या सततच्या खाली वाकण्याने माझ्या पाठीचं रूपांतर प्रश्नचिन्हात केलंय. तू उत्तर कधी देशील?
पडघम - विदेशनामा
महमूद दारविश
  • महमूद दारविश आणि त्यांच्या ‘Journal of An Ordinary Grief’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 May 2021
  • पडघम विदेशनामा महमूद दारविश Mahmoud Darwish सर्वसाधारण दु:खाची रोजनिशी Journal of An Ordinary Grief इस्त्रायल Israel पॅलेस्टाइन Palestine

महमूद दारविश (१९४१-२००८) हा पॅलेस्टाइनमधील प्रसिद्ध कवी. तो इस्त्रायल-पॅलेस्टाइनमधील संघर्षात कायम पॅलेस्टाइनमधील सर्वसाधारण जनतेची दु:खं, यातना आपल्या कविता आणि गद्यलेखनातून अभिव्यक्त करत होता. परिणामी त्याला तुरुंगवास, दडपशाही यांना तोंड द्यावे लागले आणि अनेक वर्षे बैरुत आणि पॅरिस येथे निर्वासित अवस्थेत काढावी लागली. त्याच्या ‘Journal of An Ordinary Grief’ या पुस्तकातील काही अंश इस्त्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या ताज्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर...

अनुवाद : विकास पालवे

..................................................................................................................................................................

– हे वादळ निघून जात नाही, तोवर खाली वाक प्रिय.

– या सततच्या खाली वाकण्याने माझ्या पाठीचं रूपांतर धनुष्यात केलं आहे. तू तुझा बाण कधी सोडणार आहेस?

(तुम्ही एक हात लांबवता दुसऱ्याच्या दिशेने, आणि तुम्हाला मिळतं मूठभर गव्हाचं पीठ).

– हे वादळ निघून जात नाही, तोवर खाली वाक प्रिय.

– या सततच्या खाली वाकण्याने माझ्या पाठीचं रूपांतर पुलात केलंय. हा पूल तू कधी ओलांडणार आहेस? (तुम्ही तुमचे पाय हलवण्याचा प्रयत्न करता, पण लोखंडी बेड्या हलत नाहीत.)

– हे वादळ निघून जात नाही, तोवर खाली वाक प्रिय.

– या सततच्या खाली वाकण्याने माझ्या पाठीचं रूपांतर प्रश्नचिन्हात केलंय. तू उत्तर कधी देशील? (चौकशी करणारा टेप वाजवतो, ज्यातून आवाज येतो टाळ्यांच्या कडकडाटाचा.)

जेव्हा वादळाने त्यांना पांगवलं, तेव्हा वर्तमान ओरडत होतं भूतकाळावर : ‘हा तुझा दोष आहे’ आणि भूतकाळ त्याचा गुन्हा कायद्यात रूपांतरित करत होता. भविष्यकाळाविषयी म्हणाल तर तो तटस्थ निरीक्षक होता.

जेव्हा वादळ निघून गेलं, तेव्हा ही वक्रता पूर्ण झाली. ज्याची सुरुवात आणि शेवट माहीत नाही, अशा वर्तुळात ती रूपांतरित झाली.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

– तुझ्या प्रत्येक कण्हण्यानंतर थोडा विराम घे आणि आम्हाला सांग तू कोण आहेस?

तो पुन्हा शुद्धीवर येईपर्यंत रक्त सुकून गेलं होतं.

– मी वेस्ट बँक (West Bank) इथला रहिवासी आहे.

– आणि त्यांनी तुझा छळ का केला?

– तेल अवीव इथे स्फोट झाला होता, म्हणून त्यांनी मला अटक केली.

– आणि तू तेल अवीव इथे काय करतो?

– मी बांधकाम मजूर आहे.

ही जी राज्यव्यवस्था आहे, तिच्या अंतर्गत पश्चिम किनारपट्टी आणि गाझा पट्टीतील अरब मजूर इस्त्रायलमधील शहरांत ज्या अवस्थेत काम करायचे, ती अजूनही साधारण स्थितीत आलेली नव्हती. शेवटचा पराभव झाल्यानंतर लागलीच अरब जनमताची अपेक्षा होती की, अरब मजुरांनी खंबीर राहण्यासाठी आणि जबरदस्ती ताबा घेण्याला विरोध करण्यासाठी उपासमार सहन करावी. असं असलं तरी असा ताबा असण्याच्या काळात रोजीरोटीची साधनं कशी मिळवायची, जेणेकरून ते आपला खंबीरपणा कायम ठेवू शकतील आणि जेत्यांशी सहकार्य करायला विरोध करू शकतील, या प्रश्नाचा जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांपैकी कोणीही विचार केला नव्हता.

– जेव्हा बंदुका शांत आहेत, तेव्हा तरी मला भूक लागण्याची जाणीव होण्याचा अधिकार नाहीय का?

अशा तऱ्हेने प्रश्न उपस्थित करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल? आपल्याजवळ अशी सत्ता नाहीय की, आपण राष्ट्रगीत आणि जहाल भाषणं दळून, कणीक तिंबवून त्याचं रूपांतर भाकरीत करू शकू.

दुसऱ्या सत्तेच्या ताब्यात असणाऱ्या मातृभूमीचं रूपांतर भाकरीच्या तुकड्यात होणं, हे खूपच धोकादायक आहे. सैनिकी सत्तेच्या ताब्याखाली जगणाऱ्या लोकसंख्येला वर्तमान राजकीय व सैनिकी शांततेच्या परिस्थितीमुळे जबरदस्ती उपाशी राहायला भाग पाडणं, हेही भयानक आहे.

– युद्धसदृश परिस्थितीत जेव्हा लढायांचा भडका उडतो, तेव्हा आम्ही जगण्याच्या दर्जाबद्दल फारसा विचार करत नाही. युद्ध जाहीर करा किंवा प्रत्यक्ष लढाई, आम्ही गरजेचे असतील ते सर्व त्याग करू. पण जेव्हा बंदुका शांत असतात, तेव्हा आम्हाला भूक लागल्याची जाणीव होण्याचा अधिकार आहे.

आणि आपण का विसरतो किंवा विसरण्याचा आव आणतो, की खुद्द इस्त्रायलची उभारणी अरबांच्या हातून झालेली आहे? किती हा विरोधाभास! आणि किती शरमेची गोष्ट!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ते तुम्हाला लाल सफरचंद देऊ पाहतात, आणि विचारतात, “तुम्ही सिरियामधल्या सफरचंदांची चव घेतलीय?"

तुरुंगात किती चवदार लागतात सफरचंदं! ही एकमेव अशी गोष्ट आहे- जी राखेचा रंग आगीच्या रंगात बदलते.

तुम्ही त्यांना म्हणता : “सिरियामधील सफरचंदांनी इस्त्रायली बाजारांवर हल्ला केलाय, ते मोठे आहेत, चवदार आहेत आणि स्वस्त आहेत. किबुट्झ़ समुदायाकडून निषेध होत असतानाही पापणी पडायचाही अवकाश की ज्यू सिरियामधून आलेली सफरचंदं विकत घेतात. यामुळे किबुट्झ समुदायाला त्यांच्या सफरचंदांच्या किमती कमी करणं भाग पडतं.

– तुम्ही इथे कशामुळे आलात, सिरियन बंधूंनो? आम्ही तुम्हाला दमास्कस इथल्या घरी भेटण्याची तयारी करत होतो, इथे तुरुंगात नाही.

– त्यांनी आम्हाला अटक केली आणि क्विनेत्रामध्ये चोरून परतत असल्याचा आरोप ठेवला.

– प्रत्येक वेळी परतून जाणं ही घुसखोरी ठरते. हे अरबांचं भागधेय आहे.

– ते म्हणतात की, आम्ही हेरगिरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो.

– हेरगिरी घरांवर आणि फळांच्या बागांवर?

– असंच काहीसं.

– आणि स्वत:चीच सफरचंदं चोरल्याचा आरोप त्यांनी तुमच्यावर लावला का?

– त्यांनी आमच्यावर अजून आरोप ठेवलेला नाही.

– तुम्ही कधीपासून अटकेत आहात?

– अकरा महिने, एक आठवडा आणि तीन दिवस.

अचानक ते विचारतात :

– तू त्यांना ओळखतोस. तुला वाटतं ते आमच्यावर सिरियन असल्याचा आरोप ठेवतील.

– तुम्ही सिरियन नाही आहात का?

– हो. आम्ही सिरियन आहोत.

– तुमच्यावर हाच आरोप ठेवला गेला आहे का?

– आम्हाला ठाऊक नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

जा. आणि मी अत्यानंदाच्या भावनेतून स्वत:कडेच परत येईल त्या अवधीत पुन्हा परतून ये. स्वप्नं माझं शरीर सोडत नाहीत तोवर दूर राहा. मी तुला सिगारेट ओढायला शिकवलं होतं. आणि तू मला धुम्रपानाच्या सहवासाचे धडे दिले होते. जा. आणि पुन्हा परतून ये.

– आणि तू आणखी तिला काय म्हणाला होतास?

– मी प्रेमाबद्दल बोललो नव्हतो. माझे शब्द धूसर होते, ती निद्राधीन होईपर्यंत मला ते शब्द समजलेच नाहीत. ती खूप गायची, आणि मला तिची गाणी समजत नव्हती, स्वप्नांत असल्याशिवाय. आणि ती सुंदर आहे! सुंदर! मी तिला पाहिलं त्या क्षणीच माझ्या मनातील मळभ दूर झालं. मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो आणि म्हणालो, ‘या प्रेमाचा स्वीकार कर.’

ती हसली. अगदी अंधाऱ्या क्षणांतही ती हसली.

मी तिला उसन्या घेतलेल्या एका नावाने हाक मारायचो, कारण ते नाव खूप सुंदर होतं. जेव्हा मी तिची चुंबनं घेतली, तेव्हा दोन चुंबनांदरम्यान मी इच्छांनी इतका तुडुंब भरलो होतो की, जर आम्ही चुंबनं घेण्याचं थांबवलं तर मी तिला गमावून बसेल की काय, असं मला वाटलं.

वाळू आणि पाण्याच्या मधल्या जागेवर उभं राहून ती म्हणाली, “माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

आणि इच्छा आणि छळवणूक यांच्यामध्ये असलेला मी म्हणालो, “माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

आणि जेव्हा अधिकाऱ्याने तिला ती इथे काय करतेय असं विचारलं तेव्हा ती उत्तरली, “तू कोण आहेस?" आणि तो म्हणाला, “आणि तू कोण आहेस?"

ती म्हणाली, “मी त्याची प्रेयसी आहे, हरामखोरा, मी त्याच्यासोबत या तुरुंगाच्या गेटपर्यंत आलेय त्याला निरोप द्यायला. तुला त्याच्याकडून काय हवंय?"

तो म्हणाला, “तुला माहीत असायला हवं की, मी एक अधिकारी आहे."

‘मीदेखील पुढल्यावर्षी अधिकारी होणार आहे’, ती म्हणाली.

तिने सैन्यात समाविष्ट असल्याची कागदपत्रं काढली. मग अधिकाऱ्याने स्मित केलं आणि मला तुरुंगाच्या दिशेने खेचून घेऊन गेला.

पुढच्याच वर्षी (१९६७) युद्ध सुरू झालं, आणि मला पुन्हा तुरुंगात डांबण्यात आलं. मी तिचा विचार केला : “ती आता काय करत असेल?” कदाचित ती नब्लूसमध्ये असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तरी शहरात, हलकी बंदूक घेऊन जेत्यांमधील एक होऊन, आणि कदाचित या क्षणी काही माणसांना हात वर करण्याचे हुकूम देत असेल किंवा जमिनीवर गुडघे टेकण्याचे किंवा कदाचित ती तिच्या वयाच्या व ती जितकी सुंदर होती, तितक्याच सुंदर अरब मुलीच्या चौकशी आणि छळ करण्याच्या कामावर प्रमुख म्हणून कार्यरत असेल.

तिने निरोपाचे शब्द उच्चारले नाहीत. आणि तू म्हणाला नाहीस : ‘जा, आणि परत ये.’

तू तिला सिगारेट ओढायला शिकवलंस, आणि तिने तुला धुम्रपानाच्या सहवासाचे धडे दिले होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तुला रस्त्यावर मजा करायची आहे का?

– प्रिय, मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रणगाडा किंवा तोफ, किंवा रशियन बनावटीचं कोणतंही हत्यार भेट म्हणून हवंय.

– मी तुला रणगाडा भेट म्हणून देईल, ज्यात आपण दोघंही झोपू शकू, माझ्या प्रिये, म्हणजे आपण नव्या स्थितीत सेक्स करू.

– नाही. आपण खुल्या हवेत, सुएझ कालव्याच्या किनाऱ्यावर एकत्र झोपू.

– हा! हा! हा!

– हा! हा! हा!

तुम्ही रस्त्यावरून चालता, कॉफीहाऊसमध्ये बसता. तुम्ही बसमधून प्रवास करता आणि जिभेवर ताबा ठेवता. तुम्हाला तुमची ओळख सांगायला बोलावलं जात नाही. तुमची शांतता सारं काही स्पष्ट करते. जेव्हा तुम्ही हे इस्त्रायली प्रेमसंभाषण ऐकता, तेव्हा तुम्ही हा एकमेव पवित्रा घेऊ शकता. गोड शब्दांचं युग आता संपलेलं आहे. मी तुला भेट म्हणून चंद्र किंवा लहान काळवीट देईल. नाही. वाळवंटात भटकणारी कल्पनाशीलता आणि तंत्रज्ञान व विजयाने तयार केलेली कल्पनाशीलता यांत किती मोठं अंतर आहे. ताज्या घटना आणि तंत्रज्ञानातील शोध यांचा मिलाफ म्हणजे हल्लीचे प्रेमसंभाषण होय. उत्सुकता ही आता निसर्गातल्या गोष्टींशी संवादी राहिलेली नाही.

अशा प्रकारे इस्त्रायलमधील अरब हा प्रेम करण्याच्या बाबतीतही आता मागासलेला आहे. आपल्या प्रेयसीला फुलं देऊन संबोधायला त्याला खूप वेळ लागतो. मग, आणखी किती युगं या प्राण्याला पुढील प्रकारच्या प्रेम संभाषणासाठी स्वत:ला तयार करावयास लागतील : प्रिये, मी तुला भेट म्हणून रणगाडा देईल.

आणि तुम्ही कशाबद्दल विचार करत आहात? ती दोघं रणगाड्यात कशी एकत्र झोपली असतील! आणि त्यांनी रणगाड्यात मुलांना जन्म कसा दिला असेल? आणि त्यांनी त्यांचा चांगला वेळ रणगाड्यांत कसा घालवला असेल? आता सावकाश पुढे व्हा! हे सुरक्षित असलेलं इस्त्रायली घर आहे. हे प्रेमाचं घरटं आहे. आणि हेच भविष्य.

..................................................................................................................................................................

तुम्ही टॅक्सीतून घरी येता.

तुम्ही चालकाशी अस्खलित हिब्रूत संवाद साधता. तुमच्या शारीरिक खाणाखुणा तमच्या ओळखीबद्दल काहीच जाहीर करत नाही. ‘कुठे जायचं, सर?’ चालक विचारतो. ‘अल-मुतनाबी मार्ग’, तुम्ही सांगता.

तुम्ही तुमच्यासाठी एक सिगारेट पेटवता आणि तो नम्र आहे म्हणून त्याच्यासाठीही. अचानक तो म्हणतो, “मला सांगा, आपण ही घाण कुठवर सहन करत राहायची? आम्ही अगदी वैतागलो आहे याला.”

तुम्हाला वाटतं की तो युद्धसदृश परिस्थिती, वाढणारे कर आणि पावाचे वाढते भाव यांबद्दल बोलतोय, आणि तुम्ही म्हणता, “तुझं बरोबर आहे. हे खरंच वैतागवाणं आहे.” मग तो पुढे बोलत राहतो, “या घाणेरड्या अरेबिक नावांना आणखी किती काळ हे राज्य चिकटून बसणार आहे? आपण त्यापासून मुक्ती मिळवायला हवी आणि ती नावं पुसून टाकायला हवीत.” ‘ते कोण आहेत?’ तुम्ही विचारता. ‘अर्थात अरबी’, तो तुच्छतेने म्हणतो. तुम्ही विचारता का, आणि तो म्हणतो, ‘कारण ते गलिच्छ आहेत.’

तुम्ही त्याच्या उच्चारावरून ओळखता की तो मोरोक्कामधला आहे. तुम्ही त्याला विचारता, “मी इतका गलिच्छ आहे? म्हणजे उदाहरणार्थ तू माझ्यापेक्षा स्वच्छ आहेस का?”

तो आश्चर्यचकित होऊन विचारतो. ‘तुम्हाला काय म्हणायचं आहे?’

तुम्ही त्याला यावर विचार करायला सांगता, आणि त्याला कळतं पण त्याचा विश्वास बसत नाही. ‘थट्टा करणं थांबवा!’ तो म्हणतो.

जेव्हा तो तुमचं ओळखपत्र पाहतो, तेव्हा त्याचा विश्वास बसतो की तुम्ही अरब आहात. तो म्हणतो, “मला ख्रिश्चनांबद्दल असं बोलायचं नव्हतं.” तुम्ही मुस्लीम असल्याचं त्याला सांगता. मग तो म्हणतो, “मला सगळ्या मुस्लिमांबाबत असं नव्हतं म्हणायचं. माझा रोख फक्त गावाकडच्या मुसलमानांकडे होता.” तुम्ही त्याला सांगता की, तुम्ही एका मागासलेल्या गावातून आला आहात, जे गाव त्याच्या राज्याने उद्ध्वस्त केलं आणि त्याने जशी इच्छा मनात धरली असती त्याप्रमाणे पृथ्वीच्या चेहऱ्यावरून पुसून टाकलं. आणि तो म्हणतो, ‘राज्याविषयी आपल्याला पूर्ण आदर आहे!’

तुम्ही टॅक्सीतून बाहेर पडता आणि चालत घरी परतण्याचा निर्णय घेता. तुम्हाला रस्त्याची नावं वाचण्याचा झटका येतो. खरं तर, त्यांनी सगळी नावं मिटवून टाकली आहेत. सालेह अल-दीन मार्ग आता श्लोमो मार्ग झालाय. तुम्हाला आश्चर्य वाटतं की, ‘त्यांनी अल-मुतनाबीचं नाव तसंच का ठेवलंय?’ पण जेव्हा तुम्ही अल-मुतनाबी मार्गावर येतो तेव्हा त्याचं नाव पहिल्यांदाच हिब्रू भाषेत वाचता आणि तुमच्या लक्षात येतं की ते झालंय ‘मोंट नेवी' (Mont Nevi) अल-मुतनाबी नाही (AI-Mutanabbi) ज्याची तुम्ही कल्पना केली होती.

..................................................................................................................................................................

तुम्हाला घर भाड्याने घ्यायचंय?

तुम्ही वर्तमानपत्रांत जाहिरात पाहता आणि फोन करण्यासाठी धावता :

‘मॅडम, मी आपल्या भाड्याने द्यायच्या खोलीविषयीची जाहिरात पाहिली. मी ती पाहू शकतो?’

तिचं आनंदाने ओतप्रोत भरलेलं हसणं तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्हालाही

आशा वाटू लागते : “सर, हे माउंट कार्मेल येथील उत्कृष्ट घर आहे. तुम्ही या आणि लागलीच राखीव करून ठेवा.”

तुम्ही फोनकॉलचे पैसे द्यायला विसरता आणि तातडीने तिला भेटायला जाता. तिला तुम्ही आवडता आणि तुम्हीही भाडं कधीपासून सुरू करायचं अन् ते कसं भरायचं याबाबतच्या अटी मान्य करता. आणि जेव्हा तुम्ही करारावर सही करायला म्हणून बसता तेव्हा तिच्या डोक्यात वीज चमकते. “काय? अरब! माफ करा, सर. तुम्ही उद्या पुन्हा फोन करा.”

हीच घटना अनेक आठवडे पुन्हा पुन्हा घडते. प्रत्येक वेळी तुम्ही रिकाम्या हातांनी परतता. तुम्ही घरांचे सज्जे पाहता आणि त्यांच्या मालकांविषयी चौकशी करता देशत्याग व निर्वासित या वाऱ्यांमुळे जे नेहमी गैरहजर असतात. अशी किती घरं बांधली गेलीयत मालकांकडून जे त्यात राहिलेच नाहीत? या घरांचे मालक अजूनही आपल्या खिशात घरांच्या चाव्या बाळगतात आणि त्यांचे हृदय परतून येण्याच्या अपेक्षेने तुडुंब भरलेले असते. परतून यायचं पण कुठे? जर त्यांच्यापैकी एखादा परतून आलाच त्याच्या घरी, तर त्याला त्याच्या चाव्या वापरायची परवानगी दिली जाईल? त्याने बांधलेल्या घरातील एखादी खोली तरी त्याला भाड्याने घेणं शक्य होईल?

या सगळ्यावर कडी म्हणजे, ते तुम्हाला म्हणतात, “झायोनिझमने कोणतेही गुन्हे केले नाहीत. त्याच्याबाबतीत एवढंच म्हणता येईल की, त्याने मायभूमी नसलेल्या लोकांना लोक नसलेल्या मायभूमीत आणलं.”

तुम्ही त्यांना विचारता की, ही घरं कोणी बांधली. मग ते तुम्हाला एकटं सोडतात आणि चोरलेल्या घरांतल्या विश्वात आणखी मुलं जन्माला घालतात.

..................................................................................................................................................................

शब्दार्थ

१. किबुट्झ - इस्त्रायलमध्ये सामुदायिक रीतीने राहणारा समूह. या समूहात शेती किंवा औद्योगिक क्षेत्रात काम केल्यानंतर मिळणारा नफा समप्रमाणात वितरीत केला जातो. यात समाजवाद आणि झायोनिझम यांची सरमिसळ आहे.

२. क्विनेत्रा - सिरियामधील एक शहर.

३. नब्लूस - वेस्ट बँकच्या (West Bank) उत्तरेकडील एक शहर.

..................................................................................................................................................................

अनुवाद : विकास पालवे

vikas_palve@rediffmail.com

 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......