२०२१ सालचे एप्रिल आणि मे हे महिने भारताला फार कठीण गेले. करोना या व्हायरसने भारतात फार मोठा धुमाकूळ घातला. रोजच्या चार-चार लाख केसेस या काळात येत होत्या. रोज चार हजाराच्या आसपास लोक दगावत होते. रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची फार मोठी कमतरता या काळात जाणवली. रेमडेसिव्हिर हे औषधही कित्येक रुग्णांना मिळत नव्हते. कित्येक लोक ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मरण पावले. कित्येक लोक रेमडेसिव्हिर न मिळाल्यामुळे मरण पावले. हॉस्पिटले संपूर्ण भरल्यामुळे कित्येक रुग्णांना बेड मिळेनासे झाले. त्यामुळे कित्येक रुग्णांनी उपचारांविना हॉस्पिटलांच्या आवारात प्राण सोडले. कित्येकांनी आपल्या घरातच आपल्या प्रियजनांच्या समोर प्राण सोडले.
उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात करोनाने ग्रामीण भागात कहर केला. ग्रामीण भागात कित्येक मैलपर्यंत आरोग्य सुविधा त्या काळी उपलब्ध नव्हती. आज या गोष्टीचे आश्चर्य वाटेल. आज भारतात कुठल्याही रुग्णाला हेलीकॉप्टर किंवा इमर्जन्सी ड्रोनद्वारे काही मिनिटात अत्याधुनिक हॉस्पिटलात पोहोचता येते. नाहीतर रोबो डॉक्टर आणि नर्सेस काही मिनिटात रुग्णापर्यंत पोहोचवल्या जातात. २०२१मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘सुपरपॉवर’ होत आहे, अशी भाषा करत होते. त्यातल्या कुणाचेही लक्ष ग्रामीण भागातील दारुण स्थितीत असलेल्या आरोग्यसुविधांकडे नव्हते, या गोष्टीचे आज २१२१ साली आश्चर्य वाटते.
ग्रामीण भागात लोकांना फळबागांमध्ये झाडांखाली पुठ्ठ्यावर झोपवून उपचार करण्याची पाळी आली, हे वाचून इतके का मानवी आयुष्य त्या काळी स्वस्त होते, असा विचार आजच्या २१२१मधील वाचकाच्या मनात आल्यावाचून राहणार नाही. त्या काळात उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात झाडांच्या फांद्यांना सलाइने बांधली गेली होती. आजच्या वाचकाचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. अनेक लोकांनी रोग झाला, म्हणून स्वतःला शेतात किंवा रानात ‘क्वारंटाईन’ केले. कारण त्यांच्या स्वतःच्या गावातून त्यांना रोगाच्या भीतीमुळे हाकलून दिले गेले होते. हे लोक तडक हॉस्पिटलमध्ये गेले नाहीत, कारण हॉस्पिटलांमधल्या अव्यवस्थेची त्यांना भीती वाटत होती. जे आपोआप बरे झाले ते बरे झाले. बाकीचे आपल्या शेतात म्हणा, रानात म्हणा आपले प्राण त्यागते झाले. कित्येकदा सकाळी उठल्यावरच त्यांची प्रेते त्यांच्या नातेवाईकांना मिळाली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
स्मशाने पुरी पडेनात. दहनासाठी लाकडे मिळेनात. मिळाली तर परवडेनात. दहनासाठी लागणारा चार-पाच हजाराचा खर्च लाकूड टंचाईमुळे सुमारे दहा हजारांवर गेला. त्यामुळे आपल्या प्रियजनांचे देह लोक गंगेत किंवा यमुनेत सोडू लागले. चाळीस रुपये दिवस एवढा त्या काळी रोजंदारीचा दर होता. रोज चाळीस-पन्नास रुपये मिळवणारी गरीब जनता दहनासाठी इतका पैसा कुठून आणणार? उत्तर प्रदेशातून गंगा नदी ११४० किलोमीटरचा प्रवास करते. या गंगेच्या अकराशे किलोमीटरच्या प्रवाहात किमान दोन हजार प्रेते वाहिल्याच्या बातम्या त्या काळी आल्या. फुगलेली प्रेते खालच्या बाजूला तीरावर येऊन सडू लागली. भारतभर नव्हे जगभर ते फोटो प्रसिद्ध झाले. आपल्या प्रियजनाचा देह व्यवस्थित दहन करता आला नाही, म्हणून पाण्यात सोडताना लोकांना किती वेदना झाल्या असतील, याची तत्कालीन भारतात कुणालाही कसलीही पर्वा होती असे दिसत नव्हते.
या मन विषण्ण करणाऱ्या पार्श्वभूमीवर तत्कालीन भारतात राजकीय चर्चा बहरात आल्या होत्या. त्यात अनवधानाने विनोदसुद्धा घडत होते. भारताची संवेदना जणू काही बधीर झाली होती. राजकीय युद्धातील दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर तूटून पडत होते.
हे सर्व वाचायला आणि ऐकायला आज जड वाटते आहे. लाखो मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या या बखरीत एक ‘डार्क ह्यूमर’ भरून राहिला आहे, हे आजच्या वाचकाला निश्चितच जाणवेल.
ही बखर लिहिण्याची लेखक शिरोजीची इच्छा नसावी. या काळ्या काळात कसली चर्चा करायची आणि कसले लिखाण करायचे, अशी त्याची भूमिका होती. ती या बखरीमध्ये भास्कर या पात्राच्या तोंडी काही शब्द घालून शिरोजीने वदवली आहे. परंतु भास्कर जसा चर्चेत ओढला गेला, तसाच शिरोजीसुद्धा या बखरीच्या लिखाणात ओढला गेला असावा. शेवटी आपल्याला जे वाटते ते योग्य वेळी सांगितले गेले पाहिजे, अशा मताचे भास्कर आणि शिरोजी असे दोघेही असावेत, असे अनुमान काढण्यास जागा आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
२०२१च्या एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना-१९ या व्हायरसने कहर केला. किती लोक गेले त्याला गणना नाही. देशातील सगळीच सरकारे मृत्यू पडलेल्यांची संख्या लपवण्यामध्ये या काळामध्ये व्यस्त होती. काही लोक म्हणत होते, मरणाऱ्या लोकांची संख्या सरकारी आकड्यांच्या किमान दुप्पट असावी. काही म्हणाले तिप्पट असावी. काही म्हणाले पाचपट असावी. तवलीन सिंग नावाच्या ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राच्या एक प्रसिद्ध स्तंभलेखिका होत्या. त्यांनी तर लिहिले की काही परदेशी तज्ज्ञांच्या मते ही संख्या किमान वीसपट तरी असावी. या संख्येवरून विविध वृत्तपत्रे आणि राज्ये यांच्यात खडाजंगी जुंपली.
(आज शंभर वर्षे झाली तरी कोविड-१९ने भारतामध्ये दगावलेल्या लोकांचा आकडा नक्की होता, हे कळलेले नाही. परंतु विविध राज्य सरकारे आणि केंद्र सरकार सांगत होते, तितका तो कमी नव्हता एवढे मात्र नक्की - संपादक)
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मे महिन्यात एके दिवशी अचानक गंगा आणि यमुना या नद्यांमध्ये कोविड रुग्णांची प्रेते वाहवली गेल्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांमधून यायला लागल्या. त्याबरोबर पंतप्रधान मोदी यांचे समर्थक अच्युत आणि अविनाश यांच्या रागाचा पारा चढला. त्याचबरोबर मोदीजी यांचा विरोधक समर याच्याही रागाचा पारा चढला.
हे असले फोटो दाखवले गेले म्हणून अच्युत आणि अविनाश रागावले होते. मोदीजींच्या रामराज्याची अशी बदनामी झाल्यामुळे ते संतापले होते. आपल्याच देशाला असे बदनाम कशाला करायचे?
मीडियाने पुरेशी चित्रे दाखवली नाहीत म्हणून समर चिडला होता. यू-ट्यूबवरील अनेक रिपोर्ट त्याने बघितले होते, ते सगळेच्या सगळे वृत्तवाहिन्यांनी दाखवले पाहिजेत, असे त्याचे म्हणणे होते. केंद्रामध्ये आणि उत्तर प्रदेशात बीजेपीची सरकारे होती. बिहारमध्येसुद्धा बीजेपीप्रणित सरकार होते. बीजेपीच्या समर्थकांना लपायला कुठे जागा नव्हती.
महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या लाटेने कहर उडवला तेव्हा अच्युत आणि अविनाशने महाराष्ट्र सरकारवर भयंकर टीका केली होती. कारण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांचे सरकार होते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रोगाचा उद्रेक झाल्यावर तुम्ही आता कोणावर टीका करणार, असे समरने त्यांना विचारले. त्यावर ते दोघेही जोरात हसले. अच्युत म्हणाला, ‘उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अतिशय चांगलं काम चालू आहे त्यामुळे रोग नियंत्रणात आहे.’
समरने त्यावर त्यांना महाराष्ट्राच्या वृत्तपत्रात आलेले उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये पसरलेल्या साथीचे रिपोर्ट दाखवले.
अविनाश म्हणाला, ‘यांना इथं महाराष्ट्रात बसून काय कळतंय? काहीतरी थापा मारायच्या!’
त्यावर समरने उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या ‘अमर उजाला’, दैनिक ‘भास्कर’ आणि दैनिक ‘जागरण’ या वृत्तपत्रांच्या साईट उघडून दाखवाल्या.
त्यावर अच्युत म्हणाला, ‘ही सगळी देश विरोधी वृत्तपत्र आहेत, त्यांचं काय ऐकायचं?’
त्यावर समरने ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘द टाईम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द ऑस्ट्रेलियन’, ‘द सिंगापूर टाईम्स’ या जगभर प्रतिष्ठा पावलेल्या वृत्तपत्रातील बातम्या दाखवल्या.
ते बघून अविनाश म्हणाला – ‘हा भारताला बदनाम करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे. त्यांना मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली भारताने केलेली प्रगती सहन होत नाहिये.’
अच्युत म्हणाला, ‘यातले बहुतेक लेख गिधाडी प्रवृत्तीच्या पत्रकारांनी लिहिलेले आहेत.’
समरने विचारले, ‘कसली गिधाडी प्रवृत्ती?’
अच्युत म्हणाला, ‘प्रेतांच्या बातम्या देऊन पैसे मिळवण्याची वृत्ती. कशाला द्यायच्या प्रेतांच्या बातम्या?’
हे ऐकून समर गार पडला. भास्कर हा सगळा प्रकार सिगरेट ओढत शांतपणे ऐकत बसला होता.
समर कसंबसं म्हणाला – ‘मग सुरुवातीला महाराष्ट्रातील वाईट बातम्या तुम्ही कीती आनंदाने ऐकत होता?’
अच्युत म्हणाला – ‘हे बघ महाराष्ट्रात सरकारच्या नाकर्तेपणा मुळे रोग पसरला तर बातम्या द्यायला नको का?’
समर म्हणाला – ‘मग उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कार्यक्षमतेमुळं रोग पसरतो आहे का?’
अविनाश – ‘हे बघ, सरकारे त्यांना करता येईल तेवढं मनापासून करत आहेत. किती मोठी राज्ये आहेत ही!’
हे ऐकून समर हसायला लागला.
अच्युत त्याला म्हणाला – ‘आम्ही तुला समर्पक उत्तर दिले आहे. तरीही तू का हसतो आहेस?’
यावर इतका वेळ शांत बसलेल्या भास्करलासुद्धा हसू आलं.
दोघांना हसताना बघून अविनाश खूप चिडला. म्हणाला, ‘तुम्ही निर्लज्ज आहात. उत्तर प्रदेश आणि बिहार किती मागास राज्ये आहेत हे माहीत आहे का?’
भास्कर म्हणाला, ‘मोदीजी आल्यावर सगळा भारत प्रगती करणार होता वेगाने. मग उत्तर प्रदेश आणि बिहारामध्ये नक्की कुठे घोडे अडले?’
समर - ‘खरं तर सगळ्या भारताचेच कुठे घोडे अडले?’
अच्युत - ‘हे बघ भारताने प्रगती केलेली आहे.’
भास्कर – ‘रघुराम राजन २०१५ पासून सांगत होते की अर्थ व्यवस्था थंडावते आहे. नोटबंदी करू नका. नोटबंदी करून अजून प्रॉब्लेम वाढतील. त्यात आता हा करोनाचा प्रॉब्लेम आला आहे.’
(रघुराम राजन हे त्या काळातील जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. २००८ साली झालेला जगभरातील ‘इकॉनॉमिक मेल्ट-डाऊन’ त्यांनी ‘प्रेडिक्ट’ केला होता. त्यामुळेच ते जगप्रसिद्ध झाले होते. - संपादक)
अविनाश – ‘त्या रघुराम राजनला काय कळतंय? फक्त २००८ सालचा ‘मेल्ट-डाऊन प्रेडिक्ट’ केला म्हणजे तू लगेच मोठा झालास का?’
भास्कर – ‘अरे, गंमत वाटली का तुला ती?’
अविनाश – ‘जोसेफ स्टिग्लिट्झ सारखं काही महान केलं आहे का तुझ्या त्या टुकार राजनने?’
(जोसेफ स्टिग्लिट्झ हे विसाव्या आणि एकविसाव्या शतकातले मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. २००१ सालचं अर्थशास्त्रासाठी दिलं जाणारं नोबेल मेमोरियल पारितोषिक त्यांना दिले गेले होते. त्यांची ‘रिस्क अॅव्हर्जन थिअरी’ आज सव्वाशे वर्षे झाली तरी अभ्यासली जाते. - संपादक)
समर – ‘जोसेफ स्टिग्लिट्झसुद्धा म्हणाले आहेत की, भारतामध्ये धार्मिक विभाजनाचं राजकारण करून मोदींनी मोठी चूक केली आहे म्हणून.’
भास्कर – ‘राजकारण आणि अर्थकारण कसे करू नये याचा धडा मोदींनी जगासमोर ठेवला आहे, असं म्हणाले आहेत तुझे लाडके जोसेफ स्टिग्लिट्झ.’
अविनाश – ‘खोटं आहे हे.’
यावर समरने अविनाशला मोबाईलवर नेट उघडून ती बातमी दाखवली.
अविनाश – ‘च्यायला खरंच की!’
समर – ‘शिवाय मोदींनी करोना आल्यावर पहिला कडक लॉकडाऊन लावला तेसुद्धा चुकीचं होतं असं म्हणाले आहेत बघ तुझे स्टिग्लिट्झ. भारतासारख्या गरीब देशाने कडक लॉकडाऊन लावताना खूप विचार करायला पाहिजे होता असं म्हणतायत ते.’
अविनाश – ‘मला वाटलं नव्हतं इतका बकवास असेल हा स्टिग्लिट्झ.’
अच्युत – ‘त्या स्टिग्लिट्झला काय कळतंय?’
अविनाश – ‘आणि भारत हा गरीब देश नाहिये. ‘सुपर-पॉवर’ होतोय आपला देश.’
समर – ‘मग पहिल्या लॉकडाऊन नंतर जे लोक रोजगार संपला म्हणून हजारो मैल आपल्या गावी चालत गेले, ते सगळे श्रीमंत लोक होते का भारत नावाच्या ‘सुपर-पॉवर’मधले? का आज गंगेत श्रीमंत लोक मृतदेह सोडत आहेत?’
अच्युत – ‘मोदीजी चिडले तर सगळं अर्थशास्त्र शिकवतील जगतल्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांना.’
भास्कर – ‘एकदा खरंच शिकवायला सांग त्यांना.’
समर – ‘स्टिग्लिट्झलासुद्धा बोलवा म्हणावे. नोबेल मिळाले आहे त्याला.’
अच्युत – ‘नोबेलचं कौतुक नको सांगूस. चार पैसे फेकले की मिळतं नोबेल.’
अविनाश – ‘त्या अमर्त्य सेनला नाही का मिळालं?’
अच्युत – ‘आणि त्या अभिजीत बॅनर्जीला. फालतू माणूस.’
अविनाश – ‘मोदी हेटर्स!’
समर – ‘सगळे हुशार लोक मोदीजींवर टीका का करत असतील रे? कधी विचार केला आहेस का?’
यावर अच्युत आणि अविनाश जोरात हसले. त्या दोघांच्या हसण्याने समर तर गोंधळलाच, पण भास्करसुद्धा गोंधळला.
अच्युत – ‘हे हुशार नाहियेत. हे ‘मोदी-हेटर्स’ आहेत म्हणून दिलं गेलं आहे त्यांना नोबेल. सगळ्या मोदी हेटर्स ना मुद्दाम नोबेल दिले जाते.’
समर – ‘का?’
अविनाश – ‘मोदींच्या नेतृत्वाखालच्या भारताची भीती वाटते त्यांना.’
समर – ‘स्टिग्लिट्झना २००१ ला नोबेल दिले गेले आहे. अमर्त्य सेन यांना १९९८ साली. तेव्हा मोदी सत्तेत सुद्धा नव्हते.’
अच्युत – ‘या दोघांना मोदींवर टीका करण्यासाठी नंतर पैसे दिले गेले.’
अविनाश – ‘नोबेल प्राईझ जेन्युइन असते, तर आत्तापर्यंत मोदीजींना पाच सहा तरी नोबेल मिळाली असती.’
यावर समरला इतके हसू आले की, तो कट्ट्या वरून खाली पडला. भास्करलाही हसू आले. सिगरेटचा धूर छातीत असताना त्याला भक्कन हसू आल्याने त्याला प्रचंड ठसका लागला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले.
मोदीजींना पाच सहा नोबेल मिळायला पाहिजे होती, हे ऐकून अच्युत भक्त असला तरी थोडा नरमला. म्हणाला पाच-सहा नाही, पण दोन तरी द्यायला पाहिजे होती. एक शांततेचं आणि दुसरं पोलिटिकल सायन्सचं. कारण पोलिटिकल सायन्स हा मोदीजींचा विषय आहे.
आतापर्यंत भास्कर सावरला होता. त्याने दुसरा झुरकाही घेतला होता. मोदीजींना पोलिटिकल सायन्स मधलं नोबेल द्यायला पाहिजे होतं हे ऐकून तो दुसरा झुरकासुद्धा भास्करच्या छातीत अडकला. त्याचा जीव कासावीस झाला. समर कट्ट्यावर पुन्हा बसला होता तो पुन्हा खाली पडला.
खाली पडल्या पडल्या समर हसत राहिला आणि म्हणाला – ‘अरे, पोलिटिकल सायन्स साठी देत नाहीत रे नोबेल कुणाला.’
अच्युत म्हणाला – ‘मग मोदीजींपासून सुरुवात करा ते द्यायला.’
हे ऐकून दोघे गार झाले. यावर काय बोलावे हे त्यांना सुचेना. थोड्या वेळाने भास्कर म्हणाला, ‘अरे भारत देशात लोक मरत आहेत आणि आपण या कसल्या चर्चा करत आहोत?’
यानंतर थोडी शांतता तयार झाली, तरी सुद्धा समर आणि भास्करला अधूनमधून परत परत हसू येत होते.
हे दोघे का हसत आहेत हे अच्युत आणि अविनाशला कळेना.
थोड्या वेळाने अच्युत म्हणाला की, व्हॅक्सिनवरचे ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स’ रदद् केले आहेत अमेरिकेने. आता जगात कोणीही कुठलीही लस बनवू शकणार आहे. मोदीजींनी अमेरिकेवर प्रेशर टाकून अमेरिकेला मानवी दृष्टिकोनातून हे राईट्स रद्द करायला लावले. मोदी है तो मुमकिन है!
त्यावर समर म्हणाला, ‘राईट्स रद्द झाले पण लसीचे तंत्रज्ञान नको का मिळायला?’
अच्युत म्हणाला – ‘म्हणजे?’
त्यावर समर म्हणाला, ‘समज माझ्या नाटकावरचे माझे हक्क रद्द झाले आहेत अशी घोषणा सरकारने केली. पण, तेवढ्याने तुला माझे नाटक करता येईल का? मी माझ्या नाटकाचे स्क्रिप्ट तुला द्यायला नको का? लस करण्याचे हक्क मिळाले. पण ‘मॉडेर्ना’ किंवा ‘फायझर’सारख्या कंपन्यांनी तंत्रज्ञान नको का द्यायला”
अविनाश म्हणाला, ‘इतकी साधी गोष्ट नसणार. मोदीजींनी केले म्हणजे ते बरोबरच असणार.’
भास्कर – ‘अरे, हक्क मोकळे झाले म्हणजे त्या कंपन्या तुम्हाला लस तयार करायचे टेक्निक देणार नाहीत. जर्मनीच्या अध्यक्षा अँगेला मेर्केल बाईसुद्धा तेच म्हणाल्या.’
अच्युत – ‘त्या जाडीला काय कळतंय?’
समर – ‘आणि इटलीचे अध्यक्ष मारियो द्राघीसुद्धा तेच म्हणाले.’
अच्युत – ‘त्या लांब नाकाच्याला काय कळतंय?’
अविनाश – ‘त्याला म्हणावं तुझ्या देशाचं बघ पहिल्यांदा. तुझ्या देशात माणसं मरतायत ते बघ आणि मग मोदीजींना शिकवायला ये.’
समर – ‘अरे, ऐन वेळी साधा ऑक्सिजन नाही पुरवता येत माणसाला पटकन, लस कशी तयार होणार ऐन वेळी?’
अच्युत – ‘ऑक्सिजन मिळतो आहे सगळ्यांना. इंटरनॅशनल मीडियामध्ये पण आलंय हे.’
अच्युतने आपला फोन काढला आणि एक मेसेज समराला फॉरवर्ड केला. बघ हे ‘ऑस्ट्रेलिया टुडे’नं मान्य केलं आहे की, भारतात भरपूर ऑक्सिजन उपलब्ध आहे.
भास्कर – ‘वाचला आहे हा मेसेज मी. ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ हे लंगोटी वेब पोर्टल दोन मोदीभक्तांनी सुरू केलं आहे. त्याला कसं ‘इंटरनॅशनल मीडिया’ म्हणता येईल?
अच्युत – ‘ऑस्ट्रेलियात आहे हे पोर्टल म्हणजे तो ‘इंटरनॅशनल मीडिया’च झाला.
अविनाश एक मेसेज पाठवत म्हणाला- हा बघ ‘डेली गार्डियन’चा रिपोर्ट.
समर – ‘अरे, हेसुद्धा फेक वर्तमानपत्र आहे. मी सर्च केलं आहे. यूपीमधलं आहे हे वर्तमानपत्र. लंडनचं ‘द गार्डियन’ आहे, असं भासवलं आहे.
अविनाश – ‘काही का असेना. सत्य बोलत आहे ते. आणि इंटरनॅशनली वाचलं जातं आहे, ते म्हणजे हे सुद्धा ‘इंटरनॅशनल मीडिया’चा भाग झालं.
समर – ‘अरे, मघाशी तुम्ही ‘न्यू यॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या मान्यता प्राप्त वृत्तपत्रांनाही मानत नव्हता आणि आता ही तोतया वृत्तपत्र काय नाचवता आहात आमच्या समोर?’
अविनाश – ‘ ‘न्यू यॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ही भारतविरोधी आहेत.’
समर – ‘कशावरून?’
अच्युत – ‘ते भारतविरोधी’ नसते तर त्यांनी मोदींविरुद्ध कशाला लिहिलं असतं”
समर – ‘असं कसं म्हणता येईल? भारत आणि मोदीजी एक आहेत का?’
अच्युत – ‘नाही. मोदीजी भारतापेक्षा मोठे आहेत. भारताला मोदीजींची गरज आहे. मोदीजींना भारताची गरज नाहिये.’
भास्कर - (हसत) ‘हे बघ बायोकॉन कंपनीच्या किरण मुजुमदार शॉ यांनीसुद्धा ट्वीट केले आहे की, भारतामध्ये ऑक्सिजन वितरण पारदर्शक पद्धतीने होत नाहिये म्हणून.’
अविनाश – ‘तिला काय येतंय? मूर्ख बाई आहे ती.’
भास्कर – ‘आता हीसुद्धा मूर्ख का?’
समर – ‘अरे, सुप्रीम कोर्टाने स्वतःची कमिटी नेमली आहे बारा लोकांची ऑक्सिजन वितरण करण्यासाठी. केंद्र सरकारकडून ऑक्सिजन वितरण काढून घेतलं आहे सुप्रीम कोर्टानं.’
अच्युत – ‘सुप्रीम कोर्टाला काय येतंय?’
अविनाश – ‘सगळे वशिल्यानं बसले आहेत तिथं.’
भास्कर – ‘भारतातली सगळी वर्तमानपत्र बकवास. ‘इंटरनॅशनल मीडिया’ बकवास. रघुराम राजन आणि स्टिग्लिट्झ बकवास. मेर्केल बाई आणि मारियो द्राघी बकवास. जगातले सगळे बुद्धिवंत बकवास. किरण मुजुमदार शॉसारखी कर्तृत्ववान बाई बकवास आणि आता साक्षात आपले सुप्रीम कोर्टसुद्धा बकवास! तुम्ही सोडून बाकी सगळेच मूर्ख आहेत का?’
अविनाश - (अत्यंत गंभीर पणे) ‘हो!!!’
यावर अच्युतने अविनाशला टाळी दिली.
अच्युत, समर आणि भास्करकडे वळला आणि म्हणाला – ‘जो जो मोदीजींचे चुकले असे म्हणेल तो मूर्ख आहे असे समजूनच चालायला पाहिजे. मोदीजी कधीच चुकत नाहीत. या सगळ्यांना सहन होत नाहिये भारत प्रगती करतो आहे ते.’
हे सगळे ऐकताना भास्करचे भान हरपले होते. त्याची सिगरेट संपून गेलेली, त्याला कळलेच नाही. त्याला हातातल्या थोटकाचा चटका बसला. भारत देशात उगवलेले वागण्या-बोलण्याचे हे नवे वाण त्याच्या बुद्धीच्या बाहेरचे होते. तो गप्प बसला. भारत नक्की कुठल्या दिशेने चालला आहे, याचा विचार मनात आल्याने समर गप्प झाला.
एवढ्यात अविनाश म्हणाला, ‘तुम्ही शांत बसला आहात कारण आम्ही तुमच्या सगळ्या मुद्दयांना समर्पक उत्तरं दिली आहेत.’
त्यानंतर अच्युत म्हणाला, ‘मोदींविरुद्ध ओरडणाऱ्या या सगळ्यांना एकच गोष्ट सांगा - तुम्हाला बोंबलायचं आहे तेवढं बोंबला, आखिर आयेगा तो मोदीही.’
हे सगळे ऐकून भास्कर आणि समरची मती सुन्न झाली. भास्करला एक सत्य कळले होते - नदीतून माणसांची प्रेते वाहायाच्या खूप आधी लॉजिक आणि विवेकी ज्ञानाची प्रेते चर्चेच्या नदीतून वाहू लागलेली असतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
(त्या काळात झडलेल्या चर्चा शिरोजी अत्यंत प्रगल्भपणे आपल्या समोर जिवंत करतो. महाराष्ट्राने अनेक बखरकार पाहिले आहेत. त्यातील अत्यंत वरच्या दर्जाच्या बखरींमध्ये शिरोजीच्या बखरीची गणना करावी लागेल, असे आम्हाला शिरोजीच्या बखरीच्या ही पहिली दोन प्रकरणे वाचून वाटू लागले आहे. विनोदी ढंगाने लिहिली गेलेली ही पहिलीच बखर असावी. शिवाय या खळबळीच्या काळामध्ये शिरोजीने अत्यंत तटस्थ राहून, कुणाचीही बाजू न घेता इतिहास कथन केलेले आहे हे कुणाला नाकारता येत नाही.
या बखरीतील शेवटचे झणझणीत वाक्य शिरोजीचे की भास्करचे, हा विचार आज मनात येत राहतो. आम्ही रात्रभर हा विचार करतो आहे. शिरोजी आणि भास्कर हे एकमेकांशी ‘रेझोनेट’ होणारी व्यक्तिमत्त्वे असावीत का? का शिरोजी, भास्कर या बिंदू मधून आपल्या विचारांचा तीर मारतो आहे?
एखाद्या नदीमधून वाहत चाललेली प्रेतांची यात्रा आपल्याला सुन्न करते. त्याचप्रमाणे या बखरींमधून एक राजकीय चर्चा आपल्यापर्यंत वाहत आलेली आहे. भारतातील भयाण पार्श्वभूमीवर चाललेली अविनाश, अच्युत आणि समरमधील ही राजकीय चर्चा विनोदाने संपृक्त असली तरी तिच्यामधील संवेनशीलतेच्या अभावाने ती आपल्याला विषण्ण करते. - संपादक, शिरोजीची बखर)
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment