अजूनकाही
मातीशी इमान राखून जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी जनमनात राष्ट्रीयत्वाची भावना जागी ठेवणं म्हणजे ‘इस्त्रायली’ असणं…
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीत आणि युरोपात इतरत्र ज्यूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराच्या कहाण्या जगासमोर मांडून रडत बसण्यापेक्षा आत्मविश्वासाच्या बळावर मृतवत राष्ट्र सुषुप्तीतून जिवंत करणं आणि मृतप्राय मातृभाषा हिब्रू सबळ करणं म्हणजे ‘इस्त्रायली’ असणं…
आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाला गवसणी घालून राष्ट्राच्या संरक्षणासाठी आदर्श वस्तुपाठ निर्माण करणं म्हणजे ‘इस्त्रायली’ असणं…
रुक्ष वाळवंटात जगाला आदर्शवत ठरावं, असं कृषी तंत्रज्ञान विकसित करणं, खाऱ्या समुद्राला साद घालून त्याचं पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरण करण्यासाठी कष्ट उपसणं, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात स्वतःची जागतिक नाममुद्रा निर्माण करणं म्हणजे ‘इस्त्रायली’ असणं…
आपल्या अस्मितेचा हुंकार जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशाचा ऋणी नाही, हे अमेरिकेसारख्या सर्वशक्तिमान देशालादेखील ठामपणे सांगणं म्हणजे ‘इस्त्रायली’ असणं…
…इस्त्रायली लोकांसोबत काम करताना त्यांचे हे भावविश्व आपल्यासमोर उलगडू लागते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आज सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक, कृषी, मेकॅनिकल, बँकिंग, इ-कॉमर्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत चीन, अमेरिका आणि युरोपातील कंपन्यांशी स्पर्धा करू शकणारी टेक्नॉलॉजी इस्त्रायली आहे. ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’सारख्या दरवर्षी बार्सिलोनामध्ये होणाऱ्या प्रदर्शनात ‘इस्राएल पॅव्हेलियन’ नावाचा मोठा भाग छोट्या-मोठ्या इस्त्रायली कंपन्यांनी व्यापलेला असतो. अक्षरशः शेकडो कंपन्या तिथे आपले तंत्रज्ञान जगासमोर मांडत असतात.
त्या ठिकाणी जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताचा एखादा छोटा स्टॉल प्रातिनिधिक स्वरूपात कुठेतरी दिसतो. इस्त्रायली कंपन्यांसोबत ‘निगोशिएशन्स’ करणं अतिशय अवघड असतं. त्यांच्या वस्तूच्या आणि सेवेच्या दर्जाबद्दल खात्री असल्यामुळे, ते आपले मूल्य कधीही घसरू देत नाहीत. शिवाय मानवी आयुष्य अशाश्वत आहे, हे ध्यानात घेऊन ते निडरपणे जगतात.
भोवताली सगळ्या बाजूंनी शत्रू राष्ट्रांनी वेढलेला त्यांचा देश कधी एखादा बॉम्बहल्ला, कधी एखादे रॉकेट लाँन्चर, कधी अचानक शाळेवर होणारा दहशतवादी हल्ला, अतिरेक्यांद्वारे विमान अपहरण याचा सामना करण्यासाठी, तसेच त्याची किंमत मोजण्यासाठी कायम तत्पर असतो.
अशा वेळी एखादा ऑफिसचा कॉल चालू असला आणि घराबाहेर बॉम्ब पडला तर, समोरच्या दुसऱ्या देशातील माणसाला, ‘थोडे थांब, बाहेर बॉम्बहल्ला झालाय. मी पाच मिनिटात बंकरमध्ये जातो आणि मग आपण बोलू’, असे सांगणारा बिझनेसमन जगाच्या पाठीवर फक्त इस्त्रायलमध्येच भेटतो!
त्याशिवाय स्वतःच्या देशाच्या शिक्षणात, ज्यूंवर झालेला अनन्वित अत्याचाराचा इतिहास आणि संघर्षातून उभा राहिलेल्या आत्मजागृतांचे आत्मगान नव्या पिढीसमोर न मांडण्याचा करंटेपणा या देशात होत नाही. या देशाच्या जडणघडणीत गोल्डा मायरसारख्या देशासाठी पै-पै जोडणाऱ्या संघर्ष-सरितेचे रक्त आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात येते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अशा वास्तविक चित्रणातून या देशाची भावी पिढी घडत असते. आपल्या पदरात इंग्रजांनी जाता जाता १९४८मध्ये दिलेली ४४ टक्के भूमी म्हणजे संपूर्ण इस्त्रायल नाही, त्याखेरीज असणारी ४८ टक्के पॅलेस्टाईनची भूमीदेखील आपलीच आहे, शिवाय युनायटेड नेशन्सच्या अखत्यारीतील ८ टक्के जेरुसलेम येथील येशूची जन्मभूमी आपलीच आहे, ही भावना पुढील पिढीत सक्षमपणे संक्रमित करणे, हेदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाएवढेच आवश्यक आहे, असे मानणारे त्यांचे जागृत राजकीय मानस आहे.
या सर्वांमुळे इस्त्राईलला आपण ताठ कण्याचा देश मानतो. ज्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, त्याच राष्ट्राचे मत जग विचारत घेते, हा डार्विनच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या तत्त्वज्ञानाचा आधुनिक राजकीय आविष्कार इस्त्राईलने मनोमन अंगिकारलेला आहे.
आपल्या मस्तीत जगणारा हा देश, पॅलेस्टाईनवर अत्याचार करतो, नेहमीच त्यांची जमीन बळकावतो, हे जरी सत्य असले तरी, ती त्यांच्या अस्तित्वाची खूण आहे, संघर्षाचा विपाक आहे आणि जगण्याचा अविभाज्य भाग. हा इरेला पेटलेला संघर्ष कधी कधी उग्र रूप धारण करतो खरा, पण त्यामागे ‘आपल्याला झळ बसत नाही ना, पण आजच्या जागतिक ध्रुवीय संघर्षात आपण कुठे आहोत, याची चाचपणी होते ना’, हे दुरून पाहणारे आणि मदत करणारे मोठे देश आहेत. त्यांच्या दृष्टीने ही ‘संघर्षभूमी’ त्यांच्या ताकदीची फक्त ‘लिटमस टेस्ट’ असते…
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
म्हणून अशी भूमी धगधगती ठेवणे, त्यांच्या मोठ्या भू-राजकीय समीकरणातलं एक प्रत्यंग फक्त असतं. मात्र या समीकरणाच्या फलोत्पत्तीसाठी दोन देश आपले सर्वस्व पणाला लावून झुंजत असतात आणि दुरून कोणीतरी हा खेळ, कोंबड्यांना झुंजवावं, अशा आविर्भावात खेळत असतं. त्यात त्यांची भागीदारी असते, पण प्रतिबद्धता नसते!
जागतिक अर्थ आणि राजसत्तांसाठी भारत आणि पाकिस्तान ही अशीच ‘संघर्षभूमी’ आहे.
जगातील इस्त्राईल-पॅलेस्टाईनसारख्या धुमसत्या ‘संघर्षभूमी’ मोठ्या राष्ट्रांच्या केवळ ‘प्रयोगशाळा’ असतात!
(हा लेख लिहिताना मंदार कुलकर्णी आणि प्रसाद फडणीस यांनी केलेल्या प्रत्यक्ष अनुभव निवेदनाचा उपयोग झाला. त्यांचे आभार.)
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment