत त्याला झपाटून टाकतं. त्याच्या मनाची ही ऊर्जाच जणू त्याचे आणि त्याच्या बरोबरच्या सगळ्यांचे प्राण वाचवते.
डॉन फेंडलर हा कोवळा मुलगा या कहाण्यांमधला खरोखरच ‘डॉन’ आहे! इतर सगळ्या कहाण्यांमधल्या संकटात सापडलेल्या व्यक्तींपेक्षा डॉन त्या मानानं शांत असल्याचं आपल्याला त्याची कहाणी वाचताना जाणवतं. ‘लहान मूल जास्त अनभिज्ञ असल्यानं जास्त घाबरणार’ असं सगळ्या मोठ्या माणसांचं समीकरण असतं. या समीकरणाला डॉन सतत धक्के देतो. त्याचं कोवळं मन कुठलाही चष्मा न लावता सगळी परिस्थिती अलगद टिपून घेणारं आहे. अंगभर खाजवून झालेल्या जखमा, रक्तबंबाळ शरीर, जखमांवर बसलेल्या माशा आणि किडे अशी अवस्था असताना डॉनला झाडावर बसून चिवचिवाट करणारा पक्षी दिसतो आणि केवळ तेवढ्या चिवचिवाटानं मरणाच्या दारात असलेली जागाही त्याला सुसह्य वाटते.
हे वाचताना ‘अशी ऊर्जा केवळ कोवळं मनच निर्माण करू शकतं’ असं वाटल्याशिवाय राहत नाही. पाणी प्यायला आलेल्या हरणाला मारून खाण्याचा विचार मनात येण्याऐवजी ते आपल्याला घाबरलं नसल्याचा आनंद, आपल्याला पाहून धडपडून पळणाऱ्या अस्वलाला बघताना जमिनीवर लोळण घेऊन हसणारा डॉन हे केवळ न गढूळलेलं नितळ मनच करू शकतं!
आनंद हा माणसाचा स्थायीभाव असावा, असं या मुलाचा सगळा प्रवास वाचताना पुन्हा पुन्हा वाटत राहतं. संकटात सापडूनही आई-वडलांच्या जिवाला घोर लागू नये म्हणून देवाची प्रार्थना करणारा; अस्वलाला सोबती मानणारा आणि ते गेल्यावर एकटेपणाच्या जाणिवेनं रडणारा, हे डॉनचं सगळं वर्तन आपल्या गुळगुळीत भावना, आपल्या विवेकाच्या आणि आनंदाच्या कल्पना यांना हलवून सोडतं; डंख मारतं. डॉनचा हा प्रवास माणसाच्या भीतीपलीकडच्या सहजप्रवाही मनापर्यंत आपल्याला घेऊन जातो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अल्वरेंगाचा सगळा प्रवास वाचताना, त्याला असलेली समुद्राची नशा आणि त्याचा कलंदरपणा ही वैशिष्ट्यं आपल्याला सतत खुणावत राहतात. स्वतःला आणि आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी तो जे जे प्रयोग करतो, ते त्याच्या या गुणांची साक्ष देणारे आहेत. मग ते कासवाचं रक्त पिणं असो, हातानं मासे पकडणं असो किंवा भासांची दुनिया ठरवून जगणं असो!
या सगळ्या कहाण्यांमधल्या बहुतांश व्यक्तींना एकटेपणानं छळलेलं आहे. अल्वरेंगाही याला अर्थात अपवाद नाहीच, पण या छळाइतकंच तो एकटेपण एन्जॉय करताना दिसतो; एकटेपणाची खुमारी कळवून घेताना दिसतो. अगदी मरायला टेकण्याची सुरुवात होते, तेव्हाही त्याला मरणाबद्दल उत्सुकता वाटते; प्रत्येकाच्या मरणाची सुरुवात अनोखी असण्याचा तो विचार करतो. बाकी जवळपास सगळ्या कहाण्यांमधल्या व्यक्तींना ‘आपला जगण्याचा संघर्ष लोकांना न समजताच आपण मरू’ ही खंत दिसते. अल्वरेंगा मात्र एक वर्ष होडीत जिवंत राहण्याच्या आपल्या कर्तृत्वावर खूश होऊन स्वतःत समाधान पावलेला असतो आणि सुखानं मरायला तयार असतो. त्याचं हे सगळं वर्तन, हा सगळा प्रवास ही त्यामुळेच एका मच्छीमाराची केवळ मृत्यूशी झुंज उरत नाही. तो ज्या प्रकारे हा प्रवास जगतो, ते आपल्याला एका प्रतिभावान मनाचं लक्षण वाटतं. कारण त्याचं हे जगणं, टोचणाऱ्या सर्वसामान्य चौकटींच्या पलीकडचं माणसाचं मनोविश्व आपल्यापुढे खुलं करतं.
अॅडाचा सगळा प्रवास हा एका सहनशील, चिवट, पारंपरिक स्त्रीचा प्रवास आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना तिच्या प्रवासाचे वेगवेगळे स्वर लागलेले जाणवतात. उबग आणणारा शोक, थक्क करणारी कार्यमग्नता, कल्पनातीत सेवाभाव, पुरुषाला लाजवेल असा सणकीपणा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा बाईकडे असलेला अचाट चिवटपणा हे सगळे भाव तीव्र स्वरामध्ये आपण अॅडाचा प्रवास वाचताना सतत अनुभवतो. कदाचित त्यामुळेच या प्रवासाला आपण चटकन प्रतिसाद देऊ शकत नाही; स्तब्ध होतो.
पुस्तकाची एकूण निर्मिती उत्तम झाली आहे. पुस्तकासाठी वापरलेला कागद, छायाचित्रं, इन्ट्रो, मूळ पुस्तकाचे तपशील ही सगळी रचना आटोपशीर आणि प्रभावी झाली आहे. प्रकरणाचं शीर्षक, त्यावरची ठळक व्यक्तिरेखांची नावं, एकीकडे विशेष व्यक्तिरेखेला अधोरेखित करणारी आणि दुसरीकडे मूळ शीर्षकाला वेगळं करणारी सूचक रेष, शीर्षक आणि व्यक्तिरेखा यांच्या नावांची रंगसंगती; त्यांच्याशी मेळ खाणारी इन्ट्रोची रंगसंगती; प्रकरणातलाच अंश न घेता वेगळ्यानं लिहिलेला नेटका, अचूक इन्ट्रो हे सगळे घटक पुस्तकाची परिणामकारकता निश्चित उंचावतात.
छायाचित्रे आणि मजकूर यांचा साधलेला तोलही नजरेला सुखावणारा आहे. कुठेही छायाचित्रांचा अतिरिक्त मारा किंवा गिचमिड नाही. स्वप्नदीप क्रिएटिव्ह्जची मांडणीची सगळी मेहनत निश्चित परिणामकामरक ठरते. बिनीच्या प्रत्येक पानाची एकूणच रचना साचेबद्ध कमी आणि कलात्मक अधिक आहे. त्यामुळे ती डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही. मुखपृष्ठाचा कागदही उत्तम वापरला आहे. पुस्तकाचं शीर्षक सुलेखन करणारे गिरीश सहस्रबुद्धे आशयाची बोच सुलेखनातून नेमकेपणाने पोहोचवतात. सुनील चावट यांचं मुखपृष्ठावर घेतलेलं चित्र पुस्तकाचा आशय गडद करतं. यातल्या तीव्र रंगांच्या घुसळणीचे रौद्र प्रवाह आशयाची मनोभूमिका तयार करतात.
अनुक्रमाची मांडणीदेखील साधी, पण ठसा उमटवणारी आहे. मलपृष्ठावर असलेला पुस्तकाचा ब्लर्ब स्वच्छ, सुटसुटीत आणि वाचकाला पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. मजकूर प्रत्ययकारी करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक कहाणीच्या सुरुवातीला येणारा प्रसंग चालू वर्तमानकाळात घेण्याचा मानस दिसतो. पण सगळीकडे हे सातत्य राखलं न गेल्यानं काळाचा काहीसा गोंधळ झालेला आहे. मात्र मूळ कहाणी पकड घेणारी असल्यानं काळाची ही गडबड फारशी सलत नाही. बाकी पुस्तकाचं संपादन बिनचूक झालं आहे आणि मुद्रितशोधनाच्या चुकाही केवळ टंकांच्या, त्याही नगण्य आहेत. त्यामुळे आशय आणि मांडणी या पातळीवर पुस्तक निश्चित उजवं ठरतं.
मात्र हा एका अर्थी लेखिकेनं मांडलेल्या वेगवेगळ्या कहाण्यांचा सारांश असल्यानं मुळातल्या कहाण्या अधिक थरारक असणार असल्याची जाणीव पुस्तक वाचत असताना सतत होत राहते. त्यामुळे वाचत असलेलं वर्णन थोडं डायल्युटेड वाटतं. तरी कदाचित याचमुळे कहाण्यांची मूळ पुस्तकं खुणावत राहतात. समान धाग्यानं जोडलेल्या अशा पुस्तकांच्या कहाण्यांचा कुतूहल चाळवणारा पट सांगणं हे लेखिका आणि त्याच वेळी संपादिका म्हणून गौरी कानेटकर यांचं यश म्हणावं लागेल. कदाचित म्हणूनच संपृक्त मजकुराची मात्रा चाळवण्यापलीकडे पाल्हाळीक आणि चाळवण्याअलीकडे अळणी झालेली नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या सगळ्या कहाण्यांमधल्या बहुतांश व्यक्ती दीर्घायुषी असल्याचं आपल्या लक्षात येतं. कारण प्रकरण संपता संपता लेखिकेने मूळ पुस्तकाचं छायाचित्र असलेली, त्याबद्दल थोडक्यात सांगणारी आणि या सर्व व्यक्तींची शेवटच्या काळातली छबी दाखवणारी छोटी चौकट टाकली आहे. मृत्यूला शह देणारी ही आगळीवेगळी व्यक्तिमत्त्वं दीर्घायुषी ठरली नसती, तरच नवल!
तुमच्या-आमच्यासारख्या असलेल्या या माणसांमध्ये अटीतटीच्या प्रसंगी इतकी दांडगी जीवनेच्छा कुठून निर्माण झाली असावी? विचार करता करता चमकलं की, जीव धरतानाही बीज कुठल्या ऐऱ्यागैऱ्या शुक्रजंतूशी सम साधत नाही. त्याच्या जहाल तडाख्यातूनही जे शुक्रजंतू टिकून राहतात, त्यांच्यातल्याही एकाशी समेट होऊन जीव धरला जातो. पुढेही अनेक कसोट्यांवर खरा उतरल्यानंतर जीव जन्म घेतो. माणसाच्या जाणिवेत या गोष्टी नसल्या, तरी कदाचित त्याच्या आदिम प्रेरणांमध्ये त्या अजूनही चिवटपणे वाहत असाव्यात आणि आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत त्या माणसाच्या शरीर-मनाचा ताबा घेत असाव्यात. माणसाच्या अस्तित्वाच्या तळाशी खोल दडलेल्या या निसर्गाचं हे विराट दर्शन म्हणूनच अद्भुत आहे!
‘मृत्यू पाहिलेली माणसं’ : गौरी कानेटकर,
समकालीन प्रकाशन, पुणे,
पाने : १४६, मूल्य : २०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5314/Mrutyu-Pahileli-Manase
..................................................................................................................................................................
लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक आहेत.
bhagyashree84@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment