ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कोकणी साहित्यिक रवीन्द्र केळेकर यांनी एका लेखात म्हटले आहे - “मी भाग्यवंत गोवेकर. खूप मोठमोठी माणसं जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं मला. काही जणांच्या अगदी जवळही पोहोचलो. त्यातलाच एक मार्टिन ल्युथर किंग. १९५८-५९ सालातील गोष्ट. (गांधीवादी विचारवंत) आचार्य काकासाहेब कालेलकर अमेरिकेचा दौरा करून आले होते. आल्यानंतर अमेरिकेत आपण काय पाहिलं, ते भेटायला आलेल्या आपल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं होतं- ‘नायगाराचा धबधबा पाहिला आणि तिशीतला एक निग्रो वीर पाहिला. दक्षिण आफ्रिकेत कार्य करणाऱ्या बापूंचाच अलीकडचा अवतार वाटला. त्याच्याकडे जाऊन राहिलो. बापूंच्याच प्रेरणेने तो तिथे निग्रोंमध्ये कार्य करत आहे.’ ”
कालेलकरांनी मार्टिन ल्युथर किंग यांच्या कार्याविषयी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी चर्चा केली आणि गांधी निधीच्या वतीने त्या तरुणाला भारतभेटीसाठी येण्या-जाण्याची तिकिटे पाठवून दिली. केळेकर लिहितात – ‘त्याप्रमाणे मार्टिन पत्नीला आणि सोबत्याला घेऊन हिंदुस्थानात आला. खूप ठिकाणी फिरला. खूप जणांना भेटला.’
निग्रोंच्या हाल अपेष्टांबद्दलही केळेकर यांनी लिहिले आहे, ‘‘अमेरिकेतील निग्रोंनी गोऱ्यांचा खूप त्रास सहन केला आहे. आपल्या दलित बांधवांनी सोसला त्याच्यापेक्षा थोडाही कमी नाही. जास्तच म्हटलं तरी चालेल. मार्टिन ल्युथरच्या नेतृत्वाखाली या लोकांनी गांधीजींच्या मार्गाने आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार केला. मार्टिनच्या आत्मकथेत त्यांच्या या छळाची वर्णने आली आहेत आणि त्याच्या प्रतिकारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा वृत्तांतही आलेला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. इतकं असूनही अन्याय करणाऱ्यांविषयी मार्टिनच्या लेखनात एकही वाईट शब्द आलेला नाही. गांधीजींच्या वाटेने तो आपल्या सोबत्यांना घेऊन एक-एक विजय मिळवत पुढे गेला आणि गांधीजींसारखीच शरीरावर गोळी झेलून एक दिवशी त्याने मरणाला मिठी मारली.”
या डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना ‘अमेरिकेचे महात्मा गांधी’ संबोधले जाते. असे असले तरी त्यांचे चरित्र आणि कार्य गांधींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या अधिक जवळचे आहे असे मला वाटते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकाचे लेखन मी पूर्ण केले, तेव्हा माझा असा ठाम विश्वास निर्माण झाला.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा
नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -
https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१
..................................................................................................................................................................
‘बाबासाहेब आंबेडकरांचे जीवित कार्य नि:संशय ऐतिहासिक स्वरूपाचे होते. त्यांना आपले कार्यक्षेत्र सापडावे लागले नाही. ते जन्मत:च त्यांच्या वाटेला आले होते. त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी निःशंकपणे स्वीकारले.’’ असे गं. बा. सरदार यांनी म्हटले आहे.
ही वाक्ये मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनाही लागू पडतात. हे महान नेते बहुसंख्य समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील कुटुंबात जन्माला आले. या दोन्ही नेत्यांच्या समाजाला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा हक्क नाकारला गेला होता. एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी कायद्याने रद्द केली होती. विसाव्या शतकाच्या अखेरीस मोहनदास करमचंद गांधी या भारतीय व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवून समानतेच्या हक्कासाठी पुढे दीर्घकाळ चालणाऱ्या या लढ्यासाठी शिंख फुंकले होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अस्पृश्य समाजाच्या लोकांना ज्या प्रकारच्या मानहानीची वागणूक मिळत असते, त्याच प्रकारे अमेरिकेत काळ्या वर्णाच्या लोकांना अत्यंत वाईट प्रकारे वागवले जात असे. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे अस्पृश्यता पाळणे कायद्यानुसार गुन्हा झाला.
त्यानंतरही दोन दशके म्हणजे १९६५पर्यंत पुढारलेल्या, एक जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत काळ्या मुलांसाठी वेगळ्या शाळा, काळ्या लोकांसाठी वेगळे बगीचे, वेगळ्या वस्त्या, वेगळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वेगळे थिएटर आणि बसमध्ये मागे बसण्याची जागा असायची.
आता इतिहासकाळात जमा झालेल्या अस्पृश्यता पद्धतीविषयी आणि जाती-पोटजातींनी निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेविषयी आपल्याकडे बरेच लिखाण झाले आहे. मात्र अमेरिकेसारख्या प्रगत देशाने चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी केली, तोपर्यंत तिथे काळ्या लोकांना बसमध्ये गोऱ्या लोकांच्या रांगेत बसण्याची, बगीच्यात किंवा चित्रपटगृहांत बसण्याची आणि मतदान करण्यास कायद्याने बंदी होती, हे वाचून धक्काच बसतो.
विसाव्या शतकाच्या पाचव्या-सहाव्या दशकात रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांनी अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी संघर्ष केला. रोझा पार्क्स या काळ्या महिलेने १९५५ साली माँटगोमरी शहरात बसमधील आपली जागा गोऱ्या प्रवाशास खाली करून देण्यास नकार दिला, तेव्हा काळे लोक एकत्र आले. माँटगोमरी शहरातील बससेवेवर काळ्या लोकांनी बहिष्कार टाकला. हा बहिष्कार तब्बल वर्षभर चालू राहिला. एक वर्षांनंतर बसमध्ये काळ्या प्रवाश्यांना गोऱ्या प्रवाश्यांप्रमाणे समानतेची वागणूक मिळण्याचा हक्क आहे, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि या लढ्याची यशस्वी सांगता झाली. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) हा नेताही या लढ्यातूनच उदयास आला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
एक ख्रिस्ती धर्मगुरू या नात्याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची अहिंसा तत्त्वावर पूर्ण श्रद्धा होती. प्रथम मॉटगोमेरी बस बहिष्कार प्रकरणात आणि नंतर विविध आंदोलनांत किंग यांची अहिंसेंवरची श्रद्धा कधीही ढळली नाही. येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपला वर्णविरोधी लढा हिंसक होणार नाही, याची किंग यांनी सतत पुरेपूर काळजी घेतली. यामुळे त्यांना अनेकदा आपल्या अनुयायांचा, चळवळीतील लोकांचा रोष पत्करावा लागला.
डॉ. आंबेडकरांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनात आणि दीर्घकाळ चाललेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात बाबासाहेबांच्या अनुयायांना डिवचण्याचे, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहण्याचे अनेक प्रसंग घडले. अहिंसा तत्त्व शिकवणाऱ्या गौतम बुद्धाच्या तत्त्वप्रणालीचा बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्वीकार केला. मात्र त्याआधी काही दशके त्यांनी आपले लढे सनदशीर मार्गाने लढवले.
डॉ. आंबेडकर ‘कायदेपंडित’ होते. कुठल्याही प्रथेला कायदा वा समाजाची मान्यता असली तरी ती प्रथा वा तो कायदा न्याय्य असतोच असे नाही, याची त्यांना कायदेपंडित या नात्याने जाणीव होती. अस्पृश्य समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी अनेक सनदशीर मार्ग हाताळले. गोलमेज परिषदांसारख्या बैठकीत त्यांनी अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीत गव्हर्नरांच्या कौन्सिलात त्यांनी मजूरमंत्री म्हणूनही काम केले. या सनदशीर मार्गाचा कळस म्हणून शेवटी त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करून हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अस्पृश्यता प्रथेचे कायमचे उच्चाटन केले. सनदशीर, कायदेशीर मार्गाचा यशस्वी वापर करण्याचे डॉ. आंबेडकरांसारखे दुसरे असे कोणते मोठे उदाहरण दाखवता येईल?
महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक चळवळीचा आणि त्यांच्या सत्याग्रह या अस्त्राचा किंग (ज्युनियर) यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. किंग यांनी पत्नी कॉरेटा हिच्यासह १९५९ साली भारताला भेट दिली, त्या वेळी डॉ. आंबेडकरांचे निर्वाण होऊन केवळ तीन वर्षे झाली होती. वर्णभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या किंग यांना तशाच प्रकारच्या सामाजिक विषमतेविरुद्ध म्हणजे अस्पृश्यतेविरुद्ध यशस्वी लढा लढणाऱ्या डॉ. आंबेडकरांविषयी फारसा परिचय नव्हता असे दिसते. अन्यथा मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना तेच अधिक जवळचे वाटले असते. राजघाट, साबरमती आश्रम वगैरे ठिकाणी भेट देताना त्यांनी आपल्या भारत दौऱ्यात चैत्यभूमीला नक्कीच भेट दिली असती!
डॉ. आंबेडकरांनी सामाजिक विषमतेविरुद्ध चालवलेल्या लढ्याची डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना फारशी कल्पना नसावी वा या लढ्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले नसावे, हेसुद्धा साहजिकच आहे. याचे कारण म्हणजे हिंदुस्थानातील परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाललेल्या लढ्याकडे जगाचे जितके लक्ष गेले, तितके या देशातील गावकुसातील आणि गावकुसाबाहेरच्या लोकांमधील विषमतेविरुद्ध चाललेल्या संघर्षाकडे जागतिक पातळीवर फार चर्चा झाली नाही.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कृष्णवर्णीयांनी वर्णभेदाविरुद्धचा आपला लढा काव्य, कथा-कादंबरीसारख्या साहित्याच्या माध्यमातून आणि तेही इंग्रजी भाषेतून मांडून आपली व्यथा संपूर्ण जगासमोर मांडली. हिंदुस्थानातील अस्पृश्यतेच्या प्रश्नावर त्यामानाने इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर जागृती केली गेली नव्हती. या संदर्भात जे काही लिहिले गेले, साहित्यनिर्मिती केली गेली, ती हिंदुस्थान पातळीवर, स्थानिक भाषांपुरती मर्यादीत राहिली. जागतिक पातळीवर या प्रश्नाचे गांभीर्य प्रकर्षाने मांडले गेले नाही. त्यामुळे या प्रश्नाची जगानेही तितक्या प्रखरतेने दखल घेतली नाही.
महात्मा फुले यांनी सर्वप्रथम आणि त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणात मांडला. त्याची समाजाला, तत्कालीन राज्यकर्त्याला दखल घेणे भाग पाडले. किंबहुना अस्पृश्यतेच्या प्रश्नाला जागतिक स्तरावर मानवी हक्काचा मुद्दा म्हणून उभारण्यास अनेकदा आपल्या देशातूनच नेहमीच प्रखर विरोध झाला आहे. त्यामुळे आपल्या देशाची, संस्कृतीची नाचक्की होते, अशी काही जणांची भावना असते.
किंबहुना हिंदुस्थानात हजारो वर्षांपासून चालत आलेली जन्मावर आधारित जातिनिष्ठ सामाजिक विषमतेविरुद्ध दीर्घकाळ लढा करून आणि नंतर राज्यघटनेद्वारे ही विषमता कायद्याने दूर करणाऱ्या डॉ. आंबेडकरांची ‘आधुनिक मनू’ ही प्रतिमा तोपर्यंत प्रकर्षाने जगासमोर आलीच नव्हती. अन्यथा रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग यांच्याप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनाही नोबेल हे जागतिक स्तरावरचे पारितोषिक नक्कीच प्रदान झाले असते!
डॉ. आंबेडकर आणि किंग (ज्युनियर) या दोघांचाही लढा मानवजातीच्या समानतेसाठी होता. स्वत:स श्रेष्ठ म्हणवून घेतल्या जाणाऱ्या समाजघटकांनी इतर समाजघटकांना वाळीत टाकल्यामुळे या उपेक्षित घटकातील लोकांना काय वेदना भागाव्या लागतात, याचा या दोन्ही महान नेत्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. दोघांनी दोन वेगळ्या देशांत विषमतेविरुद्ध संघर्ष केला. या दोन्ही नेत्यांचा प्रवास मानवजातीत समता स्थापन करण्यासाठी समांतर दिशेने चालू होता.
