अजूनकाही
राजकारण आणि राजकारण्यांवर लिहिण्याचा कंटाळा आला, म्हणून या आठवड्यात साप्ताहिक स्तंभाचं लेखन केलं नाही, मात्र त्या कंटाळ्याला राजीव सातवच्या मृत्यूच्या बातमीचं जिव्हारी लागणारं फळ येईल असं चुकूनही वाटलं नव्हतं...
खरं तर, परवाच सकाळी वाटलं होतं की, एखादा एसएमएस पाठवून राजीवच्या प्रकृतीची चौकशी करावी, पण ते टाळलं कारण तसं करणं प्रशस्त वाटलं नाही. मग संध्याकाळी त्याला पुन्हा व्हेंटिलेटरवर घेतलं असल्याची बातमी कळली, पण तो बाहेर येईल अशी वाटलेली खात्री खोटी ठरली.
हे काही मरणाचं वय नव्हतं म्हणून करोनापुढे हतबल किंवा ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ वगैरे वगैरे सांत्वनाचा महापूर आला तरी राजीवच्या मृत्यूचं समर्थन होऊ शकणार नाही...
■■
राजीवची भेट होऊन किती वर्षं झाली असतील! ते वर्ष बहुदा १९८१ असावं. ८०च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातून सूर्यकांता पाटील आणि रजनी सातव विजयी झालेल्या होत्या. सूर्यकांता आणि माझ्यात सख्खी मैत्री. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी त्या दोघी नागपूरला आलेल्या होत्या. विधिमंडळाच्या वृत्तसंकलनाचं माझं ते पहिलंच वर्ष. आमदार निवासात सूर्यकांता पाटीलला भेटायला गेलो, तेव्हा तिनं रजनी सातव यांची ओळख करून दिली.
त्या वेळी राजीव भेटला. जेमतेम दहा-बारा वर्षांचा असेल. थोडा लाजराबुजरा.
पुढे रजनी सातव मंत्री झाल्या. सत्तेत असणाऱ्यांभोवती फार घुटमळण्याचा स्वभाव नव्हता, शिवाय माझ्याकडे बीट म्हणून काँग्रेस नव्हतं म्हणून आमची ओळख पुढे सरकली नाही, जुजबीच राहिली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पुढे विधी शिक्षण घेतानाच राजीव राजकारणात आला; आधी महाराष्ट्र आणि मग राष्ट्रीय युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाला.
आमच्या त्या काळात अगदीच दोन-तीन भेटी झाल्या, त्याही विमानतळ वगैरेवर. अशा भेटींचं स्वरूप औपचारिकच असतं, पण दिसलो की लगेच आपल्याकडे येण्याचा त्याचा उमदेपणा कायम लक्षात यायचा.
त्यात लक्षात आलेली बाब म्हणजे दिल्लीत असूनही राजीवचं मराठी वाचन चांगलं आहे; माझ्या लेखनावरही त्याचे अधूनमधून फोन येत.
■■
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत तो अपडेट असायचा, पण महाराष्ट्रात यावं असं मात्र त्याला वाटत नसल्याचं लक्षात येत असे.
गांधी कुटुंबीयांच्या तो अतिशय निकटचा असल्याची चर्चा त्या काळात काँग्रेस वर्तुळात होती; त्या वेळची एक आठवण आहे –
‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चा राजकीय संपादक म्हणून मी राजधानी दिल्लीला जून २०१३मध्ये पडाव टाकला.
तोपर्यंत काँग्रेसच्या राजकारणात राजीव एक बडं प्रस्थ झालेला होता; ‘युवक काँग्रेस’चा राष्ट्रीय अध्यक्ष होता आणि खूप व्यस्त असायचा.
‘लोकमत’मधील विकास झाडे या सहकार्याकडे राजीवला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
विकासनं ठरवल्याप्रमाणं एक दिवस एका पावसाळ्यातल्या कलत्या दुपारी साडेचारच्या सुमारास आम्ही कार्यालयात पोहोचलो, तर राजीव कार्यालयात नव्हता, पण परिचय देताच त्याचे स्वीय सहायक लगबगीने खुर्चीतून उठले आणि मोठ्या अदबीनं आम्हाला त्यांनी राजीवच्या कार्यालयात नेऊन बसवलं.
‘साब राहुलजी के पास गये है. आप के आने की खबर उन्हे देता हूं,’ असं म्हणत तो बाहेर गेला आणि पाचच मिनिटात परत येऊन त्यानं सांगितलं की, ‘साब निकले है, बस दस मिनिट में पहुचेंगे.’
राजीव आला, त्यानं अतिशय नम्रपणे झुकून नमस्कार केला आणि तातडीच्या कामासाठी जावं लागलं असं अपराधी स्वरात सांगत आम्हाला वाट बघावी लागली, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सत्ताधारी पक्षाचा आणि त्यातही काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता समोरच्याला वाट पाहावी लागली म्हणून दिलगिरी वगैरे व्यक्त करतो, याचं अप्रूप ओसरायच्या आत राजीव त्याच्या टेबलापलीकडच्या राखीव खुर्चीत न बसता माझ्या शेजारी बसला.
संकोचून त्याला त्याच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली, तर तो म्हणाला, ‘सर, तुम्ही खूप सीनिअर आहात. माझी आई बोलली आहे. मीही वाचतो तुमचं लेखन...’ वगैरे.
हा तरुण नेता कसा सुसंस्कृत आणि ‘डाऊन-टू-अर्थ’ आहे, याचा तो अनुभव सुखावणारा होता. हाच अनुभव नंतरच्या प्रत्येक भेटीत येत राहिला, तो बहुदा त्याच्यावरचा मातृसंस्कार असावा!
मी दिल्ली सोडली, औरंगाबादला स्थायिक झालो आणि आमच्या भेटी खूप कमी झाल्या तरी संपर्क कायम राहिला.
■■
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हेच दोन उमेदवार विजयी झाले.
राजीव दिल्लीत अजूनच रमला आणि काँग्रेसच्या राजकारणात राहुल गांधी यांचा कट्टर समर्थक म्हणून आकंठ बुडाला. काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय समित्यांवर आणि पंजाब, गुजरात विधानसभा निवडणुकांत त्यानं कळीच्या जबाबदार्या पार पाडल्या.
राहुल गांधी यांचा साधेपणा आणि पक्षाविषयी त्यांना असणारी तळमळ याविषयी राजीव अनेकदा बोलत असे. ‘पक्षाचा तोंडवळा पूर्ण बदलायला हवा आणि बनेल बुजुर्गांना बाजूला सारायला हवं, या माझ्या मताशी तो सहमत होता, पण हे लगेच घडणार नाही, राजकीय पक्षात लगेच असं घडत नसतं, हे तो सांगायचा.
गुजरात विधानसभा निवडणुकीत राजीववर फार मोठी जबाबदारी होती आणि तिकडे ठिय्या मारून त्याने ती निभावली. भाजपशी ‘अरे’ला‘कारे’ करून तुरुंगाची वारीही करून आला, पण डगमगला नाही. (त्या काळात एकदा दमणला गेलेलो असताना त्याला फोन केला, तेव्हा ही त्याची तुरुंगवारीची हकीकत समजली!)
‘गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्ता संपादन नाही करणार, पण नरेंद्र मोदी आणि भाजपला काँग्रेस ‘होम स्टेट’मध्ये जेरीस आणेल हे नक्की’, हे त्याचं म्हणणं तंतोतंत खरं ठरलं.
मात्र, पक्षात मिळालेलं स्थान आणि गांधी कुटुंबीयाशी असणार्या जवळीकीबद्दल तो फारसा बोलत नसे. त्या जवळीकीचा तोराही त्याच्या वागण्यात नसे.
‘लुज टॉक’ तर त्याच्या स्वभावच नव्हता.
मोजकं बोलावं, ठाम बोलावं आणि कार्यरत राहावं हेच राजीवचं व्रत राहिलं. विरोधी पक्षात आहे म्हणून वचावचा बोलणं, एकारला कर्कशपणा करणं, पोरकट वागणं राजीवनं कधीच केलं नाही. ऋजू वागणं आणि बोलणं हे त्याचं वैशिष्ट्य राहिलं. त्यामुळेच बहुदा चार वेळा ‘संसदरत्न’ म्हणून गौरवलं गेलं.
■■
राजकारणात असंख्य चांगल्या आणि वाईट घडामोडी एकाच वेळी घडत असतात. त्याचा एक भाग म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे मृत्यू झाले. मराठवाड्याला राजकीय पोरकेपणा आला.
मराठवाड्यात अनेक नेते आहेत. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचेही वारसदार त्यात आहेत, पण अजूनही मराठवाड्याचा तो राजकीय पोरकेपणा संपलेला नाही.
तो संपवण्याची क्षमता राजीवमध्ये होती. राज्याचं नेतृत्व करण्याची कुवतही त्याच्यात होती.
हे मी अनेकदा लिहिलं, जाहीरपणे सांगितलं आणि राजीवशीही दोन-तीन वेळा बोललो, पण त्याला दिल्लीतच राहायचं होतं. ‘माझी गरज दिल्लीत जास्त आहे’, असं त्यावर त्याचं म्हणणं असायचं आणि केसातून हात फिरवत तो हे ठामपणे सांगायचा.
‘उद्याचा मराठवाडा’ या दैनिकाचा एक दिवाळी अंक संपादित करताना ‘महाराष्ट्राचं भावी नेतृत्व’ असा विषय घेतला होता. त्यात राजीवचं नाव अर्थातच होतं आणि लिहिण्याची जबाबदारी संजीव कुळकर्णी या नांदेडच्या ज्येष्ठ पत्रकार मित्रावर सोपवली होती.
पण, राजीव तर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आकंठ बुडलेला होता, त्याला वेळच मिळत नव्हता, हे संजीवनं सांगितलं.
अखेर मी फोन केला आणि वडीलकीच्या नात्यानं जरा लटकं रागावलो, तेव्हा ‘सॉरी, सॉरी’ म्हणत राजीवनं संजीवला वेळ दिला, त्याच्याशी गप्पा मारल्या आणि तो लेख सिद्ध झाला. फोन केला की, राजीवचा असा सकारात्मक प्रतिसाद माझ्याही अंगवळणी पडलेला होता.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
खूप मोठी राजकीय मजल मारण्याआधीच राजीवला मृत्यूनं कवटाळलं.
तो माझ्यापेक्षा वयानं २२ वर्षांनी लहान आणि मोठी राजकीय कर्तबगारी असणारा, ऋजू, उमदा म्हणूनच त्याचा अकाली मृत्यू जिव्हारी घाव घालणारा आहे.
■■
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा लोकसभेत बोलताना ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब उपाख्य मधु दंडवते जे म्हणाले ते जरा बदलून सांगायचं तर -
मतदारांनी प्रतिनिधी, लोकसभेनं उमदा सदस्य, राजकारण्यांनी नेता गमावला तरी आपल्या अपेक्षा आणि दु:खाचं सोडा. रजनीताईं सातव यांनी खूप वर्षांपूर्वी डॉक्टर पतीला अकाली गमावलं. आता कर्तृत्व बहरात येऊ लागणार्या पुत्राला गमावल्याचा घाव लागलेल्या मातेचं; अकाली वैधव्य आलेल्या पत्नीचं आणि पितृछत्र गमावलेल्या पुत्र व कन्येचं सांत्वन कोण आणि कसं करणार?
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment