स्पिती व्हॅलीचा अदभुत, रोमांचक प्रवास
संकीर्ण - फोटोएसे
मेधा करंदीकर
  • नाको सरोवर
  • Sun , 12 February 2017
  • फोटोएसे स्पिती व्हॅली Spiti Valley नाको सरोवर Nako Lake बास्पा नदी Baspa River रकछम व्हॅली Rakchham Valley चंद्रताल Chandratal चिटकुल Chitkul काझा Kaza

बऱ्याच दिवसांपासून पर्यटनाचे विचार मनात घोळत होते आणि एखादी जरा हटके टूर करावी असं वाट होतं. तोच स्पिती व्हॅलीची माहिती मिळाली. त्यातच माझ्या मैत्रिणीची- वर्षाची- साथ मिळाल्यावर गोष्टी सोप्या झाल्या. तिने चंदीगड ते चंदीगड इनोव्हा व हॉटेल बुकींग अगदी थोड्यात वेळात करून दिले. मी, माझा नवरा, मिलिंद व बहीण, मृणाल असे तिघेजण ६ ऑक्टोबरला प्रवासाला निघालो!

मुंबई-चंदीगड विमान प्रवासानंतर चंदिगड विमानतळावर साहिल नावाचा अत्यंत अदबशीर तरुण आमच्यासमोर येऊन उभा राहिला. आमच्या इनोव्हा गाडीचा तो मालक होता. सोनू नावाचा ड्रायव्हर काही कारणाने त्या दिवशी येऊ शकला नाही. मात्र दुसऱ्या दिवासापासून संपूर्ण प्रवासात सोनू आमच्याबरोबर होता. पुढच्या टूरला लागतील तेवढ्या पाण्याच्या बाटल्या, नवीन टायर वगैरे खरेदी करून साहिल आम्हाला घेऊन सिमल्यात दाखल झाला तेव्हा संध्याकाळ झाली होती.

सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही सिमला ते सराहन प्रवासासाठी सज्ज झालो. अत्यंत दाटीवाटीनं उतारावर बांधलेली घरं, वाहनांची प्रचंड गर्दी, चिंचोळे नागमोडी रस्ते यातून मार्ग काढत आम्ही सिमला सोडलं. प्रवासात चहूबाजूंनी हिरव्यागार वनराईनं वेढलेली ग्रीन व्हॅली, पुढे फागु व्हॅली अशी आम्हाला सोनू माहिती देत होता. सिमला-सराहन वाटेवर एक हाटू शिखर व हाटू मंदिराचा फाटा होता. तीन-चार किमीवर. अतिशय अरूंद रस्ता, चढण पार करून आम्ही शिखराजवळ पोहोचलो. या छोट्या रस्त्यावर सोनूच्या ड्रायव्हिंग कौशल्याचा आम्हाला अनुभव आला आणि पुढच्या सर्व प्रवासाबद्दल आम्ही निश्चिंत झालो. हाटू शिखराच्या परिसरात देवदार, पाईन, स्पृसची झाडं पाहायला मिळाली. सुमारे बारा हजार फूट उंचीवर असलेलं हाटू माता मंदिर हे स्थानिक लोकांच्या मते रावणाची पत्नी, मंदोदरीचं आहे. अतिशय स्वच्छ अशा या लाकडी मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही सराहनच्या दिशेनं निघालो.

सराहनला पोहोचलो तेव्हा अंधार होत आला होता. हॉटेलमध्ये गेल्यावर लक्षात आलं की, मिलिंद त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स सिमल्याच्या हॉटेलमधून परत घ्यायला विसरला होता. आता उलटं परत फिरणं शक्य नव्हतं. पुढच्या प्रवासात आठ दिवसांनी आम्ही मनालीला पोहोचणार होतो. आमच्या गाडीचा मालक साहिल व माझी मैत्रीण, वर्षा यांनी ते मनालीत पोहचवण्याची हमी दिल्यावर आमच्या जीवात जीव आला. सराहनचं हॉटेल हिमाचल प्रदेश टुरिझमचं होतं. इथून सकाळी उजाडल्यावर दिसणारं दृश्य सुंदर होतं. हिमाचल टुरिझमची हॉटेल्स एकंदरीतच राहायला चांगली व उत्कृष्ट लोकेशन्सवर आहेत. सोनूलाही इथं काही ड्रायव्हर मित्रमंडळी भेटली. ही मंडळी एकमेकांना नावानं कमी गाडीच्या नंबरनं जास्त ओळखत होती. ब्रेकफास्टनंतर आम्ही सांगला या ठिकाणी जायला निघणार होतो. त्या आधी आमच्या हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या प्रसिद्ध भीमाकाली मंदिर पाहायला गेलो. जवळच हिमाचल प्रदेशचा राज्यपक्षी असलेल्या मोनाल पक्ष्याचं पालनकेंद्र असल्याचं समजलं. तिथं पोहोचल्यावर कळलं की, ते उघडायला बराच वेळ होता. त्यामुळे आम्ही माघारी फिरलो. तेव्हा लक्षात आलं की, माझा मोबाईल फोन देवळाच्या परिसरात विसरला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळ जवळ अर्ध्या तासानं आम्ही परतलो तरी त्या फोनला कुणीही हात लावलेला नव्हता. आमच्यासारख्या शहरी लोकांना त्याचं अप्रूप वाटलं. या मंदिरातील कालीमातेचं दर्शन घेताना इतर भाविकांप्रमाणे खण, नारळ, ओटी अशी कुठलीही तयारी आमच्याकडे नव्हती. तरीसुद्धा दर्शन घेताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता पुजाऱ्यानं अतिशय निरपेक्ष भावनेनं प्रसाद दिला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिरातल्या बाजारूपणाचा अनुभव असलेल्या आम्हाला हा एक सुखद धक्का होता!

सराहन ते सांगला प्रवासाला सुरुवात झाली. गाडीचा वेग एकदम मंदावला. त्यात दोष रस्त्याचा होता. मनालीपर्यंत असाच रस्ता असणार याची पूर्वकल्पना सोनूने दिली. त्यामुळे आपली हाडं खिळखिळी होणार याची मानसिक तयारी आम्ही केली. संपूर्ण प्रवासात सतलज नदी कधी डावीकडे तर कधी उजवीकडे आमच्या सोबतीला होती. वाटेत कोसळलेल्या दरडींचा ढिगारा उपसण्याच्या आणि कुठे रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे गाडीचा वेग ताशी केवळ १५-२० किमी एवढाच शक्य होता. सांगला जवळ येऊ लागलं तशी सफरचंदांनी लगडलेली अनेक झाडं दिसून लागली. दुपारी तीनच्या सुमारास सांगलाच्या हॉटेलवर पोहोचलो. इथला रसोईखाना बंद झाल्यामुळे एका जवळच्या छोट्या हॉटेलमध्ये जेवलो. एक गोष्ट जाणवली की, वाटेत लागणारे छोटे धाबे, हॉटेल्स यात जेवण चवदार होतं. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे, बटाट्याचा सर्व भाज्यांमध्ये सढळ वापर (कारण बटाटा या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पिकतो.), राजमा, फ्लॉवर, कोबी, मटार, वगैरे पदार्थ असं इथल्या सर्वसाधारण जेवणाचं स्वरूप आहे.

संध्याकाळी कामरू फोर्टच्या पायऱ्या चढताना आमची भरपूर दमछाक झाली. तिथली छोटी छोटी मुलं, वजनदार टोपल्या घेऊन जाणाऱ्या बायका व म्हातारी माणसंसुद्धा आरामात पायऱ्या चढून जात होती. वर पोहाचल्यावर मात्र अगदी निराशा झाली. आमच्या कल्पनेत असलेली किल्ल्याची तटबंदी वगैरे काहीच नसून फक्त एक वॉच टॉवर आणि एक मंदिर होतं. पायऱ्या उतरून हॉटेलवर परतलो. सोनूने आम्हाला नागमंदिराजावळ गाडीनं सोडलं. आता आम्हाला बराच उतार पायी उतरून जावं लागणार होतं. नागमंदिर आम्ही पोहोचेपर्यंत बंद झालं होतं. परंतु बाकी परिसर अतिशय स्वच्छ व मंदिराच्या पाठी दूरवर बर्फाच्छादित शिखरं दिसत होती. या वाटेवर प्रथमच काही अक्रोडाची झाडंही दिसली. हॉटेलवर परत येईस्तोवर हवेत चांगलाच गारवा वाढला होता. परत दोन मजले उतरून खाली जेवायला जायचा कंटाळा आला होता. पण हाॅटेल मॅनेजरने आमच्या रूमबाहेरील कॉरिडॉरमधल्या टेबलवर जेवण वाढून आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला.

चिटकूल

दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून जवळच असलेल्या चिटकुल या गावाला भेट द्यायची होती. चिटकुल हे भारत-तिबेट सीमेवरचं बास्पा नदीच्या काठी बसलेलं शेवटचं गाव. सफरचंदांच्या झाडांनी बहरलेली रकछम व्हॅली पार करून आम्ही चिचकुलला पोहोचलो… आणि डोळ्याचं पारणं फिटलं. एका बाजूला हिरवेगार डोंगर तर दुसऱ्या बाजूला बोडके डोंगर, मधून दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं, खळखळून वाहणारी बास्पा नदी असं अदभुतरम्य दृश्य पाहून आम्ही स्तब्ध झालो.

चिटकुल गाव छोटंसं असूनही तिथं धाबे, मंदिरं, शाळा, दुकानं सर्व काही होतं. परतीच्या प्रवासात निसर्गसुंदर रकछम व्हॅलीचे फोटो काढत आम्ही हॉटेलवर परतलो. नवरात्रीचे दिवस असल्याने सर्व भागांत पर्यटकांची गर्दी वाढत होती. त्यात प. बंगालमधून येणाऱ्यांची संख्या सर्वांत जास्त होती. काही देशी तर काही विदेशी नागरिक या सर्व रस्त्यावर मोटरसायकलवरून प्रवास करताना दिसले.

बास्पा नदी

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टनंतर नाकोला जायला निघालो. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता रूंदीकरण चालू असल्याने रस्ता अतिशय खडबडीत होता. वाटेत कल्पा मॉनेस्ट्री, बाजारपेठ बघून पुढे निघालो. वाटेत कुठेतरी गाडीत डिझेल भरायला मिळेल हा सोनूचा अंदाज खोटा ठरला. नशिबाने काही अतंर उलट गेल्यावर एका ठिकाणी कशीबशी सोय झाली. वाटेत सतलज व स्पिती या दोन नद्यांचा संगम पाहायला मिळाला. हाईड्रो प्रोजेक्टसच्या कामांमुळे प्रवाह फार जोरात नव्हते. मात्र सतलजचं पाणी करड्या रंगाचं व स्पितीचे अतिशय स्वच्छ असल्याने संगमाच्या जागी स्पष्टपणे फरक दिसत होता. नाकोला पोहोचलो तेव्हा काळोख झाला होता. गाडीतून उतरल्यावर सर्वजण थंडीने कुडकुडायला लागलो. सांगलाच्या मानाने इथं पारा चांगलाच खाली घसरला होता. इथल्या हॉटेलची रूम सर्वसाधारण होती. मात्र गरमागरम सूप व चवदार जेवण मिळाल्यामुळे थंडी थोडी सुसह्य वाटायला लागली. रूम ठाकठीक असली तरी सकाळी समोर दिसणारं दृश्य भान हरपून टाकणारं होतं. छोटासा नाको लेक, त्याच्या काठावर बसलेलं नाको गाव, आजूबाजूला असलेली हिरवी-पिवळी झाडं, पाठीमागे असलेले डोंगर व त्याचं लेकमध्ये दिसणारं प्रतिबिंब अतिशय विलोभनीय होतं. सकाळी ऊन पडल्यानंतर तर या सर्वांनी वेगळ्याच रंगछटा दाखवल्या. सर्व कॅमेऱ्यात कैद करताना आम्ही कडाक्याच्या थंडीकडे दुर्लक्ष केलं. आदल्या दिवशीच्या अनुभवावरून आम्ही सकाळी पटापट आवरून ब्रेकफास्ट करून काझाच्या दिशेनं प्रयाण केलं.

बास्पा नदीकिनारी आम्ही तिघे

नाकोहून निघाल्यावर वाटेत बटाटा, मटार यांची शेतं लागली. नाको हे आमच्या प्रवासातील तिबेट सीमेपासून सर्वांत जवळचं ठिकाण होतं. एकंदरीतच तिबेट सीमेजवळ असल्याने हिंदू देवता व बुद्ध यांची मंदिरं ठिकठिकाणी दिसत होती. काझाच्या वाटेवर गुई मॉनेस्ट्रीला भेट दिली. इथं एक ५०० वर्षं जुनी ममी जतन केली आहे. ती बघून आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. थोड्याच वेळात एक विचित्र आवाज आल्याने सोनूने गाडी थांबवली. टायर पंक्चर झाला होता. ते बदलण्यात थोडा वेळ गेला. साहिलने दोन नवीन टायर विकत घेऊनसुद्धा सोनूने त्यातला एकच बरोबर घेतला होता. अशा खराब रस्त्यावर जास्त चांगले टायर बरोबर असणं महत्त्वाचं. पंक्चर झालेल्या टायरला मोठी चीर पडल्याने तो दुरुस्त होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे उरलेला सर्व प्रवास अतिशय सांभाळून करावा लागला. वाटेत टाबो मॉनेस्ट्रीत बुद्धाची सुंदर मूर्ती पाहिली. ही सर्वांत जुनी मॉनेस्ट्री असल्याचं सांगितलं जातं. तिथं भिंतीवर फार सुंदर पेंटिंग्ज आहेत.

सांगलाहून निघाल्यापासून आजूबाजूच्या परिसरात एक लक्षणीय बदल होत गेला. तो म्हणजे मध्ये नदी असूनसुद्धा दोन्ही बाजूचे डोंगर पूर्ण बोडके होते. मात्र त्यावरील दगडांच्या विविध रंगांमध्येसुद्धा एक वेगळंच सौंदर्य होतं. वर्षातला बराचसा काळ पूर्ण बर्फाच्छादित असल्याने या भागात विशेष हिरवळ नसते. या भागात राहणाऱ्या लोकांना जवळपास सहा महिने पुरेल इतकं अन्नधान्य, लाकूडफाटा वगैरेची सोय करून ठेवावी लागते. हिमाचलमध्ये तशी बऱ्याच प्रमाणात वीज पोहोचली आहे. मात्र नाको, काझा या परिसरात अधूनमधून वीजप्रवाह खंडित होतो.

काझाचा प्रवास

नाकोहून सकाळी वेळेत निघाल्याने काझाला आम्ही दिवसाउजेडी पोहोचलो. इथं बऱ्यापैकी थंडी होती, पण आम्ही आता सरावलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून जवळ असलेल्या किब्बर व्हिलेजला भेट दिली. १४, २०० फूट उंचीवर हे गाव आहे. याचा वीज पोहोचलेल्या सर्वांत उंच गावांमध्ये जगात तिसरा क्रमांक लागतो. इथले लोक बर्फ पडायच्या आधी शेतं नांगरून खतपाणी करून ठेवतात आणि बर्फ वितळायला लागल्यावर लागवडीला सुरुवात करतात.

परतीच्या वाटेवर या भागातील सर्वांत मोठ्या की मॉनेस्ट्रीला भेट दिली. उंचावर असल्याने इथूनही निसर्गाचा देखावा फार सुंदर होता. दुपारी हॉटेलवर परतलो. आता पुढचा टप्पा होता चंद्रताल. काझाच्या हॉटेलमध्ये आम्हाला अनेक प्रवासी भेटले, ते उलटा प्रवास करत होते. त्यांनी आम्हाला चंद्रतालचा विचार डोक्यातून काढून टाकायचा सल्ला दिला. अतिशय खडबडीत, चिंचोळा रस्ता, रात्री दहा मायनस अंश सेल्शियसपर्यंत घसरणारं तापमान आणि वाटेत कुठेही राहायची धड सोय नाही हे ऐकून आम्हाला मनातून थोडी भीती वाटायला लागली. परंतु दुसरीकडे ज्या चंद्रतालसाठी एवढा प्रवास करून आलो तोच बघायला मिळणार नाही असं वाटून निराशाही झाली. त्यातच सोनूनला इतर ड्रायव्हर मित्रांनी चंद्रतालला न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तोही पहाटे लवकर निघून सरळ मनालीला जाऊ या असे म्हणायला लागला. पुन्हा एकदा माझी मैत्रीण वर्षा मदतीला धावून आली. तिने चंद्रताल कॅम्पसची व्यवस्था करणाऱ्या बिशन सिंग यांना फोन केला. नशिबाने ते काझालाच आमच्या जवळच्याच हॉटेलमध्ये आले होते. त्यांना मिलिंद व मृणाल जाऊन भेटले. त्यांनी कॅम्पसमध्ये असलेल्या सोयींची माहिती तर दिलीच, पण “आता आणखी वय वाढल्यावर तुम्ही कुठे चंद्रतालला येणार? आता आलाच आहात तर पाहून जा. तुमच्या ड्रायव्हरशी मी बोलतो. तो तयार नसेल तर तुम्हाला मनालीपर्यंत मी पोहोचवायची व्यस्था करतो.” असं सांगून आमचा उत्साह वाढवला. मग काय आम्ही सर्वांनी जोर लावून सोनूला तयार केलं.

काझाच्या प्रवासात दिसलेला वाळूचा पर्वत

सकाळी निघण्याआधी बिशनजींनी सोनूला भेटून आपण सर्व बरोबरच जाऊ असं सांगून त्याची अस्वस्थता कमी केली. आम्ही निघालो व बाताल गावाच्या थोडं आधी असलेल्या चंद्रताल फाट्याला लागलो. ऐकल्याप्रमाणे रस्ता खरोखरच अत्यंत अरूंद व खडबडीत होता. सोनूने सर्व कसब पणाला लावून सांभाळून आम्हाला बिशनजींच्या पॅरेसोल कॅम्पपर्यंत पोहोचवलं. बिशनजी आमच्यानंतर थोड्याच वेळात पोहोचले. तिथल्या टेन्टमध्ये सामान टाकून आम्ही दोन-तीन किमीवर अंतरावर असलेल्या चंद्रतालला जायला निघालो. बिशनजी आमच्यासोबत येणार होते, परंतु काही महत्त्वाची पाहुणेमंडळी आल्यामुळे त्यांनी त्यांच्या चार बाय चारच्या पिकअप व्हॅनची चावी सोनूला दिली. मग काय सोनूपण खूश. थोडं अंतर गाडीने व थोडं चालत आम्ही चंद्रतालला पोहोचलो. वरती गडद निळं आकाश, खाली अत्यंत स्वच्छ पाण्याचा निळाशार जलाशय, तिन्ही बाजूंनी वेढणारे अदभुत रंगाचे डोंगर... अदभुत दृश्य होतं!

ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याने थोड्या चालण्याने आमची दमछाक होत होती. मिलिंदला थोडा डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. आम्ही कॅम्पवर परतलो. मध्यभागी एका मोठ्या टेन्टमध्ये तंदूर लावून चांगलं उबदार वातावरण तयार केलं होतं. या टेन्टमध्ये रात्रीच्या जेवणाची सोय होती. रात्री झोपताना रजई, ब्लँकेट, स्लिपिंग बॅग, गरम पाण्याची पिशवी यासहित अंगावर अनेक कपड्यांचे थर चढवून आम्ही झोपलो.

चंद्रतालचं एक दृश्य

सकाळी जाग आली तेव्हा बादलीतल्या पाण्याचा बर्फ झाला होता. पण थोड्यात वेळात बिशनजींच्या सहकाऱ्यांनी गरम पाणी आणून दिलं. नाश्ता करून तिथल्या आकाशाचा गडद निळा रंग डोळ्यांत साठवत आम्ही चंद्रतालचा निरोप घेतला. दुपारपर्यंत रोहतांग पासला आल्यावर थोडं हायसं वाटलं. कारण या पुढचा चंदीगढपर्यंतचा रस्ता चांगला असणार होता. मनालीजवळ सोलंग व्हॅलीतल्या हॉटेलवर पोहोचलो, तेव्हा संध्याकाळ होत आली होती. मनाली ते चंदीगढ खूप मोठा प्रवास असल्याने आणि चंदीगडहून संध्याकाळी मुंबईसाठीचं विमान पकडायचं असल्यानं सकाळी साडेसहालाच मनालाहून निघालो.

अशा प्रकारे आमची स्पिती व्हॅलीची टूर संपली. ही बरीचशी रुक्ष वाळवंटी व्हॅली आहे. इथल्या परिसरात राहणाऱ्या लोकांचं जीवन खडतर आहे. तरीही त्यांच्या वागण्यात आदबशीरपणा आहे. वृत्ती समाधानी आहे. आमच्यासारख्या पैशापाठी धावणाऱ्या शहरी माणसांना बरंच काही शिकवून जाणारी आहे!

karandikar.milind@gmail.com

Post Comment

Nivedita Deo

Tue , 14 February 2017

khoopcha chan lekha ahe


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......