स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानातील अस्पृश्यांची सामाजिक स्थिती आणि त्या काळातील अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची स्थिती यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळेच येथील दलित चळवळीला निग्रो लोकांनी आपल्या हक्कांसाठी चालवलेल्या लढ्याचे आणि निग्रो लोकांच्या विद्रोही साहित्याचे अप्रूप वाटले. रेव्ह. किंग यांचे चरित्र वाचताना हिंदुस्थानात डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या आणि नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशलढ्यांचे स्मरण होते. हे दोन्हीही संघर्ष शांततामय मार्गानेच लढवण्यात आले होते.
नरहर कुरूंदकर म्हणतात, “व्यापक करुणेचे नैतिक अधिष्ठान असल्याशिवाय समता आणि स्वातंत्र्याचा लढा चालवता येत नाही, एरव्ही हा लढा फक्त द्वेष आणि कटुता वाढवणारा, हिंसा आणि अत्याचार वाढवणारा, विध्वंस आणि विभाजन वाढवणारा ठरतो. तुम्ही नाव बुद्धाचे घ्या, गांधींचे घ्या, बाबासाहेबांचे घ्या अगर किंगचे घ्या, कोणत्या वंदनीय नेत्याचे नाव आपण घेतो हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मुद्दा एकात्म राष्ट्रवादात गृहीत असणाऱ्या बंधुत्वाचा व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यापक करूणेचा आशय आपणास मान्य आहे काय, हा आहे.”
हिंदुस्थानात अनेक शतकांपासून चालत असलेली अस्पृश्यता आणि जागतिक पातळीवर अनेक देशांत काळ्या लोकांना दिली जाणारी वंशभेदाची वागणूक, या दोन्हीं बाबींना एकाच पारड्यात टाकता येणार नाही, असे अनेकदा म्हटले जाते. तरीदेखील अस्पृश्यता आणि काळ्या लोकांना त्यांच्या वर्णामुळे दिली जाणारी वागणूक यात गुणात्मक काहीही फरक नाही हे वास्तव मान्य करायलाच हवे.
रावसाहेब कसबे यांनी डॉ. आंबेडकरांच्या या व्यक्तिमत्त्वाचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे - “बाबासाहेबांचा विचार दोन पातळ्यांवर करावा लागतो. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्यवर्गाच्या हक्कासाठी केलेले संघटन, प्रबोधन, चळवळ आणि संघर्ष अभ्यासावे लागतात, तर दुसऱ्या पातळीवर संपूर्ण भारतीयांसाठी आणि अंतिमत: एकूण मानवजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजून घ्यावे लागते. यापैकी कोणत्याही एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर बाबासाहेबांचे एकारलेले, संकुचित, विकृत चित्र रंगवले जाण्याचा धोका असतो.”
डॉ. आंबेडकरांच्या कार्याविषयी गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे- “अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न बाबासाहेबांनी दयाधर्माच्या, उद्धाराच्या, पापक्षालनाच्या वा सेवाभावाच्या पातळीवरून हक्काच्या पातळीवर नेला. याचकधर्म सोडून देऊन स्वत:च्या बळावर आपले नैसर्गिक हक्क प्राप्त करून घेण्याची त्यांनी शिकवण दिली. आपण दलित समाजाला विशेषाधिकार मागत नाही, केवळ समान हक्क आणि अधिकार मागत आहोत, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. चवदार तळ्यातील पाणी म्हणजे काही अमृत नव्हे की ते प्राशन करण्यासाठी अस्पृश्यांची मने हपापलेली होती, तसेच मंदिरप्रवेशासाठीचा आग्रह हा काही स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीसाठी नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, हिंदू समाजाचे घटक आहोत, तेव्हा स्पृश्यांच्या बरोबरीने विहिरी, देवालये, शाळा, बाजारहाट यासारख्या सर्व सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे प्रवेश करण्याचा आम्हाला हक्क आहे असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.’’
रेव्ह. मार्टिन किंग यांचीही भूमिका याहून काही वेगळी नव्हती. अमेरिकेचे समान नागरिक म्हणून ते कृष्णवर्णीयांना शाळात, सार्वजनिक वाहनात, बागबगीच्यात आणि प्रेक्षागृहात प्रवेशाची मागणी करत होते. आपल्याला काही विशेषाधिकार द्यावेत, अशी या कृष्णवर्णीयांनी कधीही मागणी केली नव्हती.
किंग (ज्युनियर) आणि डॉ. आंबेडकर या दोघांमधील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे हे दोन्ही सामाजिक नेते उपेक्षितांचे अनभिषिक्त राजे होते. या दोघांनाही आपल्या समाज बांधवांचे खूप प्रेम लाभले. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे एक आघाडीचे नेते म्हणून कार्य केले. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या चाहत्यांची, अनुयायांची संख्या अमर्याद राहिली आहे. दलितांच्या हृदयात त्यांच्याइतके आदराचे स्थान इतर कुणाही नेत्यास त्या काळी वा नंतरही कधी मिळाले नाही.
भारताच्या तुलनेत अमेरिकेत सणानिमित्त वा राष्ट्रनेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची संख्या अगदी कमी आहे. ‘आय जस्ट काल्ड टू से आय लव्ह यू’ हे गाणे म्हणणारे लोकप्रिय अंध गायक स्टिव्ही वंडर यांनी किंग (ज्युनियर) यांच्या जन्मदिनानिमित्त अमेरिकेत सुट्टी जाहीर करावी, यासाठी १९८०च्या दशकात मोहीम लढवली. १५ जानेवारी हा मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांचा जन्मदिन. त्यामुळे जानेवारी महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मार्टिन ल्युथर किंग यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेत ‘सार्वजनिक सुट्टी’ असते!
अमेरिकेत वर्णभेदाविषयीचा लढा शिगेला पोहोचला होता. तेव्हा म्हणजे १९६३ साली सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्तीचे आणि समानतेविषयी स्वप्न पाहणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी ‘आय हॅव अ ड्रीम’ (माझे एक सुंदर स्वप्न आहे) या शीर्षकाचे भाषण दिले होते. कातडीच्या रंगावरून कुणाही व्यक्तीचे मूल्य ठरवले जाणार नाही, अमेरिकेतील वर्णभेद संपून पूर्वाश्रमीच्या काळ्या गुलामांचे वंशज आणि या गुलामांच्या मालकांचे वंशज यांना समान वागणूक मिळेल, असे स्वप्न व्यक्त करणाऱ्या किंग यांच्या त्या शीर्षकाच्या भाषणाचा चिरंतन मूल्य असणाऱ्या भाषणांमध्ये समावेश केला जातो. वयाच्या ३५व्या वर्षी शांततेचे नोबेल पारितोषक देऊन किंग (ज्युनियर) यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय किंवा आफ्रो-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी २००९ रोजी शपथविधी घेण्याच्या आदल्या दिवशी बराक ओबामा यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त वर्णभेदाविरुद्ध लढा उभारणाऱ्याया नेत्यास आदरांजली वाहिली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
बराक ओबामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, तो क्षण म्हणजे मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी त्या दिवशी पाहिलेल्या स्वप्नाची ती प्रतीकात्मक पूर्तताच होती असे म्हणावे लागेल. कारण त्या देशात अनेक शतके अस्तित्वात असलेल्या वर्णभेदाची भिंत प्रतीक स्वरूपात ढासळली.
मानवी हक्कांच्या चळवळीत अमेरिकेतील निग्रो लोकांचा नागरी हक्कांसाठी चाललेला प्रदीर्घ लढा एक महत्त्वाचे प्रकरण आहे. त्यानंतरही पुढे अनेक वर्षे दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाची प्रथा चालूच राहिली होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नेल्सन मंडेला यांनी तब्बल २७ वर्षे तुरुंग कोठडीत राहून जागतिक पातळीवरील वर्णभेदाचा हा लढा अखेरीस जिंकला.
हिंदुस्थानातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील, दक्षिण आफ्रिकेतील किंवा इतर राष्ट्रांतील वर्णभेद यांमध्ये फरक नाही. दोन्ही पक्षपाती प्रथांची दाहकता सारखीच होती. त्यामुळेच अस्पृश्यता प्रथेविरुद्धच्या लढ्यात एकांडे शिलेदार असूनही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवी समानतेसाठी लढणारे नेते म्हणून अब्राहाम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि डॉ. नेल्सन मंडेला यांच्या बरोबरीने जागतिक पातळीवर स्थान असायला हवे.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment