अजूनकाही
जगद्गुरू आदि शंकराचार्य यांची काल (१७ मे २०२१) जयंती होती. त्यानिमित्त त्यांच्याविषयीच्या तीन चरित्रांचा वेध हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
श्रीशंकराचार्य चरित्र - संतकवी दासगणू
संतकवी दासगणू (श्री गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे) यांनी विविध संतांची चरित्रं लिहिली. म्हणून ‘महाराष्ट्र सारस्वता’त त्यांचा उल्लेख ‘आधुनिक महिपती’ असा केला जातो. ‘मनावरील मालिन्य दूर करण्यासाठी संतचरित्र’ या रूपकाला यथार्थ करण्यासाठी ते एका प्रसिद्ध रचनेत – ‘रहम नज़र करो... अपने मशीद का झाडू गणू है’ असे म्हणतात.
‘केवल-अद्वैत’ तत्त्वज्ञानाची विमल पताका भारतवर्षात ज्यांनी उभारली, त्या जगद्गुरू श्रीशंकराचार्यांचे ‘श्रीशंकराचार्य चरित्र’ संतकवी दासगणूंनी मराठीत पद्यरूपाने आणले. ३९ अध्यायांत साधारण ५०० पृष्ठांचे दीर्घ, संशोधित अन् प्रासादिक चरित्र मराठीत दुसरे नाही. या चरित्राला ‘सार्थ ज्ञानेश्वरी’चे संपादक श्री शं. वा. दांडेकरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. “ ‘मणिना वलयं वलयेन मणिः’ या न्यायाने ह. भ. प. दासगणूंची काव्यस्फूर्ती व आचार्यासारख्यांचे चरित्र ही एकमेकांना सुशोभित करण्यासारखीच आहेत, यात शंका नाही”, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. स्वामी वरदानंद भारतींनी ‘हा ग्रंथ भाविकांचा कल्पवृक्ष आहे’, असे म्हटले आहे.
संतकवी दासगणूंसारख्या सिद्धहस्त संत-चरित्रकाराला लौकिक संघर्ष चुकला नाही. या चरित्राचे प्रकाशन करताना अनंत अडचणी आल्या, खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले, पण काही स्नेह्यांच्या मदतीने त्या यथाकाल दूर झाल्या, पण त्याची आठवण ओवीरूपात ‘करा त्याचे प्रकाशन...’ या उपोद्घातात त्यांनी जागवली आहे, हा संघर्ष मात्र शब्दांतून अनुभवताना डोळ्यात असावं उभी राहतात.
श्री शंकराचार्य यांनी ज्या काळात प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती, निसर्ग आपले रम्य व रौद्र रूप मार्गात सगळीकडे दाखवत होता, त्या काळात केरळ ते काश्मीर असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान ठिकठिकाणच्या विद्वानांना वादविवादात पराभूत करून ‘केवल-अद्वैत’ या वैदिक मताची प्रस्थापना केली. लोकांच्या मनांत मूळ तत्त्वज्ञानाविषयी विश्वास निर्माण केला, तसेच ज्याचे जे आराध्य दैवत ते मध्यभागी ठेवून इतर देवता भोवताली पूजेत ठेवणारी ‘पंचायतन’ पूजेची शक्यता पटवून दिली. ही लवचीकता स्वतः आचार्यांनी हिंदू धर्मातील लोक एकमेकांविरुद्ध दिशेला वळू नयेत म्हणून रुजवली.
या चरित्रग्रंथात जैन आणि बौद्ध धर्माचा इतिहास विस्तृत रूपात आला आहे, नंतर कुमारिलभट्टांचे चरित्र आहे, मंडणमिश्र-सरस्वती विवाह, शंकराचार्य जन्म, त्यांनी रचलेले लक्ष्मीस्तवन, आचार्यांची महती, नक्र प्रकरण, संन्यासग्रहण, भगवान शंकराने केलेला उपदेश, मंडणमिश्र व सरस्वतीस वादविवादात जिंकणे, शिष्य संपादन, सर्वज्ञ पीठावर आरोहण आहे. पुढे त्यांनी भारतात चार वेदरूपी मठांची/ पीठांची स्थापना केली आणि त्याची महती उत्तरोत्तर वाढवण्याची जबाबदारी विद्वान शिष्यांकडे सोपवली, यासंबंधी खालील माहिती या चरित्रात विस्तृत रूपात उपलब्ध आहे.
शृंगेरी मठ - श्री मंडणमिश्र किंवा सुरेश्वराचार्य- ‘अहं ब्रह्मास्मि’ हे ब्रीद, कृष्ण-यजुर्वेद हा उपासनाग्रंथ.
ज्योतिर्मठ - श्री तोटकाचार्य – ‘अयमात्मा’ हे ब्रीद, ‘आथर्वण वेद’ हा उपासनाग्रंथ.
द्वारका किंवा शारदा पीठ - श्री हस्तामलक – ‘तत्त्वमसि’ हे ब्रीद, ‘सामवेद’ हा उपासनाग्रंथ.
गोवर्धन पीठ- श्री पद्मपाद – ‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे ब्रीद, ‘ऋग्वेद’ हा उपासनाग्रंथ.
याचबरोबर श्री दासगणूंनी श्री रामानुजाचार्यांचे ‘विशिष्टाद्वैत’, श्री निंबार्काचार्यांचे ‘द्वैताद्वैत’, श्री मध्वाचार्यांचे ‘द्वैत’, श्री वल्लभाचार्यांचे ‘शुद्धाद्वैत’ याविषयी आणि चार्वाक तत्वज्ञानाविषयी, तसेच कांची कामकोटीच्या पाचव्या मठाविषयी सविस्तर चर्चा केली आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जगद्गुरू आदि शंकराचार्य (हिंदी) - श्री शशि तिवारी
साहित्य अकादमी, दिल्लीने श्री शशि तिवारी यांनी लिहिलेले एक छोटे ७० पानी हिंदी चरित्र प्रकाशित केले आहे. ते संक्षिप्त असले तरी माहितीपूर्ण आहे. ज्यांना थोडक्यात आदि शंकराचार्यांचे कार्य समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. यात वरील सर्व विषय, घटना अगदी थोडक्यात मांडल्या आहेत. शिवाय शंकराचार्यांच्या साहित्यविषयक कर्तृत्वाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे -
“शंकराचार्य का कृतित्व विशाल है। उन्होंने लगभग २०० रचनाओं का लेखन विशद संस्कृत भाषा में किया था, जिन में ‘प्रस्थानत्रयी-ब्रह्मसूत्र’, ‘उपनिषद्’ और ‘गीता’ के सुप्रसिद्ध भाष्य, गणेश, देवी, शिव, विष्णु आदि अनेक देवताओं के भावपूर्ण स्तोत्र - काव्य; और अद्वैतवेदांत के सिद्धातों के प्रतिपादक कई महत्त्वपूर्ण ग्रंथ आते हैं। उनका गद्य जितना धाराप्रवाह है, पद्य उतना ही सरल और सुललित है। आचार्य शंकर सभी शास्त्रों के ज्ञाता थे, पर उनका मुख्य प्रतिपाद्य विषय वैदिक अद्वैतवेदांत था। यह कोई नया सिद्धांत नहीं था। उन्होंने वेद में बिखरे विचारों को सुव्यवस्थित कर प्रामाणिक रूप से प्रस्तुत किया और लोगों के लिए अद्वैतमार्ग के पथप्रदर्शक बने। धर्म के विकृत स्वरूप के परिमार्जन का महत्त्वपूर्ण कार्य भी इसमें सहायक बना। ‘नेति नेति’ के सिद्धांत का अनुसरण कर आचार्यने नित्य, शुद्ध, व्यापक आत्मा का ‘शिवोऽहम्’ रूप में जो वर्णन प्रस्तुत किया वह स्मरणीय बन गया-
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः ।
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥"
(या ‘निर्वाषटकम्’च्या मराठीतील अर्थ-निष्पत्तीसाठी पुढील लिंक पाहावी-
https://www.facebook.com/yogesh.kate.963/videos/3796123450467349/)
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
जगद्गुरू श्रीशंकराचार्य (हिंदी) - पं. दीनदयाल उपाध्याय
आदि शंकराचार्यांच्या समाज-धर्म कार्याभोवती; ग्रंथ-रचना कर्तृत्वाभोवती तेजोवलय आहे, हे निःसंशय. त्यामुळे भारतभूच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या इतिहासाला त्यांच्या योगदानाची दखल घ्यावीच लागते. ‘प्रभात’ प्रकाशनाचे पं. दीनदयाल उपाध्याय लिखित ‘जगद्गुरु श्रीशंकराचार्य’ हे हिंदी चरित्र यावर प्रकाश टाकते. पं. दीनदयालजींच्या चरित्र लिखाणाची प्रेरणा तरुणांना आचार्यांच्या अद्भुत जीवनप्रवासाची माहिती करून देणे, ही होती. त्यात त्यांनी आचार्यांच्या पुढील रचनांचा उल्लेख केला आहे- ‘बालबोध संग्रह’, ‘नर्मदाष्टक’, ‘षोडश भाष्य’, ‘धन्याष्टक’, ‘मनीष्पञ्चक’, ‘गङ्गास्तोत्र’, ‘मातृस्तुति’, ‘तत्त्वबोध’, ‘कृष्णाष्टक’.
शिवगुरू आणि आर्यम्बा यांचा मुलगा शंकर. त्यांचे गुरू गोविंदपाद, त्यांचे गुरू गौडपाद (ज्यांनी ‘मांडूक्य-कारिका’ लिहिल्या), त्यांचे गुरू शुकदेव, त्यांचे बादरायण व्यास अशी वेदांत-दर्शन परंपरा यात विशद केली आहे. सोबतच कणाद-वैशेषिक, गौतम-न्याय, कपिल-सांख्य, जैन-अर्हत्, बौद्ध-तथागत, चार्वाक-लोकायत, पतंजली-योग, जैमिनी-मीमांसा या दर्शनांवरही प्रकाश टाकला आहे. आचार्यांच्या प्रवासमार्गासंबंधी विवेचन आहे- वाराणसी, प्रयाग (इलाहाबाद), मिथिला (मगध), तक्षशीला, प्राग्ज्योतिष, केदारनाथ, बदरिकाश्रम, काश्मीर.
शशि तिवारींच्या चरित्रापेक्षा पंडितजींचे १११ पानांचे चरित्र-लेखन अधिक माहितीपूर्ण आहे, हे निःसंशय. याखेरीज ‘श्री आदिशंकराचार्य’ नावाचा संस्कृत चित्रपट आपण अधिक माहितीसाठी यू-ट्यूबवर पाहू शकता -
आजही आपण भारतभरात पदयात्रेचा इतिहास जिवंत करणारी शंकराचार्यांची आणि त्यांनी ज्यांचा जीर्णोद्धार केला आहे, अशी मंदिरं पाहू शकतो. त्यांचे जन्मस्थान कालटी येथील मंदिर कोचीनपासून अगदी जवळ आहे. ज्या वडाच्या प्राचीन झाडाखाली श्रीकृष्णाने विषादाने ग्रासलेल्या अर्जुनाला गीतोपदेश गेला, ते ठिकाण, कुरुक्षेत्रावर ‘ज्योतिसर’ (‘ज्ञानसरिता’ या अर्थाने) नावाने प्रसिद्ध आहे. वडाच्या झाडाचे आयुष्मान काढणे कठीण, पण आदि शंकराचार्यांनी ही जागा शोधून काढली. या ठिकाणाचा जीर्णोद्धार केला. इथे त्यांचे अगदी छोटे मंदिर आहे.
श्रीनगर या नावाची उत्पत्ती लक्ष्मीचे (श्री) नगर अशी आहे, हे आपल्याला माहिती असते. आज या शहरात उंच डोंगरावर आदि शंकराचार्यांचे साधना स्थळ आहे आणि अष्टकोनी आकारातील दगडाचे भक्कम शिव मंदिर आहे. ‘दल लेक’मधून विहार करताना ते दिसते. देवी सरस्वतीला आपण ‘काश्मीरपूरवासिनी’ किंवा ‘काश्मीरी’ म्हणतो. तिचे सर्वज्ञपीठ काश्मीरमध्ये आहे, अशी धारणा असल्यामुळे त्या पीठावर आरोहण करण्यासाठी त्यांनी हा अवघड प्रवास केला होता. या मंदिराचे दगडी बांधकाम डोळ्यात भरण्यासारखे आहे, तसेच श्री आदि शंकराचार्यांची कालटी ते श्रीनगरपर्यंत वाहतुकीची साधने नसताना प्रवास करण्यामागची असामान्य जिज्ञासा व विजिगीषा वृत्तीही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आदि शंकराचार्यांच्या जन्माबाबात इसवी सनाचे आठवे शतक की इसवीपू चवथे शतक असा विवाद असला तरी त्यांच्या योगदानाच्या मूलगामी व दूरगामी कार्याबद्दल विवाद नाही. या चरित्रांत लेखकाच्या दृष्टीने काही अवघड जागा येतात, जसे नक्र प्रकरण, नर्मदेचा प्रवाह कालटी येथे वळवणे, कुमारिलभट्ट यांची उडी, सरस्वती संवादात परकायाप्रवेश इ. पंडितजींनी अशा जागांना ‘किंवदंती’ म्हणून सोडून दिले, पण श्रीदासगणूंनी त्यांचा ‘सत्पुरुषांचे चमत्कार’ म्हणून भक्तीने स्वीकार केला आहे.
आपण आज प्राचीन मंदिरं पाहतो उदा. वेरूळच्या लेण्या, ते काळाच्या गर्भात लोपलेले स्थापत्य आता आपण पुनःनिर्मित करू शकतो का? नाही. त्यामुळे कालव्यापनासोबत माणसाने प्रगती केली, हा अहंकार आपण सोडला पाहिजे. भगवद्भक्तांना अहंकार नसतो, म्हणून राजकीयदृष्ट्या सोयीची विधाने केली पाहिजेत, असे बंधनही नसते. म्हणून मराठी चरित्रातील सगळेच प्रसंग संत दासगणूंनी प्रत्ययकारी बनवले आहेत. त्यामुळे ज्यांना विवेक जागृत ठेवून सविस्तर वाचन सम्यक दृष्टीने करायचे आहे, त्यांच्यासाठी मराठी चरित्र वरील दोन हिंदी चरित्रांपेक्षा अधिक उपयुक्त ठरावे.
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment